शुक्रवार, ३० जून, २०१७

नावात बरंच काही असतं!





- डॉ. सुधीर रा. देवरे

      नावात काय आहे, असं म्हटल्याबरोबर आपल्याला शेक्सपिअर हे नाव आठवतं. हो, फक्‍त नावच आठवतं. कारण शेक्‍सपिअर नावाची व्यक्‍ती कोणी पाहिली? निदान मी तरी नाही. व्यक्‍तीच काय पण शेक्‍सपिअरचं छायाचित्रही मी अद्याप पाहिलं नाही. आपण पाहतो ते शेक्‍सपिअरचं चित्र आहे. असो. म्हणजे नावात काय आहे, हे वाक्‍य म्हणायला कितीही आकर्षक वाटत असलं तरी प्रत्यक्षात नावात बरंच काही असतं.
      नातेवाईकातल्या एका मुलीचं लग्न होतं. लग्नपत्रिका मिळाली. वराचं नाव वाचलं. तेजेंद्र उर्फ बंडू आणि कंसात नाना. नावाखाली एम एस ई बी असं लिहिलेलं. या नावाची कोणती नवीन डिग्री निघाली म्हणून दोन तीन जणांजवळ चौकशीही केली. पण त्यांनी मलाच उलट विचारलं, ही काय डिग्री आहे? त्या लग्नाला गेलो. लग्न आटोपल्यावर एका सारे जहॉ से अच्छा दिसणार्‍या वर पक्षाकडील इसमाला ‍हळूच विचारलं, ‘आपल्या नानांचं काय शिक्षण झालंय?’ तो इसम म्हणाला, नाना असतील ना मॅट्रीक! धक्का बसलेला चेहरा सावरून मी म्हटलं, काय काम करतात नाना?
वायरमन भाऊसाहेब आहेत ना ईज बोर्डात.
आताशी कुठे लक्षात आलं की वर एमएसईबीत नोकरीला आहे. ती डिग्री नाही. किती कामसुचक नाव ठेऊन घेतलं नानांनी स्वत:ला पहा! लोकांना तेज देणारा इंद्र म्हणजेच तेजेंद्र. नानांचे नाव लहानपणीच ठेवलं गेलं असेल पण ते नाव वायरमन होऊन त्यांनी खरं करून दाखवलं.
      माणसाला नुसतं नावच महत्वाचं वाटतं असं नाही. नावानंतर लिहावी लागणारी पदवीही तेवढीच महत्वाची असते. आणि नावाआधी लागणारी उपाधी तर त्याहून महत्वाची.
      बाळू काकुळते नावाचा माझा मित्र डी.एच.एम.एस. झाला. मित्राला ही पदवी प्राप्त होताच मी त्याला अभिनंदनाचे पत्र पाठवले. तर त्याचे उत्तर आले ते असे:
      तुझे पत्र मिळाले. यापुढे पत्र लिहितांना पत्त्यावर बाळू काकुळते असं न लिहिता डॉ बाळासाहेब काकुळते असे लिहीत जावे. आणि मग पत्राच्या पुढील ओळीत या डॉक्‍टर साहेबांना मैत्रीच्या प्रेमाचं भरतं आलेलं. डॉ बाळासाहेब काकुळतेने इतकं काकुळतीने ते लिहिल्यामुळे पुढे पुढे मी बाळू काकुळते या व्यक्‍तीला विसरून गेलो. पण डॉ बाळासाहेब काकुळते या नावाला कधीच विसरलो नाही. या धड्याचा बोध घेऊन तेव्हापासून प्राध्यापकाच्या नावामागे प्रा., डॉक्‍टराच्या नावामागे डॉ., वकिलाच्या नावामागे अॅड लावायला मी कधीच विसरत नाही. आता इंजिनियरच्या नावामागेही इंजि. लावायची पध्दत सुरू झाली आहे.
      या डॉ बाळासाहेब काकुळते वरून माझा चेतन पाटोळे नावाचा मित्र आठवला. हा मित्र लोकल वृत्तपत्रात फुटकळ बातम्या पाठवतो. अर्थात त्याला त्याच्या तोंडावर पत्रकार म्हणावं लागतं. तर हा मित्र वार्ताहरच्या कामासोबतच बारीक सारीक सामाजिक काम करतो. म्हणजे तो सामाजिक कामं करतो असं त्याचं स्वत:चं मत आहे. म्हणूनच अधून मधून छोट्या छोट्या बातम्यात त्याचं नाव वाचायला मिळतं. (तो स्वत: वार्ताहर आहे हं) असंच एकदा त्याचं नाव एका बातमीत छापून आलं. पण ते नाव नेमकं चुकलं. चेतन पाटोळे ऐवजी त्याचं नाव चेतन वाटोळे असं छापलं गेलं. म्हणून त्याने संपादकाला चुकीच्या दुरूस्तीसाठी पत्र लिहिलं. मग एके दिवशी चुकीचा खुलासा पुन्हा चुकीचाच छापून आला. तो असा: अमूक अमूक तारखेला अमूक अमूक पानावर अमूक अमूक कॉलममध्ये अमूक अमूक शीर्षकाच्या बातमीत चेतन वाटोळे असं नाव छापलं गेलं. तरी ते नाव वाचकांनी चेतना पाटोळे असं वाचावं. हा खुलासा वाचून मित्र पुन्हा वैतागला. आणि त्याने पुन्हा संपादकांना पत्र लिहिलं:
      मी स्त्री नसून पुरूष आहे. तुम्ही आधी पाटोळेचे वाटोळे केलं आणि आता चेतनचं चेतना केलं. कृपया योग्य नाव छापावं ही विनंती.
      मग पुन्हा चुकीचा खुलासा झाला. हा खुलासा येईपर्यंत मूळ बातमी येऊन जायला पंधरा दिवस उलटले होते आणि बातमीचा कार्यक्रम व्हायला एक महिना उलटला होता. चेतन पाटोळे मात्र संपादकांना चुकीची दुरूस्ती करायला भाग पाडत होता. आणि संपादकही त्यांची चूक दुरूस्ती करण्यासाठी वाचकांनी असं असं वाचावं, असं छापून वाचकांना महिण्यापूर्वीचे पेपर वाचायला बळजबरी भाग पाडत होते. याबाबत मी मित्राला म्हटलं, नाव छापलं तर छापलं चुकीचं. अशा गोष्टीत कशाला वेळ घालवतोस? तर तो म्हणाला, सामाजिक कमात असा वेळेचा विचार करून कसं चालेल?
      मूळ नावापेक्षा उर्फ नावांचाही मी धसका घेतलाय. अगदी लहानपणी एका नातेवाईकाच्या घरी कायम येणंजाणं होतं. मध्यंतरी माझ्यापुरतं तरी येणंजाणं थांबलं होतं. अलिकडे त्यांच्याकडे जाण्याचा योग आला. मी मनाशी घरातील एकेका व्यक्‍तीचा धागा जुळवू लागलो. मी ज्याला लहानपणी सोम्या म्हणायचो, तो आता सोमनाथ झाला असेल ह्या हिशोबाने मी त्यांच्या घरात विचारलं, सोमनाथ कुठे गेला?
      मावशी म्हणाली, कोण नाना का, मळ्यात गेला असेल ना. माझी विकेट पडली. ह्या नाना प्रकरणाच्या अनुभवाने शहाणा होऊन नानाचा लहान भाऊ दत्तू याला आता काय म्हणत असतील, असा विचार करू लागलो. शेवटी बापू या नावावर माझा मुक्काम पक्का झाला. मग सगळा धीर एकवटून मावशीला विचारलं, बापूचं काय चाललं? मावशी उत्तरली, बापूचं कसलं रे भाऊ आता. दात गेलेत. आता डोळेही पार चाललेत. मागच्या मंगळवारी शकू आली होती. ती तर म्हणे, आता ते गुडघेही दुखावतात. हा बापू कोण आणि ही शकू कोण, ते मला काही समजलं नाही. पण बापू नावाचा टाकलेला दगड खाली पडला नाही, याचंच समाधान वाटलं.
      चहा झाला. मावशी म्हणाली, आण्णा आला पहाय. मी दाराकडे पाहिलं. तो दत्तू होता. म्हणजे मला अभिप्रेत असणारा बापू हा आण्णा होता. आण्णाशी बोलत बसलो. तेवढ्यात मावशी घरातून कडेवर लहान पोरगं घेऊन आली. ते पोरगं नानाचं असेल असं मला वाटलं. पण विकेट पडण्याच्या भितीने मी तसा उल्लेख करण्याचा आगावूपणा केला नाही. शेवटी गप्पांच्या ओघात माझा कयास बरोबर निघाला. हल्ली नव्वद टक्के मुलं बबल्याच असतात असं गृहीत धरून मी त्याच्या पोराला म्हटलं, बबल्या चल इकडं. तेवढ्यात घरातली कमान मंजूळली, पिंट्या जा रे काकांकडे. हा दगडही फेल गेला, म्हणून मी मनातल्या मनात आयचा पिंट्या म्हणून त्याला जवळ घेतलं.
      नाव, उर्फनाव, आद्यनाव, उपाधी इत्यांदीप्रमाणे विशेष नावांचीही सध्या फारच चलती आहे. आपण एखाद्या भर रस्त्यातल्या गॅलरीत उभे राहून, अहो साहेब अशी आरोळी मारली तर नव्यान्नव टक्के लोक तुम्हाला ओ देतीलच. इतकं साहेब या नावाचं प्रदुषण बळावलं आहे. मी तर हल्ली रावसाहेब, भाऊसाहेब ह्या पाचआकडी नावांपेक्षा कोणालाही साहेब हे सुटसुटीत नावच वापरतो. म्हणायला सोपं आणि ऐकणाराही खुष.
      मनुष्य जन्माला येताना आपल्या स्वयंभू अवयवांप्रमाणे आपले नाव घेऊन येत नाही. जन्मानंतर त्याला ते दुसर्‍यांकडून ठेवले जाते. तरीही आपले नाव जपण्यासाठी मनुष्य एवढा जागरूक का असतो? उत्तर तसं सोपं आहे:
      आपले सर्व अवयव मिळून बनलेल्या व्यक्‍तीमत्वाच्या ठेवलेल्या नावाला लोक कोणते नाव ठेवतात, यावर आपलं विशेष व्यक्‍तीमत्व अवलंबून असतं. तरीही जगाची लोकसंख्या इतकी प्रचंड वाढू लागलीँ की जन्मलेल्या मुलांना नवीन नाव देणं आपल्या कल्पनेच्या बाहेर जायला लागलं. मग आता तीच तीच नावं ठेऊन एकाच गल्लीत एकाच नावाचे दहा- पाच पोरं सापडायला लागलीत. तरी हा नाममहिमा काही कमी होत नाही पहा. काही लोक तर आपले नाव वडिलांचे नाव आणि आडनावासहीत एकाच गावात दोन दोन तीन तीन आढळू लागले. त्यांचे व्यक्‍तीमत्व किती ढासळत असेल.
      (‘सत्याग्रही विचारधारा’ 2017 अंकात प्रकाशित झालेल्या लेखाचा संपादित अंश. या ब्लॉगचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

बुधवार, १४ जून, २०१७

याचक: एक आस्वाद



याचक: एक आस्वाद
- डॉ. सुधीर रा. देवरे

      कुसुमाग्रजांच्या याचक या कवितेचा मी घेतलेला आस्वाद इथे थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करतो :

याचक
असा याचक
ज्याच्या हातातील कटोरा
कशानेच भरत नव्हता.
नृपाळांनी टाकली सिंहासने
कुबेरांनी टाकली
सुवर्णाची भांडारे
तरीही तो रिताच.

पंडितांनी शब्द टाकले
पुरोहितांनी धर्म टाकले
साधुंनी सत्व टाकले
वीरांनी कर्म टाकले
तरीही तो रिताच.
मग याचक आला
एका भिकारणीच्या दाराशी
तिथे ती उघड्या स्तनाने
पाजीत होती
आपल्या पोराला...
याचक म्हणाला,
माई भीक वाढ,
भिकारणीने पोर बाजूला सारले
आणि स्तनावर पान्हाळलेले
दुधाचे दोन थेंब
त्याच्या कटोर्‍यात टाकले,
कटोरा भरून गेला
शिगोशिग
अथांग समुद्रासारखा.
आता तो याचक
दाता होऊन
त्या दुधाचे थेंब वाटतो आहे
पृथ्वीवर सर्वांना.
म्हणूनच
इतके सारे होऊन
होत असून
माणसाची जात
अद्यापही जीवंत आहे.
                  - कुसुमाग्रज (मुक्‍तायन)
      कविता ऐकल्यावर- वाचल्यावर आपल्याला प्रथम असं लक्षात येतं, एक याचक हातात कटोरा घेऊन सर्वदूर भटकत आहे. त्याच्या रिकाम्या कटोर्‍यात राजांनी सिंहासने, कुबेरांनी सुवर्णाची भांडारे, पंडितांनी शब्द, पुरोहितांनी धर्म, साधुंनी सत्व आणि वीरांनी कर्म टाकले. तरी तो कशानेच भरत नाही. याचक एका फाटक्या भिकारणीच्या दाराशी येतो. ती भिकारीन स्वत:चे दुधाचे दोन थेंब त्या कटोर्‍यात टाकते आणि कटोरा शिगोशिग भरून जातो. अशी या कवितेची कवितागत कथा आहे. चमत्कार म्हणता येणार नाही तरी काहीशी ‍अतिभौतिकी. या चमत्कारातून आपण सावरत नाही तोच कवितेचा पुढील भाग आणखी एकेक धक्के देत जातो. कटोरा भरल्यावर हा याचक तृप्त होऊन स्वस्थ बसत नाही तर याचकाचा तो दाता होतो. भरलेल्या कटोर्‍यातून दुधाचे थेंब पृथ्वीवर सर्वांना वाटत फिरतो. पुढे कविता सांगते, ‘म्हणूनच/इतके सारे होऊन/होत असून/माणसाची जात अद्यापही जीवंत आहे.’
      पूर्वार्धात हा याचक वेगळा आहे हे लक्षात येतं. पण शेवट वाचल्यावर माणसाची जात जीवंत ठेवणारा आणि याचकाचा दाता झालेला हा माणूस साधासुधा याचक कसा असेल? याचक नुसता आगळावेगळाच नसून माणूस नावाची जात जीवंत ठेवणारा दाता - प्रचंड मोठी विभूती होत महामानव होत जातो. या याचकाची भूमिका काय, हे शोधून काढण्यासाठी पुन्हा एकदा कविता पहिल्यापासून नीट आस्वादावी लागते.
      कवितेच्या सुरूवातीलाच, याचकाच्या हातातील कटोरा कशानेच भरत नसल्याचा उल्लेख आहे. पहिल्या कडव्यात कटोरा नृपाळांच्या सिंहासनांनी भरत नाही. कुबेराच्या सुवर्ण भांडारांनी भरत नाही. म्हणून हा लोकव्यवहारात मोजल्या जाणार्‍या वस्तूंची वा चलनाची याचना करणारा याचक नाही हे स्पष्ट होते. 
      याचकाच्या हातातील हा कटोरा कवितेच्या दुसर्‍या कडव्यात पंडितांच्या शब्दांनी भरत नाही. पुरोहितांच्या धर्मांनी भरत नाही. साधूंच्या सत्वांनी भरत नाही आणि वीरांच्या कर्मांनीही भरत नाही. उपरोक्‍त संज्ञा तर चाकोरीबध्द व्यवहारी नाहीत. मग या कटोर्‍याला भूक कसली लागली आहे? हे शोधून काढण्यासाठी आधी हा कटोरा शब्द, धर्म, सत्व, कर्म या संकल्पनांनी का भरत नाही हे ठरवून घेतले पाहिजे.
      कटोरा शब्दांनी का भरू नये? हा पहिला प्रश्न. कवी म्हणतात, पंडितांनी शब्द टाकले. म्हणजे हे नुसते शब्द नाहीत तर ते पंडितांचे शब्द आहेत. म्हणून हा शब्द तत्वज्ञान आहे, शब्दप्रामाण्य आहे. कोरड्या तत्वज्ञानाने पोटाची भूक तर जात नाहीच पण आत्मिक- भावनिक भूकही भागत नाही. म्हणून अशा शब्दांनी कटोरा भरत नसावा.
      याच कडव्यातील दुसरी ओळ, पुरोहितांनी धर्म टाकले तरी कटोरा भरत नाही. धर्म म्हणजे नेमका कोणता धर्म? नुसता धर्म नाही तर हा पुरोहितांचा धर्म आहे. म्हणजेच हा विशिष्ट चौकटीतला धर्ममार्तंडांचा पोटभरू धर्म आहे. एखाद्या कर्मकांडामागची कारणमीमांसा न तपासता धर्मात आहे म्हणून कराव्या लागणार्‍या आचरणात आत्मिक तादात्म्य कसे राहील? म्हणून या धर्मानेही कटोरा भरत नसावा.
      पुरोहितांच्या धर्माप्रमाणेच साधूंच्या सत्वानेही कटोरा कसा भरेल? साधुंच्या गूढ सत्वाविषयी सामान्य माणूस भितीयुक्‍त आदर दाखवेल तरी भावनिक एकतानता कशी निर्माण होईल? आणि शेवटी वीरांच्या कर्मानेही कटोरा भरत नाही. इथे मात्र याचकाची मनोवृत्ती नीट तपासून घ्यावी लागते. वीरांच्या कर्माने कटोरा का भरू नये? हा प्रश्न कोड्यात टाकतो. पण पुढचा भाग वाचून कविता समजून घेतली की हा प्रश्नही लगेच सुटतो. हे कर्म वीराचे आहे. वीराचे कर्म कितीही शूर वा उदात्त असो पण ते क्रौर्याचे- हिंसेचे कर्म आहे. कारण वीराचे कर्म हे शत्रूला मारण्याशिवाय आणखी कोणते कर्म असणार? आणि हा याचक तर देव, धर्म, सिमा, शत्रू, लिंग, रंग, जात यापलिकडे पाहणारा विशाल दृष्टीचा मानव आहे- हे ही समग्र कविता आस्वादताना स्पष्ट होत जातं. म्हणून वीराच्या संकुचित शौर्यानेही हा कटोरा भरत नाही.
      लक्षात येतं, ज्या ज्या गोष्टी वा वस्त़ू त्याच्या कटोर्‍यात टाकल्या गेल्या त्या स्वयंभू नाहीत. त्या तथाकथित मौलिक भौतिक वस्तू वा अमूर्त संकल्पना आहेत. ज्यांनी ज्यांनी वैभवी वस्तू कटोर्‍यात टाकल्या त्यांनी त्या वस्तू जन्माला आल्यावर प्राप्त केल्या आहेत. जन्माला येतांना त्यांनी त्या वस्तू आपल्या शरीरासोबत आणलेल्या नाहीत. किंवा ज्या वस्तू त्यांच्या शरीराचा भाग नव्हत्या त्या मौलिक असल्या तरी निर्जिव वस्तू कटोर्‍यात टाकल्या गेल्या. ज्या गोष्टी आपण चलनी व्यवहारात मोजतो त्या वस्तूंची याचना करणारा हा क्षुद्र याचक नाही. या याचकाचा कटोरा वेगळ्याच गोष्टींसाठी भुकेला आहे हे स्पष्ट होतं. व्यवहारी गोष्टी ज्या आपण मौल्यवान समजतो त्या या याचकाला नको आहेत.
      मग याचक भिकारणीच्या दाराशी आल्यावर भिकारीण दूध पिणार्‍या आपल्या पोराला बाजूला सारून स्वत:च्या शरीरातले दुधाचे दोन थेंब कटोर्‍यात टाकते आणि कटोरा शिगोशिग भरून जातो. दुधाच्या दोन थेंबांनी हा कटोरा शिगोशिग का भरून जावा? हा मूलभूत प्रश्न. एकतर हे दूध भिकारणीचे स्वत:चे आहे. ते दूध तिच्या शरीरातलाच एक स्वयंभू भाग आहे. सिंहासन, सुवर्ण, शब्द, धर्म, सत्व, कर्म यांच्यासारखे ते उपरे नाही, असा एक अन्वयार्थ सुचीत होतो.
      आता दुधाचा लक्षणार्थ घेऊ या. पहिला अर्थ म्हणजे दुधाला आपण अमृत म्हणतो. याचकाला अमृत प्राप्त होते. दुसरा लक्षणार्थ म्हणजे हे दूध एका आईचे आहे. दूध हे संगोपणाचे प्रतिक. म्हणजे हा याचक माया, ममता, वात्सल्य प्रेमासाठी भुकेला आहे, तहानलेला आहे हे लक्षात येतं.
      त्याची ही प्रेमाची भूक तृप्त झाल्यावर तो एकाचजागी स्वस्थ बसत नाही. याचकाचा आता तो दाता होतो आणि त्याला मिळालेले प्रेम, वात्सल्य, माया, ममता संपूर्ण पृथ्वीवर वाटत फिरतो. इथे कवीने पृथ्वी हा शब्द फार सुचकतेने योजलेला दिसतो. हा याचक कोणत्याही एका धर्मात, एखाद्या देशात वा एखाद्या जातीत बंदिस्त नाही. कोणत्याही एका देशाला, धर्माला वा जातीला तो प्रेम वाटत नाही तर पृथ्वीच्या पाठीवर जिथे जिथे माणूस नावाची जात आहे, तिथे तिथे तो प्रेम वाटत फिरतोय. हा याचक महामानव वा मानवतावादी धर्माचा प्रेषित ठरतो. म्हणून तर कवितेचा शेवट होतो,
’इतके सारे होऊन/होत असून/माणसाची जात/अद्यापही जीवंत आहे!’
      इतके सारे होऊन म्हणजे नेमके काय? हे स्पष्ट करण्याची आवश्यकता नसावी. आज जगात काय काय होत आहे हे तर नव्याने सां‍गण्याची गरज नाही. ते सर्वांना ज्ञात आहे. मानवातले दानवपण नियमितपणे प्रत्येकाच्या प्रत्ययाला येत असले तरी मानवतावाद, प्रेम, वात्सल्य, माया, ममता क्वचित का होईना पण ते आहे वा राहील अशी आशा कवी व्यक्‍त करतात. जगातील प्रेम आटलेले नाही. ते दुर्मिळ असेल पण आहे. म्हणून हा साधासुधा याचक नसून मानवाचे मानवपण टिकावे यासाठी तो हाती कटोरा घेऊन हिंडणारा रक्षक आहे.
      शेवटी कवीला हेच सांगायचं आहे की, मनुष्याच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांइतकीच किंबहुना त्याहूनही अधिक प्रेम ही तेवढीच महत्वाची आस आहे, प्रेम ही मानवाची सर्वात मोठी व आदिम तहान-भूक आहे.
      (‘कवितारती’ जाफेमाए-2017 च्या अंकात प्रकाशित झालेले मर्मग्रहण. या ब्लॉगचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/