बुधवार, १ एप्रिल, २०२०

कोरोना आणि माणूस- डॉ. सुधीर रा. देवरे

    डिसेंबर 2019 मध्ये कोरोना चीनच्या वुहान शहरात पसरला. चीन मधून तो इतरत्र पसरणार नाही असा अनेकांचा समज होता. आज संपूर्ण जगात कोरोनाच्या दहशतीने युध्दजन्य परिस्थिती आहे. हा विषाणू म्हणजे मानवाने तयार केलेला जैविक बाँब असून तो माणसावरच बुमॅरंग सारखा उलटला असं बोललं जात होतं.
    चीन मधून कोरोनाचं उच्चाटन होताच चीनने हाच आरोप इतर देशांवर केला. कोरोना हा जैविक बाँब की नैसर्गिक विषाणू हा प्रश्न आज अनुत्तरीत असला तरी, हे जैविक संकरीत हत्यार असल्याची साशंकता काही शास्त्रज्ञांना वाटत आली.
    मार्च 2020 च्या सुरूवातीला कोरोना भारतात दिसू लागला. आधी तुरळक. नंतर रूग्ण संख्या वाढू लागली. दरम्यान डब्ल्यूएचओ कडून कोरोना वैश्विक महामारी असल्याचं जाहीर झालं. इटली, इराण, स्पेन, अमेरिका सारखे अनेक देश  सुरूवातीला गाफील राहिल्याने त्यांना जबर किंमत चुकवावी लागत आहे. हा विषाणू जगात अजून किती धुमाकुळ घालणार, माहीत नाही. याचं उच्चाटन होईपर्यंत जगात कितीतरी लोकांनी आपला प्राण गमावला असेल.
     कोरोनासारखे विषाणू जातीभेद, धर्मभेद, पंथभेद पाळत नाहीत. आस्तिक- नास्तिक ओळखत नाहीत. ही मक्‍तेदारी माणसाची! मित्र राष्ट्र कोणते, शत्रू राष्ट्र कोणते त्याला माहीत नाही. सगळ्या माणसांना कोरोना समान न्याय देताना दिसतो. इतकंच काय ज्याच्या भरोश्यावर लोकश्रध्देतील जगन्नाथाचा रथ चाललाय त्या देवालाही कोरोनाने माणसांसमोर कोंडून ठेवलं!
     जन्माला घालणार्‍या देशालाही त्याने दयामाया दाखवली नाही. डोळ्यांना न दिसणारा हा शत्रू माणसाच्या जीवावर उठला. पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा! हे पदोपदी जगूनही माणसावरच कोरोना सोडून माणूस माणसाच्या जीवाशी खेळतो. अशा निर्मितीशिवायही माणूस माणसाशी कोरोनासारखाच वागतो. माणसाची घमेंड, अहंकार, महत्वाकांक्षेचा हा कोरोना.
    विषाणूंच्या संकराने माणूस कोरोनाचा भस्मासूर निर्माण करतो. पण तो आपल्याच डोक्यावर हात ठेवेल, हे माणसाला कळू नये? जन्मदात्याला ओळखण्याइतकी बुध्दी विषाणूला नाही. असे विध्वंसक शोध म्हणजे पृथ्वीवरील आख्ख्या मानवजातीला सुरूंग! हे कोरोना कडून माणसाने शिकावं. आख्ख्या मानवजातीने त्याला गुरू मानत धडधडीत धडा शिकावा. कोरोनाला संजीवनी देणार्‍या महाशक्‍ती आज हतबल आहेत. घातक हत्यार बनवताना, वेळ पडल्यास मृत्यू तांडव थांबवायचं कसं, यावर समांतर संशोधन होत नाही. आज धोक्यातल्या मानवजातीला वाचवायचं औषध वा लस तयार नाही! केवढं हे क्रौर्य!  
    पृथ्वी शेकडो वेळा बेचिराख होईल इतके अणुबाँब, रासायनिक शस्त्र जगभर लपवलेले आहेत. ते चुकीच्या हातात पडले तर आक्‍ख जग नष्ट होईल. पण जागतिक सत्ताधीश होण्याच्या नादात माणूस बुध्दीभ्रष्ट झाला. विवेक हरवून बसला.
     माणसाच्या शेजारी शत्रू असतातच. आपण ज्याला देश वगैरे संबोधतो. शत्रूचं घर नष्ट करण्यासाठी त्याच्या घराला आग लावायची. शेजारचं घर जळताच आपलं घरही जळणं साहजिक, हे बुध्दीवान मानवाला माहीत असतं. तरीही शत्रूचा काटा काढण्यासाठी शेजार्‍याचं घर जाळतो. शत्रूचा नायनाट झाल्यानंतर आपलं घर जळेल! आ‍धी नाही. शत्रूचं घर जळताना जो आनंद मिळेल, तो महत्वाचा. असा माणूस. शिकून सवरून, कळून वळून बुध्दीभ्रष्ट. सत्ता आणि महासत्तेसाठी नरसंहार करणारा!
     कोरोनाचा जन्म हा असाच महत्वाकांक्षी आविष्कार. 1999 साली प्रकाशित झालेल्या डंख व्यालेलं अवकाश या माझ्या कवितासंग्रहातली युध्द नावाची कविता आठवली:

विनंतीची वेळ टळून गेली
आता बळाची परवानगी
शांततेच्या रात्री
चंद्र खुडून शत्रूचं घर पेटवायचं
मग शेजारी आपसूक बाहेर येतील...
उगवत्या सूर्याच्या साक्षीने
मागील दाराने
आपण आत घुसायचं
नंतर आपलं घर पेटलं तरी  
युद्ध आपण जिंकलंच म्हणायचं!

(‘सगुण- निर्गुण मटा, दि. 1 – 4 – 2020 च्या अंकात प्रकाशित झालेला लेख. लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

© डॉ. सुधीर रा. देवरे
  ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/