बुधवार, २८ फेब्रुवारी, २०१८

भाषा अहिराणी


 
- डॉ. सुधीर रा. देवरे

     उत्तर महाराष्ट्रातील खानदेशात बोलली जाणारी प्रमुख भाषा ही अहिराणी भाषा आहे. पूर्वी घरात, मित्रांत, नातेवाईकांत, बाजारात, दुकानात, दैनंदिन व्यवहारात, शेती व्यवहारात सर्वत्र अहिराणी भाषा बोलली जायची. घरात पूर्णपणे अहिराणीत संभाषण होत असे. कारण खानदेशातली अहिराणी ही लोकभाषा आहे. म्हणजेच उत्तर महाराष्ट्रातील खानदेशची प्रमाणभाषा अहिराणी आहे.
     त्या काळातला प्राथमिक शाळेतला शिक्षक असो की माध्यमिक शाळेतला. शाळेतून शिक्षक बाहेर पडले की ते घरी-दारी अहिराणी भाषा बोलायचे. शाळेत विद्यार्थ्यांनाही आपसात अहिराणी बोलायला अलिखित परवानगी होती. मात्र शिक्षक आणि विद्यार्थी एकमेकांशी मराठी बोलत. आपसात बोलण्यासाठी विद्यार्थ्यांना मराठीची सक्‍ती नव्हती. घरात आणि नातेवाईकांत नैसर्गिकपणे अहिराणी भाषा बोलली जायची.
     पुढे पुढे केव्हातरी भाषेबाबत न्यूनगंड बळावत गेला. भाषेच्या शुध्द अशुध्द स्वरूपावर अधिकारी चर्चा होऊ लागली. बोलीभाषा बोलणार्‍यांना गावंढळ संबोधलं जाऊ लागलं. कोणाकडून भाषेतले उच्चार नीट होत नसले तर हिनवलं जाऊ लागलं. घरी बोली भाषेत बोलणारा शिक्षक शाळेत येताच बळजबरी तथाकथित शुध्द भाषा बोलण्याचा प्रयत्न करू लागला. आणि एखाद्या‍ विद्यार्थ्याच्या तोंडातून चुकून बोलीतला शब्द निघाला की तो शिक्षक त्या विद्यार्थ्याला चिडवत त्याचा अपमान करू लागला. अशा पायरी पायरीने होणार्‍या बदलात शाळेत गेलं की विद्यार्थ्याने मराठीच बोललं पाहिजे अशी आचारसंहीता आपोआप आणि केव्हा तयार झाली हे कोणालाच कळलं नाही.
     शाळेत कोणी विद्यार्थी चुकून अहिराणी बोलला तर तो चेष्टेचा विषय होऊ लागला. हिनवला जाऊ लागला. अहिराणी बोलणं ही बाब न्यूनगंड तयार करू लागली. हे सर्व भयानक आहे हे कोण कोणाला सांगेल, अशी परिस्थिती. ‘इथे अहिराणी बोलण्यास सक्‍त मनाई आहे.’ अशा इकडच्या काही सरकारी कार्यालयात पाट्या सुध्दा लावल्या गेल्या. आणि अशा अनेक कारणांनी खानदेशातील बर्‍याच लोकांनी अहिराणी बोलणं सोडलं.
     खानदेशातल्या अहिराणी सारखे त्या त्या भागातल्या बोलीभाषांवर हा दबाव येऊन भाषा अस्तास जायला लागल्या. यामुळे बोली भाषांची अतोनात हानी झाली. हा मधला काळ सोडला तर त्यानंतर भाषा शास्त्राचे वारे शिक्षण क्षेत्रात आले हे नशीब. विद्यार्थ्याला त्या त्या बोली भाषेत शिक्षण दिलं गेलं पाहिजे हे मान्य होऊ लागलं. आणि मग ही प्रमाणभाषेची आचार संहीता नष्ट होऊ लागली. पण ह्या गोष्टीला खूप उशीर झाला होता. या आधीच्या न्यूनगंडामुळे बोलीभाषांचं जे नुकसान झालं ते पुढे भरून आलं नाही.
     या अशा आणि न्यूनगंडांच्या अनेक कारणांमुळे आज अहिराणी भाषेतून मूळ अहिराणी शब्द लुप्त होत आहेत. आज अनेक अहिराणी शब्दांची जागा इंग्रजी व मराठी शब्दांनी घेतली आहे. अहिराणीच्या बाबतीत जे घडलं ते सगळ्याच बोली भाषांच्या वाट्याला आलं.
     नाशिक (जिल्ह्यातील पूर्व भाग), धुळे, नंदुरबार, जळगाव (पश्चिम भाग) या चार जिल्ह्यात अहिराणी भाषा बोलली जाते. खानदेशातली ‍अहिराणी ही लोकभाषा असून याच पट्ट्यात काही अहिराणी पोट भाषा समजल्या जातात. बागलाणी, नंदुरबारी, खानदेशी, खाल्यांगी, वरल्यांगी अशा काही अहिराणी लोकभाषेच्या पोटभाषा आहेत. अहिराणी परिसरात काही जाती- जमातीय भाषाही बोलल्या जातात. भावसारी, तावडी, पावरी, भिल्ली, मावची, गुर्जरी, लेवापाटीदार, देहवाली, कोकणा, वारली, ठाकर, लाडशिक्की, घाटकोकणी आदी बोलीही बोलल्या जात असल्या तरी या सर्व पोट भाषांवर अहिराणी भाषेचा पगडा दिसून येतो.
          सगळ्याच बोली आज जपल्या पाहिजेत तरच प्रमाण मराठी जपली जाईल.
     (या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
   इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

बुधवार, १४ फेब्रुवारी, २०१८

ग्रामीणांचा आहार


 
- डॉ. सुधीर रा. देवरे

     बाजरीची भाकरी आणि कोणतीही भाजी हा गावातल्या लोकांचा रोजचा मुख्य आहार असायचा. भाजीला पूर्वी या परिसरात अहिराणी भाषेत शाक म्हटलं जायचं. ऋतू कोणताही असो दररोज बाजरीची भाकर जेवणात असायची. भाकर गरम पडते वा डांजते असं कधी चुकूनही कोणाकडून ऐकायला मिळायचं नाही. आणि आजारी पडल्यावर असं निदान इथल्या डॉक्टरनेही कधी केलं नाही. या परिसरात त्यावेळी बाजरी मुबलक प्रमाणात पिकत असल्यामुळे इथल्या जेवणात बाजरीच्या भाकरी शिवाय अजून काही पर्याय असू शकतो अशी कल्पनाही कोणाला नव्हती. इथं गहूही पिकायचा. पण घरचा गहू असूनही कोणी रोज चपात्या खात नव्हतं.
     अशा जेवणा व्यतिरीक्‍त कुठ वेगळं जेवण दिसलं की ती खाण्याची चैन समजली जायची. नातेवाईकांकडे- भावबंदांकडे पाहुणे आले की पाहुण्यांना जेवण सांगण्याची पध्दत होती. पाहुण्याला त्यातल्यात्यात उजवं जेवण म्हणून भजींची आमटी, भाकर, भात, लोणचं, पापड, कांदा असं ताट भरून वाढलं जायचं. ज्या पाहुण्याला जेवायला बोलवलं त्याला कोणी बाहेर विचारलं, ‘काय जेवण होतं’, तर तो पाहुणाही केवळ भजींची आमटी न म्हणता ताट भरून आलेल्या सगळ्या जीनसांची नावं सांगायचा.
     भात हा अलिकडील जेवणात नैसर्गिक पदार्थ समजला जात असला तरी, खिचडी- भात त्याकाळी इथल्या जेवणाचा भाग नव्हता. लोकांकडे केवळ सणाच्या दिवशी सार सोबत भात खावा लागतो म्हणून दुकानातून तेवढ्यापुरता बिटेभर वा चिटेभर तांदुळ मागवला जायचा. तांदळाचे वेगवेगळे प्रकार असतात आणि त्या प्रकारानुसार त्याची किंमत ठरलेली असते हे ही त्यावेळी माहीत नसायचं. दुकानदार जो काही बिटेभर तांदूळ देईल आणि जी किंमत सांगेल तो तांदुळ भातासाठी घेतला जायचा. म्हणजे गावात तांदळाच्या व्हरायट्या दुकानदाराकडे नसत.
     भाकरी सोबत आजच्या काही भाज्या त्या काळात दिसत होत्या तरी तेव्हा रानभाज्यांचे प्रमाण जेवणात जास्त प्रमाणात होतं.
     ज्याला कदान्न म्हटलं जाईल अशा प्रकारचे पदार्थ त्यावेळी नाइलाज म्हणून खावे लागत असले तरी तो एक पारंपरिक खाद्य पदार्थांचा आणि लोकजीवनाचाच अविभाज्य भाग बनून गेला होता. म्हणून ते कदान्नही आवडीने खाल्लं जायचं. यापैकी काही पदार्थांना सणसणीत चव असायची.
सोलासनं बट्ट, सोलासनं तिखं, लसुननं तिखं, कोंडाळं, घाटा, बेसन, सुघरं भुगरं, मटमुंगना वडानं बट्ट, मिरचीना खुडा, कुळीदनी घुगरी, कुळीदना मुटकळा,‍ लोंचाना खार, मिरचीना ठेचा, काळा समार, तेलगुळना काला, चिखल्या, गुळ टाकून शिजवलेले शिळ्या भाकरीचे तुकडे अशा प्रकारचे पौष्टीक नसलेले आणि काही बेचव असलेले पदार्थ कांदा तोंडी लावून भाकरी सोबत खाऊन लोक आपल्या कामाला लागायची. झिंदरं आणि वांगानं भरीत त्यातल्या त्यात चविष्ट पदार्थ असायचे.
आता सांगितलेले अनेक खाद्य पदार्थ आज एकतर नामशेष झाले आहेत वा आपल्या ‍जीवनातून हद्दपार होण्याच्या बेतात आहेत. आजचा आहार हा समतोल आहाराऐवजी गरजेपेक्षा जास्त आणि चमचमीत चवीचा आहार दैनंदिन जेवणात घेतला जातो. मात्र हा आहार दुर्गम खेड्यातले गरीब लोक अजूनही घेत आहेत. असं कदान्न खाऊनही ते अर्धपोटीच राहतात. ज्यांची स्थिती आज मध्यमवर्गीय म्हणता येईल अशी प्रगती केलेले लोक हे पदार्थ विसरून गेले आहेत.
     (या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
   इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/