शनिवार, २५ मे, २०१३

ढोल: अहिराणी संदर्भमूल्य नियतकालिक




-डॉ सुधीर रा. देवरे


            ऑगष्ट १९९७ पासून बडोदा येथील भाषा संशोधन केंद्रातर्फे प्रकाशित होणार्‍या ढोल या राष्ट्रीय पातळीवरील नियतकालिकाच्या अहिराणी विशेषांकांचा मी संपादक आहे. राष्ट्रीय पातळीवरील दर्जेदार संशोधनात्मक असे हे पहिले अस्सल अहिराणी नियतकालिक ठरले. अहिराणी ढोल चे आतापर्यंत फक्त काही अंक प्रकाशित झाले असले तरी त्यांतून अनेक मौखिक घटकांगांचे दस्ताऐवजीकरण झाले आहे. आजपर्यंत अहिराणी भाषेतील लोकसाहित्यावर आणि भाषेवर काही संकलित पुस्तके प्रकाशित झाल आहेत. माझ्या स्वत:च्या पुस्तकांसहित क्वचित निखळ अहिराणी साहित्याची पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. परंतु संपूर्ण माध्यम अहिराणी असलेले नियतकालिक अद्याप अहिराणी भाषेत प्रकाशित झालेले नव्हते. म्हणून ढोल हे आता आणि यापुढेही ऐतिहासिक दस्ताऐवजाचे महत्वपूर्ण नियतकालिक ठरले आहे.
            लोकभाषा मरू नयेत म्हणून त्यांच्या संवर्धनासाठी बडोदा येथील भाषा संशोधन केंद्रातर्फे डॉ. गणेश देवी यांनी एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत ढोलची संकल्पना त्यांनीच मांडली आणि भाषा केंद्राशी संबधीत आम्ही सर्वांनी ती उचलून धरली. ढोल चे नामकरण डॉ. देवी यांनीच केले. मात्र यानंतरचे सर्व संपादकीय हक्क त्या त्या भाषेतील संपादकांना देण्यात आले. संपादकीय क्षेत्रात डॉ देवींनी त्यानंतर कोणताही हस्तक्षेप केला नाही.
            लोकभाषा व लोकसंस्कृती यांचे दस्ताऐवजीकरण करण्याचा प्रयत्न म्हणून संपूर्ण अहिराणी माध्यमातील हे नियतकालिक सुरू करण्यात आले. कविता, कथा, ललित, चुटके, जाहिराती, आकर्षक मुखपृष्ठ अशा प्रकारचे करमणूकप्रधान व व्यावसायिक स्वरूप या नियतकालिकाला कधीच द्यायचे नव्हते. यातून लोकसंस्कृती, लोकपरंपरा, ‍लोकजीवन, आदिवासी जीवन जाणिवा, बोलीभाषा, लोकभाषा, लोककला- आदिवासी कला, लोकवाड्मय, लोकदैवते, लोक श्रध्दा आदींचा वेध घेण्यात येतो. या बरोबरच आदिवासी लोकजीवन, आदिवासी कथा आणि व्यथा, आदिवासी संस्कृती यांचाही वेध घेण्यात आला. सखोल चिंतनात्मक आणि वर्णनात्मक लेख, अभ्यास, संशोधन यातून येत राहिले. ढोल साठी अशा स्वरूपाचे लिखाण मिळाले नाही तर तसे लिखाण स्वानुभवांच्या चिंतनातून मी स्वत: केले. छापण्यासाठी न लिहिणार्‍यांना ढोल साठी लिहिते केले. प्रत्येक अंकात स्वत: संपादक वगळता नवे लेखक ढोल मध्ये आणले- येत राहिले.
            बोलीभाषांवर, लोकसंस्कृतीवर वा आदिवासी लोकपरंपरांवर आज महाराष्ट्रातील अनेक एम. फिल., पीएच. डी. करणारे प्राध्यापक अभ्यासक विद्यार्थी ढोल चा संदर्भ नियतकालिक म्हणून आधार घेतात आणि आपल्या प्रंबधाच्या संदर्भ ग्रंथांच्या यादीत ढोल नियतकालिकाचा साधार उल्लेख करतात.      
            या अंकांचा सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक आणि साहित्यिक असा विशिष्ट स्तरावरील दर्जा ठेवण्यातही मला यश मिळाले आहे, हे सर्वदूरच्या स्तरांतून आलेल्या अभिप्रायांवरून लक्षात येते. प्रातिनिधीक असे फक्त तीन अभिप्राय येथे नमूद करतो: महाराष्ट्र टाइम्स चे तत्कालीक कार्यकारी संपादक आणि जेष्ठ पत्रकार श्री अशोक जैन यांनी अहिराणी ढोल वर महाराष्ट्र टाइम्सच्या मैफल रविवार पुरवणीतून समीक्षणात्मक दखल घेत लिहावे यातच ढोल चे यश दिसून येते. (महाराष्ट्र टाइम्स. २५--१९९९.)
            बेळगाव येथील त्र्याहत्तराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील अध्यक्षिय भाषणात डॉ. . दि. फडके यांनी अहिराणी ढोल चा आणि माझ्या संपादकीय कौशल्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला होता. त्यांच्या छापील भाषणात अहिराणी ढोल साठी एक संपूर्ण परिच्छेद लिहिलेला आहे. (२८ एप्रिल २०००.)
            जर्मन टी. व्ही. आणि बी बी सी नेही ढोलच्या भाषक चळवळीवर विशेष कार्यक्रम सादर करून दखल घेतली आहे.
            ढोल च्या माध्यमातून आदिवासी संस्कृती, आदिवासी भाषा, लोकभाषा, लोकसमज, सण, लोककथा, लोकगीते, सांस्कृतिकता, श्रध्दा, परंपरा अशा लोकसंस्कृतीचे जतन करायचे आहे. लोकसंस्कृती-लोकपरंपरा टिकल्या तरच लोकभाषा टिकते म्हणून भाषेबरोबर त्याही उपयोजित होत आहेत. सुरूवातीच्या काळात षण्मासिक स्वरूपात सुरू झालेल्या या नियतकालिकाला चाकोरीबध्द साचलेपणाचे स्वरूप प्राप्त होऊ नये म्हणून आता ते अनियतकालिक करण्यात आले आहे.
      (ललित मासिक, मे 2013, वाड्‍.मयीन नियतकालिक विशेषांक, सुवर्ण महोत्सवी वर्ष, संपादन श्री. सतीश काळसेकर : या अंकातून साभार.)

-            डॉ. सुधीर रा. देवरे        
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
        

शनिवार, १८ मे, २०१३

व्यवस्था म्हणजे काय ?



-         डॉ. सुधीर रा. देवरे


         चिखलीकर यांनी जमा केलेली माया संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली. एक साधा इंजिनियर इतक्या कोटींपर्यंत माया जमवू शकतो आणि त्यातील निम्म रक्कम ही रोख आणि सोन्याच्या रूपात ठेवतो हे सुध्दा देशाने प्रथमच ऐकले असेल. महाराष्ट्रात आपली कुठे कुठे मालमत्ता, जमीन, घरे, प्लॉट आहेत हे नक्की माहीत नसणारा व त्या इस्टेटीचे ट्रंकभर कागदपत्रे बाळगणारा हा एकमेव इंजिनियर नक्कीच नसावा. धर्मभास्करापासून तर चिखलीकरांपर्यंत असे अनेक लोक होऊन गेले असतील ‍आणि आजही समाजात उजळ माथ्याने वावरत असतील पण अजून ते उघडे पडले नाहीत इतकेच. राजकारणी, कर्मचारी, व्यापारी, दलाल, तथाकथित संत, मंदिरांचे विश्वस्त, क्रिकेटर आणि सर्वच खेळाडू यांना पैसे कमवण्याची हाव सुटलेली आहे. माणूस हा किती प्रचंड हावरा प्राणी आहे, याचे खरे चित्र जरा इकडेतिकडे पाहिल्यावर लक्षात येते! आपण हे नक्की कोणासाठी करत आहोत याचे तारतम्य न बाळगणारे असे अनेक लोभी सापडतील.
         चिखलीकरांसारखे अनेक सरकारी कर्मचारी, अनेक राजकारणी आणि आपण सर्व नागरीकही या व्यवस्थेला कारणीभूत आहोत. आपण कोणाकडून लाच घेत नसलो तरी आपण आपले कामे लाच देऊन करून घेतो. अनेक पापभिरू लोक अवघड जागेचे दुखणे म्हणून पैसे देतात व कामे करून घेतात. कोणतेही प्रमाणपत्र घ्यायचे असेल तर पावतीशिवायचे पैसे ठरलेले. आरटीओकडून गाडी पासींग करून घ्यायची, योग्य नंबर हवा असेल, लायसन्स काढायचे तर पैसे ठरलेले. रेशनकार्ड काढायचे, पैसे. खरेदी विक्री करायची आहे, पैसे. पोलीसांकडे जा, पैसे. उच्च शिक्षणासाठीच नव्हे तर बालवाडी प्रवेशासाठीही देणग्या. नोकर्‍या मिळवण्यासाठी पैसे. ठेका मिळण्यासाठी पैसे. आणि यासाठी शिपायापासून मंत्र्यांपर्यंतची साखळी. कोणत्याही कार्यालयात कोणत्याही किरकोळ कामासाटी जा, एका फेरीत काम होणार नाही. झालेच तर तुमचा पूर्ण दिवस त्या कामावरून ओवाळून टाकावा लागतो. आपल्याला लाच दिल्याशिवाय चैन पडत नाही. वरीलपैकी ज्या गोष्टींचा उल्लेख केला त्यात आपण कोणाकडे कोणत्याही नियमबाह्य गोष्टी मागत नाहीत तरी लाच द्यावी लागते. सामाजिक क्षेत्रात हुंडा देणे-घेणे, धुमधडाक्यात लग्न, वाढदिवस, मानपान या बाबी आपल्याला सोडवत नाहीत.
         घेणारे लोक कमी आहेत, पण देणारे सर्वच आहेत. म्हणून एखाद्याने नियमावर बोट ठेवला की त्याचे काम होत नाही. त्याला नियमांचा बडगा दाखवून वेगळ्या प्रकारे त्रास दिला जातो. त्याच्या बाजूने लाच देणारे इतर लोक उभे रहात नाहीत. हीच आपली अवनती. नियम फक्त पाळणार्‍या लोकांसाठी आहेत. जे नियम पायदळी तुडवतात त्यांची सर्व कामे दललांमार्फत घरबसल्या होतात.
      आपले सरकार आणि शासन दिवसेंदिवस भ्रष्ट होत आहे. कारण आपलेच प्रतिबिंब आपल्या शासन व्यवस्थेत पडलेले असते. काही मतदार जात पाहून मतदान करतात. काही धर्म पाहून मतदान करतात. काही मतदार पैसे घेऊन मतदान करतात तर काही स्थानिक ठिकाणी पार्ट्या घेऊन मतदान करतात. आणि अशा पार्ट्यांचा आस्वाद घेत लोक, देशात भ्रष्टाचार वाढल्याच्या चर्चा करतात. भ्रष्टाचार हा फक्त पैशांचाच नसतो. वागण्याच्या, कर्तव्याच्या, वेळेच्या आणि विचारांच्या भ्रष्टाचाराने आज सर्वत्र थैमान घातले आहे.
         व्यवस्था म्हणजे केवळ शासन, सरकार आणि कर्मचारी नव्हेत, तर देशातील नागरीक म्हणजे आपणही या व्यवस्थेचे घटक आहोत. जसे नागरिक तशी व्यवस्था. या व्यवस्थेचा एक घटक म्हणून आपल्यापासून अभ्यास करू या.

-            डॉ. सुधीर रा. देवरे        
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
        

शनिवार, ११ मे, २०१३

कुठे गेली मानव जातीबद्दलची कळकळ




-         डॉ. सुधीर रा. देवरे


         इथे विशिष्ट जातीच्या प्रेमाने का लिहिले जाते वा एखाद्या जातीबद्दल प्रेमाने लिहिताना दुसर्‍या जातीचा व्देश का दिसतो काही लोकांच्या लिखाणातून. तसेच एखाद्या धर्मावर आपुलकीने लिहिताना दुसर्‍या धर्माबद्दलची नफरत का दिसते आपल्या विचारातून. एखाद्या ऐतिहासिक पुरूषावर लिहिताना दुसर्‍या ऐतिहासिक पुरूषाला आपण कमी का लेखतो. एखाद्‍दुसरा तसा संदर्भ आला तर आपण तो का झाकपाक करतो वा नाकारतो?
         अंधश्रध्देवर लिहिले तर तो धर्मावर प्रहार असतो का? राजाराम मोहन राय यांनी सतीची चाल बंद केली म्हणजे त्यांचा इथल्या धर्माला विरोध होता का? महात्मा फुल्यांनी बहुजनांना आणि‍ स्त्रियांना शि‍क्षणाची दारे उघडली म्हणून तो धर्मावर आघात झाला का? आगरकर सुधारक होते म्हणून ते काही धर्माविरूध्द होते का? बालविवाह बंद झाले म्हणून धर्म बुडाला नाही. विधवा विवाह सुरू झाले म्हणून धर्माला कोणी वाईट ठरवले नाही. आज कोणी परंपरेतील भोंदूगिरीवर प्रहार करत असेल तर तो धर्माविरूध्द आहे असे का म्हटले जाते. धर्मातील अनिष्ट गोष्टी दूर करणे हे आपले कर्तव्य आहे. ह्या अनिष्ट गोष्टी खर्‍या धर्माचे अंग नसतात. कोणीतरी आपल्या स्वार्थासाठी त्या नंतर घुसडलेल्या गोष्टी असतात. म्हणून सगळ्या हिनकस गोष्टी नाकारणे हे आपले आद्य कर्तव्य ठरते.
         आपल्या विचारात अखिल मानव जातीबद्दलची कळकळ का नाही दिसत. आपण फक्त विशिष्ट जातीची, विशिष्ट धर्माची, विशिष्ट गटाची, विशिष्ट पक्षाची बाजू घेत का लढत राहतो आयुष्यभर. विशिष्ट व्यक्तिला विभूती ठरवून व्यक्तिपूजेचे स्तोम का माजवत राहतो आपण. या व्यक्ती म्हणजे तथाक‍थित आजचे संत असोत, आजचे राजकीय पुढारी असोत की होऊन गेलेले ऐतिहासिक पुरूष असोत. या सगळ्यांतून आपण बाहेर पडलो नाहीत तर आपले भवितव्य कठीण आहे.


-            डॉ. सुधीर रा. देवरे        
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
        

शनिवार, ४ मे, २०१३

कितीही सरबजित मारले तरी-





-         डॉ. सुधीर रा. देवरे


         जगात जे काही राष्ट्रवादी देश आहेत त्या देशातील सर्व राजकीय पक्ष परराष्ट्र धोरण ठरवताना एक होत असतात. आपल्या राष्ट्राचा प्रश्न असतो तेव्हा ते सर्व एकमेकांचे राजकीय विरोधक असूनही राष्ट्रीय मुद्द्यावर एक मुखाने बोलत असतात. मात्र भारतात अफजल गुरूला वा कसाबला फाशी दिल्यावर तसेच विशिष्ट पक्षाच्या कचेरीजवळ बाँब स्फोट झाल्यावर कोणत्या पक्षाला निवडणूकीत किती फायदा होईल अशी राष्ट्रीय चर्चा सुरू होते. यामुळे भारतात काँग्रेसचा भारत वेगळा आहे तर भाजपचा भारत वेगळा आहे. आणि अजून बाकीच्या प्रांतीय पक्षांचा भारत वेगळा आहे असे त्यांच्या बोलण्यातून जाणवत असते.
         म्हणूनच कोणत्याही बाजूने एक राष्ट्र म्हणता येणार नाही असा धर्मांध आणि कपटी पाकिस्तान भारताचे वेळोवेळी लचके तोडून नाचवत आहे. जो देश पाकिस्तानासारख्या कमकुवत देशाचे काही करू शकत नाही तो भारत आपले काय करून घईल म्हणून चीन भारतामध्ये पुन्हा पुन्हा घुसतोय. आणि ज्या देशाला आपण स्वांतत्र्य मिळवून दिले तो बांगला देशही आपल्यावर डोळे वटारू शकतो.
         आपले राजकीय पक्ष, सरकार, नेते आणि अधिकारी यांना देशाविषयी काहीही देणेघेणे नाही हे आता वेळोवेळी सिध्द झाले आहे. अनेक राजकीय नेत्यांना भावी पंतप्रधान वा भावी राष्ट्रपती होण्याचे वेध लागले आहेत. त्यापेक्षा जरा छोट्या नेत्यांना मुख्यमंत्री होण्याचे वेध लागतात. जे कोणत्याही पध्दतीने निवडून येऊ शकतात अशांनाच फक्त निवडणुकीचे तिकिटे देण्यात येतात मग ते नेते कितीही भ्रष्ट असोत वा कट्टर गुन्हेगार असोत. सत्ता आणि पैसा या भोवती सगळे भारतीय राजकारण आज फिरत असल्यामुळे कितीही सरबजित सिंग पाकिस्तानने मारले तरी आम्ही फक्त खेद व्यक्त करू वा संसदेत दोन मिनिट मौन पाळू. चीन कितीही भारतात घुसला तरी आम्ही तो स्थानिक प्रश्न आहे असे सांगत आमच्या खुर्च्या सांभाळू.
         देशाचे काहीही होवो सत्ता हिसकवता आली पाहिजे. नंतर ती टिकवता आली पाहिजे. कोणत्या का मार्गाने होईना प्रंचड पैसा कमवता आला पाहिजे हे समीकरण आज भारतीय राजकीय व्यवस्थेत- अगदी ग्रामपंचायतीपासून- नगरपालिकेपासून तर थेट पंतप्रधानापर्यंत व्हाया भ्रष्ट अधिकारी- यांच्यात रूढ झाले आहे. अशा या अजगरी सुस्त व्यवस्थेकडून पाकिस्तानला धडा शिकवण्याची वा चीनला इशारा देण्याची अपेक्षा करणे सपशेल चुकीचे आहे. आपण म्हणजे सर्वसामान्य नागरिक फक्त आत्मक्लेश करू शकतो. दुसरे काय?

-            डॉ. सुधीर रा. देवरे        
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/