रविवार, २९ जुलै, २०१२

सद्यस्थितीत साहित्यिकांची जबाबदारी




- डॉ सुधीर रा. देवरे

      सद्यस्थितीत साहित्यिकांची जबाबदारी काय? असा आजच्या परिसंवादाचा विषय आहे. अशी जबाबदारी साहित्यिकांवर वा खरे तर सर्वच कलावंतांवर टाकता येईल का, हा खरा प्रश्न आहे.
      सद्यस्थिती म्हणजे नेमकी कोणती स्थिती? सद्यस्थितीचे वर्गीकरण तीन भागात करता येईल.
. व्यवस्था : भ्रष्टता, अनैतिकत, दांभिकता, सामाजिक वंचितता.
. धार्मिक अराजकता वा असहिष्णुता
. नैसर्गिक आपत्कालीन स्थिती
      भूकंप, महापूर, सुनामी, चक्रीवादळ ह्या नैसर्गिक घटना अपरिहार्य म्हणून स्वीकारल्या तरी पहिल्या दोन प्रकारच्या घटना या मानवनिर्मित आहेत. अशा घटना घडू नयेत यासाठी समाजाचे वैचारिक परिवर्तन घडविण्यासाठी लेखकावर प्राथमिक जबाबदारी येते. कारण साहित्यिक - कलावंत हे समाजाचे सांस्कृतिक व वैचारिक नेतृत्व करीत असतात.
      आजच्या कलाविष्कारात आजच्या व्यवस्थेचं वा धार्मिक अराजकता- असहिष्णुतेचं चित्रण मर्मभेदकपणे आविष्कृत होतं का - उपयोजित होतं का? असे प्रश्न उद्भवतात.  बहुतांशपणे नाहीच, असंच या प्रश्नाचं उत्तर येईल.
      आम्ही अजूनही ऐतिहासिक कादंबर्या लिहिण्यात आणि वाचण्यातही धन्यता मानतो. ऐतिहासिक काळात रमण्याची आपली ही मानसिकता आज बदलण्याची आवश्यकता आहे. कारण अशी मानसिकता नवनिर्माणासाठी मारक व घातक ठरत असते. इथे गैरसमज होण्याची शक्यता आहे. इतिहासाचा अभ्यास आवश्यक आहे. मी इतिहासात रमण्याच्या मानसिकतेवर बोलतो आहे. उदाहरणार्थ, आमच्या जातीचे लोक राजे होते यावर समाधान मानत राहणे.
      पानिपताच्या युध्दात दीड लाख बांगड्या फुटल्या - म्हणजे दीड लाख महिला विधवा झाल्या. तरी तत्कालीन पंत कवी पुराणांवरच आख्याने रचत राहिली. दीड लाख विधवांचे अश्रू समलाकालीन कवींपर्यंत पोचले नाहीत.
      पानिपताच्या युध्दाला दोन- अडीच शतके उलटून गेल्यानंतर आत्ता कुठे पानिपत हा कादंबरीचा विषय होतो. पानिपताच्या युध्दावेळी तत्कालीन कवींना पानिपतापेक्षा पुराणकथा जश्या महत्वाच्या वाटत होत्या. तसेच आजच्या लेखकाला आत्ताच्या सार्वत्रिक अराजकांपेक्षा भूतकाळातील पानिपत शोकांतिका महत्वाची वाटते वा जास्त भावते. हा काय प्रकार आहे?
      आजच्या व्यवस्थेवर कलावंत काय प्रतिक्रिया देतो. आजच्या धार्मिक असहिष्णुतेवर कलाकार काय भाष्य करतो. अशा कलावंताच्या प्रतिक्षिप्त क्रियांकडे जागरूक साहित्य - कला रसिकांचे कान असतात. मात्र कलावंत त्यांचा नेहमीच अपेक्षाभंग करीत असतात.
      सुनामीने साहित्यिकांत कशी अनुकंपा  निर्माण झाली? भूकंपाने साहित्यिक कसे हादरून गेले? महापुराने साहित्यिकांचा विचारप्रवाह कसा वाहू लागला? दुष्काळाने कलावंतांच्या तोंडचे पाणी पळाले का? ह्या गोष्टी वाचकांपर्यंत कधीच पोचत नाहीत.
      सद्यस्थितीत साहित्यिकाची जबाबदारी असे म्हणताना कलावंताने वा साहित्यिकाने सामाजिक बांधिलकी पाळावी असे अभिप्रेत दिसते.  यात सामाजिक बांधिलकी साठी आपण कोणते निकष लावतो यावर लेखकाची बांधिलकी ठरवता येणार नाही. कलावंताची सामाजिक बांधिलकी सापेक्ष असते.
      आपल्या गुहेत राहणारा साहित्यिक हा कदाचित सामाजिक बांधिलकी जोपासणारा असू शकेल तर सभा, समेंलने गाजवणारा, उठसूट भाषणे करणारा आणि समाजात वावरणारा साहित्यिक आपल्या आविष्कारातून बांधिलकी धुडकावणाराही असू  शकतो.
      डॉ. गणेश देवी हे इंग्रजी, मराठी व गुजराती भाषेत लिहिणारे लेखक व समीक्षक वीस वर्षांपूर्वीपासून आपली सुखासीन नोकरी सोडून आदिवासींच्या उत्थापनासाठी स्वत:ला वाहून घेतात. लिहायचं झाल्यास अशा प्रश्नांवरच लिहितात. सुप्रसिध्द बंगाली भाषक लेखिका महाश्वेता देवी ह्याही भटक्या विमुक्तांसाठी कार्यरत होतात. मानवाधिकारासाठी लढतात.  अरूंधती रॉय या इंग्रजी भाषेतल्या कादंबरीकार एकदम आदिवासींच्या प्रश्नात लक्ष घालतात. मेधा पाटकरांसोबत आदिवासींच्या - विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी आंदोलनात सहभागी होतात. हे सगळे कुठल्या प्रेरणेतून होते, हे ही आपण समजून घेतले पाहिजे.
       कलाकार - साहित्यिक हा जगातील कोणत्याही जातीचा, वंशाचा, पंथाचा वा धर्माचा असला तरी त्याच्या कलाविष्कारातून मानवी मूल्यांचा साक्षात्कार कसा होतो, हे पाहणे महत्वाचे ठरते. कलाकार हा मानवी भावभावनांचा पुरस्कर्ता असला पाहिजे. कारण कलावंतला मानवी समाजातूनच निर्मितीची प्रेरणा मिळत असते.
      जीवननिष्ठा, जीवनबंधातून तत्कालीन समाजस्थितीचे आकलन कलावंताला झालं पाहिजे, अशा सार्वत्रिक अपेक्षा असतात. मात्र विशिष्ट भावविश्वाचा वारा प्यालेला कलावंत आपल्या पिंडाला मानवेल तसाच आविष्कृत होत राहतो. अशा साहित्यिकांचा उदाहरणार्थ म्हणून उल्लेख करायचा झाला तर पु. शि. रेगे, ग्रेस, बाबासाहेब पुरंदरे यांचा करता येईल.
      साहित्यात तत्कालीन जीवन जाणिवा येऊनही ते कालातीत असायला हवे. आठशे वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या ज्ञानेश्वरीत तत्कालीन जीवन जाणिवा प्रत्ययास येतात. पण आजही ज्ञानेश्वरी कालबाह्य झालेली नाही. आठशे वर्षांपूर्वी इतकीच ती आज समरसून वाचली जाते. म्हणजेच ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कालातीत ठरतो. तुकारामाची गाथा सुध्दा समकालीन जीवन जाणिवांसह कालातीत आहे.
      सद्यकालीन वा समकालीन स्थिती म्हणजे केवळ प्रासंगिक घटना नव्हेत, हे ही इथे नमूद करावेसे वाटते.
      ज्या काळात कलेसाठी कला की जीवनासाठी कला अशी फक्त चर्चाच महाराष्ट्रात रंगली होती, त्या वेळी कोणत्याही बाजूने उभे नसलेले साहित्यिक विश्राम बेडेकर यांनी रणांगण नावाची कादंबरी लिहून कला आणि जीवन यांचा समन्वय एकाच कलाकृतीतून आविष्कृत करून दाखवला. थेट दुसर्या जागतिक महायुध्दाची पार्श्वभूमी असलेली ही कादंबरी कलामूल्यांनी तितकीच कसदार होती.
      साहित्यिकांवर अशी काही तत्कालीन जीवन जाणिवा अनुसरण्याची जबाबदारी टाकता येईल का? वा तशा जीवन जाणिवांच्या चौकटीतच लिहिण्याची सक्ती करता येईल का? असे प्रश्नही इथे ऊपस्थित होऊ शकतात. या प्रश्नांचे उत्तर मात्र आपल्याला नाही ह्या शब्दातच द्यावे लागणार आहे. सद्यस्थितीची जाण साहित्यिकाच्या कलाकृतीतून दिसावी अशी आपण अपेक्षा करू शकतो. पण साहित्यिकांवर तशी सक्ती करता येणार नाही.
      कारण कलाविष्कारात उपयोगिता शिरली तर कलात्मकतेत बाधा येऊ शकते. कलावंताने काय आविष्कृत करावे हे जर समाज व शासन ठरवू लागले तर आविष्काराला कलाकृती म्हणता येणार नाही. त्या कारागिराकडून तयार करून घेतलेल्या वस्तू ठरतील. म्हणून कलावंताने काय आविष्कृत करायचे ते कलावंतानेच ठरवलेले योग्य. मग तो कलावंत सद्यस्थितीला डोळसपणे भिडत असो वा नसो.

- डॉ सुधीर रा. देवरे

शनिवार, २१ जुलै, २०१२

बोलीभाषेतून साहित्यनिर्मिती होण्याची गरज


               - डॉ. सुधीर रा. देवरे
       


महाराष्ट्रात साधारणपणे 65 बोलीभाषा बोलल्या जातात. अधिकतम म्हणजे चार जिल्ह्यांच्या मोठ्या भौगौलिक  क्षेत्रात अहिराणी बोलली जाते. मालवणी भाषेला राष्ट्रीय पातळीवर प्रमाण भाषा म्हणून मान्यता आहे. इतर बोलीभाषांना मात्र अशी मान्यता नाही. जवळपास एक कोटी नागरिक अहिराणी बोलतात.  बोलीभाषा  दिवसेंदिवस नामशेष होत चालल्या आहेत. त्यातले प्रवाहीपण साचल्यासारखे झाले आहे. दर पंधरा दिवसाला जागतिक पातळीवर एक बोलीभाषा मरते.
बोलीभाषेत लेखन करणा-यांची कमतरता आहे. सर्व वाचक ते वाचत नाहीत हे यामागचे कारण आहे. अहिराणी बोलीभाषा बोलत असूनही अनेक प्रथितयश अहिराणी लेखक प्रमाण भाषेतच लेखन करतात. हेच चित्र इतर बोलीभाषांमध्ये पहायला मिळते.  सर्व प्रदेशांमध्ये विखुरलेला मराठी वाचक डोळ्यांसमोर ठेवून प्रमाण भाषेत लेखन करावे लागते. बोलीभाषेला ठरावीक असा वाचक वा प्रेक्षक उरलेला नाही.
ढोलसारखं अहिराणी भाषेतलं नियतकालिक पुणे-मुंबईसारख्या शहरांमध्ये गाजलं, पण धुळे- जळगावसारख्या अहिराणी भागातही दुर्लक्षिलं जातं. हा विरोधाभास सगळ्याच बोलीभाषांच्या बाबतीत दिसतो. शासकीय नियमानुसार दहा लाख लोकांपेक्षा अधिक लोक बोलीभाषा बोलतात तेव्हा त्या भाषेला प्रमाण भाषेचा दर्जा देण्यात येतो. असा दर्जा मिळाला म्हणजे बोलीभाषेत साहित्यनिर्मिती व्हायला परिस्थिती पूरक ठरते. मात्र, जनगणनेत लोक आपली बोलीभाषा ही मातृभाषा म्हणून सांगत नाहीत अशीही एकीकडे स्थिती आहे. आपली शैक्षणिक भाषा मातृभाषा म्हणून सांगतात. बोलीभाषेतून साहित्यनिर्मितीबरोबरच व्यवहारदेखील होणे अपेक्षित आहे. अलिकडे प्रमाणभाषेतून बोलीभाषा उपयोजित होताना दिसत असली तरी बोलीभाषेतून समग्र कलाकृतीचे लिखाण होताना दिसत नाही. बोलीभाषांवर संशोधन, संकलन केले जाते, पण त्या भाषेतून विनोद सोडल्यास ललित, गंभीर लेखन, कथा, कादंबरी होताना दिसत नाही.
सर्वच बोलीभाषांना लिपीचा प्रश्न असतो कारण बोलीभाषा अजूनही मौखिक स्वरूपातच अस्तित्वात आहेत. त्यामुळे  जवळच्या प्रमाणभाषेचा- महाराष्ट्रात देवनागरी लिपीचा आधार बोलीभाषा लिहिताना घेतला जातो, ज्यात अनेक अडचणी येतात हे देखील बोलीभाषेत साहित्यलेखन न होण्याचे कारण आहे. वाचकवर्ग मर्यादित लाभत असल्याने अशी पुस्तके छापायला प्रकाशकही पुढे येत नाहीत म्हणून लेखक प्रमाण भाषेचाच आधार घेताना दिसतात हे अत्यंत साहजिक असले तरी बोलीभाषेतून लेखन होणे बोलीभाषा टिकवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. आणि जी भाषा आपली मातृभाषा आहे तिच्यात लिहिणे नैसर्गिक ठरेल.
प्रमाण भाषेत बोलीभाषेतील शब्द वारंवार वापरण्याचे प्रमाण काही लेखकांच्या लेखनात दिसत असते ही त्यातल्या त्यात एक चांगली आणि जमेची बाजू. त्यामुळे त्या बोलीभाषेबरोबरच प्रमाण भाषादेखील समृद्ध होते. असे काही चांगले प्रयत्न वगळता बोलीभाषांमध्ये लेखन होत नाही.  बोलीभाषेच्या वापरामुळे त्या त्या ठिकाणची लोकसंस्कृती साहित्यात खोलवर रुजण्यास मदत होते. त्यामुळे बोलीभाषा साहित्यात वापरली जाणे आवश्यक आहे.
(दै. दिव्य मराठी, अक्षरा पुरवणीत दिनांक 18 जुलै 2012 रोजी माझी मुलाखत प्रसिध्द झाली आहे. मुलाखत प्रियंका डहाळे यांनी घेतली आहे.)


डॉ. सुधीर रा. देवरे                              मुलाखत : प्रियंका डहाळे


शनिवार, १४ जुलै, २०१२

लज्जास्पद...घृणास्पद...



- डॉ सुधीर रा. देवरे


आसामची राजधानी गोहत्ती. एका राज्याची राजधानी म्हणजे मोठे शहर. या शहरात चार दिवसापूर्वी एक अकरावीतली मुलगी रात्री दहा वाजता आपल्या मैत्रीणीच्या वाढदिवसाची पार्टी संपवून रस्त्याने घरी परतत होती. काही मुलांनी तिला रस्त्यात अडवले. त्या मुलांना अजून काही मुले येऊन मिळालीत. त्या सर्वांनी तिला घेरून मारले. स्पर्श केला. कपडेही फाडले. ती मुलगी ओरडत होती. रडत होती. आणि हे 15 ते 20 जणांचे टोळके तिला खेचत खिदळत होते. आजूबाजूला शंभरेक लोकांचा जमाव गम्मत बघत होता. पैकी या अनाचाराला कोणीही विरोध केला नाही.  
या वेळी दिप्या बार्दोलोई नावाचे पत्रकार रस्त्याने जात होते. त्यांनी पोलिसांना फोन केल्यावर तिथे अर्ध्या तासाने पोलिस आले. पण त्यांच्या हाती काही लागले नाही. पोलिसांचा सुगावा लागताच जमाव पळून गेला. त्या पत्रकारानेच ही घटना कॅमेर्यात शुट केली. एनडीटीव्ही इंडिया या चॅनलवरून ही चित्रफित प्रसारीत झाल्यावर पोलिसांनी आतापर्यंत त्यातील फक्त चार जणांना ताब्यात घेतले.
ही जशीच्या तशी घटना वर लिहिली. अकरावीतील म्हणजे फक्त 15 वर्षाची मुलगी. तिच्याशी असा अमानवी अत्याचार भररस्त्यात सर्वांसमक्ष होत होता, आणि तो थांबवायला पुढे कोणी येत नव्हते. या घटनेच्या पाठोपाठ महाराष्ट्रातील चंद्रपूरात अल्पवयीन मुलीवर सामुदायिक बलात्कार झाला. आणि उस्मानाबाद मध्ये मुलांनी छेडछाड केल्यामुळे एका चौदा वर्षिय मुलीने स्वत:ला जाळून घेतले.
आपण नेमक्या कोणत्या देशात राहतो. या देशात असे तालिबानी वेळोवेळी कसे निर्माण होतात? इतका राक्षसीपणा या लोकांमध्ये कुठून येतो? या टोळक्यातील एखादाही मुलगा त्या मुलीच्या बाजूने का लढला नाही? कोणी एकानेही असे करू नका असे आवाहन बाकीच्यांना का केले नाही? जमावातील लोक सुध्दा अशा वेळी फक्त बघे कसे होतात? आपण नक्की कुठे आहोत आणि कुठे चाललोत? प्राण्यांतील नर सुध्दा मादीचा अनुनय करत तिला वश करतात आणि मग तिच्याशी समागम करतात. या नरांना पशू म्हणणे सुध्दा पशूंचा अपमान ठरेल इतके हे कृत्य नीच पातळीचे आहे.

- डॉ सुधीर रा. देवरे

रविवार, ८ जुलै, २०१२

अहिराणी बोली - सामाजिक अनुबंध



                                                       - डॉ. सुधीर रा. देवरे

       आगोदर मानुस, त्यानानंतर समाज आणि मंग भाशा. भाशा आणि बोली हाऊ फरक आता यानंपुढे करना नही. जी बोली आपू बोलतंस ती भाशा. मंग हायी भाशा आक्खा जगनी र्हावो नहीत्ये येक गाव-पाडा पुरती बोलामा येवो. बोली म्हंजे भाशाच र्हास.
      मानसं येरान्येरसंगे देवानघेवान कर्ता जे काही बोलतंस ती भाशा. कोनतीच भाशामा आशुध्द काही र्हात नही. कोनतीच भाशा गावठी र्हात नही आनि कोनतीच भाशा देढगुजरी पन र्हात नही.
      कालदिस आठे कोनीतरी म्हने, धुळानी भाशा शुध्द शे. पन तशे शुध्द आनि आशुध्द काही र्हात नही भाशामा. तशे पाहे त्ये आजनी जी जागतिक भाशा इंग्रजी शे ती सुध्दा शुध्द नही. आशेच आनखी आठे कोनीतरी म्हने मराठी मानससले अहिरानी भाशा कळत नही. कळस आनि बाहेर सगळा महाराष्ट्र दखल भी घेस. फक्त काम चांगलं व्हवाले पाहिजे. कालदिस मन्ह जे आठे अहिराणी लोकपरंपरा पुस्तक प्रकाशित जयं त्ये मुंबईना ग्रंथाली प्रकाशननी काढं.  दिनकर गांगल सर यास्नी त्ये व्हयीसन मांगी घिदं. महाराष्ट्र टाईम्स ना तैनना कार्यकारी संपादक यास्नी मैफल पुरवनी मा अहिराणी ढोल वर लेख लिव्हा व्हता. डॉ. . दि. फडके यास्नी बेळगावना अ. भा. साहित्य संमेलनना अध्यक्षीय भाशनमा येक पानभर अहिराणी ढोल वर लिव्ह व्हतं आनि या तिन्ही अभ्यासक अहिराणी भाषक नव्हतात हायी सांगाकर्ता हाऊ उल्लेख करी र्हायनू.
      दोन जनस्ले येकमेकनं सांगेल कळनं त्ये जयी ती भाशा तयार. मंग तुमी तिले कोनतंबी नाव द्या. तिले नाव दिधं नही तरी कोनतीबी भाशानं काहीच आडत नही. मंग आशा भाशा त्या त्या लोकस्ना गटनं, जातपातनं नाव लायीसन लोकजीवनमा तग धरी र्हातीस.
      अहिर लोकस्नी अहिराणी भाशाबी खानदेशमा आशीच तयार व्हयनी. आजूबाजूनं लोकजीवन म्हंजे लोकस्न रोजनं जगनं. हायी जगनं भाशामा वनं आनि अहिराणी भाशा तयार जयी.
      मानुस आठून तठून जशा येक नही. जमीन आठून तठून जशी येक नही, बाहेरनी हवा-वातावरन आठून तठून जशे येक नही. तशा भाशाबी आठून तठून येक नहीत, यान्ह मोर्हेबी भाषा येक र्हानार नही. आनि यानं मोर्हे कोनी कितीबी तशे करानं ठरायं तरी ते यव्हवारी व्हनार नही. तरीबी आक्खा जगमा आज आपल्या सवतान्या भाशा बोलाले ज्या ज्या लोक लाजीकाजी र्हायीनात त्या त्या भाशा मरा लाग्यात आता. आशा गंजच भाशा आजपावत मरी गयात तिस्ना पत्ताबी लागत नही.
      लोकजीवन जशे र्हास तशी भाशा र्हास. लोकजीवनमा ज्या ज्या जिनसा र्हातीस, ज्या ज्या झाडं झुडपं र्हातंस. जमीन, पानी, हवा, पीकंपानी जशे र्हास त्यास्ना  वरतीन लोकजीवनमा लोकपरंपरा, लोकगीतं, लोकवाड्मय, लोकम्हनी, लोकनाच, लोकहुंकार, लोकपरिमानं, लोकव्यवहार, लोकवास्तु, लोकवस्तु,  लोकहत्यारं  तयार व्हतंस आनि मंग त्यामुळे आपोआप भाशा तयार व्हस.                                       
      संस्कृतमजारतीन मराठी आनि मराठीमातीन अहिराणी आशी जी आजपावत आपुले कोनी अहिरानी भाशानी उत्पत्ती सांगी व्हयी ती चूक शे. तशी उत्पत्ती नही शे. बोलीभाशास्पशी प्रमानभाशा तयार व्हस. प्रमानभाशास्पशी बोली नही तयार व्हनार, हायीच कोनी ध्यानात घेत नही. म्हनीसन आशे कैन्हनं उलटं संशोधन व्हयी र्हायनं.
      कोनत्याभी भाशास्मा बाकीन्या भाशास्ना शब्द येनं साहजिक शे. काही टक्का दुसरी भाशाना शब्द बोलीस्मा दखातंस म्हनीसन ती भाशा त्या अमूक परमानभाशापशी तयार जयी, हायी म्हननं वडनं पान पिपळले लावानं गत व्हयी.  लोक जधळ भाशा वापराले लागतंस आनि दुसरी भाशा बोलनारा लोकससांगे व्यवहार करतंस तधळ शब्द इकडना तिकडे आनि तिकडना इकडे व्हत र्हातंस. काही काळमा त्या शब्दबी भाशाना घटकच व्हयी जातंस आनि हायी साहजिक शे.
      अहिराणी बोली - सामाजिक अनुबंध, अशा मराठी परमानभाशामा या परिसंवादना इशय शे. सामाजिक अनुबंध म्हंजे समाजसोबतनं नातं. यामा चार पोटविषय करेल शेत. त्यापैकी पहिला विषय:
      खान्देशातील विधी, विधी-नाट्य, देव-देवता:
            ० विधी = व्रत घेनं, चक्र भरनं, धोंड्या, तोंड पाव्हाना कार्यक्रम,  
                  सुखगाडी (सुखदेवता)
            ० विधी- नाट्य = भोवाडा, खंडोबा आढीजागरण,
                  भील आनि कोकणा यास्ना डोंगर्या देव उत्सव, कोकणा  
                  आदिवासी भाऊस्नी कन्सरा माउली.
            ० देव देवता = कानबाई, रानबाई, गौराई, काठीकवाडी, खांबदेव
                  (नागदेव, वाघदेव), म्हसोबा, आया, डोंगरदेव, मुंजोबा.
      जशा मानसं, तशा देव. विधी, विधी-नाट्य आणि देव देवता यास्माबी त्या त्या भागनी- परिसरनी दाट सावली पडेल र्हास. जशे मानसस्न रोजनं जगनं, राग-लोभ, काम, भीती, समजुती, भक्ती ह्या परंपराखाल त्या त्या भागात तयार जयात तशा त्यावर तोडगा म्हनीसन या देवबी मानोसले आधार देवाकर्ता तयार व्हयनात. या सगळ्या घडामोडीस्ना आळ- आरोप देव वर करेल र्हास, जो अहिराणी भागमाबी लागू व्हयी.
      लोक देव हाऊ भाव ना भुख्या र्हास. म्हनीसन थोडासा कपडा, थोडासा निवद यामा तो खुश व्हयी जास. त्याले भक्त कडथीन कोनताबी घबाडनी अपेशा र्हात नही. ज्या सूतना कपडा आठे तयार व्हतस त्याच कपडास्मा देव राजी व्हयी जास. ज्या झाडस्ना पानं आठे सहज मिळतीन त्या झाडस्नी पत्रीच या देवस्ले चालस. ज्या ज्या फळं आठे त्या त्या रूतूमा येतंस, त्याच फळ आठला देवले आवडतंस. ज्या पदार्थ आठे घरघरमा कमी खर्चात तयार व्हतस, तोच निवद या देवस्ले लागस आनि त्याच निवदवरी त्यास्नं पोट भरस.  
      २ रा विषय : लोकगीतातील स्त्री जीवन दर्शन = लग्नातला गाना, झोकावरला गाना, गौराईना गाना, कानबाईना गाना, गुलाबाईना गाना, बारमजारल्या गाळ्या, अहिराणी रडनं, ओव्या, घरोटवरल्या ओव्या, आन्हा, उखाना, कोडा, म्हनी आशा सगळास्मातीन अहिराणी बाईनं बाईपन पाहे त्ये ध्यानात येस, अहिराणी बाईले दागिनास्ना सोस जशा शे तशा रामना म्हनजे पतीना विरह शे. सासरना सासरवासले ती जशी कटाळेल शे तशी माहेरपनले - मायले भेटाना नितात शे. माहेरना मानसस्ले भेटाले उतावळी व्हयेल शे. पहाटपशी काम करता करता ती इतकी दमी जास तरी दुसरा दिवस पुल्हाळे उठीसन ती घरोटवर गाना म्हनाइतकी ताजीतवानीबी व्हई जास.                             
      लोकगितंसमजारला शब्द आनि त्यास्ना अर्थ पाह्यात त्ये आपुले नवल वाटस, आशी हायी अहिराणी किती शिरीमंत शे हायी लोकगीतंस्मातीन सहज ध्यानात येस.  
      ३ रा विषय: अहिराणी- बोली संशोधन- एक आढावा = अहिरानीना इतिहास, अहिरानीना भूगोल आनि अहिरानीनी उत्पत्ती- व्युत्पत्ती यावर आपू वाचतंस आनि तेच सांगतंस. अभीर- अहिर- अहिराणी हायी सूत्र आता आपू  कैन्हनं मान्य करी टाकं.
      अहिराणी हायी मागधी, सौराष्ट्री, शौरसेनी, महाराष्ट्री, पैशाची या सगळ्या भाशास्पशी तयार व्हयनी का संस्कृत - मराठी - आशी वाटधरी तयार जयी? आशा इचार करापेक्षा ती आठेच तयार जयी व्हयी आशे काबर म्हनू नही ?
      अहिरानी भाशा आठेच रांगनी, आठेच तिन्हा बोबडा बोल फुटनात आनि आठेच ती चार जिल्हास्मा हात पाय पसरी तिन्हा जम बसाडा आशा आपू का इचार करतं नहीत. तो कराले पाहिजे.
      ४ था विषय: अहिराणीतील स्तंभलेखन= अहिराणीमा स्तंभलेखन व्हयी र्हायनं आता. पन फक्त पेपरमा. मासिकं आनि भाशाले-इचारले जागा देनारा नियतकालिकस्मा अजून आशे स्तंभलेखन दिसत नही. यानं कारन काय? गावगप्पा, चुटका, फटका, किस्सा यानंपुढेबी हायी लिखान सरकाले पाहिजे ना. घटकाभर करमनुक म्हनीसनच काबरं हायी स्तंभलेखन व्हयी र्हायनं? अहिरानीमा वैचारिक लेखनबी व्हवाले पाहिजे आनि समीक्षानी भाशाबी येवाले पाहिजे. जी आजून येत नही.

      आता या चर्चामातीन- म्हंजे निबंधस्मातीन काय पुढे वनं? काय आर्थ निंघना?

            -जगमजारली कोनतीबी भाशामा त्या त्या समाजनं आनि तो समाज ज्या भागमा र्हास त्या भागनं चित्र दखास. तशे अहिराणीमाबी अहिरानी बोलनारा लोकस्न चित्र अगदी टहाळबन दखास, हाऊ अनुमान या परिसंवादमातीन पुढे वना, हायी आठे नमूद करीसन मी थांबस.
      आपला सगळास्ना आभार. आनि ज्यास्नी आठे आपला इचार मांडात त्या चारी अभ्यासक यास्नाबी आभार मानीसन हाऊ परिसंवाद संपना आशे जाहीर करस.

            ( दिनांक ३ व ४ डिसेंबर २०११ ला नाशिक येथील महाकवी कालिदास कला मंदिरात आयोजित अ. भा. चौथ्या अहिराणी साहित्य संमेलनातील अहिराणी बोली: सामाजिक अनुबंध या विषयाच्या परिसंवादातील अध्यक्षिय भाषण.)


-डॉ. सुधीर रा. देवरे
     Email id: sudhirdeore29@rediffmail.com