बुधवार, १५ सप्टेंबर, २०२१

बोलीभाषेतून साहित्यनिर्मिती होण्याची गरज

                                                                  - डॉ. सुधीर रा. देवरे   

                    महाराष्ट्रात साधारणपणे पासष्ट बोलीभाषा बोलल्या जातात. अधिकतम म्हणजे चार जिल्ह्यांच्या मोठ्या भौगौलिक क्षेत्रात अहिराणी बोलली जाते. (अहिराणी ही भाषा आहे. कोणतीही बोली ही भाषाच असते. बोली आणि भाषा असा भेद आजचं भाषाशास्त्र मानत नाही.) मालवणी- कोकणी भाषेला राष्ट्रीय पातळीवर, राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टात प्रमाण भाषा म्हणून मान्यता आहे. इतर बोलीभाषांना मात्र अशी मान्यता नाही. जवळपास दीड कोटी नागरिक अहिराणी बोलतात.  बोलीभाषा  दिवसेंदिवस नामशेष होत चालल्या आहेत. त्यातले प्रवाहीपण साचल्यासारख झाल आहे. दर पंधरा दिवसाला जागतिक पातळीवर एक बोलीभाषा मरते.

          बोलीभाषेत लेखन करणाऱ्यांची कमतरता आहे. सर्व वाचक बोलीभाषेतली पुस्तकं वाचत नाहीत हे ह्यामागचं कारण आहे. अहिराणी भाषा बोलत असूनही अनेक प्रथितयश अहिराणी लेखक प्रमाण भाषेतच लिखाण करतात. हेच चित्र इतर बोलीभाषांमध्ये पहायला मिळतं.  सर्वदूरच्या प्रदेशांमध्ये विखुरलेला मराठी वाचक डोळ्यांसमोर ठेवून लेखकाला प्रमाण भाषेत लेखन करावं लागतं. म्हणून बोलीभाषेला ठरावीक असा वाचक वा प्रेक्षक उरलेला नाही.

          (प्रस्तुत लेखक संपादीत) ढोलसारखं अहिराणी भाषेतलं नियतकालिक पुणे- मुंबईसारख्या शहरांमध्ये उत्सुकतेनं वाचलं गेलं, पण धुळे- जळगावसारख्या अहिराणी भागातही दुर्लक्षिलं जातं. हा विरोधाभास सगळ्याच बोलीभाषांच्या बाबतीत दिसतो. शासकीय नियमानुसार दहा लाख लोकांपेक्षा अधिक लोक बोलीभाषा बोलतात तेव्हा त्या भाषेला प्रमाण भाषेचा दर्जा देण्यात येतो. असा दर्जा मिळाला म्हणजे बोलीभाषेत साहित्यनिर्मिती व्हायला परिस्थिती पूरक ठरते. मात्र, जनगणनेत लोक आपली बोलीभाषा ही मातृभाषा म्हणून सांगत नाहीत अशीही एकीकडे स्थिती आहे, आपली शैक्षणिक भाषा मातृभाषा म्हणून सांगतात. आणि जे नागरिक आपली मातृभाषा अहिराणी सांगतात, ते कागदावर लिहिलंच जातं असं नाही. हे सर्व सर्वे करणाऱ्या कर्मचार्‍यांवर अवलंबून. (म्हणून प्रत्यक्षात अहिराणी दीड- दोन कोटी लोक बोलत असूनही जनगणनेत ती दहा लाखांपेक्षा कमी दिसते.) बोलीभाषेतून साहित्यनिर्मितीबरोबरच दैनंदिन व्यवहारदेखील होणं अपेक्षित आहे. अलीकडे प्रमाणभाषेतून (साहित्यातूनही) बोलीभाषा उपयोजित होताना दिसत असली तरी बोलीभाषेतून समग्र चांगल्या कलाकृतीचं- साहित्यकृतींचं लिखाण होताना दिसत नाही. (अशा साहित्यकृतींचं प्रमाण खूप कमी आहे.) बोलीभाषांवर संशोधन त्रोटकपणे केलं जातं, पण संकलन मोठ्या प्रमाणात होतं, ते पारंपरिक लोकवाड्‍.मयाचं असतं. त्या त्या बोलीभाषेतून विनोद, गपशप, किस्से सोडल्यास ललित, गंभीर लेखन, कथा, कादंबरी गांभीर्यानं होताना दिसत नाही.

          सर्वच बोलीभाषांना लिपीचा प्रश्न असतो. कारण बोलीभाषा अजूनही मौखिक स्वरूपातच अस्तित्वात आहेत. त्यामुळे जवळच्या प्रमाणभाषेचा- महाराष्ट्रात देवनागरी (मराठी) लिपीचा आधार बोलीभाषेत लिहिताना घेतला जातो, ज्यात अनेक अडचणी येतात हे देखील बोलीभाषेत साहित्यलेखन न होण्याचं कारण आहे. वाचकवर्ग मर्यादित लाभत असल्यानं अशी पुस्तकं छापायला प्रकाशकही पुढं येत नाहीत. म्हणून लेखक प्रमाण भाषेचाच आधार घेत लिहिताना दिसतात. हे अत्यंत साहजिक असलं तरी बोलीभाषेतून लेखन होणं बोलीभाषा टिकवण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. आणि जी भाषा आपली मातृभाषा आहे तिच्यात लिहिणं नैसर्गिक ठरतं.

          प्रमाण भाषेत बोलीभाषेतील शब्द वारंवार वापरण्याचं प्रमाण काही लेखकांच्या लेखनात दिसून येतं, ही त्यातल्या त्यात एक चांगली आणि जमेची बाजू. त्यामुळं त्या त्या बोलीभाषेबरोबरच प्रमाण भाषादेखील समृद्ध होते. असे काही चांगले प्रयत्न वगळता बोलीभाषांमध्ये नैसर्गिक प्रेरणेने ठरवून लेखन होत नाही.  बोलीभाषेच्या वापरामुळं त्या त्या ठिकाणची लोकसंस्कृती साहित्यात खोलवर रुजण्यास मदत होते. त्यामुळं बोलीभाषा साहित्यात मुद्दाम, अगदी ठरवून वापरली जाणं आवश्यक आहे.

                  (दै. दिव्य मराठी, अक्षरा पुरवणीत दिनांक 18 जुलै 2012 रोजी, प्रियंका डहाळे यांनी घेतलेली माझी मुलाखत प्रकाशित. लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

 

  © डॉ. सुधीर रा. देवरे

     ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.com/

बुधवार, १ सप्टेंबर, २०२१

पारवे पाळले होते

 

- डॉ. सुधीर रा. देवरे

                    गावात भोई मास्तरांनी पारवे पाळलेले होते. (त्यांचं आडनाव भोईच होतं.) पारव्यांसाठी त्यांनी मोठं लाकडी खोकं तयार करून घेतलं होतं. खोक्याला लोंखडी जाळी बसवलेली होती. सकाळी त्या खोक्याचं दार उघडलं की पारव्यांचा थवा बाहेर उडायचा. गल्ली, झाडांवर, भितींवर, घरांवर सगळीकडे ते उडत- चरत विहार करायचे. आणि संध्याकाळी बरोबर त्याच खोक्यात येऊन बसत. खोक्यात ती गुटूरगूम...गुटूरगुम करायची. भुई मास्तरांचा मुलगा- सुरेश त्यांना आऽ आऽ करून बोलवायचा. दाणे टाकायचा. पारवे  त्याला ओळखायचे. त्याच्या अंगावर बसायचे. त्याच्या आजूबाजूला न घाबरता बागडायचे. हे दृश्य पाहून माझं मन हरखून जायचं. पारवे आपणही पाळावेत असं मला मनातून वाटत होतं. सुरेशला एकदा विचारलं,

पारवा इकतंस का तुम्ही?’ 

तो म्हणाला, ‘मंग इकतंस ना!

कवढाले?’

पाच रूपयाले जोडी. नर मादीनी जोडी. पाळना शेत का तुले सांग?’

तश्याचार व्हयी र्‍हायना.

पाळ ना मंग. चांगलं र्‍हास. आम्ही फगत येकच जोडी आनी व्हती. त्यास्ना कितला व्हयी गयात पहाय आता.’

                    मी तेव्हा नववीत होतो. पारवे पाळले तर अभ्यास होईल का? मी खूप विचार केला. येताजाताना पारव्यांची गमंत बघायचो. आपण पारवे पाळले तर ते असेच आपल्या ओट्यावर बसतील. खेळतील. गुटूरगुम करतील. मग मी एका दिवशी पारव्यांची एक जोडी सुरेशकडून पाच रूपयाला विकत घेतलीच. नर पाढंर्‍या रंगाचा होता तर मादी होती काळ्या रंगाची. त्यांचे एकेक पाय सुतळीने बांधून त्यांना आमच्या ओट्याच्या भिंतीच्या खुंटीला बांधून दिलं. त्यांच्या समोर दाणे टाकले आणि त्यांच्या रात्रीच्या मुक्कामासाठी तयारीला लागलो. घरातला एक चौकोनी आकाराचा मोठा डबा घेतला. त्याचं वरचं झाकण कधीचं मोडून पडलेलं होतं. म्हणून तो डबा असा वापरण्यासाठी आईचा विरोधही झाला नाही. डब्याच्या तोंडाच्या मापाचा विजेच्या ताराने बरोबर एक चौकोन तयार केला. त्या चौकानी ताराला उभ्या आडव्या अशा वायरी बांधून स्वत:च जाळी तयार केली. लाकडी स्टुलावर उभा राहून घरातल्या एका भिंतीवर अड्याकड्याजवळ दोन मोठे खिळे डबा बसेल अशा अंतरावर ठोकले. त्या खिळ्यांवर समोरची उघडी बाजू येईल असा आडवा डबा ठेवला. डबा पडू नये म्हणून डब्याच्या तोंडाच्या जरा मागे एक सुतळी बांधून आड्याकड्याच्या एका कडीला बांधून दिल. डब्याच्या उघड्या बाजूच्या वर चुकीने अगोदरच दोन बारीक भोकं पाडून तारेने ती जाळी थोडी ढिली बांधून ठेवली. म्हणजे ती एका बाजूने वर उचलली जाऊन जाळी उघडता येईल.

                    दोन्ही पारवे त्या डब्याच्या घरात सोडून दिले. डब्यातच त्यांना बाजरीचे दाणे टाकून वाटीत पाणी ठेवलं. त्यांच्या नव्या घरात ते लवकर रूळावेत म्हणून दिवसभर आणि लगेच रात्रभर त्यांना त्या डब्यातच कोंडून दिलं. जाळी उघडण्यासाठी नेहमी वर चढावं लागू नये म्हणून जाळीच्या झाकणाला खाली एक सुतळी बांधून आड्याकड्याच्या समोरच्या एका कडीतून ती खाली लोंबकळून ठेवली होती. ती सुतळी ओढली की जाळी आपोआप वर जायची आणि सोडली की जाळीने डब्याचं दार बंद व्हायचं.

                    दुसर्‍या दिवशी मी जाळी उघडली. दोन्ही पारवे डब्यातून घराच्या खुंटीवर व नंतर बाहेर येऊन घराच्या भिंतीवर बसले. आणि भिंतीवरून जसे उडाले तसे ते पुन्हा घराकडे फिरकलेच नाहीत. मला दिसलेही नाहीत. सायंकाळी येतील म्हणून वाट पहात बसलो पआलेच नाहीत. मग थोडा अंधार होताच सुरेशकडे गेलो. त्याच्या पारव्यांमध्ये ते खोक्यात होते. सुरेशकडून ते घेतले. सुरेश म्हणे, ‘दोन्ही पारवाकदम सोडू नही. येकना पायले दोरी राहू दे. मंग दोन तीन दिवसमा दुसराले मोकळं सोड आनि पहिलाले बांधी ठेव. आशे करता करता त्या रवळी जातीन.’  मी पारवे घेऊन घरी आलो.

                    दुसर्‍या दिवसापासून एका पारव्याच्या पायाला दोरी बांधून घरात कसं यायचं, बाहेर कसं जायचं, याचं त्याला ट्रेनिंग दिलं. जोडीदाराच्या पायाला दोरी असल्यामुळं दुसरा पारवाही उडून दूर जात नव्हता. ट्रेनिंगचा परिणामही आठच दिवसात दिसायला लागला. पारवे रूळायला लागले. डब्यात ते स्वत:हून उडून बसायला लागले. नंतर दोघांना मोकळं सोडून पाहिलं. तरीही ते उडून गेले नाहीत. परत आले. सकाळी डब्यातून उडून जाऊन दिवसभर गावभर फिरून त्यांच्या आधीच्या मित्रांमध्ये राहूनही संध्याकाळी ते माझ्या घरात येऊन डब्यात जाऊन बसायला लागले. मला ओळखायला लागले. दाणापाणी खायला लागले. आंनदात गुटूरगूम करू लागले.

                    पारवे घरात रूळून गेले. संध्याकाळी मी त्यांच्या वाटेत उभा असलो तरी माझ्या डोक्यावरून उडून डब्यात जाऊन बसायला लागले. मग जाळी लाऊन घेत असे. ते ही ती जाळी लाऊन घ्यायची वाट पहात असत. सुरुवातीला ते बळजबरी या घराशी जुळवून घेताहेत असं वाटायचं. पण दिवसेंदिवस नवं घर त्यांना आवडलं. ते माझ्याशीही हसतात- बोलतात असं वाटायचं. पाळलेल्या पारव्यांमध्ये खूप रमलो होतो. सहज एकदा डब्यात डोकावून पाहिलं तर डब्यात दोन अंडी घातलेली दिसली. आता आपल्याकडेही पारव्यांची संख्या वाढेल म्हणून आनंद झाला. असे माझे आणि पारव्यांचे छान दिवस चालले होते.

                    एका पहाटे झोपेत असतांनाच पारव्यांचा कर्कश आवाज आला. दचकून जागा झालो. आणि डब्याकडे आलो तर मांजर तोंडात मादी पारवा पकडून घराच्या धाब्याच्या गवाक्षातून बाहेर उडी घेत पळताना दिसली. घाबरलेला नर डब्यातून घाबरून घराच्या भिंतीच्या खुंटीवर येऊन बसलेला होता. झटापटीत पारव्यांचे दोन्ही अंडे जमिनीवर पडून फुटलेले होते. वायरची जाळी ढिली झालेली होती. आणि त्याचा फायदा मांजरीने बरोबर घेतला होता. मांजरीच्या झडपेसरशी जाळीतले अंतर वाढले आणि मांजरीला आत डब्यात प्रवेश करता आला होता. थोडा वेळ काही सुचलंच नाही. नर पारव्याला हातावर घेऊन बाहेर ठेवलं. त्यांची चरायला जाण्याची वेळ झालेली होती. नर उडून गेला पण परत संध्याकाळी आला नाही. मी ही सुरेशकडे त्याचा तपास करायला गेलो नाही.

                    आता कुठं पारवे दिसले की पाळलेल्या पारव्यांची आठवण होते, नव्हे ते डोळ्यासमोरच उभे राहतात. पारवे दिसले की कायमचं त्यांच्यासोबत रमून जावं. त्यांच्याबरोबर आभाळात उडावं असं वाटतं. पण या धावपळीच्या आयुष्यात तसं करायला आज वेळ नाही. मग शहाण्या माणसासारखं रोज आपलं ओझं आपणच ओढत रहाव.

                    (सहज उडत राहिलो या पुस्तकातला मजकूर. लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

  © डॉ. सुधीर रा. देवरे

      ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.com/