शनिवार, २९ डिसेंबर, २०१२

एकमेव = EKMEV




-         डॉ. सुधीर रा. देवरे

      एक जानेवारी 2013 पासून एकमेव = EKMEV या नावाचा ग्रुप मी सुरू करीत आहे. हा ग्रुप सर्वांसाठी खुला राहणार असून आपले वैचारिक दर्जेदार लेखन यात करावे.  इतरांचे लिखाण वाचून त्यावर भरीव चर्चा करावी असे आवाहन करीत आहे. यात फोटो आणि व्हीडीओ लोड करणे शक्यतो टाळावे आणि लिखाणावर - विचारांवर जास्त भर असावा अशी अपेक्षा आहे.
      या ग्रुपमध्ये खालील सर्व प्रकारचे लेखन आणि चर्चा व्हावी असे मला वाटते:
1. भाषा: सर्व भाषांचे बोलींचे स्वागत
2. कला: चित्र, शिल्प, संगीत आदी सर्व प्रकारच्या कलांचे उपयोजन आणि लिखाण.
3. साहित्य: कविता, कथा, नाट्य, कादंबरी, समीक्षा, पुस्तक परिक्षण,
   पुस्तक ओळख आदी
4. धर्म : सर्व धर्मांची-पंथांची-जातींची- आदिवासींची प्रबोधनात्मक, सुधारक चर्चा
   करण्यात यावी.
5. सामाजिक: सर्व मते, सर्व प्रवाह, अंध श्रध्देविरूध्द लढा.
6. संस्कृती: लोकसंस्कृती, लोकजीवन, लोकभाषा, आदिवासी भाषा, लोकवाड्.मय आदी.
7. लैंगिक शिक्षण: स्त्री पुरूष संबंध, समज गैरसमज यावर विषय देऊन लिखाण करणे.

      या व्यतिरिक्त राजकीय, भ्रष्टाचार विरोध, प्रबोधनात्मक टीका टिपणी, सर्व मते- प्रवाह, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी, पर्यावरण, जलसाक्षरता, साक्षरता, वैद्यकीय, शास्त्रीय माहिती अशा सर्व घटकांगांचा सकस दर्जेदार अभ्यास यातून यावा म्हणून एकमेव या अर्थपूर्ण नावाने हा ग्रुप सुरू करीत आहे. आपणा सर्वांचे विचार सहकार्य मिळून काही नवनीत निघावे ही इच्छा. या विवेचनाखाली ग्रुपची लिंक दिली आहे. लिंकवर क्लिक करून इच्छुकांनी ग्रुपचे सभासदत्व घेण्यासाठी विनंती पाठवावी.

-         डॉ. सुधीर रा. देवरे
            sudhirdeore29@rediffmail.com

या ग्रुपची लिंक: http://www.facebook.com/groups/121749187987264/?fref=ts

      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
         

शनिवार, २२ डिसेंबर, २०१२

पशू बलात्कार करत नाहीत




-         डॉ. सुधीर रा. देवरे

       दिल्ली: जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाच्या राजधानीचे शहर. दिल्ली: भारताचे पंतप्रधान ज्या शहरात राहतात. दिल्ली: भारताचे राष्ट्रपती ज्या शहरात राहतात. दिल्ली: भारताच्या लोकशाहीचे निर्णय जिथून घेतले जातात ती संसद ज्या शहरात आहे. दिल्ली: ज्या केंद्रशासीत प्रदेशातील मुख्यमंत्री एक महिला आहेत.
         अशा या सुशिक्षित दिल्ली शहरात. दिनांक 16 -12- 2012. रात्री फक्त नऊ वाजून पस्तीस मिनिटं. एका शाळेच्या धावत्या बसमध्ये. कंडक्टर आणि ड्रायव्हर या कर्मचार्यांसमोर. नव्हे त्यांच्यासहीत. एकमेकांना ओळखणारे. न ओळखणारे सगळेच प्रवासी. एक होऊन. एका उच्चशिक्षित विद्यार्थिनीवर सामुहीक बलात्कार. सुमारे दोन तास. एक तास: बलात्कार. दुसरा तास: चालत्या बस मधून फेकल्यावर नागड्या स्त्री देहाची फक्त गंमत पहात उभा पन्नास लोकांचा मॉब. म्हणजे शंभर डोळ्यांचा पुन्हा बलात्कार.
         दिल्ली. कलकत्ता. चेन्नई. बँगलोर. मुंबई. पुणे. नागपूर. कोल्हापूर. वसई. डोंबिवली. नाशिक. जळगाव. खैरलांजी. पाथरवट वस्ती. कोणतेही शहर. कोणतेही गाव. तालुक्याचे गाव. खेडे-पाडे. घर. शेत. शाळा- आश्रमशाळा. धावती खाजगी वाहने. धावत्या सार्वजनिक रेल्वे. आणि आता धावत्या सार्वजनिक बसेस. तीच कहाणी. तीच आवृत्ती. रोज.
         पासष्ट वर्षाची महिला. साठ वर्षाची महिला. पन्नास वर्षाची महिला. चाळीस वर्षाची महिला. तीस वर्षाची तरूणी. वीस वर्षाची तरूणी. पंधरा वर्षाची अल्पवयीन. नऊ वर्षाची अल्पवयीन. चार वर्षाची चिमुरडी. एक वर्षाची चिमुकली. सहा महिण्याची चिमुकलीही. स्त्री एक वस्तु. वापरा आणि (चालत्या वाहनातून) फेका. नाहीतर मारून पुरावा नष्ट करा. एका वर्षात एका शहरात इतके हजार. आकडेवारी प्रसिध्द. अभ्यासपूर्ण.
         पशू बलात्कार करत नाहीत. पशुंमध्ये निसर्गाला अनुसरत- अनुनय करत परस्पर सहमतीने मिलने होतात. बलात्कारासाठी एक पशू दुसर्या पशूला मदत करत नाही. चार- सहा पशू मिळून एका मादीवर आळीपाळीने बलात्कार करत नाहीत. बलात्काराला पाशवी म्हणणे हा पशूंचा अपमान आहे. हे मानवी बलात्कार. शरमेने माझी मान खाली जातेय. मला लाज वाटते. सांगायला. बोलायला. लिहायला. आणि माझ्या पुरूषत्वाचीही. सुन्न. पण दुर्दैव. हा ही ठरेल फक्त एक स्वल्पविराम,

-         डॉ. सुधीर रा. देवरे
            sudhirdeore29@rediffmail.com
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
         

शनिवार, १५ डिसेंबर, २०१२

प्रेतावर अग्निसंस्कार: श्रेष्ठ परंपरा




-         डॉ. सुधीर रा. देवरे

      मध्यंतरी एक बातमी वाचण्यात आली: हाँगकाँग मध्ये कबरस्थानात अंत्यसंस्कार करण्यासाठी पंधरा दिवसांची प्रतिक्षा करावी लागत असून अंत्यसंस्कारासाठी पाच ते बावीस लाखापर्यंत खर्च येतो. तिथे जागेच्या अभावामुळे बहुमजली इमारतींच्या धर्तीवर कब्रस्थान बांधण्यात येत आहे... अशा आशयाची ती बातमी होती.
      ज्या ज्या धर्मांत प्रेतांचे दफन करतात त्या त्या धर्मातील आचार संहिता सांगते की प्रेतांच्या कबरी टिकाऊ करू नयेत. म्हणजे विशिष्ट कालावधीनंतर ती जागा पुन्हा दुसर्या कबरीसाठी वापरता येऊ शकते. मात्र तसे होत नसल्याने कालांतराने जागेचा प्रश्न भेडसावतो. जगातील कोणत्याच धर्माने प्रेतावर अग्निसंस्कार करणे निषिध्द ठरवलेले नाही, हे ही लक्षात घेतले पाहिजे.
      भारतातील आणि विशेषत: हिंदु धर्मिय माणसाच्या मृत्यूनंतर त्याला सार्वजनिक स्मशानभूमीत- आता आधुनिक नामकरणाच्या अमरधामात अग्निडाग दिला जातो. म्हणून माणूस खर्या अर्थाने पंचतत्वात विलीन होतो. (कब्रस्थानात पुरलेलं प्रेत कोणी वेगळ्या हेतूसाठी बाहेर काढू शकतं अथवा जंगली जनावरांच्या भक्षस्थानीही पडू शकतं. मात्र प्रेत जाळलं तर एखाद्या दुर्धर रोगी प्रेताच्या शरीरातील जिवाणू विषाणूही नष्ट होतात. आता झाडे वाचवण्यासाठी विद्युतदाहिनी संयत्र वापरणेही गरजेचे झाले आहे.)
      अग्निडाग दिल्यानंतर अस्थि वेचून झाल्या की त्याच जागेवर दुसर्या प्रेताला अग्निडाग दिला जातो. म्हणून स्मशानभूमी आडव्या पध्दतीने वाढत जात नाही. तिथला अग्नी कोणी जपून ठेवत नाही. पवित्र जागा म्हणून कोणी ती राखून ठेवत नाही त्या जागेवर कोणी आपला हक्क सांगत नाही. स्मशानाबाबत जनमानसात समज असलाच तर तो भीतीचा आहे, श्रध्देचा नाही. आपल्या माणसाचे स्मरण म्हणून जर कोणाला चिरा बसवायचा झाला तर तो आपल्या शेताच्या बांधावर अथवा आपल्या घरात- घराजवळ बसवतात, स्मशानात नाही. - ही थोर हिंदु परंपरा आहे.
      देहदान- किमान नेत्रदान करणे हा मरणोत्तर श्रेष्ठ परमार्थी पर्याय आज उपलब्ध आहेच. नेत्रदानासाठी आपल्या नजीकच्या डोळ्यांच्या इस्पितळात, ब्लाइंड असोसियेशन संघात वा आय डोनर बँकेत आपल्याला स्वत: फॉर्म भरून मृत्यूनंतर नेत्रदान करण्याचा मानस व्यक्त करता येतो. नेत्रदान इच्छुक व्यक्तीच्या मृत्यूनंतर वारसांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पाठपुरावा करून पूर्ण करून घ्यायची असते. एखाद्याने नेत्रदानाचा फॉर्म भरून नाव नोंदणी केलेली नसली तरी त्याच्या मृत्यूनंतर त्याचे वारस त्या व्यक्तिचे नेत्र दान करू शकतात.
      देहदानाची नाव नोंदणी मा‍त्र ती व्यक्ती हयात असतानाच तिने स्वत: फॉर्म भरून त्यावर स्वाक्षरी केलेली असली पाहिजे. देहदानाची नोंदणी नजीकच्या सरकारी वा खाजगी मेडीकल कॉलेजात वा मोठ्या इस्पितळांत (जे जे, टाटा, रूबी, ब्रिचकँडी, ससून आदी आणि प्रत्येक जिल्हयातील इस्पितळातही) करता येते. देहदानाची इच्छा व्यक्त केलेल्या आणि तसा फॉर्म भरलेल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर नाव नोंदणी झालेल्या मेडीकल कॉलेजला त्याच्या वारसांनी कळवायचे असते. मेडीकल कॉलेजच्या-इस्पितळाच्या अँब्युलन्सने वा आपल्या खाजगी वाहनाने तो देह दान करून वारसांनी तिथून तशी रीतसर पावती- पत्र घेणे जरूरी आहे.

-         डॉ. सुधीर रा. देवरे
            sudhirdeore29@rediffmail.com
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
         

शनिवार, ८ डिसेंबर, २०१२

राष्ट्रपिता




-         डॉ. सुधीर रा. देवरे

      काही दिवसांपूर्वी एका विद्यार्थिनीने न्यायालयात जन‍हीत याचिका दाखल केली होती की, भारत सरकारने महात्मा गांधींना राष्ट्रपिता ही उपाधी बहाल केली आहे काय? न्यायालयाच्या नोटीशीला केंद्र शासनाने उत्तर दिले, अशी कोणतीही उपाधी बहाल केलेली नाही.
      अशा अनुत्पादित फालतू प्रश्न उपस्थित करायला लोकांना इतका वेळ कसा मिळतो हा खरा प्रश्न आहे. आपल्यापुढे- म्हणजे भारतासमोर रोजचे इतके गहन प्रश्न आ वासून उभे आहेत की ते सोडवायला आपल्याला वेळ नाही. न्यायालयांना भांडणांचा निपटारा करायला वेळ पुरत नाही. आणि आपण कोणाच्या उपाधीची चौकशी करत भलत्याच गोष्टीत शक्ती खर्च करत आहोत. त्यानंतर चर्चेला ऊत येऊन कोणी म्हटलं, कायद्याने ती उपाधी महात्मा गांधींना बहाल करण्यात यावी, तर काहींनी यादीच तयार करून टाकली की, राष्ट्रपिता अजून कोणाकोणाला म्हणता येईल.
      यावर वेगळे भाष्य न करता राष्ट्रपिता नावाची माझी कविता उदृत करतो :
राष्ट्रपिता
राजेंद्र प्रसादांना जसे राज्यघटनेचे शिल्पकार म्हणता येणार नाही
पंडीत नेहरूंना जसे पोलादी पुरूष म्हणता येणार नाही
सावरकरांना जसे लोकमान्य म्हणता येणार नाही
आणि टिळकांना जसे स्वातंत्र्यवीर म्हणता येणार नाही
धर्मगुरूंना जसे सुधारक म्हणता येणार नाही
जीनांना जसे महात्मा म्हणता येणार नाही
तात्या टोपेंना जसे छत्रपती म्हणता येणार नाही
‍आणि विवेकानंदांना जसे नेताजी म्हणता येणार नाही
टागोरांशिवाय कोणत्याही व्यावसायिक भगव्या बुवाला
जसे गुरूदेव म्हणता येणार नाही
तसे महात्मा गांधींशिवाय कोणालाही
राष्ट्रपिता म्हणता येणार नाही.
कारण जनमानसात रूजलेली आद्य प्रतिमा
कायद्याने बदलता येत नाही...

-         डॉ. सुधीर रा. देवरे
            sudhirdeore29@rediffmail.com
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
         

रविवार, २ डिसेंबर, २०१२

बोलीभाषा: काही समज काही आक्षेप


                                                  -डॉ. सुधीर रा. देवरे

डिसेंबर दोनहजार अकरा मध्ये झालेल्या नाशिक येथील चौथ्या अहिराणी साहित्य संमेलनातील परिसंवादातील माझ्या अध्यक्षिय भाषणावर नंतर जे मला खाजगीत प्रश्न विचारले गेले वा काही अभ्यासकांकडून आक्षेप घेतले गेले, त्या आक्षेपांवरील उत्तर म्हणजे हा लेख. मात्र हा संदर्भ काढून टाकला तरी हा स्वतंत्र लेखाचा विषय आहेच. भाषण अहिराणी भाषेतच का? मराठीत का नाही हा सुध्दा त्यात एक प्रश्न होता. बोली भाषांबद्दल सर्वसामान्यांमध्ये किती पराकोटीचे अपसमज पसरलेले आहेत, हे यावरून लक्षात आले. कोणी बोलून दाखवतं तर कोणी बोलत नाही एवढेच. म्हणून कोणतीही बोली भाषक नसलेल्या वाचकांसाठी आणि सगळ्याच बोलीभाषांबद्दल कोणाचाही आकस निर्माण होऊ नये यासाठी हा लेख मी मुद्दाम लिहीत आहे.
      अनेक लोकांचे बोलीभाषेबद्दल काही समज आहेत. काही अपसमज आहेत. समाजात फक्त प्रमाणभाषा असाव्यात. बोलीभाषा नकोत. भाषा जेवढ्या कमी असतील तेवढे दळणवळण सुलभ होईल असा त्यांचा भाबडा समज असतो. एक देश एक भाषा असा नाराही एकेकाळी गाजला आहे. आपली भाषा सोडून इतर भाषा वा बोलींबद्दल असे मत मांडणे अशा एखाद्या तथाकथित अभ्यासकाला शोभून दिसेल, ज्या अभ्यासकाचा एखादी बोली बोलणार्या लोकांशी कधी कोणताही संबंध येत नाही. त्या बोलीतले अपरिहार्य लोकजीवन त्या अभ्यासकाला मा‍हीत नसते. तरीही त्यांनी प्रमाणभाषाच बोलावी असा आग्रह असतो. पण जेव्हा एखाद्या व्यक्तिला वा गटाला एका विशिष्ट बोली व्यतिरिक्त कोणतीही भाषा बोलता येत नाही आणि तरीही ती भाषा वाळीत टाकली जाते व त्या गटाला विशिष्ट भाषा बोलायला वा शिकायला भाग पाडले जाते, तेव्हा ही माणसाच्या अस्तित्वालाच सुरूंग लावणारी घटना ठरते. कोणीतरी आपली जीभ कापून टाकतंय असा हादरवून टाकणारा हा अनुभव असतो.
विशिष्ट भौगोलिक परिसरातल्या बोली त्या क्षेत्रातील प्रमाणभाषा बोलणार्या लोकांना थोड्याफार कळतात. अहिराणी भाषा सुध्दा अनेक मराठी लोकांना कोणत्याही अडचणीशिवाय कळते. काही पारिभाषिक शब्दांची अडचण येऊ शकते, प एकूण मथितार्थ कळतो. मी संपादित करीत असलेले अहिराणी माध्यमातील ढोल आणि माझे अहिराणी लेख, पुस्तके सुध्दा महाराष्ट्रभर आणि बाहेरही सर्व चोखंदळ मराठी वाचकांना समजतात. याचा उल्लेख मी इथे मुद्दाम करीत आहे.
चौथ्या अहिराणी साहित्य संमेलनात नाशिकच्या मराठी लोकांनाही माझे अहिराणी भाषण समजावे म्हणून मी भाषणाची रचना सोप्या अहिराणीत केली होती. आता सोपी अहिराणी म्हणजे काय यावरही नवा आक्षेप येण्याची शक्यता असल्याने त्याचे स्पष्टीकरण आताच देऊन ठेवतो. जशी सोपी मराठी, अवघड मराठी; सोपी हिंदी, अवघड हिंदी; सोपी इंग्रजी, अवघड इंग्रजी; अशी आपण वर्गवारी करतो त्या अर्थाने सुलभ अहिराणी ही संज्ञा मी येथे वापरतो आहे.
      दुसरे उदाहरण देतो. राम गणेश गडकरी यांच्या भावबंधन नाटकातील भाषा मराठी आणि ग. दी. माडगूळकर यांच्या कवितेची भाषाही मराठी. एक समजायला कठीण. दुसरी समजायला सोपी.
      भाषा ह्या प्रवाहासारख्या असतात. प्रवाहात नदीचे पात्र जसे पुढे विस्तृत होत जाते तसे भाषेचे असते. भाषा एकच असली तरी आजची भाषा कालच्या भाषेपेक्षा वेगळी असते. उदाहरणार्थ, ज्ञानेश्वरांची मराठी, शिवाजी-तुकाराम यांची मराठी, ज्योतिराव फुल्यांची मराठी, चिपळूणकरांची मराठी आणि आजची मराठी यांत जसे साम्य नाही तसे अहिराणीत आज आदिमपण दिसणार नाही. तसे कोणत्याच बोलीभाषेत आदिमपण दिसणार नाही.
आदिम, प्राचीन, आर्ष या संज्ञा मी अहिराणीच्या वा कोणत्याही बोलीभाषेच्या संदर्भात वापरत नाही. माझ्या लेखाचा तो कधी विषय सुध्दा करत नाही. पण मध्यंतरी एका अभ्यासकाने अहिराणी ही आदिम बोली आहे का हा प्रश्न मला विचारला होता. माझ्या कोणत्याही लेखात  तसा उल्लेख नसताना. अहिराणीच नव्हे तर बहुतेक बर्याच बोली या आदिम आहेत. नैसर्गिक क्रमानुसार आधी बोली निर्माण होतात आणि मग प्रमाणभाषा. विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातील एकमेकांना लागून असलेल्या विविध बोलींच्या सरमिसळ मानवी व्यवहारातून प्रमाणभाषा निर्माण होत असतात.
आज भाषेतील फक्त शब्दांचे आदिमपण सांगता येते. संपूर्ण भाषेचे आदिमपण दाखवता येत नाही. कारण अनेक भाषांच्या आदान प्रदानातून सगळ्याच भाषा एकमेकांना पुरक होत राहतात. मी ज्या अभ्यासकाचा उल्लेख केला त्यांनीच, संस्कृत आदिम भाषा आहे हे सांगताना  संस्कृत मधील विष्णु हा असा एकच शब्द सांगितला की ज्याची व्युत्पत्ती सांगता येत नाही. आणि संस्कृत मधील या एका शब्दाची व्युत्पत्ती सांगता येत नाही म्हणून त्यांच्या मते संस्कृत ही समग्र भाषा आदिम ठरते. अहिराणीचे आजही असे शंभर शब्द सहज सांगता येतील की ज्यांची व्युत्पत्ती लावता येत नाही. त्या शब्दांचे नैसर्गिक स्त्रोत दाखवता येत नाहीत. तरीही अहिराणी ही आदिम भाषा आहे असा दावा करणे मी अप्रस्तुत समजतो.
अहिराणी भाषेत प्रचलित मराठी शब्दांचे अवशेष-रूपे दिसतात, हे खरे आहे. आज अहिराणी बोली बोलणारे लोक पहिलीपासून मराठीत शिक्षण घेतात. त्यामुळे अहिराणी मध्ये मराठी शब्द आज प्रंचड प्रमाणात रूढ झालेत. जेव्हा एखादी बोली प्रमाण भाषेच्या प्रभावाखाली येते तेव्हाच तिचे अर्वाचिनीकरण होणे सुरू होते. शब्द, व्याकरण आणि लिपीही प्रमाणभाषेकडून उसने घेतले जातात. अहिराणीला स्वतंत्र लिपी नसल्याने जसे माझे अहिराणी लेखन मराठी म्हणजे देवनागरी लिपीत लिहिले. उपलब्ध मराठी लिपीत अहिराणी लिहिल्यामुळे तिचे दृश्य रूपच मराठी दिसते तर मग ती आदिम कशी वाटेल? आणि ती आदिम आहे की नाही यावर चर्चा कशासाठी?
भाषेत जसे शब्दांचे आदान प्रदान होत राहते तसे व्याकरणाचेही होत असते. याचे एकच उदाहरण देतो. मराठी व्याकरणानुसार वाक्याची सुरूवात आणि या संज्ञेने होत नाही. आणि ही संज्ञा वाक्याच्या मधे येत असते. पण इंग्रजी व्याकरणानुसार वाक्याची सुरूवात (अँड) आणि ने होते. मात्र अलिकडच्या काळात मराठीतही आणि ने सुरूवात होणारी वाक्य लेखकांकडून सुध्दा सहज लिहिली जातात. संशोधनात्मक प्रबंधांतही अशी वाक्य येत आहेत. हे इंग्रजी भाषकांकडून व्याकरणाचे आदान आहे. याचा अर्थ मराठी भाषेला इंग्रजी व्याकरण आहे असे जसे म्हणता येणार नाही तसे अहिराणीला पूर्णपणे मराठी व्याकरण आहे असे म्हणता येणार नाही.    
ज्या प्राचीन भाषा इतर भाषांच्या संपर्कात आल्या नाहीत त्यांचे आदिमपण आजही टिकून आहे. उदाहरणार्थ, आंदमान बेटावरील जारवा या आदिम माणसांची भाषा आज आदिम- प्राचीन-आर्ष म्हणता येईल. कारण जारवा ही जमात इतर लोकांच्या संपर्कात अजूनही आलेली नाही. ज्या बोली इतर भाषांच्या संपर्कात आल्या त्यांचे प्राचीनत्व त्यांच्यातील काही शब्दांवरून ठरवता येते. भाषेवरून नाही.  
      जिथे शब्द फक्त हुंकाराचे काम करतात अशा प्राचीन भाषांना अगदी सुरूवातीच्या काळात व्याकरण नसते.  मात्र भाषेत वाक्य यायला लागलीत की व्याकरण येतेच. म्हणून प्रत्येक भाषेला व्याकरण असते. बोलीभाषांना व्याकरण नसते हा समज चुकीचा आहे. त्या बोलीभाषेचे व्याकरण आतापर्यंत कोणी लिहिले नसेल, व्याकरण समजून सांगितले नसेल, अथवा त्या भाषेतल्या व्याकरणाचे पुस्तक प्रकाशित झाले नसेल. पण त्या बोलीला व्याकरणच नाही असे म्हणता येणार नाही.
परंपरेने चालत आलेल्या नैसर्गिक लोकबोली वेगळ्या आणि पिजीन - क्रिऑल या कृत्रीम तयार झालेल्या बोली वेगळ्या. बोलीपासून व्यावहारीक प्रमाणभाषा तयार होतात. मात्र पिजीन - क्रिऑल सारख्या कृत्रीम बोली या प्रमाणभाषेपासून तयार होत असतात. उदाहरणार्थ, मुंबईची हिंदी बोली ही अनेक प्रमाणभाषांच्या संकरातून तयार झालेली क्रिऑल भाषा आहे. (काही गुप्त व्यवहारांसाठीही कृत्रीम सांकेतिक भाषा तयार केल्या जातात, त्यांनाही बोली म्हणता येत नाही.)
एक अभ्यासक मला म्हणाले की, बोली सुधारल्या तर मराठी सुधरेल असे तुम्हाला का वाटते? हा प्रश्न ऐकून चक्रावण्याची वेळ आली. असे मी आतापर्यंतच्या माझ्या लिखाणात कुठेच म्हटलेले नाही. बोली मुळीच सुधारायच्या नाहीत. उलट बोली जशा आहेत त्याच स्वरूपात त्या वाचवायच्या आहेत. इतर भाषेतील शब्दांऐवजी मूळ भाषेतील शब्द सापडत असतील तर बोलीत ही दुरूस्ती नक्कीच करायला हवी. बोली वाचवल्या तर प्रमाणभाषा टिकतील आणि सकस समृध्द होतील हे मात्र खरे आहे, जे मी वेळोवेळी म्हटले आहे.
अहिराणी ही अहिर लोकांचीच भाषा आहे, हे कशावरून? हा एक आक्षेप. अभिर लोकांचा एक समूह होता जो नैऋत्य कडून आला, असे इतिहासकारांनी आधीच नमूद करून ठेवलेले आहे. अभिरचा अपभ्रंश नंतर अहिर झाला. अहिर हे एका विशिष्ट जातीचे नव्हते. म्हणून आजही अहिर कुणबी, अहिर सोनार, अहिर लोहार, अहिर शिंपी अशा सर्व जातीत अहिर हे कुळ आढळते. अहिर लोकांची भाषा ती अहिराणी. आणि तेव्हापासून म्हणजे तिच्या उगमापासूनच ती लोकभाषा आहे. अहिराणी ही विशिष्ट जातीची भाषा नाही.
लोकदेव म्हणजे काय हे सुध्दा अनेक लोकांकडून विचारले गेले. पण भाषणातील विवेचनावरून ते सह्ज लक्षात येते. लोकांनी लोकांसाठी तयार केलेला तो लोकदेव. लोकदेव हा लोकांचा साधासुधा देव असतो. लोकांचे अन्न ते त्याचे अन्न. लोकांचे कपडे ते त्याचे वस्त्र. म्हसोबा, आसरा, मुंजोबा, वाघदेव, नागदेव, खांबदेव, पिरोबा, खंडोबा, डोंगरदेव, कन्सरा माउली आदी अहिराणी पट्यातील लोकदेव आहेत. आणि या लोकसंस्कृतीतून लोकभाषा घडत असते.
      शेवटी, एका अभ्यासकाने जे काही म्हटले आहे त्या आक्षेपाला काय उत्तर द्यावे मला सुचत नाही. बोलीभाषा टिकवल्या पाहिजेत, त्या मरू देता कामा नये, त्यांचे संगोपण करणे, त्यांचे डाक्युमेंटेशन करणे, बोलीभाषा बोलणार्या लोकांना समजून घेणे आदी प्रकारच्या सर्व कामाला त्यांनी प्रतिगामी ठरवले आहे. आणि बोलीभाषा मारून प्रमाणभाषेकडे जाणे म्हणजे त्यांना पुरोगामी वाटते. अशी संकुचित टिका याआधी मी कधीच ऐकली नव्हती. पण अशा विचारांचे लोकही आहेत हे लक्षात येत होते. अशा विचारांच्या लोकांनी मराठी भाषेत तरी का बोलावे आणि मराठीत का लिहावे? कारण मराठी सुध्दा महाराष्ट्रापुरती एक बोली भाषाच आहे. या बोलीभाषेत व्यवहार करून प्रतिगामी ठरण्यापेक्षा त्यांनी जागतिक भाषेत म्हणजे फक्त इंग्रजीत व्यवहार करून पुरोगामी असणे इष्ट ठरेल.
      याचे उत्तर कदाचित ते देतील की मराठी ही आमची मातृभाषा आहे म्हणून आम्ही ती उपयोजित करतो. मग वेगवेगळ्या बोली बोलणार्यांची आणि बोलीभाषा जतन करणार्यांचीही तीच भूमिका आहे हे त्यांच्या लक्षात का येत नाही.

(दिनांक ३ व ४ डिसेंबर २०११ ला नाशिक येथील महाकवी कालिदास कला मंदिरात आयोजित अ. भा. चौथ्या अहिराणी साहित्य संमेलनातील अहिराणी बोली: सामाजिक अनुबंध या विषयाच्या परिसंवादातील माझ्या अध्यक्षिय भाषणावर नंतर ज्या प्रतिक्रिया आल्या- काही आक्षेप घेतले गेले. त्यांचे निरसन म्हणजे हा लेख आहे.)
(भाषा आणि जीवन, पुणे, दिवाळी अंक 2012 यात प्रसिध्द झालेला लेख. प्रका‍शन, 10 नोव्हेंबर 2012)
-             डॉ. सुधीर रा. देवरे
            sudhirdeore29@rediffmail.com
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/