रविवार, ३० नोव्हेंबर, २०१४

बाबा-बुवांचा दहशतवाद


                        -  डॉ. सुधीर रा. देवरे

       भारतात असे अजून किती बाबा आहेत! ज्यांच्याजवळ शेकडो एकर जमीन आहे. ज्यांच्याकडे अमाप संपत्ती आहे. (अशी संपत्ती अपघाताने सापडलीच तर ती सामुहीक पध्दतीने मोजायलाही काही दिवस लागतात.) भारतात अजून असे किती बुवा आहेत! ज्यांनी शेकडो लोकांच्या जमिनी बळकावल्या आहेत. राज्याराज्यात आणि देशोदेशात ज्यांनी आपल्या आश्रमरूपी पंचतारांकीत शाखा उघडल्या आहेत. ज्यांचे लाखोंनी अनुयायी आहेत. ज्यांच्या सुरक्षेसाठी खाजगी सैन्य आणि खाजगी कमांडो आहेत. ज्यांना भारताचा कोणताही कायदा मान्य नाही. भारताच्या राज्यघटनेपेक्षा आणि कायद्यापेक्षा जे आपल्याला उच्च स्थानावर समजतात. त्यांच्या वाट्याला जाल तर तुम्हाला दगडी झेलाव्या लागतील. पेट्रोलबाँब झेलावे लागतील. बंदुकीच्या गोळ्या झेलाव्या लागतील. अंगावर तेजाब झेलावे लागेल. ज्यांच्या पंचतारांकीत हॉटेलरूपी आश्रमाला तीन स्तरीय भक्कम गडकोट आहेत. ज्यांच्या आश्रमात महिलांवर धार्मिकतेच्या नावाखाली स्वत: बाबांकडूनच गुपीत अत्याचार केले जातात. जिथे महिला आणि मुलांचा ढालीसारखा वापर केला जातो. तोंड उघडणार्‍यांना ब्लॅक मेलींग केले जाते. अशा सर्व बाबा-बुवांची स्वतंत्रपणे जनगणना करावी काय. म्हणजे तेव्हा कुठे त्यांची नेमकी बाबासंख्या समोर येईल.
         नोकरी इमाने इतबारे करता येत नसेल तर या देशात कोणालाही सहज बाबा होता येते. नोकरीतून बडतर्फ झाल्यावर राजमार्गाने बुवा होता येते. गुंडगिरी करता करता एक दिवस बाबा होता येते. ज्याच्या अंगी थोडाफार वक्‍तृत्व गुण असेल त्याला प्रवचने करून सहज बुवा होता येते. चांगले राजकारण करता येत नसेल तर या देशात बाबा होता येते. राजमार्गाने गुंडगिरी करता येत नसेल तर भगव्या वस्त्रातल्या बाबागिरीतून ती सहज करता येते. बाबा होण्यासाठी कोणतीच स्पर्धा परीक्षा देण्याची आवश्यकता नाही. कोणतीच शैक्षणिक प्रमाणपत्रे कोणाला दाखवण्याची गरज नाही. दहावी पास नापास असलात तरी बाबा होता येते. बुवा होऊन गडगंज संपत्ती कमावता येते. आणि त्या संपत्तीतून देशासाठी कर भरलाच पाहिजे असेही नाही. जे लोक प्रत्येक महिण्याला किरकोळ पगार घेतात ते कर भरतील. बाबांचे ते काम नाही.
         जो जो बाबा अशा उद्योगांनी उजेडात येतो, त्याच्या साम्राज्याने आपले डोळे दिपवून टाकतो. हरियानातील बरवाला- हिसार येथील एकट्या रामपालबद्दल मी बोलत नाही. रामपाल हा प्रातिनिधीक बाबाचे फक्‍त एक उदाहरण ठरू शकतो. रामपाल ही एक बाबा-बुवाप्रवृत्ती आहे. असे असंख्य रामपाल भारतात आपले साम्राज्य चालवत आहेत. अजून अशा पध्दतीने उजेडात न आलेले अनेक बाबा आपली स्वतंत्र राज्यव्यवस्था चालवताहेत आणि पुढेही चालवत राहतील. चंद्रास्वामी, सत्य साईबाबा, आसाराम, त्याचा मुलगा, आता रामपाल अशी ही खूप मोठी रांग आहे. जे उजेडात येत नाहीत त्यांच्या साम्राज्यातील हुकुमशाही अव्याहतपणे सुरू आहे. दोनहजार सहाला रामपालने आर्य समाजाच्या दयानंद सरस्वती यांच्या पुस्तकावर टिपणी करून दंगल घडवली नसती तर न्यायालयाने त्याला समन्स बजावले नसते आणि त्याचे उद्योग यापुढेही राजकीय आ‍शीर्वादाने सुरू राहिले असते. या आश्रमात काय चालते हे कदाचित कायमचे गुलदस्त्यात राहिले असते. ( या देशात जी थोडीफार सुव्यवस्था टिकून आहे ती इथल्या न्यायालयांमुळे आहे. जे काम सरकारचे आहे ते आज न्यायालयांना करावे लागते, हे इथल्या कोणत्याही सरकारला लज्जास्पद वाटत नाही.) भारतात असंख्य बाबा-बुवांनी राजरोस आपली संस्थाने सुरू ठेवली आहेत. रामपालच्या साम्राज्यापेक्षा प्रचंड साम्राज्य अजून अनेक बाबांकडे आढळतील. (इथे बाबा-बुवांऐवजी संत हा शब्द मुद्दाम वापरला नाही. यांना तथाकथित संत असे म्हटले तरी आतापर्यंत होऊन गेलेल्या थोर संतांचा तो अपमान ठरेल.)   

         प्रत्येक बाबाला कायदा‍ शिकवण्यासाठी शासनाला एवढा प्रंचड फौजफाटा गोळा करावा लागत असेल. काही लोकांच्या प्राणांची आहुती द्यावी लागत असेल. देशाचे कोट्यावधी रूपये अशा अटकेसाठी खर्च होत असतील तर आपण नेमके कुठे चाललोत हे कोणी नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. (रामपालला पकडण्यासाठी 27 कोटी रूपये भारताला खर्च करावे लागलेत. मात्र त्याची तिजोरी त्याने त्याआधीच मोकळी करून ठेवली होती.) बिचारा भारत. एकीकडे उघड उघड आतंरराष्ट्रीय दहशतवाद झेलतोय. दुसरीकडे भारतातल्या जंगलांतून लपून छपून पाठीमागून वार करणारे नक्षलवाद भोगतोय आणि तिसरीकडून अगदी हमरस्त्यात बाजार मांडणार्‍या बाबा-बुवांचा दहशतवादी उच्छाद सहन करतोय.
         भारताबाहेर भारतीयांचा काळा पैसा किती असावा, हे इथल्या सामान्य माणसाला माहीत नाही. असेल तर तो भारतात कधी येईल हे ही कोणाला माहीत नाही. मात्र भारतातील मंदिरांचे आणि अशा तथाकथित बाबा-बुवांच्या आश्रमांचे बँकांप्रमाणे राष्ट्रीयकरण केले तर जो प्रचंड पैसा बाहेर येईल त्यातून देशाचे नक्कीच काहीतरी भले होईल. पण त्यासाठी राज्यकर्त्यांजवळ इच्छाशक्‍ती असावी लागते. फक्‍त विरोधासाठी विरोध आणि फालतू राजकारण करणे सोडून देशाच्या भवितव्याची तळमळ असावी लागते. ज्या देशात निवडणुका लढवण्यासाठी तथाकथित बाबा-बुवांची मदत घेतली जाते, एखाद्या फडतूस व्यापारी बाबाची तुलना एखादा राजकारणी, महात्मा गांधी आणि जयप्रकाश नारायण यांच्याशी करत असेल, त्या देशात यापेक्षा अजून दुसरे काय घडेल.
         (या ब्लॉगमधील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या
ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)  

     -  डॉ. सुधीर रा. देवरे
     
           इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
     

शनिवार, १५ नोव्हेंबर, २०१४

कविता, गाणी आणि मंचीय कविता





-         डॉ. सुधीर रा. देवरे

         साठोत्तरी कवितेला मागे टाकून आज नवोदत्तरी कविता दिवसेंदिवस प्रगल्भ होऊ लागली तरी सर्वत्र दिसणारी – सादर केली जाणारी करमणूकप्रधान पारंपरीक कविता आपले मूळ सोडायला तयार नाही. ती विपुलपणे फोपवायला पोषक परिस्थिती आजही आजूबाजूच्या वातावरणात दिवसेंदिवस वाढताना दिसते. याला कारणीभूत ठरणारा पहिला घटक मला पाठ्यपुस्तक अभ्यासक्रमात दिसतो. पुढे भविष्यात जो जो कोणी कवी होणार असतो, त्याला कविता पहिल्यांदा शालेय-महाविद्यालयीन अभ्यासक्रमात पाठयपुस्तकातून भेटते आणि ‍अशाच कवितांचा संस्कार त्यांच्यावर निर्णायक ठरतो.   
         राखीव जागांप्रमाणे कवितांना पाठ्यपुस्तकात स्थान दिले जाते. कवितेच्या गुणवत्तेप्रमाणे नाही. संत कवी इतके, पंत कवी इतके, विशिष्ट धर्मिय कवी इतके, विशिष्ट जातीय कवी इतके. त्यानंतर शेतकरी वा ग्रामीण बोली भाषेतील कवितेला जागा मिळाली तर मिळाली. असा राखीव कोटा पूर्ण करताना आणि काहींची वशिल्याने वर्णी लावताना चांगली कविता अभ्यासक्रमात कधीच येत नाही. म्हणून जिला कविता म्हटले जाते, ती अशीच असते, अशी खूणगाठ बालपणी- किशोरपणी भावी कवी आपल्या मनात बांधून ठेवतो आणि पुढे आयुष्यभर तशाच कविता पाडू लागतो. आपण अभ्यासलेल्या कवितेव्यतिरिक्‍त कविता असू शकते हे तो मान्य करायलाच तयार होत नाही. या मनस्थितीतून खूप कमी लोक बाहेर पडतात, ज्यांना वेळेवर योग्य मार्गदर्शक लाभतो.
         दुसरा घटक म्हणजे दरवर्षी गावोगावी होणारी शेकडो हौसी साहित्य संमेलने. (अशा संमेलनांतही राजकारण आणि अर्थकारण खेळत राहते.) या संमेलनांतून वाचली जाणारी मोठ्या प्रमाणातील अकविता. या अकवितेमुळे समाजात कोणालाही सहज कवी म्हणून मान्यता मिळू शकते आणि तालुका जिल्हास्तरीय वर्तमानपत्री प्रसिध्दीही मिळते. श्रोत्यांमधील कवी होऊ घातलेले शालेय- महाविद्यालयीन विद्यार्थी याच कवितेचे अनुकरण करत कवी होऊ पाहतात. कविता करणे किती सोपे आहे, असे ही  व्यासपिठीय कविता ऐकून त्यांच्या ध्यानात येऊ लागते. तिसरा घटक म्हणजे कवितेचा व्यावसायिक धंदा करत पैसा कमवू पाहणारा कवी वर्ग. हे कवी कवितेचे कार्यक्रम करतात. गावोगावी शक्य असेल त्या व्यासपिठांवर आणि महाविद्यालयांमध्ये कविता वाचन करून पैसे कमविण्यासाठी कविता राबवतात.
         आज लिहिल्या जाणार्‍या कवितेत तीन प्रकार दिसतात. आधुनिक म्हणता येईल अशी कसदार सकस कविता, गाण्यांचा प्रभाव असलेली गेय कविता (चारोळ्या आणि गझला गृहीत.) आणि व्यासपिठावरून भाषण करावे तशी म्हटली जाणारी मंचीय भाषण कविता. मंचावरून एखाद्याने आपली गंभीर कविता सादर केली की तिला कसलीही दाद मिळत नाही. मग श्रोत्यांच्या डोक्यावरून जाईल ती पडलेली कविता, अशी वर्गवारी ठरलेली. कवीने अशी गंभीर कविता सादर करायला सुरूवात केली की एकेका शब्दांचा वा ओळींचा संदर्भ मॉबला तात्काळ लागेलच याची शाश्वती नसते. श्रोत्यांमध्ये असे जाणकार दर्दी काव्य रसिक असतातच असे नाही. परिणामी गंभीर कविता व्यासपिठावर सपशेल अयशस्वी ठरते.
         एक वेळ गाणे- गेय कविता ऐकून आपण सहन करू शकतो पण मंचावरून सांगितली जाणारी भाषण कविता ऐकणे जबरदस्त शिक्षा ठरते. अशा भाषण कवितेत विशिष्ट पध्दतीचा हेल काढून उपदेश, सुविचार, उद्‍गार, तथाकथित प्रबोधन, माहिती, चटकदार कोट्या, टोमणे, कोपरखिळ्या असे सर्व काही अगदी ठासून भरलेले असते. ‘वा वा, क्या बात है’ आणि टाळ्या असा प्रतिसाद मिळाला की कवी अजून चेकाळतो. ज्या कवितेला अशी दाद मिळाली ती गावोगाव आपोआप चांगली कविता म्हणून पुढे येते आणि त्या कवितेचा जन्मदाता सुप्रसिध्द कवी म्हणून ओळखला जातो.
         सदर लोकप्रिय कविता आपल्याला कशी सुचली याची निर्मितीप्रक्रिया सुध्दा सांगितली जाते. अनेक कवी डायसजवळ विशिष्ट पोज देणे याला सुध्दा आता कविता सादर करण्याचे अंग मानू लागलेत.  आजच्या फेसबुकच्या जमान्यात अशा भाषण कविता सादर करतानाचा फोटो तर आवश्यक बाब ठरली आहे. कविता आणि भाषण यांच्यातील पुसट रेषा अनेकांच्या लक्षात येत नाही. यात विद्यापिठीय चर्चासत्रांची भर पडली आहे. (तू मला तुझ्या कॉलेजवर बोलव आणि उसणे फेडण्यासाठी  मी पण बोलवीन. यात तू गोड मी गोड, असं सगळीकडे गोड गोड साटंलोटं चाललंय. भाषण हे विशिष्ट मुद्दे मांडण्यासाठी दिले जात नाही,  तर नेमून दिलेला समारंभाचा तास पूर्ण करण्यासाठी केले जाते. मग त्यात विनोद, चुटके, किस्से सांगत वेळ मारून नेता येते. तीच गोष्ट कवितेची.) आज कवितेची आराधना व्यावसायिक होत पैसे कमावण्याचे साधन होऊ पहात आहे हे सर्वात घातक. हौस आणि बेगडी प्रसिध्दी ही या नाण्याची दुसरी बाजू. (उदाहरणादाखल त्या त्या प्रकृतींच्या कवींची नावे इथे मुद्दाम दिलेली नाहीत.)
         गुहामानवासारखे आपल्या घराच्या कोपर्‍यात समाधी लावून कविता जगणारे कवी ह्या हमरस्त्यातून आल्हाद बाजूला फेकले जातात. ते कोणत्याच परंपरेत (पहिली, दुसरी, तिसरी परंपरा) बसत नाहीत. कोणत्याच गटात सामील होत नाहीत. समीक्षकही त्यांना अनुल्लेखाने मारतात. म्हणून असे कवी व्यासपिठांवरून तर दिसत नाहीतच पण तथाकथित चळवळीतल्या अनियतकालिकांतही छापून येत नाहीत. तिथेही गट तट असल्याचा हा परिणाम असतो. 
         कविता कशी आस्वादायची यावर एकदा विंदा करंदीकर आपल्या मुलाखतीत म्हणाले होते, ‘कविता आस्वादायची नसते. भोगायची असते, आणि ती ही अगदी कपडे काढून’. याचा अर्थ कविता ही सार्वजनिक जागेत आनंद घेता येईल अशी कलाकृती नाही. सोवळे ओवळे पाळून मखरात बसवून पूजा अर्चना करायची ती आकृती नाही. कविता ही ‍अतिशय एकांतात समाधी लावून, व्रत घेऊन म्हणजेच अभ्यास करून मेंदू आणि हृदयाने जगण्याची- लिहिण्याची- समजून घ्यायची कला आहे, असा या उद्‍गाराचा ध्वन्यार्थ काढता येईल.
         (या ब्लॉगमधील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या
ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

        -  डॉ. सुधीर रा. देवरे
     
           इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
     

शनिवार, १ नोव्हेंबर, २०१४

बार : एक सांस्कृतिक लढाई





- डॉ. सुधीर रा. देवरे

            (ग्रंथाली प्रकाशन, मुंबई तर्फे दिनांक 3 डिसेंबर 2011 ला प्रकाशित झालेल्या अहिरानी लोकपरंपरा’  या माझ्या पुस्तकातील एक संपादित लेख.)

      अक्षय-तृतीयेच्या दिवशी दुपारी तीन वाजेपासून नदीच्या दोन्ही काठांवर बार खेळण्यासाठी लोक जमू लागतात. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत -म्हातारे -कोतारे देखील बार पाहण्यासाठी गर्दी करतात. जाणत्या वयाच्या मुलांपासून तर तरण्याताठ्या माणसांपर्यंत सर्वच जण दगडी गोळा करून, हातात गोफण घेऊन बसलेले असतात. एकदाचा बार सुरू झाला क इकडची माणसं दुसर्‍या गावाच्या माणसांवर दगड फेकतात आणि तिकडची माणसं इकडच्या गावकर्‍यांवर दगडफेक करतात. कुणी  हाताने दगडी फेकतात. तर कुणी गोफण्यांच्या साहाय्याने भिरकावतात. सर्वजण एकमत करून दगडी घेऊन अशा भरधाव वेगाने धावतात की तिकडची माणसं गावातच पळून जातात. मग तिकडची माणसं सुद्धा अशाच पद्धतीने ह्या लोकांवर तुटून पडतात आणि ही माणसं सुद्धा गावाकडे जीव घेऊन पळतात. हा खेळ म्हणजे एक छोटीशी लढाईच असते. दरवर्षी इकडची दहा बारा आणि तिकडची आठ दहा डोकी तर फुटतातच फुटतात पण डोकी फुटूनही कोणीही कोणावर पोलीस केस करत नाही की जुने भांडणही उकरुन काढत नाही. अक्षय तृतीयेच्या दिवसानंतर पुन्हा जो तो आपापल्या कामाला जुंपला जातो. दोनही गावांतील माणसे एकमेकांच्या गावात जायला लागतात. मग अक्षय तृतीयेच्या दिवशी बार खेळतांना एकमेकांची डोकीही फोडलेली असली तरी देखील दुसर्‍या दिवसापासून ते गोड बोलतात. ती  लढाई केवळ त्या एका दिवसासाठी असते, याचे भान दोन्ही बाजूच्या गावकर्‍यांना असल्याने ते एकमेकांचा व्देष करत नाहीत की डूख धरून बसत नाहीत. दोन्ही गावांची वेस त्या गावांमधून वाहणारी नदीच असते. बारच्या वेळी दोन्ही गावाचे मांग नदीमध्ये उभे राहतात. दोन्हीकडील मुलांना ते दूर ठेवतात. मुला-मुलींना लांबूनच लढाई करायला सांगतात. मांग झटापट होऊ देत नाहीत. त्यांच्यावर कोनीही दगडांचा वर्षाव करीत नाही. हा अलिखित नियमच आहे.
            हे झालं पुरूषांचं. मुलींचा बार तर यापेक्षाही विचित्र असतो. सासरी गेलेल्या विवाहिता सणासाठी माहेरी येतात. अक्षय तृतीयेच्या दिवशी त्या सणासाठी सजतात-सवरतात. विवाहीत मुलींपेक्षा कुमारीकाच बार खेळण्यासाठी अधिक उत्सुक असतात.
            गावातील मुलींपैकी एक मुलगी प्रमुख असते. तिला पुरूषी पोशाख घातलेला असतो. शर्ट-पँट, बूट घालून सजवलेल्या मुलीला मोगल म्हणतात. हा मोगल सर्वांच्या पुढे असतो. तिच्या हातात लहानसा आरसा देतात. बार खेळता-खेळता मोगल दुसर्‍या गावातील मुलींना तो आरसा दाखवून शिव्या घालतात. बाकीच्या मुली मोगलच्या मागे-पुढे व आजूबाजूला असतात. एक मुलगी मोगलच्या डोक्यावर छत्री धरते. अशा पद्धतीने दोन्ही गावांचे मोगल एकमेकांच्या समोर येऊन एकमेकांना गाण्यांमधूनच शिव्या घालतात. बार खेळण्यासाठी मुलींच्या अशा अनेक टोळ्या असतात. मुलींच्या हातात टिपर्‍या असतात. टिपर्‍यांच्या चालीवरच त्या एकमेकींना शिव्या घालतात. मोगल मात्र एकच असतो. दोन्ही गावांच्या भिलाटींचे णखी वेगळे मोगल असतात.
            दोन्ही गावांच्या मुली बार खेळतांना एकमेकांना अश्लाघ्य-अश्लील शिव्या घालतात. अश्लील चाळे करतात. काही शिव्या अशा:
)    वाही वनी आकोडी , - -  गयी साकोडी.
)    सानावाटे टाका दोर , धरा धरा रम्या चोर .
)    मन्हा निंबले निंबोळ्या , सकीनी - - ले घामोळ्या .
)    कढं कढं गुळणं कढं , डोंगरेजन्या पोरीस्ले - - नं यडं .
)    येकाना घे पोरी दोनाना घे , बारानी गाडीले लवकर ये .
)    डोकावर धुनं कोनं वं , शिपाई दाद्या तीना वं .
)    डोंगरवाडी कुचू कुचू , मंगीनी - - वर बारा इच्चू .

      परंतु अशा वेळ त्याचं कोणाला काही वाटत नाही. आजूबाजूला भरपूर पुरुष मंडळी बसलेली असतात. त्यांनाही त्यात काही वावगं वाटत नाही. कारण ही पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. जवळच्या कोणत्याही दोन गावांमध्ये हा बार खेळला जातो. बहुतांशी अशा गावांमधून सामाईक नदी असते. म्हणूनच नदीच्या तिरांवर उभे राहून हा खेळ खेळता येतो आणि नदी ही नैसर्गिक सीमा असते. विरगांव- डोंगरेज, तळवाडा - किकवारी , आसखेडा - वाघळे ,द्याने-उतराने, सटाणा -मळगांव, सोमपूर -भडाणे, करंजाड-पिंगळवाडे, पारनेर - निताने ह्या काही गावांच्या जोड्या आहेत जिथे पूर्वापार पद्धतीने बार खेळला जातो.
            अशा पद्धतीने लगतच्या गावांमध्ये बार खेळला जातो. यांपैकी काही गावं तर बारसाठीच प्रसिदध आहेत. काही वर्षापूर्वीपर्यंत बार पाहण्यासाठी दूरदूरचे पाहुणे या गावांना भेटी देत असत. जात -पात विसरून सर्वजण बार खेळत आणि संध्याकाळी आपापल्या घरी परतत. परंतु अलिकडे खेड्यांमध्ये देखील शहरी संस्कृती प्रविष्ट होऊ लागली आहे, त्यामुळे आई-वडील मुलींना बार खेळायला जाऊ देत नाहीत. बार खेळणं आपल्याला शोभत नाही, ते खालच्या जातीसाठी आहे, अशी वर्गीय जाणीव आता बारसंबंधी दिसू लागली आहे. अगोदर मात्र असं नव्हतं. वाणी -ब्राम्हण -मराठ्यांच्या मुलींपासून तर भिल्लांच्या मुलींपर्यंत सर्वच बार खेळत. परंतु आता तसं राहिलेलं नाही. बारमधल्या अश्लीलपणाकडे अश्लील दृष्टीनेच गावकरी बघू लागले आहेत. आणि आम्ही त्यांच्यापैकी नाहीतच असं सांगणं त्यांना प्रतिष्ठेच वाटू लागलं आहे. म्हणूनच बार नावाची सांस्कृतिक लढाई आज लोप पावत चालली आहे.
            (यातील मजकूराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

-         डॉ. सुधीर रा. देवरे  
     
     इमेल: sudhirdeore29@rediffmail.com        
  
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/