शुक्रवार, १ जुलै, २०२२

अहिराणी साहित्य परंपरा

डॉ. सुधीर रा. देवरे

 

           प्रास्ताविक : अनेक दिवसांपासून काही अभ्यासक अहिराणी लेखकांची सूचीची मागणी करत होते. तशी एक लघुसूची ढोलच्या पाचव्या अंकात (जानेवारी 2004) प्रकाशितही केली होती. पण त्यानंतर बरेच लेखक अहिराणीत लिहिते झाले. सूचीतले अनेक घटक व अहिराणी साहित्याची परंपरा माझ्या अन्य लिखाणात आलेली असल्यानं पुन्हा नव्यानं साहित्य सूची कशाला, असंही अनेकांना सांगून पाहिलं. पूर्वपरंपरेसह आजचे साहित्यिक यांची बेरीज करुन अहिराणी साहित्य परंपरा हे टिपण यातून तयार झालं. म्हणून ही केवळ सूची म्हणता येणार नाही :

          चक्रधर स्वामी : अहिराणीचा पहिला उल्लेख लिळाचरित्रात येतो. चक्रधर स्वामींसह तत्कालीन इतर महानुभावांनी ढासलं, रांधलं, पुंज आदी अहिराणी शब्द बोलण्यात वापरल्याचं दिसून येतं.

          ज्ञानेश्वर : संत ज्ञानेश्वर यांचे बागलाण नवरीचे रुपकात्मक अभंग प्रसिद्ध आहेत. याशिवाय श्रीज्ञानदेव यांचीच अहिराणी गवळण व काही अहिराणी पदं सापडतात. ज्या ज्ञानदेवांना बोली अरूपाचं रूप दाखवायचं होतं, त्यांनी बागलाणी (अहिराणी) भाषेत काव्य करून आपली प्रतिज्ञा पूर्ण तर केलीच पण बागलाणी बोलीही तेवढी प्रतिष्ठेची होती हेही त्यामुळं आपोआपच सिद्ध होतं. 

          जयराम पिंड्ये : राधामाधवविलासचंपू ऊर्फ शहाजी महाराज चरित्र हा ग्रंथ जयराम पिंड्ये या कवीचा आहे. हा ग्रंथ शके १५७५ ते १५८० च्या दरम्यानचा असावा. या ग्रंथात बागलाणी (अहिराणी) काव्याचाही समावेश आहे. ग्रंथात बागलाणी असा उल्लेख असून तिची प्रमुख भाषांमध्ये गणना केलेली दिसते. सदर ग्रंथ वि. का. राजवाडे यांनी संपादित केला असून त्याला अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावनाही लिहिली आहे. ‘‘...भाषा केवळ संस्कृत किंवा मराठी नसून फारशी, उर्दू, ब्रज, गुजराथी, बागलाणी, पंजाबी व कर्नाटकी अशा हिंदुस्थानातील बहुतेक प्रमुख भाषा आहेत... बागलाण हा त्या काळी महत्वाच्या देशात मोडत असे व तेथे बहुतेक लोक स्वतंत्र हिंदू राजे राज्य करीत असत, असा बागलाणीला जयरामने मान दिला.’’ (राधामाधवविलासचंपू, पृ. १३, १४) हे या ग्रंथातलं राजवाडे यांचं महत्वाचं अवरतण आहे.

          मोरिरचा भाट : शहाजी राजांच्या दरबारात ज्याने बागलाणीत स्तुती केली आहे, त्याचं नाव मोरिरना भाट’ (मोरिरचा भाट) असं आहे. त्यांचं काही काव्य उपलब्‍ध आहे. 

         जैन कवी निंबा : शके १६४८ मध्ये जैन कवी निंबा याने एक पोथी लिहिली असून या पोथीत अहिराणीया नावाचंच भक्तीपर व उपदेशपर एक अहिराणी गीत आहे. हे अहिराणी गीत पाच कडव्यांचं आहे. हा जैन कवी विदर्भातील असून त्याने अहिराणी शब्दांचा वापर केला आहे. तठे, जीनपास, तान्हा, मन्हा, त्याले, मन्ह, मननी असे शब्द त्यांच्या गीतात येतात... परंतु हे काव्य आज उपलब्ध होत नाही.

         कमलनयन : बागलाणीतून काव्य करणारे बागलाण तालुक्यात अजून एक कवी होऊन गेले. मुल्हेर जवळच्या अंतापूर या खेड्यातले ते रहिवासी होते. कमलनयनहे त्यांचं नाव होतं.  नयनमहाराजम्हणूनही ते ओळखले जात. कवी कमलनयनयांचा काळ १६८० ते १७५० हा होता. मुल्हेरचे श्री उद्धव महाराज यांचे ते पट्टशिष्य होते. त्यांनी लिहिलेलं काव्य कालांतराने नामशेष झालं. परंतु त्यांचा अभंगावलीनावाचा काव्यग्रंथ आजही मुल्हेर येथील श्री उद्धवस्वामी यांच्या मंदिरांच्या विश्वस्तांजवळ उपलब्ध आहे. अभंगावलीत १५०० ओव्या आहेत. त्यात ५ ते ६ बागलाणी - अहिराणी भाषेत पदं आहेत.

          कमलनयनकवीने अभंगावली, स्तोत्रे, आरत्या दोहे अशा रचना केल्या आहेत. ते संत कवी होते. त्यांचे वंशज बुवाआडनावाचे होते.

          ग्रिअर्सन : सर जॉर्ज ग्रिअर्सन (१८५१- १९४६) यांनी भारतीय भाषांचा अभ्यास केलेला आहे. क्षेत्रविस्तार भाषांची संख्या आणि बहुविधता या दृष्टीनं त्यांनी केलेलं कार्य सर्वांत मोठं आणि महत्त्वाचं होतं. ही सर्व भाषिक माहिती ‘Lingustic Survery of India’ या नावानं खंडशः प्रसिद्ध आहे. त्यातील नवव्या खंडातल्या तिसर्‍या भागात ग्रिअर्सनने अहिराणीचा विचार केला आहे.

 अहिराणीतील आधुनिक साहित्य :

           अहिराणी लोकसाहित्यात खूप मोठा खजिना सापडतो तर प्राचीन- अर्वाचीन साहित्यात चक्रधर स्वामी, संत ज्ञानदेव, मोरिरचा भाट, कवी कमलनयन असे मोजकेच पण भारदस्त द्रष्टे आढळतात. पुर्वस्त्रोतांशी तुलना केली तर अहिराणी आधुनिक साहित्यात अजून खूप मोठी भर पडली नाही. पण काही लिखाण भविष्यासाठीचं आश्वासन नक्कीच आहे.

          कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कविता (बहिणाबाईच्या कविता) अहिराणी वा खानदेशी असल्याचं उर्वरीत महाराष्ट्रात समजलं जातं. शालेय अभ्यासक्रमांत त्यांच्या कवितेचा उल्लेख अभ्यासक्रम मंडळांकडूनही अहिराणी- खानदेशी असल्याचा केला जातो. (बहिणाबाई चौधरी या अशिक्षित असूनही विस्मयित करणारे तत्वज्ञान त्यांच्या काव्यातून सहज अवतरतं. त्यांच्या जवळ जवळ सर्वच कविता, लोकगीतं आणि ओव्यांचा बाज सांभाळतात. तरीही ही कविता अहिराणी कितपत म्हणता येईल, हा प्रश्नही‍ नेहमीच उपस्थित होत आला.) बहिणाबाईची कविता अहिराणी कविता या संज्ञेनं संपूर्ण महाराष्ट्रभर ओळखली जात असली तरी या कवितातल्या शब्दांमध्ये- उच्चारांमध्ये अहिराणी भाषा येत नाही. ही लकब खुद्द कवयित्रिची की त्या कवितेवर संस्कार करणार्‍या व्यक्तीची, हे लक्षात येत नाही.

          जळगाव जिल्ह्यातल्या काही भागात लेवा गणबोली नावाची बोली बोलली जाते. कवयित्री बहिणाबाईंची कविता ही लेवा गणबोली भाषेतली आहे, असं अलीकडे काही अभ्यासक त्यांच्या शोधनिबंधातून मांडू लागले आहेत. या अभ्यासकांचा आदर करुन बहिणाबाईच्या कवितांचा समावेश अहिराणी भाषेत केलेला नाही.

          विजया श्रीधर चिटणीस :  खानदेशी बोली : एक स्थानिक अभ्यास (धुळे जिल्ह्यातल्या मोहाडी या गावातल्या भाषेचा अभ्यास पुणे विद्यापीठात पीएचडी साठी सादर, १९८४, माध्यम इंग्रजी. प्रेस्टीज प्रकाशन, पुणे.)   

          दा. गो. बोरसे : अहिराणी लोकवाङ्मय संकलनाचं काम श्री. दा. गो. बोरसे यांनी मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न केला. जिभाऊ, अहिराणीची कुळकथा, खान्देश वाग्वैभव, लोकनाट्य, गिरजा, तापीतरंग, अजिंठ्याचे लेणे, (माध्यम मराठी). परंतु जे काम सर्व अंगांनी मोठ्या प्रमाणात व्हायला हवं होतं तसं ते झालं नाही. हे काम एकट्या दुकट्या व्यक्तीचं नक्कीच नव्हतं. श्री. बोरसे यांनी जिभाऊनावाची कादंबरी लिहिली. त्या कादंबरीची पार्श्वभूमी- भौगोलिक परिसर खानदेश असला तरी, आणि काही पात्रे अहिराणी भाषा बोलताना दिसत असले तरी तिचं निवेदन प्रमाण मराठीत झालेलं आहे. हीच लेखकाची मर्यादा आहे. एखाद्या लेखकानं प्रमाण मराठी भाषेत कादंबरी लिहावी आणि पात्रांच्या तोंडी कोकणी मिश्रित मराठी वा सातारी, कोल्हापुरी बोली वापरावी तसाच हा प्रयोग होता. श्री. बोरसे यांच्याच अहिराणीची कुळकथाया पुस्तकातूनही विशेष काही हाती लागत नाही. ‘‘श्रीराम अत्तरदे यांच्या सावलीच्या उन्हातव श्री. नारखेडे यांच्या अंजनीखेरीज तरी खानदेशी प्रादेशिक ललित कृती उपलब्ध नाही.’’ असा उल्लेख जिभाऊच्या प्रस्तावनेत दा. गो. बोरसे करतात. पण या उल्लेखातील दोन्हीही ललितकृती अहिराणी माध्यमात नाहीत. या कृती मराठी माध्यमातील आहेत.

          राजा महाजन : अहिराणीवर आणि अहिराणीत काही लिखाण. सूर्यानी लेक आणि गुन्हेगार (अहिराणी कथासंग्रह)

          कृष्णा पाटील : अहिराणी लोकसाहित्य दर्शन खंड - एक (सण आणि उत्सव) आणि खंड दोन (नाती- गोती) या ग्रंथांत लेख प्रकाशित. (माध्यम - मराठी). उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात दोन्ही संदर्भ ग्रंथ. अहिराणी लोकवाङ्मयाचे संकलक. श्री. पाटील यांनाही संकलनाव्यतिरिक्त अहिराणी भाषेत ललित लिखाण करता आलं नाही. इतिहास संशोधन वगैरे क्षेत्रातही भरीव योगदान देता आलं नाही.

          देशीवादाचे लेखक श्री. भालचंद्र नेमाडे यांनी समीक्षासारख्या लिखाणातही रावण्या सारखा अहिराणी शब्द वापरण्याचं धाडस केलं. त्यांच्या मेलडी आणि देखणी नावांच्या कवितासंग्रहातही काही कवितांमध्ये अहिराणी शब्द- अहिराणी वाक्‍प्रचार जाणीवपूर्वक वापरलेले दिसतात. पण क्षमता असूनही त्यांची एकही संपूर्ण कविता अहिराणीत नाही. आणि संपूर्ण कादंबरी तर फार लांबची गोष्ट झाली.

          सदाशिव माळी : अहिरानी दर्शन (जीवनविषयक स्फुट ओव्या), संकलन, (शिवमूर्ती प्रकाशन, धुळे), (माध्यम : मराठी).

          डॉ. रमेश सूर्यवंशी : अहिराणी : भाषा वैज्ञानिक अभ्यास (अक्षय प्रकाशन, पुणे) हे महत्वाचं पुस्तक असून अहिराणी शब्दकोशातील (Dictionary), (अक्षय प्रकाशन, पुणे)  शब्दसंकलनाचं महत्वपूर्ण काम आहे. दिवसेंदिवस अहिराणीतील शब्द हरवण्याची जी नामुष्की ओढवत होती ती या शब्दकोशामुळं दूर होईल. यापुढं अभ्यासकांना तरी आता सहज उपलब्ध होऊ शकेल आणि अजून कोणाला यापासून प्रेरणा मिळाली तर राहून गेलेल्या शब्दांचाही दुसरा कोश उदयास येऊ शकेल असं वाटतं. अहिराणी म्हणी- वाक्प्रचार (संकलन, माध्यम - मराठी).       

          प्रस्तुत लेखक (डॉ. सुधीर देवरे) सुमारे पस्तीस वर्षांपासून अहिराणी भाषा संवर्धनासाठी चळवळ उभी करुन आपल्या लिखाणातून अहिराणी भाषा उपयोजित करीत आहे. अहिराणीच्या संवर्धन व जागृतीसाठी सटाण्यात (१९८५ पासून जवळजवळ अडीच वर्ष) रसिकनावाचं पाक्षिक सुरू ठेवलं होतं. १९९८ पासून बडोदा येथील भाषा संशोधन  केंद्राच्या भाषा प्रकाशन पुढाकारानं ढोलनावाचं पहिलं संपूर्ण अहिराणी माध्यम व अहिराणी लोकसंस्कृतीला वाहिलेलं संशोधनात्मक (जाहिरातींशिवायचं) नियतकालिक प्रस्तुत अभ्यासक संपादित करतो. आतापर्यंत ढोलचे मोजकेच अंक प्रकाशित झाले असूनही त्यांतून अहिराणी भाषा दस्तावेजीकरणाचं भरीव काम झालं आहे. प्रस्तुत लेखकाचा संपूर्ण अहिराणी माध्यम असलेला आदिम तालनं संगीत नावाचा अहिराणीतला पहिला कवितासंग्रहही (१ जुलै २००० साली, भाषा प्रकाशन, बडोदा) प्रकाशित झाला आहे. अहिराणी लोकपरंपरा’, (संदर्भ ग्रंथ -संकीर्ण, डिसेंबर २०११, ग्रंथाली प्रका‍शन, मुंबई.) अहिराणी लोकसंस्कृती (संदर्भ ग्रंथ, एप्रिल २०१४, पद्मगंधा प्रकाशन, पुणे.)  अहिराणी गोत’, (अहिराणी दर्शन, मार्च २०१४, पद्मगंधा प्रकाशन, पुणे.) अहिराणी वट्टा’, (अहिराणी कथा,मार्च २०१४, पद्मगंधा प्रकाशन, पुणे.) अहिराणीच्या निमित्ताने: भाषा (भाषा संशोधन संदर्भ ग्रंथ, एप्रिल २०१४, पद्मगंधा प्रकाशन, पुणे. महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरुंदकर भाषा पुरस्कार.) हे ग्रंथ प्रकाशित असून सा‍तत्यानं भाषाभ्यास- संशोधन- लिखाण सुरु आहे. (वरील सर्व ग्रंथ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एम. ए. अभ्यासक्रमासाठी संदर्भ ग्रंथ आहेत.) भाषा : व्याप्ती आणि गंड (भाषा संशोधन) आणि अहिराणी : भाषा, परंपरा आणि संस्कृती (भाषा संशोधन) हे ग्रंथ प्रकाशनाची वाट पहात आहेत. या व्यतिरिक्त प्रस्तुत लेखक ललित, वैचारिक आणि मराठी कवितेतही मुद्दाम योग्य त्या ठिकाणी अहिराणीतील महत्त्वपूर्ण शब्द उपयोजित करण्याचा अट्टहास धरतो. मी गोष्टीत मावत नाही’, (कादंबरी, २५ फेब्रुवारी २०१९, पद्मगंधा प्रकाशन, पुणे. अहिराणी भाषा उपयोजन), सायको, (कादंबरी, फेब्रुवारी २०२१, तेजश्री प्रकाशन, इचलकरंजी. (अहिराणी भाषा उपयोजन), ‘सोन्याची शाळा (कादंबरी, नोव्हेंबर 2021, लोकवाड्‍.मय गृह, मुंबई. या कादंबरीतले संवाद ‍अहिराणीत आणि निवेदन मराठीत.) खानदेशचा सांस्कृतिक इतिहास (खंड-३) : संपादक : डॉ. मु. ब. शहा, का. स. वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्था, धुळे, जानेवारी- २००४, अहिराणीवरील दीर्घ लेख : अहिराणी भाषा : उत्पत्ती आणि इतिहास’, भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण, (महाराष्ट्र, १७ ऑगष्ट २०१३, पद्मगंधा प्रकाशन, पुणे.) यात प्रत्यक्ष सहभाग आणि पृष्ठ क्रमांक ६८ ते ८१ वरील अहिराणी भाषा वरील दीर्घ लेख.

          डॉ. बापूराव देसाई : अहिराणीतील काही लोकवाङ्मयाचं संकलन केलं आहे. पण डॉ. देसाई यांची आक्खी हयातीही संपूर्ण अहिराणी माध्यम असलेली कादंबरी प्रस्तुत अभ्यासकाला महत्त्वाची वाटते. अहिराणी असणं हेच व्यवहारात उपयोजित होऊ शकतं, असा संदेश या कादंबरीतून अहिराणी भाषिकांना मिळू शकतो आणि अहिराणीबद्दल विश्वासही दृढ करु शकतो.खानदेशी साहित्य सुरभि (संकलन), बनी कारे बापू (संकलन), खान्देशी संस्कृती’, (पानफूल प्रकाशन, जळगाव) आदी पुस्तकं प्रकाशित आहेत.

          संजीव गिरासे : लगीन’, (राजश्री प्रकाशन, पुणे), आगारी’, कथा, (सुधा प्रकाशन, जळगाव) आणि इतर लिखाण.

          डॉ. उषा सावंत : अहिराणी साहित्याच्या सोनियाच्या खाणी (खानदेशी स्त्री गीते’, प्रतिमा प्रकाशन, पुणे) आणि इतर लिखाण.

          देवीदास हटकर : अहिरराष्ट कान्हदेश पुस्तक आणि तंगा मंगा ना दंगा हे नाटक अहिराणी भाषेत प्रकाशित.

          डॉ. शशिकांत पाटील : अहिराणी लोक साहित्याचा अभ्यास’, (चिन्मय प्रकाशन, औरंगाबाद)

          डॉ. म . सु . पगारे : अहिराणी लोकवाङ्‌मयातील लोकभाषा’, (प्रशांत पब्लिकेशन्स, जळगाव) आणि इतर संपादीत ग्रंथ.

          प्रा. शं. क. कापडणीस : अहिराणीचा संसार (लोकम्हनी), संघर्ष प्रकाशन, सटाणा.

          डॉ. सयाजी पगार : खानदेशातील ग्राम दैवते आणि लोकगीते’, (का. स. वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्था, धुळे)

          रामदास वाघ : याले जीवन आसं नाव’, म्हतारपननी काठी, तुना काय बापनं जास, ‘आख्यान’, वानगी’, माय नावना देव’, (प्राजक्ता प्रकाशन, नाशिक) आणि इतर पुस्तकं. गावशिव नावाचं एक मासिक संपादीत करून त्यातून अहिराणीतलं हलकं फुलकं साहित्य प्रकाशित केलं.

          सुभाष अहिरे :  गावनं गावपन’, (ललित, भावना प्रकाशन, धुळे), वयंबा (कवितासंग्रह), शांताई  आणि इतर पुस्तकं.

          डॉ. सुधाकर चौधरी : समाज भाषाविज्ञान : अहिराणी बोलीचा अभ्यास’, (अथर्व प्रकाशन, जळगाव) हे पुस्तक.

          डॉ. दिलीप धोंडगे : सांगनं नही पन सांगनं वनं दैनिक गावकरीतलं सदर.

          डॉ . बाळासाहेब गुंजाळ : अहिराणी म्हणी : अनुभवाच्या खाणी’, (शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर)

          प्रा . भगवान पाटील : चांगभलं’, अहिरानी ललित लेखसंग्रह, (कस्तुरी प्रकाशन, अमळनेर), ‘संत मीरानी भक्ती’, (अहिरानीत अनुवाद, पानफूल प्रकाशन, जळगाव) ही पुस्तकं.

          प्रा. लतिका चौधरी : गलीनी भाऊबंदकी (कादंबरी), खान्देशी बावनकशी’, (दिशोत्तमा प्रकाशन, नाशिक), नियं आभाय (कवितासंग्रह, कस्तुरी प्रकाशन, अमळनेर) ही पुस्तकं.

          प्रा. शकुंतला पाटील रोटवदकर : मन्हगोत (ओवीगीते, उ.म.वि. संदर्भ ग्रंथ), अभिरानी (कवितासंग्रह), लग्नसोहळा (अहिराणी गीतांचं संकलन) ही पुस्तकं.

          श्रीमती विमल वाणी : रानमेवा’, खान्देशधन’, खान्देशनी संस्कृती (हे तीन कथासंग्रह) आणि अन्य काही संकलनं प्रकाशित.

          प्रकाश पाटील (पिंगळवाडेकर) : सटीना टाक या प्रदर्शित अहिराणी चित्रपटासह अजून काही चित्रपटांत अहिराणी गीतलेखन व संवादलेखन. (धुयाना दांडगो’, सात जनमनी साथ अप्रकाशित पुस्तकं.)

          आबा महाजन : मन्हा मामाना गावले जाऊ (बाल कवितासंग्रह, अथर्व प्रकाशन, जळगाव).

          एन. एच. महाजन : गावगाडा (कथासंग्रह, अनुराग प्रकाशन, शिरपूर) आणि इतर.

          डॉ. फुला बागूल : खारं आलनं’, (प्रशांत पब्लिकेशन्स, जळगाव) अहिराणी पुस्तकांवरील परीक्षणं, आणि इतर पुस्तकं.

          सुरेश राजाराम पवार : भगवतगीतेचा अहिराणीत अनुवाद.

          नानाभाऊ माळी : लाह्या (कवितासंग्रह, भावना प्रकाशन, धुळे).

          महेशलीला पंडित : आखो नियतकालिकाचे संपादन.

          रत्ना पाटील : गोट-पाटल्या (अहिराणी कथासंग्रह)

          एस. के. पाटील : अहिराणी वैभव नाट्यप्रयोग सादरीकरण.

          रमेश बोरसे :  आप्पान्या गप्पा’, (अभ्यासिका प्रकाशन, कन्नड), पुरनपोयी (कवितासंग्रह, राऊ प्रकाशन, धुळे) ही पुस्तकं.

                    उल्ले‍खित लेखकांव्यतिरिक्त अहिराणीसाठी झटलेल्या बर्‍याच व्यक्‍ती आणि संस्था आहेत. यात डॉ. रमेश वरखेडे, डॉ. मु. ब. शहा, डॉ. किसन पाटील, डॉ. आशुतोष पाटील, जगदीश देवपूरकर, विकास पाटील आदी व्यक्ती, आणि भाषा केंद्र- बडोदा (डॉ. गणेश देवींसोबत आम्ही मित्रांनी स्थापन केलेली एनजीओ), का. स. वाणी संस्था- धुळे, बहिणाबाई (उत्तर महाराष्ट्र) विद्यापीठातील मराठी विभाग- जळगाव, उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ- कल्याण, अहिरानी साहित्य परिषद- धुळे आदी संस्थांची नावं घेता येतील. या व्यतिरिक्‍तही अनेक लोक नव्यानं आज अहिराणीत लिहू लागले. अनेक पुस्तकं अहिराणीत निघू लागलीत. यातून अहिराणीच्या भवितव्याचं चांगलं आश्वासन मिळतं.

          ताजा कलम : हे टिपण अपूर्ण असल्याची जाणीव आहे. अहिराणी लेखकांनी आपल्या व इतरांच्या प्रकाशित पुस्तकांची माहिती कळवावी म्हणजे सूची वेळोवेळी परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करता येईल.

          हा अंक किंडलवर ईबुक स्वरूपातही स्वस्तात उपलब्ध आहे.

अंकाची लिंक : https://notionpress.com/read/sampruktt-likhan

          (‘संपृक्त लिखाण आखाजी- मे २०२२ च्या अंकात प्रकाशित. इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

 

© डॉ. सुधीर रा. देवरे

ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.com/