बुधवार, १ जून, २०२२

सहावे सुख

 

          (‘संपृक्त लिखाण - मे २०२२ अंक एकला लिहिलेले संपादकीय)

                    दोन वर्षांपेक्षा जास्त काळापासून कोवीड-19 ने मानवी जीवन पूर्णत: नासवून टाकले. अनेक साहित्यिक, लेखक, कवी, गायक आदी कलाकारांसह आपले मित्र, नातेवाईक, तरुण व्यक्ती आपल्यापासून कायमच्या दूर निघून गेल्यात. प्रत्येकाची अशी एक तरी जवळची व्यक्ती या साथीने अचानक हिरावून नेली, की ती व्यक्ती आज हयात नाही यावर अजूनही आपला विश्वास बसत नाही. अशा या वैश्विक मानवी एकता दाखवण्याच्या काळातसुध्दा काही युध्दपिपासू सत्ता पृथ्वीला नष्ट करण्याची भाषा बोलत विध्वंस घडवत राहतात. तर दुसरीकडे धर्माचा बाजार मांडणारे लोक मानवी नात्यांचे ध्रुवीकरण करण्यात मग्न आहेत. मी (म्हणजे नागरिक) धार्मिक- अध्यात्मिक असेल, पण सत्ता मिळवण्यासाठी राजकारणी लोक माझ्या धर्माचा भावनिक वापर करत असतील तर मी त्यांना तो का करु द्यावा? राजकारण्यांनो- सत्ताधार्‍यांनो, देशाचा विकास करणे, नागरिकांना विज्ञानवादी बनवत त्यांच्या आयुष्यात समाधान निर्माण करणे, रोजगार उपलब्‍ध करणे, किमान जीवनावश्यक सुविधा निर्माण करणे, आरोग्य सुविधा पुरवणे अशी तुमची कामे आहेत- तुमची ध्येयं अशी असली पाहिजेत. धर्माला धर्माच्या पवित्र जागी राहू द्या. तुम्ही विकासाचे राजकारण करावे. नागरिक जोडण्याचे काम करावे, तोडण्याचे नव्हे, व्देषाचे नव्हे! देशातले लोक हे आधी नागरिक आहेत, केवळ मतदार नाहीत याचे भान ठेवावे. पूर्वी काही विशिष्ट कारणांनी देशात कुठे जातीय- धर्मिय ताणतणाव वाढला तर नागरिक जातीयवादी व्हायचे. परंतु जबाबदार सत्ताधारी, लोकांना भाईचारा शिकवित. आता खुद्द सरकारांत सामील लोक, नागरिकांत भेदभाव करतात आणि नागरिक सत्ताधार्‍यांना भाईचाराच्या चार गोष्टी शिकवतात... कालाय...

                    आलेल्या सगळ्याच संधींचा पुरेपुर फायदा घेत काही भ्रष्ट प्रवृत्ती माणसांना अधिकृतपणे लुटत राहतात. अशा सर्वदूर बिघडलेल्या गढूळ वातावरणात संवेदनशील माणूस आपल्या कुवतीनुसार सामाजिक काम करत विचार मांडण्याशिवाय- विधायक अभिव्यक्ती आविष्कृत केल्याशिवाय खूप काही करू शकत नाही. भयंकर आणि किळसवाण्या वास्तवाचे फक्त पारायणे करण्यापेक्षा वास्तव उपयोजित आपल्या कलावादीसहाव्या सुखात गुंतवून घेण्याचा एक प्रयत्न म्हणजे संपृक्त लिखाण हे नियतकालिक.     

                    वाड्.मयीन नियतकालिके बंद होत असल्याच्या काळात नवीन नियतकालिक सुरु करण्याचे धाडस करीत आहे. आवड असली की सवड मिळते तसे आवड असली की खर्चाकडे पहायचे नसते. ज्या गोष्टीत आपल्याला आनंद मिळतो ते करीत राहणे म्हणजेच प्रगती. हातून साहित्य निर्मिती झाल्यावर लेखकाला जो निखळ आनंद मिळतो तो खरा स्वर्गीय आनंद! केवळ लिखाणच नव्हे, तर इतर साहित्यिकांचेही वेगळे आणि अभिजात साहित्य वाचून असाच निर्भेळ आनंद लेखकाला मिळत असतो. प्रत्येक लेखक स्वत:च्या साहित्य निर्मितीसोबत कायम अशा अभिजात साहित्याच्या शोधात असतो आणि अधूनमधून असे चांगले साहित्य त्याला आस्वादायलाही मिळत असते. अशा प्रथितयश साहित्यिकांसोबत अजून उजेडात न आलेल्या पण कसदार लिहीत असलेल्या नवोदितांतील अप्रकाशित साहित्याचा मोठ्या प्रमाणात शोध घेऊन ते प्रथम प्रकाशित करण्याचे श्रेय घेण्याच्या स्वार्थाने हे नियतकालिक सुरू करीत आहे. म्हणूनच हे नियतकालिक कोणत्याही विशिष्ट भौगोलिक परिसराचे, गटातटाचे असणार नाही. या नियतकालिकात एखादा कळप दिसणार नाही.

                    कोणत्याही प्रकारच्या चाकोरीबध्द वा इतर मुक्त आविष्कारांत पसरटपणा वा पाल्हाळ नसावे, आशयाची संपृक्तता असावी, असे मत असल्याने या नियतकालिकाचे नाव संपृक्त लिखाणनिश्चित करण्यात आले. भाषा केंद्र बडोदा पुरस्कृत ढोल नियतकालिक संपादनाचा मिळालेला आनंद गाठीशी असल्याने गुंतवून घेणे स्वस्थ बसू देत नव्हते. ढोल नियतकालिकाचे भारतीय लोकभाषा सर्वेक्षणात विलिनीकरण झाल्यापासून अशा एका पर्यायी नियतकालिकाचा विचार करत होतो, पण आर्थिक स्वायत्तता नसल्याने तो पूर्ण होत नव्हता. शेवटी स्वत: धाडस करून तो आज साकार होतोय.

                    मुखपृष्ठावरच्या लिखाण शब्दाला तांबडा रंग नाही. तो रक्ताचा रंग आहे. या अंकाच्या मुखपृष्ठावर ज्या चित्रकाराचे चित्र प्रकाशित झाले ते किरण मोरे ग्रामीण भागातील- अहिराणी पट्ट्यातील एक छोटे शेतकरी असून त्यांचे अद्याप एकही चित्र कोणत्याही नियतकालिकात प्रकाशित झालेले नाही.

                    नियतकालिकाचे निवेदन प्रसिध्द झाल्यावर खूप मोठ्या प्रमाणात ईमेलने साहित्य येणे सुरू झाले. पण समाधान देईल असे साहित्य विरळ. मोठ्या प्रमाणात आलेले साहित्य नाईलाजाने बाजूला ठेवावे लागले. अनेक मित्रांनी साहित्य पाठवले. अनेक सुहृद नियतकालिकाबद्दल फोनवर बोलले. पण लोकनाथ यशवंत, जी. के. ऐनापुरे, सरदार जाधव, ‍दीपक बोरगावे आणि देवानंद सोनटक्के यांनी पैशांचे कसे?’ हे महत्वाचे विचारले. कारण पैसे असल्याशिवाय अशी हौस भागवता येत नाही, याचे भान या मित्रांनी पुन्हा आणून दिले.

                    म्हणून प्रकाशन खर्चासाठी न मागता मिळालेल्या देणग्या स्वीकारल्या जातील आणि त्यांचा नामोल्लेख अंकात केला जाईल, असे ठरवले. मात्र देणगी कोणाकडे मागितली नाही. देणग्यांबाबत पहिल्यांदाच इथे लिहीत असल्याने कसा प्रतिसाद मिळतो ते पाहू या. ह्या नियतकालिकाला कोणत्याही मंडळाचे अनुदान मिळाले नाही. कोणतीही संस्था, एनजीओ अथवा व्यक्ती या नियतकालिकाची आर्थिक पाठराखण करीत नाही. (तशी मागणीही कोणाकडे केलेली नाही.) नियतकालिकाची वर्गणी (वार्षिक, व्दैवार्षिक, त्रैवार्षिक, पंचवार्षिक, आजीव वगैरे) आगाऊ घेण्यात येणार नाही. प्रत्येक अंक त्या त्या वेळी कवी, लेखक, वाचक, प्राध्यापक यांनी थेट (ऑन लाईन) विकत मागवावेत अशी अपेक्षा आहे. अंकाचे मूल्यही उत्पादीत खर्चावर आधारित वाजवी आकारले आहे- यापुढेही कायम वाजवी आकारण्याचा प्रयत्न राहील. (तरीही अनुदानप्राप्त नियतकालिकांपेक्षा या अंकाची किंमत वाचकाला जास्त वाटू शकते. नोशन प्रेसच्या उत्पादीत खर्चानुसार कमीतकमी जी किंमत संगणक दाखवते, तीच आकारावी लागते.) कवी, लेखक, वाचक यांनी अंकाच्या एकापेक्षा जास्त- किमान दोन प्रती तरी मागवाव्या. आपल्यासाठी एक आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना विकत वा भेट देण्यासाठी एक. अंकाच्या दोनशेपेक्षा जास्त प्रती विकल्या गेल्या तर (उत्पादीत खर्च वगळून) अंकात समाविष्ट झालेल्या साहित्यिकांना मानधन देता येईल. अंकांत फक्त पुस्तकांच्या, प्रकाशकांच्या, साहित्य संस्थांच्या, साहित्यिकांच्या, स्मृतीप्रित्यर्थच्या जाहिराती स्वीकारण्याचा विचार आहे. 

                    यापुढेही साहित्यकारांनी आपले सगळ्यात चांगले व निवडक अप्रकाशित साहित्य संपृक्त लिखाणसाठी पाठवत रहावे. पसंतीस उतरलेल्या साहित्याला प्रकाशित करु. संपृक्त लिखाणचे स्वरूप अर्धवार्षिक असेल. २०२२ पासून दरवर्षी दोन अंक आखाजी (मे) आणि दिवाळी (नोव्हेंबर) दरम्यान प्रकाशित होतील. धन्यवाद.

       संपृक्त लिखाण अंक मागवण्यासाठी लिंक: https://notionpress.com/read/sampruktt-likhan

          (‘संपृक्त लिखाण अंक पहिला - मे २०२२ ला लिहिलेले संपादकीय. इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

© डॉ. सुधीर रा. देवरे

ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.com/