शनिवार, ३० मार्च, २०१३

धार्मिकतेचा धंदा




- डॉ. सुधीर रा. देवरे

         आपल्या देशात कोणत्याही धंद्याला मंदी येते. कुठल्यातरी उद्योगांना मंदी येत असते. पण असा एक उद्योग आहे की त्याची बाराही म‍हिने चलती असते. कोरडा दुष्काळ असो. ओला दुष्काळ असो. देशात काहीही होवो. लोक उपाशी मरोत. भूकबळी जावोत पण धार्मिकतेच्या धंद्यात कधीच तोटा येत नाही. भारतातील कोणत्याही मंदिरात जाऊन पहा. प्रचंड गर्दी. अगदी चेंगराचेंगरी होऊन कोणत्याही बाँबस्फोटापेक्षा जास्त माणसे मरतील इतकी गर्दी.
         देवाला चढणारे दागिने, दानपेटीत भरभरून पडणारा पैसा पाहून परदेशात कोणीच विश्वास ठेवणार नाही की भारतात पन्नास टक्के लोक गरीब आहेत, वीस टक्के लोकांना चांगले पोटभर जेवण मिळत नाही आणि असंख्य बालके कुपोशीत आहेत.
         ह्यात  दोन प्रकारचे धंदे आहेत. एक, मंदिरात चालणारा ‍धार्मिकतेचा धंदा आणि दुसरा, बाहेर मठांत, आश्रमांतून प्रती देव असणारे अनेक प्रकारचे तथाकथित संत. हे संत सर्वसामान्य लोकांना सुख शांतीचे अमिष दाखवत आपला धंदा राजरोसपणे चालवतात. रोज नवनवीन उदयाला येणारे बाबा, गुरू, देवी माँ, राधे माँ यांचे प्रचंड पंचतारांकीत पिके भारतात आले आहेत. राधे माँ नावाची देवी परवा भक्तांना एका चँनलवर म्हणत होती, भक्तो, आय लव्ह यु फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट.
         आणि लोक तिच्या पायाशी धनाच्या राशी ओततात. का ओतणार नाहीत. एक स्त्री असलेली देवी आपल्याला आय लव्ह यू म्हणते आणि तेही जाहीरपणे. अजून काय पाहिजे. इंग्रजी ही आता जागतिक भाषा झाल्यामुळे आणि भारतातल्या तरूण नवीन पिढीला देव भावायला हवा असेल तर भारतात नवीन देव-देवता म्हणून जन्म घेणार्‍या देवांना वा देवांच्या दलालांना सॉरी एजंट लोकांना आय लव्ह यू म्हणण्याइतके तरी इंग्लीश आलेच पाहिजे की नाही.
         देवालयांमध्ये गोळा होणारा प्रंचड पैसा दुष्काळसारख्या नैसर्गिक आपत्तींना वापरता येत नाही हा देवालयांचा अजून एक अँक्ट आहे. देवालयातला पैसा हॉस्पिटल वा अन्य कामे करण्यासाठी विश्वस्त वापरू शकतात पण दुष्काळ, भूकंप, सुनामी सारख्या नैसर्गिक आपत्तींसाठी हा पैसा वापरता येत नाही असा सगळ्याच मंदिरांचा अँक्ट सांगतो म्हणे. आहे की नाही गमंत.
         अशा देवाच्या नावाने चाललेल्या लबाड धंद्याना आपण ‍धार्मिक-अध्यात्मिक वगैरे ठरवत असतो आणि यावर टीका करणार्‍यांना नास्तिक म्हणत असतो हे त्यापेक्षा वाईट.

-         डॉ. सुधीर रा. देवरे           
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
        

शनिवार, २३ मार्च, २०१३

भालचंद्र नेमाड्यांचे भाषण



           - डॉ. सुधीर रा. देवरे

         सत्ताविस फेब्रुवारी 2013 ला मराठी भाषा दिनाच्या दिवशी नाशिक येथे भालचंद्र नेमाडे यांना जनस्थान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी त्यांनी केलेल्या भाषणातील दोन मुद्दे इतके महत्वाचे आहेत की त्यांची दखल सर्वत्र घेतली जाईल आणि यावर चॅनल्सवरूनही खूप चर्चा होईल असे मला वाटत होते. पण आपण कलावंताला वा साहित्यिकाला कसे गांभिर्याने घेत नाही, हेच मराठी वर्तमानपत्रांसह मिडियाने दाखवून दिले. अशी सर्वत्र शांतता पाहून या मुद्द्यांवर मी येथे मुद्दाम लिहीत आहे. नेमाडे यांचे त्या भाषणातील दोन मुद्दे असे:
         एक: महाराष्ट्रात शिवाजी महाराजांना ब्राम्हणांनी मुसलमानांविरूध्द वापरून घेतले. मराठ्यांनी ब्राम्हणांविरूध्द वापरून घेतले. शिवसेनेने दक्षिण भारतीय आणि उत्तर भारतीयांविरूध्द वापरून घेतले. मात्र शिवाजी महाराजांचे अनेक विश्वासू मुसलमान मित्र होते, तरीही बिचारे मुसलमान शिवाजी महाराजांना वापरून घेण्यात कमी पडले.
         दोन: रामाने सीतेचा अपमान केला. सीतेवर संशय घेऊन टाकून दिले. यामुळे अशा अन्यायी राजाचे मंदिर होऊ नये म्हणून आधी सगळ्या महिलांनी अयोध्येतील राम मंदिराला विरोध केला पाहिजे.
         : या भाषणातील हे दोन मुद्दे मला महत्वाचे वाटले. पण ऐकणार्‍यांना आणि मिडियालाही हे भाषण कदाचित विनोदी वाटले असावे म्हणून त्यांनी गांभिर्याने घेतले नाही की काय याची शंका येते. या दोन मुद्यांत मला चाकोरीबाहेरची वैचारिकता जाणवली. केवळ श्रोत्यांना हसवण्यासाठी काहीतरी बोलायचे म्हणून नेमाडे बोलले असे वाटून आपण प्रासंगिक विनोद म्हणून तिथेच हे सोडून दिले की काय? खरे म्हणजे अशा प्रकारचे वास्तव विचार आपल्या पचनी पडत नाहीत म्हणून आपण ते तिथल्या तिथे सोडून सोयिस्करपणे विसरून जातो.

-         डॉ. सुधीर रा. देवरे           
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
        

शनिवार, १६ मार्च, २०१३

सख्खा शेजारी: पक्का वैरी



 
- डॉ. सुधीर रा. देवरे

         भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या- विशेषत: पाकिस्तानच्या बाबतीत केलेल्या धरसोडीच्या धोरणाने आपल्याला वेळोवेळी अपमानित होण्याची वेळ येतेय. अफजल गुरूला झालेली फाशी म्हणजे भारतातील एक बिघडलेल्या दहशतवाद्याने जगातील सर्वातमोठ्या आणि आपल्याच देशातील सर्वोच्च लोकशाहीच्या व्यासपिठावर केलेल्या हल्ल्याची शिक्षा होती. मात्र हे आपल्या कृतीतून वेळेवर जगासमोर न मांडल्यामुळे पाकिस्तानसारखे दहशतवादी देश आपली खोडी काढू पाहतात.
         आजपर्यंत पाकिस्तान सांगत होतं, की दहशवादाशी आमचा कोणताही संबंध नाही. आम्हीच दहशतवादाची शिकार आहोत. पण दिनांक 14-3-2013 या दिवशी त्यांच्या संसदेत त्यांनी अफजल गुरूच्या फाशीबद्दल भारताचा निषेध करण्याचा जो ठराव केला त्या ठरावाने त्यांनी हे जगाला दाखवून दिले, की पाकिस्तान हा अधिकृतपणे जा‍गतिक दहशतवादाचा पुरस्कार करतोय. पाकिस्तानच्या या कृतीमुळे ते किती बालीश आणि असंमजस व धर्मांध राष्ट्र आहे हे पुन्हा एकदा सिध्द झालंय.
         पाकिस्तानला आज कोणती उपमा द्यावी हा माझ्यासमोर मोठा प्रश्न आहे. कारण कोणतीही उपमा फिकी पडेल असे पाकिस्तानचे हे कृत्य आहे. आज पाकिस्तानला उपमा द्यायचीच झाली तर रॅबीज झालेल्या श्वानाची देता येईल. पाळलेल्या श्वानाला रॅबीज झाला तर त्याला कितीही जीव लावा, त्याचे लाड करा वा त्याला कुरवाळा, प्रेम करणार्‍यालाच तो चावा घेतो. भारताने जेव्हा जेव्हा पाकिस्तानला प्रेमाने कुरवाळायचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा त्याने भारताला कडकडून चावा घेतला. अशा श्वानाला डॉक्टर इंजेक्शन देऊन शांत करतात. म्हणजे मारून टाकतात. कारण तो श्वान कधीही बरा होणारा नसतो.
         पाकिस्तानला मारण्याचे पाप भारताने कधीही करू नये. तरीही त्याला कुरवाळण्याचे उद्योगही त्वरीत बंद केले पाहिजेत. त्याच्याशी असलेला व्यापार बंद केला पाहिजे. कोणत्याच प्रकारची चर्चा करता कामा नये. बस, ट्रेन बंद केल्या पाहिजेत. कोणालाही भारतात यायला व्हिसा देणे बंद केले पाहिजे. खेळ बंद केले पाहिजेत आणि सिमेवर जास्त पहारा देऊन त्याच्या कोणत्याही आगळिकीला जिथल्यातिथे चोख उत्तर देणे सुरू ठेवले पाहिजे.
         पाकिस्तान हा इस्लामचे नाव घेऊन इस्लामच्या शिकवणुकीला काळे फासणारा देश आहे. भारतातील ज्यांना कोणाला पाकिस्तानबद्दल प्रेम असेल (ओवेसी, अफजल गुरू सारखे) त्यांनाही कडक इशारा द्यायला हवा: पाकिस्तान आता जास्त काळ एक देश म्हणून अस्तित्वात राहणार नाही आणि राहिला तरी तो देश म्हणण्याइतका कधीच भरभराटी करू शकणार नाही. म्हणून पाकिस्तानच्या भरोश्यावर असणार्‍यांनो, तुमचेही भवितव्य अंधारात आहे. म्हणून सावधान.

-         डॉ. सुधीर रा. देवरे           
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
        

शनिवार, ९ मार्च, २०१३

फोटो लावण्याची गरज नाही



 
-         डॉ. सुधीर रा. देवरे


      माझ्याकडे अभ्यास, मार्गदर्शन, चर्चा आणि वेगवेगळ्या कारणांसाठी अनेक अभ्यासकांचे येणे असते. पैकी बरेच जण माझ्या घरात कोणतेच फोटो- मुर्त्या नाहीत म्हणून अस्वस्थ होतात. माझ्याविषयी ते काही अंदाज बांधू शकत नाहीत. उघडपणे  विचारूही शकत नाहीत. मात्र अलिकडे तसे विचारणारा एक जण निघालाच. म्हणाला, सर एक विचारू का? तुमच्या घरात कोणत्याही ऐतिहासिक पुरूषाचा वा देवाचाही फोटो नाही. असे का?
      मी तात्काळ म्हणालो, याचे कारण मला फोटो लावायचे असतील तर सगळेच लावावे लागतील. एकटा दुकटा फोटोच का लावायचा? अमूक पासून अमूक पर्यंत मला फोटो लावावे लागतील असे मी म्हणालो तर त्यात तुम्हाला अभिप्रेत असलेली एखादी ऐतिहासिक व्यक्ती माझ्या मनात आहे की नाही अशी शंका येऊ शकते. म्हणून मी सगळीच नावे घेण्याचा प्रयत्न करतो- काही नावे सुटण्याची शक्यता गृहीत धरून. ती नावे अशी:
      येशू ख्रिस्त, महम्मद पैगंबर (काबा), कृष्ण, राम, गौतम बुध्द, महावीर, गुरू नानक, गुरू गोविंदसिंग, चार्वाक, व्यास, वाल्मीक, कालिदास, सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी, विवेकानंद, कबीर, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, गाडगे बाबा, चोखोबा, जनाबाई, कान्होपात्रा, छत्रपती शाहू, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, वि. रा. शिंदे, आगरकर, धोंडो केशव कर्वे, रघुनाथ कर्वे, राजाराम मोहन राय, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सावरकर, सुभाषचंद्र बोस, पंडीत जवाहरलाल नेहरू, डॉ बाबासाहेब आंबेडकर, साने गुरूजी, विनोबा भावे, रविंद्रनाथ टागोर, वि. का. राजवाडे, जयप्रकाश नारायण, हमीद दलवाई, अँरिस्टॉटल, सिग्मंड फ्रॉइड, लिओ टॉलस्टॉय, शेक्सपिअर, कार्ल मार्क्स, सॅम्युअल हॅनिमन, हिप्पोक्रेट, गॅलिलिओ, एडीसन, न्यूटन, आइन्स्टाइन या व्यतिरिक्त सगळे शास्त्रज्ञ, संशोधक, तत्वज्ञ, लेखक आदींचे फोटो मला लावावे लागतील. अर्थात ते अशक्य आहे असेही नाही.
      छोट्या आकारातील खूप सारे फोटो एका फ्रेममध्ये घेऊन मी घरात लाऊ शकतो.
पण मला तशी गरज वाटत नाही. तसे करण्यात वेळ का घालवायचा? वर सांगितलेल्या लोकांचे विचार मी आमलात आणले पाहिजेत. त्यांचा अभ्यास केला पाहिजे. वरीलपैकी प्रत्येकाचे स्मारक मी माझ्या हृदयात बांधले पाहिजे. मी जागतिक महाकाव्य- इलियड रामायण महाभारत वाचली पाहिजेत. गीता, बायबल, कुराण, ग्रंथसाहिब, त्रिपिटीक, अवेस्ता असे सर्व धर्मग्रंथ समजून घेतले पाहिजेत. शाहू, महात्मा फुले, आंबेडकरांची वै‍चारिकता जीवनात उपयोजित केली पाहिजे. असे झाले तर घरात एखादा फोटो लावण्याची गरज कोणालाच वाटणार नाही.

-         डॉ. सुधीर रा. देवरे
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
         

शनिवार, २ मार्च, २०१३

स्मारकांच्या देशा




 - डॉ. सुधीर रा. देवरे

         दिल्लीत बलात्कार झाला आणि नंतर प्रंचड जनक्षोभ उसळला. त्यावेळी एका टीव्ही चॅनलवर भावनिक आवाहन केले जात होते, की पिडित महिलेचे स्मारक बांधायला हवे काय? इतक्या गंभीर प्रसंगीही मला त्यावेळी हसू आले होते. (नंतर काही दिवसांनी त्या पिडित मुलीचा मित्र एका चॅनलवर त्याच्या मुलाखतीसह दाखवला आणि त्यावेळीही त्या चॅनलवर चर्चा झाली, की या तरूणाला शासनकडून शौर्य पदक देण्यात यावे काय? यावेळीही ही चर्चा हास्यास्पद वाटली. त्या युवकाने धाडस दाखवले हे सत्य असले तरी त्याचे ते कर्तव्यच होते असे चॅनलला वाटले नाही.  आणि त्यामुळेच त्याला पुढे प्रश्न विचारला गेला की तुला तिथून पळून जावेसे का नाही वाटले? हा प्रश्न ऐकून तर मी डोक्याला हात लावला. ज्याच्या विश्वासाने ती मुलगी बाहेर पडली होती आणि ती त्याची मैत्रीण होती. तिच्यासाठी प्राण पणाला लावणे हे सा‍हजिक होते. त्या युवकाऐवजी दुसरा कोणीही असता तरी त्याला तिथे लढावेच लागले असते.)
         महाराष्ट्रात सध्या असेच स्मारकांचे वादळ आलेले आहे. शिवाजी महाराजांचे स्मारक समुद्रात व्हावे का अन्य ठिकाणी. ते कसे असावे. पुतळा किती उंचीचा असावा. बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक कुठे करावे. महात्मा फुले यांच्या स्मारकाचे काय? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची किमान जागा तरी नक्की झाली. अजून काही स्मारकांची चर्चा सुरू आहे. पण त्यांचा आवाज अजूनतरी वाढलेला नाही.
         जी स्मारके आज महाराष्ट्रात उभी आहेत, त्यांची अवस्था पाहिलीत तर ह्या स्मारकांचे एकतर कुठे मंदिरे झाली आहेत नाहीतर ती भूतबंगले म्हणून शिल्लक राहिली आहेत. स्मारके कशासाठी? का? ज्यांच्या स्मारकांची आपण मागणी करतो त्या व्यक्ती आपण नीट समजून घेतल्यात का? त्यांचे विचार समजून घेतलेत का? त्यांचे तत्वज्ञान अभ्यासले का? त्यांनी लिहून ठेवलेले ग्रंथ वाचलेत का? त्यांचे कार्य आपल्याला माहिती आहे का? आपण जे काही स्मारक उभारायचे म्हणतो ते त्यांच्या स्वत:च्या विचांरांशी सुसंगत आहे का, हे ही तपासून घ्यायला नको हवे याचे भान कोणालाच नाही. स्मारके म्हणजे प्रंचड ग्रंथालय ही संकल्पना आपल्याकडे अजून रूजायची आहे.
         महाराष्ट्रापुढे आज किती गंभीर प्रश्न उभे आहेत हे खरे तर कोणालाच सांगायची आवश्यकता नाही. त्यातला तात्कालीक प्रश्न म्हणजे पिण्याचे पाणी. भीषण दुष्काळ. तरीही असे प्रश्न प्राधान्याने बाजूला ठेऊन बाकीचे बिनमहत्वाचे प्रश्न का पुढे येतात, हा आज अभ्यासाचा विषय होऊ पहातोय. बौध्दीक प्रबोधन करण्याऐवजी लोकांच्या भावना कुरवाळणे राजकीय लोकांकडून नेहमी होतंय ते केवळ मतपेटीसाठी. अशा भावनिक मुद्द्यांना हात घातला की लोक आपले खरे प्रश्न विसरून संमोहीत होतात. आणि या पोकळ अस्मितेवर जगत राजकीय लोकांना मते देऊन त्यांना मोकाट सोडतात. लोकांच्या पोकळ अस्मिता कुरवाळल्या की ते वश होऊन आपल्याला मतदान करतात हे राजकीय नेत्यांच्या- पक्षांच्या लक्षात आलं आहे. अशा पध्दतीने निवडून येऊन नेते वास्तवात सगळ्या प्रकारचे ऐषारामी जीवन व्यतीत करत राहतात. आणि आपण काल्पनिक सुखात तुडुंब जगत राहतो. अर्धपोटी का होईना.

-         डॉ. सुधीर रा. देवरे           
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/