गुरुवार, १ जून, २०२३

‘माणसं’ : रिपोर्ताज शैलीतले वास्तव लिखाण

 

 

- डॉ. सुधीर रा. देवरे

                     प्रत्येक मनुष्य आपल्या सुखदुःखाचे आपल्या पुरतेच एक कुंपण करून असतो. या कुंपणापलीकडे त्याला काहीही दिसत नाही. एखाद्या बहिष्कृताचे जीवन पाहून रूटीनला सरावलेला मनुष्य कधी विरघळत नाही. बहिष्कृताकडे बघताना एखाद्या वस्तूकडे बघितल्यासारखी त्याची निर्विकार प्रतिक्रिया असते. ‘‘या लोकांना तशा कामाची आणि तसे राहण्याची सवय असते!’’ असे म्हणून तो नेहमी आपली जबाबदारी अंगावरून झटकत असतो.

                    अनिल अवचटांनी अशा बहिष्कृतांविषयी सखोल अभ्यास करून माणसं पुस्तकात त्यांच्याविषयी विस्तृतपणे माहिती करून दिली आहे. (साहित्य चार भिंतींच्या आत लिहून प्रकाशित झाल्यावर सर्वदूर वाचले जाते, अशा पध्दतीने हे पुस्तक घरात बसून लिहिले गेले नाही. हे भटकणाऱ्यांच्या जीवनावरील पुस्तक, त्यांच्यासोबत भटकूनच गोळा केलेल्या वस्तुस्थितीवर लिहून, वाचकांना चार भिंतीच्या आत वाचायला अवचटांनी उपलब्ध करून दिले आहे.)

                    कृपया हा लेख वाचताना माणसं पुस्तकाची भलावण, परीक्षण किंवा समीक्षा समजून वाचकांनी वाचू नये. हा लेख लिहिण्याचं प्रयोजन इतकंच : आपल्या आजूबाजूची माणसंवाचण्यासाठी (वाचवण्यासाठीही) संवेदनाशील वाचकांना- माणसांना उद्युक्त करण्याचा प्रयत्न.

                    या पुस्तकातील पहिला लेख : माणसं’. यात उस्मानाबाद जिल्ह्यातून पुण्याला येणाऱ्या दुष्काळग्रस्तांचे यथार्थ चित्रण प्रथम वाचायला मिळते. हे दुष्काळग्रस्त त्यांच्या आर्थिक फाटक्या परिस्थितीसह मानसिक दृष्ट्याही आतून खचलेले असल्याने त्यांचे अतोनात हाल होत असतात. त्यातूनच ते कुठेतरी आश्रय मिळवून, ते झोपडपट्टीतले एक रहिवासी होऊन जातात. कोणतेही आणि कुठलेही काम अल्प मोबदल्यात करायला तयार असूनही असे हलक्यातले हलके काम मिळण्यासाठीसुध्दा त्यांना करावी लागणारी यातायात! असे ह्या माणसांचे पशूवत जगणे अवचट टिपत- रेखाटत राहतात.

                    कोण माणसं... कोण जनावरं! या लेखात पुण्यातल्या विविध क्षेत्रातल्या हमालांचे चित्रण केले आहे. गुळातले हमाल, मिरचीतले हमाल, बारदानातले हमाल, धान्यातले हमाल, सिमेंटातले हमाल, चुन्यातले हमाल, खतातले हमाल, फरशीतले हमाल इत्यादी हमालांच्या कामाचे विस्तृत चित्रण यात आहे. गुळातल्या हमालांच्या हातांना गुळामुळे घट्टे पडतात, मिरचीतल्या हमालांच्या तळपायातल्या भेगात मिरची अडकून बसते आणि त्यामुळे सतत होणारी तळपायांची जीवघेणी आग, मिरच्यांमुळे सतत येणारा ठसका आणि ठसक्यामुळे कायमचा खराब होणारा घसा, सिमेंटातल्या हमालांना होणारा खाकरा’. घामात सिमेंट विरघळून छीलली जाणारी त्यांची कातडी. मात्र ह्या हमालांना होणाऱ्या त्रासाला आणि त्यातून उद्‍भवणाऱ्या रोगांसाठी कोणताही मालक जबाबदार राहत नाही. कामाच्या जागेवर त्यांच्यासाठी कोणत्याही सोयी-सुविधा नसतात. फरशीतल्या हमालांना तर काही वेळा त्यांच्या शरीराच्या एखाद्या अवयवालाच पारखं व्हावं लागतं. यासाठी आरोग्य व्यवस्था नाही. आरोग्यासाठी- यातून उद्‍भवणाऱ्या आजारांसाठी वा जखमांसाठी मेडिकल व्यवस्था नाही. प्राथमिक इलाजाचीही सोय नाही. इलाज करायचा झाला तर कामावर न जाता स्वखर्चाने इलाज करून घ्यावा लागतो. पण तसे कोणी हमाल करत नाही. त्याचे आयुष्य तो अल्पमोबदल्यात डावावर लावत राहतो. इलाजासाठी सुट्टी घेतली तर खाडे दिवस पडतात.

                    ...आणि ह्या लोकांना इतके काम करून रात्री विश्रांतीही पुरेशी मिळत नाही. कारण रहाण्याचेही प्रश्न सतत भेडसावत असतात. त्यांच्या जीवनातली असुरक्षितता वस्त्या माणसांच्यामध्ये झोपडपट्टी म्हणजे असुरक्षितता (पृ. ६५) असे परिणामकारक वाक्य टाकून अवचट वाचकांना अंतर्मुख व अस्वस्थ करून सोडतात. या लेखात पुण्या- मुंबईतील वाढती झोपडपट्टी, जीवन जगण्यासाठी केले जाणारे हिन व्यवसाय, हमालांना करावा लागणारा बाह्यांखेरीज आंतरिक संघर्ष, दादा लोकांचे प्राबल्य, झोपडपट्टींची वर्गवारी, शासकीय जीवघेणी निष्क्रियता, झोपडपट्टीत सतत वाढत जाणारी रोगराई, त्यात बळी जाणाऱ्यांचे प्रसंग आणि या सगळ्यांवर अवचटांनी सुचवलेले उपाय, यामुळे हा लेख सर्वांग परिपूर्ण झाला आहे.

                    भटक्या विमुक्त लोकांचे वर्णन अनिकेत प्रकरणात केले आहे. यात वैदू, कैकाडी, वडार बंजारा, जोशी, गोंधळी, चित्रकथी, डवरी, वासुदेव, गोसावी, जोगी, मदारी (सापवाले, जादूवाले), नंदीवाले, डोंबारी, कोल्हाटी, कंजारभाट, मारवाडी, कुंभार, फासेपारधी इत्यादींचे जीवन कथन केले आहे.

                    भटक्या जातींमध्ये रानटी पारंपरिक रूढी- परंपरा असून समाजात दखलपात्र समजले जाणारे गुन्हेही परस्पर आपापल्या जात पंचायतद्वारे दंड- शिक्षा वगैरे करून मिटवले जातात. या पंचायतीतही आपपर पाहून अन्याय केला जातो.

                    भटके- विमुक्त लोक जगण्यासाठी सतत भटकत असल्याने नैसर्गिक आपत्तींना त्यांना  वेळोवेळी तोंड द्यावे लागते. तसेच काही वेळा एखाद्या मुक्कामी स्थानिक लोक त्यांच्यावर चोरीचा आरोप करून, शारीरिक इजा करत- मारहाण करत त्यांचे हाल करतात. त्यांच्यातले काही लोक कदाचित गुन्हेगार असतीलही- म्हणजे छोटीमोठी उचलेगिरी करत असतीलही, पण गुन्ह्याची शहानिशा न करता अपराधी नसलेल्यांचाही पोलिसांकडून अतिरेकी छळ केला जातो. दोन हवालदारांनी मला धरलं आणि उलटं केलं. साहेबानं माझ्या गांडीत हा भला मोठा दांडूच घातला. (पृ. १४१) हे एका फासेपारधी बाईचे वाक्य, समाज बांधिलकी मानणाऱ्या कोणत्याही सुज्ञ नागरिकाला चीड आणणार नाही, तरच आश्चर्य!

                    भटक्यांपैकी वैदु जातीत मुलीला हुंडा देण्याची प्रथा आहे. जास्त हुंडा देईल त्याला मुलगी दिली जाते. मग तो म्हातारा का असेना! या विषयी अवचट एका वैदूला विचारणा करतात, तर त्याचं उत्तर असतं :

          गाढवाला गिऱ्हाईक आलं तर ते म्हातारं की तरणं आहे हे आपण बघतो का? जो भाव देईल त्याच्याशी आपण व्यवहार करतो.’ (पृ. १०६) ही या अडाणी राहून गेलेल्या लोकांची वैचारिक पातळी. गाढवाशी केवळ  माणसाचीच नाही, तर आपल्या पोटची मुलगी सोपवताना, होणाऱ्या जावयाची तुलना गाढव या प्राण्याशी केली जाते!

                    आज भटक्या जमातीतच खरे दलित आहेत. त्यांना मुख्य प्रवाहात सामावून घेणे मानवी समाजाचे पहिले कर्तव्य ठरते. अवचट म्हणतात,

                    महार, मातंग यांना गावगाड्यात, खालचे का होईना स्थान आहे. त्यांच्यावर जुलूम झाला तर तो थोड्याच लोकांना का होईना, पण खूपतो. सरकार तोंड देखली का होईना, पण चौकशीची, कृतीची घोषणा तरी करतं. उलट, भटक्यांचे जग आम्ही समाजाच्या परिघाबाहेरच ठेवलंय. (पृ. १४३ / १४४)

                    या पुस्तकातला शेवटचा लेख : अंधेरनगरी निपाणी’. या लेखात महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवरील निपाणी शहरात विडी कामगार म्हणून काम करणाऱ्या कामगारांचे शारीरिकहालाचे- शोषणाचे वर्णन भयानकपणे समोर येते.

                    कायद्यानुसार कामगारांना तीन महिन्यानंतर कायम कामगार म्हणून सवलती द्याव्यात, असे कायदेशीर नियम आहेत. म्हणून मालक लोक कामगार-रजिष्टर मधील कामगारांची नावे आलटून पालटून बदलत राहतात. कामगार म्हणून तीन महिण्यांपेक्षा जास्त काम केल्याची नोंद या रजिष्टरमध्ये होणार नाही हे पाहिले जाते. म्हणून हे कामगार महिनोंमहिने इथे काम करतात तरीही ते कायमस्वरूपी कामगार होत नाहीत. कंपनी कायदा लागू होऊ नये म्हणून कामगारांना अंगावर घरी काम दिले जाते.

                    कामगार स्त्रियांवर मालकांकडून शारीरिक अत्याचारही केले जातात, लैंगिक शोषण केले जाते; ते अवचटांच्या शब्दशैलीत वाचू, 

‘‘मालकाला चांगल्या स्त्रिया मिळवून देणे हाही चेकरच्या ड्युटीचाच भाग असतो. अशा स्त्रियांना आधी जास्त छाट विडी काढून किंवा विड्यांसाठी तंबाखू कमी देऊन रडवेली करतात. ती स्त्री तक्रार करू लागल्यावर म्हणतात, जा मालकांना जाऊन भेट. मालक कुठे आहे तर वखारीत. न जावे तर काम जाईल, जावे तर तिकडे काय होईल ते सांगता येत नाही, अशा कात्रीत ते सापडतात. काही स्त्रिया अशा कोंडीतून मालकाकडे जाणे पसंत करतात. तिला त्या बदल्यात विडीसाठी जास्त तंबाखू मिळू लागते, तिची छाट विडी निघेनाशी होते. तिच्या या संबंधाची नवऱ्याला किंवा घरच्यांना कल्पना आली असली तरी ते या बाबतीत काही बोलत नाहीत. कारण जास्त काम मिळते ते बंद होईल ही भीती. मालकाने वापरलेल्या स्त्रिया नंतर चेकर लोक वापरतात.’’ (पृ. १६५)

                    माणसं या पुस्तकाच्या नावातच उपरोधिकता आहे. सर्व पुस्तकभर अवचटांनी, या अतिशय पशूतुल्य अवस्थेत जीवन जगणाऱ्या लोकांमध्ये माणूसपण, तर अतिशय ऐषारामात जगणाऱ्या माणसांत पशूपण दाखवण्याचा वास्तविक शैलीतून प्रयत्न केला आहे. उदा.

          ज्यांच्या शरीरातल्या शिरानशिरा आखडल्या आहेत, ज्यांना अतिशय अपुरी मजूरी मिळते, जे गलिच्छ वस्त्यांमध्ये राहतात, जनावरांची जिणे जगतात, ते हमाल त्यांच्यातल्या काम करतांना मेलेल्या हमालांच्या बायकांना मदत देतात. आपसात पैसे जमवून जबाबदारीने तिला भाऊबीज घालतात. कोण माणूस आणि कोण जनावर! (पृ. ४५)

                    अवचटांची लिखाणशैली मिश्र, उपहासात्मक, अलिप्त पण मर्मभेदी आहे. त्यांच्या शैलीची तुलना पटकन अन्य कोणाशी करता येणार नाही असे वाटते. महात्मा फुलेंच्या शैलीत सामाजिक प्रश्नांचा उद्रेक असला तरी तीत आवेश, विद्रोह आणि सल्लावजा उपदेश जाणवतो, (त्यांच्या पातळीवर तो योग्यच आहे.); तर अवचटांची शैली तटस्थ पत्रकारासारखी वस्तुस्थितीचे चित्र डोळ्यापुढे साकार करून उपाय सुचवते. वाचकाला अंतर्मुख करते. म्हणून अवचटांची शैली- अनुभवातल्या अंतरिक प्रेरणेतून आलेली खास त्यांचीच अशी (शैली) वाटते. लालित्याला बाध न येऊ देता रोखठोक वास्तविक मतप्रदर्शन करणारी ही रिपोर्ताज शैली आहे. उदाहरणार्थ :

१.    नदीचे पाणी नाल्यामध्ये आतपर्यंत शिरले होते. नदीकाठच्या वस्त्या, एखाद्या कार्टून फिल्ममध्ये एखाद्या ब्रशच्या फटकाऱ्यासरशी दृश्य जसे पटकन पुसले जाते, तशा पुसल्या गेल्या होत्या. (पृ. ६६)

२.   झोपडपट्टी हा माणसाची जनावरे बनवण्याचा प्रचंड कारखाना आहे. इथे दाखल होणारा किंवा जन्मणारा माणूस हळूहळू या पशुसंस्कृतीचा भाग होऊन जातो. इथे माणसे सांगकामी बैल तरी असतात किंवा हिंस्र पशू तरी असतात किंवा घाणीत राहण्यात आनंद वाटणारी डुकरे तरी असतात. जनावरे कोंडवाड्यात घालतात तसे भट्टीवरून पकडून घेऊन तुरुंगात जाणाऱ्या पंटरच्या आयुष्याला वेगळा काय अर्थ असतो? (पृ. ८९)

३.   एवढेच नव्हे, आपली रक्कम याने वापरली म्हणून पहिल्या नवऱ्याने तक्रार केली असता दुसऱ्याने त्या बाईपासूनच झालेली दोन मुले त्याला व्याजादाखल दिली. (पृ. १०६)

               अवचटांच्या निवेदन शैलीतून त्यांच्यातला द्रष्टा पत्रकारही नेहमी डोकावताना दिसतो :

१.    झोपडपट्टीतल्या लोकांच्या उपजीविकेस महत्व द्यायचे की विमानतळावरून येणाऱ्या परदेशी पाहुण्यांच्या डोळ्यांना होणाऱ्या त्रासाला महत्व द्यायचे यात साधा विवेक केला पाहिजे. (पृ.९२)

२.   रात्री चौकीत जाऊन इन्स्पेक्टरने दिलेला चहा पीत बातमी लिहिणाऱ्या क्राईम रिपोर्टर्सनी... किंवा काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची मर्जी मिळवून पोलिसांचा उदो उदो करणाऱ्या, पोलिसी चातुर्यकथा लिहिणाऱ्या लेखकांनी- डोळे उघडे ठेवून पोलीस कस्टडीत विमुक्तांवर होणाऱ्या अत्याचारांची व छळवादांची प्रकरणे उजेडात आणली पाहिजेत. (पृ. १४७/१४८)

                आता या पुस्तकातील सर्वच लेखांचे समारोप पाहू. समारोप कसे मर्मभेदी आणि परिणामकारक झाले आहेत, हे प्रत्यक्ष अवचटांचे काही समारोप वाक्य वाचून लक्षात येईल :

१.    भारताचे राष्ट्रपती आता स्वच्छ आणि सुंदर रस्त्यांवरून जाऊ शकणार होते! (पृ. २४)

२.   ज्यांच्या शरीरातल्या शिरानशिरा आखडल्या आहेत--------------- कोण माणूस आणि कोण जनावर! (पृ. ४५)

३.   भटक्यांचे जग पाहताना, हिवाळ्यात बर्फ पडते म्हणून स्थलांतर करीत आपल्या उबदार देशात येणाऱ्या रशियन पक्षांची किंवा हिरवळीचा शोध घेत हिंडणाऱ्या आफ्रिकन हत्तींच्या कळपांची आठवण होते. (पृ. १४९) -------------- दुष्काळ पडला की कुठले पाणी आणि कुठली हिरवळ? आधी पडलेले हत्तीचे सांगाडे हुंगत हे हत्ती त्याच मार्गाने पुढे जात राहतात. टिकतात ते जातात पुढे; नाही ते तिथेच हाडे टाकतात. आज भटक्यांची परिस्थिती त्याहून काही वेगळी नाही. (पृ. १५०)

४.   एका अंधाऱ्या घरात राहणाऱ्या जर्दा कामगार चांभार म्हातारीला भेटायला गेलो होतो. ---------------- चिमणीच्या अंधुक प्रकाशात पांढरे टारले हलवीत ती म्हणाली,  बाबा, ही निपाणी नाही, ही अंधेरनगरी आहे अंधेरनगरी. (पृ. १७०)

                    मीच्या पलीकडील स्वने पाहिलेल्या माणसांच्या हलाखीच्या जीवनावर लिहिलेले व वेगवेगळ्या दृष्टीकोनांतून टिपलेले हे लिखाण आहे. हे लिखाण म्हणजे मुक्त चिंतनातले ललित गद्य म्हणता येईल. सुरक्षित जगातल्या माणसाने असुरक्षित जगातल्या माणसांवर लिहिलेले संवेदनशील लिखाण, असाही या लिखाणाचा उल्लेख करता येईल. या पुस्तकात खालच्या वर्गातील- कष्टकरी लोकांचे दु:ख वास्तविकतेसह कलात्मकतेने मांडले गेले आहे. असे हे एकूण दर्शनात्मक लिखाण म्हणता येईल.

                    (ही माझी पहिली समीक्षा. प्रथम वर्ष- विद्यार्थीदशेत असताना १९८३ साली सटाणा महाविद्यालयाच्या यशवंत वार्षिक नियतकालिकात प्रकाशित. इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

© डॉ. सुधीर राजाराम देवरे

ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/