शनिवार, २९ मार्च, २०१४

तिकीट मिळालं का?



 - डॉ. सुधीर रा. देवरे

       आज जिकडे तिकडे तिकीट मिळालं का? असा प्रश्न ऐकू येतोय. ज्याचा तिकिटाशी संबंध येतो तो तर असे विचारतोच पण ज्याचा अशा तिकिटाशी काहीही संबंध नाही तो सुध्दा तिकिटाबद्दलच बोलतो, अशा पध्दतीने आजचे वातावरण तिकीटमय झाले आहे.
         आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाचा तिकिटाशी संबध येतो तो प्रवासात. बसचे तिकीट काढणे, रेल्वेचे तिकीट काढणे. वगैरे. बसचे तिकीट काढणे तसे खूप सोपे. तिकिटासाठी पैसे द्यावे लागत असले तरी बसमध्ये जाऊन बसल्यावर तिकीट काढण्याची सोय तरी आहे, पण रेल्वेचे तसे नाही. रेल्वेचे तिकीट आधीच काढावे लागते. ते पुन्हा कन्फर्म करावे लागते. काही वेळा तिकीट एजंट कडून मिळवावे लागत असल्याने अनेक लोक तिकिटावरच्या छापलेल्या किमतीपेक्षा जास्त पैसे देऊन रेल्वेचे तिकीट काढतात. आणि तिकीट कन्फर्म झालं तर आताच्या तिकीट मिळणार्‍या लोकांइतका सर्वसामान्य माणसाला आनंद होतो.
         सांगण्याचा मुद्दा असा की आजच्या काळात तिकीट मिळणे ही फार जबरदस्त गोष्ट झाली आहे. साध्या रेल्वेच्या तिकिटाला किमतीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागत असतील तर मग प्रत्येक जिल्ह्याला फक्त एकच तिकीट असल्यावर या तिकिटाची किमत काय जबरदस्त असेल, याची कल्पना करा. या जबरदस्त किमतीच्याही पुढे बंद दाराआड बोली बोलून लिलाव पध्दतीने तिकिटे खपतात. का खपतात अशी तिकिटे?
         कारण सांगता यायला पाहिजे. सगळ्यांनाच सांगता आले पाहिजे. अगदी सर्वसामान्य माणसाला सुध्दा या प्रश्नाचे उत्तर देता आले पाहिजे: या तिकिटावर जर तुमचा लग्गा लागलाच तर पाच वर्षात तुम्हाला तुमची प्रॉपर्टी पंधरावीस पटीने सहज वाढवता येते. म्हणून आज काही कोटी गुंतवल्यावर पाच वर्षात जर काही करोड कोटी रूपये मिळवता येणार असतील तर व्यापार्‍यांनी या व्यवसायात उतरलेच पाहिजे की नाही. व्यवसाय आणि व्यापारी हे शब्द इथे चुकून आलेले नाहीत. अगदी जाणीवपूर्वकच लिहिले आहेत. म्हणून तिकीट देणारी पार्टी सुध्दा नुसत्या पैसे मोजणार्‍यालाच तिकीट देते असे नाही, तर ज्याला तिकीट देऊन गाडीत बसवले जाते ती असामी त्या गावापर्यंत पोचलीच पाहिजे, अशी काळजीही घेतली जाते. मग रस्त्याने त्याने या गाडीचे (म्हणजे व्यवस्थेचे) कितीही नुकसान केले तरी हरकत नाही. 
         म्हणून तर तिकिटासाठी या पक्षातून त्या पक्षात. त्या पक्षातून फालतू पक्षात आणि फालतू पक्षातून अपक्षात अशा कोलांट्या उड्या मारून तिकीट मिळवायचे आणि लग्गा लागायची वाट पहायची. जो कोलांट्या उड्या मारण्यात जास्त पटाईत तो लग्गा लावून घेण्यातही पटाईत ठरतोच. लोक विकायला मोकळेच आहेत. तुम्ही प्रयत्न तर करा, हे त्यांचे ब्रीद आहे. अ‍ाणि त्यांचे हे ब्रीद आपण सगळे जण यशश्वी करत राहतो. म्हणजे दारूच्या बदल्यात, पार्टीच्या बदल्यात, किरकोळ नोटांच्या बदल्यात, केव्हा केव्हा मतदान केंद्रापर्यंतच्या केवळ वाहन सौख्यातही आपण स्वत:ला विकायला तयार असतो. आणि मग पुढील पाच वर्ष चावडीवर फक्त गप्पा मारत राहतो : निवडून आलेले लोक कसे नालायक आहेत पहा!!!
         (या ब्लॉगमधील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

    - डॉ. सुधीर रा. देवरे        
       इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा