शनिवार, १४ फेब्रुवारी, २०१५

केजरीवाल: एक यशश्वी प्रयोग

-         डॉ. सुधीर रा. देवरे

     श्री अरविंद केजरीवाल यांचे पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन. डिसेंबर दोनहजार तेराच्या दिल्लीच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाला अठ्ठावीस जागा मिळाल्या होत्या. छत्तीस जागांचे निर्भेळ यश मिळाले नव्हते तरी सत्तास्थानावर आम आदमी पक्ष पोचला होता. या घटनेवर तेव्हा अरविंद केजरीवाल या नावाचा मी ब्लॉग लिहिला होता. केजरीवालांना यावेळी सत्तर पैकी सदुसष्ट जागा मिळाल्यात. म्हणजे एकूण जागांच्या फक्‍त 3 जागा कमी मिळाल्या. एकूण पंच्चावन्न टक्के लोकांनी आम आदमी पक्षाला मतदान केले आहे. हे त्यांचे यश म्हणजे केवळ योगायोग नाही तर मोठ्या सायासाने मिळवलेले यश आहे.
      अ‍रविंद केजरीवाल यांच्याकडे भारतीय राजकारणातला एक प्रयोग म्हणून मी पाहतो. एक कर्मचारी वर्गातला माणूस, नोकरीचा राजीनामा देऊन सामाजिक कामात उतरतो. परिवर्तन नावाची एक एनजीओ काढून जनलोकपालाचा खर्डा बनवतो. अनेक समानधर्मा लोकांना जमवून आंदोलन करतो. आणि त्या आंदोलनात राजकारण्यांकडून राजकारणात येण्याचे आव्हान मिळताच ते स्वीकारून ते लिलया पेलवून दाखवतो, ही या लोकशाही देशातली फार मोठी घटना आहे.
      आधीच भारतात अनेक राजकीय पक्षांची खिचडी झाली आहे. असे अनेक पक्ष स्थानिक- प्रांतिय कारणाने यशश्वी होत असले तरी थोड्या फार लोकसभेच्या जागा मिळताच ते केंद्रात लुडबुड करू लागतात. अशा कोणत्याही आधीच अस्तित्वात असलेल्या पक्षात केजरीवाल न जाता स्वत:चा स्वतंत्र पक्ष स्थापन करतात हेच प्रंचड मोठे कष्टाचे काम होते.  प्रामाणिकपणा, पक्ष निधी जमवतानाचा पारदर्शीपणा, धनादेशने मिळवलेला निधी, कोणताही गुन्हेगारी शिक्का नसलेले आणि सर्वसामान्य लोकांतून आलेले उमेदवार, समाजकार्याची तळमळ, निगर्वी संभाषण, सामान्य लोकांशी जोडलेली नाळ, साधी राहणीमान, ‍ नकारात्मक प्रचार न करता लोकांच्या  गरजांना हात देणारे कार्यकर्ते आदी अनेक बाबींमुळे आम आदमी पक्ष सर्वसामान्य लोकांना आपला पक्ष वाटतो. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या माणसाला केजरीवाल यांचे राजकारण भावते. अरविंद केजरीवाल आणि त्यांचा पक्ष म्हणूनच देशातला राजकीय गणितातला एक प्रातिनिधीक घटक ठरतो. हा पक्ष भविष्यात केवळ दिल्लीपुरता प्रांतिय पक्ष न ठरता तो भारताचा राष्ट्रीय पक्ष ठरावा अशी आशा करू या. केजरीवाल यांच्याकडे  भारतीय राजकारणाचा एक यशश्वी प्रयोग म्हणून पहावे लागेल. आज हा पक्ष राष्ट्रीय नसला तरी त्याने पाडलेल्या पायंड्याने इतर पक्ष अंतर्मुख होऊन आत्मपरिक्षण करू लागले तर ही घटना उत्तम आणि लोकाभिमुख दर्जेदार राजकारणाची नांदी ठरू शकेल.   
      लोक मौनालाच कंटाळतात असे नाही तर त्याच त्याच भाषणबाजीलाही कंटाळतात हे दिल्लीतल्या निकालांनी दाखवून दिले. भाषणबाजीतला विकास हा भुलभुलैया आहे आणि जमिनीवरचा अंजेडा वेगळा आहे हे नागरिकांच्या लक्षात आले. भाषणातला विकास देशात कुठेच दिसत नाही. फक्‍त आठ नऊ महिण्यातच केंद्र सरकारची आपल्याच तोंडून आत्मस्तुती वाढली आहे. (आणि मंदिर बाधंणे हा त्यावरचा कळस!) भ्रष्टाचार कमी झाला नाही. महागाई भडकली. संप्रदायिकता वाढली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव अर्ध्यावर आले तरी पेट्रोल- डिझेल भारतात फक्‍त एकेक- दोन दोन रूपयांची स्वस्त होते. पेट्रोल- डिझेलचे भाव आंतरराष्ट्रीय किमतीनुसार ठरवण्याचे अधिकार भारतातल्या तेल कंपन्यांना दिल्यामुळे आज त्याचे परिणाम (कच्च्या तेलाच्या किमती पडल्यामुळे) जाणवत नसले तरी भविष्यात प्रचंड किमती वाढू शकतात.
      काळा पैसा जो स्वीस बँकेत असल्याचे सांगितले जात होते, तो कुठे गेला. ज्यांचा होता त्यांनी या गदारोळात तो तिथून काढून दुसरीकडे ठेवला की मुळात तो नव्हताच? आणि असला तरी तो देशात आणणे आंतरराष्ट्रीय कायद्याने इतके सहज शक्य आहे का? मुळात आपल्या देशातून काळा पैसा बाहेर जाऊ नये याची शासनाकडून कोणती खबरदारी घेतली जाते? (असा पैसा बाहेर पाठवणार्‍या खाजगी हवाला यंत्रनेकडूनच भारतातील सर्व राजकीय पक्षांनी पक्षनिधी घेतल्याचे यापुर्वीच उघडकीस आले आहे.) देशातलाच काळा पैसा शासनाला बाहेर काढता येत नाही तर परदेशात गेलेला पैसा आणणे कसे शक्य होणार?
      या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचे हे यश आहे. आपच्या यशाने देशातील धार्मिक जातीय समीकरणांचे राजकारण बदलेल अशी आशा करता येईल. भारतातील सर्वसामान्य नागरीक धार्मिक आणि जातीय राजकारण करणार्‍या पक्षांना कंटाळले आहेत. आज दिल्लीत आप पक्ष नसता तर या सत्तर जागा भाजप आणि काँग्रेसमध्ये विभागल्या गेल्या असत्या आणि लोक या पक्षांना मानतात असा अर्थ त्यातून काढला गेला असता. खरे तर या दोन्ही पक्षांच्या प्रवृत्तीत खूप फरक नाही. स्वार्थासाठी हे दोन्ही पक्ष एक झालेले अनेक वेळा दिसून आले. लोक आता पर्यायांच्या शोधात आहेत. जिथे पर्याय असतो तिथे लोक पर्यायासोबत जातात.
      पारदर्शीपणाला महत्व, गुन्हेगारमुक्‍त उमेदवार, जातीयता- धार्मिकतेपासून अंतर आदी बाबी आप पक्षात आजतरी पहायला मिळतात. काही राष्ट्रीय नेत्यांनी केजरीवाल यांना नक्षलवादी ठरवण्यापर्यंत मजल मारली. पण असा प्रचार त्यांच्या अंगाशी आला. देशाच्या सर्वोच्चस्थानी असलेल्या नेत्याने अशा खालच्या स्तरावर (दोन्ही अर्थांनी) प्रचार करणे जनतेला आवडले नाही. केजरीवालांवर नक्षलवादी, गद्दार, देशद्रोही आदी व्यक्‍तिगत आरोप करून भाजपने नागरिकांची नाराजी ओढवून घेतली. ऐनवेळी राजकारणात उडी घेतलेल्या संधीसाधू लोकांनाही मतदारांनी ओळखले आणि त्यांना खड्यासारखे बाजूला सारले.    सारांश, दिल्लीतले आप पक्षाचे यश हा भारतीय लोकशाहीचा सर्वात मोठा विजय असून हा प्रयोग देशभर यशश्वी व्हायला हवा.
      (दिनांक 5 जानेवारी 2014 रोजी लिहिलेला अरविंद केजरीवाल हा ब्लॉगही http://sudhirdeore29.blogspot.com/2014/01/blog-post.html?spref=tw या लिंकवर इच्छुकांनी जरूर वाचावा. या ब्लॉगमधील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)


     -  डॉ. सुधीर रा. देवरे
     
           इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

रविवार, १ फेब्रुवारी, २०१५

चमत्कार मीमांसा

- डॉ. सुधीर रा. देवरे

      (‘माणूस जेव्हा देव होतो’ हा माझा संदर्भ ग्रंथ नुकताच प्रकाशित झाला. या ग्रंथातील एका प्रकरणाचा संपादित अंश.)
      जिथे बुध्दीची हद्द संपते तिथे श्रध्देचा प्रांत सुरू होतो आणि मानवी श्रध्दा अनेक प्रकारच्या चमत्कारांना जन्म देतात. चमत्कारांशिवाय नमस्कार मिळत नाही हे खरे असले तरी असे जाणीवपूर्वक मिळवलेले नमस्कार जास्त दिवस टिकत नाहीत हे ही तितकेच खरे आहे. मानवी बुध्दीच्या आकलनापलिकडे घडणार्‍या घटना म्हणजे चमत्कार. काही खरोखर घडणार्‍या घटनांनी बुध्दी कुंठीत होते म्हणून ते चमत्कार समजले जातात, तर काही चमत्कार आपल्या प्रिय अध्यात्मिक गुरूच्या अतिव प्रेमापोटी श्रध्देतून पसरवले जातात. कोणताही भक्‍त आपल्या गुरूची कोणतीही कृती सामान्य समजत नाही म्हणून त्या कृतीचा तरतमभाव न तपासता त्या घटनेला तो चमत्काराचे रूप देऊ पाहतो आणि सांगीवांगीतून चमत्कारांचा फैलाव सर्वदूर होत राहतो.
       चमत्कार कुठे घडत नाहीत? जगात सगळीकडे चमत्कार आहेत. अगदी या एकविसाव्या शतकातही चमत्कार ओतप्रोत भरून आहेत. परवा दोनहजार तेराच्या फेब्रुवारी महिण्याच्या सुरूवातीला व्हॅटिकन सिटीत ख्रिश्चन धर्मगुरू पोप बेनडिक्ट सोळावे यांनी सेंट पीटर्स स्क्वेअर चर्चमध्ये प्रकृतीच्या कारणाने पोप पदापासून दूर होण्याचा निर्णय जाहीर करताच चर्चवर वीज कडाडली म्हणे. आणि या विजेचा लोळ फोटोग्राफीतून जगभरातल्या चॅनल वाल्यांनी दाखवला. (नंतर २८ फेब्रुवारी २०१३ ला पोप यांनी आपले पद सोडले.) कोणत्या फोटोग्राफरने ती वीज आपल्या कॅमेर्‍यात पकडली तेही तपशील दाखवले गेले. त्या फोटोग्राफरच्या मुलाखतीही प्रसारीत झाल्या.
       वीज पडली हे खरे आहेच. जगभर त्या आठवड्यात कुठे ना कुठे वादळी पाऊस झाला तर कुठे बर्फाने थैमान घातले होते. भारतातही हिमाचल भागात या वेळी तुफान बर्फवृष्टी झाली आणि दिल्लीसह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत होता. व्हॅटिकन सिटीचे वातावरणही असे पावसाळी वातावरणाने बिघडलेले होते. पाऊस पडत होता. त्यामुळे गडगडाटासह विजा होत होत्या. पण पोप यांनी राजीनामा दिल्यामुळे चर्चवर वीज पडली हे जे काही तर्कट चर्चेला आले, हा चमत्कार. म्हणजे ही नैसर्गिक घटना पोपच्या राजीनाम्याशी जोडून या आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगातही चमत्कार चर्चिले जातात तर इतिहासात थोडे मागे अप्रगत काळात डोकावल्यावर काय होत असेल याची कल्पना करता येईल.
       आज घडलेल्या घटनांचे विश्लेषण करायला उत्कृष्ट तंत्रज्ञान विकसित झाले असूनही आपण चमत्कारांना शरण जात असतो तर मग ज्यावेळी असे कोणतेही तंत्रज्ञान नव्हते आणि वैचारिकता वाढण्याइतकी वैज्ञानिक प्रगतीही नव्हती, त्याकाळी चमत्कारांनी काय थैमान मांडले असेल याची कल्पना केलेली बरी. जिथे जिथे आपली तार्कीकता पोचत नाही, कार्यकारण भाव तपासण्याच्या पलिकडे काही घडते तिथे चमत्कार घडतात. कोणत्याही घटनेकडे पाहण्याचा तरतमभाव आपण या तंत्रज्ञान संपन्न काळातही हरवून बसल्यामुळे चमत्कार पहायला मिळतात आणि अफवांमुळे हे चमत्कार सांगिवांगीतून मोठे होत जातात. घटना प्रत्यक्ष घडतात त्यापेक्षा कितीतरी प्रमाणात आपल्या कल्पनाशक्‍तींनी चमत्कार मोठे होत जातात.
       काही वर्षांपूर्वी गुंथर सोन्थायमर नावाचे एक जर्मन संशोधक भारतात येऊन संत तुकारामांचा अभ्यास करीत होते. त्यांनी तुकारामांवर एक डॉक्युमेंटरी फिल्म बनवली आहे. त्या डॉक्युमेंटरीत तुकारामाचे अभ्यासक व कवी दिलीप पुरूषोत्तम चित्रे यांची त्यांनी मुलाखत घेतली आहे. दिलीप चित्रेंना त्यांनी मुलाखतीत प्रश्न विचारला, तुकारामांचे अभंग इंद्रायणी नदीत बुडवल्यावर काही दिवसांनी ते पाण्यावर कोरडे तरंगून आले असे जे म्हटले जाते ते कसे शक्य आहे? चित्र्यांचे उत्तर मला खूप आवडले. ते म्हणाले, येशू ख्रिस्तांविषयी जसे म्हटले जाते, की सूळावर दिल्यानंतर येशू ख्रिस्त तिसर्‍या दिवशी आपल्या कबरीतून उठून धर्म प्रचाराला निघाले. तशी ही तुकारामांची आख्यायिका आहे. 
 किती समर्पक उत्तर आहे पहा. मला तर दिलीप चित्र्यांची ही स्वतंत्र कविताच वाटली. काय नाही या उत्तरात. या उत्तरात सगळे काही आले आहे. समजणार्‍याला इशारा काफी. अशा उत्तराने त्यांनी पाश्चात्य लोकांनाही दुखवले नाही आणि भारतीयांनाही. थोडक्यात, लोकोपवाद, लोकश्रध्दा यांची फार चिकित्सा न करता आपण संशोधन करत राहणे महत्वाचे.
 संत नामदेवासोबत विठ्ठल जेवले, हा एक चमत्कार नामदेवांच्या नावाने सांगितला जातो. संत ज्ञानेश्वरांनी चांगदेवाला सामोरे जाण्यासाठी भिंत चालवणे आणि रेड्याच्या तोंडून वेद वदवणे हे दोन चमत्कार ज्ञानेश्वरांच्या नावाने सांगितले जातात तर संत तुकारामांच्या कवितेच्या बुडवलेल्या वह्या नदीच्या पाण्यावर तरंगून येतात आणि शेवटी ते सदेह वैकुंठाला जातात हे दोन ‍चमत्कार संत तुकाराम यांच्या नावाने प्र‍चलित आहेत. आम्ही जातो आमुच्या गावा आमचा राम राम घ्यावा, हा त्यांचा अभंग ते सदेह वैकुंठाला जात असताना गात होते असेही म्हटले जाते.
       संत ज्ञानेश्वर यांच्या नावावर जे दोन मुख्य चमत्कार आहेत, ते म्हणजे वाघावर बसलेल्या चांगदेवाची भेट घेण्यासाठी निर्जीव भिंत चालवण्याची आणि दुसरा, रेड्याच्या तोंडून वेद वदवण्याची. संत तुकारामांनी ज्ञानदेवांबाबत आपल्या अभंगात म्हटले आहे:
जयाचिया व्दारी। सोन्याचा पिंपळ। अंगी ऐसे बळ। रेडा बोले ।।
        या काव्यात्मक ओवीमुळे खरोखरचा रेडा बोलता झाला असे सर्वसामान्य लोकांनी समज करून घेतला असावा असे म्हणावे, तर भींत चालवण्याचा चमत्कार कसा झाला हा प्रश्न उरतोच. प्रत्येक ओवी चमत्कार होणार नाही. चमत्काराला जे सोपे वाटते ते चमत्कार उचलून घेते. वरील अभंगातील रेडा बोलेचा चमत्कार सांगिवांगीतून सहज पसरवणे शक्य होते. त्याला संत तुकारामाच्या काव्यातून दुजोरा मिळू शकत होता. पण ज्ञानेश्वरांच्या दारासमोर सोन्याचा पिंपळ दाखवणे इतके सोपे नव्हते आणि त्याचा व्यंगार्थ कळणेही सर्वसामान्य लोकांना शक्य नव्हते म्हणून हा पिंपळाचा ‍चमत्कार झाला नाही असे म्हणावे लागेल.
       ओव्या, अभंगांमधून वाचार्थ घेतला जातो. व्यंजना, लक्षणा, प्रतिके, रूपके, प्रतिमा यांचा विचार सामान्य पातळीवरच्या लोकांत होत नसल्यामुळे असा अर्थ काढला जात असावा. अंगी ऐसे बळ रेडा बोले या पदाचा अर्थ वाचार्थाने घेऊन लोकश्रध्देतून ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद वदवले हा चमत्कार सांगितला जाऊ लागला. खरे तर या पदाचा अर्थ रेड्यासारख्या कमी बुध्दीच्या माणसालाही ज्ञानी करून सोडणे हे ज्ञानेश्वरांचे कार्य होते- ब्रिद होते, म्हणून ते ज्ञानेश्वर. ज्ञानाचे ईश्वर. अध्यात्मात काव्यात्मक बोलणे नेहमी वाचार्थाने घेतले जाते आणि जगात असे सर्वत्र झालेले दिसते.
       काही चमत्कार अशा काव्यातून वेगळा अर्थ काढून सांगितले जातात तर काही चमत्कार जाणीवपूर्वक भक्‍तांकडून आणि अपवादात्मक ‍िवरोधकांकडूनही पसरवले जातात. चांगदेव भेटायला आले त्यावेळी ज्ञानेश्वर कदाचित भावंडांसह एखाद्या भींतीवर बसलेले असतीलही. तसेच वाघावर बसलेल्या चांगदेवापेक्षा ज्या भिंतीवर ज्ञानेश्वर बसलेले असतील ती भिंत वाघापेक्षा क‍दाचित किंचित उंचही असेल. ही गोष्ट भक्‍‍तांकडून सांगता सांगता काही दिवसांनी लोकश्रध्देतून ती भिंत चालायलाही लागली असावी, असा अनुमान काढता येऊ शकतो.
       संत तुकारामांबाबत असेच झाले आहे. तेराव्या दिवशी अभंगांच्या- कवितेच्या कोरड्या वह्या इंद्रायणीच्या पाण्यावर तरंगून येण्याचा आणि सदेह वैकुंठवासी होण्याचा हे दोन्ही चमत्कार सगळ्यांनाच माहिती असतात. विरोधकांच्या कागाळ्यातून सगळे काव्य नदीत बुडवल्यानंतर तुकारामांना काय करावे सुचेना आणि त्यांनी तिथेच नदीच्या काठावर बसून उपोषण सुरू केले. पंचक्रोशीत विखुरलेले त्यांचे भक्‍‍तगण त्यांच्या भोवती गोळा झाले. संत तुकारामांकडून अभंग रचून होताच भजनातून- कीर्तनातून गाऊन ते इतर भक्‍‍तांच्याही मुखद्‍गत झालेले होते. या तेरा दिवसात ज्याला जे जे अभंग आठवतील ते ते अभंग भक्‍त म्हणू लागले आणि त्यांच्यात जे कोणी साक्षर असतील त्यांनी ते अंभग लिहून घेतले असावेत. असे तुकारामांचे सगळे अभंग तेरा दिवसात पुन्हा शब्दबध्द झाले, म्हणजेच ते पु्न्हा पाण्यावर तरंगून आले असेच म्हणावे लागेल. तुकारामांचे अभंग बोलीभाषेतून असल्यामुळे सहस्त्र मुखातून ते सहज तरंगून आले.
       संत नामदेवांच्या ताटात स्वत: विठ्ठल जेवायला बसला तर त्यांच्या दासीचे दळण दळण्यापर्यंचे घरगुती कामेही विठ्ठल आनंदाने करतो असे अनेक चमत्कार सगळ्यांनाच माहिती आहेत. आणि त्यामागची भक्‍‍ती- श्रध्दा येथे विशेष काम करते हे ही अभ्यासकांना माहिती असते. संत गाडगेबाबा तसे कर्मकांडांविरूध्द असणारे थोर संत होते. म्हणून त्यांनी अंधश्रध्देला कधी थारा दिला नाही आणि चमत्कारांनाही. तरीही त्यांच्याबाबतीतही एक चमत्कार सांगितला जातो की ते त्यांच्या भक्‍‍तांच्या गराड्यातून गुप्त होऊन दूर कुठेतरी झाडाखाली बसलेले दिसत.
       शिर्डीच्या साईबाबांचा पाण्यात दिवे लावण्याचा चमत्कारही आपल्याला माहिती आहे. साईबाबांचे असंख्य चमत्कार सांगितले जातात. देव आणि संतांच्या नावाने सांगितले जाणारे असे चमत्कार सर्वत्र आढळतात. पण ते तारतम्याने घ्यायचे असतात, वास्तव अर्थाने नव्हे. अध्यात्मिक- धार्मिक क्षेत्रात चमत्कार दोन प्रकारचे असतात.
एक: एखाद्या संतांचे इतर भक्‍‍त त्यांच्या नावाने काही चमत्कार सांगतात.
दोन: काही तथाकथित संत भक्‍‍तांपुढे स्वत: चमत्कार करतात.
       पहिल्या प्रकारचे चमत्कार हे आपल्या प्रिय गुरूचे मोठेपण सांगण्यासाठी भाबडेपणातून वा काही प्रमाणात भक्‍‍तांच्या अज्ञानामुळे निर्माण होतात व त्याच भाबडेपणातून ते इतरांना सांगितले जातात. या चमत्कारांतून कोणा भक्‍‍ताला आपला स्वार्थ साधायचा नसतो. पण दुसर्‍या प्रकारचे चमत्कार हे भक्‍‍तांना ठगवण्यासाठी केले जातात. आपण कोणीतरी वेगळे म्हणजेच दैवी पुरूष आहोत हे भक्‍‍तांवर ठसवण्यासाठी असे तथाकथित संत आपण स्वत:हून असे चमत्कार करतात. उदाहरणार्थ, भक्‍‍तांच्या संत्सगांत हातातून सोन्याची अंगठी काढणे, चैन काढणे, प्रसाद काढणे, गुलाल काढणे हे स्वस्त प्रसिध्दीच्या मागे लागलेल्या आणि धार्मिकतेच्या आवरणाखाली व्यवसाय करणार्‍या बुवाबाजीचे काम आहे.
        अतिव श्रध्देमुळे, अतिव विश्र्वासामुळे आणि लोकसमजांमुळे योगायोगाला चमत्कार समजला जातो वा घडलेली घटना वेगळ्या अर्थाने सांगत सांगीवांगीतून- कर्णोपकर्णी एखाद्या घटनेची अफवा ईश्वरी रूप घेत अजरामर होत जाते. कार्यकारण भावाचा अभाव म्हणजे चमत्कार होणे. म्हणून कोणत्याही प्रकारचे चमत्कार मान्य करणे हे मानसिक गुलामगीरीचे लक्षण आहे.
       आपले पूर्वज अडाणी होते. तरीही त्यांनी चमत्कारांना खूप नावाजलेले नाही. देवांच्या नावाने आणि संतांच्या नावानेही काही चमत्कार त्यांच्याकडून जरूर सांगितले जातात- ऐकायला मिळतात. पण या चमत्कारांना त्यांनी दुय्यम स्थान दिले आहे. चमत्कारांआधी देवांचे वा संतांचे मूळ कतृत्व नावाजले जाते. त्यांनी केलेले परोपकार आणि जनतेविषयी त्यांच्या काळजात असलेला कळवळा आधी अधोरेखित केला जातो. त्या अनुषंगाने एखाददुसरा चमत्कारही सांगितला जातो. पण केवळ चमत्काराने आपल्या पूर्वजांनी कोणाला देवपण दिलेले नाही, हे लक्षात घ्यावे लागेल. तसे असते तर जगातले सगळेच जादूगार आज आपल्यात देव नाहीतर संत म्हणून मिरवले गेले असते.
     (या ब्लॉगमधील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.) 

     -  डॉ. सुधीर रा. देवरे
     
           इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/