शनिवार, २३ फेब्रुवारी, २०१३

दहशतवादाचा बाँब 
- डॉ. सुधीर रा. देवरे

         हैद्राबादला बाँबस्फोट झाला. भारतातला हा पहिला दहशतवादी बाँबस्फोट नाही. मोजायचे ठरवले तर तात्काळ मोजता येणार नाहीत एवढे बाँबस्फोट आतापर्यंत भारतात झाले आहेत. हैद्राबादेतीलही हा पहिला बाँबस्फोट नाही आणि या शहरातील त्या जागेवरीलही हा पहिला बाँबस्फोट नाही. तरीही या भागातील सीसीटीव्ही कॅमेरे नादुरूस्त आढळून आले.
         आता युध्दपातळीवर तेथे सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील. जसे दिल्लीला धावत्या बसमध्ये बलात्कार झाल्यावर कॅमेरे लावले गेले वा बंद पडलेले दुरूस्त केले गेले. पुढे कधीतरी जयपूरला स्फोट झाल्यावर तेथेही कॅमेरे बसवले जातील. बँगलोरला स्फोट झाला तर तेथेही बसवले जातील. पण तोपर्यंत आम्हाला दहशतवादाचे कितीही चटके बसले तरी आम्ही पूर्वतयारी करणार नाही. आणि दिल्ली- हैद्राबादला नवीन स्फोट होईपर्यंत तिथले आता बसवलेले कॅमेरे पुन्हा बंद पडलेले असतील.
         लोक कितीही असुरक्षित असले तरी यापुढेही नेत्यांची सुरक्षाच वाढवली जाईल. देशात प्रचंड सुरक्षा रक्षक असूनही ते सगळे नेत्यांच्या सुरक्षेवर तैनात केले आहेत. आजचे सगळे बाँबस्फोट रिमोट कंट्रोलने केले जातात हे उघड सत्य आहे. तरीही कोणत्याही शहरातील गर्दीच्या ठिकाणी रिमोट जॅमर बसवले जात नाहीत. कारण आमच्यात म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षात तशी इच्छाशक्तीच उरलेली नाही. मात्र अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या घरादारात आणि वाहनांमध्येही हे जॅमर बसवले आहेत असे कळते. सर्वसामान्य लोकांचे रक्षण एवढ्या अवाढव्य देशात शक्य नाही असेही एका नेत्याने काल आडवळणाने सांगितले. सगळ्याच राजकीय नेत्यांना प्रचंड प्रमाणात सुरक्षा व्यवस्था पुरवली असल्याने दहशवादी हल्ल्यात जे काही वाईट होईल ते नागरीकांचे होईल. परवा हैद्राबादेत या गर्दीच्या ठिकाणी रिमोट जॅमर बसवलेले असते तर इतक्या निरपराध माणसांना ‍जिवाला मुकावे लागले असते का?
         दहशतवादी हा सलीम असो की अनिल, हरसिंग असो की अशोक, उजवा नक्षलवादी असो की डावा. दहशतवादी हा फक्त दहशतवादीच असतो. कुठल्या धर्माचाच काय तो साधा माणूस म्हणायलाही लायक नसतो. जगातील कोणता धर्म सांगतो, की इतर धर्माच्या लोकांना ठार मारा? एखाद्या धर्मग्रंथात असे लिहिले असेल तर दहशतवाद्यांनो तो ग्रंथ दाखवा.
         अशा दहशतवादाला काही उथळ राजकीय लोक केवळ मतांच्या राजकारणासाठी धर्माचा रंग देऊ पाहतात ही आमच्या लोकशाही देशाची खरी शोकांतिका आहे. आणि म्हणून आपल्या नेहमीच्या रस्त्यावर दहशतवादाचा बाँब आपला पाठलाग करत राहतो. कायम.

-          डॉ. सुधीर रा. देवरे          
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
        

शनिवार, १६ फेब्रुवारी, २०१३

देशांतर्गत खाजगी फतवे
-         डॉ. सुधीर रा. देवरे


            भारतातील अनेक लोकांना भारताची राज्यघटना माहीत नाही की काय असा संभ्रम पडावा इतक्या प्रमाणात रोज अगम्य असे फतवे देशभर निघत राहतात. हे फतवे फक्त अडाणी माणसेच काढतात आणि ते त्यांच्यापुरतेच मर्यादित आहेत असे नाही तर काही संघटना आणि राजकीय संघटनाही चालवणारे लोक या फतव्यांमागे असतात ह्या जास्त चिंताजनक घटना आहेत.
पैकी काही फतवे आणि घटना पहा:
1 पंधरा वर्ष वयाच्या मुलींचे लग्न लावा म्हणजे बलात्कार होणार नाहीत.
2 मुलींनी- महिलांनी मोबाइल वापरू नयेत.
3 रिसेप्सेनिष्ट म्हणून मुस्लीम महिलांनी काम करू नये.
4 दर्ग्यात जायला मुस्लीम महिलांवर बंदी.
5 बुरखा वापरल्याशिवाय मुस्लीम महिलांनी बाहेर पडू नये.
6 मुस्लीम महिलांनी- मुलींनी शिक्षण घेऊ नये. नोकर्‍या करू नयेत.
7 परजातीत वा परधर्मात लग्न केले तर ठार मारणे.
8 खाप पंचायतीचे अनेक निकालांत राज्यघटनेविरूध्द वर्तन.
9 शाळेत मुलींना अमूक एक ड्रेस घालायला परवानगी नाकारणे.
10 जम्मू काश्मीर मध्ये मुलींना वाद्य वाजायला व गायला बंदी घालणे.

      फक्त एवढेच आदेश नाहीत. इथे फक्त आठवले ते सांगितले. असे असंख्य फतवे आपल्या रोज वाचनात येतात. हे सर्व प्रकारचे फतवे आपल्या देशाच्या राज्यघटनेविरूध्द आहेत, हे फतवे काढणार्‍यांना आणि ते आमलात आणणार्‍या नागरीकांनाही माहीत नाही की काय असे वाटावे असे आज सर्वत्र भयावह चित्र पहायला मिळते. काही लोक या बातम्या ऐकून-वाचून-पाहून सोडून देतात तर काही लोक या फतव्यांच्या समर्थनार्थ बोलू लागतात, हे त्याहून भयंकर आहे.
      अशा देशांतर्गत खाजगी फतव्यांना नुसत्या कायद्यानेच विरोध करून चालणार नाही तर नागरिकांनी मुद्दाम अशा फतव्यांविरूध्द वागावे आणि फतवा काढणार्‍यांना त्यांची जागा दाखवून द्यावी. फतवा काढणारा एखादा लोकप्रतिनिधी असेल तर भारतीय राज्यघटना मान्य नाही म्हणून त्याच्या राजिनाम्याची मागणी करायला हवी. 

    -         डॉ. सुधीर रा. देवरे           
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
         

शनिवार, ९ फेब्रुवारी, २०१३

शाहरूख: एक सामान्य माणूस 
-         डॉ. सुधीर रा. देवरे  

      शाहरूख खानला मी एक थोर कलावंत समजत होतो. थोर अभिनेता समजत होतो. त्याचे काही अभिनय पाहून मी भारावलोही होतो. म्हणूनच काही रिअँलिटी शोंमधून त्याच्या उथळ विनोदांनाही मी त्याचा हजरजबाबीपणा समजून दाद दिली होती. पण परवाच्या आऊटलूक साप्ताहीकामधील त्याच्या लेखातील काही संदिग्ध विधानांनी तो फक्त एक अतिसामान्य माणूस आहे, हे त्याने आपल्या निदर्शनास आणून दिले.
      त्याची ती संदिग्ध विधाने वाचून पाकिस्तानातील कुप्रसिध्द दहशतवादी हाफिस सइद त्याला पाकिस्तानात वास्तव्याला बोलावतो, तर पाकिस्तानचे गृहमंत्री भारताला सल्ला देतात की, भारताने शाहरूखला सुरक्षा व्यवस्था पुरवावी. इतके सारे होऊनही शाहरूख तात्काळ प्रतिक्रिया देण्याचे टाळतो. जेव्हा उशीरा का होईना पण त्याने जी गुळमुळीत प्रतिक्रिया दिली तीत त्याने उघडपणे पाकिस्तानचे नाव घेतले नाही. खरे तर त्याच्या फालतू विधानांमुळे एक दहशतवादी व्यक्ती आणि पाकिस्तान किती धुर्त चाल खेळले हे त्याच्या लक्षात येऊन आपली ही कृती त्याला स्वत:लाच लज्जास्पद वाटायला हवी होती. पण त्याच्या वागण्यावरून तसे अजिबात जाणवले नाही. हे सर्व घडत असताना शाहरूख हा एक अतिसामान्य, उथळ आणि स्वार्थी माणूस आहे हे सिध्द झाले.
      भारतात काही मुठभर लोक आणि मुठभर राजकारणी जातीयवादी, धर्मांध नक्कीच आहेत. अशांमुळे अनेक लोकांच्या भावनेला ठेच लागते हे ही खरे आहे. मात्र अशा मुठभर लोकांसाठी तुम्ही करोडो भारतीयांची मने दुखावता हा कृतघ्नपणा ठरतो. थोर कलावंत म्हणून शाहरूखला हे वागणे अजिबात शोभनिय नव्हते. माय नेम इज खान आणि चक दे इंडिया या सिनेमातील अभिनयाने त्याच्या मानसिकतेत परिणाम झाला की काय अशी शंका येते. हे चित्रपट कला म्हणून मला आवडले. पण शाहरूख त्याला वास्तवता समजतो की काय. आणि असेलच ती वास्तवता तर ती सगळ्या जाती धर्मांसाठी- आणि सगळ्याच अल्पसंख्यांकासाठी- दलितांसाठीही आहे, पण अपवादात्मक. नव्हे, असे अनुभव बहुसंख्यांकानाही येतात. परंतु आपले तारतम्य सुटायला नको हे महत्वाचे.
      मोहम्मद अझरूद्दीन हा भारतीय क्रिकेट टीम मध्ये येताच तो क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातला ताईत बनला होता. त्याच्या गुणवत्तेवर तो कर्णधारही झाला होता. त्याच्यावर मॅचफिक्सींगचे आरोप झाले तरी क्रिकेटप्रेमी त्या आरोपाशी सहमत नव्हते. पण तसा आरोप होताच अझरूद्दीनला आपण अल्पसंख्यांक असल्याचा साक्षात्कार झाला होता. तेव्हा पासून तो माझ्या मनातून उतरला तो अजूनही. तीच गत शाहरूखची.
      माझे असंख्य मुस्लीम मित्र आहेत. हे सगळे सामान्य लोक आहेत. त्यांना कोणत्याही प्रसिध्दीचे वर्तुळ नाही. सुरक्षा नाही. श्रीमंतही नाहीत ते. ‍काही हिंदू- मुस्लीम दंग्यात त्यांना अनेक वाईट अनुभवांनाही सामोरे जावे लागले. तरीही त्यांनी भारताच्या धर्मनिरपेक्षतेवर कधीही शंका घेतली नाही. त्यांना इथे कधी असुरक्षित वाटले नाही. ज्या घटना घडतात त्या तात्कालीक आणि काही असमंजस प्रवृत्तींकडून होतात, हे ते चांगल्याप्रकारे जाणतात. आपण पाकिस्तानात नाही हे आपले सुदैव आहे, असेही त्यांनी माझ्याजवळ अनेकदा बोलून दाखवले आहे. असे माझे सामान्य मित्र शाहरूखपेक्षा कितीतरी पटीने मनाने श्रीमंत ठरतात आणि सुज्ञही. अशी सुज्ञता शाहरूखला दाखवता आली नाही हे आपल्या धर्मनि‍रपेक्ष भारताचे दुर्दैव.

-         डॉ. सुधीर रा. देवरे           
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
        

शनिवार, २ फेब्रुवारी, २०१३

साहेबांस नम्र विनंती अशी की...
- डॉ. सुधीर रा. देवरे     

      हाफिस सईद साहेबांनी सीमेवर त्यांच्या सैनिकांकरवी आमच्या सैनिकांची हत्त्या करून त्यांची शिरे कापून पाकिस्तानात नेली ती कारवाई आम्हाला अजिबात पसंद पडली नाही. नाहीतर आमचे उदाहरण पहा, अजमल कसाब साहेबांवर आम्ही करोडो रूपये खर्च करून खटला चालवला. त्यांना स्वखर्चाने आम्ही वकिल दिला. आणि कोर्टाच्या निर्णयाचे पालन करत आम्ही त्यांना फाशी दिले. अजमल कसाब साहेबांच्या आत्म्याला शांती मिळो.
      ओसामा बीन लादेनजी साहेबांना अमेरिकेने पाकिस्तानातच दाणदाण गोळ्या घालून धाडकन मारून टाकले, तसे आम्ही अजमल कसाब साहेबांचे केले नाही. या पृथ्वीतलावरची आमची सगळ्यात मोठी लोकशाही उगीच नाही. आता लादेनजी साहेबांनी हिसकावली असतील खच्चून माणसं भरलेली काही विमानं आणि ठोकली असतील अमेरिकेतील ट्वीन टॉवर्सवर. लादेनजींनी काही हजार माणसं मारण्याचा एक खेळ खेळला म्हणून आमच्यासारखे मोठ्या मनाने सोडून द्यायचे ना, का गोळ्या घालून ठार मारायचे साहेबांना? अमेरिकेच्या या वागण्याशी आम्ही अजिबात सहमत नाही.
      शेवटी, दाऊद इब्राहिम साहेबांना आम्ही अशी नम्र विनंती करतो की, त्यांनी आमच्याशी खेळीमेळीने बोलणी करून भारतातला दहशतवाद थांबवावा. तसे केले तर त्यांना आम्ही त्यांची मुंबई पुन्हा देऊन टाकू. आणि आता अफजल गुरू साहेबांना तरी फाशी होऊ नये असेही आमचे आग्रही मत आहे.

-         डॉ. सुधीर रा. देवरे           
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/