बुधवार, १ नोव्हेंबर, २०२३

मोकळा प्लॉट

 

- डॉ. सुधीर रा. देवरे

 

          काही वर्षांपूर्वी गावाला लागून असलेल्या नव्या वस्तीत माझ्या छोट्याशा घरात रहायला आलो तेव्हा आजूबाजूला खूप कमी घरं होती. घराजवळच्या जागेत लोक विविध प्रकारचा कचरा हक्कानं फेकायची. लक्षात येताच तो कचरा गोळा करून जाळायचो.

          आजूबाजूला घरं बांधली जाऊ लागली. पण माझ्या घराला लागून एका बाजूचा प्लॉट अजूनही मोकळा आहे. घरं वाढली तसा घराजवळच्या प्लॉटात कचराही वाढू लागला. तो मी इमानेइतबारे आठवड्यातून एकदा सुट्टीच्या दिवशी जाळू लागलो. तेव्हा नगरपालिकेकडून कचरागाडी फॅसिलीटी नव्हती. म्हणून कचरा जाळणं म्हणजे वायुप्रदुषण करणं, हे माहीत असूनही तेव्हा दुसरा सोपा उपाय नव्हता.

          त्यावेळी जुन्या गावातही लोक कुठंही कचरा फेकायचे. कचरा पेट्यांच्या परिसरातली नेमकी पेटीच मोकळी ठेऊन, लोक आजूबाजूला कचर्‍याचं साम्राज्य पेरायचे. तो कचरा कधी कोणी उचलायचाच नसतो असं लोकांनाही वाटत असावं. बरेच लोक आपापल्या घरासमोरच्या उघड्या गटारीतही कचरा टाकायचे. कधीतरी गटार उपसलीच तर त्या गल्लीनं जाणं ही कठोर शिक्षा वाटायची. या गल्लीत लोक कसे राहत असावेत? भयानक उग्र वास दोन दिवस येत रहायचा.

          नव्या घराजवळच्या जागेत बरीच झाडी लावली. पावसाळ्यात काही झाडं शेजारच्या प्लॉटमध्ये आपोआप उगली आणि आपोआप वाढत राहिली. घराच्या हद्दीत मुद्दाम लावलेली तर रिकाम्या प्लॉटमध्ये आपोआप झाडी उगून घराबाजूच्या एक चथुर्तांश प्लॉटमध्ये नैसर्गिक उगलेल्या झाडांचं कुंपण तयार झालं. यात बाभुळ, गंगुती, बिलायत, बोरी, शिकेखाई अशा काटेरी झाडांमुळं डुकरांपासून आणि गायी, बकर्‍यांपासून मी लावलेल्या झाडांना संरक्षण मिळत होतं.

          दरम्यान आजूबाजूला नवी घरं उभी रहात हा भाग चांगलाच डेव्हलप होत होता. माझी झाडंही मोठी होत होती. शेजारचा प्लॉट अजूनही मोकळाच होता. घराच्या बाजूला झाडांनी अशी दाटी केली की त्याबाजूनं दुरून घर दिसण्याऐवजी फक्त झाडी दिसत.

          दरम्यान नगरपालिकेकडून गावात घंटागाडी सुरू झाली. म्हणून आपल्यासारखेच इतर लोकही आता घरात निर्माण झालेला कचरा घंटागाडीत टाकत असावीत असं वाटत होतं.  

          शेजारच्या प्लॉटमध्ये लावलेल्या आणि काही आपोआप उगलेल्या अशा घनदाट झाडांमध्ये थोडा निवांत वेळ काढून रमायचो. उन्हाळ्यात फॅनची गरज भासत नव्हती. या झाडांमुळं घरात थंड हवा खेळायची. काही झाडं फुलं द्यायची. काही फळं द्यायची. पण संगोपन केलेल्या झाडांसहीत इतर सर्वच झाडं भरभरून ताजा प्राणवायु फुकट द्यायची, हे सर्वात महत्वाचं होतं. घराजवळचं वातावरण कायम टवटवीत आल्हाददायक असायचं.

          अनेक पक्षी– ज्यांची नावंही माहीत नाहीत ती घराजवळ झाडांत रमू लागली. घरटी बनवू लागली. अंडी घालू लागली. त्यांची पिलं जन्माला येऊ लागली. त्या पिलांना त्यांचे आईवडील दाणे कसे भरवतात, वगैरे निरिक्षण जवळून करता ये‍त होतं. परका मोठा पक्षी आजूबाजूला आला की त्यांचा चिवचिवाट सुरू व्हायचा. त्याला दूर पळवून लावण्यासाठी चोची मारून दूर हाकलत. (काही पक्ष्यांनी मलाही शत्रू समजून चोची मारल्या आहेत.) पक्षी पिलाला उडायला कसं शिकवतात, हे जवळून पाहू लागलो. त्यांच्यासाठी दाण्यांची- पाण्याची- फळांची सोय करू लागलो.

          मधमाशा दिसू लागल्या. झाडांवर मधाचे पोळे दिसू लागले. मागच्या दारी असलेल्या पाण्याच्या टाकीवर मधमाशा पाणी प्यायला येऊ लागल्या. मानवी वावर असतानाही धीट होऊ लागल्या. चुकून त्यांना धक्का लागला तर चावा घेऊ लागल्या. मधमाशा, गांधील माशा, विविध प्रकारची फुलपाखरं असे अनेक प्रकारचे किटक जवळून पहात होतो. अंजीर, पेरु, सिताफळ, रामफळ, पपई, केळी ही फळं पाखरं खायची. फळं तोडायला गेलं तर त्यांची फळं तोडतो असं त्यांना वाटायचं आणि चिवचिवाट करत फळं तोडायला विरोध करायची. मुंगूस, मुंगसाची पिलं, जमिनीतली मुंगसांची बिळं, खारूताई, मांजरी आदी प्राणी ह्या छोट्याशा जंगलात दिसत. या लावलेल्या कम नैसर्गिक जंगलाचा उल्लेख घरात आम्ही बाग असा करायचो. उदा. बागेत कसला आवाज आला बघ’, अमूक एक वस्तू बागेत ठेवली असेल बघ.

          निसर्गासहीत सर्व जीव मला आवडतात. पण डुक्कर, माशा (आणि काही प्रमाणात कुत्रा) हे जीव अजिबात आवडत नाहीत. (मच्छर- डासही आवडत नाहीत. डास रोगाला निमंत्रण देत असले तरी त्यांची किळस तरी येत नाही, डुक्कर, माशा, कुत्रा यांची अतोनात ‍किळस येते. हे प्राणी भयंकर रोग- साथ पसरवतात.) घराभोवती असे सुंदर जंगल‍ निर्माण केल्यानं डुकरांना इथं प्रवेश नव्हता. घराजवळ एखादंही डबकं साचणार नाही, याची काळजी घ्यायचो. त्यांना सहजासहजी बागेत येता येणार नाही अशी वडांगीची डागडुजी आतून अधूनमधून व्हायची.  

          आणि एके दिवशी नगरपालिकेनं निर्णय घेतला की शहरातील बर्‍याच रिकाम्या प्लॉटांमध्ये उगलेल्या अनाहूत बोरी बाभळी काढायच्या. तसं काम सुरू झालं. इतरत्र सुरू झालेलं हे काम पाहून आपल्या घराजवळच्या या प्लॉटचं काय करायचं? काय करावं? निर्णय घेता येत नव्हता. खरं तर प्लॉट स्वच्छ झाला तर ते हवंच होतं. झाडांविषयी, पशु-पक्षी-किटक- निसर्गाविषयीच्या प्रेमामुळं, आहे तसंच ठेवलं तरी चालणार होतं. मला ठोस भुमिका घेता आली नाही. घेतलीच नाही. एक दिवस जेसीबी आलं आणि माझ्या हद्दीतील पाळीव झाडं वगळून, त्यांच्या हिशोबानं भाकड झाडं काढून प्लॉट त्यांच्या पध्दतीनं स्वच्छ केला. झाडांना आडोसा असलेला वडांगीसारखा नैसर्गिक भाग निघून गेला. पक्ष्यांची घरटी उध्वस्त झाली. अंडी फुटली. काही पिलं मेली, पक्षी उडून गेले. मधाचा पोळा कचर्‍यात गेला. मधमाशांनी कालवा केला, पण त्यांच्या विरोधाचा उपयोग झाला नाही. कचर्‍याचा ढीग प्लॉटात मध्यभागी गोळा करून जेसीबी दुसरीकडं निघून गेलं.

          लावलेली- फुलं, फळं देणारी झाडी आपल्या कामाची आणि बोरी, बाभूळ, नीम, पिंपळासारखी झाडं बिगर कामाची, अशा तथाकथित आपल्या  उपयुक्ततावादी दृष्टीकोनामुळं दिवसेंदिवस जंगल कमी होतंय. पण सर्वच हिरव्या पानांच्या वनस्पती आपल्यासाठी प्राणवायू निर्माण करीत असतात हे कोणाच्या खिजगणतीतही नसतं. अनेक जीवांसाठी निवासी जंगल जेसीबीनं काही मिनिटात

उखडून फेकून दिलं. प्लॉट मोकळा झाला हे चांगलं झालं की वाईट मला ठरवता येत नव्हतं. उघडी बोडकी जागा मला अस्वस्थ करत होती. मशीनचा आवाज मंद होत दूर जाताच एक कावराबावरा झालेला भारव्दाज पक्षी, आधी झाडं होती, तिथं जमिनीवर उतरला. इकडं तिकडं पहात झाडांचा कानोसा घेऊ लागला. अजून काही पक्षी याच पध्दतीनं आपली घरं शोधत आली. धारातिर्थी पडलेल्या हिरव्यागार झाडांच्या कत्तलीतून चाहूल नसलेला कानोसा घेत, मागमूसही शिल्लक नसलेली घरं इथं होती, कुठं गेली?’ अशा नजरेनं बोलत होती. कावर्‍याबावर्‍या झालेल्या मुक्या जीवांचं रडणं आपल्यापर्यंत पोचत नाही, त्यांचा आक्रोश दिसत नाही. मानवी शब्दांत त्यांचं सांत्वनही करता येत नाही. त्यांची पोरकी अवस्था पाहून नकळत दुसरीकडं बघू लागलो. मनातल्यामनात प्रतिक्रियाशून्य झालो.

          दुसर्‍या दिवसापासून मात्र आणखी वेगळेच धक्के बसू लागले. रोज कचरागाडी येऊनही आजूबाजूचे बरेच लोक या रिकाम्या प्लॉटात येता जाता दिवसभर कचरा फेकत होते. एका बाजूला राहणारा विक्षिप्त शिक्षक, रोज माझ्या अभ्यासाच्या खिडकीजवळ अगदी पाच सात फुटावर रात्रीचं शिळं- नासलेलं- वास करणारं अन्न टाकून जातो. प्लॉटशेजारी दुसर्‍या बाजूला राहणारा माणूस त्याच्या पाळलेल्या कुत्र्यानं ओट्यावर केलेली घाण, राजरोस रिकाम्या प्लॉटात रोज फेकतो. कोणी प्लॅस्टीकच्या पिशव्या फेकतं. एक बाई तर या प्लॉटपासून तीन चार घरं पलीकडे राहत असूनही आणि तिच्या मागच्या दारीसुध्दा मोकळा प्लॉट असूनही ती तिच्या घरातला ओला कचरा फेकायला या प्लॉटजवळ येते. म्हणजे स्वत:च्या घराजवळ कचरा फेकल्यानं आरोग्याला ते हाणीकारक आहे हे त्या महिलेला ज्ञात आहे, म्हणून ती तो कचरा फेकायला इथं येते. जणू असा कचरा घंटागाडीत टाकायला मनाई आहे, असं लोकांना वाटतं की काय! या कचर्‍यात तोंड घालण्यासाठी डुकरांचे- कुत्र्यांचे कळप आता नेहमी इथं वावरत असतात.

          एक चथुर्तांश प्लॉटमध्ये जेव्हा मी निसर्गाचा आनंद घेत होतो तेव्हा तीन चथुर्तांश प्लॉटमध्ये हे कचरा फेकण्याचं- कुत्र्याची घाण फेकण्याचं काम नित्यनेमानं आधीपासूनच सुरू असलं पाहिजे. मात्र दाट आणि अपारदर्शक जंगलामुळं दृष्टीआड सृष्टी या न्यायानं मला ते दिसत नव्हतं. त्याचं गांभीर्य नव्हतं. आज हे सगळं पाहत सहन करावं लागतं. कुत्र्यावाल्याला सांगितलं, ही घाण इथं टाकू नका, कचरागाडीत टाकत जा. कचरा फेकणार्‍यांना सांगितलं, कचरा घंटागाडीत टाकत जा. लोकांनी ऐकून घेतलं.

          विक्षिप्त शिक्षकाला असं सांगताच तो म्हणाला, ‘मी कचरा टाकताना तुम्ही दुसरीकडं पहायचं ना? इकडं कशाला पाहतात?’ असा हा तज्ज्ञ शिक्षक! सामाजिकतेचा गंध नसलेल्या लोकांना मोकळे प्लॉट म्हणजे कचरा डेपो वाटतात.

रोज सकाळी खिडकी उघडताच बाहेर नवनवीन कचरा दिसत राहतो, प्लॅस्टीक दिसत राहतं. (प्लॅस्टीकचा वास येत नाही ही आपल्यासाठी जमेची बाजू. पण प्लॅस्टीक डोळ्यांना दुरूनच खडळत राहतं, फ्रेश वाटत नाही. हे सहज फेकलेलं प्लॅस्टीक आता 30 वर्ष मातीत मिसळणार नसतं. शहरातील प्रचंड वाढणारी डुक्करसंख्या, कुत्री आणि गर्दीत फिरणारी भाकड जनावरं हा आणखी भयानक आणि मोठा चिंतनाचा विषय आहे. कुत्र्यांचा कळप जीवंत डुकरांच्या पिलांना फाडून खातात. दुनिया नामशेष होईपर्यंत हे प्रश्न मार्गी लागणार नाहीत, असं आता पाठपुराव्यांनी थकून वाटू लागलं.)

          घराला तार कंपाऊंड केलं अथवा भिंतीचं कंपाऊंड केलं तरी कचरा फेकला जाणार. कंपाऊंड केल्यावर कदाचित तो कचरा धीट होत कंपाऊंडला लागून अजून जास्त घराजवळ सरकू शकेल. म्हणजे या समस्येवर कंपाऊंड करणं हाही रामबाण उपाय होऊ शकत नाही.  

          पुढच्या वर्षाच्या पावसाळ्यात नैसर्गिक जंगल पुन्हा उगण्याची वाट पाहण्याशिवाय हाती काहीही शिल्लक नाही. नैसर्गिक झाडांतून जंतू कदाचित फिल्टर होत राहतील, अथवा अन्नसाखळीच्या नियमानुसार काही जीव त्यांना परस्पर संपवतील अशा आशेत... तसं झालं नाही तरी वाढलेल्या भाकड वनस्पतींतून आपल्या पापी डोळ्यांना पलीकडचा कचरा दिसणार नाही आणि लोकांना शिस्त लावण्यात आपसातले संबंधही खराब होणार नाहीत.

                    (अप्रकाशित. इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

© डॉ. सुधीर राजाराम देवरे

ब्लॉगचा पत्ता :http.://sudhirdeore29.blogspot.com/