मंगळवार, १५ जून, २०२१

निष्क्रिय सज्जन म्हणजे...

 

- डॉ. सुधीर रा. देवरे

              आपल्यातल्याच काही विभूती दैनंदिन स्तुत्य कृतीतून विकास पावत इतिहासात लोकदेव झाले. कृतीतून त्यांनी लोकांना त्यांच्यातला देवत्वाचा दृष्टांत दिला. परोपकार देवत्वाकडे घेऊन जातो. माणसाला आयुष्यातील कृतीतून देवत्वापर्यंत पोचता येतं. कृतीतून देवमाणूस होत जाणं साधी सोपी गोष्ट नाही. आपण अशा देवमाणसांचा आदर्श न घेता मंदिरं बांधून दानपेट्या ठेवत कधीही मंदी नसलेला व्यवसाय सुरु करतो. 

              माणसाला एकुलतं एक आयुष्य मिळतं. त्यातलं निम्म्याधिक आयुष्य झोपेत निघून जातं. बालपणातलं आयुष्यही बेरजेत नसतं. उरलेल्या आयुष्यात माणूस कष्ट करत दोन वेळचं जेवण कमवतो. आयुष्यात हावही स्वस्थ बसू देत नाही. सुख मिळवण्यासाठी रोज दु:खं पचवत जगायचं. मोहाची स्वप्न उबवायची. वयात येताच वासनेचा डंख. अहंकार फणा काढतो. जातीचा अहंकार, धर्माचा अहंकार, सत्तेचा अहंकार, श्रीमंतीचा अहंकार, राजकीय विचारसरणींचा अहंकार. काहींना तर ज्ञानाचाही अहंकार असतो! (विशेष म्हणजे अहंकार आपल्याला अप्रत्यक्षरित्या समाजाकडूनच शिकायला मिळतो.) अहंकार पचवणं ही साधी सोपी गोष्ट नाही. अहंकार पचवला तो देव झाला.

              व्देष हा माणसाच्या खूप आत दबा धरुन बसलेला असतो आणि तो उथळ कारणानंही उफाळतो. मानसिक स्वास्थ्य बिघडताच व्देष रंग दाखवतो. पहिल्यांदा निंदा- नालस्ती व्देषाला मोकळी जागा करुन देतात. व्देषाला बाहेर निघता आलं नाही तर भयंकर विकृत घटना घडतात. क्रोधाचंही तसंच. क्रोधाने जगात रोज अनेक अमानुष घटना घडतात. आपण वर्तमानपत्रांतून आणि न्यूज चॅनल्सवरुन वाचतो- पाहतो. वरवरचा क्रोध मनुष्य टाळू शकतो पण आत खोलवर साचलेला क्रोध कशानंही शमत नाही.

              या सगळ्या षड्रीपूंना हद्दपार करणारा माणूस स्थितप्रज्ञ ठरतो. जिथं मरणात- जीवनात भेद दिसत नाही. आपण पुढच्या क्षणाला अस्तित्वात राहणार नाही तर आपल्या खिशातले हजार रुपये आपल्याला काय उपयोगाचे, हा विचार करता आला पाहिजे. आपण पुढच्या क्षणाला अस्तित्वात नसणार आणि परिवाराचं काय होईल? ही चिंता ज्याला नाही. पुढच्या क्षणाची शाश्वती नाही तरीही आपण उद्याच्या आर्थिक व्यवहारांचा विचार करतो. माझ्याकडे याचक आला आहे, तो या क्षणाला भुकेला आहे आणि मी सेवानिवृत्तीनंतर माझ्याकडे मृत्यूपर्यंत पैसे कसे शिल्लक राहतील, म्हणजे मी कोणाकडे हात न पसरता दोन वेळचं जेवण जेऊ शकेल याचं नियोजन करतो. (कोणी दान करताना, सामाजिक काम करताना वाजागाजा करतो. अशी समाजोपयोगी कामं कोपर्‍यात करुन आपण कॅमेर्‍यात येणार नाही याची काळजी घेतली जात नाही.)   

              हेवा वाटण्यातून असमाधान जागृत होतं. कोणाच्या दु:खात आनंद होणं ही भयंकर विकृती. वैयक्‍तीक राजकारण आपल्याला माणूसपणापासून रोधून धरतं. इथं राजकीय पक्षांचं राजकारण अभिप्रेत नाही. मित्राचं वागणं पटत नाही तरी आपण त्याला तोंडावर सांगतो, तुझा स्वभाव छान आहे. एखाद्याचं वागणं बोलणं मनापासून आवडतं पण आपण ते कबूल करत नाही. एखाद्याचे विचार पटत असूनही त्याचं आचरण- अनुकरण करणं लांबच ते मान्य करण्याचाही आपण मनाचा मोठेपणा दाखवत नाही. एखाद्याचं यश आपल्याला हुलकावणी देतं. त्याचं यश आपलं दु:खं आणि तेच यश आपल्याला मिळालं तर लोकांना ते आवडावं असं आपल्याला वाटणं. मान्य करु नये ते आपण मान्य करतो आणि जे मान्य करायला हवं ते करत नाही. कोणाला दुखवू नये म्हणून नावाजत राहतो. ज्याला दुखवायला नको त्याला दुखावलं जातं. जिथं स्पष्ट बोलायला हवं तिथं ‘री’ ओढली जाते- हाजी हाजी केली जाते. जिथं बोलू नये तिथं मुद्दाम टोचून बोललं जातं, हे राजकारण. सारांश, काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, दंभ या षड्रिपूंच्या पाशात अडकलेल्या माणसाला माणूसपण निभावता येत नाही. खरंखुरं कोणाचं चांगुलपण त्याला सहन होत नाही.

              अशातून आपल्यात साधं माणूसपणही दिसून येत नाही. जास्तीतजास्त माणूस दिखाऊ सज्जन होऊ शकतो. जो कोणाच्या खिजगणतीत नाही त्याला आपण सज्जन म्हणतो. असा माणूस नैसर्गिक माणूसही राहात नाही मुळात. जो योग्य जागी स्पष्ट बोलतो त्याला ‘अतिशहाणा’ ठरवलं जातं, त्याला अनेक शत्रू नि‍र्माण होतात. आणि ‘वाचाळा’पुढे कॅमेरे हात जोडून चोवीसतास उभे राहतात. माणसाची बुध्दी यावेळी वरदान नव्हे तर शाप ठरते. मोठा बुध्यांक नसलेला माणूस वा फक्‍त आजचाच विचार करणारा माणूस नैसर्गिक जीवन सरळपणे जगतो, कारण अज्ञानातलं सुख. त्याच वेळी बुध्दीवान- संवेदनाशील माणूस आतल्याआत आपणच दाह निर्माण करत जगताना दिसतो. व्यवस्था बदलता येत नाही म्हणून उदास होतो. कारण ‘बुडते हे जन, न देखवे डोळा’.

               आधी केलं मग सांगितलं, हे संतत्वाचं ब्रीद. सर्वसामान्य जीवांत संतांना देव दिसतो. सर्वसामान्य जीव म्हणजे केवळ मनुष्य नाही, सगळेच प्राणी वा वनस्पतीही. असे लोक जिथं राहतात, तिथं कृती करतात. (अशा माणसांचे मित्र कमी होत शत्रू वाढत राहतात.) परिणामांचं भय न बाळगता कोणत्याही माणसाच्या जगण्यातून ही सगुणता दिसायला हवी. अन्यायाच्या विरोधात उघड भूमिका घेता यायला हवी. सारांश, निष्क्रिय सज्जन म्हणजे देवमाणूस नव्हे!

                  (लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

© डॉ. सुधीर रा. देवरे

          ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com