शनिवार, १५ जून, २०१९

म. सु. पाटील : उत्तुंग समीक्षक आणि माणूस- डॉ. सुधीर रा. देवरे

          दिनांक 31 मे 2019 ला रात्री अकरा वाजता म. सु. पाटील सर उर्फ बाबा यांचं निधन झालं. ही दु:खद बातमी समजताच सरांशी झालेल्या पहिल्या भेटीपासून तर आतापर्यंतच्या त्यांच्या समग्र आठवणी अगदी कालच घडल्यासारख्या मनात सहज तरळून आल्या.
     म. सु. पाटील सरांशी माझी पहिली प्रत्यक्ष भेट मनमाडला 1985-86 च्या दरम्यान झाली. (त्या आधी सरांशी आणि पुपाजींशी मी आठवीत असतानापासून पत्रसंवाद होता. अनुष्टुभनियतकालिकामुळे.) मनमाड महाविद्यालयात सर प्राचार्य होते. त्यांच्या निरोपानुसार त्या रविवारी सटाण्याहून डॉ. मोहन माजगावकर दादा आणि आम्ही काही मित्र (प्रा. शं. क. कापडणीस, डॉ. एकनाथ पगार, डॉ. दिलीप धोंडगे आणि मी) मनमाडला गेलो होतो. कॉलेजच्या त्यांच्या निवासस्थानावर पोचलोत. (तेव्हा मी विद्यार्थी होतो. पण पाटील सरांच्या वर्गातला विद्यार्थी नव्हतो.) मुंबईहून अरूण म्हात्रे, रविंद्र लाखे, अशोक नायगावकर आलेले होते. प्रा. प्रभाकर बागले, गो. तु. पाटील, विजय काचरे सरही होते. मनमाडहून खलील मोमीन, देविदास चौधरी हे ही आले.
     सकाळच्या गप्पात हॉलमध्ये घरगुती पध्दतीने खाली टाकलेल्या सतरंज्यावर (सरांसह) भिंतींच्या कडेकडेने बसत आम्ही प्रत्येकाने आपापल्या दोन दोन कविता वाचल्या. कवितांवर व्वा व्वा, क्या बात है वगैरे नेहमीची ठरलेली उडती दाद न येता धीर गंभीर प्रतिसाद मिळत होते. म. सु. पाटील सर अशा गंभीर प्रतिक्रियांना सुरूवात करत. मोजकेच आणि अनौपचारिक बोलत. फक्‍त कविता वाचनाचेच असे दोन तीन राऊंड आणि अनौपचारिक चर्चा झाल्यावर दुपारी साधं पण चवीष्ट जेवण झालं. घरगुती जेवणाची खास तयारी सरांनी आत करून घेतली होती. (सर मनमाडला एकटेच असत. परिवार मुंबईला होता.)
     दुपार नंतरच्या अनौप‍चारिक सत्रात पाटील सरांनी विदुषकी कविता शीर्षकाखाली अनेक कवींच्या कवितांवर लिहिलेली त्यांची समीक्षा वही अतिशय संयत, सावकाश आणि संथ गतीने वाचून दाखवली. ह्या समीक्षेला खास म. सु. टच होता. ही समीक्षा म्हणजे एक दीर्घ कविताच असल्याचं लक्षात येत होतं. समीक्षेतही सृजन असतं, हे या समीक्षेतून दिसून येत होतं. खुद्द सरांच्या तोंडून त्यांची समीक्षा ऐकण्याचा तो योग अपूर्व होता. कवितेसारखी कवितेच्या समीक्षेलाही दाद देता येते, असं पहिल्यांदा वाटू लागलं. नंतर ही समीक्षा पुस्तक रूपाने पुढे येणार होती. या आधी सरांचे अनुष्टुभ मधील आदिबंधात्मक समीक्षा लेख प्राधान्याने वाचत होतो. आदिबंधात्मक समीक्षा ही संकल्पना मराठीत आणण्याचं श्रेय पाटील सरांनाच जातं.
     या नंतर नाशिकच्या सावानातील जिल्हा साहित्य मेळाव्यातही आमची एकदा भेट झाली होती. सोबत नीरजा होत्या. सरांनी नीरजांशी ओळख करून दिली. 1985 ते 1990 च्या दरम्यान मी तीन-चार वेळा नाशिकच्या साहित्य मेळाव्यात गेलो आहे. नंतर जाणं बंद झालं.) पाटील सरांना त्यांचे बहुतेक विद्यार्थी बाबा म्हणत. मी मात्र त्यांना कायम सर म्हणूनच हाक मारत आलो.
     सरांच्या सेवा निवृत्तीच्या‍ निरोप समारंभावेळी 1989 ला मनमाडलाच आमची तिसरी भेट झाली. सरांच्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी या निरोप समारंभाला साहित्यिक संमेलनाचं स्वरूप दिलं होतं. तात्यासाहेब (कुसुमाग्रज) प्रमुख पाहुणे होते. धुळ्याहून पुपाजीही (पुरूषोत्तम पाटील) कार्यक्रमाला आले होते. या कार्यक्रमात चेतश्री प्रकाशनातर्फे सरांचं पुस्तकही प्रकाशित झालं. (बालकवींचे काव्यविश्व हे ते पुस्तक असावं.) बाबांचे अनेक माजी विद्यार्थी म्हणजे तेव्हाचे प्राध्यापक लोक कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. पुपाजी आणि तात्यासाहेब (कुसुमाग्रज) यांची संयुक्‍तीक भाषणं झाली. तात्यासाहेबांच्या हस्ते सरांचा सत्कार झाला. या नंतर सर मुंबईला स्थायिक झाले.
     द. ग. गोडसे यांच्या कलामीमांसेचा मी अभ्यास करत होतो. 28, 29 फेब्रुवारी 1990 या दोन दिवसांचे मुंबई विद्यापीठ आणि देवरूख (जि. रत्नागिरी) येथील आठल्ये- सप्रे महाविद्यालय यांच्या संयुक्‍त विद्यमाने द. ग. गोडसे यांच्या वयाच्या पंचाहत्तर वर्षांनिमित्ताने त्यांच्या कलामीमांसेवर चर्चासत्र आयोजित केले होते. संस्थेचे अध्यक्ष अरूण आठल्ये, प्राचार्य डॉ. सुरेश जोशी, मुंबई विद्या‍पीठाच्या मराठी विभाग प्रमुख सरोजिनी वैद्य हे संयोजक होते. या चर्चासत्रासाठी महाराष्ट्रातील एकूण पस्तीस अभ्यासक निमंत्रित होते. त्यात म. सु. पाटील सर आणि मी ही निमंत्रित होतो. दुर्गा भागवत, कमल देसाई, प्रभाकर मांडे, पुष्पा भावे, आलोचनाचे संपादक वसंत दावतर, वसंत पाटणकर, उषा देशमुख, हरिश्चंद्र थोरात, दिपक कन्नल, सीताराम रायकर, रामदास भटकळ, अलका मटकर, रोहिनी भाटे, म. द. हातकणंगलेकर, प्रकाश खांडगे, अशोक निरफराके आदी साहित्यिक आणि विविध कला क्षेत्रातले दिग्गज लोक या चर्चासत्रासाठी निमंत्रित होते. (या सर्वांत वयाने लहान मीच होतो. शेवटच्या दिवशी महेश केळुस्कर आणि श्रीधर तिळवे यांची भेट झाली. श्रीधर तिळवे त्या वेळी कवी म्हणून कोणाला माहीत नव्हते.)
     देवरूख कॉलेजच्या पटांगणात मंडप देऊन त्याखाली पलंग टाकून आमची राहण्याची सोय निसर्गरम्य परिसरात केली होती. मी आणि पाटील सर एकत्रच असायचो. आमचे पलंगही शेजारी एकमेकांना लागून होते. पहिल्या‍ दिवशी पाटील सरांचं टिपण वाचून झाल्यानंतर सायंकाळी मी माझं टिपण सरांना वाचायला‍ दिलं. चर्चासत्रात माझा सहभाग दुसर्‍या दिवशी होता. म्हणालो, सर, माझ्या टिपणावरून जरा नजर फिरवाल. संपूर्ण टिपण वाचावं का काही टाळावं? माझा निर्णय होत नाही. सरांनी माझं संपूर्ण टिपण काळजीपूर्वक वाचलं, पैकी एक मुद्दा मी मांडू नये असं त्यांनी सुचवलं. याचं कारण हे चर्चासत्र म्हणजे पंच्याहत्तरी  निमित्ताने गोडसेंचा सत्कार कार्यक्रम होता. आणि माझ्या या मुद्द्यात गोडसेंच्या कलामीमांसेवर थोडी कठोर टीका होती. मी तो मुद्दा दुसर्‍या दिवसाच्या माझ्या सादरीकरणात टाळला.
     द. ग. गोडसे यांच्या कलामीमांसेवर मला पुणे विद्यापीठाची पीएच. डी. (1998) मिळाल्याचं समजताच सरांचं मला पत्र आलं. त्या पत्रात त्यांनी म्हटलं होतं: सुधीर, तू निवडलेला विषय फार किचकट होता. समीक्षेची समीक्षा तू करत होतास. त्यातून तू कसा मार्ग काढलास आणि शेवटी कसा योग्य त्या शोधावर येऊन पोचलास हे तुझं तुलाच माहीत. खूप अवघड विषयाचं शिवधनुष्य तू पेललंस. यासाठी तुझं त्रिवार अभिनंदन. 
     2001 साली अहिराणी बोलीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार देण्याच्या समितीवर भालचंद्र नेमाडे सर, डॉ. मु. ब. शहा सर व मी असे तिघं होतो. (मी सटाण्याहून तर शहा सर धुळ्याहून रात्रीच दादरला पोचलोत. मुंबई मराठी साहित्य संघाच्या विश्रामगृहात आम्ही दोघं थांबलो होतो.) दुसर्‍या दिवशी दादरच्या ऑफिसातली आमची एकमुखी निर्णयाची बैठक संपल्यावर शहा सर व मी पाटील सरांना भेटायला त्यांच्या घरी जाण्याचं ठरवत होतो. पण ते वेळेअभावी शक्य नसल्याने आम्ही बुथ वरून सरांशी टेलिफोनने बोललो. (तेव्हा मोबाईल नव्हते.) आम्ही कोणत्या कामासाठी मुंबईत आहोत हे ऐकून त्यांना आनंद झाला. फोनवरच बराच वेळ साहित्य क्षेत्रातलं बोलणं झालं. पण यावेळी प्रत्यक्ष भेट घेता आली नाही.
      2004 साली मला पार्ले येथील लोकमान्य सेवा संघाचा मा. सी. पेंढारकर पुरस्कार जाहीर झाला. कला आणि संस्कृती : एक समन्वय या माझ्या पहिल्या समीक्षेच्या पुस्तकासाठी मला हा पुरस्कार मिळाला होता. या संस्थेकडून या आधी कोणाकोणाला हा पुरस्कार‍ मिळाला आहे, त्याची यादीही या संस्थेने पाठवली होती. त्यात डॉ. म. सु. पाटील हे नाव वाचून मला आनंद झाला. (पाटील सरांच्या नावांसोबत म. वा. धोंड यांच्यासह अजून काही दिग्गजांना हा पुरस्कार मिळाला होता.) म. सु. पाटील सरांना हा पुरस्कार या आधी मिळाला आहे आणि आपल्यालाही तो मिळतोय, म्हणून त्यांच्या पंक्‍तीत जाऊन बसण्याचा मला साहजिक आनंद होत होता. मी पाटील सरांना रात्री फोन केला. या पुरस्काराबद्दल सांगितलं. पुरस्कार घ्यायला जाऊ का?’ विचारलं. सर म्हणाले, हो अवश्य जा. चांगले लोक आहेत. पुरस्कार देण्यामागे त्यांचा हेतू चांगला आहे. मी पुरस्कार घ्यायला गेलो. आणि योगायोगाने तो पुरस्कार मी प्रा. गंगाधर पाटील सर यांच्या हस्ते स्वीकारला. (डॉ. म. सु. पाटील आणि प्रा. गंगाधर पाटील यांना मी समांतर सूर असलेले सहयोगी समीक्षक मानतो.)
     27 फेब्रुवारी 2016 च्या सायंकाळी दादरच्या रविंद्र नाट्य मंदिरात सरांशी माझी शेवटची प्रत्यक्ष भेट झाली. लांबा उगवे आगर या त्यांच्या आत्मचरित्रासाठीचा पुरस्कार घेण्यासाठी ते तिथं आले होते. आणि मी अहिराणीच्या निमित्ताने : भाषा या माझ्या भाषाविषयक पुस्तकासाठीचा नरहर कुरूंदकर भाषा पुरस्कार (दोन्ही महाराष्ट्र शासनाचे) घेण्यासाठी सटाण्याहून मुंबईला गेलो होतो. रस्त्यातल्या ट्रॅफिक जॅममुळे कार्यक्रम सुरू होण्याच्या फक्त पाच मिनिट आधी सर पोचले. म्हणून जास्त बोलता आलं नाही, तरी आम्ही त्या भेटीत खूप बोललोत असंच म्हणावं लागेल. त्यानंतर दोन तीनदा फोनवर बोलणं झालं. 
     माझा एक विद्यार्थीमित्र मुंबईला नोकरी करतो. त्याला एकदा सरांकडे मी पाठवलं होतं. सरांशी झालेली चर्चा त्याला इतकी भावली की तो नेहमी सरांकडे जाऊन काव्यशास्त्रावर चर्चा करू लागला, साहित्यावर बोलू लागला आणि सरांनाही त्याचं त्यांच्याकडे येणं आवडू लागलं. सरांची त्या विद्यार्थ्याशी थोड्याच काळात खूप चांगली गट्टी जमली. सरांचा स्वभाव ‍प्रेमळ, निर्मळ, निगर्वी असल्याने कोणीही नवखा माणूस त्यांच्याशी तात्काळ तादात्म्य पावत असे. सरांनी केलेल्या मार्गदर्शनाच्या वाटेवर न चालता कोणी स्वतंत्र वागला तरी सर मनात त्याच्याविषयी कोणताही किंतु कधी मनात ठेवत नसत.
     पाटील सरांना 2018 चा मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. प्रामुख्याने सर कवितेचे मर्मग्राही समीक्षक म्हणून सर्वत्र विख्यात झाले. काव्यासोबत संत साहित्य, दलित साहित्याचेही ते मर्मग्रहण करीत असत. जवळजवळ पन्नास वर्षांपासून ते मराठी समीक्षा प्रांतात ठळकपणे ओळखलं जाणारं व्यक्तीमत्व आहे. (होतं नाही. आहे. पाटील सरांचे ग्रंथ म्हणजेच त्यांचं अस्तित्व. त्यांचं अस्तित्व कोणाला पुसता येणार नाही. म्हणून इथं भुतकाळात उल्लेख न करता वर्तमानकाळात करतो.)
     सरांनी 1988 पर्यंत अध्यापन केलं. प्राचार्य पदावरून ते 1989 साली निवृत्त झाले. त्यांची एकूण फक्त सत्रा (17) पुस्तके प्रकाशित असली तरी ती अक्षर वाड्‍.मयात गणली जातील अशी आहेत.
     2014 आणि 2018 असे दोन साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध या त्यांच्या ग्रंथाला 2018 चा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला. समीक्षा क्षेत्रात त्यांच्या कार्याची सर्वदूर म्हणता येईल अशी योग्य दखल नक्कीच घेतली गेली आहे.
     कविता म्हणजे काय, कविता का लिहावी, कवितेचे अस्तित्व, कविता आस्वादायची कशी, कवितेची सौंदर्यस्थळे म्हणजे काय, कविता आणि अकविता आदी गोष्टी काव्य प्रकारात शोधण्याचा त्यांना ध्यास होता. त्यांच्या कडून मार्गदर्शन मिळावे म्हणून अनेक नवोदित त्यांच्याकडे सतत येत-जात असत. आणि त्यांच्याकडे गेलेले आणि त्यांना अनुसरणारे नवोदित कधीही साहित्य प्रांतात अपयशी ठरले नाहीत.
     मराठीत आदिबंधात्मक समीक्षातृष्णेचे काव्यशास्त्र या दोन नवीन संकल्पना मांडण्याचं श्रेय म. सु. पाटील सरांना जातं. प्रा. गंगाधर पाटील आणि डॉ. म. सु. पाटील यांनी मराठी समीक्षेत समीक्षक म्हणून पाटील युग सुरू केलं. (कुलकर्णी युग संपलं आणि पाटील युग सुरू झालं असं साहित्य-समीक्षा क्षेत्रात गांभीर्याने म्हटलं जाऊ लागलं.) पाटील सर माणूस म्हणूनही उत्तुंग व्यक्‍तीमत्व होते. त्यांची समीक्षा किचकट- अवजड- अवघड शब्दांची नसून सहज सोपी सर्जनात्मक आहे. अगदी अलीकडे त्यांनी बदलते काव्यसंवेदन नावाचा समीक्षा ग्रंथ सिध्द केला. तो प्रत्येकाने जरूर वाचला पाहिजे.
     डॉ. म. सु. पाटील सर आपल्यातून गेले असं अजिबात वाटत नाही. त्यांच्या ग्रंथ संपदेतून ते यापुढेही आपल्याशी हितगुज करत राहणार आहेत हे नक्की.
     (या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
   ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

शनिवार, १ जून, २०१९

आरश्यातल्या आरश्यात : एक आस्वाद- डॉ. सुधीर रा. देवरे
आरश्यातल्या आरश्यात वारले बेवारशी...
                        - मनोहर ओक
                        (आयत्या कविता मधून)

     मनोहर ओक यांच्या आयत्या कविता या कविता संग्रहातील ही पहिली कविता. एका ओळीची.
     या एका ओळीच्या कवितेतील शेवटचा बेवारशी हा शब्द ओळीत पहिला असता तर ते केवळ एक वाक्‍य झाले असते:
     बेवारशी आरश्यातल्या आरश्यात वारले! असे ते वाक्य झाले असते. पण बेवारशी हा शब्द ओळीच्या शेवटी गेल्याने या वाक्याला एक लय प्राप्त झाली आहे. मात्र केवळ हा शब्द शेवटी गेल्यानेच लय निर्माण झाली असे मात्र नव्हे. तर या एवढ्याश्या ओळीतच नाद लयीचे सुंदर मिश्रण आहे. म्हणून ही एकच एक ओळ संपूर्ण कवितेची अट पूर्ण करते. ती कशी हे पुढील विवेचनावरून ‍अधिक स्पष्ट होईल:
आरश्यातल्या           आरश्यात               वारले        बेवारशी
। ।                  । ।                   । ।           । ।
                                                       -  आ ची लय
                                                       
                                                            -  र चा नाद
चार शब्दांपैकी तीन शब्दात श ची लय आहेच पुन्हा.
लय + नाद  = नादलय  ~  काव्य  ~ कविता.
     एका आंग्ल कवीने (नाव आठवत नाही) म्हटलं आहे की, कविता धूसर राहील इतकी लहान असू नये आणि रसिकाची एकतानता राहणार नाही इतकी मोठीही असू नये.
     आपण पुष्कळ छोट्या छोट्या कविता वाचलेल्या असतात. आठ ओळींच्या, सहा ओळींच्या, चार ओळींच्याही. शंकर रामाणी यांची एक कविता दोन ओळींची आहे:
स्वच्‍छ एकटेच तळे
विसावले चांदण्यात.
     शब्द कमी जास्त आणि इकडे तिकडे झाले असतील तर चुकभूल देणेघेणे.
पण एक ओळ लिहून ती एक संपूर्ण कविता आहे असं म्हणणारे आणि इतरांनाही म्हणायला भाग पाडणारे मराठीतले मनोहर ओक हे पहिलेच कवी असावेत. (एका ओळीची, तीन ओळीची एक संपूर्ण कथा वा नाटक असल्याचा दावा काही पाश्चात्य लेखकांनी या आधी केले आहेतच!)
     आपल्याला जे काही म्हणायचं आहे ते एका ओळीत पकडलं गेलं आहे आणि म्हणूनच यापुढे काही लिहिणं म्हणजे कवितेचं भ्रष्टीकरण तर होणार नाही ना, अशी शंका येऊन एकाच ओळीवर कविता संपवणं हा या कवीचा संयम आदर्शभूत ठरावा.
     आता प्रत्यक्ष कवितेतील शब्दांकडे वळू या:
आरसा आपले प्रतिबिंब दाखवणारा.
        आपल्यासारखीच पण आभासात्मक आकृती दाखवणारी वस्तू.
वारले -  लौकीक जगतातून विलय.
बेवारशी- पूर्वजांशिवायचा.
        वारसा सांगणारे कोणीही नसलेले.
        लावारीस. उपरा.
     आपण आरश्यात पाहिल्यावर आपल्याला दिसणार फक्‍त आपलंच प्रतिबिंब. प्रतिबिंब दिसल्यावर आपण गप्प बसत नाही. केस पिंजारतो. नाहीतर विंचरतो. चेहरा पाहतो. निरखतो. आपण कसे दिसतो? कसे आहोत? इतरांना आपण कसे दिसत असू? आपलाच विचार करतो तो आरसा. आपले रूप दाखवतो तो आरसा. आपले नखरे खपवून घेतो तो आरसा. आरसा म्हणजे अहम. इगो. स्वत:च्याच प्रतिबिंबाला स्वत:च कुरवाळणारा. स्वत:लाच स्वत: शाबासकी देणारा. स्वत:वरून स्वत:च आरती ओवाळणारा. सतत आपल्यातच मग्न असणारा. इत्यादी इत्यादी.
     अशा आरश्यात जे जे कोणी सदैव पहात राहतात. आत्मसंतुष्ट होत स्वत:लाच कुरवाळत राहतात अशांच्या अस्तित्वाला इतरांच्या दृष्टीने काय किंमत? जे आपल्या नैसर्गिक लौकीक जीवनाशी आपली नाळ तोडून केवळ आपल्याच विश्वात दंग असतील. येन केन प्रकारे प्रसिध्दी मिळवून आपल्यातच घोकत असतील. वृत्तपत्रात आपलं नाव आपणच छापवून आपणच वाचत बसत असतील, तर ते लौकीक दृष्टीने जीवंत असूनही लोकांसाठी वारल्यातच जमा असणार नाहीत का?
     अशा बेवारश्यांना आरश्यांशिवाय दुसरा पर्याय नाही. ते आरश्यांशिवाय जगू शकणार नाहीत. अशांना आरश्याची इतकी नशा चढलेली असते, की ते जगतात, फक्‍त आपल्या विश्वातील दिखाऊ आदर्शांच्या दिवास्वप्नात रममाण होण्यासाठी. म्हणजेच आरश्यात पहात. म्हणून ते जीवंत काय नि वारले काय इतरांच्या दृष्टीने काहीही फरक पडणार नसेल, तर ते आरश्यातल्या आरश्यात वारल्यासारखे बेवारशीच ना!...
     (‘कवितारती’ जानेवारी- फेब्रुवारी 2019 च्या अंकात प्रकाशित. लिखाण दिनांक 19-09–1990. या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)
  डॉ. सुधीर रा. देवरे
   ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/