शनिवार, ३१ मार्च, २०१८

ग्रामीण पेहराव
- डॉ. सुधीर रा. देवरे

          तीस ते चाळीस वर्षांपूर्वी ग्रामीण वासियांचा पेहराव इकडे सर्वत्र एकसारखा दिसत असे. उत्तर महाराष्ट्र पट्ट्यात पांढरा रंगाचा सदरा, पांढरे धोतर आणि डोक्यावर पांढरी गांधी टोपी असा पुरूषांचा पेहराव दिसायचा. वयाने तरूण आणि शाळा- महाविद्यालयात शिकत असलेल्या मुलांत पांढर्‍या सदर्‍यासोबत पांढरा पायजमा असायचा आणि अशाच पेहरावात सर्रासपणे तरूण मुले कॉलेजलाही जात असत. महाविद्यालयात सुध्दा ड्रेसकोड नावाची भानगड त्यावेळी नव्हती.
          आम्ही माध्यमिक शाळेत जायचो तेव्हा आमच्या गावच्या माध्यमिक शाळेचा गणवेश पांढरा सदरा आणि खाकी आखूड चड्डी असा होता. अंगातल्या सदर्‍याला पचरटी गुंड्या (बटणं) असायच्या. मुलींचा गणवेश पांढरे झंपर आणि निळ्या रंगाचा स्कर्ट होता. असा ड्रेसकोड सक्‍तीचा होता असेही नाही. या व्यतिरिक्‍त कोणी रंगीबेरंगी कपडे घालून शाळेत येऊ शकत होतं. त्या काळी बहुतांशी वापरले जाणारे कपडेच शाळेचा गणवेश असायचा. याचा अर्थ शाळेत न जाण्याच्या दिवशी सुध्दा ग्रामीण मुलांच्या अंगावर हेच कपडे असत.
          उत्तर महाराष्ट्र पट्ट्यातली ग्रामीण महिला बहुतकरून नऊवारी साडीत दिसायची. पण या साडीला तेव्हा नऊवारी न म्हणता काष्टी पातळ वा काष्टी लुगडे म्हणायचे. (काष्टी लुगडे नेसणार्‍या गरीब घरातल्या स्त्रिया लुगडं दांडे करून नेसायच्या. एक लुगडं फाटल्यावर ते टाकून देण्यापेक्षा दुसर्‍या एखाद्या फाटक्या लुगड्याचा चांगला राहिलेला भाग या लुगड्याला जोडणे म्हणजे दांडे करणे. दांडे केलेले अर्धे लुगडे वेगळ्या रंगांचे असे.) सहा वारी साडीला गोल साडी म्हटलं जायचं. म्हणजे काष्टा न घेता नेसली जाणारी आणि शरीराभोवती गोल गुंडाळलेली दिसते म्हणून ती गोल साडी. शाळेत जाणारी मुलगी असो व शाळेत न जाणारी असो स्कर्ट वा लेंगा झंपर- पोलक्यात असायची. वयात आलेली मुलगी गोल साडी नेसायची. गोल साडी नेसणारी मुलगी विवाहीत झाली की ती लगेच काष्टी लुगड्यात दिसू लागायची.
          खेड्यापाड्यातून असणार्‍या कापडांच्या दुकानातही तेव्हा पांढरे हरक, मळकट पांढरे सैन- मांजरपाट, खाकी कापड, काष्टी लुगडे आणि गोल साड्या अशा कपड्यांचेच गठ्ठे असायचे. आयते कपडे शहरात मिळतात असं ग्रामीण भागात त्या वेळी ऐकून माहीत असलं तरी मिटरने कापड मोजून शिंप्याकडे माप देऊन कपडे शिऊन घ्यायचा तो काळ होता. वडीलधार्‍या दाद्या माणसांच्या अंगात सदर्‍याखाली सैनची बंडी वा कोपरी असायची. बंडी- कोपरीची जागा आता बनियनने घेतली.
          उत्तर महाराष्ट्रातील पश्चिम ग्रामीण भागातील विशिष्ट पट्ट्यात राहणार्‍या कोकणी लोकांचा पेहराव यापेक्षा थोडा वेगळा असायचा. पुरूषाचे गुडघ्यापर्यंतचे आखूड धोतर, सैनच्या कापडाचा सदरा आणि महिलांच्या अंगावर असणारी फिकट लाल रंगाची फडकी, खाली कंबरेपासून तर गुडघ्यापर्यंत दांडे केलेल्या वेगळ्या रंगाच्या लुगड्याचा एक तृतीयांश भाग, हा फरक स्पष्ट दिसायचा. आता लुगडं नेसणार्‍या महिला शोधून काढाव्या लागतात तर धोतर नेसणारे लोकही लुप्त झाले आहेत. लेंगापँटीही आता नामशेष झाल्या आहेत. गांधी टोप्या फक्‍त लग्न समारंभापुरत्या उरल्यात. आमच्याकडच्या ज्यांना कोकणी म्हटलं जातं अशा बायांची फडकीही आता कालबाह्य ठरली आहे.
          स्थित्यंतर होता होता पांढर्‍या पायजम्याची सुटपँट झाली, पांढर्‍या हरक कापडाच्या सदर्‍याचा रंगीबेरंगी डिझा‍यनींचे पॉलिस्टर ते आतापर्यंतचे सर्व बदल पचवलले शर्ट झाले. ऋतू कोणताही असो तेव्हा आर्थिक ओढाताणीमुळे बाराही महीने एकच पेहराव असायचा. आता ऋतू प्रमाणे कपडे बदलू लागले. विविध प्रकारचे स्वेटर हिवाळ्यात दिसू लागले. उन्हाळ्यात तरूणाईच्या अंगावर टी शर्ट चमकू लागले. पावसाळ्यात डोक्यावर छत्र्या दिसू लागल्या. पूर्वीच्या ग्रामीण भागात भर पावसात गोणपाटाच्या घोंगड्या डोक्यापासून कंबरेपर्यंत पांघरून घराबाहेर पडलेले लोक वाकून चालताना‍ दिसत.
     (या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

बुधवार, १४ मार्च, २०१८

ग्रामीण निवासस्थाने- घरे
- डॉ. सुधीर रा. देवरे

     बागलाण हा एकेकाळी चार जिल्हे आपल्या पोटात घेणारा प्रंचड प्रांत होता. नाशिक जिल्ह्याचा काही भाग, धुळे, जळगाव, नंदुरबार, आजच्या गुजराथच्या ताब्यात असलेला डांगचा काही भाग अशा या मोठ्या प्रांताला बागलाण म्हटलं  जायचं. बागूल राजाची राजवट असलेला तो बागलाण प्रांत. आता हा प्रांत एका तालुक्यापुरता मर्यादित झाला. आजच्या बागलाण तालुक्याचे क्षेत्रफळ केवळ 1616.2 चौ. किमी. असून आताच्या बागलाण तालुक्यात एकूण फक्‍त एकशे सहासष्ट गावे आहेत. तरी सुध्दा इतक्या कमी क्षेत्रफळात या भागात घरांची रचना दोन प्रकारची दिसून येते.
     याचं कारण बागलाणच्या पश्चिम पटट्यात असणारे पावसाचे जास्त प्रमाण. बागलाणच्या पश्चिम भागाला डांग आहे. डांग भागात पूर्वी बर्‍यापैकी जंगल असल्याने पावसाळ्यात आठ आठ दिवस पावसाची झडी लागायची. याला झडी ऐवजी वर डांग लागना असंही म्हटलं जायचं. पाश्चिम भागात कोकणा लोकांचे प्रमाण जास्त प्रमाणात आहे म्हणून या भागाला कोकणही म्हणतात. (पण महाराष्ट्राच्या दक्षिणेतला समुद्र तटावर वसलेला कोकणी भाग वेगळा आणि बागलाणातला हा छोटासा उत्तर कोकण वेगळा.) बागलाणच्या पश्चिम भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने तिथं उतरत्या छपरांची घरे जास्त आढळायची. नवापूर, नंदुरबार, पिंपळनेर, साक्री, मुल्हेर, कळवण, दिंडोरी, वणी, पेठ, सुरगाणा आदी भागात उतरत्या छपराची घरे होती.
     उलट बागलाणच्या पूर्व भागात पावसाचे प्रमाण कमी म्हणून या भागात मातीच्या धाब्याची सपाट घरे जास्त प्रमाणात होती. उतरत्या छपरांच्या घरांसाठी ऊसांचे पांजडं वापरून झ्याप तयार केला जायचा. गावठी लाल- काळ्या मातीच्या कौलांची घरं असायची, प‍त्र्यांच्या घरांचं प्रमाणही मोठं होतं. नंतर आर्थिक सुबत्ता आलेल्या लोकांची इंग्रजी कौलांची घरंही कुठं कुठं दिसू लागली होती. बागलाण पूर्व भागात आणि धुळे, शिरपूर, जळगाव परिसरातील काही गावातही बहुतांशी मातीच्या धाब्याची किलचनची घरे दिसायची- अजूनही आहेत. यात चिखलाच्या रद्याने बांधलेली घरं जशी आढळायची, (मातीत कुटार वा कडबा टाकून रात्रभर माती भिजवून हेल्याच्या -रेड्याच्या मदतीने ती माती चांगली रगडली की जो निब्बर चिखल तयार होतो त्याला रद्दा म्हणतात. रद्याच्या‍ भिंतीत विटा दगड वगैरे काहीही न वापरता फक्‍त चिखलात बांधकाम केलं जातं.) तशी मातीच्याच पण न भाजलेल्या कच्च्या आणि चौड्या (पसरट) विटांनी मातीतच बांधलेली घरं दिसायची. लाकडाच्या सर्‍या उभारून त्यावर लाकडाच्या आडव्या कड्या टाकलेल्या असत. लाकडांच्या कड्यांवर लाकडांचेच आडवे तिडवे लाकडांचे किलचन अंथरून त्यावर मातीचा चिखल ओतून तयार केलेली धाब्याची घरं म्हणजे किलचनची घरं. आणि धाब्याच्या घराचा दुसरा प्रकार पाटाइचे घर.     ‍किलचन ऐवजी लाकडी सर्‍यांवर नेटकेपणाने व्यवस्थित फळ्या टाकून वर चिखल ओतला की ते झालं पाटाइचं घर.
     घर टुमदार दिसलं पाहिजे, घराला रंगरगोटी केली पाहिजे असं त्यावेळच्या ग्रामीण माणसाला वाटलं नाही. राहण्यासाठी फक्‍त घर हवं. डोकं घालायला घर पाहिजे. घराच्या बाहेरच्या भिंती चिखलाने सारवल्या जात, तर आतून घर मातीने पोतारले जायचे. घराची जमीन मातीची असायची आणि ती चार पाच दिवसांनी शेणाने सारवावी लागायची. टुमदार देखणं घर बांधून त्याच्या भिंती धुवून पिल्याने पोट भरता येईल का, असं गावातले लोक म्हणायचे. म्हणून घरासाठी प्रचंड पैसा खर्च करण्यापेक्षा शेतीत पैसा लावला जायचा. वा शेती विकत घेतली जायची. 
     त्यावेळी भट्टीत भाजलेल्या लाल विटा आणि सिंमेटची घरं खेड्यात दिसायची नाहीत. तसं बांधकाम दिसलं की ते कुठलं तरी सरकारी बांधकाम असेल असं समजलं जायचं. (काही गावातल्या प्राथमिक शाळा त्यावेळी चुना आणि दगडांत बांधलेल्या होत्या. वर इंग्रजी कौलं असायची.) पण अलिकडे सर्व खेड्यापाड्यात भाजलेल्या लाल विटा, सिमेंट, आरसीसी, लोड बेअरींग आणि वर स्लॅब असं आधुनिक बांधकाम मोठ्या प्रमाणात होत आहे. शहर आणि खेडं हा फरक आज सर्वच बाबतीत पुसला गेला असला तरी तो घरांच्या बाबतीत प्रकर्षाने जाणवतो. खेड्यातच नव्हे तर शेतात वस्ती करणार्‍या लोकांचे बंगलेही आज काँक्रेटीकरणात सजलेले दिसतात. पूर्वी शेतात पांजडाचे झ्याप बांधलेले असत, म्हणजे झोपड्याच.
     (या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
   इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/