सोमवार, १५ जून, २०२०

माणूसपणाच्या आसपास!


-  डॉ. सुधीर रा. देवरे

    आपल्याला झाडांत देव पाहता येतो. म्हणजे झाडांची पूजा करायची नाही तर झाडं लावायची. झाडांचं संगोपन करायचं. निसर्गात देव पाहता येतो. म्हणजे निसर्गचक्रात मानवी ढवळाढवळ करायची नाही. माणसात देव पाहता येतो. म्हणजे माणसाला माणसासारखं वागवायचं. एखाद्या माणसाच्या चरित्रातही देव पाहता येतो. ऐतिहासिक पुरूषात देव दिसू शकतो. संतांच्या कृतीत देव असतो. देवाच्या मुर्तीतच फक्‍त देव असतो असं नाही. मंदिरातच फक्‍त देव असतो असं नाही. देव्हार्‍यातच फक्‍त देव असतो असं नाही. पूजा केल्यानेच फक्‍त देव प्रसन्न होतो असंही नाही. म्हणून नवनवीन देवस्थाने निर्माण होऊ नयेत. रोज नवनवीन स्मारके उभी राहू नयेत. निसर्ग, झाडं, पुस्तकांची कपाटं, ग्रंथालये मंदिरं झाली पाहिजेत.
    रोज मंदिरात जाणार्‍यांना, रोज पूजा-अर्चा करणार्‍यांना, देवाला फुलं अर्पण करणार्‍यांना, मुर्तीला अभिषेक करणार्‍यांना, पारायणे करणार्‍यांना, यज्ञ विधी करणार्‍यांना, कपाळावर गंधटिळा लावणार्‍यांना, सत्संग करणार्‍यांना, चारीधाम करणार्‍यांना वा देवाच्या दानपेटीत पैसे टाकणार्‍या लोकांनाच फक्‍त आपण धार्मिक वा आस्तिक समजतो का? पूजा- क्रिया- विधी करणारे लोक कदाचित आस्तिक असतीलही, पण असं कर्मकांड न करणारे लोकही आस्तिक असतात.
    दररोज भरपूर वेळ खर्च करत देव भजणारे लोक विशिष्ट प्रकारच्या भीतीग्रस्ततेने देवपूजा करतात का? भीतीमुळे कोणी देव भजत असेल तर मनातून भीती पळते का? आस्तिकतेत परमार्थ महत्वाचा. ‘देवा मला सुखी ठेव’, असं म्हणताना इतरांचं काहीही होऊ दे, असा प्रतिध्वनी ऐकू येऊ नये! आपण नेहमी वरवर दिसणारे दृश्य पहात असल्याने आपल्या आस्तिकतेच्या कल्पना संकुचित होतात का? कर्मकांडाच्या जखड्यात अडकलेल्यांना आपण आस्तिक म्हणतो आणि बाकीच्यांना सरसकट नास्तिक ठरवून मोकळं होतो का? संतांच्या आणि देवांच्या चमत्कारात देवत्व असतं का? देवत्व हे विभूतीच्या कृतीतून- आचरणातून दिसावं. एखादा थोर महात्मा त्याच्या कर्माने लोकांचा देव होतो आणि नंतरचे त्याचे भजनी मंडळ त्याच्या देवपणाची जाहिरात करून त्यांची भव्य दुकानं थाटतात.
    देव आहे का? असेल तर कुठं आहे? आपण आस्तिक आहात का नास्तिक? वगैरे प्रश्न अधून मधून कोणी एखादा कोणाला विचारत राहतो.
    माणूस आत्मिक प्रगती करत स्थितप्रज्ञ होत जातो, तेव्हा त्या हाडामांसाच्या माणसात काय बदल होत असतील? त्यावेळी त्याच्या मेंदूपासून हृदयापर्यंत सगळं काही सुरळीत असेल? लोकांतून देवमाणूस होताना माणसाच्या असीम त्यागाची कल्पनाही करवत नाही. प्राणीपणा गुंडाळून देवपणाला सामोरं जाणं साधीसुधी गोष्ट नाही. अहंकार, वासना, लोभ, क्रोध, सत्ता, राजकारण (सूक्ष्म अर्थाने) आदी विकारांसह बौध्दीकता, प्रतिकार क्षमता, विचार, विवेक आदी चांगल्या गोष्टींचाही त्याग म्हणजे दुसरा मृत्यूच. सहजासहजी षड्रीपूंना तिलांजली देत स्थितपज्ञ होणं जमत नाही.
    देहात राहून विदेही होत वैदेही वावरणं हे एखाद्या शतकात कधीतरी कोणालातरी कुठंतरी जमतं. ह्या रोजच्या घटना नसतात. आणि म्हणूनच अशा ऐतिहासिक देवासमोर सर्वसामान्य माणसाचे दोन हात नमस्कारासाठी आपोआप जोडले जातात. दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती’. ज्याला हात जोडले जातात आणि जो हात जोडतो त्या दोघांच्या देहात देवत्व असतंच. देह देवाचं मंदिर होतं.
    एखाद्या माणसातलं देवपण ओळखून त्याला देवपण देणारा पृथ्वीतलावरचा माणूस मनाने तितकाच थोर ठरतो. माणसाचं देवपण ओळखता येणं ही प्रगत माणसाची खूण. पण दिव्यत्वाला नुसतं हात जोडून आपलं काम संपायला नको. देव होता येत नसलं तरी माणूसपणाच्या आसपास पोचायला आपल्याला काय हरकत आहे? तुला सगुण म्हणू का निर्गुण रे असं माणसाला उद्देशूनही म्हणता आलं पाहिजे!
(‘सगुण- निर्गुण’ मटा, दि. 8–4–2020 च्या अंकात प्रकाशित झालेल्या लेखाचा बृहत भाग. लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

© डॉ. सुधीर रा. देवरे
   ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

सोमवार, १ जून, २०२०

सुंदर हे जग!-   डॉ. सुधीर रा. देवरे

          ‘मुळात हे जग सुंदर आहेच. पण असे काही वाईट अनुभवही येतात, की वाटतं, आता आहे त्यापेक्षा हे जग कितीतरी पटीनं नक्कीच सुंदर असू शकेल!’ हे अवतरण माझ्या ‘पंख गळून गेले तरी’ या आत्मकथनातील आहे. लाच, भ्रष्टाचार, गरीबी, लाचारी, हिंसा, जातीभेद, वर्गभेद, लिंगभेद, धर्मभेद, रंगभेद, व्यंगभेद, प्रांतभेद, अहंकार, धार्मिक कलह, दुसर्‍याला कमी लेखणं, टवाळी, निंदा, नालस्ती, शोषण, अवास्तव स्तुती, खुशमस्करी, लांगुलचालन, मत्सर, व्देष, भाषाव्देष, पापाच्या कल्पना, लबाडी, लूट, भेसळ, नफाखोरी, कोणाच्या व्यंगांकडे पाहण्याचा दुषीत दृष्टीकोन आदी गोष्टींतून आपण बाहेर कधी पडायचं?
          दृष्टीकोन बदलला तर, जग नक्कीच सुंदर होईल. आपण दुसर्‍याचा आदर करायला शिकलोत तर? शाब्दिक हिंसा होत राहील तोपर्यंत पाशवी हिंसाही होईल. ‘बळी तो कान पिळी’ ही म्हण ज्या दिवशी नामशेष होईल व विचारांना प्रतिष्ठा मिळेल तो दिवस माणुसकीच्या इतिहासात सुवर्णाक्षरात लिहिला जाईल. 
          उदाहरणार्थ, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही, हे माहीत असूनही आपल्याला आपला खाजगी महामानव हवा असतो. महान होताना त्या विशिष्ट व्यक्‍तीने काय हलाहल पचवले त्याचा अभ्यास नको. ऐतिहासिक कालखंडाच्या पटलावर ज्या ठळक ऐतिहासिक महान व्यक्‍ती आढळतात, त्या सहजपणे संधी मिळून पुढे गेलेल्या नाहीत. त्यांच्या आयुष्यात वेळोवेळी अपमान वाट्याला आलेला असतो. काही वेळा स्वाभिमान बाजूला ठेऊन परिस्थितीशी जुळवून घेत पुढं जाणं स्वत:च्या आणि ‍अखिल मानवाच्या दृष्टीने हिताचं असतं. काही तडजोडी करूनच आयुष्यात ध्येय गाठता येतं.
पण हीच व्यक्‍ती पुढे ऐतिहासिक श्रध्दास्थान बनली, की त्या व्यक्‍तीचं वस्तुनिष्ठ समीक्षण आपल्याला रूचत नाही. ती व्यक्‍ती जन्मताच महान कशी होती, अशा पुराणाच्या आवरणाखाली आख्यायिका तयार होतात. इतिहासापेक्षा दंतकथा मनुष्य प्राण्याला जास्त प्रिय असतात. अशा काल्पनिक दंतकथा रूजवण्याच्या मानसिकतेमुळे वस्तुनिष्ठ चरित्र ऐकताच लोकांच्या भावना दुखावतात. आणि परस्पर असहिष्णुता वाढत राहते.
सांगायचा मुद्दा असा, आज आपण जे थोर लोक पूजतो, ते ऐतिहासिक पुरूष असोत की देवत्व बहाल झालेले थोर महात्मे. त्यांनी अखिल मानव जातीसाठी अनेक हालअपेष्टा, अपमान सहन केलेले असतात. खस्ता खात आजच्या आदर्शवत व्यक्‍तीमत्वापर्यंत पोहचलेले असतात. नामुष्कींचा सामना करत वाटेतले काटे फुले समजून ते यशस्वी होतात. निंदा पचवत स्थितप्रज्ञतेने त्यांनी आत्मीक उन्नती केलेली असते. पण आपण त्यांचे ग्रंथ कधी उघडून वाचून पहात नाही. फक्‍त त्यांचे उत्सव साजरे करतो.
अशा पार्श्वभूमीवर आजचं चिंतन: जो कळप करून रहात नाही, जो वरिष्ठांची मर्जी सांभाळत नाही, आपण भलं आणि आपलं (जगासाठी) काम भलं; अशा आपल्याच तंद्रीत राहणार्‍या माणसाचं हे जग अजूनही नाही. अशा माणसाला माणूसघाना ठरवलं जातं. त्याच्या मदतीला कोणी धाऊन जात नाही. असा माणूस समाजात एकटा पडतो. वाईट माणूस मात्र सर्वत्र तोडांवर का होईना नावाजला जातो.
          आपण मनाला आगळ घालतो, जो चांगला माणूस आहे त्याच्या वाट्याला कोणी जात नाही! पण हे चुकीचं गृहीतक ठरतं. उलट चांगल्या माणसालाच सर्वत्र वेगवेगळ्या अन्यायांना तोंड देत सामोरं जावं लागतं. प्रतिकार नसतो तिथं कोणीही दगड मारतो. जशासतसं वागून पाशवी अंग दाखवर्‍याच्या वाट्याला कोणी जात नाही. अशांना कोणी त्रास देत नाही. ही वस्तुस्थिती आपण बदलू शकतो. सारांश, आताचं जग सुंदर आहेच पण यापेक्षाही हे जग आपल्याला नक्कीच सुंदर बनवता येईल!           
माणसाच्या चांगुलपणामुळंच जग सुरळीत चाललंय. माणूस वाईट नाही. माणसाचे विचार वाईट असू शकतात. माणसांच्या वाईट विचारांकडे कानाडोळा करत आपण पुढं चालू या.
(‘सगुण- निर्गुण’ मटा, दि. 6–5–2020 च्या अंकात प्रकाशित झालेला लेखाचा बृहत भाग. लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

© डॉ. सुधीर रा. देवरे
   ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/