शनिवार, २७ एप्रिल, २०१३

फेसबुकवरील मराठी विश्व
 
- डॉ. सुधीर रा. देवरे
         मी दर रविवारी माझ्या ब्लॉगस्पॉटवर मराठी भाषेत ब्लॉग लिहितो. 29 एप्रिल 2012 ला पहिला ब्लॉग लिहिला. म्हणजे आज ब्लॉग सुरू व्हायला एक वर्ष पूर्ण झाले आणि वर्षभर या ब्लॉग लेखनात एकाही रविवारचा खंड पडू दिला नाही. बहुतेक ब्लॉग शनिवारी संध्याकाळीच पोस्ट करतो आणि लागलीच त्याची लिंक व्टीटर, फेसबुक, फेसबुकवरील काही मराठी ग्रुप्स आणि ग्लोबल मराठी वेबसाईट यांच्यावर टाकतो. दुसर्‍या दिवशी संपूर्ण ब्लॉग मराठी ग्रुप्ससहीत इतरत्र देतो.
         फेसबुकवर काही चांगले विचार मांडणारे लोक आणि चांगले वाचक, रसिक मराठी भाषिक ग्रुप्स असल्यामुळे तिथे माझ्या ब्लॉगचे स्वागत होते. चांगल्या टिपण्या सुध्दा वाचायला मिळतात. अनेक मित्रांनी संदेश पाठवले, की आमचा अमूक एक ग्रुप आहे. त्याचे आपण सभासद व्हावे व आपल्या ब्लॉग्समधील विचार आमच्या ग्रुपवरही प्रकाशित करावेत. त्याप्रमाणे मी त्या त्या ग्रुपवर गेलोय आणि माझे ब्लॉग्स तिथेही पोष्ट करतोय.
         एकदा एका ग्रुपवरच्या माझ्या ब्लॉगवर एका मित्राची टिपणी होती: आपले ब्लॉग छान असतात. मी नेहमी वाचतो. पण आमच्या ग्रुपवर आपल्या ब्लॉगची जाहिरात करू नये ही विनंती... ही टिपणी एका दुसर्‍या मित्राने लाइक केलेली होती. हा गमतीचा भाग असेल असे वाटल्यामुळे ही टिपणी मी सुध्दा लाइक केली आणि सवयीने त्यांचे आभार मानले.
         मला ही टिपणी गमतीची वाटण्याचे कारण असे की, माझे ब्लॉग कोणी प्रायोजित करत नसल्यामुळे त्या प्रायोजकाची जाहिरात होत नाही आणि हे ब्लॉग अमूक इतक्या लोकांनी वाचले म्हणजे मला अमूक इतके कोणाकडून तरी मानधन मिळणार आहे, असे काही नसल्यामुळे मी ही टिपणी हसण्यावारी नेली. आपल्या आजूबाजूला ज्या काही घटना घडतात त्यांच्यावर एक संवेदनाशील माणूस म्हणून आपले विचार व्यक्त करावेत आणि मित्रांसोबत चर्चा व्हावी हा या ब्लॉग्समागचा उद्देश आहे. प्रबोधन करणे वगैरे नाही. झाले तर चांगलीच बाब आहे. माझ्या विचारांवर प्रतिकूल मत देणार्‍यांचेही मी स्वागत केले आहे. मत मतांतरे असू शकतात पण विचारांची जाहिरात कशी होऊ शकेल? विचार म्हणजे काय शॅम्पू आहे, त्याची जाहिरात करता येईल?
         त्याच ग्रुपवर पुढच्याच आठवड्यात माझ्या ब्लॉगवरची ती टिपणी मागच्या आठवड्यात ज्या मित्राने लाइक केली होती, आता त्यांनी टिपणी लिहिली: आपले विचार चांगले आहेत पण आमच्या ग्रुपच्या नियमात आपल्या ब्लॉगची जाहिरात टाकणे बसत नाही तरी कृपया अशी जाहिरात करू नये ही विनंती... ही टिपणी वाचून आता मी अवाक झालो आणि तात्काळ तो ग्रुप सोडला. हा ग्रुप जनरल होता. अमूक एका विषयासाठी वाहिलेल्या ग्रुपची गोष्ट वेगळी असते. एक ग्रुप फक्त निसर्गासाठी आहे. एक पर्यावरणासाठी आहे. एक देहदानासंबंधी आहे. अशा ग्रुप्सवर मी माझे ब्लॉग्स त्या आशयाचे असतील तरच टाकतो. अन्यथा नाही. मात्र आम्ही साहित्यिक, मराठी पुस्तके व मराठी बुक या ग्रुप्सवर मी माझा प्रत्येक ब्लॉग टाकत असतो. कारण जगातील कोणत्याही विषयाचे वावडे साहित्यिकाला असता कामा नये. कोणत्याही सामाजिक प्रश्नांचे विश्लेषण करणे हे तर साहित्यिकाचे आद्य कर्तव्यच ठरते.            फेसबुकवर अनेक मराठी भाषिक ग्रुप्स आहेत. या गटांमुळे इथे एक मराठी विश्व तयार झाले आहे. त्यातून विचारांची आदानप्रदान होते म्हणून आनंद होतो. वेगवेगळे गट तर हवेतच, पण या गटांची गटबाजी होऊ नये असे वाटते. कोणाच्या प्रामाणिक विचारांकडे जाहिरात म्हणून न पाहता सगळ्यांनी आपले गट अधिक खुले केले तर हे विचार अधिक लोकाभिमुख व लोकशाहीवादी होतील अशी अपेक्षा करू या.

-         डॉ. सुधीर रा. देवरे           
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
        

शनिवार, २० एप्रिल, २०१३

बलात्कार मीमांसा 
- डॉ. सुधीर रा. देवरे

       सोळा डिसेंबरच्या दिल्लीतील बलात्कार कांडानंतर आजपर्यंत देशात बलात्कारांची संख्या आधीच्या तुलनेत वाढली आहे. तीही दुपटीपेक्षा जास्त वाढली आहे. बलात्कारांत क्रूरपणाही कल्पनेहून भयंकर आहे. देशभर इतकी चर्चा झाली. इतकी निदर्शने झालीत. कायदे केले गेले. वटहुकूम काढला गेला. काल- परवा तर आपसात समझदारीने लैंगिक संबंध ठेवण्याचे वय अठरा वरून सोळावर आणण्याचा प्रयत्न झाला आणि तो पुन्हा मागे घेण्यात आला. तरी ही संख्या का वाढते आहे, हा चिंतनाचा विषय आहे. आधीच्या काही वर्षांच्या तुलनेत हा विचार आता शांतपणे आणि अनेक पातळ्यांवर करावा लागेल.
         खरे तर ही संख्या वाढली म्हणजे दिल्लीच्या घटनेनंतर बलात्कार झाल्यावर गुन्हा नोंदवण्याचे प्रमाण वाढले असे म्हणावे लागेल. त्या आधीही गुन्हे घडतच होते. बलात्कार होतच होते सर्वत्र, पण पोलिसात तक्रार देण्याचे टाळले जात होते म्हणून ते कागदोपत्री येत नव्हते असे म्हणावे लागेल. घटना घडली आहे तिचा बोभाटा करून इज्जत घालवण्यापेक्षा असे गुन्हे दाबण्याकडेच सर्वसाधारण माणसांचा कल होता, त्याला थोडी चालना मिळून आज गुन्हे नोंदवण्याचे प्रमाण वाढले आहे.
         बलात्कारावर आपण वरवर चर्चा करतोय असे वाटते. मुळ मुद्दा वा पायाबध्द विचार करत नाही. दिवसेंदिवस लग्नाचे वय वाढतेय. शिक्षणात बरेच आयुष्य खर्ची पडायला लागले. पुरूषांची 26 ते 35 वयादरम्यान लग्न होऊ लागलीत आणि स्त्रियांची 25 ते 32 वयादरम्यान लग्न होऊ लागलीत. दुसरीकडे लैंगिक आकर्षण वाटण्याचे वय कमी होत आहे. आज ते सरासरी 14 असू शकते. यात चित्रपट, इंटरनेट, टीव्ही, मोबाईल, ब्ल्यू फिल्म वरून लोक जास्त माहिती मिळवू लागलीत. (ज्ञान नव्हे, ज्ञान होणे आणि माहिती होणे यात फरक आहे. आपण माहितीला ज्ञान म्हणतो. आता दिल्लीत पाच वर्षाच्या मुलीच्या योनीशी जे क्रूर कृत्य केले गेले ते लैंगितेची अशास्त्रीय फिल्म पाहिल्यामुळे असू शकते.)
         अशा पध्दतीने मिळालेल्या माहितीच्या आधारे खर्‍या ज्ञानाऐवजी विकृत माहिती उपलब्ध होते. तरूणांमध्ये वाढत्या वयात निसर्गनियमानुसार निर्माण झालेली लैंगिक ऊर्जा बाहेर पडायला हवी असते. ती तशी बाहेर पडत नसेल तर कुठे तरी वळवायला हवी असते. तशी ती कुठेच वळवली जात नसल्याने परिणामांना न घाबरता बलात्कारासारख्या घटना घडतात, हे आपण लक्षात घेत नाही. कायदे करून काही होणार नाही. गुन्हे घडणार नाहीत यासाठी काहीतरी केले पाहिजे.
         आज तरूण तरूणीच नव्हे तर चाळीशी उलटलेले लोक सुध्दा शास्त्रशुध्द लैंगिकतेवर बोलायला घाबरतात- टाळतात. कोणी तसे बोलायला लागले की बोलणारा अनितीमान- अनैतिक ठरवला जातो. (पण चोरूनलपून अशास्त्रीय फिल्म मोठ्या प्रमाणात पाहिल्या जातात.) लैंगिकता ही जशी काही परग्रहावरची बाब आहे असे आपण सर्वच भासवण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणूनच ते भयावह आहे. कारण अशा दाबलेल्या वासना कुठेतरी- केव्हातरी फणा उभारतात. असे जोपर्यंत आपण सोवळेओवळे पाळत राहू तोपर्यंत कितीही कायदे केले तरी बलात्कारांची संख्या कमी होईल असे वाटत नाही, हे दुर्दैवाने सत्य आहे.

-         डॉ. सुधीर रा. देवरे           
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
        

शनिवार, १३ एप्रिल, २०१३

बाबासाहेब आंबेडकर- डॉ. सुधीर रा. देवरे

         भारतात आणि जगात महामानव म्हणता येतील अशी जी काही माणसं होऊन गेलीत, त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा निश्चितपणे समावेश करावा लागेल. सर्वसामान्य माणसाला अनुकूल परिस्थितीत जी कामे एका आयुष्यात करता येणार नाहीत इतकी प्रचंड कामे प्रतिकूल परिस्थितीतही ज्या व्यक्ती करतात त्यांना महामानव म्हणता येईल अशी माझी महामानवाची व्याख्या आहे.
         बालपणापासून खालेल्या खस्ता, वाट्याला आलेला अपमान सहन करत नेटाने करावे लागणारे शिक्षण. यातून उभारी घेत ज्ञानलालसेने वाट शोधत एकेक पदवीचा भोजा टिपत बाबासाहेब प्रज्ञावंत होत गेले.
         बाबासाहेब हे समाजसुधारक व ज्ञानतपस्वी होते. गर्दीपासून दूर राहून संशोधकाचा-अभ्यासकाचा त्यांचा पिंड होता. त्यांना राजकारणात रस नव्हता. परंतु कायद्याविषयीच्या त्यांच्या गाढ्या अभ्यासामुळे महात्मा गांधीनी त्यांच्यातील स्फुल्लींग ओळखून, भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी त्यांना कायदामंत्री करावे अशी नेहरूंकडे शिफारस केली. आणि हे कायदामंत्रीपद मिळताच बाबासाहेबांनी या संधीचे सोने करून दाखवले.
         जगातील प्रमुख धर्मांचा सखोल अभ्यास तर त्यांनी केलाच पण भारतीय संविधान- राज्यघटना तयार करण्याच्या मिषाने जगातील काही निवडक लोकशाही देशांच्या राज्यघटना त्यांनी अभ्यासल्या. खूप ल‍वचिकही नाही आणि खूप ताठरही नाही अशी धर्मातीत निधर्मी राज्यघटना आपल्या भारताला मिळाली.
         बाबासाहेबांनी लिहिलेले समग्र ग्रंथ प्रत्येक भारतीयाने वाचावेत इतके ते अभ्यासनीय आहेत. बाबासाहेब हे स्वत:च एक विद्यापीठ होते. महापुरूष हे कोणत्याही एका जातीधर्मात बंदिस्त करता येत नाहीत. त्यांची अन्य कोणाशी उठसूठ तुलना करणेही अप्रस्तुत असते. जो तो महामानव त्या त्या ठिकाणी एकमेव असतो आणि हे महामानव सगळ्या मानव समाजाचे असतात.
         डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन.

-         डॉ. सुधीर रा. देवरे           
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
        

शनिवार, ६ एप्रिल, २०१३

मंदिरांची मांदियाळी                                      - डॉ. सुधीर रा. देवरे

         आज सगळीकडे नवनवीन मंदिरे उगवताहेत. माणूस जसजसा आधुनिक होतोय तसतसे त्याच्या भोवताली मंदिरेही वाढू लागलीत. साधी आणि छोटी मंदिरे तर वाढत आहेतच पण पंचतारांकीत मंदिरेह प्रंचड प्रमाणात वाढताहेत. प्रतिमंदिरे- प्रतितिर्थक्षेत्रेही वाढताहेत. म्हणजे प्रतिशिर्डी- प्रतिबालाजी वगैरे. या प्रतिमंदिरातही मूळ मंदिरांइतकीच भक्तांची गर्दी होतेय हे ही विशेष.
         मंदिरांमागे फक्त भक्ती ही एकच एक गोष्ट आहे असे समजायचे कारण नाही. पुणे- मुंबंईसारख्या शहरात जागेचा कब्जा करण्यासाठी मोक्याच्या रस्त्यावर वा कोपर्‍यांवर मंदिरे उभारण्याचा पर्याय असतो. मंदिरांच्या आडोश्याने जागेवर आपले बस्तान बसवता येते. आणि मोठ्या मंदिरांची निर्मिती म्हणजेच एक नवीन उद्योग सुरू करणे.       
         अगदी तालुका पातळीवरील शहरात नवीन उपनगरे तयार होत आहेत. या नवीन शहर आराखड्यात नियमानुसार मोकळी जागा- ओपन प्लेस सोडावी लागते. या ओपन प्लेसचा उद्देश सर्वत्र सिंमेंटचे जंगल न दिसता या जागेत थोडी हिरवळ असावी. आजूबाजूच्या लोकांना जरा मोकळी हवा मिळावी. मुलांना तिथे खेळता यावे. संध्याकाळी लोकांना त्या जागेत येऊन मोकळा श्वास घेता यावा अशा उद्देशाने त्या मोकळ्या जागा सोडण्याची योजना असते. मात्र या बहुतांश मोकळ्या जांगांमध्ये जागा मालक वेगवेळ्या देवांची मंदिरे वा स्मारके उभारून ती जागा वेगळ्या प्रकारे आपल्या कबजात ठेवतात. (तसेही करता आले नाही तर कुठले तरी सांस्कृतिक-सामाजिक मंडळ स्थापन करून ती संस्था नोंदणी केली की त्या संस्थेच्या कार्यालयाला ती जागा देता येते.)
         मंदिरातून ठेवलेल्या दानपेट्या दिवसभरात अगदी सहज भरून येतात. येता जाता लाच देण्याची सवय असलेल्या लोकांना देवाच्या दानपेटीत माणसाला लागणार्‍या लाचेच्या मानाने कमी पैसे टाकूनही पुण्य पदरात पाडता येते. (म्हणजे परमेश्वरा, तुम्ही सुध्दा?)
         आज या मंदिरांच्या मांदियाळीतून वाट काढत जर कोणाला काही चांगले काम करायचे असेल तर तो पुन्हा एखाद्या धार्मिक कार्यातच खर्च करतो अशी ही सगळी गोची आहे. एखादे धार्मिक ट्रष्ट सामाजिक काम करते वा दुष्काळग्रस्तांना मदत करते असे दाखवत असले तरी तुम्ही दानपेटीत टाकलेल्या एका रूपयातून एक पैसाही अशा सामाजिक कामात खर्च होत नाहीत, इतके हे प्रमाण अल्प आहे. खरे सामाजिक कार्य आणि धार्मिकतेच्या नावाने चाललेले कर्मकांड या वेगळ्या बाबी आहेत हेच आज कोणाला कळेनासे झाले आहे.

-         डॉ. सुधीर रा. देवरे           
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/