मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२०

माणूस आणि एकलेपण

 


 - डॉ. सुधीर रा. देवरे

        माणूस नात्यागोत्यांच्या सहवासात एकटा पडत नाही. दु:खातच नव्हे तर सुखाच्या दिवसातही माणसाला आपल्या माणसांसोबत रहायला आवडतं. विवाह समारंभ जसा एकट्याने साजरा करता येत नाही, किमान वधूवरांचे दोन कुटुंबं आणि दोन मित्र त्यात सामील असतात, तसा माणसाचा शेवटचा दिवसही म्हणजे अंत्यविधीही कोणाला एकटेपणाने उरकता येत नाही. माणसाच्या पार्थिवाला उचलायला कमीतकमी चार खांदे द्यावे लागतात. (आता वैकुंठ रथ असला तरी.) सारांश, सुखाचा आनंद व्दिगुणीत करण्यासाठी माणसाला मित्र- नातेवाईक लागतात आणि दु:खाचं सांत्वन करण्यासाठीही माणसाला आपुलकीचे लोक लागतात.

         माणूस या जगात एकटा जगू शकेल? म्हणजे तो विनासंबंध- विनापाश असू शकेल? माणसाशी कोणतंही नातंसंबंध न ठेवता कोणी एखादा सुखात राहू शकेल का? माणसाशी कोणी कायम फटकून वागू शकतो? एखादा माणूस माणूसघाना असू शकतो का? एकलकोंडा असू शकतो का? या सर्व प्रश्नांची उत्तरं नकारार्थी येतील. तरीही आपल्याला असं रोज कोणाबद्दल तरी ऐकायला मिळतं, अमूक एक माणूस एकलकोंडा आहे. अमूक एकाला एकटं राहणं आवडतं. अमूक एक माणूस आजूबाजूच्या माणसांत न मिसळता कायम आपल्याच कोषात गर्क असतो. आपल्याकडे माणसं येणं त्याला आवडत नाही आणि इतर माणसांकडे जाणंही तो हेतुत: टाळत असतो. वगैरे.

         अतिपरिचयात अवज्ञा म्हणून एखादा माणूस शेजार्‍यापाजार्‍यांशी फटकून वागत असेल वा वेळप्रसंगी भांडतही असेल, तरी तो माणसात मिसळणाराच असतो. एखादा माणूस माणसांच्या कळपात राहणं टाळत असला तरी तो आतून अनेकांशी मैत्री करण्याच्या प्रयत्नात असतो. अपरिचित माणसाशी सोबती करावी असंच त्याला मनातून वाटत असतं. माणसाशी प्रत्यक्षात फटकून वागणारा माणूस हा आतून समाजाशी जुळवून घेणाराच असतो. कोणताही माणूस तमाम मानव समाजाविरुध्द नसतो. समाजातील काही प्रवृत्तींविरुध्द तो बंड करू शकतो. पण आख्या मानवजातीच्या विरोधात जाणारा माणूस अजून जगात जन्माला आला नाही. जगाच्या कोणत्याही कानाकोपर्‍यात एकटा मनुष्य राहणं म्हणूनच अशक्य घटना वाटते.

         आपला स्वत:चा स्वभाव विसरून आपण इतर लोक आणि त्यांचे स्वभाव हा नेहमी चर्चेचा विषय करतो. एखादा माणूस कसा एकलखुरा आहे, तो समाजापासून कसा फटकून वागतो, तो माणसात, समाजात कसा मिसळत नाही, नातेवाईकांकडे जात नाही, विवाह, अंत्यविधी आदी कार्यक्रमांना उपस्थित राहत नाही. अमूक हा आपण आणि आपलं घर भलं वा काम भलं असा झापडं लावलेल्या विचारांचा माणूस आहे, अशा प्रकारचं कोणाबद्दलचं तरी वक्‍तव्य आपण ऐकत आलो आहोत. असं आपल्या कळपात नसलेल्या माणसाबद्दल आपण बोलतो.

        माणूस हा निसर्गत:च समाजप्रिय प्राणी आहे. गरीब असो, श्रीमंत असो, आदिवासी ग्रामीण असो की शहरी सुशिक्षित असो. तो माणसाच्या कळपातच रमतो. कोणाकडे जात नसला तरी तो माणसांच्या वस्तीतच घर बांधतो. माणसाच्या गरजाच अशा आहेत की तो अंशत: का होईना परावलंबी आहे. पूर्णपणे स्वावलंबी नाही. त्याला कपडे शिवण्यासाठी शिंप्याकडे जावं लागेल तर डोक्याचे केस कापण्यासाठी नाभिकाकडे जावं लागेल. तब्बेत तपासण्यासाठी डॉक्टरकडे जावं लागेल तर जेवण तयार करण्यासाठी बाजारात-दुकानात नाहीतर आयत्या जेवणासाठी हॉटेलीत तरी जावं लागेल. कोणीही एकलखुरा माणूस जंगलात वा डोंगरात रहायला जात नाही. माणसांच्या गावात- शहरातच तो वस्ती करतो. म्हणजे प्रत्यक्ष ओळखीत अथवा येता जाता कोणाशी गप्पा मारण्यात तो रमत नसला, तरी आजूबाजूच्या माणसांचा कानोसा घेत आपल्या कोषात आपलं आयुष्य व्यतीत करत असतो. म्हणून मानवी संबंधांचा विचार कोणत्याही एका टोकाचा न करता साधकबाधक तारतम्याने सगुण-निर्गुणात्मक घ्यावा लागेल.

                    (‘सगुण- निर्गुण’ मटा, दि. 4-3-2020 च्या अंकात प्रकाशित झालेल्या लेखाचा बृहत भाग. लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

 

    © डॉ. सुधीर रा. देवरे

     ब्लॉगचा पत्ता:  http://sudhirdeore29.blogspot.com/

मंगळवार, १ सप्टेंबर, २०२०

देव आणि माणूस

 


 

- डॉ. सुधीर रा. देवरे

 

         आधी देव का आधी माणूस? आज आपण जे देव भजतो ते सगळ्याच प्रकारच्या सजीवांचे देव आहेत का? (आहेत असं आपण समजतो. माणसाला बुध्दी आहे. म्हणून तो पूजा, पाठ, विधी, कर्मकांड वगैरे करतो. मुक्या प्राण्यांना बुध्दी नाही, म्हणून ते देवाला भजत नाहीत, असंही आपलं प्रामाणिक मत असू शकतं. ) प्राण्यांसाठी विशिष्ट एखादा देव असेल तर तो कोणता? प्राणी आपल्या देवाची प्रार्थना कशी करतात? पूजा कशी करतात? प्राण्यांच्या देवांची मंदिरं कुठं असतात? समजा प्राण्यांचा देव मूर्त स्वरूपात असला तर त्या देवाची मूर्ती कशी असेल? वाघांचा देव वाघासारखा असावा का? (वाघदेव, नागदेव आहेत पण ते माणसांचे देव आहेत.)पक्ष्यांचा देव पक्ष्यासारखा दिसेल का? किटकांचा देव किटकांसारखा घडवला जाईल का? अशी चिकित्सा कोणी करत नाही. तसं असेल तर माणसाचा देव हा सुध्दा मंदिरातील मूर्तीत माणसासारखा घडवला जाईल. आज परंपरेने तो माणसासारखाच घडवला जातो.

         माणूस ज्या देवाची पूजा करतो. माणूस ज्या देवाची मंदिरं बांधतो. ज्या मूर्तींची पूजा करतो, ते बहुतकरून माणसासारखे दिसतात. माणसासारखे वागतात. माणसासारखे असतात.(बहुतकरून म्हणण्याचं कारण हनुमान, गणपती, दत्तात्रेय आणि नरसिंहासह दशावतारातले काही देव अपवादात्मक.) देव एकतर पूर्णपणे पुरूषासारखा असतो वा स्त्री सारखा. याचाच अर्थ मनुष्य हा आपल्या देवाला आपल्याच बाह्य आकारात- रूपात पाहतो.

         माणसाचे सर्वच देव काल्पनिक नाहीत. ते जन्माला येतात. माणसासारखे लहानाचे मोठे होतात. पृथ्वीवर आपल्या लिला दाखवतात. आपल्या कृतीतून जगात देव म्हणून सिध्द होतात. म्हणूनच माणसाचा देव हा मंदिरांतून- मूर्तीतून माणसासारखा दिसतो, नव्हे जन्माला येऊन मानवांसाठी महान कार्य करणार्‍या विशिष्ट माणसाला देवाचा अवतार ठरवून त्याच्या देहावसानानंतर त्याला देव म्हणून मंदिरांतून मंडीत करतात.

         देवाची मूर्ती घडवताना त्याला दोन डोळे, दोन कान, दोन हात (काहींना जास्त हात असतात हा अपवाद. देवाला इतके हात असल्यामुळे तो सर्वसाधारण माणसापेक्षा मोठी कामं करू शकतो हे रूपक.), दोन पाय, दोन कान,एक नाक,चेहरा वगैरे माणसातला शिल्पकार सगळं माणसासारखं घडवतो. याचं कारण माणसाला आपला देव आपल्या रुपात भावतो.

         श्रीकृष्ण,राम माणूस म्हणून जन्माला आले (श्रध्दा)आणि ते देव होऊन गेले. येशू ख्रिस्त माणूस म्हणून जन्मले आणि देव होऊन गेले. गौतम बुध्द माणूस म्हणून जन्मले आणि देव होऊन गेले. महावीर माणूस म्हणून जन्मले आणि देव होऊन गेले. गुरू नानक माणूस म्हणून जन्मले आणि देव होऊन गेले. महमद पैगंबर माणूस म्हणून जन्मले आणि देव होऊन गेले. शंकर, विष्णु, ब्रम्हा, पार्वती, लक्ष्मी, सरस्वती अशा सगळ्याच देवतांबद्दल आपली श्रध्दा आहे, की ते काल्पनिक नाहीत. काल्पनिक असते तर आपण त्यांच्या लिला इतक्या माणसाळलेल्या शब्दांत रंगवल्या नसत्या. पोथ्या- पुराणातून त्यांच्या माणूसपणाचे ठसठसशीत (केवळ) शाब्दिक पुरावे लेखकांनी दिले आहेत. (आता अनेक टीव्ही मालिकांतून देव दृक-श्राव्यतेमुळे अजून जास्त प्रमाणात माणसाळले. पूर्वी फक्‍त काही चित्रपटांतून देव बोलायचे- दिसायचे. आता टीव्हीतून रोज दिसतात- बोलतात.) सगळे देव माणसांसारखे सहजपणे मोकळेपणाने आपल्या आसपास वावरतात.

         पूर्वी होऊन गेलेल्या या थोर आणि महामानवांना आपण त्यांचा आदर्श घेण्यासाठी वाड्‍.मयातून चिरंजीव करुन ठेवलं आहे. म्हणजेच माणसाने देवत्वाला जन्म दिला. अशी ही मानवाची मानवाला देव करण्याची थोर परंपरा फक्‍त मानवात आहे. प्राण्यांमध्ये नाही. तीच पूर्वपरंपरा आजही आपण कायम ठेऊन अनेक महात्म्यांना देवपण देत त्यांना अजरामर करत आहोत. म्हणून या मानव नावाच्या चालत्या बोलत्या आणि वैचारिक अधिष्ठान लाभलेल्या माणसाला वंदन करायला हवं. ही देवपण देण्याची दृष्टी मात्र डोळस असावी, सगुण असावी. (फक्‍त येता जाता मंदिरात जाण्याइतकी ढोबळ नसावी.) घेता घेता एक दिवस आपल्याला देवाचं कर्म घेता आलं पाहिजे.

                  (‘सगुण- निर्गुण’ मटा, दि. 3-6-2020 च्या अंकात प्रकाशित झालेल्या लेखाचा बृहत भाग. लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

 

    © डॉ. सुधीर रा. देवरे

     ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/