बुधवार, ३० नोव्हेंबर, २०१६

देशभक्‍ताची व्याख्या! 

- डॉ. सुधीर रा. देवरे

 

      8 नोव्हेंबर 2016 च्या रात्री आठ वाजता पंतप्रधानांनी देशाच्या नागरिकांना उददेशून केलेल्या भाषणात 1000 आणि 500 च्या नोटा आता कागदाचे तुकडे झाल्याची घोषणा केली. पण नागरिकांना आपल्याकडचे हे चलन बदलायला पन्नास दिवसांची मुदत दिल्याने सर्वत्र आनंद झाला. त्यांच्या या निर्णयाचे देशभर स्वागत झाले. निर्णयावर टीका केली तर आपण काळा पैसा बाळगणारे आहोत असा संदेश जाईल की काय या भीतीनेही बरेच लोक निर्णयाचे स्वागत करू लागले.

      आपण अर्थतज्ञ नाही. चलनवाढ, काळापैसा, स्मगलींग, नकली नोट यातले आपल्याला काही कळत नाही. मात्र दैनंदिन गरजांसाठी आपल्याला चलन हवे असते आणि ते कमवण्यासाठी आपण नोकरी, विविध प्रकारची कामे, उद्योग करत असतो. अशा चलनाबद्दल जेव्हा विशिष्ट निर्णय घेतले जातात त्यावर हा सर्वसामान्य माणूस आपल्या अनुभवातून काही प्रतिक्रिया देऊ लागतो. तशीच ही माझी सामान्य माणसाची प्रतिक्रिया आहे.

      चेकने व्यवहार करावे असे शासनातर्फे सांगितले जाते. म्हणून सर्वत्र चेकचा वापर करायचे ठरवले: दुध वाल्याला चेक देऊन पाहिला, त्याने घेतला नाही. पेपर वाल्याला चेक देऊन पाहिला, घेतला नाही. भाजी वाल्याला चेक देऊन पाहिला, घेतला नाही. इथंपर्यंत आपण समजू शकतो, पण डॉक्टरांना अनेकांनी चेक दिला, त्यांनीही चेक घेतला नाही. जुन्या नोटा घेतल्या नाहीत आणि काहींनी तर रूग्णांवर उपचारच केले नाहीत. मोठे व्यवहार चेकने करणे ठीक. पण किरकोळ व्यवहार आपण चेकने करू शकणार नाही हे पावलोपावली लक्षात येते. उदाहरणार्थ, एखादा गरीब माणूस चारपाचशे रूपयाचा किराणा घ्यायला गेला आणि दुकानदाराला तेवढ्या रकमेचा चेक देऊ लागला तर? प्रत्येक चेकला स्लीप भरून बँकेत जमा करावा लागतो. म्हणून संपूर्ण व्यवहार पारदर्शक असूनही वेळेच्या नियोजनासाठी आपल्याला छोट्याशा रकमेसाठी हे नको असते. प्रत्येक व्यवहार आपण चेकने करू लागलो तर चेकच देशाचे चलन होईल. चेकचा अतिवापरही पैशांच्या देवाणघेवाणीपेक्षा धोकादायक ठरू शकेल. नोटा नकली येऊ शकतात तर चेक नकली होणे फार सोपी गोष्ट आहे. नकली चेकने व्यवहार करणारे स्मगलर पकडले जाऊ शकणार नाहीत. अविश्वास वाढत जाईल. असे वारंवार होऊ लागले की आधी अनोळखी लोकांकडून कोणी चेक स्वीकारणार नाही. नंतर हा विश्वास ओळखीच्या ग्राहकांवरही दाखवला जाणार नाही. क्रेडीट कार्डस् काढू म्हटलं तर त्यासाठी जिल्ह्याला जावे लागते. तालुका स्तरावर कार्डस् मिळत नाहीत, असे स्टेट बँकेकडून आताच समजले. (सगळ्याच प्रकारच्या कार्डसची विश्वासार्हता किमान आज भारतात तरी अजून नाही.) पेटीएम वॉलेट सारख्या सुविधा सरसकट कुठेही वापरता येत नाहीत. म्हणजे चलन हेच विश्वासार्ह आणि खणखणीत असणे गरजेचे आहे. आज भारतातील फक्‍त 6 टक्के लोक कॅशलेस व्यवहार करतात. बाकी 94 टक्के लोक रोखीत व्यवहार करतात. याचा अर्थ 94 टक्के लोकांजवळ बेहिशोबी पैसा आहे असे म्हणता येत नाही. भारतासारख्या अवाढव्य लोकसंख्येच्या देशात, ग्रामीण भागात, डोंगराळ भागात व अतिदुर्गम भागात 100 टक्के कॅशलेस व्यवहार होणे शक्य नाही. म्हणून इतर छोट्या छोट्या आणि कमी लोकसंख्येच्या देशांशी तुलना आपल्याला करता येणार नाही.

      1978 मध्ये मोरारजी देसाईंनी हजारांच्या नोटा बंद केल्या होत्या तेव्हा आमच्या गावात हजाराची एकही नोट नव्हती. ती कशी असते हे ही गावातल्या लोकांना माहीत नव्हतं. म्हणून त्या निर्णयाचा सर्वसामान्य माणसावर अजिबात परिणाम झाला नाही. (आणि तेव्हाही काळ्या पैशाला आळा बसला नाही. ज्या ज्या देशांनी आपले चलन बदलले त्यांचे अनुभव वाईट आहेत.) नरेंद्र मोदींनी ज्या नोटा बंद केल्या, आज खेड्यापाड्यातल्या मजुरांजवळही फक्‍त त्याच नोटा आहेत! कारण 86.5 टक्के व्यवहार या नोटांनी होत होता. पंतप्रधान जेव्हा या नोटा बंद करण्याची घोषणा करत होते त्या वेळी सुध्दा एटीएम मशीन मधून 500 - 1000 च्याच नोटा बाहेर येत होत्या. आणि भाषण ऐकल्याबरोबर या नोटा (मध्यरात्रीपासून नव्हे तर त्याच वेळेपासून) कोणी स्वीकारत नव्हतं.

      पश्चिम बंगाल मधील मालदात अनेक गरीब लोकांच्या खात्यात त्यांच्याच हाताने कोणाचे तरी पैसे लाखांच्या आकड्यांत जमा होत आहेत. रांगेत उभे राहण्यासाठी रोजंदारीने लोक कामाला लावले जाताहेत. 8 नोव्हेंबर नंतर पहिले तीन दिवस (रात्रभर सुध्दा) दुपटीच्या भावाने सोने चांदी खरेदी होत होती. कोणी लांब पल्ल्याच्या रेल्वेची एसी तिकीटे खरेदी करून दोन दिवसांनी रिफंड (नवीन चलनात) मागत होते. सरकारी दवाखाने, मेडीकल स्टोअर्स, पेट्रोलपंप, घरपट्टी- पाणी पट्टी भरणे, इतर बिले आदी ठिकाणीही पैसे बदलण्याच्या उद्देशानेच गर्दी होत होती. आज कोणी डॉलर खरेदी करताना दिसतोय. कुणी घर खरेदीत अडकवताना दिसतो. कोणी हिरे खरेदी करतो तर कोणी विविध प्रकारच्या इस्टेटीत पैसे अडकवू लागला. काही खाजगी बडे लोक आणि शासनाशी या ना त्या निमित्ताने संबंधीत असलेले लोक तीन तीन कोटी रूपये बदलून देण्याचे आश्वासन देताना स्टींग ऑपरेशनमध्ये दिसू लागलीत. यात खाजगी बँकर्स पण आहेत. हिस्सारहून विमानाने अडीच कोटी रूपये पूर्वोत्तर भारतात पाठवले गेलेत आणि ते विशिष्ट संस्थेचे आहेत म्हणून प्रमाणपत्र पुढे केले गेले. रक्कम पकडली तरी (हा काळा पैसा होता) शासन काहीच करू शकले नाही. आज सापडलेले काळे पैसे हे फक्‍त हिमनग असू शकतं. यापेक्षा कितीतरी पट पैसा जिरवला गेला असेल. जिरवला जातोय. 

      एका गावातील एका व्यक्‍तीकडे (शेतकरी नव्हे) रूमभर 1000 आणि 500 च्या नोटा आहेत. (ही अफवा नसून त्या व्यक्‍तीकडे काम करणार्‍या नोकराने सांगितलेली घटना.) रोज एक पोते भरून नोटा काढल्या जातात. त्या नोटा 90 नोकरांच्या आणि त्यांच्या पत्नींच्या खात्यावर रोज विभागून रांगा लाऊन खात्यात जमा केल्या जाताहेत. काही नोटा याच पध्दतीने बदलल्या जात आहेत. म्हणजे काळा पैसा अशा पध्दतीने पध्दतशीरपणे जिरवला जातोय. ही गोष्ट उघड झाली नाही तर तो पैसा पांढरा होऊन उजळमाथ्याने व्यवहारात येईल. 2000 च्या नोटेत पुन्हा साठवला जाईल.

      बँकांमध्ये खात्यांवर प्रचंड प्रमाणात पैसा जमा होत आहे. पण हा पैसा सर्वसामान्य लोकांनी घरात ठेवलेला पैसा आहे. हात खर्चासाठी साठ सत्तर हजार रूपये आपल्या जवळ ठेवणे हा गुन्हा नक्कीच नाही. म्हणून याला काळा पैसा म्हणता येणार नाही. ग्रामीण भागातील बहुतांश लोकांचे अजूनही कोणत्याच बँकेत खाते नाही. लोक पैसा जवळ ठेवतात. पण हा पैसा त्यांच्या कष्टाचा असतो. काळा पैसा बाहेर काढता येत नाही तरी सामान्य लोकांजवळच्या पांढर्‍या पैशाने बँका भरून गेल्या. काळा पैसा बाळगणारे लोक सरकारपेक्षा एक पाऊल पुढे आहेत. काळा पैसा बाहेर काढण्याचा नोटाबंदी हा प्रामाणिक प्रयत्न असेलही. परंतु हा प्रयत्न भाबडा ठरू नये. ज्यांनी या आधीच काळा पैसा जमिनीत गुंतवला त्याचे काय? ज्यांनी याआधीच सोन्यात गुंतवला त्याचे काय? ज्यांनी याआधीच घरांमध्ये- भूखंडांमध्ये- हिर्‍यांमध्ये गुंतवला त्याचे काय? आणि आता जो काही काळा पैसा असेल तो कशापध्दतीने जिरवला जातोय हे काही चॅनल्सच्या स्टींग ऑपरेशन्समधून दिसून येत आहे. (स्टींग ऑपरेशन्सपेक्षा कितीतरी पटीने लोक हे पैसे सर्वत्र जिरवत असतील, त्यांची गणती नाही. नोटा बदलण्याचेही रोज नियम बदलतात. ज्याच्याकडे काळा पैसा सापडेल त्याला 200 टक्के दंड होईल असे आधी सांगीतले गेले आणि परवा संसदेत अशा लोकांचे 50 टक्के कापण्याचे बील सादर केले. 200 टक्के वरून 50 टक्यावर येण्याचे कारण काय? सर्वसामान्य लोकांकडे 30 डिसेंबर नंतर एखादी नोट शिल्लक राहिली तर ती कागदाचा तुकडा होईल. पण बेईमान लोक या कायद्याच्या आधाराने 1 जानेवारी 2017 नंतरही आपल्या नोटा 50 टक्के देऊन पांढर्‍या करून घेतील. अशी सवलतीने काळापैशावाल्यांना सांभाळून घ्यायचे होते तर नोटाबंदीचे फलीत काय?) एकंदरीत देशातील काळा पैसा फुकट जाण्याऐवजी बर्‍यापैकी जिरताना दिसतो आहे. मात्र पाकिस्तानात छापल्या जाणार्‍या आणि बांगलादेश व नेपाळमार्गे वितरीत होणार्‍या पैशाला ताप्तुरता लगाम बसला हे नक्की. हा लगाम कायमस्वरूपी बसू शकेल का हा ही प्रश्न आहेच. नोटाबंदीनंतर दोन तीन दिवस काश्मीरातील दगडफेक थांबली होती. पण ती आता पुन्हा सुरू झाली. दहशवाद्यांकडे दोन हजारच्या खर्‍या नोटाही सापडू लागल्या. 2000 च्या नकली नोटा तर तिसर्‍या दिवसापासून सुरू झाल्या. केवळ पाकिस्तान मधून येणारा नकली पैसा आपण रोखू शकत नाही आणि देशातील काळा पैसा कायदेशीरपणे पकडू शकत नाही म्हणून सव्वाशे कोटी लोकांचे चलन बंद करण्याएवढा मोठा निर्णय घ्यावा लागला असे म्हणावे तर ही आपली नामुष्की आहे. आपण हे युध्द हरलोत असेच म्हणावे लागेल. डोंगर पोखरून फक्‍त उंदीर निघणार असेल तर हे सर्व भयानक आहे!...

      एका सर्वेनुसार रद्द केलेल्या नोटांचे वापरातील प्रमाण 86 टक्के होते. देशात सुमारे 17 लाख कोटी रूपयांच्या नोटा वापरात आहेत. रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार सुमारे 400 कोटी रूपयांच्या नोटा बनावट आहेत. केवळ 400 कोटी रूपयांच्या बनावट नोटा नष्ट करण्यासाठी 17 लाख कोटी रूपयांच्या नोटांचा वापर थांबवण्याची गरज होती का असे प्रश्न विचारले जात आहेत. आज जी यंत्रणा चलन बदलासाठी वापरली गेली तीच जर 400 कोटी रूपयांच्या बनावट नोटा पकडण्यासाठी आणि संशयित काळाबाजार करणार्‍यांवर छापे टाकून पकडायला वापरली असती तर कमी कष्टात बरंच काही साधता आलं असतं. मात्र नोटाबंदीचा हा निर्णय आता मागे घेणं यापेक्षा भयानक ठरू शकतं. म्हणून आता जे काही झालं ते यशश्वी व्हावं असंच प्रत्येक नागरिकाला मनापासून वाटतं.

      9 नोव्हेंबर पासून काही दिवस भाजीपाला सडला, तो घ्यायला लोकांकडे सुटे पैसे नव्हते. अनेक ट्रका रस्त्यांवर पडून होत्या. भाजीवाला 500 रूपये घेऊन सुटे कुठून देणार, प्रवाश्यांना खिशात पैसे असून जेवता आले नाही. सुटे पैसे नाहीत म्हणून बस मध्ये प्रवास करता आला नाही. रेल्वेतही तीच अवस्था. हॉस्पीटल्समध्ये पैशांशिवाय इलाज झाला नाही. काही लोक, काही लहान बालकं दगावली. कोणी बँकेच्या रांगेत हार्ट अॅटकने वारले. बँक कर्मचारी अॅटकने वारले. कोणाच्या लग्नाची फसगत. स्मशानभूमीत फसगत. बँक कर्मचार्‍यांवरील अतोनात ताण. आतापर्यंत या सर्जिकल स्ट्राईक्स मध्ये 75 सर्वसामान्य लोक वारले. मात्र काळा पैसा जवळ आहे म्हणून कोणी हार्टअॅटक येऊन वारला वा आत्महत्या करून वारला अशी एकही बातमी अजून ऐकायला- वाचायला मिळाली नाही! ज्या नागरिकांचे अजून कोणत्याच बँकेत खाते नाही अशा मजूर, भटक्या, आदिवासी व ग्रामीण लोकांचे सर्वात जास्त हाल झाले. या निर्णयाचे चांगले आणि वाईट असे दूरगामी परिणाम होणार आहेत.

            नवीन नोटांच्या आकाराचे साचे एटीएम मशीनमध्ये नसल्याने एटीएम व्यवहार ठप्प होते अजूनही आहेत. नोटा बंद करायचा निर्णय घेणारे जे कोणी दोन तीन लोक असतील त्यांना एटीएम मशीनची रचना (हार्डवेअर) नवीन नोटांसाठी मॅन्युअल पध्दतीने दुरूस्त करावी लागतील याची कल्पना नसावी. देशभरातील दोन लाख वीस हजार एटीएम मशीन्स मॅन्युअल पध्दतीने अपडेट (रिकॅलिब्रेशन) करणे सोपी गोष्ट नाही. नवीन नोटा जुन्या नोटांच्या आकाराच्या छापल्या असत्या तरी एटीएम सेवेचा इतका बोजवारा उडाला नसता. बँकेतून द्यायलाही चलन अपूर्ण पडत आहे. नवीन चलनाची जी व्यवस्था व्हायला हवी होती ती झाली नाही. 500 रूपयाच्या नोटा छापायला 11 नोव्हेंबरला सुरूवात झाली.

      काळा पैसा, सोने, भूखंड, स्मगलर या सर्वांचा विचार केला तरी अजून काहीतरी या व्यवस्थेत खोट आहे. फक्‍त एक उदाहरण सांगतो. आपल्याला असे अनेक उदाहरणे आठवतील: एखाद्या व्यापार्‍याचे शहरात चार पाच दुकाने असतात. रहायला मोठी बिल्डिंग असते. तरीही त्याच्याजवळ नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असते. मात्र पोष्टात काम करणारा लिपिक नॉन क्रिमिलियर मध्ये बसत नाही. कारण त्याला मिळणार्‍या प्रत्येक पैशाचा हिशोब त्याच्या पेस्लीपमध्ये असतो. आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी त्याला पूर्ण फी भरावी लागते. या देशात फक्‍त नोकरवर्गानेच आयकर भरावा आणि नोकरवर्गाच्या मुलांनीच प्रचंड फुगवलेली शैक्षणिक पूर्ण फी भरावी असा अलिखित नियम झाला आहे. हे कधी आणि कोण बदलेल? प्रत्येक नागरिकाचे खरे उत्पन्न कागदावर कधी येईल? जास्तीतजास्त नागरिक आपला प्रामाणिक प्राप्तीकर कधी भरतील? (सध्या फक्‍त 4 टक्के नागरिक प्रा‍प्तीकर भरतात.) ‍नोकरी करत नसलेले पण करप्राप्त उत्पन्न असलेले बरेच लोक आयकर का भरत नाहीत?

 ‘‘कोणाचे काम करून देताना कधीच लाच घेत नाही, नियमांतर्गत (वा नियमबाह्य) कामे करून देण्यासाठी लाच देत नाही, आपला योग्य तो प्राप्ती कर (इनकम टॅक्स) देशासाठी भरतो, निवडणूकीत जो नागरिक आपले मत विकत नाही आणि जो उमेदवार मते खरेदी करत नाही, तो खरा देशभक्‍त.’’ अशी देशभक्‍ताची व्याख्या केली तर किती देशभक्‍त आपल्या देशात सापडतील?

      म्हणून सर्वात महत्वाची बाब म्हणजे मानवी नैतिकता. ती नसेल तर कोणी कोणतेही कायदे करो, कोणतेही चलन बंद करो वा नवीन आणो, लोकपाल आणो. अनैतिक व्यवहारांसाठी सगळीकडे पळवाटा आहेत. (हजाराच्या नोटांत लाच दिली- घेतली जात होती ती आता दोन हजाराच्या नोटेत सुटसुटीतपणे देता- घेता येईल. पैसेही कमी जागेत साठवता येतील.) आपण नैतिकता पाळणार नसू तर सचोटी येऊच शकणार नाही कधी. म्हणून हा फक्‍त सरकारी यंत्रणेचा प्रश्न नाही. आपण सर्व मिळून चांगले काही करू शकलो तरच हे होऊ शकेल. अन्यथा नाही. आज इतके सारे होऊनही बेईमानी लोक आपल्या घरात ऐषारामात गात असतील:

आम्हास नाही तोटा शोधण्यास पळवाटा                                     कितीही करा खोटा आम्ही करू तो मोठा

            (या ब्लॉगचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

सोमवार, १४ नोव्हेंबर, २०१६

नाशिकची उत्सव संस्कृती


 
- डॉ. सुधीर रा. देवरे
            (महाराष्ट्र टाइम्स च्या नाशिक ‍विभागाच्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेला निमंत्रित लेख.)        
            नाशिकची उत्सव संस्कृती हा विषय दिवाळी अंकातील लेखासाठी आपण सुचवला, हे योग्य केले. नाशिकची खास अशी उत्सव संस्कृती आहे, हे खरे आहे. पण नाशिक म्हणजे केवळ नाशिक शहर नव्हे तर नाशिक व परिसर आणि संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील उत्सव संस्कृती हे स्पष्ट केल्याने विषयाची व्याप्ती वाढली. अशा वाढलेल्या व्याप्तीमुळे ग्रामीण भागातील अद्याप उजेडात न आलेल्या प्रथा परंपरांची थोडक्यात नोंद घेता येईल व या परंपरा काय आहेत हे महाराष्ट्रभर कळू शकेल. विषय नाशिक जिल्ह्यापुरता असला तरी त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. मात्र शब्दसंखेच्या अटीमुळे विषय आटोपता घ्यावा लागेल म्हणून त्याला आढाव्याचे स्वरूप प्राप्त होऊ शकतं. खरं तर विशिष्ट परंपरा या केवळ आमच्या गावाच्या आहेत वा जिल्ह्याच्या आहेत असा दावा करणं थोडं धाडसाचं ठरू शकतं. कारण परंपरा या लोकप्रिय असतात, प्रवाही असतात आणि म्हणून त्या प्रचंड वेगाने सर्वदूर पसरत जातात. त्यांचे मूळ शोधत बसणे चुकीचे ठरेल. एखाद्‍दुसरी परंपरा आज त्या गावापुरती वा विशिष्ट भूभागापुरती मर्यादित आहे असं ठामपणे सांगता येत असलं तरी डझनभर परंपरा या केवळ आमच्याच जिल्ह्यातील आहेत असं दूराग्रहाने मांडता येणार नाही.
            उत्सव या संज्ञेत सण, यात्रा, लोकपरंपरा, लोकोत्सव, विधी, विधीनाट्य, रीती, रूढी, देव-देवता, खेळ, लोकजीवन आदींचा समावेश होतो. महाराष्ट्राचा माणूस उत्सवप्रिय आहे. महाराष्ट्रात सर्वत्र विविध उत्सव साजरे केले जातात. पण आपल्याला अभिप्रेत आहे नाशिक उत्सव. म्हणून नाशिक जिल्ह्यापुरत्याच ओळखल्या जाणार्‍या काही सांस्कृतिक उत्सवांचा गोषवारा देणे इथे अभिप्रेत आहे.
            नाशिक जिल्ह्यातील ठळकपणे उल्लेख करता येतील अशा काही उत्सवांची वर्गवारी करता येईल. नाशिक शहरातून गोदावरी नदी वाहते. नाशिक पासून पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील ब्रम्हगिरी पर्वतातून गोदावरी उगम पावते. प्रत्येक बारा वर्षांतून नाशिक आणि ‍त्र्यंबकेश्वर येथे होणारा कुंभ मेळा, सिंहस्थ पर्वण्या हा प्रचंड मोठा उत्सव असून तो महाराष्ट्रात फक्‍त नाशिकलाच होतो. या कुंभमेळ्याकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन धार्मिक वा अध्यात्मिक नसून ही ऋषिमुनींची एक लोकपरंपराच आहे असे वाटते. या मेळाव्याकडे एक लोकोत्सव, लोकप्रथा, लोकसांस्कृतिक लोकपरंपरा म्हणूनच पहावे लागेल. (कुंभ मेळ्याला ऋषीपरंपरा वा साधू परंपरा म्हणता येईल. पण संत परंपरा म्हणता येणार नाही.) इतर लोकप्रथा- लोकपरंपरांमध्ये जो काही धार्मिक अंश सापडतो तेवढ्याच अंशात कुंभमेळ्यात धार्मिकता असल्याचे दिसेल. यापेक्षा या मेळाव्यात काहीही धार्मिक वा अध्यात्मिक असल्याचे शोधूनही सापडत नाही. 
            फक्‍त नाशिकच्या म्हणता येतील अशा ज्या काही प्रथा सांगता येण्यासारख्या आहेत त्यात कुंभमेळा आणि सिंहस्थ पर्वण्यांचा समावेश होऊ शकतो. गोदावरी ही दक्षिणेतील गंगा समजली जाते. म्हणून कुंभमेळ्याच्या सिंहस्थ पर्वणीला स्नानासाठी देशभरातून येणार्‍या साधूंचे आखाडे, या आखाड्यांना असलेली विविध नावे, आखाड्यांतील विविध धार्मिक पदव्या मिळवलेले मुखिया, त्यांच्याजवळ असलेले विविध हत्यारे, वाद्य, विविध वेषभूषेतील साधू, (नग्न साधू हे अजून एक विशेष आकर्षण), साधूंचा अहंकार आणि ठेवणीतला विक्षिप्तपणा, विविध नशांचे व्यसन, शैव- वैष्णव वाद, स्नानासाठी देशभरातून येणारे देव भोळे लोक, श्रावण महिण्यातही दूरवरून स्नानासाठी गोदावरीवर होणारी गर्दी. कुंभ उत्सवात नाशिक जिल्ह्यातील रहिवासीही मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतो.
            कालिकादेवी यात्रा, चैत्र पौर्णिमेला (एप्रिल) सप्तश्रृंग गडावरील लोकजत्रा, नाशिक पंचवटीला रामायणातील उपयोजनाची असलेली पार्श्वभूमी आणि या पार्श्वभूमीमुळे धार्मिक भावनेतून यात्रोत्सव होत असतो. (खरं तर व्यापक अर्थाने या जागा लोकश्रध्देच्या या अर्थाने लोकपरंपराच आहेत.) बागलाण तालुक्यातील मुल्हेर येथे कोजागिरी पौर्णिमेला होणारी रासक्रिडा, मांगीतुंगी येथे जैन मुनींसह स्थानिक लोकांची भरणारी यात्रा आदी उत्सव फक्‍त नाशिक जिल्ह्यात पहायला मिळतात. अशा उत्सवांतून दिसणार्‍या प्रथा- परंपरा- लोकोत्सव अन्यत्र महाराष्ट्रात कुठेही पहायला मिळत नाहीत.
            या व्यतिरिक्‍त अजून काही लोकोत्सव फक्‍त नाशिक जिल्ह्यात पहायला मिळतात. हे लोकोत्सव महाराष्ट्रातील जनतेसाठी अजून अंधार्‍या कोपर्‍यांत आहेत असे म्हणावे लागेल. (महाराष्ट्रातील अनेक लोकोत्सवांची दखल अजून कोणी घेतलेली नाही.) त्यांचा गाजावाजा नाही. अजूनही प्रकाशात न आल्याने अशा काही लोकोत्सवांवर उजेड टाकता येईल:
             विधी: व्रत घेणे, चक्र भरणे, तोंड पाहण्याचा कार्यक्रम, सुखगाडी (सुखदेवता), मुलामुलींची नावे ठेवण्याची पध्दत, पाऊस येत नाही म्हणून वरूण देवाला प्रसन्न करून घेण्यासाटी धोंड्या काढणे, तुळशीचे लग्न लावणे, जावळं काढणे, घरभरणी करणे आदी लोकोत्सव नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव आणि देवळा या परिसरात होत असतात. पैकी धोंड्या काढणे, तुळशीचे लग्न लावणे, घरभरणी करणे हे विधी अन्यत्र होत असले तरी त्यांचे स्वरूप वा नावे भिन्न आहे. 
            विधी- नाट्य: भोवाडा, खंडोबा आढीजागरण, अहिराणी लळित,
भील आणि कोकणा यांचा डोंगर्‍या देव उत्सव, कोकणा आदिवासी बांधवांची कन्सरा माली, एखाद्या पारंपरिक वैद्याने रोग्याची पटोळी पाहणे, लग्नाच्या विविध परंपरा, मंत्रांनी पान उतरवणे (सापाचा दंश उतरवणे), विंचू उतरवणे, मंत्र-तंत्र आदी लोकविधी- नाट्य नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, कळवण, सटाणा, मालेगाव आणि देवळा या परिसरात होत असतात. पैकी बोहाडा, खंडोबा जागरण हे नाट्य नृत्य प्रकार इतरत्र होत असले तरी त्यांचे स्वरूप वेगळे आहे.
            देव- देवता: कानबाई रानबाई बसवणे, गौराई बसवणे, काठीकवाडी काढणे, खांबदेव पुजणे (नागदेव, वाघदेव), म्हसोबा, आया, डोंगरदेव, मुंजोबा, कन्सरा माऊली आदी देव- देवता वार्षिकोत्सव नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा आणि खानदेश- अहिराणी भाषा पट्टा या परिसरात आढळतात. पैकी म्हसोबा, आसरा, मुंजोबा, काठीकवाडी या देवता इतरत्रही सापडतील पण त्यांच्या लोककथा- लोकप्रथा भिन्न आहेत.
            खेळ: आखाजीचा बार, झोका, गोफण, गलोल आदी खेळ नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा आणि खानदेश- अहिराणी भाषा पट्टा या परिसरात आढळतात. पैकी झोका, गोफण, गलोल हे महाराष्ट्रात इतरत्रही आढळत असले तरी त्यांचा हत्यार म्हणून वेगळा उपयोग होतो.
            लोकसाहित्य: आखाजी बारातल्या सामुहीक शिव्या, झोक्यावरची सामुहीक गाणी, कुटुंबात कोणाचा तरी मृत्यू झाल्याने स्त्रियांचे शोकग्रस्त पण गेय स्वरूपात शब्दबध्द सामुहीक रडणे, लोकगीतातल्या तीनशे साठ- नऊ लाख अशा लोकपरिमाण संज्ञा, उखाणे, आन्हे, लोकगीते आदी सामुदायिक लोकसाहित्य नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा आणि खानदेश- अहिराणी भाषा पट्टा या परिसरात आढळतं. इतरत्र काही प्रकार असलेत तरी भाषा आणि जीवन जाणिवातल्या भावना वेगळ्या दिसतील.
            रूढी-रिती: अहिराणी खाद्य पदार्थ, दुख टाकायला आणणे, दारावर जाणे, विवाह परंपरा, बाळाला घुगरावणे आदी लोकप्रथा नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा आणि खानदेश अहिराणी भाषा पट्टा या परिसरात आढळतात. इतरत्र त्याचे स्वरूप वेगळे दिसेल.
            वाद्य आणि नाच: खंजिरी, डफ, तुणतुणे, ढोल, ढोलकी आदी आदिवासी वाद्य प्रकार तर फेरा नाच, दबक्या नाच, शिमगा नाच, टापर्‍या गव्हार्‍याची कला आदी आदिवासी नृत्य प्रकार नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागात वेगळ्या परंपरेत दिसतील. अशी काही नाशिक लोकसंस्कृतीची विविध रूपे दिसतात. त्यांचा जवळून आस्वाद, अनुभूती नवीन जीवनदृष्टी देऊन जाते.
            एखाद्या गावापुरत्या वा जिल्ह्यापुरत्या म्हणता येतील अशा क्वचित व दुर्मिळ प्रथा परंपरा असतात. लोकप्रथा, लोकपरंपरा, लोकसंस्कृती, लोकरहाटी, लोकजत्रा हे लोकोत्सव अनुकरणातून झपाट्याने सर्वदूर पसरत राहतात. म्हणून ऋषीचे कुळ आणि नदीचे मूळ जसे शोधू नये तशी अमूक लोकपरंपरा अमूक गावातून प्रचलित झाली असे म्हणणे योग्य नव्हे. विशिष्ट गावाशी निगडीत असलेली परंपरा ही दुर्मिळ आणि क्वचित एखादी असते. एका विशिष्ट गावाशी निगडीत असलेल्या लोकपरंपरा वा लोकोत्सव या काही संखेने मोजता येतील इतक्या आकडेवारीनुसार सांगता येणार नाहीत. ही मर्यादा नाशिकसाठीही आहे, हे लक्षात घेणे महत्वाचे आहे.
            (या ब्लॉगचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

मंगळवार, १ नोव्हेंबर, २०१६

दिवाळीचे दिवस
 - डॉ. सुधीर रा. देवरे
      बालपणी दिवाळी आली की नव्या कपड्यांपेक्षा फटाकड्यांचीच जास्त ओढ लागायची. पंधरा दिवस दिवाळी पुढे रहायची अशा बेताने मी आण्णांच्या मागे फटाकडे आणण्याचे टुमणं लावत असे.    दुसरीकडे माझी आकाशदिव्याची तयारी सुरू व्हायची. तेव्हा सुध्दा विरगावला व्यापार्‍याच्या दोन तीन घरांमध्ये रेडीमेड आकाशदिव्यांची फॅशन सुरू झाली होती. पण सर्वच गाव टोकरांच्या कामड्यांपासून तयार केलेल्या घरगुती आकाशदिव्यातच समाधान मानणारे होते. मला विमान आणि चांदणीचे आकाशदिवे करता येऊ लागले होते. म्हणून एका वर्षाआड मी आकाशदिवा करत असे. सलग दोन वर्ष मी तोच आकाशदिवा लावत असे. दिवाळी झाली की तो व्यवस्थितपणे अडकड्याला सरीला बांधून ठेवीत असे.
      टोकरांच्या बारीक कामड्या तयार करून त्या चांदणी अथवा विमानाच्या आकाराने दोर्‍याने बांधायच्या. खाली पणती ठेवायला लहान चौक तयार करावा लागायचा. चहू बाजूने लाल, पिवळा, जांभळा, निळा, हिरवा असे पातळ घोट्याचे कागद कवायचे. धाब्यावर एक काठी बांधायची. तिच्या वरच्या टोकाला फिरता दोराचा रीळ बसवायचा. त्यावरून दोरीने आकशदिवा खाली वर घेऊन जाता येत असे.
      दररोज संध्याकाळी आकाशदिवा दोरीने खाली सोडून घ्यायचा आणि त्यात मातीची पणती ठेवायची. पणतीत कापसाची वात, गोडेतेल टाकून पणती पेटवायची. दोरी ओढली की आकादिवा वर जायचा. विशिष्ट उंचीवर आकाशदिवा गेला की दोरी खालच्या खुंटीला बांधून ठेवायची. हा ही एक खेळच होऊन गेला होता लहानपणी. पणतीत तेल असेपर्यंत आकाशदिवा उजेड द्यायचा.
      दिवाळीची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे फटाकडे फोडणे असे वाटायचे. सारखं सारखं सांगितलं तरच एखाद्या शनिवारी (बाजाराचा दिवस) आण्णा सटाण्यातून फटाकडे घेऊन येत. त्या फटाकड्यांमध्ये बरेच प्रकार रहायचे. लवंगी फटाकडे, मध्यम आकाराचे फटाकडे, लाल तोटा, टमबाँब, तारकाडया, विमान, भुईनळा, टिकल्यांच्या डब्या असे सर्व प्रकारचे फटाकडे आणून आण्णा आम्हा भावंडांना ते सारखे वाटून द्यायचे. मग आम्ही ते पुरवून पुरवून दिवाळीपर्यंत थोडे थोडे फोडायचो. अहिराणीमध्ये लावून लावून जेवण कर अशी म्हणायची पध्दत आहे. म्हणजे एखादी भाजी जास्त आवडत असली तरी ती सर्वांना पुरावी म्हणून जास्त न खाता भाकरीने लावून लावून म्हणजे थोडी थोडी खायला सांगीतले जायचे. तसे आम्ही फटाकडे लावून लावून फोडायचो.
      एकदा दिवाळी दोन चार दिवसावर आली तरी आण्णा काही फटाकडे आणत नव्हते. टुमणं लावून लावून मी ही कंटाळलो पण आण्णा लक्ष देत नव्हते. मनात म्हटलं, आपण काय केलं म्हणजे आण्णा फटाकडे आणतील? मग मला आयडीया सुचली. आण्णा सकाळी अंघोळ करून ओसरीत कपडे घालायला येत. तोपर्यंत मी झोपलेलाच असायचो. र्‍याचदा जागा असूनही मी अंथरूनतच पडलेला असायचो. एका सकाळी आण्णा कपडे घालायला ओसरीत आले आणि मला जाग असूनही मी झोपेचं सोंग घेऊन झोपेत बरळतोय असे दाखवत म्हणालो, माले फटाकडा पाहिजेत व्हय अंहं.. आणि तसाच मटराऊन गोधडीत पडून राहिलो.
      दुसर्‍या दिवशी मला फटाकडे मिळालेत खरे पण मी बरळायचे नाटक केले हे आण्णांनी बरोबर ओळखलं होतं. आण्णा मला शिव्या द्यायला लागले तेव्हा माझ्यासहीत सर्व घर हसायला लागलं. असं काही माझ्याकडून झालं की आण्णा मला नेहमी म्हणायचे, भयान जातवान शे हाऊ.
      आम्ही थोडे फटाकडे रात्री आणि थोडे पहाटेला फोडायचो. फटाकडफोडण्यासाठी चुलीतले एक विस्तवाचे लाकूड-भितूक हातात घ्यायचे. ओट्यावर उभे राहून फटाकड्याची वात विस्तवाला लावून फटाकडा गल्लीत फेकायचा. काही फटाकडे फुटायची. काही फुसकनिघत. फुसके फटाकडे उचलायला आण्णा जाऊ देत नसत.
      विमान, भुईनळा, रॉकेट, मोठे तोटे असे फटाकडे वडील भाऊ बहिणी लावायचे. असे फटाकडे फोडायला फटाकड्याच्या वातीला भितूक लावून दूर पळावे लागत असे. असे दूर पळायला असमर्थ असल्याने मी लवंगी फटाकडे, तारकाड्या, टिकलींच्या डब्या फोडायचो. आमच्यासोबत आण्णाही फटाकडे फोडायचे.
      एकदा आण्णांनी तोटा फोडला. लाकूड धरलेल्या हातातही एक फटाकडा होता.  दुसर्‍या हातातल्या फटाकडयाच्या वातीला विस्तव लावून तो ओट्यावरून आण्णांनी खाली फेकला. पण तोपर्यंत लाकूड धरलेल्या हातातील तोट्याची वात हालचालीत विस्तवाला लागली होती. दुसर्‍या हातातील तोटा आण्णांना न कळत फटकन त्यांच्या हाताच फुटला. धडाम.
      आण्णांच्या हाताला खूप चटका बसला. हात लालभडक होऊन सुजून आला. हातावर पाणी ओतले. मध लावले. पण आग काही कमी होत नव्हती. आण्णांचा हात जसजसा सुजत होता तसतसे आण्णा मला शिव्या द्यायला लागले. या भडव्याचच खूप चालत. फटाकडे आणा, फटाकडे आणा अं. हा फटाकडा आता जर तुझ्या हातात फुटला असता तर काय झालं असतं.? बरं तर बरं तो माझ्या हातात फुटला. फटाकडे मिळाले नाही तर भडवा खोटं खोटं बरळतो. पहाय हा हात मन्हा? फटाकड पाहिजेत नही का तुल? पहाय हा हात मन्हा. जातवान कुठला. आण्णांच्या शिव्या ऐकून ऐकून माझ्याच हातात फटाकडा फुटला की काय असे मला वाटू लागले.
      ह्या गोष्टीला दोनेक वर्ष झाली असतील. वयाने मोठे असलेले लोक भुईनळा हातात लावायचे हे मी पहायचो. ते पाहून मी ही एक भुईनळा हातात लावायचं ठरवलं. ते लोक इतकमोठा भुईनळा हातात लावतात तर मी हा छोटासा भुईनळा हातात लावला तर काय होईल, असे वाटून मी हातात भुईनळा लावला. त्यातून थोड्याश्या आगीच्या चिंग्या उडाल्या आणि तो माझ्या हातातच फटकन फटाकड्यासारखा फुटला. हाताला आधी प्रचंड झिनझिन्या आल्या आणि नंतर हाताची खूप आग होऊ लागली. हात थोड्या वेळातच भप्प सुजून आला. सगळा हात पांढर्‍या दारूचा पांढराफटक पडला होता. बरं तर बरं तो डावा हात होता. नाहीतर आता काही दिवस शाळेत लिहिण्याचे जमलेच नसते. मी आण्णांना कळू दिलं नाही. वडिलांना माहीत झाल असत तर खूप शिव्या दिल्या असत्या त्यांनी. हातावर घरच्याघरी उपचार करून घेतले. आणि फटाकडे फोडण्याची तेव्हापासून कानाला खडी लावली.
      कळायला लागलं तसं फटाकड्यांबद्दल बर्‍याच वाईट गोष्टी कळायला लागल्या म्हणून मी आता फटाकडे फोडण्याच बंद करून टाकल. चटका बसला म्हणून नाही तर एक तत्व म्हणून मी आता फटाकडे फोडत नाही. फटाकड्यांच्या कारखान्यात बालकामगारांकडून चोरूनलपून काम करून घेतल जात. कमी पैशात काम होतं म्हणून बालकामगार ठेवले जातात. फटाकड्याच्या दारूमुळे बालकामगारांचे आयुष्य बरबाद होत. फटाकडे फोडणं म्हणजे बालकामगार राबवायला उत्तेजन देणं. दरवर्षी फटाकड्यांमुळे कोणाचे डोळे जातात तर कोणी होरपळून मरतं. कोणी जखमी होतं. कुठे आगी लागतात. फटाकड्यांच्या आवाजामुळे ध्वनी प्रदुषण होतं. दारूमुळे हवेचेही प्रदुषण होत. बाजारात विकले जाणारे फटाकडे अनेक अवैध कारखान्यातून येत असतात.
      मी लहानपणी दिवाळी खूप साजरी केलेली आहे. भरपूर फटाके फोडून घेतले आहेत. भरपूर म्हणजे बालमनाला जितके पुरेसे वाटतात तितके. स्वस्तातले. परवडणारे. बारीक बारीक फटाकडे. पण खूश होऊन जायचो.
      नोकरीला लागलो तेव्हा दिवाळीला फक्‍त एक दिवस सुट्टी असायची. नोकरी आवश्यक सेवेतील म्हणून दिवाळीच्या दिवशी बळजबरी ओव्हरटाईम करावा लागायचा. तालुक्याच्या गावालाच पोस्टींग म्हणून सुट्टी मिळायची नाही. लांबच्या लोकांना दिवाळीला सुट्टी मिळायची. आम्हाला ओव्हरटाईम करावा लागायचा. ओव्हरटाईम म्हणजे आठ तास ड्युटीसाठी एकशे साठ रूपये मिळायचे. त्यातल्यात्यात समाधानाची गोष्ट एकच की, ड्युटी शिप्टवाईज असल्याने अडजेस्टमेंट करता यायची. दिवाळीच्या दिवशी मी नाईट अथवा दुपारची ड्युटी लावून घ्यायचो आणि दिवाळीला सटाण्याहून विरगावला जायचो.  घरी सर्व कुटुंब आलेले असायचे. कुटुंबात रहायला मिळायचे. मित्रांबरोबर प्रत्येकाच्या घरी फराळाचे खायचे. आम्ही गावात वाचनालय स्थापन केलेले असल्याने आणि दिवाळीला सर्वच मित्र गावात आलेले असतात म्हणून दिवाळीच्या दिवशीच आम्ही वार्षिक मिटींग घ्यायचो.
       दिवाळीच्या दिवशी एवढे सर्व जगता जगता वेळ कुठे निघून जात होता कळत नव्हत. दुपारी मला लगेच सटाण्याला जावे लागे. ड्युटी असायची. ह्या थोड्या वेळेचाही मी जास्तीत जास्त सदुपयोग करून घेत असे. मला दुपारी ड्युटीला जायचे म्हणून मित्रही आपले कार्यक्रम पुढे ढकलून जास्तीत जास्त वेळ माझ्याबरोबर रहात. माझ्या जाण्याच्या वेळी सर्व जण एस टी स्टँडपर्यंत मला सोडवायला येत असत. मी गाडीत बसून सटाण्याला यायला निघालो की ते परत गावात जात. हवेवर स्वार होऊनच माझी दिवाळी आनंदात जात होती. आणि एवढा एवढा वेळ दिवाळीसाठी देऊनही मी तुडुंब आनंदांने -मनाने ड्युटीवर येत असे.
      पुढे आम्हा ऐकेक मित्राचे लग्न होऊ लागले. माझेही झाले. आता आम्ही सर्वच मित्र विवाहित. पैकी तिघांना नोकर्‍या नाहीत पण वय तरूण झाल्याने नैसर्गिक नियमानुसार नोकरी नसली तरी छोकरी सगळ्यांनीच मिळवली आहे.
      दरम्यान टेलिफोन काँप्युटराइज्ड झाल्यामुळे मानवी आवश्यकता कमी झाली. यामुळे ओव्हरटाइम बंद झाला. दिवाळीला दिवसभर सुटीही आता सहज मिळू शकते. दिवसभर मित्रांबरोबर विरगावला राहू असा बेत आखून मी एका दिवाळीला विरगावला गेलो. ऐकेक मित्राच्या घरी जावून त्यांना शोधू लागलो. पण कोणीही घरी आलेलनव्हत. दिलीप आणि त्याच्या भावांची जमीन वाटणी झाल्यामुळे तो यावेळी घरी आलेलाच नव्हता. विरगावला गलोत तर रहायचे कोणाकडे अशी त्याची अवस्था होणार होती. भास्करचेही तेच. रमेश पुण्याला स्थायिक झालेला. प्रभाकर शेतत आणि द्राक्षांच्या बागेत इतका गुंतला की तो म्हणतो, द्राक्षे मार्केटला नेली आणि पैसे हातात आले की तेव्हाच मी दिवाळी साजरी करतो. राजूचे गावातील घर पडल्यामुळे दिवाळीला तो प्रवासात सुट्टी खर्च करतो. राहिला कडू. त्याचे खरे नाव रमेश सोनवणे. त्याच्याकडे गेलो. तो होता. त्याला नोकरी नाही. गावातच शेतकरी सोसाटीच्या सेक्रेटरीचा असिस्टंट म्हणून काम करत असल्याने तो कुठे जाऊही शकत नाही. मी त्याच्याकडे चहा घेतो.
      आम्ही वाचनालय उघडतो. वाचनालयात खूप धुळ, जाळ साचलेले असते. आधी तिथे बसतो. वाचनालयातील आम्ही स्थायी सदस्यांची पाटी वाचत एकेकाची आठवण काढत राहातो. वाचनालयाला आम्ही स्वतंत्र ग्रंथपाल ठेऊ शकत नाही. कारण ग्रंथपालाला पगार देण्यासाठी शासन ग्रट देत नाही. कोणी देणगी देत नाही. कधीकाळी विरगावला कोणाचे तरी वाचनालय होते. ते ग्रँट घेत होते. मग ते कुठे गेले अशी शासनाकडून आम्हाला विचारणा केली जाते. पण ते वाचनालय कागदोपत्री सापडले तरी आम्ही त्यांच्याकडून तसा ठराव घ्यायला अयशस्त्ती ठरलोत.
      दिवाळीचा दिवस सरकत नाही. काळ  पुढे जात नाही. मला दिवाळी साजरी करायला वेळ मिळत नव्हता तेव्हा सर्व जण मोकळे होते व वेळ द्यायला तयार होते. आता मला वेळ आहे तर माझे मित्र पोटापाण्याच्या कामानिमित्त इकडेतिकडे पांगलेत. आता त्यांना एकत्र कसे कुठे करता येईल हा माझ्यापुढे प्रश्न आहे.
             (नुकत्याच प्रकाशित झालेल्या सहज उडत राहिलो या पुस्तकातून साभार. या ब्लॉगचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/