गुरुवार, १ सप्टेंबर, २०२२

वही : पारंपरिक जाणिवेची कविता

 


 - डॉ. सुधीर राजाराम देवरे

 

          प्रास्ताविक : ना. धो. महानोर यांचा वही कवितासंग्रह म्हणजे रानातल्या कविता या संग्रहानंतरचा हा दुसरा कवितासंग्रह. या संग्रहातही लहानसहान कविताच समाविष्ट झालेल्या असून यात बऱ्याचशा गेय अशा गीत प्रकारातल्या कविता आहेत. एकूण साठ कविता समाविष्ट असलेल्या या संग्रहातील कवितांना शिर्षके दिलेली नसून केवळ क्रमांक दिलेले आहेत.

          कवितासंग्रहाला वही हे नाव देण्यामागे विशिष्ट भूमिका असल्याचे लक्षात येते. वही हा एक पारंपरिक लोकआख्यान प्रकार आहे. हा गीत प्रकार मौखिक स्वरूपात परंतु गेयतेने नाल, टाळ, डफ, ढोलकी, झांज, थाळी, खंजिरी, सांबळ, तुणतुणे आदी वाद्यांवर गायला जातो. ताल, ठेका व झील ओढणे हे या प्रकाराचे वैशिष्ट्य असून तो लवचिक यमकबद्ध असतो. एकट्या दुकट्याने नाही तर सामुहिक पद्धतीने वह्या गायल्या जातात. या संग्रहातील बरीचशी कविता वही या लोकपारंपरिक कवितेच्या वळणाने आविष्कृत झाली असल्यामुळे संग्रहाला हे नाव देण्यात आले असावे.

          कवितेची वैशिष्टे : कविता क्रमांक २८, ३६, ३७, ४१, ४२, ४३, ४४, ४५ या कविता गद्य मुक्त शैलीतील वाटतात तर कविता क्रमांक ४९, ५२, ५३, ५४, ५७ लावणी गिते असल्याचे लक्षात येते. उरलेल्या सर्व कविता ओव्या, जात्यावरच्या ओव्या आणि अभंगांच्या रूपात आविष्कृत झालेल्या दिसतात. म्हणजेच ओवी आणि जात्यावरची ओवी यांचा रूपबंध आणि घाट या संग्रहातील बहुतांश कवितांना मिळालेला आहे.

          मराठवाड्यातल्या ग्रामीण- शेतकरी बोलीभाषेतल्या या कविता आहेत. नैसर्गिक भाषेमुळे कवितेतले शब्द चित्रदर्शी झाले आहेत. बऱ्याचशा कविता यमक्या असूनही त्यात कारागिरीचा भाग कमी आणि उत्स्फूर्तता अधिक असल्याचे लक्षात येते. ग्रामीण ओवी, जात्यावरची ओवी, अभंग, छंद, गद्यात्मक पद्य, म्हणजे कथात्मक पद्य अशा प्रकारची कविता या कवितासंग्रहात समाविष्ट झालेली दिसते.

          अगदी ग्रामीण पारंपरिक मौखिक लोकगितेच आपण वाचत आहोत की काय, इतकी सहज नैसर्गिक भाषा, शब्द, उपमा, प्रतिमा, प्रतिके, अलंकार या कवितेत उपयोजित झालेले दिसतात. कवीचे नाव पुसून टाकले तर ही पारंपरिक लोकगितेच आहेत, असे वाटावे, इतकी साधी आणि मौखिक लोकगितेची लय या वहितल्या गितांनी पकडली आहे.

          वही नावाचा एक पारंपरिक लोकगीत प्रकार आज अस्तित्वात असला तरी तो लोकपरंपरेतल्याच ओवीच्या अपभ्रंशातून उद्भवला असल्याचीही एक शक्यता वाटते. सारांश, ना. धो. महानोर यांच्या वहीतल्या कविता एक वहीच असल्याचे ध्यानात येते.

          आस्वाद : आकाराने छोट्या छोट्या अशा या कविता दिसत असल्या तरी त्या संपृक्त अशा स्पर्शिका आहेत. मनाची स्पंदने आहेत. निसर्ग आणि स्त्री विभ्रमांच्या वर्णनाआडून ही कविता मैथून चित्रणात दंग असल्याचे दिसते. ही कविता प्रतिकांच्या भाषेत बोलते. शब्दांच्या भुलभुलय्या आणि यमकांची धुंदता यामुळे रसिक संमोहीत होतो. बऱ्याचशा कवितेत तेच तेच शब्दही आवर्त होताना दिसतात.

          पापणी, नितळ, निळे, हळदी, गाणे, वेल्हाळ, गंध, हिरवे, मेघ, गुलहोशी, गुलछडी, पाऊस, चंद्रबन, गोंदण, झाड, पक्षी, न्हाण, रात, रानवारा, पंख, काळोख, चांदणे, तळे, आभाळ, पाणी, ऊन, झिम्मड, फांदी, मोरपंखी, काचोळी, चोळी, पारा, वळचणीवाटा, मेंदी, फुले, नभ, स्वप्न, देह, सांज, बोभाटा, पीक, साळसूद, मोर, रानपाखरे, डोळे, राघू, वाट असे शब्द कवितेत पुन्हा पुन्हा येत असल्याने आस्वादनात रसभंग होऊ पाहतो.

          मात्र थरकबिथरल्या, गडगहिरे डोळे, धूळधाणी, आषाढबन, चंद्रकला, लाटांधले मन, छेलछबेला, केशरगंध, लाजवाट, हळदिव्या, झुलताझांजरता, राजसझेले, हिसळाले, जडगहिरे पीक, जवानी, मालनवेळी, निळीलखाके, फुलपंखी, दयाघन, शिवार, ऊनसावल्या, थरकली, शहारा, पिसारा, अवकाळी, हिंदळणे, वेटाळणे, काळीजकहाणी, शेजबाज, झावळ, उन्मन, रंगोटल्या, सोनसळी, लुब्रे, हुल, पोरसवदा, अंगलुशी, नाचणभिंगरी, झांजझुलते, शिरताज अशा शब्दांनी कविता नवी, ताजी, टवटवीत, गूढ व वजनदार होताना दिसते. यातील काही तुरळक शब्द बोलीभाषेला जवळ जाणारे असल्यामुळे आविष्कारात चैतन्य झिरपत राहते.

          या कवितेतील विशेषणातही नाविन्य ओतण्यात महानोर यशस्वी झाले आहेत. उदा. सोनसळी फूल, पंखजड कबुतरे, लखलखता देह, अलवार देह, खुला देह, सकवार देह, कोवळी डहाळी (देह), हळदिवा (देह), गुलहौशी डोळे, लखलख तेज, निर्मळ ओठ, दयाघन आभाळ, काळाकुट्ट काळोख, नवे पाणी, निळे स्वप्न, रांगडा संभोग, मनाचा मोर, लक्ष पाकळ्यांचे मन, जांभळे मेघ, काळेकुट्ट मेघ, संथ उन्ह, फांदीवरले उन्ह, जास्वंदी उन्ह, केतकी हात, घनसावळी सांज, रंगपेटली झाडे, नग्न निरागस वेली, झिम्मड वेली, ओल्या वेली अशा प्रकारची कवितेतली वेगळी विशेषणेही आकर्षूण घेतात.

          महानोर यांची निसर्गकविता ही अर्वाचीन निसर्ग कविता नाही. निसर्गाला अनुसरणारी व पारंपरिक लोकरचनेला खूप जवळची अशी ही निसर्गकविता आहे. निसर्गाच्या आडून कवीचे भावन कवितेतून आविष्कृत होताना दिसते. ही कविता लहान आहे, अल्प शब्दांत आविष्कृत झालेली आहे, संपृक्त आहे, संश्लिष्ट आहे. शब्दांची मोळी लयबद्ध गीतमय दोरीने करकचून गच्च बांधलेली अशी ही कविता आहे. महानोर रात्रंदिवस शेतात वास्तव्य करणारे आधी शेतकरी आहेत आणि नंतर कवी हेही या कवितेतून अधोरेखित होते.

          कवी लावणीच्या प्रासात गुंतून गेलेला दिसतो. म्हणून या कवितात यमकांबरोबर प्रासांचेही प्राबल्य दिसते. कविता क्रमांक ५१ व ५२ या लावणीवजा कवितांत तर तो विशेष आणि खटकेबाजपणे दृगोचर होताना दिसतो. उदा.

          राजसा

          जवळि जरा बसा

          जीव हा पिसा तुम्हाविण बाईऽ

          कोणता करू ‍शिणगार सांगा तरी काहीऽ

          त्या दिवशी करूनि दिला विडा

          टिचला माझा चुडा

          कहर भल्ताच

          भल्ताच रंगला काथ लाल ओठात

          खुळी ही जात...   (क्रमांक ५२. पृ. ६०)

      बिभत्सता आणि उत्तानपणाचा स्पर्शही न होता नैसर्गिक मिथून अनेक कवितांमध्ये अधोरेखित झालेले दिसते. उदा.

          नागीण मैथुनात मग्न

          नग्न नागाच्या विळख्यात

          स्वस्थ

          सळसळते

          अंगांग सगळे

          आसमंत विसरून

          सुस्त

          जडावल्या डोळ्यांच्या प्राणात.  (क्रमांक ६. पृ. १२)

     कविता क्रमांक ४८ मध्येही पहिल्या वहिल्या मैथुनाचे चित्रण झालेले आढळते. लैंगिकतेतला कोवळेपणा सुचविण्यासाठी कवितेत श्रावणातली उन्हे असा शब्दप्रयोग केलेला दिसतो. कविता क्रमांक २७ मध्ये न्हात्याधुत्या पोरींचे वर्णन आहे. सैरभैर कसरती मनाचे चाळे, शारी‍रिक मानसिक ओढ आणि तरीही तोल सावरण्याचा प्रयत्न म्हणजे ही कविता.

     वहीतल्या पहिल्या कवितेकडे अजून कोणाचे नीट लक्ष गेलेले दिसत नाही. ही कविता अशी आहे.

          रूजे दाणा दाणा

          जेष्ठाचा महिना

          मातीतला गंध ओला

          चौखूर दिशांना

          पाखरांचे पंख, आम्हा

          आभाळ पुरेना     (क्र. १. पृ. १)

     या संग्रहातील ही पहिलीच कविता ऐन ज्वानीत आलेल्या मीचे भाषण आहे. आत्माविष्कार आहे. आम्हा या शब्दामुळे ही जाणीव प्रातिनिधिक झाली आहे. ही ज्वानीतली सर्व पाखरे प्रथम वयसाकाळी संभोगोत्सुक आहेत आणि निसर्ग नियमानुसार दाणा रुजवण्यासाठी सज्ज झाली आहेत. म्हणूनच अशा धुंद पाखरांना आभाळ पुरत नाही.

     ना. धो. महानोर यांची वहीतली बहुतांश कविता मिथुन शिल्पे आहेत. या कवितेची मुख्य जीवन जाणीव मैथुनातच दृगोचर होतांना दिसते. म्हणून वहीतल्या कवितांचा प्राण आणि या मैथुनातल्या विविध अवस्था पाहण्यासाठी प्रातिनिधिक अशी तीन उदाहरणे पाहू.

१)    कसे लपेटून घ्यावे

नवे मेघावी आभाळ

मेंदिगोंदल्या हातांना

हिर्वी बिलोरी भोवळ  (क्र.३०, पृ.३६)

२)    स्पर्श पेटता जिव्हारी

सारे अंग अंग होरी

पाराभरल्या देहाला

घट्ट वेटोळे कस्तुरी   (क्र. ३४, पृ. ४०)

३)    चंद्रकलेचा पदर उतरता

देहच उरला लेणी

जर्द सोनिया अंगांगाची

राजसवाणी राणी     (क्र. ४०, पृ. ४८)

          काही कवितात मात्र जाणीवेपेक्षा कवी शब्दांच्या प्रेमात पडलेला दिसतो. म्हणून नेमके चित्रण होण्याऐवजी आपण शब्दांच्या आवर्तातच गोल गोल गटांगळ्या खात राहतो. उदा.

                    डोंगरझाक

                    निळीलखाक

                    वळसे घेऊन

                    वळत वळत ह्या

                    जळात भिजले पक्षी लाख

                    निळेलखाक   (क्र. ४१, पृ. ४९)

विशिष्ट शब्द आणि च्या प्राससाठी या कवितेतून काहीही निष्पन्न होत नाही.

          आक्षेप : वही संग्रहावर मोजक्याच समीक्षा वाचण्यात आल्या. त्यांचा उल्लेख करणे आवश्यक वाटले म्हणून इथे स्थूल स्वरूपात उदृत करतो.

      आलोचन (मे १९७२) : मे १९७२ च्या आलोचनेत एक पुस्तक : दोन दृष्टिकोन नावाचा लेख प्रकाशित झाला आहे. आलोचनेची सूची उपलब्ध न झाल्याने हा लेख कोणत्या समीक्षकाचा ते समजू शकले नाही. या लेखातल्या पुर्वार्धात वहीचे गुणविशेष दाखवले असून उत्तरार्धात दोष दिग्दर्शन केले आहे. ही कविता म्हणजे ताजी लयविभोर, नितळ सौंदर्याचा प्रत्यय देणारी, स्त्री देहमनाचे विभ्रम टिपणारी, शृंगारीक उत्कटधुंद, लयमग्नता, रसरसित, जीवंत, ठसकेबाज, सुंदर भावविश्वाची कविता असे या कवितेचे गुणवैशिष्ये टिपलेले आहेत, तर उत्तरार्धात चिंतनशिलतेचा अभाव, अप्रगतीशील, केवळ शृंगारिक रस, उखाणेवजा शब्द आदी दोषारोप केलेले आहेत.

     केशव मेश्राम : केशव मेश्राम यांना तर या कवितेतील गुणवत्तेपेक्षा दोषच जास्त आढळतात. निसर्ग माध्यमातून अकृत्रिमपणे मानवी भावनांचा व त्यातही स्त्रीच्या शृंगार विभ्रमांचा वापर या कवितेत झाला असून स्त्री हे ह्या कवितेचे एकमेव लक्ष असल्याचे मेश्राम लक्षात आणून देतात.

     स्थलचित्रे, ग्रामचित्रे, रंगचित्रे आणि भावचित्रे यांची अनुभूती या कवितेत असून कवितेत नादमूल्य असल्याचेही मेश्राम यांच्या लक्षात आले आहे. तरीही संपूर्ण कवितासंग्रहात ‍त्यांना केवळ पाच- सहाच कविता उत्तम असल्याचे आढळते. क्रमांक ५९ ही कविता त्यांना एकसंध आशय आणि सूक्ष्म प्रत्ययाची अशी एकमेव कविता वाटते.

     कविता क्रमांक १६, ३६, ३९, ४५, ५२, ५६, ५७ व ५८ या कविता शब्दबंबाळ व कृत्रिम असल्याचे मेश्राम यांचे निरिक्षण आहे. धुंद व मदिर शब्द, गिर्रेबाज यमके, पारंपरिक उत्तान शृंगारोत्तेजक वातावरण अशी या कवितांची संभावना करून कविता क्रमांक १७ ही ग्रेस यांच्या कवितेचे तंतोतंत अनुकरण तर कविता क्रमांक २५ ही दि. पु. चित्रे यांच्या कवितेचे अनुकरण असल्याचे मेश्राम यांनी दाखवून दिले आहे. कविता क्रमांक क्र. ५८ म्हणजे हास्यास्पद यमकांची कविता असून ही कविता कवीला सुचली नाही तर कवीने ती बळजबरी पाडली असे मेश्राम यांना वाटते. कवीने प्रचलित चलनी संकेत झुगारले पाहिजेत असेही मेश्राम यांनी सुचविले आहे.

     समाज प्रबोधन पत्रिका : (मार्च- एप्रिल १९७२) : समाज प्रबोधन पत्रिकेच्या (मार्च-एप्रिल १९७२) च्या अंकातील लेखही नेमका कोणाचा हे कळू शकलेले नाही. या लेखात रान, पाऊस, ऊन, पक्षी, झाडे, मेघ, स्त्री देह आदी गोष्टी महानोरांच्या कवितेचा विषय होतात, असे म्हटले आहे. हीसुद्धा रानातली कविताच असून या संग्रहात ती नीटस व पारदर्शक झाली आहे. निसर्गानुभव, लावणीचा प्रास, खटकेबाजपण, संभोग सूचकता ही या संग्रहातील कवितांची वैशिष्ट्ये नमूद केली आहेत. महानोर यांची काव्यप्रकृती आदिम असल्याने तिला समाज जीवनाची निराकरण रूपे टिपता येत नाहीत, असेही या समीक्षा लेखाच्या लेखकाचे प्रतिपादन आहे.

     वा. रा. कांत : महानोर यांच्या वही संग्रहातील कवितेत तरलता, सखोलता व व्यामिश्रता असून शेवटच्या काही कविताच फक्त वही प्रकारात मोडतात म्हणून या संग्रहाला वही हे नाव औचित्यपूर्ण नाही असे वा. रा. कांत म्हणतात.

          शेवट : स्वत: ना. धो. महानोर यांनी, सटाणा येथे (आम्ही आयोजित केलेल्या) संमेलनातील अध्यक्ष‍ीय भाषणात आपल्या कवितेच्या स्वभावाविषयी प्रतिपादन केले होते. ‘‘माझी कविता लोकपरंपरेतून आलेली असून ग्रामीण भागातील लोकगितांवरच माझ्या कवितेचा पिंड पोसला आहे. म्हणून माझ्या काव्यातून लोकपरंपरेला मी कधीही नाकारणार नाही.’’ ही कवीची भूमिका लक्षात घेता वही मधील कवितांना पारंपरिक नैसर्गिक जाणिवेची कविता, असे म्हणताना या प्रतिपादनातून पुष्टीच मिळते. त्यांच्या कविता लोकगितांच्या रूपबंधातून आविष्कृत होत असल्याचे नुसते निरिक्षणच येथे उदृत करता येणार नाही तर महानोर यांच्या कवितेचा तो स्थायीभाव आहे, हे स्पष्ट होते.

          महानोर यांची कविता शृंगारिक आहे, स्त्रीच्या लैंगिक अवयवांवर घोटाळणारी आहे, स्त्री देहाचे विभ्रम चघळणारी आहे, त्याच त्याच शब्दांतून अर्थवलयांचे फवारे उडविणाऱ्या या कविता आहेत. म्हणूनच या कवितेला मर्यादा आहेत, अशा प्रकारचे आक्षेप समीक्षकांकडून या कवितेवर घेतले जातात, काही समीक्षकांनी तर महानोरांकडून आत्मपर, व्यक्तिगत आणि सामाजिक आशयांच्या कवितांचीही अपेक्षा व्यक्त केली आहे.

          कोणताही कलाकार आपल्या पिंड प्रकृतिनेच कला आविष्कार आविष्कृत करीत असतो. कलाकाराच्या जीवन- जाणिवांचे स्पष्ट प्रतिबिंबही त्या कलाकाराच्या कलाकृतीतून दृगोचर होत असते. भावते ते आविष्कृत करण्याची सृजनात्मक उर्मी दाबून जर दखादा कलावंत सामाजिक बांधिलकीच्या नावाने उसना आव आणून कलाकृतीत ती वरून लादून राबवू लागला तर अशा कलावंताच्या हातून आविष्कार नक्कीच निर्माण होईल पण कलाकृती साकारणार नाही.

          म्हणून महानोरांना आपल्या निसर्ग साहचर्यातून आणि आपल्या जीवन जाणिवांतून या नैसर्गिक प्रतिमाच आपल्या पिंड प्रकृतीच्या सर्जनातून शृंगारीकतेने भावत असतील तर त्यांनी त्या माध्यमातूनच कलाविष्कार आविष्कृत केला पाहिजे. कोणतीही (लादलेली) बांधिलकी कलाकृतीला मारक ठरू शकते. खरे तर, कलाकारांकडून अशी अवास्तव अपेक्षा व्यक्त करणेच सर्वथा अरसिकपणाचे लक्षण ठरावे.

     संदर्भ:

१)    वही - ना. धो. महानोर, पॉप्युलर, पहिली आवृत्ती, १९७१

२)    आलोचना- मे १९७२

३)    शब्दांगण- (केशव मेश्राम)

४)    समाज प्रबोधन पत्रिका- मार्च- एप्रिल १९७२

५)    महाराष्ट्र टाइम्स- १६-७-१९७२ (वा. रा. कांत)

          (डिसेंबर २००० मध्ये लिहिलेला व संपृक्त लिखाण आखाजी-मे 2022 मध्ये प्रकाशित झालेला लेख. इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

© डॉ. सुधीर राजाराम देवरे

ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.com/