शुक्रवार, १५ एप्रिल, २०२२

ब्लॉग लिखाणाला दहा वर्ष पूर्ण

 

-  डॉ. सुधीर रा. देवरे

                    वाचकांच्या अल्प प्रतिसादामुळं महाराष्ट्रातील मराठी नियतकालिकं बंद पडत आहेत. वर्तमानपत्र संकुचित होत आहेत. म्हणून दिवसेंदिवस महाराष्ट्रात, भारतात आणि जगात घडलेल्या घटनांवर प्रतिसाद कुठं द्यावा हा प्रश्न संवेदनशील व्यक्तींना पडत असतो. त्यासाठी ब्लॉगवर लिखाण करत आपलं स्वतंत्र व्यासपीठ असणं आवश्यक ठरतं. इथं ठराविक कालावधीत वा आपल्या सोयीच्या वेळी व्यक्त होता येतं. ट्विटरला शब्दांची मर्यादा असते. त्यामुळं तिथं सविस्तरपणे व्यक्त होता येत नाही. मात्र ब्लॉगला तशी कोणतीही शब्दमर्यादा नसते. अशी विशिष्ट शब्दमर्यादा नसल्यानं ब्लॉगवर सविस्तरपणे मोकळेपणानं लेखकाला- संवेदनशील व्यक्तीला अभिव्यक्त होता येतं. हा डिजिटल युगाचा जमाना आहे. त्यासाठी अद्ययावत असणं आवश्यक झालं आहे.  

                    वैचारिक, राजकीय, शैक्षणिक, प्रासंगिक गोष्टींवर प्रतिक्रिया देण्यासाठी ब्लॉग हे आजचे प्रभावी माध्यम आहे. या विचारांसोबतच साहित्यविषयक लिखाणही ब्लॉगवर येत असतं. जे लिखाण वेळोवेळी इतर नियतकालिकातून प्रकाशित होतं, परंतु नियतकालिकातून ते मर्यादित लोकांपर्यंतच पोहोचतं, ते ब्लॉगवर टाकून महाराष्ट्रातील, भारतातील आणि जगातील मराठी व्यक्तींपर्यंत पोचवता येतं. ब्लॉगवरील आजचे माझे लेख जगातील पाच हजार लोकांपर्यंत पोहोचतात.

                    बरोबर दहा वर्षांपूर्वी दिनांक 29 एप्रिल 2012 पासून मी दर शनिवारी साप्ताहिक ब्लॉग लिहायला सुरूवात केली होती. 27 एप्रिल 2014 पर्यंत दोन वर्ष एकही शनिवार ब्लॉगशिवाय टळला नाही. म्हणजेच एकाही आठवड्याचा खंड पडू न देता आणि शनिवार सायंकाळ ही वेळही न टाळता नियमितपणे ब्लॉग लिहीत होतो. मात्र प्रत्येक आठ दिवसांनी ब्लॉगवरील लेखांमुळे अन्य लिखाणावर प्रतिकूल परिणाम होतो असं लक्षात आल्यानं एप्रिल 2014 पासून प्रत्येक महिण्याच्या 1 आणि 15 तारखेला ब्लॉगवर लेख देऊ लागलो. प्रत्येक पंधरा दिवसाला एक ब्लॉग. या दहा वर्षांत एकही खंड जाऊ दिला नाही. खूप लांबलचक लेख लिहिण्यापेक्षा विचारांची थोडक्यात व संपृक्‍त मांडणी करायची शिस्त स्वत:ला लावून घेतली आणि ती शिस्त आजपर्यंत पाळत आलो. 

                    या सर्व छोटेखानी लेखांत साहित्यिक, सांस्कृतिक, भाषिक, कला, लोकजीवन, सामाजिक, धर्मकारण, राजकारण, युध्द, शैक्षणिक, सुधारक, प्रबोधनात्मक, पर्यावरण, वैश्विक, आंतकविरोध, शेती, पाणी, पर्यावरण, चरित्र, व्यक्‍तीविशेष, बोलीभाषा, अहिराणी भाषा, विविध पडसाद आदी विषय येत गेले. काही लेख देशात (वा विदेशात) त्या त्या वेळेला घडलेल्या घटनांवर ‍प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया वा भाष्य अशा स्वरूपाचे असलेत तरी असे लेख केवळ प्रा‍संगिक आहेत असं म्हणता येणार नाही. हे लेख केव्हाही वाचताना विशिष्ट संदर्भात कालाय ठरावेत असा दृष्टीकोन ठेऊन मी लिहीत गेलो. म्हणजे घटना विशिष्ट काळातली असली तरी तिचा परिप्रेक्ष आजच्या अन्य घटना- प्रसंगांकडे नक्कीच निर्देश करेल याचा विचार लिखाण होताना केला आहे. दहा वर्षातील लेखांवरून नजर फिरवली तर त्यातल्या विषयांची विविधता लक्षात येईल. एखादा विषय पुन्हा चर्चेला आला तरी त्याचा आशय पूर्णपणे वेगळा असतो.

                    या ब्लॉगचे आंतरजालावर स्वतंत्र संकेतस्थळ तर आहेच पण हेच ब्लॉग मी तात्काळ त्या त्या दिवशीच ग्लोबल मराठी, व्टिटर या संकेतस्थळासह फेसबुक, व्हॉटसअॅपवरही टाकतो. नुकताच डेलिहंट या वेब पोर्टलसोबत ब्लॉगचा करार झाला आहे. ब्लॉग माझ्या साइटवर प्रकाशित होताच डेलिहंटवरही थेट प्रक्षेपित होऊ लागला. फेसबुकच्या भिंतीसोबतच त्या त्या विषयांवर असलेल्या काही गटांवर हे लेख मी टाकत असतो. (1 नोव्हेंबर 2014 पासून) व्हॉटस् अॅपवरही माय ब्लॉग्स् नावाचा ग्रुप सुरू केला. अनेक मित्र- वाचक ब्लॉगवरील लेख परस्पर इतरांना फॉरवर्ड करत असतात. त्यामुळे आंतरजालावरील ब्लॉग साइट, ग्लोबल मराठी, व्टिटर, फेसबुक, व्हॉटस् अॅप आणि डेलिहंट या सर्वांवर प्रत्येक लेख जवळपास पाच हजारांवर वाचक वाचतात, हे वाचकखुणांवरून लक्षात येतं. तरीही या ब्लॉगला प्रायोजक मिळविण्याचा अजून खटाटोप केला नाही. काहीतरी आतून सांगायचं असतं. भारताच्या संविधानाने दिलेल्या अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याला अनुसरून व्यक्‍त होणं आणि अप्रत्यक्षपणे झालंच तर प्रबोधन एवढ्याच ध्येयानं प्रेरित होऊन हे लिखाण मी करतो. ब्लॉगवर लेख टाकण्यासाठी वेळ सांभाळणं कठीण जातं, पण सांभाळतो. ब्लॉगमुळं माझ्या इतर लिखाणावरही विपरीत परिणाम होतो, हे ही लक्षात आलं. पण ब्लॉग लिखाण सातत्यातून जो आनंद मिळतो त्याचं वर्णन इथं शब्दांत मांडता येत नाही.

                    दहा वर्षांतील या छोट्या लेखांची जवळपास जाणारी संख्याच सांगायची झाली तर ती 300 (तीनशे) इतकी झाली आहे. पैकी काही निखळ प्रासंगिक स्वरूपाचे लेख वगळून 2012 ते 2016 या कालावधीतले ब्लॉगचं पुस्तक (119 लेख) प्रकाशित झाले आहे. ब्लॉगच्या जाळ्यातून जग असं या पुस्तकाचं नाव असून पुण्याच्या दिलीपराज प्रकाशनाकडून ते 25 सप्टेंबर 2020 ला प्रकाशित झालं आहे. या पुढंही मी ब्लॉग लिहीत राहीन. पण आता यातही थोडा बदल करावासा वाटतो. अन्य लिखाण, अभ्यास आणि आता सुरू केलेल्या संपृक्त लिखाण नियतकालिकाला द्यावा लागणारा वेळ यामुळं यापुढं महिण्यातून दोन नव्हे तर एक लेख ब्लॉगवर देण्याचा विचार करतोय. प्रत्येक महिण्याच्या एक तारखेला ब्लॉगवर लेख देण्याचा दिवस कटाक्षानं पाळण्याचा प्रयत्न करीन.

                    कला, साहित्य, भाषा, समीक्षा, लोकसंस्कृती, लोकजीवन, वैचारिक ‍लेखन अशा स्वतंत्र लेखनाबरोबरच माझे इतरत्र प्रकाशित झालेले लिखाणही ब्लॉग मधून देत असतो- देत राहील. या ब्लॉग लिखाणाला दहा वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं जर आपण माझे याआधीचे इतर ब्लॉग वाचून त्यांच्या संदर्भातही काही सुचना केल्या वा प्रतिक्रिया दिल्या तर आनंद होईल. आधीचे ब्लॉग वाचण्यासाठी या ब्लॉगच्या शेवटी लिंक दिली आहे, त्या लिंकवर आतापर्यंतचे माझे सर्व लेख वाचता येतील. आपल्या सर्वांच्या ‍अभिप्रायांमुळं, प्रतिक्रियांमुळं, टिपण्यांमुळं आणि विशेषत: आपल्या प्रेमामुळं मला लिखाण करण्याची ऊर्जा मिळते, म्हणून ब्लॉगचं लेखन सातत्य आतापर्यंत तरी टिकवून आहे. ब्लॉगच्या लेखांवरील आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया (प्रतिकूल प्रतिक्रियासुध्दा) वाचून मला खूप आनंद मिळतो. हा आनंद आपण सर्व मिळून यापुढंही घेत रहायचा का? या ब्लॉगवरील लेखांमधून आपल्याला काही नवीन माहिती वा नवीन ज्ञान मिळतं का? प्रबोधन होतं का? वा तसं होत नसेल तर किमान सांस्कृतिक- सामाजिक उजळणी तरी होते का? अशा प्रश्नांचे मंथन जरूर व्हावे ही विनंती. यापुढंही सर्व वाचकांचं असंच प्रेम मिळत राहील अशी आशा बाळगतो. धन्यवाद.

   - डॉ. सुधीर रा. देवरे                  

       इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.com/

शुक्रवार, १ एप्रिल, २०२२

लोक आजारी आहेत...

 

 

- डॉ. सुधीर रा.  देवरे

 

लोक आजारी आहेत

लोक भयंकर आजारी आहेत

लोक व्हॉट्सअप वाचतात 

आणि आजारी पडतात 

लोक फेसबूक- व्टिटर वाचतात

आणि आजारी पडतात...  

लोक आजारी पडतात

आणि सोशल मीडियावर चिरकतात

लोक आजारी पडतात

आणि कचरा फॉरवर्ड करतात

लोक आजारी पडतात

आणि खांद्यांवर झेंडा घेतात

लोक आजारी पडतात

आणि अंगाची रंगातून ओळख देतात...  

लोक चित्रपट पाहतात 

आणि आजारी पडतात

लोक नाटक पहातात

आणि आजारी पडतात 

लोक बंबाळतेने चर्चाळतात 

आणि आजारी पडतात 

लोक प्रायोजित टिव्ही पाहतात

आणि आजारी पडतात

लोक पिसा भाषणं ऐकतात 

आणि आजारी पडतात

लोक स्वस्त मुखपत्र वाचतात

आणि आजारी पडतात...

शिळ्या कढीला उत आणत

लोक बुजलेली मढी उकरतात

इतिहासाला टांग मारत

मनगढत कहाण्या रचतात

लोक काल्पनिक सीमा आखून

फाळणीवर बार खेळतात

आणि आजारी पडतात लोक...  

लोक खाचखळग्यांच्या रस्त्यांतून मुरगळत

आभाळपल्याड स्वर्ग भोगण्याच्या स्वप्नात

लोक मंदिरात.. दानपेट्या फुगवतात..

नंदीच्या शेपटीला देव करून सोडतात

दर्शनाला रांगा.. टाळ्या वाजवत..

आरत्या आणि भजनं भसाडं गाऊन

बदल्यात दैनिक इरीद मिळवतात...

जान नसलेले अजान भोंगेही

गावागावात कान ठणकवतात  

सत्य.. नारायण नागबलीत चप्पी

धूप धुपारे चेटवतात

न पिणार्‍याला पाजत’.. दुधाच्या

अंघोळी घालत चिखलतात

फक्त माणसासाठी भेसळयुक्त

आणि यज्ञात अस्सल तूप जाळतात 

निष्काम भक्तीत आजारी पडत

लोक डाराडूर झोपतात घरात...

पुजार्‍याला पक्कं माहीत असतं

देवळात देव नाही

पण अडत्याला इलाज नाही

आणि धंद्याशिवाय

खुर्चीची उब नाही

म्हणून पोथ्यांमधून

नवे देव जन्माला येत राहतात

आणि लोक आजारी पडतात

निवडणुका जाहीर होतात

आणि लोक आजारी पडतात

लोक वाचत नाहीत यथार्थ

फक्त पाहूनमस्त होतात

आणि पटकन आजारी पडतात...   

यांचे पोटापाण्याचे प्रश्न

चुटकीसरशी सुटत राहतात

यांच्या सगळ्या मजा प्रायोजित असतात!

कोणत्याही विवंचनेशिवाय

इतके लोक प्रायोजित कसे?

आणि नसतील प्रायोजित तर

उत आलेले आजारीच असू शकतात...

आजारी लोक राजरोज संचारतात

आणि सर्वदूर संसर्ग पसरवतात

या लोकांची घृणा करता येत नाही

कारण ते भयंकर आजारी आहेत 

दिवसेंदिवस ही लागण फैलावणारी

या आजाराला डॉक्टर चालत नाही  

आणि लोक पटापट आजारी होत जातात...

- पर्वतांवर विराजमान निर्जीव दगडं

लोकांना दूरुनही ओळखत नाहीत

पण दगडांच्या एकतर्फी भक्तीत

लोक आजारी पडत आहेत!

                    (अप्रकाशित. कवितेचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

© डॉ. सुधीर रा. देवरे

ब्लॉगचा पत्ता :  http://sudhirdeore29.blogspot.com/