शनिवार, २९ मार्च, २०१४

तिकीट मिळालं का?



 - डॉ. सुधीर रा. देवरे

       आज जिकडे तिकडे तिकीट मिळालं का? असा प्रश्न ऐकू येतोय. ज्याचा तिकिटाशी संबंध येतो तो तर असे विचारतोच पण ज्याचा अशा तिकिटाशी काहीही संबंध नाही तो सुध्दा तिकिटाबद्दलच बोलतो, अशा पध्दतीने आजचे वातावरण तिकीटमय झाले आहे.
         आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाचा तिकिटाशी संबध येतो तो प्रवासात. बसचे तिकीट काढणे, रेल्वेचे तिकीट काढणे. वगैरे. बसचे तिकीट काढणे तसे खूप सोपे. तिकिटासाठी पैसे द्यावे लागत असले तरी बसमध्ये जाऊन बसल्यावर तिकीट काढण्याची सोय तरी आहे, पण रेल्वेचे तसे नाही. रेल्वेचे तिकीट आधीच काढावे लागते. ते पुन्हा कन्फर्म करावे लागते. काही वेळा तिकीट एजंट कडून मिळवावे लागत असल्याने अनेक लोक तिकिटावरच्या छापलेल्या किमतीपेक्षा जास्त पैसे देऊन रेल्वेचे तिकीट काढतात. आणि तिकीट कन्फर्म झालं तर आताच्या तिकीट मिळणार्‍या लोकांइतका सर्वसामान्य माणसाला आनंद होतो.
         सांगण्याचा मुद्दा असा की आजच्या काळात तिकीट मिळणे ही फार जबरदस्त गोष्ट झाली आहे. साध्या रेल्वेच्या तिकिटाला किमतीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागत असतील तर मग प्रत्येक जिल्ह्याला फक्त एकच तिकीट असल्यावर या तिकिटाची किमत काय जबरदस्त असेल, याची कल्पना करा. या जबरदस्त किमतीच्याही पुढे बंद दाराआड बोली बोलून लिलाव पध्दतीने तिकिटे खपतात. का खपतात अशी तिकिटे?
         कारण सांगता यायला पाहिजे. सगळ्यांनाच सांगता आले पाहिजे. अगदी सर्वसामान्य माणसाला सुध्दा या प्रश्नाचे उत्तर देता आले पाहिजे: या तिकिटावर जर तुमचा लग्गा लागलाच तर पाच वर्षात तुम्हाला तुमची प्रॉपर्टी पंधरावीस पटीने सहज वाढवता येते. म्हणून आज काही कोटी गुंतवल्यावर पाच वर्षात जर काही करोड कोटी रूपये मिळवता येणार असतील तर व्यापार्‍यांनी या व्यवसायात उतरलेच पाहिजे की नाही. व्यवसाय आणि व्यापारी हे शब्द इथे चुकून आलेले नाहीत. अगदी जाणीवपूर्वकच लिहिले आहेत. म्हणून तिकीट देणारी पार्टी सुध्दा नुसत्या पैसे मोजणार्‍यालाच तिकीट देते असे नाही, तर ज्याला तिकीट देऊन गाडीत बसवले जाते ती असामी त्या गावापर्यंत पोचलीच पाहिजे, अशी काळजीही घेतली जाते. मग रस्त्याने त्याने या गाडीचे (म्हणजे व्यवस्थेचे) कितीही नुकसान केले तरी हरकत नाही. 
         म्हणून तर तिकिटासाठी या पक्षातून त्या पक्षात. त्या पक्षातून फालतू पक्षात आणि फालतू पक्षातून अपक्षात अशा कोलांट्या उड्या मारून तिकीट मिळवायचे आणि लग्गा लागायची वाट पहायची. जो कोलांट्या उड्या मारण्यात जास्त पटाईत तो लग्गा लावून घेण्यातही पटाईत ठरतोच. लोक विकायला मोकळेच आहेत. तुम्ही प्रयत्न तर करा, हे त्यांचे ब्रीद आहे. अ‍ाणि त्यांचे हे ब्रीद आपण सगळे जण यशश्वी करत राहतो. म्हणजे दारूच्या बदल्यात, पार्टीच्या बदल्यात, किरकोळ नोटांच्या बदल्यात, केव्हा केव्हा मतदान केंद्रापर्यंतच्या केवळ वाहन सौख्यातही आपण स्वत:ला विकायला तयार असतो. आणि मग पुढील पाच वर्ष चावडीवर फक्त गप्पा मारत राहतो : निवडून आलेले लोक कसे नालायक आहेत पहा!!!
         (या ब्लॉगमधील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

    - डॉ. सुधीर रा. देवरे        
       इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
     

शनिवार, २२ मार्च, २०१४

मते कुणाला? भारताला !


                             -         डॉ. सुधीर रा. देवरे


            तुम्ही हिं‍दु धर्मात जन्माला आलात म्हणून ज्याचे कतृत्व फक्त हिंदुत्व आहे अशा नेत्याला मते देऊ नका. तुम्ही मुस्लीम धर्मात जन्माला आलात म्हणून ज्याचे कतृत्व फक्त मुस्लीम असणे आहे अशा नेत्याला मते देऊ नका. तुम्ही शीख धर्मात जन्माला आलात म्हणून ज्याचे कतृत्व फक्त शीखत्व आहे अशा नेत्याला मते देऊ नका. तुम्ही बौध्द धर्मात जन्माला आलात वा बौध्द धर्म स्वीकारला म्हणून ज्याचे कतृत्व फक्त बौधुत्व आहे अशा नेत्याला मते देऊ नका. हीच गोष्ट प्रत्येक धर्मिय बांधवांना सांगता येईल.
            तुम्ही मराठा जातीत जन्माला आलात म्हणून ज्याचे कतृत्व फक्त मराठा जात मिरवणे आहे, अशा नेत्याला मते देऊ नका. तुम्ही माळी जातीत जन्माला आलात म्हणून ज्याचे कतृत्व फक्त माळी जात मिरवणे आहे, अशा नेत्याला मते देऊ नका. तुम्ही ब्राम्हण जातीत जन्माला आलात म्हणून ज्याचे कतृत्व फक्त बाम्हण्य पाळणे आहे, अशा नेत्याला मते देऊ नका. हीच गोष्ट इथल्या प्रत्येक जातबाधंवांना सांगता येईल.
            भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. कोणी भारताला धर्मातीत देश असल्याचे सांगतो, ते सुध्दा खरेच आहे. पण धर्मातीत देश असणे म्हणजे आपापल्या धर्माची मते आपापल्या धर्मातील नेत्यालाच द्या असा याचा अर्थ नाही. खरं म्हणजे धर्म हा भारताच्या लोकशाहीचा आधारच नाही. देश धर्मातीत आहे याचा अर्थ ज्या त्या धर्माने आपापली कर्मकांडे आपापल्या घरात करायला हरकत नाही हा आहे. धर्माच्या नावाने मते मागून संसदेत कायदे करण्यासाठी या, अशा या धर्मातीत असण्याचा अर्थ नाही. म्हणून जातीच्या नावाने आणि धर्माच्या नावाने जे लोक मते मागतील त्यांना त्या त्या जाती धर्माने मते तर देऊच नयेत, उलट निवडणूक आयोगाच्या हे लक्षात आणून देणे गरजेचे आहे.
            भारताच्या नागरीकांनी ही पथ्ये पाळली तर इथे जातीयवाद वाढणार नाही. धर्मांधता फोफावणार नाही. चांगले धर्मनिरपेक्ष लोक निवडून येऊन संसदेत जातील आणि मग रोज रोज घडणारे विविध कांडे कमी होत जातील. आपल्या जाती धर्मांच्या लेबलने आपल्या जातीधर्माचे लोक आपल्याला मते देत नाहीत हे आता नेत्यांच्या लक्षात आले की ते जातीय तेढीचे आणि धर्मांधतेचे राजकारण सोडून विकासाच्या वाटेवर चालण्याची अपेक्षा आपण करू शकतो.
            म्हणून प्रश्न आता असा निर्माण होतो की आपण मते द्यायची कोणाला? आपण भारताचे नागरीक आहोत म्हणून आपण सार्वभौम भारताला मते दिली पाहिजेत. म्हणजेच ज्या उमेदवाराचे भारताबद्दलची मते उदारमतवादी आहेत. भारताच्या उज्वल भवितव्याची ज्याला आस आहे, जो भ्रष्टाचारी नाही, निष्कलंक आहे, अभ्यासू आहे, ज्याच्याजवळ वैचारिकता आहे आणि मुख्य म्हणजे ज्याच्याजवळ स्वधर्माचा आणि स्वजातीचा फाजील अहंकार नाही अशा नेत्याला आपण मते दिली पाहिजेत. मग तो कोणत्याही जातीधर्माचा असो.
            अनेक नेते निवडणूक काळात मतदारांसाठी पार्ट्या देतात. नेत्यांनी ठेवलेल्या पार्ट्यांना अनेक लोक जातात, कोणी नेत्यांकडून मतांच्या बदल्यात पैसे घेतात. कोणी दारू घेतो. कोणी मतदानाच्या दिवशी नेत्यांच्या गाडीने मतदान केंद्रावर जातो. असे होत असेल तर आपला नेता आपल्यासारखाच भ्रष्ट राहणार आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही.
      (यातील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)


- डॉ. सुधीर रा. देवरे            
इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
     

शनिवार, १५ मार्च, २०१४

निवडणुकीतला जाहीरनामा



 
  - डॉ. सुधीर रा. देवरे


       कोणत्याही निवडणुका जवळ आल्या की राजकीय पक्षांचे जाहीरनामे झळकू लागतात. या जाहीरनाम्यात काय असते? स्वस्त धान्य देऊ, चांगले रस्ते देऊ, पाणी देऊ, गटारी बनवू, वीज देऊ, मोबाइल देऊ, लॅपटॉप देऊ इत्यादी. या व्यतिरिक्त काही द्यायचेच झाले तर एखादा पक्ष स्थिर सरकार देऊ पाहतो. यापेक्षा अजून काही द्यायचे असते हे राजकीय पक्षांनाही माहीत नसते आणि ज्यांच्यासाठी ते सत्तेवर येऊ पाहतात त्या जनतेलाही ते माहीत नाही. माहीत आहे पण ते मागायचे असते हे माहीत नाही की काय अशी परिस्थिती आज पहायला मिळते.
         खरं तर राजकीय नेत्यांना विसर पडला असला तरी आपण मागाव्यात अशा अनेक गोष्टी आपण मागत नाही. वृक्ष कर घेतला जातो पण आपल्या आजूबाजूला वृक्षच नाहीत. ‍साफसफाई कर घेतला जातो पण सफाई होत नाही. झाडे लावा अशी कोणी मागणी करत नाही आणि आपण स्वत:ही वृक्ष लागवड करत नाही. आमच्या नद्या जशा होत्या तशा करून द्या, त्यांची गटारं करू नका असे आपण म्हणत नाही. गटारींची मागणी आपण करतो आणि आपल्या सगळ्या गावासहीत नद्यांच्याही गटारी आपल्या वाट्याला येतात. अशाच गटार नद्यांचे पाणी आपण पित असतो आणि आपल्या आरोग्याची वाट लावतो. पाणी अडवण्यासाठी आपण आपली मागणी करत नाही. पावसाचे पाणी वरून पडते आणि वाट सापडेल तिकडे वाहून जाते. आपण नदी-नाल्यात पाणी अडवत नाही. शेतात अडवत नाही. गावात अडवत नाही.
         जंगल राखून ठेवल्याची मागणी आपण करत नाही. डोंगरांना संरक्षण देण्याची मागणी आपण करत नाही. नद्यातली वाळू रक्षणाची मागणी आपण करत नाही. वीजेचे भारनियमन होऊ नये हा मुद्दा असतो, पण देशात नवीन वीजनिर्मिती करण्यासाठी आपले काय धोरण आहे हा प्रश्न कोणी राजकीय पक्षांना विचारत नाही. सारांश, पर्यावरण वाचेल अशा मागण्या आपण करत नाहीत आणि म्हणून राजकीय पक्षही त्याकडे लक्ष देत नाहीत. गावात चांगली ग्रंथालये हवीत अशी मागणी आपण करत नाही.
         लाच न देता काम व्हायला हवीत अशी मागणी आपण करत नाही. शिक्षणात देणग्या घेऊन प्रवेश दिले जातात ते बंद करण्याची मागणी आपण करत नाही. शासकीय सेवेत पैसे देऊन नोकर्‍या दिल्या जातात ते बंद करण्याची मागणी आपण करत नाही. किराण्यात आणि सगळ्याच खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये जी सर्रास भेसळ होते ती होऊ नये अशी आपण मागणी करत नाही. दूध आणि मिठाईतल्या भेसळीबद्दल कोणी बोलत नाही. खोट्या औषधांबद्दल कोणी बोलत नाही. नफेखोरी, साठेबाजी, नकली माल अशा सगळ्या गोष्टी आपण अधिकार्‍यांच्या चांगुलपणावर सोडून दिल्या आहेत. जर चांगले कर्मचारी असतील तर ते अशा गोष्टी रोखतील नाहीतर बाकींच्यांना म्हणजे आपल्या व्यवस्थेला याच्याशी काही घेणेदेणे नाही असे सगळे चित्र दिसते. आणि आपण ते विनातक्रार मान्य केले आहे. राजकीय जाहीरनाम्यात या गोष्टी आपल्याला वाचायची सवय नाही, मागायची सवय नाही आणि राजकारण्यांच्या विचारात या गोष्टीला थारा नाही.
         (यातील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)
 
      - डॉ. सुधीर रा. देवरे            
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

     

शनिवार, ८ मार्च, २०१४

वातावरण बिघडले आहे! सावधान !!!


                                                                                         -         डॉ. सुधीर रा. देवरे

       आज देशात वातावरण बदलले आहे. भौगोलिक वातावरण जसे बदलले आहे तसे देशातल्या जनमानसातही काही तरी बदल झाल्याचे स्पष्ट दिसते. काही तज्ज्ञांच्या मते तर हे वातावरण बदलले नसून बिघडले आहे. या बिघडलेल्या वातावरणामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहेच आणि देशातल्या नागरिकांच्या शारीरिक व्याधीही वाढल्या आहेत. या नैसर्गिक वातावरणाच्या फटक्याप्रमाणे देशातल्या गोडी गोडी वातावरणाचा देशातील नागरिकांना अजून मोठा फटका बसतो की काय अशी भीती वाटणेही रास्त आहे.
         शेवटचा दिवस गोड व्हावा असे संत तुकारामांनी सांगितल्याप्रमाणे संसदेच्या शेवटच्या दिवशी आपले सगळे लोकप्रतिनिधी किती शालीन आहेत याचे दर्शन देशवासियांना घडले. प्रत्येक सत्रात असे वातावरण आपल्या संसदेत दिसले असते तर कितीतरी पडून राहिलेली कामे मार्गी लागली असती आणि विकासाने देश पुढे गेला असता. सभागृहाचे कामकाज संपताच बाहेरही अचानक अकल्पित गोष्टी घडू लागल्या. अनेक शत्रूंनी हात मिळवत दोस्त्या केल्या. ज्यांनी आयुष्यभर कधी राम म्हटले नाही अशा काही फक्त नावाने राम असणारे लोक राम भक्तांना राम राम म्हणत लोटांगण घालू लागलीत. (प्रत्येक निवडणूकीआधी असे आयाराम गयाराम आपले सौदे करून घेतात.)
         यांना असा अचानक साक्षात्कार होण्याचे कारण काय असावे? समुद्रात कुठे लाट दिसत नव्हती. अजूनही दिसत नाही. मात्र हवा बदललेली दिसते. हवेची दिशा बदललेली दिसू लागली. हवेतल्या प्रमुख झाडाची उंची वाढलेली दिसू लागली. झाडाला पहायला लोक गर्दी करू लागले. काय सांगावे, या झाडाला उद्या फळे येऊही शकतात. या शंकेला दुजोरा देण्यासाठी देशातला मिडियाही धावून आला. झाडाची उंची वाढल्याची मिडिया ग्वाही देऊ लागला. मग आजूबाजूची खुरटी झाडी मनातल्यामनात म्हणू लागली, पाच वर्षे विजनवासात जाण्यापेक्षा या झाडाला फळे लागण्याची चिन्हे दिसतात तर खाऊ आपणही. नाहीतरी आपले ध्येय तेवढेच तर आहे!
         ही हवा आणि हे मोठमोठे पण खुरटे वृक्ष, यांना काही तत्वे आहेत का? सत्तेत येण्यासाठी जे लोक देवाला आणि थोर ऐतिहासिक पुरूषांनाही वापरून घ्यायला मागे पुढे पहात नाहीत ते सामान्य माणसांचे काय भले करतील? जे लोक सत्तेसाठी नुसते तत्वच सोडत नाहीत तर लाजही सोडतात अशा लोकांपासून म्हणूनच सावधान! 
         (या ब्लॉगमधील मजकूराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

    - डॉ. सुधीर रा. देवरे        
       इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
     

शनिवार, १ मार्च, २०१४

मराठीच्या अस्तित्वाचे प्रश्न आणि मराठी बोली



 
-डॉ. सुधीर रा. देवरे

          (प्रस्तावना: सासवड येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील याच विषयाच्या परिसंवादात माझा सहभाग होता, पण माझ्या सहभागाची मला कल्पना नसल्यामुळे मी संमेलनाला उपस्थित नव्हतो. या परिसंवादाच्या विषयावर मी माझ्या ब्लॉग मधून लिहावे अशी अनेक मित्रांची मागणी होती. म्हणून सदर विषयावरचा मी हा लेख लिहिला आणि तो भाषा दिनाच्या मुहुर्तावर 27 फेब्रुवारी दोनहजार चौदाच्या  महाराष्ट्र टाइम्स मध्ये प्रकाशितही झाला आहे. आपल्या सर्वांसाठी तो इथे पुन्हा देत आहे.)
          आज आपल्यापुढे केवळ मराठीच्या अस्तित्वाचा प्रश्न नाही तर मराठी भाषा सकस, सशक्त होत दमदारपणे पुढे वाटचाल कशी करेल हा खरा चिंतनाचा विषय आहे. मराठी भाषा ही महाराष्ट्रात अ‍ाणि महाराष्ट्राबाहेरही मोठ्या प्रमाणात बोलली जात असल्याने तिच्या अस्तित्वाचा प्रश्न मुळीच उद्‍भवत नाही, असे काही अभ्यासकांचे मत आहे. असा निष्कर्ष काढणे काही ठराविक मर्यादेपर्यंत ठीक असले तरी मराठी यापुढे महाराष्ट्रात कशा पध्दतीने अस्तित्वात राहू शकेल हा मात्र चिंतेचा विषय ठरावा अशीच परिस्थिती आहे.   
            मराठी कसदारपणे संवर्धीत होण्यासाठी तिच्यात महाराष्ट्रातील बोलीभाषांचे प्रभावी उपयोजन होणे आज आवश्यक आहे. साहित्यातून हे काम प्रभावीपणे करता येते आणि ते तसे करणे सोपेही होते- आहे. महाराष्ट्रात लहान मोठ्या परिसरात बोलल्या जाणार्‍या जवळपास पासष्ट बोली आढळतात. बोलीतले शब्द साहित्यात उपयोजित करताना ते शब्द कोणत्या बोलीतले आहेत हे त्या त्या पुस्तकात वा तळटिपेत नोंदवण्याची मुळीच आवश्यकता नाही. लेखकाच्या निवासातून- त्याच्या क्षेत्रीय परिचयातून त्या बोलीभाषेचा परिचय आपोआप स्पष्ट होत जातो. उदाहरणार्थ, टहाळबन , चावळणे असे काही शब्द मी माझ्या कथा- कवितेत वापरले तर ते शब्द अहिराणी बोलीतले  आहेत हे मला स्वतंत्रपणे तेथे नमूद करण्याची आवश्यकता भासू नये. काही काळ तळटिपेत त्यांचा अर्थ सांगितला तरी पुरे. कालांतराने तशीही आवश्यकता भासणार नाही.
            एका बोलीतले काही शब्द जसेच्यातसे दुसर्‍या काही बोली भाषांमध्ये आढळतात. म्हणून ते शब्द अमूक बोलीतूनच इतर बोलींमध्ये आले असे आपल्याला ठामपणे मांडता येणार नाही. मात्र तरीही हे शब्द ते ते बोलीभाषक लेखक प्रमाणभाषेत साहित्य लिहिताना वापरत नाहीत. उदा. उलसा (लहान), जाम (पेरू), घुगरी (उस्सळ), कुद (पळ), दप (लप), व्हता (होता), असे काही शब्द फक्त विशिष्ट बोलीभाषेतच अस्तित्वात आहेत असे नाही, तर ते अनेक बोलींमध्ये वापरले जातात हे लक्षात येते. म्हणजेच हे शब्द बोलीभाषेतले असूनही मराठी प्रमाणभाषेत सर्वदूर परिचयाचे आहेत. असे शब्द मराठी साहित्यात रूळायला हवेत.
            इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या मराठी विषयांच्या पुस्तकात बोलीभाषांचा वितृत परिचय द्यायला हवा. महाराष्ट्रात पासष्ट बोलीभाषा बोलल्या जातात. म्हणून पाचवी ते बारावी या आठ इयत्तांमध्ये एकेक वर्गात आठ आठ बोलीभाषांचा परिचय थोडक्यात विद्यार्थ्यांना करून देता येऊ शकतो. मात्र पाठ्यपुस्तके तयार करणार्‍या मंडळाचे हे काम असून अशा मंडळावर योग्य व्यक्तींची निवड होणे गरजेचे आहे. अभ्यास मंडळ आणि पाठ्यपुस्तक मंडळातून जबाबदारीने असे काम झाले पाहिजे आणि त्यासाठी योग्य व्यक्ती तिथे पाठवल्या गेल्या पाहिजेत.
            नागर भाषा म्हणजेच प्रमाणभाषेचे महत्व अतोनात वाढवणे हे मराठीचे प्रवाहीपण कमी करण्याची चाल असू शकते. संस्कृत भाषेचा मारा करून प्रवाही मराठी वाक्यरचनेपासून सर्वसामान्यांना दूर लोटण्याचा प्रयत्न होतो. अशा प्रवृत्तींपासूनही सावध राहणे आज गरजेचे झाले आहे. या गोष्टींकडे लक्ष पुरवले तरच आपल्याला बोली बोलणार्‍यांचा न्यूनगंड दूर करता येऊ शकतो. अन्यथा बोली आणि प्रमाण मराठी यांच्यातली दरी यापुढेही वाढत जाऊ शकते.
            सारांश, बोली भाषा जिवंत राहिल्या तर प्रमाण मराठी जिवंत राहील आणि बोलींशी युती केल्यानेच ती प्रवाही होईल. प्रवाही असणे हेच जिवंतपणाचे लक्षण आहे. तं‍त्रबंधात अडकल्याने भारताची पारंपरिक ज्ञानभाषा असलेल्या आणि ‍जिच्यात विपुल दर्जेदार साहित्य लिहिले गेले अशा संस्कृत भाषेचे आज काय झाले हे सर्वज्ञात आहे. म्हणून आज मराठीचे प्रवाहीपण टिकवायचे की संस्कृतप्रमाणे तिला मृत भाषा होऊ द्यायचे हे आपल्याला आज गंभीरपणे ठरवावे लागेल. मराठी भाषेतून- साहित्यातून अगदी नियोजनबध्द उपयोजन करतच आज बोलीभाषांचे दस्तावेजीकरण सुलभ होऊ शकेल.
            हे खरे आहे की संवादाची कामचलाऊ मराठी भाषा कधीच मरणार नाही. मात्र तिचे क्षेत्र दिवसेंदिवस संकुचित होऊन ती फक्त ग्रामीण आणि झोपडपट्टीतल्या व्यवहारात पहायला मिळेल. अशा पध्दतीने तिचे महत्व कमी होत जाणार असल्यामुळेच हा चिंतेचा विषय ठरतो. आजच महाराष्ट्रात मराठी हा विषय शिक्षणात अजिबात नसला तरी मराठीत गप्पा मारत कोणत्याही शाखेचा पदवीधर होता येते, ही परिस्थिती बदलली पाहिजे. म्हणजे केवळ मराठी हा विषयच नव्हे तर एखाद्या विद्यार्थ्याला मराठी माध्यमातून बी. एससी. व्हायचे असेल तर पदवी पर्यंतची सायन्सची पुस्तके त्याला मराठीत उपलब्ध व्हायला हवीत. पूर्णपणे मराठीत शिक्षण घेण्याचा हक्क त्याला मिळायला हवा. रसायन शास्त्र, भौतिक शास्त्र, जीवशास्त्रांसहीत सर्व शास्त्रांची पु्स्तके त्याला मराठीतून उपलब्ध झाली पाहिजेत. अशी परिस्थिती आज अजिबात नाही. आज अनेक ग्रामीण आणि आदिवासी विद्यार्थी शास्त्राच्या ज्ञानात चमकतात. परंतु इंग्रजी माध्यमाच्या अडसरमुळे मागे पडतात.
            शास्त्रांच्या पुस्तकांप्रमाणेच संगणकाची भाषाही मराठी झाली पाहिजे. आज संगणकाची संपूर्ण भाषा मराठी होण्याची गरज असताना महाराष्ट्रातील संगणक विक्रेत्यांना मराठी फॉन्टस् बद्दल काही सांगता येत नाही. मराठी फॉन्टस हवे असतील तर आपल्याला त्यातील तज्ञांची भेट घ्यावी लागते आणि ते फॉन्टस त्यांच्या सल्याने आपल्या संगणकात अपलोड करून घ्यावे लागतात. विशेषत: ग्रामीण भागात अशा समस्या जास्त प्रमाणात आहेत. अशी दारूण परिस्थिती आजही आपल्या महाराष्ट्रात आहे. या पार्श्वभूमीवर संगणकातील संपूर्ण आज्ञावली व विंडोज सॉफ्टवेअर मराठीत आणणे ही कदाचित आपली कवी कल्पनाच ठरण्याची शक्यता अधिक आहे.
            मराठी भाषा मोठ्या भौगोलिक क्षेत्रात बोलली जाते म्हणून तिला धोका नाही असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरेल. मराठीची व्यावहारीक पिछेहाट कमी प्रमाणात असून शैक्षणिक व ज्ञान क्षेत्रातील पिछेहाट मात्र चिंताजनक आहे हे कबूल करावेच लागेल.
            अशा पध्दतीने भाषा विकसित करायची जबाबदारी कुणा एकाचीच वा काही विशिष्ट संस्थांचीच नसून ही सामुहीक जबाबदारी ठरते. यासाठी आपण सगळ्यांनीच सजग होणे आवश्यक आहे.
         (या ब्लॉगमधील मजकूराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या        
ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

    - डॉ. सुधीर रा. देवरे        
       इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/