शनिवार, ३० सप्टेंबर, २०१७

बोली आणि भाषा





-         डॉ. सुधीर रा. देवरे

      बोली या आदिम भाषा आहेत. संपूर्ण भारतभर आज पंधराशे बोली भाषांचे अवशेष सापडतात. म्हणजे या पेक्षा कितीतरी अधिक बोलीभाषा पूर्वी अस्तित्वात असाव्यात. परंतु त्यांच्यात होणारा दैनंदिन मौखिक व्यवहार ठप्प झाल्यामुळे काळाच्या ओघात त्या मरण पावल्या. मृत्यू पावलेल्या भाषा फक्‍त मौखिक स्वरूपात परंपरेने अस्तित्वात होत्या. माणसाच्या अडाणीपणामुळे त्या लिहिल्या जात नव्हत्या. त्या लिहिल्या जात नव्हत्या म्हणून त्यांना लिपी नाही. या भाषा नामशेष झाल्यामुळे त्या कशा स्वरूपाच्या होत्या, हे आज कोणालाही सांगता येत नाही. कारण या भाषांचे दस्ताऐवजीकरण (Documentation) झालेले नाही. आज अस्तित्वात असलेल्या बोली या सुद्धा यापुढे आपण जागरूक राहिलो नाहीत तर कालांतराने नामशेष होणार आहेत. तसे होऊ द्यायचे नसेल तर आज आपल्याला माहीत असलेल्या बोलींचे (त्यांच्यासाठी कोणतीही लिपी उपलब्ध नसली तरी) माहीत असलेल्या लिपीत आपण लिहून ठेवल्या पाहिजेत. मग या बोली कोणत्याही असोत. झाडी बोली असो, मालवणी असो की कोकणी असो. या भाषा ज्या भाषेच्या घटकबोली ठरतात, त्या उपलब्ध लिपीत त्या लिहून ठेवल्या पाहिजेत. आता उल्लेख केलेल्या भाषा देवनागरी लिपीत आपण शब्दबद्ध करून ठेवल्या पाहिजेत. म्हणजे काळाच्या ओघात त्यांच्यातील दैनंदिन व्यवहार ठप्प झाला तरी तिचे स्वरूप अशा दस्तऐवजीकरणातून भाषाभ्यासकांना उपलब्ध होऊ शकेल. अशा दस्तऐवजीकरणाचे काम ढोल आणि भाषा लोकसर्वेक्षण या प्रकल्पातून होत आहे.
      बोलली जाणारी बोली आणि लिखाण, ज्ञान व व्यवहार यांसाठी वापरली जाणारी ती भाषा असे आपण भाषांचे वर्गीकरण करणे चुकीचे आहे. कारण प्रमाणभाषा ह्या कृत्रिम व अपुर्‍या ठरतात तर बोली याच मूळ उत्स्फूर्त भाषा ठरतात. सर्व घटक बोली गटांना समजेल अशी प्रमाणभाषा आपोआप रूढ होत असते, ती बोलींच्या खांद्यावर उभे राहून. प्रमाणभाषा ह्या बोलींकडूनच भाषिक सामर्थ्य घेऊन प्रवाहित होत असतात. प्रमाणभाषेतील बहुतांश शब्दही बोलींकडून उचललेले असतात. तरीही प्रमाणभाषा बोलणारे लोक बोलीभाषांना ग्राम्य, अशुद्ध व कमी प्रतीची म्हणून हेटाळणी करतात. प्रमाणभाषांचा उगम बोलींमधून होत आला आहे, हे सर्वसामान्य माणसांच्या लक्षात आले तर असे होणार नाही. उदाहरणार्थ, मराठीच्या घटक बोली म्हणून अहिराणी, वैदर्भी, कोकणी, सातारी, मालवणी, नगरी, कोल्हापूरी अशा बोली बोलणार्‍या अडाणी लोकांना प्रमाण मराठी समजते, पण प्रमाण मराठी बोलणार्‍या सुशिक्षित लोकांना या बोली काही प्रमाणात समजत नाहीत. यावरून हा मुद्दा लक्षात येईल.
      जी प्रमाणभाषा आपल्या घटक बोलींचे शब्द जास्तीतजास्त प्रमाणात उपयोजित करते, ती भाषा दिवसेंदिवस समृद्ध होत राहते. उलट जी भाषा आपल्या तथाकथित शद्धुत्वाच्या नावाखाल़ी सावळे पाळायला लागते ती लवकर मृत होते. याचे ठळक उदाहरण म्हणजे संस्कृत भाषा. संस्कृत भाषेत प्रचंड प्रमाणात ग्रंथ लिखाण झालेत. दोन जागतिक महाकाव्य -रामायणमहाभारतसंस्कृत भाषेत असूनही या भाषेने, म्हणजे ही भाषा ज्या मूठभर लोकांच्या हाती होती, त्यांनी सर्वसामान्य लोकांसाठी आपली कवाडे बंद करून घेतली. तत्कालीन विशिष्ट वर्गाने संस्कृत वाचायलाही सामान्य लोकांवर बंदी घातली. यामुळे लवकरच संस्कृत भाषा मृत झाली. हे उदाहरण समोर ठेवून भाषिक अस्मिता आपण तारतम्याने वापरायला हवी. आम्ही बोलतो वा लिहितो तेवढीच भाषा शुद्ध आणि इतर बोलतात वा लिहितात ती ग्राम्य असे होता कामा नये. म्हणून आपण बोलींसह सगळ्याच भाषांचा आदर करूया. मग ती भाषा अहिराणी असेल, गोंडी असेल, पारधी असेल, कोकणा असेल, झाडी असेल, मराठी असेल, हिंदी असेल, गुजराथी असेल. इग्रंज़ी ही परकीय भाषा असली तरी आपण तिचा आदर करूया. आपल्या मायबालीच्या प्रेमाखातर आपण कोणत्याही दुसर्‍या भाषेचा दुस्वास करता कामा नये. भाषा ही माणसं जोडण्यासाठी आहे, तोडण्यासाठी नाही. भाषा-प्रेमाने माणसं तुटत असतील तर आपण आपल्या भाषेवर आंधळं प्रेम करतो, असं म्हणावं लागेल. आपल्या भाषेवर प्रेम करताना दुसर्‍या भाषेचा द्वेष होता कामा नये. दुसर्‍या भाषेलाही अगत्याने समजून घेणे गरजेचे आहे. भाषा आपण अशा जोडत गेलो तर माणसंही आपोआप जोडली जातात.
      सारांश, भाषा मरायला नकोत यासाठी आपण जागृत राहिले पाहिजे. कारण भाषेत त्या त्या भौगोलिक परिसरातील लोकसंस्कृती सखोल मुरलेली असते. भाषांच्या माध्यमातून सांस्कृतिक ओळख होत असते. कोणत्याही भाषेत ग्रामीणत्व, अशुद्ध, अश्लीलता असे काहीही नसते. भाषेतील ह्या संकल्पना सापेक्ष असतात. शहरी माणसाच्या दृष्टिकोनातून एखादा शब्द ग्राम्य वा अश्लील ठरत असेल तर ग्रामीण लोकांच्या दृष्टिकोनातून तो दैनंदिन नैसर्गिक व्यवहार ठरू शकतो.
      (पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘अहिराणीच्या निमित्ताने: भाषा’ या पुस्तकातून साभार. या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह  ब्लॉगचा  संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
  इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
(दिनांक: 01 9 -2017)

गुरुवार, १४ सप्टेंबर, २०१७

बाबा-बुवांचे सामाजिक काम


-         डॉ. सुधीर रा. देवरे

     भारतात बाबा-बुवांचे साम्राज्य प्रचंड वाढले आहे. अलिकडे खाजगीत एक चावळ सुरू झालीय की म्हणे हिंदु धर्माच्या बुवांनाच टारगेट केलं जातं. म्हणून इथं एक गोष्ट मुद्दाम नमुद करावी लागेल की हे बुवा सगळ्याच धर्मात आहेत आणि आपली स्वार्थिक बजबजपुरी त्यांनी आपापल्या धर्मात प्रचारून आपली दुकाने यथास्थित सुरू ठेवलीत. पण समजा हिंदू धर्मातले बुवा टारगेट केले जातात असं घटकाभर मान्य केलं तरी ज्याअर्थी हिंदू चोरांची बाजू आपण घेत नाही, ज्याअर्थी हिंदू खुन्यांची बाजू आपण घेत नाही त्याअर्थी केवळ हिंदू धर्मातले आहेत म्हणून बलात्कारी बाबांची बाजू आपण का घ्यावी?
     बर्‍याच भाबड्या लोकांचं असंही मत आहे की जे सापडलेत ते बलात्कारी आणि गुन्हेगारी बाबा होते. पण मी ज्या बाबाच्या भजनी लागलोय तो बाबा सर्वगुणसंपन्न संतशिरोमणी असल्यानेच अजून कायद्याच्या कचाट्यात सापडला नाही.
     बाबा-बुवांचे विविध आश्रम भारतभर कुठे कुठे हजारो एकर जमिनीवर उभारलेले असतात. (अशा जमिनी शासनाकडून मिळवलेल्या असतात आणि आसपासच्या बळकावलेल्याही.) भारताबाहेरही त्यांचे साम्राज्य फैलावलेले असते. आधी अंधश्रध्दाळू लोक बाबांच्या नादी लागतात. नंतर सर्वदूर पसरलेल्या अनेक भ्रष्ट लोकांना आतून जाणवत असतं की आपलं काम पापाचं आहे. आपण कमवतो ते सरळमार्गी नाही. आपण समाजाची लुबाडणूक करतो. असे लोक पापक्षालणार्थ आपल्या पापाच्या काळ्या कमाइचा काही हिस्सा या आश्रमात ओतत असतात आणि पाप धुतलं गेलं असं समजत राहतात. अशा पध्दतीने आश्रमात प्रचंड मोठ्या प्रमाणात देणग्या येत असतात. मागितल्या जातात. वरून या धार्मिक दिसणार्‍या वावटळीत अनेक खंगलेले, पिचलेले, पापभिरू, देवभोळे लोकही नंतर सापडतात आणि ते आपला कष्टाचा पैसा इथे उधळतात. आपल्या जीवनाचे योग्य चीज व्हावं असं त्यांना देवभोळेपणामुळे वाटत असतं. बाबांभोवती जोडल्या गेलेल्या प्रचंड भक्‍तगणांत राजकारणी लोकांना मतदार‍ दिसू लागतात. या मतदारांकडून एकगठ्ठा मतदान करून घेण्यासाठी राजकारणीही अशा बाबांच्या चरणी लीन होऊ लागतात. (धार्मिक आणि राजकीय यांची सत्तापिपासू साठ-गाठ झाली नसती तर आज इतकी भयानक परिस्थिती उद्‍भवली नसती.)
          बरेच बाबा आणि त्यांचे भक्‍तगण असा प्रचार करतात की ते खूप मोठे सामाजिक कामे सुध्दा करतात. आश्रमात येणार्‍या लोकांसाठी दहा रूपयात जेवण देणे, दहा रूपयात प्रसाद देणे, मेडिकल कॉलेज चालवणे, आणि या कॉलेज अंतर्गत कमी पैशात रूग्णसेवा करणे, रक्‍तदान शिबीरे घेणे, नेत्रदान, अवयव दान करणे, विशिष्ट प्रकारचे प्रशिक्षण देणे, गावांत छोटे छोटे तलाव बांधणे, आश्रमात गरीबांना मजुरीला लावणे आदी बाबींना बाबांचे समाजकार्य म्हटले जाते.
     कोणत्याही धर्मातला आश्रम, कोणताही बुवा कधीही इनकमटॅक्स भरत नाही. पण वर्षाला तीन लाख कमावणार्‍या कर्मचार्‍याने इनकम टॅक्स भरला पाहिजे. तसा फॉर्मही भरला पाहिजे ही सक्‍ती. इनकम टॅक्स पूर्णपणे माफ होण्यासाठी बाबा आपले प्रचंड सामाजिक काम दाखवत असतात. (धार्मिक कामांचा ट्रस्ट म्हणून टॅक्स माफी असतेच.) मात्र या सामाजिक कामातूनही बाबांचा पैसा खर्च होण्याऐवजी वाढत जातो. तलाव गावागावातल्या भक्‍त मंडळीकडून श्रमदानाने केला जातो. स्थानिक देणगीदारांच्या खर्चातून केला जातो. पण आश्रम त्यासाठी खर्च झालेला दाखवतो. मेडीकल कॉलेज मधून‍ शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांकडून प्रचंड मोठ्या देणग्या घेतल्या जातात. मात्र आश्रम हा शैक्षणिक खर्च दाखवतो. भक्‍तांच्या लंगर साठी रोज फुकट जेवण द्यायला हरकत नाही. पण प्रत्येक जेवणाचे दहा रूपये घेतले जातात. हा नफा. जेवण आणि प्रसादावर खर्च दाखवला जातो. ‍रूग्णांवर जे कमी पैशात वा फुकट इलाज केले जातात, तो ही पैसे जिरवायचा एक चोर मार्ग आहे. ही समाजसेवा म्हटली जाते. पण यातून प्रचंड पैसा झाकण्याचा प्रयत्न होतो. काळा पैसा पांढरा केला जातो. रक्‍तदान, नेत्रदान, अवयवदान यातूनही काळाबाजार होतो.
     आपण फक्‍त पाच वर्षांसाठी सरकार निवडून देतो. निवडणूकीत‍ नेत्यांनी दिलेली आश्वासने पाळावीत म्हणून आपण त्यांच्यावर दबाव आणतो. पण हे बाबा तर कोणत्याही निवडणूकीशिवाय स्वयंभू तहहयात आपले धार्मिक लोकप्रतिनिधी होऊन आपल्याला लुटत असतात. त्यांच्या एवढ्याश्या कामांचंही आपण किती कौतुक करतो. अशा बाबांच्या आश्रमातून धार्मिक कामं होतात असं आपण समजतो. (हे बाबा समाजाला उत्तरदायित्व नसतात.  समाजाला वा शासनाला त्यांना ऑडीट द्यायचे नसते. आपल्या आश्रमात ते  हुकुमशाही राजवट चालवणारे सत्ताधीश असतात.)
     सारांश, आजच्या शैक्षणिक संस्था चालवणारे लोक जसे शिक्षण महर्षी नाहीत, तसे हे बाबाही संतशिरोमणी नाहीत. सर्वच धर्मातल्या अशा बाबा- बुवांचा अध्यात्माशी काडीचा संबंध नसतो. धार्मिकतेशीही संबंध नसतो. यांची तुलनाच करायची झाली तर धर्माच्या- देवभोळेपणाच्या अंधश्रध्देवर चालणारे हे मॉल असतात!   
      (या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह  ब्लॉगचा  संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

शुक्रवार, १ सप्टेंबर, २०१७

मौन धारण करू या!




-         डॉ. सुधीर रा. देवरे

     संत साक्षात परमेश्वर रामरहीम बाबांना साक्षात्काराने आधीच समजून चुकलं होतं की कोर्ट आपल्याला दोषी ठरवणार. आपल्या दैवी लिला कितीही परमार्थिक- अध्यात्मिक असल्या तरी तथाकथित मानवी कायद्यातील तरतुदींनुसार आपल्या लिलांकडे विकृत दृष्टीने पाहिलं जाईल आणि नको ती शिक्षा कोर्टाकडून आपल्याला ठोठावली जाईल, हे बाबा दिव्य दृष्टीने पाहू शकत होते. म्हणूनच अशा पामरांकडून होणारे हे पाप टाळण्यासाठी बाबांनी आधीच खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या कोट्यावधी शिष्यांपैकी फक्‍त दीड लाख भक्‍तांना सिरसाहून पंचकुलाकडे पदयात्रा करत रवाना केलं. आपल्या अध्यात्मिक भाषेचा या कायदेशीर नास्तिक लोकांच्या ठायी कवडी इतकाही उपयोग होणार नाही, हे ओळखून बाबांनी इहवाद्यांना समजेल अशा आपल्या खाजगी भाषेत अनुयायांना बोलायला भाग पाडलं. पोपट भाषेतून शिष्य चॅनल्सना खुलेआम सांगत होते, बाबांना हात लावाल तर रक्‍ताच्या नद्या वाहतील. प्रेतांचा खच पडेल. संपूर्ण देश आगीच्या भक्षस्थानी पडेल. खबरदार! आणि भक्‍तांसोबत असलेल्या लाठ्या, काठ्या, पेट्रोल बाटल्या याची साक्ष देत होत्या. या भक्‍तांत सुशिक्षित समजली जाणारी तरूणाईही दिसत होती. म्हणजे या अध्यात्मिक साधनेत आजचे आधुनिक तरूणही आपले कामधंदे सोडून सामील आहेत हे या देशाचे थोर भाग्य.
     साक्षात संत परमेश्वरावर आलेलं संकट आणि त्यांच्या परम भक्‍तांनी उच्चारलेले श्याप यात राजा हवालदिल झाला. स्वत:च बाबांच्या दीक्षेने पावन झालेले आणि आपल्या डोक्यावरच्या राजमुकुटासाठी खारीचा नव्हे, हत्तीचा वाटा उचललेल्या संतांच्याच विरूध्द जाणे म्हणजे गुरूद्रोहच. प्रजेच्या बाजूने उभं राहवं का गुरूच्या? राजा‍ विचारात पडला. आपलेच महत्वाचे असतात शेवटी. सिंहासनाच्या शपथेप्रमाणे वागलो आणि सिंहासनच खेचलं गेलं तर! राजाने ठरवलं, आपण धृतराष्ट्र होऊ या. अंध होऊन थोडा वेळ गंमत पाहू या. गुरूद्रोह करण्यापेक्षा नंतरची सारवासारव करणं सोपं. दोन ओळींचं एक ट्वीट केलं की नव्वद टक्के कर्तव्य संपतं. उरला प्रश्न ठार झालेल्या, जखमी झालेल्या लोकांचा आणि जाळपोळ- तोडफोडीतल्या नुकसानीचा. प्रजेकडून घेतलेल्या पैशातूनच अशा वेळी प्रजेला काही भाग परत करता येतो. मग बाकी काही उरतच नाही. निर्णय पक्का झाला.
     कायद्याच्या बाजूने, संत परमेश्वराच्या बाजूने, राजाच्या बाजूने ज्याने त्याने ठरल्याप्रमाणे आपापल्या भूमिका बरोबर निभावल्या. दोष प्रजेचा होता. जो कर्तव्यासाठी कामावर गेला तो मेला. जो प्रपंचासाठी बाहेर पडला तो जखमी झाला. ज्यांच्या गाड्या जाळल्या गेल्या त्यांनीच लाठ्या खाल्या. संत कृपेने सव्वाशे कोटींपैकी फक्‍त सदतीस लोक मेले आणि तिनेकशे जखमी झाले. संत परमेश्वराला घ्यायला विमान आलं.
     या सर्व घटनांमागील कार्यकारणभाव भाबड्या लोकांना आणि कायद्याला कळत नाही म्हणून निरूपण करण्यासाठी शेवटी साक्षात महाराजांना अवतरावं लागलं. साक्षात महाराज हे उच्च दर्जाचे अध्यात्मिक गुरू असले तरी त्यांनी आता कायद्याचीही शपथ घेतली आहे. पण निरूपण करताना त्यांनी थोर अध्यात्मिक सत्यच सांगितलं. कायद्यापेक्षा कोट्यावधी लोकांच्या भावना श्रेष्ठ आहेत. त्या लक्षात घेऊन अजूनही संत परमेश्वरांना निरपराध घोषित करता येऊ शकतं!
     आता आपण मौन धारण करू या! दुसरं आपल्याला काय करता येतं? खरं तर हा विषय संपून आजच सात दिवस झालेत. आणि आपल्याला तर रोज नवीन विषय हवा. कालचा विसरून. नवा बाबा उजेडात आला की हा बाबा पुन्हा थोडा फार आठवेल.

      (या ब्लॉगचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/