बुधवार, १ मार्च, २०२३

(शीर्षक नसलेली कविता) : आकलनात्मक भाष्य

 

-    डॉ. सुधीर रा. देवरे

 

भ्रमण करता करता

राजज्योतिषी

एका विशिष्ट

भूमीशी येऊन थबकले

जिथे

सर्प आणि

मुंगूस

सहकार्याने

सावज पकडताना दिसले.

राजज्योतिषी

सुलतानाला म्हणाला,

ही भूमी राज्य करणेस सोयीची ठरेल.

 

  - अशोक नायगावकर (वाटेवरच्या कविता)

 

                        अशोक नायगावकर यांच्या वाटेवरच्या कविता या संग्रहातील सदतीस क्रमांकाची ही कविता. कवितेला शीर्षक नाही. या कवितेला भावगर्भ काव्यात्मक भाष्य म्हणणं अधिक सयुक्‍तीक ठरेल असं प्रस्तुत अभ्यासकाला वाटतं. या कवितेवरचं हे लिखाण समीक्षात्मक आकलन नसून आकलनात्मक भाष्य समजावं.

                        ‘‘ सर्प आणि मुंगूस सहकार्याने सावज पकडताना दिसले.’’ आणि ‘‘ही भूमी राज्य करणेस सोयीची ठरेल.’’ हे या कवितेतील महत्वपूर्ण चलन. बाकीच्या संज्ञा या चलनाच्या अवकाशातील वैशिष्ट्यपूर्ण चौकटीसाठी (फ्रेमसाठी) आलेले आहेत.

                        सर्प आणि मुंगूस या युग्माकडे युगानुयुगं एकमेकांचे नैसर्गिक कट्टर हाडवैरी- दुश्मन म्हणून पाहिलं जातं. पण या भूमीत एखादं सावज पकडायचं असेल आणि साप वा मुंगूस या दोन्हींपैकी केवळ एकाच्या शिकार कौशल्यावर ते सावज हाती (इथं तोंडी) लागणार नसेल तर मुंगूस प्रसंगी सापाची मदत घेतो तसा सापही मुंगसाची मदत घेतो, अशा प्रदेशाची या कवितेत कवी गोष्ट सांगत आहे.

                        मूळ स्वभावात असलेलं नैसर्गिक शत्रुत्व विसरुन जे प्राणी आपल्या सावजासाठी एकत्र येतात ते किती पराकोटीचे स्वार्थी असले पाहिजेत! म्हणून हे सहकार्य केवळ सावजापुरतंच मर्यादीत असणार. कायमस्वरुपी नव्हे. एकदा का सावज हाती लागलं आणि ते दोघं मिळून फस्त केलं, की मुंगूस आणि साप एकमेकांवर पाशवी झेप घेण्यास पुन्हा तयार! या जीवांची बुध्दी तेवढीच! म्हणून हे क्षणिक सहकार्य. केवळ सावजासाठी. अशोक स्तंभातील प्राण्यांसारखं जीवन सहकार्य- सातत्यासाठी नव्हे. जिथं मूळ स्वभावधर्म विसरून- आपलं तत्व विसरुन स्व कल्याणासाठी (सावजासाठी) युत्या केल्या जातात, त्या प्रदेशाची ही गोष्ट आहे. सावजासाठी जे नैसर्गिक नियम तोडतात, ते जीव सहज विकाऊ असतात हा मतितार्थ. इथं प्रजा हीच सावज ठरते. प्रजेच्या सावजासाठी जिथं मुंगूस हा सापाची मदत घेतो तसा केव्हातरी सापही मुंगसाची. अशा प्रदेशातली प्रजाही सुस्त असू शकते. कोणी तिच्या भल्यासाठी हलवलं तरी गाढ झोपेतून जागी न होणारी.

                        अशी ही भूमी सुलतानाला राज्य करणेस योग्य ठरेल! करणेस ही शासकीय पत्रव्यवहाराची भाषा. म्हणून करणेस हा शब्द इथं मुद्दाम वापरलेला दिसतो.

                        कविता इथं सुलतान म्हणून उल्लेख करते. राजा का म्हणत नाही? हा प्रश्न पडणारच. सुलतान आणि राजा या शब्दांवरचं भावव्याप्त आवरण छेदून हा फरक लक्षात घ्यावा लागेल.

                        राजा या नावाभोवती प्रजाहीतदक्ष- प्रजेचा सांभाळ करणारा, परोपकारी, दानशूर, त्यागी, न्यायी, समाजाभिमुख सत्ताधारी अशा प्रकारच्या काही प्राक्‍कथा (मिथ्स) आहेत. उलट सुलतान या नावाभोवती क्रूरता, हिंसा, अत्याचार, परधर्म असहिष्णूता, जिझिया कर लादणारा, आपमतलबी- स्वार्थी वृत्ती असलेला, सत्तापिपासू, ऐषारामी असं या शब्दाचं बदनाम स्थान जनमानसात रुढ झालेलं आढळेल.

                        साहजिकच इथं राजा ऐवजी सुलतान आ‍ला आणि प्रजेतील शत्रूस्थान हेरून त्यांना आपापसात लढवत ठेवणं ही त्याची वृत्ती. परस्पर शत्रू असलेले सरदार आणि त्यांच्यात विभागली गेलेली प्रजा एकमेकांना सहकार्य करू लागली तरी ती केवळ सामायिक (तत्कालीन) सावजासाठी असेल; याकडंही सुलतानचं कायम लक्ष राहील.

                        जोपर्यंत मुंगूस आणि साप फक्‍त सावज पकडतानाच एकमेकांना सहकार्य करतात, तोपर्यंत सुलतानाच्या साम्राज्याला इथं धोका नाही. तसेच मुंगूससाप या किरकोळ जिवांचं सामायिक सावजही सुलतान असणं शक्य नाही. (म्हणजेच सुलतानाविरूध्द प्रजा बंड करणार नाही.) म्हणून सुलताननं या भूमीवर खुशाल राज्य करावं असं राजज्योतिषी सुचवतो.

                        (लिखाण : १९९३; कविता-रती, जाने, फेब्रु, मार्च, एप्रिल 2022 मध्ये प्रकाशित. इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

© डॉ. सुधीर रा. देवरे

ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/