शनिवार, २६ मे, २०१२

व्यंगचित्राच्या निमित्ताने

व्यंगचित्राच्या निमित्ताने

                   - डॉ सुधीर रा. देवरे

 

      आजचे राजकीय नेते नको इतके संवेदनाशील झालेले आहेत. त्यांना कोणतेही सामाजिक प्रश्न ‍नीट सोडवता आले नाहीत, दुष्काळ निवारण करता आले नाही तरी कितीही जटील भावनिक प्रश्न ते चुटकीसरशी सोडवताना दिसतात. ज्या धड्याबद्दल कोणी आक्षेप घेतला तो धाडकन काढून मोकळे होणे, ज्या पुस्तकाबद्दल कोणी आक्षेप घेतला त्यावर पटकन बंदी आणणे. ज्या चित्रावर कोणी बोट ठेवला ते चटकन मागे घेणे. इतक्या झटपट असे भावनिक निर्णय घेताना बजेट मधे तरतूदीनुसार जास्तीचा कोणताही खर्च येत नाही, नियोजनावर परिणाम होत नाही. खासदार- मंत्री निधीतून कपात होत नाही. झालाच तर फक्त फायदाच फायदा. तोही छप्पर फाडके.

अशा काळात कोणी काही चांगल्या मागण्यांकरता शांततामय आंदोलन करत असेल तर ते दुर्लक्षित होते. कोणी पिण्याला पाणी मागत असेल तर इतक्या ज्वलंत प्रश्नांवर देशात चर्चा चालली असताना पिण्यासाठी पाणी मागणे हे किती क्षुद्रपणाचे लक्षण ठरेल. अशा वेळी आतापर्यंत सरकारने काहीही चांगले काम केलेले नसले तरी असे इतिहास बदलण्याचे श्रेय फुकटात मिळते आणि निवडणूकीत त्या जातीपातीच्या मतांचीही हमखास शाश्वती मिळते.

      कोणाच्याही अचानक भावना भडकताच दगडफेक, जाळपोळ,  तोडफोड साठी सार्वजनिक क्षेत्रातील कार्यालये, वाहने, वास्तु, वस्तु, दुकाने जसे शासनच सहज उपलब्ध करून देत असते इतक्या सहजपणे हिंसा होत राहते. जनसामान्यांचे प्रश्न बाजूला पडून अशा घटनांच्या प्रतिक्रियांसाठी राजकीय नेते चॅनेल्सवर झळकू लागतात. कादंबरी कशी लिहावी हे राजकीय लोक सांगतील, कविता कशी लिहावी, लेख कसा लिहावा, कथा कशी लिहावी, नाटक कसे लिहावे हे राजकीय लोक सांगतील त्याच आशयाचे लिहायला हवे. चित्र कसे काढावेत हेही तेच सांगतील. सिनेमा कसा निर्माण करावा, कसा दाखवावा हे आधी राजकीय लोकांना तो दाखवून मंजूरी घ्यावी नंतरच सेन्सार बोर्डाकडे जावे.

      खरे तर लोककल्याणकारी राजकारण कसे करावे, पुस्तके कशी वाचावीत, व्यंगचित्रे कशी पहावीत आणि वाचावीतही, कला कशी आत्मसात करावी, कला म्हणजे नेमके काय ह्याची ज्या राजकारणी लोकांनी कलावंतांकडे शिकवणी लावली पाहिजे, तेच लोक कलावंताने काय करावे हे शिकवतात हे आपल्या देशाचे आणि या प्रजासत्ताक देशाच्या राज्यघटनेचेही दुर्दैव आहे !!!

महात्मा गांधीना दक्षिण आफ्रिकेत रेल्वेतून बाहेर फेकले असे उद्या एखाद्या पुस्तकात चित्र छापल्यावर जर कोणाच्या भावना दुखावल्यात तर काय करावे? हळू हळू इतिहास बदलून टाकावा दुसरे काय. उदा. शिवाजी महाराजांनी प्रेमाने अफझलखानाला मिठ्ठी मारल्याने अफझलखानाला मित्रत्वाच्या अतिआनंदाने हृदय विकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचे निधन झाले !!!

     

- डॉ सुधीर रा. देवरे

         sudhirdeore29@rediffmail.com

रविवार, २० मे, २०१२

सर्वात कमी लाच घेणारा : देव


     सर्वात कमी लाच घेणारा : देव

                          - डॉ सुधीर रा. देवरे

 भ्रष्टाचार होऊ नये असे वाटते ना आपल्याला? लाच देऊ नये- लाच दिल्याशिवाय आपली कामे व्हावीत असेही वाटते आपल्याला? ज्या ज्या लोकांचा अशा भ्रष्टाचाराला विरोध असेल त्या त्या लोकांनी प्रथम देवाला भ्रष्ट करणे देणे बंद करावे. कोणत्याही मंदिराच्या दानपेटीत दान म्हणून रूपया सुध्दा टाकायला नको. साध्या कारकुनाला हजारात लाच देणारे लोक ठिकठिकाणी देवांच्या दानपेटीत एक रूपयापासून दान टाकायला सुरूवात करतात. सध्या भिकारी सुध्दा एक रूपयाची भीक घेत नाही. मग देवाला आपण भिकाय्रापेक्षा कमी लेखतो की काय?   

याचा अर्थ असा नव्हे की लाखात करोडोत दान देणारे, साड्या कपडे दागिने, सोन्याचा मुकुट देवाला अर्पण करणारे लोक देवाचा सन्मान करतात. देवाला दान करणाय्रा इथल्या परंपरेनेच प्रथम येथे भ्रष्टाचार रूजवला आहे. तो समूळ नष्ट करायचा असेल तर देवाला लाच देणे आधी बंद करावे लागेल. लाच देऊन देव पावतो असे जर आपले तथाकथित बालपणापासूनचे संस्कार असतील- तसे जर बाळकडू मिळाले असेल तर पुढे मोठे झाल्यावर प्रत्येक ठिकाणी लाच देऊन आपले काम करून घेण्यात कोणालाच चुकीचे वाटत नाही.

म्हणून देवाला पैसे अर्पण करणे, कपडे अर्पण करणे, दागिने अर्पण करणे याला यापुढे आपण पुर्णपणे फाटा दिला पाहिजे. आणि नैवेद्य चढवताना सुध्दा तो देवाच्या निमित्ताने आपल्यासाठी आहे- देवाला नैवेद्य चालत नाही, तो फक्त भावाचा भुकेला आहे असेच संस्कार केले पाहिजेत.

 

- डॉ सुधीर रा. देवरे

         sudhirdeore29@rediffmail.com

रविवार, १३ मे, २०१२

Dr sudhir Deore: वैद्यकिय क्षेत्रातील भ्रष्र्टाचार


वैद्यकिय क्षेत्रातील भ्रष्र्टाचार

वैद्यकिय क्षेत्रातील भ्रष्र्टाचार

                 - डॉ सुधीर रा. देवरे

लोकांची शारीरिक तंदुरूस्ती आणि रोगमुक्त आयुष्य ज्यांच्या हातात आहे अशा   वैद्य डॉक्टरांना आपण प्रती देवदूत समजतो. मात्र टक्केवारी मिळवण्यासाठी रूग्णांना गरजेपेक्षा जास्त आणि महागडी औषधे डॉक्टर लिहून देऊ लागलीत. अलिकडे हे प्रमाण सहज लक्षात येण्यासारखे फोफावले आहे. अमूक एका कंपनीचीच औषधे देण्याचा अट्टाहास धरू लागलीत. अनावश्यक चाचण्या करायला भाग पाडू लागलीत. दुसय्रा तज्ज्ञ डॉक्टरांकडे रूग्ण पाठवून त्याचेही पैसे कमवू लागलीत अशी टक्केवारी अपप्रवृत्ती वैद्यकीय क्षेत्रात दिवसेंदिवस वाढू लागली आहे.

याचा अर्थ असा नव्हे की प्रत्येक डॉक्टर भ्रष्ट आहे. प्रत्येक क्षेत्रात काही भ्रष्ट लोक असतात, काही अपवाद असतात. अशा अपप्रवृत्ती आता वैद्यकीय क्षेत्रातही घुसल्या हे मात्र सत्य आहे. वैद्यकीय क्षेत्र हे पवित्र क्षेत्र आहे. लोकांना रोगमुक्त जीवन देणारे डॉक्टर देवदूत आहेत. त्यांचे स्थान त्यांनी यापुढेही पवित्र ठेवावे. पेशाने डॉक्टर असावे, व्यवसायाने नव्हे. अशी अपेक्षा सर्वसामान्य माणसाने केली तर अशा भ्रष्ट डॉक्टरांचे काय म्हणणे आहे ?

- डॉ सुधीर रा. देवरे

         sudhirdeore29@rediffmail.com

मंगळवार, ८ मे, २०१२

हिंदू : मोठा पट आणि प्रचंड पसारा

                                                                                                               - डॉ सुधीर रा. देवरे

 

मी आत्ताच भालचंद्र नेमाडे लिखित हिंदू: जगण्याची समृध्द अडगळ ही कांदबरी वाचली. या कादंबरीचा पट सहाशे पानांइतका मोठा असून तपशिलांचा पसाराही प्रचंड आहे. कादंबरी नीट लक्षपूर्वक वाचली नाही तर आपण भरकटतो नाहीतर कादंबरीच भरकटलीय असे समजतो.

या प्रचंड आवाक्याच्या कादंबरीला आजचे म्हणजे स्वातं‍त्र्यापूर्वीपासूनचे सुरू झालेले महाकाव्य- महाभारत म्हणावे की काय असेही मला वाटू लागलेय. खानदेशमधील मोरगावातील प्रमुख पात्र खंडेराव म्हणजे अहिराणी भाषा आलीच ना. उत्तर महाराष्र्टातील लोकपरंपराचा ओझरता पटही कादंबरीत ओघाने येत राहतो. अहिराणी-खानदेशी खूप मोठ्या प्रमाणात या कादंबरीत उपयोजित झाली आहे. पण एकूणच भाषा या अंगानेही या कादंबरीकडे लक्ष जावे.

हिंदू या नावावरून धर्मवादी- संप्रदायवादी जर कादंबरी हातात घेतील तर त्यांचा भ्रमनिरास तर होईलच पण कादंबरीतील एखाद्या चटपटीत जातीयवादी- धर्मवादी वाक्याचा कोणी वादासाठी वापर करायचे ठरवले तरी ते त्यांना शक्य नाही. कारण लेखक नेमका कोणत्या बाजूचा, हे ठरवणे एवढे सोपे नाही. थोडक्यात काय तर जो जो कोणी कलावादी असेल त्यानेच या कादंबरीच्या वाट्याला गेलेले बरे.
हिंदू: जगण्याची समृध्द अडगळ, लेखक: भालचंद्र नेमाडे, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई
पृष्ठ संख्या : 603, किंमत : रू. 650

- डॉ सुधीर रा. देवरे
sudhirdeore29@rediffmail.com

शनिवार, ५ मे, २०१२

बुवाबाजीपासून सावधान !!!

               बुवाबाजीपासून सावधान !!!
                                             - डॉ. सुधीर रा. देवरे

      आज सर्वत्र गल्लीपासून दिल्लीपर्यंत बुवाबाजीची बजबजपुरी माजली आहे. एकेक नवीन बुवा त्यांच्या ऐश्वर्यसंप्पनेसह उजेडात येतात आणि त्यांच्या अफाट संपत्तीचे फुटलेले पेव पाहून आपले डोळे पांढरे होतात. शिकले सवरलेले, सुशिक्षित समजले जाणारे, उच्चशिक्षित लोकही आपली सद्‍सद् विवेक बुध्दी कुठल्यातरी अडगळीत गहाण ठेऊन बुवांच्या मागे धावतात. राजकारणी, खेळाडू, अभिनेते यांच्यातील अंधश्रध्दा तर जगजाहीर आणि किळस आणणारी आहे.
फक्त एका दिवसाचेच उत्पन्न एक कोटी असणारे तथाकथित बाबा आणि आयुष्यभर इमाने इतमाने नोकरी चाकरी करून 25 लाख रूपये सुध्दा मागे न टाकणारे नोकरदार लोक. एकीकडे दिवसभर कष्ट करून आपला उदरनिर्वाह कसातरी चालवणारा छोटा शेतकरी- शेतमजूर वर्ग आणि शरीराला दिवसभर लागणाय्रा कमीतकमी अन्नाची गरज सुध्दा भागवू न शकणारे असंख्य भुकेकंगाल लोक आणि दुसरीकडे (पण याच देशात) हजारो मंदिरांतील दानपेट्या मोजण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी वर्ग असावा लागतो. देवाला इतक्या सढळ हाताने लाच देणारे देशात इतके प्रचंड श्रीमंत लोक असूनही याच देशातले असंख्य बालके कुपोषणाने मरतात आणि घेतलेले कर्ज फेडता येत नाहीत म्हणून शेतकरी आत्महत्या करतात! एकीकडे इनकम टॅक्स चुकवणारे लोक देवाच्या दानपेट्या मात्र भरभरून भरतात यामागे कोणती मानसिकता असेल?
हा हिशोब कसा करायचा? ही दरी कशी बुजवायची? बँकांचे राष्र्टीयकरण झाले तसे मंदिरांचे राष्र्टीयकरण झाले पाहिले का? जे लोक नको इतक्या प्रमाणात देवांच्या आहारी जातात- बाबांच्या मागे लागतात त्यांचे मानसिक संतुलन योग्य आहे की नाही हे तपासून पाहिले पाहिजे का?
- डॉ सुधीर रा. देवरे