रविवार, ३० सप्टेंबर, २०१८

कविता महाजन: शैलीदार लेखिका

 
-    डॉ. सुधीर रा. देवरे

     दिनांक 27-09-2018 च्या संध्याकाळी झी चोवीस तासवर ब्रेकींग न्यूज येत होती : लेखिका कविता महाजन यांचे न्यूमोनियाच्या आजाराने निधन. प्रचंड हादरलो. अस्वस्थ झालो.
     कवयित्री कविता महाजन यांच्याशी पहिली भेट झाली तेव्हा त्या पांढर्‍या साडीत आणि गळ्यात रूद्राक्ष माळा घातलेल्या तरूणी होत्या. दुसरी भेट 2000 साली बडोद्याला भाषा केंद्रात झाली. कविता महाजनचं वारली लोक‍गीतं हे संकलीत पुस्तक आणि माझं आदिम तालनं संगीत या कवितासंग्रहाचे प्रकाशन बडोद्याच्या भाषा केंद्राच्या कृतीसत्रात सोबतच झालं. यावेळी साहित्य आणि कवितेवर आमच्या अनौपचारिक गप्पा झाल्या होत्या. राम राम पाव्हनं डॉट कॉम या वेबसाइटवर त्यावेळी कविता काम करत होत्या. वेबसाईटवर टाकण्यासाठी त्यांनी माझ्या कविता मागितल्या. मी दिल्या. त्यावेळी वेबसाईटचं इतकं पेव फुटलेलं नव्हतं.
     यानंतर आम्ही टेलिफोन आणि पत्रसंवादाने संपर्कात होतो. दरम्यान त्या आजारी होत्या. कोणत्यातरी आजाराने शरीर लठ्ठ झालं होतं. आजाराची ट्रिटमेंटही सुरू होती. त्यात नवर्‍याच्या वाईट अनुभवांमुळे त्यांना घटस्फोट घ्यावा लागल्याचं समजलं. त्यांची मुलगी (तिचं नाव बहुतेक दिशा असल्याचं आठवतं.) तेव्हा सहावीत शिकत होती. कविता एकट्या रहात असल्याने वा एकट्या प्रवासात असताना त्यांना बर्‍याच वाईट अनुभवांना सामोरं जावं लागलं.
    मी लठ्ठ झाल्याने साहित्य क्षेत्रातले मित्र मला आता हत्ती म्हणतात असं कविताने हसत हसत फोनवर सांगीतलं. रूद्राक्ष माळांचं काय प्रकरण होतं?’ असं विचारताच ते त्या वेळी काहीतरी केलं बस’, असंही हसत उत्तरल्या. फोनवर साहित्य गप्पा होत. पत्रसंवादही सुरू होता. कविताचा स्वभाव अतिशय प्रांजळ, सालस, भाबडा, मनमिळाऊ असा होता. नेहमी हसतमुख असत. खूप बोलायच्या. त्यांच्या मनात कोणाबद्दल मळ नसायचा की अढी नसायची.
     2003 की 2004 नक्की आठवत नाही. ‍आदिवासींसंदर्भातले लिखाण आणि त्या लिहीत असलेल्या पहिल्याच कादंबरीवर चर्चा करण्यासाठी त्यांचा फोन आला.
त्यांची कादंबरी लिहून पूर्ण झालेली होती. कादंबरी पीसीत डिटीपी करून ठेवली, असे म्हणाल्या. राजहंस प्रकाशनाने स्वीकृतही केलेली होती. पण नाव अजून निश्चित होत नव्हतं. मला इमेलने पाठवणार होत्या. पण तोपर्यंत माझ्याकडे संगणक नव्हता की इंटरनेट. कादंबरीचं नाव काय असावं, यावर चर्चा सुरू झाली. कादंबरीचं कथानक थोडक्यात कविताने सांगितलं. कादंबरीला त्यांना हवी तशी मी चार- पाच नावं सुचवलीही. पैकी काही नावं त्यांना भावली. (पारंपरिक आणि लांबलचक नावं नको, यावर त्या ठाम होत्या.) फोनवर कादंबरी आणि कवितांवर चर्चा होत. कविता वाचनही.
     काही दिवसांनी त्यांची कादंबरी प्रकाशित झाल्यावर मला कळलं की त्या कादंबरीचं नाव ब्र ठेवलं. हे नाव आमच्या चर्चेत आलं नव्हतं. कादंबरी वाचताना मला त्यातले सर्वच पात्र परिचित होते. हे कविताला फोनवर सांगितल्यावर कविता हसत म्हणाल्या, याला समीक्षा म्हणतात का?’  
     आदिवासी साहित्य आणि आदिवासीपण यावरही चर्चा व्हायची. आदिवासींवर लिहिलेलं माझ्याकडून एक जाडजूड पुस्तक त्यांना लिहून हवं होतं. पण मी ते अजूनही दिलं नाही. त्यानंतर कविताने पुन्हा दुसरी कादंबरी लिहायला घेतली. ती ही लगेच भिन्न नावाने प्रकाशित झाली. या दोन कादंबर्‍यांमुळे कविता अचानक महाराष्ट्रात लोकप्रिय लेखिका झाल्या. त्यांचे वाचक वाढले. कविता दिवसेंदिवस मराठी वाचकांत पोचत होत्या. या दोन्ही कादंबर्‍या अफलातून आहेत. (धुळीचा आवाज, रजई आणि कविता सुध्दा). कविताची गद्य शैलीच अशी जबरदस्त होती की कविताला कवयित्री म्हणून आतापर्यंत असलेली मान्यता कादंबरीकार कविताने हिसकावून घेतली...
     ...यश वा मोठंपण माणसाला माणसापासून तोडतं की काय? माणसाला अहंकार असतो. त्यातल्यात्यात कलाकाराला- साहित्यिकाला तो जास्त असतो का? हा अहंकार एकतर आपण तो माणूस गमावल्यावर गळतो वा स्वत:च गेल्यावर आपोआप गळून पडतो. अनेकांचे असे सुहृद संबंध अचानक थांबतात. ते संबंध थांबण्यामागे खूप मोठी कारणं नसतात. छोटी छोटी कारणं असतात वा एखादंच छोटं कारण माणूस माणसापासून दूर जायला पुरेसं ठरतं. आणि मग तो माणूस या जगातून कायमचा गमावल्यावर आपण हळहळत राहतो. कलाकार वा ‍साहित्यिकांमध्ये ज्युनियर सिनियर असं काही असतं का? गट – तट असतात का?  समवयस्क असले तरी अचानक मिळणारी प्रसिध्दी ज्य‍ुनियर- सिनियर विभागणी करत असेल का? यश, प्रसिध्दी वा मोठेपण प्रत्येक माणसाला सहजासहजी पचवता येत नाही. म्हणून मोठ्या- प्रथितयश कलावंतांशी- साहित्यिकांशी अनेक चाहत्यांचे संबंध एकतर्फी असतात का? हे तपासायला हवं. 
     कविताचा लँडलाईन नंबर आता माझ्याकडे सेव्ह आहे. मोबाईल नंबरही सेव्ह आहे. तरीही मी साताठ वर्षांपासून कविताशी बोललो नाही. का बोललो नसेल?  कविता आता खूप प्रसिध्द लेखिका झाल्या. त्या खूप व्यस्त असाव्यात. आपल्याशी बोलायला‍ त्यांना वेळ असेल की नाही? म्हणूनच त्या फोन करत नसाव्यात. समजा आपण बोललो आणि त्यांनी औपचारिक बोलून निरोप घेतला तर ते आपल्याला आवडेल का? त्यापेक्षा नकोच. ‍त्यांनी करावा फोन, मग आपण बोलू. हा अहंकार मला आडवा येत असेल म्हणून मी कविताशी काही वर्षांपासून बोललो नाही. आणि त्यांच्या मृत्यूची ही बातमी अचानक ऐकताच प्रचंड हादरलो. (मागच्याच वर्षी याच काळात- सप्टेंबर ऑक्टोबर 2017 - मी ही मृत्यूच्या दाढेतून- न्यूमोनियाच्याच आजारातून आयसीयूतून पुन्हा जीवंत झालो होतो.) मला आता राहून राहून वाटतं, कविताला फोन करून एकदा तरी त्यांच्याशी बोलायला हवं होतं. कसे आहात? काय लिहिताहात? काळजी घ्या. पण दुर्दैवाने आता हे दुसर्‍याला सांगण्यासाठी लिहावं लागतं, ते ही भावपूर्ण श्रध्दांजली! अर्पण करत...
     (या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)
  डॉ. सुधीर रा. देवरे
    ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

शुक्रवार, १४ सप्टेंबर, २०१८

ग्रामीण राहणीमान


- डॉ. सुधीर रा. देवरे

          उत्तर महाराष्ट्र वासियांचे खानदेशी ग्रामीण राहणीमान अतिशय नैसर्गिक पध्दतीचे होते. रहायला चार भिंतींचं आणि एका छपराचं घर, अंग झाकण्यापुरते फाटके मळके कपडे आणि दोन वेळचं वेळच्या वेळी जेवण मिळालं की ते कुटुंब खाऊन पिऊन सुखी असल्याचं समजलं जायचं. अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गोष्टीच त्या वेळी सुखी जीवनाची गुरूकिल्ली ठरत होत्या. अशा गरजा पूर्ण करणारे काही शेतकरी, काही शेतमजूर, काही अन्य व्यावसायिक मजूर, गावातील बारा बलुतेदारांपैकी काही लोक, कारूनारू समाज, कुठेतरी शिक्षक वा अन्य नोकरी करणारे कर्मचारी- चाकरमानी वरील व्याखेच्या सुखी जीवनात रमताना दिसत.
          मनगटी घड्याळ, सायकल आणि रेडीओ ज्यांच्याकडे असे ते कुंटुब संपन्न- श्रीमंत समजलं जात होतं. (पण यातलेच काही दारूच्या व्यसनाच्या आहारी गेलेले लोक आर्थिकदृष्ट्या कमकुवत होत असल्याचं त्यावेळीही निदर्शनास येत असे.) लोकांच्या मुळात गरजाच कमी असल्याने गावातले अनेक लोक खाऊन पिऊन सुखी असल्याचं दिसून यायचं. श्रीमंत वगैरे असण्याच्या कल्पना फक्‍त बोलण्यापुरत्या असायच्या. तो लाख्या शे असं श्रीमंत माणसाचं वर्णन केलं जायचं. लाख्या म्हणजे ज्याच्याकडे लाखभर रूपये आहेत तो. (त्यावेळचे लाख म्हणजे आज कोटी.)
     गावाच्या आसपास राहणारे आदिवासी लोक व दलित समाजाच्या वेगळ्या वस्तीत मात्र गावाच्या तुलनेत अधिक दारिद्र्य असल्याचं दिसून यायचं. त्यामुळे त्यांना पोटासाठी अनेक उपद्व्याप करावे लागत. कोणी लोक गावात घरोघरी दोन्ही वेळा भाकरी मागायला यायचे. जो तो ज्याच्या त्याच्या मगदूराप्रमाणे या लोकांना अर्धी - चोखांड भाकर द्यायचा.
     पोटासाठी भील समाजातील लोक गावठी दारू तयार करून अनाधिकृत दारू विक्री करण्याचा व्यवसाय करत. अथवा नदीतल्या  बारीक मासोळ्या पकडून गावात विकत असत. मात्र यातून त्यांना खूप पैसा मिळून त्यांचे दैनंदिन जीवन सुधारलं असं दिसत नव्हतं. कोकणा जमातीच्या महिला करवंद, आवळा, ‍सीताफळ, जांभळं, टेंभरं, चिंचा, बोरं आदी रानफळं चावडीवर बसून विकत असत. आदिवासी पुरूष लोक मजूरी करून आपली उपजीविका भागवायचे. या फळ विक्रेत्या महिलांना फळांच्या बदल्यात पैश्यांऐवजी धान्य मिळत असे.
     ग्रामीण भागातील सर्वसाधारण लोक आणि आदिवासी कुटुंबातील कोणीही व्यक्‍ती यांच्या राहणीमानात जमीन अस्मानचा फरक त्याकाळीही दिसून यायचा. आदिवासींचे मळके व फाटके कपडे आणि डोक्याच्या केसांना कधीच नसलेले तेल यामुळे हा फरक जास्तच अधोरेखित व्हायचा. हा फरक अलीकडे कुठं कुठं कमी झालेला दिसत असला तरी आदिवासी डोंगरी- दुर्गम भागात काही ठिकाणी ही दरी अजून रूंद झाल्याचं लक्षात येतं. अलीकडे जाती जमातीय वर्गीकरण करण्यापेक्षा आर्थिक दृष्ट्या सबल आणि कमकुवत यावर ही दरी वाढतांना दिसते.
     ग्रामीण घर साधं असायचं. घराला रंगरंगोटी केलीच पाहिजे असं त्यावेळच्या ग्रामीण माणसाला वाटलं नाही. कोणी घराला रंग दिलाच तर तो मातीचा अथवा चुन्याचा रंग असे. भिंतींना कोणी खेटून बसलं की तो रंग कपड्यांना- हातापायांना लागायचा. घराच्या मातीच्या भिंतीला रंग घट्ट बसावा म्हणून चिकटपणा येण्यासाठी मातीच्या रंगात साखर न टाकता साबुदान्याची पातळ खीर करून टाकली जायची. साबुदाण्याच्या‍ चिकटपणामुळे रंग आवळला जायचा. राहण्यासाठी फक्‍त घर हवं मग ते कसंका तोडकं मोडकं असेना. डोकं घालायला घर पाहिजे एवढीच अपेक्षा ग्रामीण लोकांची असायची. घराच्या बाहेरच्या भिंती चिखलाने सारवल्या जात, तर आतल्या मातीच्या पोताराने पोतारले जायच्या. घराची जमीनही मातीची असायची आणि ती चार पाच दिवसांनी शेणाने सारवावी लागायची. नुकतीच दगडी काळी फरशी त्या काळी येऊ लागली होती. ही फरशी श्रीमंत लोक आपल्या घराला बसवत. आता ती फरशी शेतातल्या झ्यापालाही कोणी बसवत नाही. त्याकाळी अलिशान घराची कल्पना कोणी करत नव्हतं, तरीही घराला घरपण येत होतं हे मात्र खरं.
          (या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/