शनिवार, २६ एप्रिल, २०१४

माझ्या ब्लॉगला दोन वर्ष पूर्ण




- डॉ. सुधीर रा. देवरे
         बरोबर दोन वर्षांपूर्वी दिनांक 29 एप्रिल 2012 ला मी दर शनिवारी साप्ताहीक ब्लॉग लिहायला सुरूवात केली. योगायोगाने या दोन वर्षात एकही शनिवार ब्लॉगशिवाय टळला नाही. म्हणजेच एकाही आठवड्याचा खंड जाऊ न देता आणि शनिवार संध्याकाळ ही वेळही न टाळता नियमितपणे ब्लॉग लिहीत आलो. खूप लांबलचक लेख लिहिण्यापेक्षा विचारांची थोडक्यात व संपृक्‍त मांडणी करायची शिस्त स्वत:ला लावून घेतली आणि ती शिस्त आजपर्यंत पाळतोय.  
         या सर्व छोटेखानी लेखांत सामाजिक, धार्मिक, राजकीय, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, भाषिक, सुधारक, प्रबोधनात्मक, पर्यावरण आदी विषय येत गेले. देशात (वा विदेशात) त्या त्या वेळेला घडलेल्या घटनांवर ‍प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया म्हणून हे लेखन प्रासंगिक भाष्य असले तरी हे लेख केवळ प्रा‍संगिक आहेत असे म्हणता येणार नाही. हे लेख केव्हाही वाचताना विशिष्ट संदर्भात कालाय ठरावेत असा दृष्टीकोन ठेऊन मी लिहीत गेलो. म्हणजे घटना विशिष्ट काळातली असली तरी तिचा परिप्रेक्ष आजच्या अन्य घटनांकडे नक्कीच निर्देश करेल याचा विचार लिखाण होताना केला आहे.
         या ब्लॉगचे आंतरजालावर हे स्वतंत्र संकेतस्थळ तर आहेच पण हेच ब्लॉग मी तात्काळ त्या त्या दिवशीच ग्लोबल मराठी या संकेतस्थळासह फेसबुकवरही टाकतोय. फेसबुकच्या भिंतीसोबतच जवळ जवळ पन्नास गटांवर हे लेख मी टाकत असतो. त्यामुळे आंतरजालावर ब्लॉग साइट, ग्लोबल मराठी आणि फेसबुक या सर्वांवर प्रत्येक लेख जवळपास दोन हजार वाचक वाचतात असा माझा अंदाज आहे. तरीही या ब्लॉगला प्रायोजक मिळविण्याच्या खटाटोपात मी अजूनही पडलो नाही. भारताच्या संविधानाने दिलेल्या अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याला अनुसरून व्यक्‍त होणे आणि अप्रत्यक्षपणे झालेच तर प्रबोधन एवढ्याच धेयाने प्रेरित होऊन हे लिखाण मी करतोय. यातून मला जो आनंद मिळतो त्याचे वर्णन मी इथे शब्दात मांडू शकणार नाही.
         दोन वर्षातील या छोट्या लेखांची संख्याच सांगायची झाली तर ती एकशेआठ इतकी झाली आहे. पैकी काही निखळ प्रासंगिक स्वरूपाचे लेख वगळून या ब्लॉगचे पुस्तक प्रकाशित व्हावे असे मला वाटते. (कोणी प्रकाशक हे पुस्तक काढण्यासाठी उत्सुक असतील तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा ही विनंती.) या पुढेही मी ब्लॉग लिहीत राहीन. पण दर शनिवार संध्याकाळ हे सातत्य या पुढेही पाळता येईल की नाही या बद्दल मीच साशंक आहे. आपल्या सर्वांच्या ‍अभिप्रायांमुळे, प्रतिक्रियांमुळे, टिपण्यांमुळे आणि विशेषत: आपल्या प्रेमामुळे मला ऊर्जा मिळत गेली, म्हणून ब्लॉगचे लेखन सातत्य मी आतापर्यंत तरी टिकवून आहे. यापुढेही सर्व वाचकांचे असेच प्रेम मिळत राहील अशी आशा बाळगतो. धन्यवाद.
   - डॉ. सुधीर रा. देवरे         
       इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
     

शनिवार, १९ एप्रिल, २०१४

अहिरानी भाषेवरील चार पुस्तकांचे प्रकाशन


                                                       -         डॉ. सुधीर रा. देवरे

          बर्‍याच दिवसांपासून प्रकाशनाची वाट पहात असलेली माझी चार अहिरानी पुस्तके नुकतीच पुणे येथील पद्मगंधा प्रकाशनाकडून प्रकाशित करण्यात आलीत.
          अहिरानी लोकसंस्कृती, अहिरानीच्या निमित्ताने: भाषा, अहिरानी गोत  अहिरानी वट्टा  अशी या चार पुस्तकांची नावे असून दोन ‍पुस्तके संपूर्ण अहिरानी माध्यमात तर दोन मराठी माध्यमात आहेत. या चार संदर्भ ग्रंथांसह माझी आतापर्यंत एकूण नऊ पुस्तके प्रकाशित झालीत.   
            अहिरानी लोकसंस्कृती या पुस्तकात एकूण अठरा लेख असून शोधनिंबधाच्या स्वरूपातील या लेखांतून अहिरानी भाषा व संस्कृतीतील अनेक रहस्य उलगडली गेली आहेत. अहिरानी प्रदेशातील दैवते, समाज, कला आणि संस्कृती यांचे परस्पर अनुबंध येथे स्पष्ट होतात. लोकसंस्कृतीतील काही मिथके समजून घेण्यासाठीही अभ्यासकांना- संशोधकांना हा ग्रंथ संदर्भांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास वाटतो. यातील काही निबंध वेगवेगळ्या राष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये वाचले गेले आहेत तर काही लेख महाराष्ट्र साहित्य पत्रिका, ‘परिवर्तनाचा वाटसरू आणि मी संपादित करीत असलेल्या अहिराणी ढोलमध्येही या आधी प्रकाशित झाल आहेत.     
            अहिरानीच्या निमित्ताने: भाषा या पुस्‍तकात अठरा लेख समाविष्‍ट केले आहेत. हा लेखसंग्रह अहिरानीच्या निमित्ताने असला तरी यातील घटकांगे भारतातील सर्वच भाषांवर भाष्य करतात. बोलीभाषा, लोकसाहित्य, आदिवासी साहित्य, लोकसंस्कृती, लोकजीवन आदी क्षेत्रांतील भाषाभ्यासकांना व संशोधकांना हा ग्रंथ संदर्भ ग्रंथ म्हणून उपयुक्त ठरेल. या विषयावर आतापर्यंत माझ्याकडून जे जे लिखाण झाले, ते सर्व या पुस्तकात आले आहे. विविध चर्चासत्रात मांडलेले विचार, भाषा आणि जीवन, अनाघ्रात, परिवर्तनाचा वाटसरू ढोल आदी नियतकालिकांतून यातील काही लेख आधीच प्रकाशित झाले आहेत. अहिरानी बोलीवर लेखन करताना सर्वच बोलींवर अर्थात सर्वच भाषांवर भाष्य होऊ लागले. इतर भाषांचाही अभ्यास होऊ लागला आणि त्यातून समान बाबींवर प्रकाश पडू लागला. यातून सर्वच भाषा जोडण्यासाठी लेखांचे माध्यमही साहजिकच मराठी वापरले गेले.
            अहिरानी गोत या पुस्तकात  सोयीसाठी  चार  विभाग  केले  असून  पहिल्या भागात अहिरानी लोकपरंपरा, दुसर्‍या भागात अहिरानी लेख, तिसर्‍या भागात  तवपावत  काढवा  याळ हा अहिरानी कथासंग्रह आणि चौथ्या भागात  जठे नही येकी हा अहिरानी बालकथा संग्रह यांचा समावेश केला आहे. लोकपरंपरा या भागात अहिरानी  लोकपरंपरेविषयीचे  लेखन  समाविष्ट  असून  यात  सतरा लेख आहेत.  दुसर्‍या भागात आदिवासी साहित्य, अहिराणी साहित्य    सामाजिक विषयाचे असे नऊ लेख समाविष्ट आहेत.
            तवपावत काढवा याळया कथासंग्रहात एकूण दहा कथा सामाविष्ट आहेत तरजठे नही येकीया बालकथा संग्रहात आठ कथांचा  समावेश आहे. या कथा बालकथा इसापनिती सारख्या बोधप्रध असून त्या माझ्या बालपणाच्या जगण्यातून आलेल्या आहेत. या कथांना मी बालकथा म्हणतो म्हणून त्या फक्त लहानांनीच वाचाव्यात अशा नाहीत. त्या प्रौढांनीही मुद्दाम वाचल्या पाहिजेत. त्यासाठी शेवटची कथा पोपट महाराज तर प्रत्येकाने वाचावी असा माझा आग्रह राहील.
            अहिरानी गोत या पुस्तकातील लोकपरंपरा आणि अहिरानी लेख ह्या दोन्ही भागातील संपूर्ण लिखाण मी संपादित करीत असलेल्या अहिरानी ढोल मध्ये प्रकाशित झालेले आहे तरतवपावत काढवा याळया कथासंग्रहातील काही कथाही ढोल मध्ये  प्रकाशित  झाल्या आहेत. बालकथा संग्रहातील कथा मात्र अप्रकाशित आहेत. या पुस्तकाचे माध्यम म्हणून साहजिकपणे अहिराणी बोलीत आहे.  गोत  म्हणजे नाते. जवळच आणि दूरच शी काही आपल नातेसंबंध असतात, ते सर्व गोत.  यात मैत्र हा घटकही असतोच. लोकपरंपरा, लोकसंस्कृती, लोकसमज, लोकरूढी, लोकरीती, लोकविधी, लोकदैवते, सामाजिक भान आदिसहीत त्यांच्या कथा आणि व्यथा एकत्र करून मांडल्या म्हणून या पुस्तकाचे शीर्षक अहिरानी गोत असे देण्याचे मी नक्की केले.
            अहिरानी वट्टा या पुस्तकात २००३ ते २००५ या दरम्यान सत्त्यायनचे प्रतिबिंब नावाच्या साप्ताहिकात माझ्या अहिरानी सदरासाठी संपादकांनी गळ घातली. तात्पुरता एक लेख लिहून दिला आणि त्यावर सदराचे नाव म्हणून अहिरानी वट्टा असे खूप विचार न करता लिहून टाकले. दुसर्‍या अंकासाठी पुन्हा त्यांचा फोन. पुन्हा लेख. असे पुन्हा पुन्हा होत राहिले आणि हे अस्सल अहिरानी भाषेतील सदर मी विनाखंड वर्षभर लिहिले. वेळ नसल्याने मी ते सदर लिहिणे बंद केले. पण संपादकांच्या आग्रहामुळे पुन्हा मर्मभेद नावाचे मराठी माध्यमातील लेख देत गेलो. हे सदरही वर्ष होताच मी बंद केले आणि नंतर नवीन सदरही हाती घेतले नाही. या दोन वर्षात कोणत्याही मानधनाशिवाय केवळ सामाजिक प्रबोधनाखातीर मी ही दोन सदरे लिहिली. या नंतर काही कारणाने ते साप्ताहिक प्रकाशित होणे पुढे बंद झाले.
            अहिरानी वट्टा या सदरात बावन्न लेख असून ते सर्व अहिरानी माध्यमात आहेत. वट्टा म्हणजे ओटा. अहिरानी ओट्यावर रंगणार्‍या गप्पा, चर्चा, घडणार्‍या घटना म्हणजे अहिरानी वट्टा. यात अहिरानी भाषा, अहिरानी लोकजीवन आणि लोकसंस्कृती यांचे दर्शन आहे. हा वट्टा अहिरानी लोकांना तर आवडलाच पण पुण्या मुंबईतील बिगर अहिरानी माणसांकडूनही त्यावर प्रतिक्रिया आल्यात. सटनानी जत्रा, हाऊ फोटूक कोन्हा, इच्चू इच्चू, पठावाना शाऊस का, मधरी आंधळी, लोकसंस्कृती जपाले पाहिजे आदी लेखांवर खूप चांगली दाद मिळाली.
            जगात फक्त एकच एक भाषा बोलली जात असावी आणि ती फक्त आपली मायबोली, अशी मानणारी अजूनही सर्वत्र भोळी भाबडी पिढी आहे. कारण त्यांच्या आयुष्यात कधी शाळा नसते आणि दुसर्‍या  भाषेचा संपर्कही. त्यांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत ते आपली एकच एक भाषा बोलतात आणि तिच्यातच आपला व्यवहार करतात. अर्थात ह़ी अभिमानाची गोष्‍ट नसून शोकांतिका आहे. अशा लोकांकडे लक्ष वेधण्‍यासाठी हे पुस्तक मी त्यांना अर्पण केले आहे. हे सर्व लेख स्वतंत्र कथा म्हणूनही वाचता येतील.
            या चारही पुस्तकांच्या उपलब्धतेसाठी: पद्मगंधा प्रकाशन, सदाशिव पेठ, पुणे- 30, फोन: 020- 24450260, मोबा. 7350839176 यांच्याशी संपर्क साधता येईल.
- डॉ. सुधीर रा. देवरे       
  इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/     

शनिवार, १२ एप्रिल, २०१४

शांतिवन: एक सेवाभावी शैक्षणिक प्रकल्प





-         डॉ. सुधीर रा. देवरे


       महाराष्ट्रात एक अतिशय मोठे सामाजिक कार्यकर्ते होऊन गेले. त्यांचे नाव आहे बाबा आमटे. महाराष्ट्रात बाबा आमटे आणि त्यांनी स्थापन केलेली आनंदवन ही संस्था कोणाला माहीत नसेल अशी व्यक्ती सापडणे दुर्मिळ. ज्यांनी कोणी आनंदवनला भेट दिली नाही तरी त्यांना हे नाव ऐकून तरी माहीत असतेच. बाबा आमटेंकडून सामाजिक दृष्टीकोन असलेल्या काही व्यक्तींनी प्रेरणा घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात आपल्याला पेलवतील अशी छोटी मोठी सामाजिक कामे आपापल्या परिसरात सुरू केली आहेत.
         एखाद्याने हाती घेतलेले सामाजिक काम आपल्याला कितीही छोटे वाटले तरी सामाजिक कामे करणे ही छोटी गोष्ट नाही. आयुष्य पणाला लावून अशी कामे करावी लागतात. इथे तासांचा हिशोब नसतो. कामाचे तास ठरलेले नसतात. दिवसाचे चोवीस तास फक्त समाजाशी बांधून घ्यावे लागते.
         आर्वी ता. शिरूर जि. बीड येथील असेच एक कार्यकर्ते श्री दीपक नागरगोजे यांनी आंनदवनला एकदा भेट दिली. तिथल्या एका शिबीरातही त्यांनी काम केले आणि त्याचवेळी त्यांनी ठरवले की आपल्या परिसरात आपण असेच काम करायचे. पुढे त्यांचा विवाह कावेरी नागरगोजे यांच्याशी झाला. पत्नीला विश्वासात घेऊन त्यांनी आपली कल्पना बोलून दाखवली आणि कावेरी नागरगोजे यांनी तात्काळ ही कल्पना उचलून धरली. बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांशी हे दोघे जण परिचित होते. त्यांची परवड, कामासाठी पश्चिम महाराष्ट्रात दीर्घकाळ स्थलांतर, त्यांची आर्थिक स्थिती आणि परिस्थिती यामुळे या कामगारांच्या मुलांचे शिक्षण होत नाही. जे चिकाटीने करतात त्यांचेही शिक्षण अर्ध्यावर सुटते. अशा मुलांच्या शिक्षणावर सर्वप्रथम या दांपत्याने आपले लक्ष केंद्रीत केले.
         स्वत:ची आठ एकर जमीन संस्थेला देऊन शांतिवन नावाची संस्था जून 2001 साली स्थापन केली. सुरूवातीला साधे पत्र्यांचे शेड उभारून या मुलांसाठी शिक्षण सुरू झाले. फक्त ऊस कामगारांच्या मुलांसाठी सुरू झालेली ही वस्तीशाळा पुढे सर्वसमावेशक होऊ लागली. अप्रगत मुले, तमाशा कलावंतांची मुले, एड्‍सबाधित मुलांचा प्रकल्प, देवदासी महिलांची मुले, अंध, अपंग, मूकबधीर, अनाथाश्रम, निराधार महिलाश्रम आदी विभाग या प्रकल्पात आज सुरू झाले आहेत. हे जोडपे संस्थेत बसून अशा मुलांची वाट पहात नाही, तर अशा मुलांची चाहूल लागताच त्या गावाला जावून अशी मुले प्रेमाने संस्थेत आणली जातात. अजून शासनाची कोणतीही आर्थिक मदत नसताना पत्र्यांच्या शेड पासून सुरू झालेली ही संस्था आज स्वत:च्या सात इमारतीत पसरली आहे.
आता पहिली ती दहावी पर्यंत शिक्षण घेणारी 700 मुले-मुली, एकोणावीस महिला आणि बावीस कार्यकर्ते या संस्थेत आहेत. लवकरच ही  संस्था बारावी पर्यंत शाळा सुरू करणार असून काही व्यावसायिक प्रकल्पही हाती घेणार आहे. आपल्या संस्थेतून शिकलेल्या मुलांसाठी काही स्वतंत्र रोजगार उपलब्ध करता येतील काय याची चाचपणीही प्रकल्पात सुरू आहे.
शांतिवन मधील प्रौढ झालेल्या मुलांच्या वैवाहीक जीवनासाठीही संस्थेत  प्रयत्न होताहेत. आतापर्यंत तीन अनाथ मुलींचे विवाह संस्थेने लावून दिलेत. शांतिवन  मधून शिकून मेडिकल, इंजिनियरिंग आणि जर्नालिझमच्या शिक्षणातही इथली काही मुले उतरलीत. या संस्थेतील प्रत्येक विद्यार्थ्याच्या दु:खाची गोष्ट वेगळी आहे. (या सर्व वास्तव कथा आज कावेरी नागरगोजे आपल्या शब्दात शब्दबध्द करीत आहेत.) आपले
   स्वत:चे घर नसलेल्या या मुलांसाठी म्हणूनच गुरूकुल पध्दतीने शिक्षण शांतिवनात
   दिले जाते.
ही संस्था लोकवर्गणीतून सुरू आहे. देणगीदारांच्या औदार्यामुळे संस्थेची वाढ
होत आहे. पण अशी मदत मिळवण्यासाठी काय खटाटोप करावे लागतात ते असे सामाजिक काम करणार्‍या लोकांनाच माहीत असते. जिथे ही संस्था सुरू आहे तिथून शिर्डी आणि शनिशिंगणापूर फक्त  150 किमीच्या आसपास आहेत. भगवान गड नावाचे धार्मिक स्थळ सुध्दा  फक्त 30 किमी अंतरावर आहे. अशा धार्मिक स्थळी जाणार्‍यांची संख्या  जशी प्रचंड आहे तशी त्यांच्या दानपेटीत रकमाही रोज प्रचंड प्रमाणात येत असतात. अशा भाविकांनी थोडी वाट वाकडी करून अशा प्रकल्पांना भेटी देऊन थोडीफार आर्थिक मदत केली तर अशा संस्था अधिक जोमाने आपले कामे करू शकतील असा विश्वास वाटतो. म्हणूनच सामाजिक दृष्टीकोन असलेल्या वाचकांसाठी त्यांचा पूर्ण पत्ता मुद्दाम इथे देत आहे: कावेरी नागरगोजे, शांतिवन, आर्वी ता. शिरूर कासार- 431122, जि. बीड.     भ्रमणध्वनी: 9421282359       

    - डॉ. सुधीर रा. देवरे        
       इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/