सोमवार, १ मे, २०२३

समकालीन मराठी साहित्याची स्थितीगती (१९८० ते २०२०)

 

 

                    हा विषय नवीनच चर्चेला आला का? का शब्दांची कसरत करत तोच विषय पुन्हा पुन्हा चर्चेला येत असतो? या विषयात संदिग्धता आहे, स्पष्टता नाही. तरीही सोयीचा अर्थ लावत विवेचन करण्याचा प्रयत्न करतो.

                    समकालीन मराठी साहित्याची स्थितीगती ठरवण्यासाठी ऐंशीनंतरचा काळ इथं विचारात घेत आहे. म्हणून हा विषय मांडण्यासाठी किमान चाळीस वर्षांच्या साहित्य व्यवहाराचा अभ्यास अभिप्रेत आहेच. पण काही दिवसात वा महिण्यात आपण या विषयाला न्याय देण्याच्या प्रयत्नात अनुमानावर येणार. वेळ कमी मिळतो म्हणून अशा निमंत्रणाला नकार देत असतो. पण आग्रहामुळं आणि हे सेमिनार ऑन लाईन (वेबिनार) असल्यानं या बीज भाषणासाठी तयार झालो. हे बीज भाषण असल्यामुळं फक्‍त काही मुद्दे मांडणार आहे. आपल्या सर्वांचा जास्त वेळ घेणार नाही. संदर्भ शोधण्यासाठी आणि चिंतनासाठी योग्य वेळ न मिळाल्यामुळं या मांडणीत अनेक त्रुटी राहण्याची शक्यता गृहीत धरलेली आहे. उपस्थित संशोधक, प्राध्यापक आणि अभ्यासक क्षमा करतील अशी अपेक्षा करतो.

                    कोणत्याही चर्चासत्रात अभ्यासकानं आपला विषय मांडण्यासाठी लिहून आणलेलं टिपण वाचावं अशी माझी भूमिका आहे. असं केल्यानं मुद्दे सुटत नाहीत आणि उत्स्फूर्ततेमुळं अभ्यासक इतरत्र घसरत नाही. म्हणून हा लिहिलेला निबंध वाचत आहे.

                    समकालीन मराठी साहित्याची स्थितीगती काय, हे शोधणं तसं खूप अवघड नसलं तरी त्यासाठी खूप वाचन करणं- म्हणजे महत्वाच्या साहित्यातील एकूण एक पुस्तक वाचणं आवश्यक आहे. त्यासाठी खूप वेळही द्यावा लागेल. आणि आपल्याकडे नेमका वेळच नसतो. त्यामुळं महत्वाचा अभ्यासही घाईगडबडीत करावा लागतो. आपण निवडक आणि महत्वाचं वाचत असतो. त्यामुळे आपल्याकडून वाचून न झालेलं काही चांगलं साहित्य आपल्याला चकवा देऊ शकतं. अशी काही पुस्तकंच नव्हे, तर एखादं पुस्तक जरी आपल्या नजरेतून निचटलं तरी आपण विषयाला आणि त्या लेखकालाही योग्य न्याय देऊ शकणार नाही. म्हणून हा विषय मांडताना, मी अपूर्ण आहे, हे आधीच सांगून ठेवतो.

                    मराठी साहित्यातील स्थितीगती शोधण्यासाठीचं काम समीक्षकांचं आहे. पण मराठी साहित्यात आज किती समीक्षक आहेत? एक काळ असा होता की मराठीत समीक्षकांचं युग होतं. समीक्षकांची फळी होती. आज समीक्षक शोधावे लागतात. आजचे समीक्षक मराठीत काही नवीन लिहिलेलं- नवीन प्रकाशित झालेलं वाचतात का? विशिष्ट पुस्तकाकडं त्यांचं मुद्दाम लक्ष वेधलं तरी ते वाचत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर भालचंद्र नेमाडे यांनी आपण होऊन उजेडात आणलेलं यमुना पर्यटनावरचं लिखाण आठवतं. (अथवा उदाहरणासाठी प्रा. गंगाधर गाडगीळांचं उदाहरण देता येईल : रणांगण ही मराठी साहित्यात नवकादंबरी आहे, हे सर्वप्रथम मी साहित्यक्षेत्राच्या लक्षात आणून दिलं! अशा अर्थाचं गाडगिळांचं एक वक्तव्य आहे.) प्रत्येक समीक्षकाला आपल्या आयुष्यात एखाद्या तरी पुस्तकाबद्दल असं सांगता आलं पाहिजे. 

                    आजचे समीक्षक नवीन साहित्यातील कलाकृती- पुस्तक उजेडात आणून देतात का? आज इतक्या मोठ्या प्रमाणात पुस्तकं प्रकाशित होत आहेत की चांगलं- वांगलं कसं शोधायचं, हे कठीण होऊन बसतं. म्हणून समीक्षकांना चांगलं साहित्य शोधून उजेडात आणणं शक्य होत नसावं. हे खरं असलं तरी एखाद्या साहित्यिकाला आपल्या पुस्तकाबद्दल आत्मविश्वास असतो. तो समीक्षकांना पुस्तकाची दखल घ्यायची विनंती करत असतो. पण सध्या वेळ नाही, वेगळ्या कामात गुंतलो आहे. अशी काही ठरलेली उत्तरं देत समीक्षक समकालीन साहित्याकडं दुर्लक्ष करतात. मात्र त्याच वेळी ते विविध उत्सवांत- संमेलनांत दिसून येतात, व्याख्यानं- भाषणं देताना दिसतात आणि आपल्या गटातल्या लोकांवर लिहितानाही दिसतात. असं असेल तर मराठी समीक्षा क्षेत्राचं भवितव्य कठीण आहे. 

                    या विषयावर चर्चा करणं वा अशी चर्चा घडवून आणणं एक वाचक म्हणून वा वाचकांचे प्रतिनिधी म्हणून चर्चासत्र आयोजित करणारे संयोजक करू शकतात. पण समकालीनतेचं चित्रण आपण आपल्या कलाकृतीतून का करत नाहीत, असा कोणत्याही कलाकाराला आपण जाब विचारू शकत नाही. कारण कलाकाराचं आविष्कार स्वातंत्र्य आपण मान्य करतो आणि तसं करणं हेच सुसंस्कृतपणाचं लक्षण आहे. कलाकाराकडून कोणत्याही प्रकारचा विशिष्ट आग्रह धरणं हेच मुळी गैरलागू आहे. म्हणून अशी कोणतीही जबाबदारी साहित्यिकांवर वा खरं तर सर्वच कलावंतांवर टाकता येईल का, हा खरा प्रश्न आहे.

                    समाजाकडून सत्तेकडे कायम विशिष्ट प्रकारची प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मागणी होत असते आणि त्या मागणीला लेखकाकडून वाचा फुटत असते. पण या लिखाणाला मागणी तसा पुरवठा असं म्हणता येत नाही. हे लिखाण प्रबोधनात्मक, लोकशिक्षण करणारं, अन्यायाविरुध्द बोलणारं, खऱ्या- खोट्यावर प्रकाश टाकणारं, नाण्याच्या दोन्ही बाजू उलगडून दाखविणारं, जनचळवळीचा वसा घेणारं, साक्षेपी आदी प्रकारचं असतं. काव्यसुध्दा याच गरजेतून निर्माण होत असतं. काही धर्मग्रंथ ही तत्वज्ञान आणि काव्य यांच्या सरमिसळीची उत्तम उदाहरणं असली तरी ती काहीतरी सांगण्यासाठी निर्माण झालीत, स्वांतसुखाय म्हणून नाही. ज्ञानेश्वर, तुकाराम यांचं काव्य प्रथम दर्जाचं असलं तरी त्यांनी ते फक्‍त काव्य म्हणून लिहिलं नाही.

                    प्राथमिक घटकांना बाजूला सारून लिखाण कलात्मक होऊ लागलं, की त्याला आपण साहित्य- वाड्‍.मय म्हणू लागतो. अशा वाड्.मयात प्राथमिक बाबी आपोआप गळून पडतात. साहित्यात जीवनाचा पट, जीवनाचा एखादा तुकडा असतो, एखादी ठसठसणारी वेदना आविष्कृत झालेली असते, एखाद्या दिवसाची घालमेल प्रतिबिंबीत असेल, समग्र जीवनाची कहाणीही असेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यात शहरी, ग्रामीण, शेतकरी, आदिवासी, दलित, झोपडपट्टी, वर्गीय, बेरोजगारी, राजकीय, राष्ट्रवादी, धर्मवादी आदी जाणिवा (एकाच कलाकृतीत) प्रतिबिंबीत होत असतील तर अशा साहित्याला आपण कोणतं लेबल लावणार?

                    साहित्यात अमूक गोष्टीचं प्रतिबिंब पडलं पाहिजे, तमूकचं प्रतिबिंब दिसलं पाहिजे अशी आपल्याकडे वेळोवेळी मागणी झालेली दिसते. देशात आणीबाणी लादली गेली तेव्हा साहित्यिकांकडून निषेधात्मक साहित्याची अपेक्षा केली गेली. (उदाहरणार्थ म्हणून उदाहरण १९७५ चं दिलं.)  शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेची आंदोलनं सुरु झाली, तेव्हा शेतकरी- कष्टकऱ्यांचं साहित्यात प्रतिबिंब पडलं पाहिजे असं शेतकरी आंदोलकांचे वरिष्ठ आंदोलक पुन्हा पुन्हा मागणी करत होते. (हा १९८२ नंतरचा काळ.) देशात वा जगात धार्मिक अराजकता माजते, तेव्हा धर्माच्या बाजूनं उभे असलेले लोक तशा साहित्याच्या प्रतिबिंबाची अपेक्षा करतात तर निधर्मी लोक निधर्मी- पुरोगामी साहित्याची कास धरतात. (१९९० नंतरचा काळ ठळकपणे अधोरेखित होईल.) व्यवस्था किडली असं म्हणणारे लोक साहित्यात तशा प्रतिबिंबाची अपेक्षा करतात. नैसर्गिक आपत्कालीन स्थितीला सामोरं गेलेल्या लोकांना तशा मानसिकतेचं साहित्य हवं असतं. (१९९३ किल्लारी भुकंप. मुंबई बाँब स्फोट, दंगल. समकालीन राजकारण वगैरे.)

                    ग्रामीण भागाचं चित्रण साहित्यातून आज मोठ्या प्रमाणात येत आहे. आजच्या समग्र साहित्याला ग्रामीण चित्रणाचाच मुख्य आधार आहे. तरीही ग्रामीण भाग आज ग्रामीण राहिला आहे का? शिक्षणापेक्षा तंत्रज्ञान आणि माहिती युगाचा आज स्फोट झाला आहे. खेड्यापाड्यात महाविद्यालये निघालीत. लोक शिकले, सुशिक्षित झाले आणि आपलं जगणं लिहू लागले. शहरं पसरत पसरत खेड्यात घुसली. टीव्ही, फोन, संगणक, मोबाईल, इंटरनेट, सोशल नेटवर्क, फेसबुक, व्हॉटस अॅप आदींसारख्या डिजिटल सोशल मिडियानं खेडी ग्लोबल झालीत. सोशन मीडिया साहित्य अशीही उद्यापरवा वर्गवारी होऊ शकते. (फेसबुक- व्हॉटस्‍अॅप विद्यापीठ असं आज हिणवण्याच्या सुरानं का होईना, म्हटलं जातं.) शहर आणि गाव असं विभाजन करता येईल असं काही आज दिसत नाही. (दुर्गम भाग मात्र अजूनही अपवाद आहेत.) वर्गीय जाणिवा मात्र नव्यानं निर्माण होताना दिसतात. अशी सुशिक्षित झालेली नवी पिढी आपल्या जगण्याच्या अनुभूतीतून साहित्य लिहू लागली. आपल्या विशिष्ट जीवन जाणिवा साहित्यात उपयोजित करू लागली. त्यात आपल्या बोली आणि परिवेश परिभाषेसह अस्सल ग्रामीणता येऊ लागली. विषय, आशय आणि बोलीभाषा आजच्या साहित्य आविष्कारात उपयोजित होताना दिसते. आजच्या काळात ग्रामीण चित्रण अपूर्ण असेल पण त्याची तशी पार्श्वभूमी ठसठशीतपणे उठून दिसते.

                    श्री. ना. पेंडसे यांचीतुंबाडचे खोत’, भालचंद्र नेमाडे यांचीहिंदू: जगण्याची समृध्द अडगळ’, आनंद विंगकर यांचीअवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट’, अशोक कौतिक कोळी यांचीपाडा’, नजुबाई गावीत यांचीआदोर’, डॉ. प्रकाश आमटे यांचंप्रकाशवाटा’, उर्मिला पवार यांचंआयदान’, वाहरू सोनवणे यांचा कवितासंग्रहगोधड’, पार्थ पोळके यांचं आभरान’, प्रकाश नारायण संत यांचं लंपनचे भावविश्व, सदानंद देशमुख यांच्याबारोमास’, ‘खुंदळघास’, आसाराम लोमटे यांचा आलोक हा कथासंग्रह, प्रस्तुत लेखकाची पंख  गळून गेले तरी’, सहज  उडत राहिलो या आत्मकथनांसह सोन्याची शाळा कादंबरी आणि अहिराणी भाषा उपयोजित पुस्तकं, आदींचा समावेश ग्रामीण साहित्यात करावा लागेल.

                    या व्यतिरिक्‍त द. ग. गोडसे, गणेश देवी, विश्वनाथ खैरे, ना. धो. महानोर, रा. रं. बोराडे, नागनाथ कोत्तापल्ले, द. ता. भोसले, वासुदेव मुलाटे, भास्कर चंदनशिव, विठ्ठल वाघ, इंद्रजित भालेराव, राजन गवस, प्रकाश होळकर, संतोष पद्माकर पवार, वीरा राठोड, नागनाथ गोरे, किरण गुरव (जुगाड), दिनकर मन्वर आदींचा समावेश ग्रामीण साहित्यात करावा लागेल.

                    ऐंशीनंतरची इथं अजून अनेक ग्रामीण पुस्तकांची आणि साहित्यिकांची नावं घेता येतील. पण यादी तयार करणं इथं अभिप्रेत नसल्यानं काही उदाहरणादाखल नावं सांगितली. रागलोभामुळं ही यादी वाढवलीच पाहिजे असं नाही. अशा विशिष्ट साहित्यिकांची नावं उदृत करणं राहून गेलं तर ती टाळली गेली असंही कोणाला वाटू शकतं म्हणून संपूर्ण यादी नकोच.

                    ऐशीनंतरच्या ठळक साहित्य- साहित्यिक नावांत विलास सारंग यांच्या रूद्र’, अमर्यादा कादंबऱ्या, चिरंतनाचा गंध कथासंग्रह आणि त्यांचं समग्र साहित्य, श्याम मनोहर यांच्या सगळ्या कादंबऱ्या, वसंत आबाजी डहाके यांची समग्र कविता, जी. के. ऐनापुरे यांची रिबोट (कादंबरी), कांदाचिर (दीर्घकथा), प्रवीण बांदेकरांची उजव्या सोंडेच्या बाहुल्या (कादंबरी), महेंद्र कदम यांची तणस’, अनंत कदम यांच्या किडे’, स्त्रोत’, कॅन्सर कादंबऱ्या; राकेश वानखेडेंची पुरोगामी (कादंबरी). प्रकाश जाधव या महत्वाच्या कवीकडे आतापर्यंत झालेलं दुर्लक्ष. एकाच वेळी वास्तव आणि अवास्तव यांचं अजब मिश्रण करत मृत्यू- जगण्याच्या कविता लिहिणारे बालम केतकर यांचाही इथं मुद्दाम उल्लेख करावा लागेल.

                    आताच प्रकाशित झालेल्यांपैकी रंगनाथ पठारे यांची सातपाटील कुलवृत्तांत कादंबरी, प्रस्तुत लेखकाची मी गोष्टीत मावत नाही’, टींब’, सोन्याची शाळा या कादंबऱ्या आदी साहित्याची दखल (सकारात्मक शक्य नसेल तर नकारात्मक पध्दतीनं का होईना) घेतली गेली पाहिजे. १९८० ते २०२२ पर्यंतचा असा ठळक वाड्‍.मयीन आढावा समोर येतो. इथं उदृत नसलेल्या पुस्तकांची- साहि‍त्यिकांची नावं या कालखंडातली महत्वाची नाहीतच असं इथं दूरान्वयानंही सूचीत करायचं नाही, हे कृपया पुन्हा लक्षात घ्यावं.

                    जीवननिष्ठा, जीवनबंधातून तत्कालीन समाजस्थितीचं आकलन कलावंताला झालं पाहिजे, अशा सार्वत्रिक अपेक्षा असतात. मात्र विशिष्ट भावविश्वाचा वारा प्यालेला कलावंत आपल्या पिंडाला मानवेल तसाच आविष्कृत होत राहतो. अशा साहित्यिकांचा उदाहरणार्थ म्हणून उल्लेख करायचा झाला तर विश्वास पाटील (पानिपत) यांचा करता येईल. 

                    सद्यकालीन वा समकालीन स्थिती म्हणजे केवळ प्रासंगिक घटना नव्हेत. सद्यस्थितीची जाण साहित्यिकाच्या कलाकृतीतून दिसावी अशी आपण अपेक्षा करू शकतो. पण साहित्यिकांवर तशी सक्‍ती करता येणार नाही. कारण कलाविष्कारांत उपयोगिता शिरली तर कलात्मकतेत बाधा येऊ शकते. कलावंताने काय आविष्कृत करावं हे जर समाज व शासन ठरवू लागलं तर आविष्काराला कलाविष्कार- कलाकृती म्हणता येणार नाही. वाड्‍.मयकृती या कारागिरांकडून तयार करुन घेतलेल्यावस्तूठरतील. म्हणून कलावंतानं काय आविष्कृत करायचं ते कलावंतानंच ठरवलेलं योग्य. मग तो कलावंत सद्यस्थितीला डोळसपणे भिडत असो वा नसो.

                    पुस्तकाचा म्हणजे वाड्‍.मयीन कलाकृतींचा कालखंड नेमका कसा ठरवायचा हाही एक मुद्दा या अंतर्गत येऊ शकतो. पुस्तक कधी प्रकाशित करायचं हे सर्वस्वी प्रकाशकावर अवलंबून असल्यानं एखादं पुस्तक प्रकाशित होताच जुनं होऊ शकतं का? म्हणजे लेखकानं विशिष्ट पुस्तक लिहायलाच दहा- पंधरा- वीस वर्ष घेतलेले असतात. आणि प्रकाशकाकडं पुस्तक पोचल्यावर ते पुस्तक पुढं दहा-बारा वर्षांनी प्रकाशित होत असेल तर तीस वर्षांच्या म्हणजे एका पिढीच्या जीवन- जाणिवा मागं पडतात. लेखकानं काळाला पुरून उरण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तत्कालीन काळाच्या उपयोजनामुळं कलाकृतीला आजच्या वाचकांच्या मनात स्थान मिळेलच याची शाश्वती नाही. (यात ऐतिहासिकता, कौटुंबिक वंशवृक्ष आदी पुस्तकांचे अपवाद गृहीत धरलेले आहेत. उदा. तुंबाडचे खोत, हिंदू: जगण्याची समृध्द अडगळ, सातपाटील कुलवृत्तांत या कादंबऱ्या इथं अपवाद ठरतील. पण मी गोष्टीत मावत नाहीचा काळ वर सांगितलेल्या अपवादात्मक कादंबऱ्यांपेक्षा जुना नसूनही कादंबरी लिखाणाचा काळ आणि प्रकाशित होण्याचा काळ वाचकाच्या मनात खडळत राहतो. याचं कारण कादंबरीतलं समकालीन राजकीय चित्रण हे प्रकाशनाला झालेली दिरंगाई टहाळबन नमूद करतं.) म्हणून पुस्तकं प्रकाशित करण्यासाठी कमाल किती कालावधी घ्यावा, याचा विचार प्रकाशकांनी करायला हवा. केवळ व्यावसायिकता म्हणून प्रकाशन व्यवसाय असू नये. आजचा वाचक कोण आणि तो किती चंचल आहे हे लेखकांपेक्षा प्रकाशकांनी लक्षात घेणं जास्त महत्वाचं आहे. (पुस्तकाला पुरस्कार मिळण्यासाठीही विशिष्ट कालखंडातलं पुस्तक विचारात घेतलं  जातं. हा वाड्‍.मयीन कलाकृतीचा अपमान ठरतो. केवळ  प्रकाशनाच्या तांत्रिक तारखेच्या घोळामुळं जी. ए. कुलकर्णींना साहित्य अकादमीचा पुरस्कार परत करावा लागला होता. केवळ काळ- वेळ पाळत नाही म्हणून एखादं चांगलं पुस्तक पुरस्कारासाठी दुर्लक्षित होणं चुकीचं ठरतं. आणि पुस्तक असं दुर्लक्षित होऊ नये म्हणून चांगलं लिहिणारा लेखकही काहीदा क्षेत्ररक्षण करु लागतो.)          

                    एखाद्या कलाकाराने आपल्या कलेत कितीही काल्पनिक चित्रण करण्याचं ठरवलं तरी त्याचा काळ, समाज आणि परिवेश त्या त्या आविष्कारात हमखास प्रतिबिंबीत होत असतो. तसेच कलेत कलाकाराचं चरित्र- चारित्र्याची पार्श्वभूमीही आविष्कृत होत असते. म्हणूनच कोणत्याही लेखकाकडून लिखाण होत असलेल्या साहित्यात त्या लेखकानं आपला स्व टाळण्याचा प्रयत्न केला तरी त्याची सामिलकी कलाकृतीत नको त्या ठिकाणी दृगोचर होईल हे नक्कीच. 

                 या वेबिनारमध्ये सहभागी तज्ज्ञ संशोधक, प्राध्यापक, अभ्यासक, आयोजक डॉ. सुधाकर चौधरी या सर्वांचे आभार.

                    (दिनांक ८-६-२०२० रोजी आर. सी. पटेल महाविद्यालय, शिरपूर यांनी आयोजित केलेल्या वेबिनार मध्ये केलेले बीजभाषण.)

महत्वाचे संदर्भ : 

१. कला आणि संस्कृती : एक समन्वय - डॉ. सुधीर रा. देवरे, २००३, समीक्षा, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर.

२. पोत - द. ग. गोडसे, १९६३, पॉप्युरल प्रकाशन, मुंबई.

          (संपृक्त लिखाण तीन, आखाजी– २०२३ च्या अंकात प्रकाशित झालेला लेख. इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

© डॉ. सुधीर राजाराम देवरे

ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/

संपृक्त लिखाण तीनची लिंक : https://notionpress.com/read/sampruktt-likhan-three