रविवार, १५ नोव्हेंबर, २०२०

कोणत्याच नळ्यात

 

- डॉ. सुधीर रा. देवरे

 

अनादी काळापासून

सरपटत चाललोय मी

प्रचंड अस्ताव्यस्त पसारा घेऊन

माझी लांबी रुंदी उंची

मोजता येत नाही मलाच

 

अंगाखांद्यांवर वाढणार्‍या

असंख्य जीव जंतूंचं

संगोपन करत

कुठून निघालो

नि कुठं संपणार

हा आदिम चिंतनाचा प्रवास

माहीत नाही

 

मी माझ्यात मावत नाही

मी तुझ्यात मावत नाही

मी तिच्यात मावत नाही

मी त्याच्यात मावत नाही

अशा अस्ताव्यस्त पसार्‍यात

प्रचंड ताणातला काळजीवाहू मेंदू

प्रचंड प्रेमाचं धडधडणारं हृदय

प्रचंड कामाचं थरकवतं टेन्शन

आणि प्रचंड भेमकावणारी स्वप्न

बठ्ठ्या खुशालींचं विष

माझ्याच बशीत

वझं पेलावं तरी कसं

 

ह्या दीर्घ वळण घेतलेल्या

अवाढव्य पसरलेल्या भिन्नाट

उघड्यावाघड्या एकल्या वाटेत

मला व्यक्‍तायला

हा उलसाच आडवा फौंटन

आणि समोर चिव्वळ पोखरलेला नळा

त्यात मी लोळागोळा 

दपू शकत नाही सलामत

 

माझ्या देहावर बांडगुळणार्‍या

समग्र जिवांचा भनका होईल म्हणून

मी डूकत बसू शकत नाही वेटोळं करून

की फणाही काढू शकत नाही

फुसकारत कोणावरही

 

माझं आख्ख काळंभोर ध्यान

पोकळ अवकाश भरून निळंगार

दोन पावलांच्या जागेत

तिसरा कुठं ठेऊ?

मी दखल घेण्याइतपत

कोणालाच दखात नाही

 

- मी कोणत्याच नळ्यात

मावत नाही!                       

        (‘हंस’ दिवाळी 2020 च्या अंकात प्रकाशित झालेली कविता. कवितेचा इतरत्र वापर करताना कवीच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

    © डॉ. सुधीर रा. देवरे

       ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.com/

रविवार, १ नोव्हेंबर, २०२०

प्रतिमा जपायची आहे

 

- डॉ. सुधीर रा. देवरे

 

               साहित्यिक, कलावंत वा संवेदनाशील व्यक्‍तींना ‍जीवनात हटके अनुभव घ्यायला आवडतात. पण असे अनुभव घेतांना काही चटके बसणंही अपरिहार्य असतं. हे चटके सोसण्याची ताकद प्रत्येकात असतेच असं नाही. उलट परिणाम उद्‍भवले की व्यक्‍ती गांगरून भीतीने थरथरते. आपण ज्या सामाजिक चौकटीत वावरतो त्या जनमानसात आपल्या प्रतिमेला तडा जाऊ नये असं वाटणं स्वाभाविक आहे.

                    आपल्या मूळ स्वरूपाहून केवळ आपली प्रतिमा उत्कट करण्याच्या अट्टहासामुळे, माणूस हटके अनुभव घेण्यासाठी आपणहून साहस करत नाही. पचेल, परवडेल, समाजात चुकीचा संदेश जाणार नाही असा मोजून मापून आपण अनुभव घेतो. परिणाम उलटा होताच हादरून जातो. जगातील सर्वात मोठा गुन्हा केला असं अपराधी समजत गुन्हेगारांच्या पिंजर्‍यात स्वत:ला पाहू लागतो. खरी बाजू मांडली तरी लोक समजून घेतीलच याची शाश्वती नसते. इतरांसमोर आपली बाजू मांडावी लागावी यालाच आपला पराभव समजून आत्मविश्वास ढासळतो. ज्यांच्या समोर बाजू मांडायची ते आपल्याशी तार जुळणारे असतीलच असंही नाही. बर्‍याचदा लोकांचा दृष्टीकोन आधीच तयार झालेला असतो.

                    उदाहरणार्थ, माझा एक लेखक मित्र. कधीमधी सोशल साइटस् सर्फींग करायचा. दिवसातून अर्धा-एक तास फेसबुकवर हटके अनुभव म्हणून महिलांशी चॅटींग करायचा. लेखक म्हणून एका वेगळ्या अनुभवाचा तर्जुमा कुठं वापरता येतो का पाहुया, हा त्याचा उद्देश.

                    महिला नसलेल्या पण महिलेच्या नावाने तयार केलेल्या फेक आयडीतून चॅटींग करणार्‍या पुरूष व्यक्‍तीने त्याला बोलताना फसवलं. खूप वाईट नसलं तरी तो आक्षेपार्ह बोलत गेला. त्याने तसं बोलावं अशी परिस्थिती मुद्दाम संवादात निर्माण केली गेली. ‍ती म्हणजे त्याने विषयाला सुरूवात करत मित्राला प्रश्न विचारून बोलतं करायचं. मित्र या जाळ्यात ओढला गेला.

                    त्या व्यक्‍तीने ब्लॅकमेल करायला सुरूवात केली. पैशांची मागणी केली. मित्राने पैसे दिले नाहीत म्हणून त्याने नावासह बदनामी केली. मित्राने पाठवलेले आणि बरेच त्याने मित्राच्या नावाने स्वत: तयार केलेले संदेश प्लँट करून मित्राच्या नावाने भिंतीवर (फेसबुक वालवर) पोस्ट केले. मित्र घाबरला. इज्जतीचा पंचनामा पाहून आत्महत्या करायला निघाला. मरता मरता वाचला.

                    आपलं काय होईल? आपण असं करू शकतो? लोक काय बोलतील? मित्र, नातेवाईक, फॅन, विद्यार्थी, वाचक इतकंच काय घरातले लोक काय म्हणतील? लेखक म्हणून वेगळा अनुभव घेत होतो, असं सांगितल्याने भागणार नव्हतं. आपण काहीबाही आक्षेपार्ह बोललोच असलं पाहिजे, असं लोक समजतील. त्याने प्लँट केलेले संदेश आपणच लिहिलेत असं लोकांना वाटेल वगैरे त्याच्या डोक्यात महिनोंमहिने भुनभुनत होतं. तो आतल्याआत खंगत राहिला. मित्र जगला पण पहिल्यासारखा लेखक उरला नाही. एक माणूस- एक कलाकार अशा पध्दतीने संपू शकतो.

                    नकारात्मक विचार मनात एकदा संचारले की संवेदनशील माणसाच्या मनातून आयुष्यभर जात नाहीत. लोक विसरून जातात पण स्वत: विसरत नाही. वास्तवापेक्षा आपली प्रतिमा फुगवल्यामुळे आपण उदासीनतेच्या गर्तेत रूतत जातो. खरं तर प्रतिमा अशी कारणाशिवाय आणि अतोनात जपल्यामुळे आपण दिवसेंदिवस निष्क्रिय सज्जन होत जातो. (हातून काही भलं होत नसलं तरी कोणाचं वाईट करू नये, या सूत्राने तो कोणाचं चांगलंही करत नाही आणि अनुभवातून सांगण्यासारखं चांगलं सांगतही नाही. यामुळे ही व्यक्‍ती दिवसेंदिवस घरात-गावात इतकी सज्जन होत जाते की ती या जगात आहे की नाही याच्याशी बाकिच्यांनाही काही देणंघेणं उरत नाही.)

                    सारांश, प्रतिमा अतोनात जपताना आपली त्रेधातिरपीट उडते. माणसाच्या अशा आवृत्त्या तयार होणं ही बांधिलकी- सामिलकीच्या दृष्टीने घातक बाब आहे.

                    (पुण्याच्या ‘दिलीपराज प्रकाशना’कडून ‘ब्लॉगच्या जाळ्यातून जग’ हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं. त्या निमित्ताने पुस्तकात समाविष्ट झालेल्या पण ब्लॉगवर अजून न आलेल्या तीन लेखांपैकी हा एक. लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

    © डॉ. सुधीर रा. देवरे

     ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.com/