रविवार, २८ फेब्रुवारी, २०१६

जेएनयूतला अराज्यवाद (?)

 - डॉ. सुधीर रा. देवरे

      9 फेब्रुवारी 2016 ला दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात घडलेल्या घटनेची चित्रफित मी 10 फेब्रुवारीला पाहिली! विद्यार्थ्यांच्या देशाविरूध्द जोशातल्या घोषणा ऐकून खूप अस्वस्थ झालो. दुसर्‍ंया दिवशी विद्यार्थ्यांच्या बाजूने आलेल्या प्रतिक्रिया वाचल्या- ऐकल्यात तर अजून चक्रावलो. हा काय प्रकार आहे? काय लिहावे. लिहू का नको वाटले. पण आत खदखदत राहिलो. 10 फेब्रुवारीला दाखवली गेलेली चित्रफित खोटी होती म्हणे. म्हणून सुधारीत 11 फेब्रुवारीला प्रसारीत केलेली चित्रफित पाहिली. घोषणांचा आशय तोच होता. जेएनयूतले काही विद्यार्थी बदलले तरी घोषणा भडकाऊ होत्याच. या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ कोलकत्त्यातील जाधवपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी पुन्हा तेच केले. रस्त्यावर उतरून जेएनयूतल्याच आक्षेपार्ह घोषणा दिल्या.
            भारत सरकार म्हणजेच भारत देश समजतात की काय असे लोक? भारत सरकार आणि भारत देश यांच्यात फरक करता आला पाहिजे! (सरकार पाच वर्षांत बदलत असतं. शासन स्थिर असतं. आपण सरकार आणि शासनाच्या चुकीच्या धोरणांविरूध्द लढू शकतो. भ्रष्ट व्यवस्थेविरूध्दही लढू शकतो. लोकशाहीने आणि भारताच्या संविधानाने दिलेला तो आपला हक्क आहे. पण देशाविरूध्द लढणे माझ्या आकलनापलिकडे आहे!)  केंद्रात अन्य इतर पक्षाचे सरकार असतानाच्या काळात या विद्यापीठात अशा प्रकारचे आक्षेपार्ह कार्यक्रम याआधीही घेण्यात आले आहेत, म्हणून हे अधिक चिंताजनक ठरते. केंद्रात कोणतेही सरकार असो, दहशतवादी वा नक्षलवादी विचारसरणीचा प्रचार आपण कसा सहन करावा? समजा भारतात नव्हे तर उदाहरण म्हणून अमेरिकेच्या काही नागरिकांनी अमेरिकेत अमेरिकेविरूध्द अशा दहशतवादाला प्रोत्साहन देणार्‍या घोषणा दिल्या तरी भारतीय असूनही आपल्याला ती पटणार नाहीत, इतकी ही गोष्ट आक्षेपार्ह आहे. आपल्या खिशातून जो कर जातो त्या करातून हे विद्यार्थी शिकतात. या विद्यापीठातील एका विद्यार्थ्यामागे एका वर्षाला तीन लाख रूपये शासन म्हणजे आपण खर्च करतो. त्यांनी भारताचे तुकडे करण्याची भाषा करावी, हे मी (पुरोगामी असलो तरी) समजू शकत नाही. दहशतवाद्यांचे काम किती सोपे होत आहे पहा.   
      एखाद्या देशात जन्माला येऊन वा एखाद्या देशाचे नागरिकत्व असूनही त्याच देशाच्या बरबादीसाठी स्वत:ला झोकून देत लोकांच प्रबोधन करण याला विशिष्ट बौध्दीक पातळीवर लोकशाहीतील अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणण समजा घटकाभर मान्य केल तरी अशा लोकांनी त्या देशाच्या नागरिकांच्या करातून शैक्षणिक वा अन्य सवलती मिळवण हे त्यांच्या नैतिकतेत बसू शकत का? हा प्रश्न उपस्थित होतो. अशा सवलती त्यांनी प्रथम नाकारायला हव्यात.
            एका विद्यार्थ्याला अटक झाली त्याच वेळी सर्व आरोपींना अटक व्हायला हवी होती. एकाला अटक करून बाकिच्या आरोपी गुन्हेगारांना भूमिगत व्हायला पुरेसा वेळ मिळाल्यान हे प्रकरण जास्त चिघळत गेल. आरोपी गुन्हेगार विद्यार्थी नेमके कोणते ते शोधून त्या सर्वांना पोलिसांनी उशीरा का होईना एकाच वेळी ताब्यात घ्यायला हव होत. अटक केलेल्या विद्यार्थ्याचे अपील वाचल होत. त्या अपिलाची गोळाबेरीज एका वाक्यात अशी सांगता येईल: माझा भारताच्या संविधानावर आणि एकात्मतेवर विश्वास आहे! ...दुसर्‍या दिवशी त्याने सांगितलं की ते अपिल पोलिसांनी त्याच्याकडून दबावानं लिहून घेतलं. याचा अर्थ त्या विद्यार्थ्याचा भारताच्या संविधानावर विश्वास नाही असा होऊ शकतो का?
     जेएनयूतील घटनेने एक गोष्ट लक्षात आली: कोणत्याही राजकीय नेत्याला वा पक्षाला देशाच्या एकात्मतेशी काही घेणं देणं नाही. येत्या निवडणूकांसाठी आपली वोटबँक कशी वाढेल या भूमिकेची जो तो काळजी घेताना दिसतो. ज्या देशावर वा देशातल्या प्रांतांवर हे राजकीय पक्ष राज्य करणार आहेत, त्याच देशाच्या बरबादीचा प्रचार करणार्‍या मुठभर लोकांना काही राजकीय पक्ष कुरवाळतात. हे बेरजेचं राजकारण नसून संधीसाधूपणा आहे. रस्ता चुकलेल्या लोकांच्या जातीधर्माचे सर्व लोक आपल्याला मतदान करतील अशी खोटी व संकुचित विचारसरणी या मागे दिसते. अशा फुटीरतावादी लोकांच्या पाठिंब्याने निवडून आलेले सत्ताधारी देशाला कसं वाचवू शकतील? पण अशा मुठभर फुटीरतावादी लोकांमागे त्या त्या जाती धर्माचे लोक उभे नसतात हे अशा राजकारण्यांनी लवकर समजून घेतलेलं बरं.
      संसद हल्यानंतर अफजल गुरूची मुलाखत ऐकली होती. जेएनयू घटनेनंतर पुन्हा दुसर्‍यांदा ऐकली. त्या मुलाखतीतून त्याच्या गुन्ह्याची त्याने कबूली देत असं स्वत: स्पष्ट केलं आहे: पाकिस्तानातील गाझीबाबा व जैशच्या तो संपर्कात आल्याने त्याच्या आहारी गेला होता. त्याच्या आदराखातर पाकिस्तानात जाऊन दहशतवादी ट्रेनिंग घेऊन भारतात आला. गाझीबाबा सांगेल ते करण्याची त्याची तयारी होती कारण त्याला पैशांची आवश्यकता होती. पैशांसाठी त्याने संसदेवर हल्ला करण्याच्या कटाला पूर्णत्व ‍दिलं. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या प्रतिकावर हा हल्ला होता. (संसदेत घुसून सर्व खासदारांना ठार मारणं- मग ते कोणत्याही पक्षाचे असोत- असा हा कट होता, असं अफजल गुरू म्हणाला. त्या हल्ल्यातून आपल्या जवानांचे बळी देऊन वाचलेले खासदार आज वाट चुकलेल्या विद्यार्थ्यांचे समर्थन करीत आहेत. याला काव्यगत न्याय म्हणावा का अजून काही?)
      काश्मिर भारतात कसं वि‍लीन झालं, हे अफजलला माहीत नव्हतं. काश्मिरच्या काही भागावर पाकिस्तानने कसा कब्जा मिळवला हे त्याला माहीत नव्हतं. आणि काश्मिर का आझाद करायचं हेही त्याला माहीत नव्हतं. काश्मिरबाबत कसलाही आदर्शवाद त्याच्यापुढे नव्हता की कुठलं विशिष्ट तत्वज्ञानही नव्हतं. सारांश, अफजल गुरू हा पैशांसाठी विकला गेलेला एक धंदेवाईक- वाट चुकलेला फक्‍त दहशतवादी होता. (याउलट अफजलगुरूचा मुलगा उच्च शिक्षण घेऊन देशासाठी काही करू इच्‍छितो, हे ऐकून बरं वाटलं.)
      या पार्श्वभूमीवर अशा फालतू आदर्शहीन व कोणताही बौध्दीक पाया नसलेल्या दहशतवादी अफजल गुरूच्या व मकबूल भट्टच्या समर्थनार्थ, जेएनयूतील स्कॉलर- संशोधक (?) विद्यार्थी भारताच्या नागरिकांच्या पैशाने शिकत, जर आपल्याच देशाविरूध्द कट कारस्थानं करत असतील तर ह्या विद्यार्थ्यांना कोणती विशेषणं लावावीत, मला सुचत नाही. हे विद्यार्थी खरंच अभ्यासू असतील, उदारमतवादी असतील आणि ‍वैश्विक दृष्टीकोनातून त्यांना दहशतवाद्यांची भूमिका योग्य वाटत असेल तर त्यांनी तसा अभ्यासपूर्ण प्रबंध लिहून आपल्या संशोधनातून जगासमोर सिध्द केलं पाहिजे. सवंग घोषणा देऊन त्यांचा उदारमतवाद सिध्द होत नाही.
      राज्यशास्त्रात अराज्यवाद नावाची एक संकल्पना आहे. त्यात जगातील काही विचारवंत कोणतीच सत्ता वा देशाची विशिष्ट सीमा मानायला तयार नसतात. जगाचे स्वतंत्र नागरिक म्हणून आपले स्वातंत्र्य अबाधित का असू नये असं त्यांचं म्हणणं असतं. या विद्यार्थ्यांच्या डोक्यात अशी काही संकल्पना असण्याची सुतराम शक्यता दिसत नाही. कारण असे विचारवंत वा बुध्दीवान लोक एका फालतू विकाऊ बिनबुडाच्या दहशतवाद्याच्या समर्थनार्थ कधीही घोषणा देणार नाहीत आणि आपल्या स्वत:च्याच काय अन्य कोणत्याही राष्ट्राच्या बरबादीसाठी घोषणा देत रस्त्यावर उतरणार नाहीत. म्हणूनच वेगवेगळ्या पध्दतीने पुरोगामी विचार करून, स्वत:ला वैश्विक नागरिक समजूनही मला अशा (वाट चुकलेल्या) विद्यार्थ्यांच्या बाजूने अवाक्षरही बोलता येणार नाही. (लेखातील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

रविवार, १४ फेब्रुवारी, २०१६

बोबींलचा वास
                                             
-        डॉ. सुधीर रा. देवरे

      (या वेळी ब्लॉग म्हणून माझी एक कथा देत आहे. रोखठोक2015 च्या दिवाळी अंकात प्रसिध्द झालेली कथा.) 
      निर्मलाबाई आणि सगुणाबाई या तश्या मैत्रिणी नव्हत्या. बालपणापासूनच्या माहितीतल्या- ओळखीतल्या नव्हत्या, म्हणून वर्गमैत्रीणीही नव्हत्या. दोन्हीही नोकरी करीत नसल्यामुळे कार्यालयातील सहकारी नव्हत्या. निर्मलाबाई आणि सगुणाबाई या दोन्ही आर्थिकदृष्य्या विचार करता वेगवेगळ्या वर्गातल्या होत्या. जातीवरून लिहिणं बरोबर होणार नाही म्हणून येथे आर्थिक वर्गाविषयी लिहावं लागलं हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आल्यावाचून राहणार नाहीच म्हणा. खरं तर जातीवरून लिहायला सुध्दा हरकत नव्हती. कारण खाणे, पिणे सर्वांसोबत आता आपण स्वीकारले असले तरी बेटा-बेटी व्यवहार आपण बंदच ठेवला आहे. शासकीय पातळीवरून शिष्यवृत्त्या, राखीव जागा जातीवरूनच ठरवल्या जातात. जातीचा दाखला वगैरे तर कायदेशीर गोष्टी आहेत. वगैरे वगैरे आपल्या सगळ्यांना माहीत आहे.
      निर्मलाबाई या बाई आर्थिक स्थितीने चांगल्या वगैरे म्हणता येतील अशा घराण्यातल्या की जिथे खानदाणीपणा मिरवण्याइतपत आत्मविश्वास सहज असू शकतो. उलट सगुणाबाईची आर्थिक स्थिती हलाकीची आणि अभिमानाने मिरवता येईल असे परंपरेने काहीही न दिलेल्या घराण्यातील जन्म आणि साहजिक लग्न होऊनही ती अशाच घराण्यात आलेली. घरात दारिद्य्र तर दारिद्य्र पण एखाद्या होऊन गेलेल्या कर्तृत्ववान महापुरूषाचा फोटो घराच्या ओसरीत दिमाखात लावता येईल अशीही पार्श्वभूमी नव्हती तिची. या कथेचा निवेदक सुध्दा बेधडकपणे सगुणाबाईचा उल्लेख एकेरी संबोधनाने करतोय तर निर्मलाबाईंना अहो जाहो म्हणतोय, याचे कारणही आपल्या सामाजिक मानसिकतेची ठेवण हेच असले पाहिजे.
       निर्मलाबाई गावाशेजारच्या नवीन बंगला वसाहतीत राहतात तर सगुणाबाई गावातील दाट वस्तीत जुन्या घरात राहतात. अशा भिन्न स्तरी या महिला असूनही दोघींची एकदा अपघाताने भाजीबाजारात गाठ पडली. भाजी घेण्याच्या बहाण्याने तोंडओळख झाली. देह बोलीतून बोलणे झाले. पुन्हा दुसर्‍यांदा किराणा दुकानात भेट झाली तेव्हा चेहर्‍यावरील स्मितासोबत थोडंफार बोलणंही झालं. तिसर्‍या भेटीत बोलणं थोडं लांबलं. बाजारातून परतताना विशिष्ट टप्यापर्यंत एकाच रस्त्याने यावे लागत असल्यामुळे दोघींची घसट वाढली. गप्पा टप्पा घसटीत ओळख आणि ओळखीची हलकीफुलकी मैत्री केव्हा होत गेली ते दोघींनाही कळले नाही.
       निर्मलाबाई सगुणाबाईंशी मराठीत बोलायच्या तर सगुणाबाई निर्मलाबाईशी अहिरानी. दोघींनाही दोघींच्या भाषेचा संवादात, मने जुळण्यात व्यत्यय येत नव्हता. अगदी सुरळीतपणे त्यांचे संभाषण व्हायचे.
       एके दिवशी निर्मलाबाईंनी सगुणाबाईला त्यांच्या घरी सत्संगला बोलवलं,
      आमच्याकडे संत्सग असतो दर गुरूवारी. तुम्ही सत्संगाला या बरका गुरूवारी घरी. सगुणाबाईने कपाळावर आढ्या पाडत निर्मलाबाईला विचारलं, हायी काय र्‍हा?
      देवाची प्रार्थना असते. भजन असतं ना तसं.
      पन आम्ही ते माय वशिट खातंस. देवले कशे काय चालई?
      तसं काही नाही ओ बाई, आमच्या पंथात तसं काही नाही. आमच्या पंथाचे दादा नेहमी म्हणतात, अन्न हे ज्या त्या प्रदेशात ठरून गेलेलं आहे, म्हणून खाण्यापिण्यावरून आपण भेद पाळायचा नाही. कोकण माहितेय ना तुम्हाला? निर्मलाबाईने सगुणाबाईला विचारलं.
      नही बय.
      समुद्राच्या काठावर जे लोक राहतात त्यांना कोकणी म्हणतात आणि त्या भागाला कोकण म्हणतात.
      आशे का ? तठे काय जयं?
      तिथले लोक रोज भात नि मासे खातात. त्यांचं ते अन्नच आहे. तिथले ब्राम्हण सुध्दा हेच खातात.         
      आशे काय! मायवं, हायी ते मी आज नवीनच आयकी र्‍हायनू.
      म्हणून तुम्हाला सांगते, मनातला संकोच काढून टाका नि सत्संगाला या.
      बरं इसू बरका बाई. आता तुम्ही सांगतीसच ते इसू.
       निर्मलाबाईने सगुणाबाईला आपलं घर दाखवलं. निर्मलाबाई सगुणाबाईकडे सत्संगाला गेल्या. सत्संग करणं बरं वाटलं म्हणून निर्मलाबाईच्या आग्रहावरून दर गुरूवारी त्या सत्संगाला जाऊ लागल्या. भजन म्हणताना टाळ्या वाजवू लागल्या. कोणी काही सांगायला लागलं तर कान देऊन ऐकू लागल्या. सत्संगाला येणार्‍या बायांकडे निर्मलाबाईंबरोबर त्या येऊ जाऊ लागल्या.  एके दिवशी निर्मलाबाईलाही सगुणाबाईने आपल्या पडक्या घरी आणलं. घर दाखवलं. सगुणाबाई सत्संगात रमून गेल्या. दिवसा कष्टाची कामं. आठवड्यातून एक रात्री सत्संग. रोजच्या चाकरीला कंटाळून थोडा वेगळेपणा म्हणून सगुणाबाईला सत्संगपणा मानवून गेला.     
       पुढे अशाच एका संध्याकाळी सत्संगचे निमंत्रण देण्यासाठी निर्मलाबाई सगुणाबाईच्या दारात आल्या. त्याच वेळी सगुणाबाईने चुल्हीवर बोंबीलच्या भाजीला फोडणी दिली. निर्मलाबाईंनी त्या घरात पाय ठेवताच बोंबीलच्या उग्र वासाने त्या हैराण झाल्या आणि नाकाला पदर लावून किती घाण वास ग बाई! कसे खात असतील हे लोक! असे ओरडतच बाहेर पळाल्या.
       सगुणाबाई निर्मलाबाईंना या आत या ना असे म्हणणारच होत्या. तेव्हढ्यात निर्मलाबाईंचे ते धारदार शब्द, नाकाला पदर लावून बाहेर पळणं हे सगुणाबाईने ऐकल, पाहिल. सगुणाबाई निर्मलाबाईचे हे नवे रूप पाहून जागीच गारठून गेल्या. त्या आपले चूल सोडून निर्मलाबाईच्या मागे बाहेर गेल्या नाहीत. सगुणाबाई बाहेर येत नाहीत, हे पाहून निर्मलाबाई बाहेरूनच नाकाला पदर लावून, मी येतेय हो, उद्या या सत्संगला  म्हणत तश्याच बाहेरच्या बाहेर निघून गेल्या.
       आपल्या बोंबीलच्या भाजीचा वास निर्मलाबाईंना मानवला नाही. आपण इतकी वाईट भाजी कशी खातो असे त्या मनातल्यामनात घोकू लागल्या. मनातल्या मनात कुढू लागल्या. त्यांनी त्या दिवशी घरात सर्वांना- पोरासोरांना वाढले, जेऊ घातले पण त्यांना स्वत:ला जेवण गेले नाही. एक घासही त्या खाऊ शकल्या नाहीत. बोंबील वाईट. त्याचा वास वाईट. मग आपण खातो कसे? आपण बोंबील खातो त्याअर्थी ती खाण्याची जिन्नस आहे. निर्मलाबाईंना बोंबील आवडत नसतील. तिच्या घरात बोंबील आणले जात नसतील. तरीही तिने माझ्या घरात माझ्या खाण्याबद्दलची नापसंती व्यक्‍त करणे योग्य होते का? तिला तो अधिकार कोणी दिला? मग आपल्याला किळस येईल अशी ती का वागली? सगुणाबाई मनातल्या मनात अहिरानी भाषेत कुढत होत्या. सगुणाबाईने निर्मलाबाईचे वागणे मनाला लावून घेतले.
       त्या दिवसापासून निर्मलाबाई घरात बोंबीलची भाजी कोणी मागतं म्हणून ती करून सगळ्यांना वाढायची. पण स्वत: खायची नाही. सत्संगला जाणे आणि निर्मलाबाईंना भेटणेही तिने सोडून दिले. निर्मलाबाईशी गाठ-भेट होणार नाही अशा वेगळ्या वाटेने ती बाजाराला जाऊ लागली. निर्मलाबाई दुरून येताना दिसल्या की सगुणाबाई रस्ता बदलून घ्यायची.
       र्‍याच आठवड्यांनंतर एका संध्याकाळी निर्मलाबाई सगुणाबाईच्या घरी आल्या. त्यांच्या सोबत अजून एक बाई होती. आल्या आल्या निर्मलाबाई सगुणाबाईशी एकतर्फी बोलायला लागल्या, काहो, सत्संगाला काबरं येत नाहीत कधीच्या?
       सगुणाबाईने निर्मलाबाईंना या म्हटले नाही की बसा म्हटले नाही. मग निर्मलाबाईच पुढे बोलू लागल्या, म्हटलं तुम्ही बाजारात तरी भेटाल. पण तुम्ही आता बाजारात पण भेटत नाहीत. रस्त्यानेही दिसत नाहीत. कुठं गावाबिवाला गेल्या होत्या की काय?
      नही, मी आठेच व्हतू. पन यानं मोर्‍हे मी सत्संगले काय येनार नही बाई आनि तुमीबी मना घर येत जाऊ नका आता.
      काय ओ काय झालं?
      तुम्ही सांगं व्हतं, सत्संगमा वशिट चालंस. कुठला तरी लोकं रोज भात आनि मासा खातंस म्हने, तरी सत्संग करतंस.
      हो ते बरोबर आहे.
      मंग मन्हा घरमा मी बोंबीलनी भाजी कयी ते तुम्ही नाकले पदर लाई बाहेर पळी गयात, हाई शोबनं का तुमले? आशे तुमना वागावरथीन माले काय वाटनं व्हई याना तरी इचार कया का तुम्ही तैन? तैन्हपशी मन्ही आनपानीवरतीन वासनाच उडी गयी ना.
      बरं बाई माझं चुकलं. जाऊ द्या. झालं गेलं गंगेला मिळालं.
      कसाले जाऊद्या नि बिऊद्या. यान्ह मोर्‍हे मी तुमनाकडे येनार नही आनि तुमीबी मन्हाकडे इऊ नका. बस.
       निर्मलाबाईला काय बोलावे ते सुचेना. पण सगुणाबाई मागच्या दारी निघून गेल्यामुळे नाईलाजाने तिच्या घरातून त्यांना काढता पाय घ्यावा लागला.
       अर्थात खाण्यापिण्याच्याच बाबतीतलेच फक्‍त निर्मलाबाईंचे विचार असे गचाळ आहेत असे नाही. त्यांच्या प्रत्येक बाबतीतल्या विचारात कावीळ आहे. कोणाचे व्यंग, कोणाची गरीबी, कोणाचे नुकसान हे त्यांच्या लेखी त्यांच्या पुर्वजन्माच्या पापांचे फळ असते, असे त्या आपल्या सत्संगाच्या घोळक्यातही सांगतात. आणि सगुणाबाईसारख्या महिलांना सत्संगात आणून त्या त्यांचे पापक्षालन करण्याचे पुण्य करीत आहेत असा त्यांचा दृढ विश्वास आहे. सगुणाबाईंच्या बोंबलांच्या वासासारखा जर निर्मलाबाईंच्या विचारांचा उग्र दर्प आला असता तर त्यांच्या वार्‍यालाही कोणी उभं राहिलं नसतं.
       निर्मलाबाई कधीच्या सत्संग करत असतील ते त्यांनाच माहीत, पण सत्संगचा पहिला जमिनीवरचा वास्तव धडा आत्ता कुठे जगण्यात त्यांच्या समोर येऊन ठाकला. आतापर्यंत सत्संगात बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी होती. अर्थात कथेतील हे चिंतन या कथेच्या निवेदकाचे आहे. निर्मलाबाईचे नव्हे. निर्मलाबाईने नेहमीप्रमाणेच हेही डोक्यात जाऊ दिले नाही. या कानातून ऐकलेले त्या कानातून आल्हाद बाहेर जाऊ दिले. कारण असे काही बाही डोक्यात जाऊ दिले तर आपले सत्संगातील ध्यान विचलीत होईल अशी त्यांना भीती वाटते. म्हणून त्या कुठेतरी या अनंत पोकळीतील शून्यात बसलेल्या देवाला सत्संगातून खूष करत आपल्याच कोषात पुन्हा रममाण झाल्या...

-         डॉ. सुधीर रा. देवरे
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/