शनिवार, ३० जून, २०१८

वाहनं आणि प्रवास



- डॉ. सुधीर रा. देवरे

      खेड्यापाडयातला पूर्वीचा प्रवास बैलगाड्यांतून होत असे. अगदी लग्नाचे वर्‍हाड सुध्दा या गावातून त्या गावी बैलगाडीने निघायचं. घर ते शेत आणि आजूबाजूच्या चार- पाच मैलांवर असलेल्या खेड्यापाड्यात कामेकाजे जाण्यासाठी पायी चालण्याचा तो काळ होता. याच काळात इकडे कुठे कुठे सायकलीही दिसू लागल्या. त्यावेळी अनेक कर्मचारी रोज वीस- पंचवीस मैलांचा प्रवास आपल्या सायकलींनी करत असत. 30 ते 40 वर्षांपूर्वी या प्रदेशातल्या ग्रामीण भागात क्वचित मोटरसायकली सुध्दा दिसू लागल्या होत्या. जावा आणि राजधूत कंपनीच्या या मोटारसायकलींना ग्रामीण भागात फटफट्या म्हटलं जायचं. पण त्यांचं प्रमाण अतिशय नगन्य असं होतं.
     गावात केवळ एक दोघांकडे फटफट्या दिसायच्या म्हणून हे लोक गावाच्या दृष्टीने खूप श्रीमंत समजले जायचे. बाकी लोक आपला प्रवास आपापल्या मगदूराप्रमाणे करायचे. जिथं पायी जाणं शक्य आहे तिथं पायी जायचं. जिथं बैलगाडीने जाणं शक्य होईल तिथं बैलगाडीने जायचं. सायकल असली तर कोणी सायकलीने एकट्याने प्रवास करायचा. सायकलीवर डबलशीट बसून दोघांनाही प्रवास करता यायचा. ज्यांच्याकडे बैलगाडी नाही, सायकल नाही ते एस टी ने प्रवास करायचे. एस टी सुध्दा सर्वत्र उपलब्‍ध नव्हती. जिथून एसटी उपलब्ध होईल त्या ठिकाणी पायी जाऊन एसटी पकडून लोक गावाला जात. अशा अडचणींमुळे अगदी आवश्यक असलेला प्रवासच त्यावेळचे गावकरी करत असत.
     त्याकाळी गाव तिथं एसटी हा प्रकार नव्हता. प्रवासासाठी बैलगाडी प्रमाणे छकडं हा प्रकारही त्यावेळी पहायला मिळायचा. पण बैलगाडी हे सर्वसाधारण शेतकर्‍यांचं वाहन तर छकडं हे श्रीमंतीचं प्रतीक समजलं जायचं. बैलगाडी ओढायला दोन बैल लागत तर छकडं ओढायला एक घोडा पुरेसा असे. बैलगाडीत दाटीवाटीने सात-आठ लोक सहज प्रवास करू शकत तर छकडं वा टांगा हे (चालवणारा धरून) दोन जणांचं प्रवास करायचं वाहन होतं. छकडं अथवा टांग्याला वर अर्धगोलाकार कामटी आणि कापडाचं छत तयार केलेलं असे. म्हणून ऊन वा पावसापासून टांग्यात थोड्याफार संरक्षणाची सोय होती. मात्र बैलगाडीला कोणतेही छप्पर नव्हते. छप्पराची बैलगाडी अजूनही सहसा कुठे पहायला मिळत नाही. म्हणून बैलगाडीतून प्रवास करताना ऊन, पाऊस, थंडीपासून संरक्षण करता येत नव्हतं. बैलगाड्यातून उघडा वाघडा प्रवास करावा लागायचा. बैलगाडी आज लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. म्हणून बैलगाडी संदर्भातले भाषेतले शब्द, म्हणी आणि वाक्प्रचारही पुढे लुप्त होणार आहेत. उदाहरणार्थ, गाड्याबरोबर नळ्याची यात्रा, जुवाडं, सावळा, जोतं, गेज, साटलं, पांजरी, चकारी, धाव, तुंबडं, आस, आरी, शेल आदी शब्द नागरी माणसाला आजच समजेनासे झाले आहेत.  
     लग्नाचे वर्‍हाड लग्नाच्या गावाला नेण्यासाठी त्याकाळी बैलगाड्या वापरल्या जात असल्या तरी लग्नाचे गाव वीस पंचवीस मैल लांब असले तर वर्‍हाडासाठी ट्रक्टर वा ट्रक भाड्याने केला जात असे. ट्रक्टरच्या ट्रॉलीत वा ट्रकमध्ये लोक दाटीवाटीने उभे राहून लग्नांना हजेरी लावत. वयस्कर माणसं ट्रकच्या मध्यभागी बसायचे.
     त्याकाळी पर्यटनाची कल्पनाही खूप भव्य दिव्य नव्हती. गावातल्या माणसाचे  पर्यटन म्हणजे जवळपासच्या लोकदेवांची जत्रा करत तो थोडाफार भटकून घ्यायचा. (उदाहरणार्थ, बागलाणातला माणूस भाक्षीची जत्रा, सटाण्याची देव मामलेदारची जत्रा, दोधेश्वर, कपालेश्वर, मांगीतुंगी, नामपूर जत्रा अशा आपल्या तालुक्यापुरती मर्यादित ठेवायचा.) जास्तीत जास्त सप्तशृंगी देवीची यात्रा आणि कुलदैवताची भेट झाली की त्याला समाधान मिळत असे. काही लोक अधून मधून पंढरीची वारीही करून येत असत. पंढरीची वारी हे त्यावेळी खूप लांबचं पर्यटन समजलं जायचं. गावातल्या लोकांचे पर्यटन हे पायी, बैलगाडी वा नंतर एसटीने होऊ लागले.
     मध्यंतरीच्या काळात इकडच्या ग्रामीण लोकांना आगगाडीचे (रेल्वेचे) खूप अप्रूप होतं. (इकडे रेल्वेचे दळणवळण नसल्यामुळे हे आकर्षण होतं.) आता स्वत:च्या (फोर व्हीलर) गाड्या जिकडे तिकडे दिसू लागल्या. गावातले अनेक लोक आता देशांतर्गत विमान प्रवासही वरच्यावर करू लागले.
     आज या भागातले अनेक तरूण मुलं परदेशात आहेत याचंही कोणाला विशेष अप्रुप वाटत नाही. कोणीही बोलता बोलता सहज सांगून जातो, परोंदिस आम्ही दिल्लीमा व्हतूत तधळ तठे पाऊस पडना. कालदिस मी मुंबईले व्हतू. रातलेच वनू. अशा पध्दतीने आजचा गावातला माणूस प्रवासातही ग्लोबल झाला आहे.
     (या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

गुरुवार, १४ जून, २०१८

ग्रामीण आणि इतर वाद्य




- डॉ. सुधीर रा. देवरे

     तीस चाळीस वर्षांपूर्वी गावात बँड हा प्रकार फोफावला नव्हता. बँड अस्तित्वात असला तरी तो फक्‍त जिल्ह्याच्या ठिकाणी आणि तालुक्याच्या गावी पोचला होता. तरीही अतिश्रीमंत घरातल्या लग्नात दूरवरून गावात बँड बोलवला जायचा. म्हणून अशा बँड ‍लावल्या गेलेल्या लग्नाची मजा पाहण्या- ऐकण्यासाठी आख्‍खा गाव जमा व्हायचा. बँडची नवलाई आख्या गावाला भुरळ घालायची.
     अन्यथा गावात गुरवचा वाजा वा सांबळचा वाजाच लग्नात वाजवले जायचे. आता तर सगळीकडे डीजेचा आवाज धुमाकूळ घालू लागला. तेव्हा सांबळाचा वाजा गावकुसात लोकप्रिय होता. सांबळाच्या वाजावर कोणालाही कोणत्याही चालीवर सहज नाचता येत असे. सांबळवाल्यांकडे लोकगीतांच्या शेकडो चाली असायच्या. खेडोपाडीच्या भोवाड्यात या सर्व चाली उपयोजित झाल्या आहेत. कुठे कुठे आजही होत आहेत. लग्नातल्या फुलकं आणि गाव मिरवणुकीत, रात्री बत्तीच्या उजेडात सांबळाच्या चालीवर ग्रामीण लोक गावभर गल्लींतून नाचत असत. सारखं नाचत असूनही नाचाची चाल बदलली तरी नाचणार्‍यांना विश्रांती मिळायची.
     पोळ्याला बैलांच्या मिरवणुकीला, गणपती विसर्जनाला, कानबाई मिरवणुकीसाठी, भोवाड्यासाठी सांबळ – पिंगाण्यांचा वाजा लावला जाई. पोळ्याच्या बैलांना मिरवण्यासाठी ढोल ताश्या पोटझोडेचा वाजाही लावला जाई. चिरा बसवणे, काठीकवाडी मिरवणे, खंडोबाचे आडीजागरण अशा कार्यक्रमांना डफ वाजवला जायचा.  
     लग्न लागण्याच्या आधल्या रात्री वराला स्त्रीचे कपडे नेसवून गावभर जी मिरवणूक काढली जाते तिला फुलकं काढणं असं म्हणतात. लग्न लाऊन आल्यानंतर रात्री गावभर नवरदेव- नवरीला लोकांच्या खांद्यांवर बसवून बत्तीच्या उजेडात गावभर नाचवलं जातं. त्याला लग्नाची गाव मिरवणूक म्हणतात. या मिरवणुका पिंगाणी- सांबळांच्या वाजावर नाचवल्या जायच्या. गुरवाचा वाजा तर आज ऐतिहासिक होण्याच्या मार्गावर आहे. याचे कारण गुरवाच्या वाज्यात काही प्रमाणात अभिजात गायकी असते. उडत्या चालीवरची गाणी नसतात. गायनात कुठलाही भडकपणा नसतो. या वाद्यावर कोणाला धांगडधिंगा करून नाचता येणं दुरच पण पायाचा ठेकाही धरता येत नाही.
     आज आपण मांडवचा दिवस आणि लग्नाचा दिवस बँडच्या- डिजेच्या घणघणाटाच्या ध्वनी पदुषणात झाकाळून टाकतो. लोकपरंपरेपेक्षा प्रदर्शनाचा उत्साह आता वाद्यांच्या दणदणाटात उतू जातो. दिखाऊपणासाठी आधुनिक(?) वाद्यांवर भरमसाठ पैसा खर्च होतो. लग्नात खोट्या प्रतिष्ठेसाठी अनावश्यक गर्दी जमवली जाते. मानपान, हुंडा, सोनंनाणं, खानपान हे प्रकार कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस प्रतिष्ठेचे होत वाढत चाललेत. आणि अशी तथाकथित प्रतिष्ठा मिरवण्यासाठी कार्यक्रमात आवाज करणारा बँड- बेंजो हवाच.
     ढोल (ढोलकं), ढोलकी, पोटझोडे, नगारा, ताशा (धतड पतड), रणशिंग (शिंगडं), पावरी, खंजिरी, डफ, तुणतुणे, टिंगरी (किंगरी), सारंगी, घांगळी, थाळी, सांबळ (सामळ- धुमडं), पिंगाण्या, मृदंग, गुरवाची पिंगाणी, पोवा (बासरी), बाजाची पेटी, चिपळ्या, झांजर्‍या (टाळ), तंबोरा, वीणा, एकतारी, नंदीबैलवाल्याचं गुबु गुबु आदी वाद्य आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या वाद्यात काही आदिवासी वाद्य आहेत तर काही लोकवाद्य. बासरीचे भारतभर वेगवेगळे प्रकार अजूनही अस्तित्वात आहेत. तबला सोडला तर सगळीच वाद्य आज दुर्मीळ झालेली दिसतात. डोंगर्‍या देवाच्या उत्सवात पावरी हे प्रमुख वाद्य असतं. तर खंडोबाच्या मिरवणुकीत खंजिरी, तुणतुणे, डफ ही वाद्य असतात. दुर्गम भागातील आदिवासीत ही वाद्य अजूनही टिकून आहेत, ही जमेची बाजू असली तरी ही वाद्य गावागावातून आजच लुप्त झालेली दिसतात, हे भयावह आहे. 
     (या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/