शनिवार, ३० जून, २०१२

सत्यमेव जयते आणि प्रसिध्दी



- डॉ. सुधीर रा. देवरे

      भारताचे ब्रीद वाक्य आहे, सत्यमेव जयते. सत्यमेव जयते नावाचा रियालिटी शो एका चॅनलवर आणून अमीर खानने सगळीकडे सुप्रसिध्दीची दाणादाण उडवून दिली. आतापर्यंत या शो मध्ये जे विषय घेतले गेले, जे सामाजिक विषय हाताळले गेलेत ते नवीन आहेत असे मात्र अजिबात नाही. हे विषय सर्वसामान्यांची जुनी दुखणी आहेत. या विषयांवर आतापर्यंत कोणी बोलले नाही का? लिहिले नाही का? चित्रिकरण केलेले नाही का? या प्रश्नांची उत्तरे, हो अशीच येतील. वेळोवेळी हे विषय चर्चेला येत असूनही ही प्रजा- जनता- सत्ता त्या त्या वेळेस तात्पुरती जागी होऊन पुन्हा झोपी का जाते कळत नाही.
      या सर्व विषयांवर आतापर्यंत अनेक चॅनेल्सवर सुटे सुटे रिपोर्ट दाखवले गेले आहेत. वृत्तपत्रांतून अग्रलेख आलेले आहेत. स्पेशल स्टोरिज लिहिल्या गेल्या आहेत. अनेक डाक्युमेंटरीज आलेल्या आहेत. फिचरफिल्म्स सुध्दा आहेत. तरीही आज जो प्रतिसाद अमीर खानला मिळतो आहे, तेवढा प्रतिसाद कोणाला मिळालेला नाही. याचा अर्थ असा होतो की, प्रश्न आहेत पण ते प्रश्न कोण उपस्थित करतोय यालाही आज तेवढेच महत्व प्राप्त झाले आहे.
      असे प्रश्न याआधी उपस्थित केले गेलेत म्हणून अमीरच्या या प्रयोगाला काही अर्थ नाही असे मात्र मुळीच म्हणता येणार नाही. अमीर खान हा चांगला अभिनेता आहे, त्याच्याकडे निर्माता म्हणून सर्व प्रॉपर्टी आहे, जनमानसाची नस त्याला सापडली आहे. त्याच्याजवळ कॅमेर्याची दृष्टी आहे, मनुष्यबळ आहे, कलावंताचे बळ आहे (म्हणजे गायक, वादक, संगीतकार, प्रत्येक भागासाठी नवीन गीत आणि नवीन चाल, कॅमेरामन आदी). सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्याच्याकडे सामाजिक बांधिलकी आहे.
आणि या सगळ्यांसाठी त्याला असलेले प्रसिध्दीचे वलय या सामाजिक प्रबोधनाला सहाय्यभूत ठरत आहे. त्याने आपल्या जनमानसात असलेल्या इमेजचा चांगल्याप्रकारे वापर करून हा शो तयार केला. ज्या ज्या प्रश्नांवर या शोमधून प्रकाश पडतोय त्या त्या संस्थेच्या उत्थापनासाठी ह्या शोच्या माध्यमातून चांगला निधी जमतो आहे ही सुध्दा या शोची खूप जमेची बाजू. चांगल्या उपक्रमांना आपण प्रतिसाद दिला पाहिजे मग तो उपक्रम कोणीही राबवो. म्हणून अमीरला जेवढे धन्यवाद देता येतील तेवढे कमीच पडतील. सत्यमेव जयते ।

- डॉ सुधीर रा. देवरे

शनिवार, २३ जून, २०१२

ही तर आपल्याच घराला आग ।



- डॉ. सुधीर रा. देवरे

ही फक्त एखाद्या घराला लागलेली आग नाही. एखाद्या हॉटेलला लागलेली आग नाही. एखाद्या इमारतीला लागलेली आग नाही. एखाद्या मॉलला लागलेली आग नाही.  एखाद्या कार्यालयाला लागलेली आग नाही. एखाद्या जंगलाला लागलेली आग नाही. ही आग एका राज्याचा राज्य कारभार जिथून चालवला जातो त्या राजदरबराला लागलेली आग आहे प्रजाहो.
      ह्या आगीत किती लोकांच्या फायली जळाल्या आपल्याला माहीत नाही. या आगीत किती लोकांच्या सेवा निवृत्तीच्या फायली जळाल्या आपल्याला माहीत नाही. या आगीत किती विनंती अर्ज करणार्या लोकांच्या फायली जळाल्या आपल्याला माहीत नाही. या आगीत किती लोककल्याणकारी योजनांच्या फाइली जळाल्या हे आपल्याला माहीत नाही. या आगीत किती स्वप्ने जळालीत आपल्याला माहीत नाही.
आणि या आगीत किती काळे कारनामे जळून खाक झाले हे ही आपल्याला कधीच माहीत होणार नाही. या आगीत जीवंत असूनही किती लोक बरबाद झाले हे आपल्याला मा‍हीत नाही. कारण पुन्हा नवीन कागदपत्रे गोळा करत फाइली तयार करण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा अनेक सर्वसामान्य लोक सरकारकडे काही मागणेच बंद करून देतील.
      ह्या आगीत राज्याचे सिंहासन, राज्याचा राजा आणि त्याचे प्रचंड प्रधान मंडळ यांच्या केसालाही धक्का लागलेला नाही. कारण नेहमीप्रमाणेच ते आपल्या सिंहासनात विराजमान नसावेत, हे आपल्या प्रजेचे केवढे मोठे सद्‍भाग्य म्हणावे लागेल. नाव गाव नसलेले पाच प्रेतं सापडलीत हे खरे. पण एवढ्या मोठ्या प्रचंड आगीत फक्त पाच प्रेतांवर निभावले हे काय कमी आहे? लोक तर मरतीलच ना. पण फक्त पाचच लोक कामी आले यातच समाधान व्यक्त केले पाहिजे.
      सर्व बेचिराख झाल्यावर आपत्कालीन व्यवस्थापनाचा बोर्या वाजला म्हणून त्या कर्मचार्यांवर ठपका ठेवत काही निलंबीत करून आपली गादी चालवायला मोकळे होऊ या. कोणाला तरी दोषी ठरवल्याशिवाय ताठमानेने हा राज्यशकट कसा चालवता येईल? म्हणून त्याला इलाज नाही मिस्टर्स सो अँड सो.
      आता झाले गेले ते विसरून काही हजारो करोड रूपये खर्च करून अत्याधुनिक मंत्रालय बांधू या. प्रजा आपल्या खर्चाची काटकसर करत जास्तीचा कर आनंदाने भरेल. कारण अशा कामाला कर नाही द्यायचा तर मग कोणत्या कामाला? आणि ही तर आपल्या घरालाच लागलेली आग आहे. म्हणूनच आपले राजे आणि त्याच्या प्रधान मंडळापर्यंत या आगीच्या झळा आपण पोचू दिल्या नाहीत. कारण एवढ्या मोठ्या राज्याचा राज्यकारभार चालवायला त्यांचे डोके थंड असावे म्हणून एवढ्या मोठ्या आगीत त्यांच्या जनानखाण्याची एसी सुध्दा आपण बंद होऊ दिली नाही काही सेकंद.  

- डॉ सुधीर रा. देवरे

रविवार, १७ जून, २०१२

कलावंतांचा सत्कार करणारे पुस्तक



                                            - डॉ. सुधीर रा. देवरे
                                                 
खरा कलावंत कोण? कलावंत आणि समाज यांचे संबंध काय? कला कोणाला कळते? कलेची किंमत रूपये- पैशांमध्ये करता येते का? कलेला कामकाळवेगाचे गणित लागू होईल काय? कला आणि नीती यांचा संबंध काय? कोणतेही शासन कलेची मुस्कटदाबी करू शकते काय? कलाप्रांतातील खटले न्यायालयात सोडविता येतील का? हे कला जगतातील यक्षप्रश्न सुटणारे नसले तरी अशा प्रश्नांचा ऊहापोह करणारा प्रातिनिधीक खटला, कलावंताचे बाणेदार उत्तर आणि न्यायालयाचा एक तात्कालीक निकाल वाचायचा असेल तर द.ग. गोडसे लिखित नांगी असलेले फुलपाखरू हे पुस्तक वाचावे लागेल. १९८९ या वर्षी हे पुस्तक पॉप्युलर प्रकाशन, मुंबई यांच्यातर्फे प्रकाशित झाले.     
इसवी सन १८७९ मध्ये इंग्लडमध्ये चित्रकार जेम्स मॅकनील व्हिसलर विरूध्द कलासमीक्षक जॉन रस्किन हा खटला गाजला. रस्किनने सातत्याने जेम्स मॅकनील व्हिसलर यांच्यावर व्यक्तिगत व त्यांच्या चित्रांवर आपल्या भाषणांतून तसेच वर्तमानपत्रे आणि मासिकांतून लेख लिहून टिका केली. अशाच एका त्यांच्या चित्राच्या कलामुल्यांबद्दलच संशय घेऊन रस्किनने टिका करताच व्हिसलरने रस्किनवर खटला भरला. आपल्या एका चित्रावर रस्किनने निघृण, व्यक्तिविषयक टीका केल्यामुळे आपल्या चित्रांच्या विक्रीवर परिणाम होऊन आपले आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसान भरपाई म्हणून रस्किनने आपल्याला एक हजार पौंड द्यावेत, असे व्हिसलरचे न्यायालयात म्हणणे होते.
चित्रकार जेम्स मॅकनील व्हिसलर हे चित्रविचीत्र कपडे परिधान करीत. वागण्यातही ते फटकळ, विक्षिप्त आणि अजब गृहस्थ होते. विंचवाची लांब नांगी असलेले फुलपाखरू हे व्हिसलरने स्वत:चे एक बोधचिन्ह तयार केले होते.
न्यायालयात खटला उभा राहिल्यावर व्हिसलरनेच दिलेल्या उत्तरानुसार अटॅर्नी जनरलने त्यांना विचारले की, एक चित्र काढायला तुम्हाला एकच दिवस लागतो तरीही आपण एका चित्राचे 200 गिनी का मागता?
व्हिसलरने तात्काळ उत्तर दिले, मी आयुष्यभर मिळविलेल्या अनुभवाच्या हिशोबाने किंमत मागतो. ...कोणत्याही कलाकृतीची किंमत, काळ-काम-वेगाचे गणित करून ठरत नाही... तर कलावंताने आयुष्यात मिळविलेल्या अनुभवाचे ते मूल्य असते. या जेम्स मॅकनील व्हिसलरच्या सुभाषितवजा उत्तराने त्यांनी हा खटला जिंकला आणि रस्किनला नाममात्र दंड झाला.
नांगी असलेले फुलपाखरू याच नावाच्या दोन दिर्घ लेखात गोडसे यांनी ह्या खटल्यासंदर्भात कला, कलावंत आणि त्याच्या तपश्चर्येला न्याय दिला आहे. या पुस्तकात एकूण सतरा लेख असून लिहून भिंतीवर भुजंग भरला रंग चिताय्राकडून, भासाच्या प्रतिमा नाटकातील नियती, बावनखणी, शतायुषी सौभद्र, राजसंन्यास, असा हा छंद, प्राण्यांचा सुहृद शिल्पी, राघू मैना... एक कल्पबंध आदी समग्र कलांची मीमांसा मुळातून वाचण्यासारखी आहे.
ह्या लेखसंग्रहात एकत्रित केलेल्या लेखांमध्ये ‍िचत्रकला, स्थापत्य, शिल्पकला, साहित्य, इतिहास, नाट्यसंगीत आणि चित्रपट ह्या सातही कलांकडे पाहण्याचा नवीन दृष्टीकोन मिळतो. गोडसे हे फक्त साहित्य समीक्षक नव्हते, नैसर्गिक कलातत्वांसह सर्व प्रकारच्या कलांची मीमांसा हा त्यांच्या चिंतनाचा आणि लेखनाचा विषय होता. एका कलेची मीमांसा करतांना ते सहज दुसय्रा कलांचे साधार उपयोजन करीत असत.
गोडसे यांचे दोन लेखसंग्रह, दोन नाटके, एक चरित्रात्मक आणि एक भाषणाचे पुस्तक धरून एकूण तेरा पुस्तके प्रकाशित असून लेखाचा विषय झालेल्या प्रस्तुत पुस्तकासह पोत (१९६३), शक्तिसौष्ठव (१९७२), गतिमानी (१९७६), लोकधाटी (१९७९), मातावळ (१९८१), ऊर्जायन (१९८५), वाऽक विचार (१९९३), समन्देतलाश (१९८९) ही त्यांच्या कलामीमांसेची सौष्ठवविचारांची महत्वाची पुस्तके म्हणता येतील.  
      द. ग. म्हणजे दत्तात्रय गणेश गोडसे. सुरूवातीच्या काळात पुस्तकांचे मुखपृष्ठकार म्हणून गोडसे प्रसि‍ध्दीस आले. बडोद्याच्या फाइन आर्ट महाविद्यालयात ते कला शिक्षक होते. मात्र उत्तरायुष्यात त्यांनी सौंदर्यमीमांसेत प्रंचड मोठे योगदान देऊनही त्यांच्या कलामीमांसेवर टिका करताना समीक्षकांकडून त्यांचा उल्लेख चित्रकार गोडसे असाच होत असे. असा उल्लेख वाचून ते व्यथित होत पण नर्म विनोदाने खाजगीत म्हणायचे, एकदा चित्रकार म्हणून कुंकू लागला की तो पुसता पुसला जात नाही. आणि यात दुसरी मेख अशी आहे की, गोडसे हे चित्रकार असल्यामुळे त्यांनी आमच्या समीक्षेच्या प्रांतात नाक खुपसू नये असेही इतर समीक्षक मला आडपडद्याने बजावत असावेत.
गोडसे यांच्या कलामीमांसेला अनेक ज्ञानशाखांची डूब प्राप्त झाली आहे. सौंदर्यशास्त्र, ‍साहित्यशास्र्त्र स्थापत्यशास्त्र, इतिहास, तत्वज्ञान, धर्मशास्त्र, मानसशास्त्र, मानववंशशास्त्र, सामाजिकशास्त्रे, जीवशास्त्र, प्राणिशास्त्र, गणित- भूमिती, शरीरशास्त्र, खगोलशास्‍त्र, भूस्तरशास्त्र, अतिभौतिकी, पदार्थविज्ञान इत्यादी विज्ञाने अशा विविध ज्ञानशाखांची संदर्भ- संपृक्तता हे गोडसे यांच्या कलामीमांसेचे वेगळेपण आहे. मराठी समीक्षेतील हे वेगळेपण विशेषत्वाने नजरेत भरणारे आहे. त्यांची समीक्षा पंडिती वळणाच्या प्राध्यापकी समीक्षेसारखी नसून सर्जनशील विवेकाची आहे. ती आस्वादक समीक्षेसारखी रसग्रहणावर समाधान मानणारी नाही. परंतु असे असूनही ही मीमांसा काहिशी दुर्लक्षित राहिली. गोडश्यांच्या कला‍मीमांसेने मराठी सौंदर्यशास्त्रात व समीक्षेत वैशिष्ट्यपूर्ण भर घातली आहे.
आपल्या अवतीभवतीच्या लोकजीवनातून आविष्कृत झालेल्या लोकाविष्कारांचा साक्षेपी वेध घेणारा समीक्षक म्हणून द. ग. गोडसे यांच्या कला मीमांसेने कलाप्रांताचे लक्ष वेधून घेतले. इतर मराठी समीक्षकांपेक्षा गोडसे यांच्या रसास्वादी आणि तरीही अभ्यासिन समीक्षेच्या (Practical Criticism) वेगळेपणाचे मर्म शोधण्याच्या जिज्ञासेतून ही मीमांसा अभ्यासली पाहिजे.
गोडश्यांनी आपल्या संकल्पनांचे व प्रमेयांचे अनेक कलाकृतींच्या संदर्भात उपयोजन केले आहे. या उपयोजनात चित्र, शिल्प, साहित्य, नाट्य, नेपथ्य, संगीत, नृत्य, वास्तु आणि नैसर्गिक आविष्कारही येतात. त्यामुळे या अभ्यास विषयाची व्याप्ती अभ्यासिन (Practical) किंवा उपयोजित ( Applied ) समीक्षेतून त्यांनी सांगितलेल्या विविध कलातत्वांचा पडताळा घेता येतो.
पंथ, संप्रदाय, धर्म यांचाही कलाविष्काराशी घनिष्ट संबंध येत असतो. जगातील आद्य वाङमय कुठल्यातरी मताच्या म्हणजेच संस्कृतीच्या प्रचारार्थ लिहिले गेले आहे. आज जागतिक महाकाव्य म्हणून मान्यता पावलेले रामायण, महाभारत, इलियड हे ग्रंथसुध्दा विशिष्ट संकृतीचे ग्रंथ आहेत, जे नंतर जागतिक मान्यता पावलेत. त्यांची मीमांसा करणे आणि ती पचवणेही आपण हळहळू शिकले पाहिजे.
(रविवार दिनांक 1 एप्रिल 2012 च्या महाराष्ट्र टाइम्स, संवाद पुरवणीत, प्रकाशित झालेला लेख)

-डॉ सुधीर रा. देवरे
इमेल : sudhirdeore29@rediffmail.com




रविवार, १० जून, २०१२

अस्वस्थ करणार्‍या काही बातम्या


                        - डॉ सुधीर रा. देवरे

 

      एवढ्यात काही बातम्या वाचण्यात आल्या. आपणही वाचल्या असतील. त्यापैकी काही बातम्यांची उजळणी:

बातमी पहिली: दिल्लीतील योजना आयोगाच्या इमारतीतील स्वच्छता गृहाच्या नुतनीकरणासाठी पस्तीस लाख रूपये खर्च झाले.

योजना आयोग म्हणजे काय? देशातील विकासकामांसाठी हा आयोग तरतुदी सुचवतो. या आयोगाने काही दिवसांपूर्वी जाहीर केलंय की जो मनुष्य दिवसाला 26 रूपये कमवतो त्याला गरीब म्हणता येणार नाही. म्हणूनच जो मध्यमवर्गीय माणूस आयुष्यभर कष्टाने स्वत:चा दहा लाखाचा फ्लॅट घेऊ शकणार नाही वा घर घेऊ शकणार नाही त्या देशातील योजना आयोग पस्तीस लाखात स्वच्छतागृहाची दुरूस्ती करतो.

 बातमी दुसरी: श्री क्षेत्र शनीशिंगणापूर येथील स्वयंभू शनिमुर्तीला एका शनिभक्ताने देवाच्या मुखवट्यासह साडेचार किलो सोन्याचा मुकूट अर्पण केला. या शनिभक्ताने नावाबाबत गुप्तता ठेवली आहे. ( बातमी, लोकसत्ता, 3 जून 2012, पहिले पान. मुकुटासह बातमी.)

      अशा भक्तांची सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे की त्यांच्याकडे एवढी संपत्ती कोणत्या देवाच्या कृपाप्रसादाने येते. बँकांचे राष्ट्रीयकरण झाले तसे मंदिरांचे करावे काय?

        बातमी तिसरी: सोनोग्राफी लिंग गर्भजल चिकित्सा केंद्रांनी सर्वत्र मांडलेला उच्छाद.

      या बातमीचा आवाका  आणि त्याचे क्षेत्रफळ पहाता ही बातमी तात्कालिक नाही. किमान 25 वर्षांपासून अशी तपासणी सर्वत्र होत आहे आणि गर्भपातही. यातील फरक एवढाच की 15 वर्षांपूर्वीपर्यंत अशा तपासणीसाठी नजीकच्या शहरात जावे लागायचे. आणि आता ही सोय आपल्या गावातही आहे. स्त्री मुक्त भारत व्हायला आता फार काळ वाट पहावी लागणार नाही.

       बातमी चौथी : वेगळ्या जातीत वा धर्मात लग्न करायची शिक्षा- मृत्यूदंड. आणि तोही आईबापांकडूनच. नुसते प्रेमाचे संबंध असले तरीही ही शिक्षा अमलात येते.

जास्त प्रमाणात मुलीच मारल्या जातात. काही ठिकाणी दोघांनाही मृत्यू पत्करावा लागतो. जातीसाठी माती खावी म्हणजे मुक्ती मिळेलच.

बातमी पाचवी: एक स्त्री डाकीण असल्याच्या संशयाने एका जोडप्याला वाळीत टाकायचा  एका जात पंचायतीचा निर्णय.

भारतात त्या त्या जातीच्या जातपंचायती गावपातळीवर परंपरागत पध्दतीने अस्तित्वात आहेत. भारतात कायदा अस्तित्वात असूनही असे बेकायदेशीर शिक्षा देण्याचे प्रकार सर्वत्र होत असतात. अजूनही भारतातील सर्वच आदिवासी क्षेत्रात या जात पंचायती न्यायदानाचे कार्य करत त्या जबर शिक्षा देत असतात. पर्ववैमनस्यातून एखाद्याचा काटा काढायचा झाला तर जातपंचायतीचा आधार घेतला जातो. डाकीण काढणे ही तर ढळढळीत अंधश्रध्दा.                          

  बातमी सहावी: भारतात विविध समारंभातून दिल्या जाणाय्रा जेवणावळीत अठ्ठावण्ण हजार करोड रूपयाचे अन्न वाया जाते.

आणि आपण परवडत नाही तरी कर्ज काढून जेवणावळी देत राहू. अनेक लोकांना भुके ठेऊन जेवणावळींचा उत्सव भरवत राहू या.

 

      ...आणि फक्त एवढ्याच बातम्या नाहीत. अशा बातम्या यापूर्वी होत्या. आता आहेत. यानंतरही बातम्या येतच राहणार आहेत. आपण काय करणार? हीच ना ती हताश प्रतिक्रिया? नाही. आपण खूप काही करू शकतो.

 

- डॉ सुधीर रा. देवरे

         sudhirdeore29@rediffmail.com

रविवार, ३ जून, २०१२

मराठी शिकवेल का कोणी

मराठी शिकवेल का कोणी

                    - डॉ. सुधीर रा. देवरे                                                     

      माझे एक हिंदी भाषिक मित्र आहेत. ते महाराष्ट्रात म्हणजे पुण्यात बँकेत नोकरी करतात. त्यांना मराठी भाषा बोलता आली नाही तरी त्यांचे काहीच बिघडणार नाही. त्यांचे सगळे व्यवहार सुरळीत चालू शकतील. कारण मातृभाषा मराठी असणारे नागपूर, मुंबई आणि महाराष्ट्रातील अनेक शहरातील लोक सुध्दा सर्रास हिंदीत बोलतात. पण या माझ्या मित्राला वाटते आपण महाराष्ट्रात राहतो तर आपण मराठी शिकली पाहिजे. म्हणून त्यांना कार्यालयीन मराठी शिकायची आहे. कामचलाऊ मराठी तर ते आताही बोलतात. त्यांनी मला विचारले की, असे प्रशिक्षण मला कुठे मिळू शकेल काय? मी तपास करतो म्हणालो. तपासाअंती असे प्रशिक्षण महाराष्ट्रात कुठेच मिळत नसल्याचे समजले.

      मुंबईतल्या महाराष्ट्र राज्याच्या मंत्रालयापासून विविध मराठी भाषा विभागात, विद्यापिठांत असा तपास करता असे प्रशिक्षण मिळण्याची कुठेच सोय नसल्याचे लक्षात आले. महाराष्ट्रात अशा अनेक शासकीय- अशासकीय भाषिक संस्था आहेत, तिथेही अशी सोय नाही.

मराठी भाषेचा पुळका असलेल्या काही राजकीय संघटनाही महाराष्ट्रात आहेत. मराठी माणूस आणि मराठी अस्मितेच्या तिकिटावर ते खाजदारकीपासून नगरसेकापर्यंत निवडूनही येत असतात. महाराष्ट्रात रहायचे असेल तर मराठीतच बोला असा त्यांचा नारा असतो. भाषेचा राजकीय फायदा उठवत ते विविध आंदोलने करीत असतात आणि आपल्याच म्हणजे सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड  करीत असतात.

पण काम, धंदा, नोकरी साठी महाराष्ट्रात आलेल्या अमराठी माणसांना जर मराठी भाषा शिकायची असेल तर तसे प्रशिक्षण देण्याची सोय आपण करावी हे अशा भाषिक राजकीय संघटनेच्या खिजगणतीतही नाही. कारण अशा कृतीशिल कामातून जेवढी प्रसिध्दी कधीच मिळणार नाही तेवढी एका तोडफोडीतून सहज मिळू शकते.

अशा प्रशिक्षणाची सोय कुठे असेल तर आपण जरूर कळवावे ही विनंती.

 

- डॉ सुधीर रा. देवरे

         sudhirdeore29@rediffmail.com