रविवार, ३० एप्रिल, २०१७

तलाक


डॉ. सुधीर रा. देवरे
      ही पोस्ट केवळ उत्सुकता आणि जाणून घ्यावे या हेतूने लिहीत आहे. म्हणून या पोस्टचा अर्थ कोणी धार्मिक वा राजकीय या अंगाने घेऊन गैरसमज करून घेऊ नये ही विनंती. मी या विषयाकडे सामाजिक प्रबोधन म्हणून पाहतो. सगळ्याच धर्मातील अनिष्ट प्रथांना विरोध या विचारधारेतून झालेले हे लिखाण आहे:
      परदेशात राहणार्‍या माझ्या एका उच्चशिक्षित मुस्लीम मित्राला विचारलं, आजच्या काळात तोंडी तीन तलाक विषयी तुमचं मत काय आहे? मित्र म्हणाला, आपण धार्मिक बाबींवर न बोललेलं बरं. आपण आरएसएस विचारांचे आहात का? त्याचे उत्तर ऐकून मी चपापलो. एखाद्या प्रश्नावर आपण भूमिका घेतली तर आपल्याला कोणत्यातरी विचारधारेत बळजबरी ढकलले जाते. म्हणून भूमिका घेताना आपण प्रतिगामी ठरवले जाणार नाहीत ना याची काळजी कशी घ्यायची? (तलाकच्या बाजूने बोललं तर आपण पुरोगामी ठरू का?) असं काही ठरवलं जाण्यापेक्षा कितीही गंभीर विषयांवर भूमिका न घेणंच चांगलं अशा पध्दतीने तटस्थ राहण्याचा हा काळ आहे. (तलाकला विरोध करणारे फक्‍त आरएसएसचे लोक असतील तर आजचे मुस्लीम विचारवंत, सर्व मुस्लीम महिला आणि न्यायालये आदी आरएसएसच्या विचारधारेतले समजावेत का? आरएसएस आपल्या अनिष्ट प्रथांचे उदात्तीकरण करत असेल तर तलाकच्या विरोधात बोलायला या संघटनेलाही नैतिक अधिकार नाही.) आजच्या काळात तोंडी तलाक हा प्रश्न धार्मिक वा राजकीय कसा होऊ शकतो? असलाच तर हा सामाजिक प्रश्न आहे.
      1985 ला राजीव गांधी पंतप्रधान असताना शहाबानो तलाक प्रकरणाचा निकाल लागला आणि त्या महिलेला नवर्‍याने पोटगी द्यावी असा कोर्टाने आदेश दिला. या वेळीच तोंडी तलाक बेकायदेशीर ठरवला गेला होता. मात्र काही कडव्या धर्मांधळ्या लोकांकडून राजीव गांधीची दिशाभूल केली गेली. म्हणून संसदेत कायदा होऊन तोंडी तलाकला कायदेशीर पाठिंबा मिळाला आणि तलाक पीडित महिलेला ‍आर्थिक मदतीसाठी कायम वफ्फ बोर्डाकडे हात पसरावे लागले.
      याच दरम्यान निकाह नावाचा हिंदी सिनेमा आला. (खरं तर या चित्रपटाचे नाव तलाक असायला हवं होतं.) चित्रपट ‍अभिजात म्हणता येणार नसला तरी या चित्रपटाने तलाक पीडित महिला कशी उध्वस्त होते, यावर छान भाष्य करून तात्कालीन एका पिढीचे प्रबोधन केले होते. सलमा आगा आणि गुलाम अली यांनी गायलेल्या गजला अप्रतिम. चित्रपटात सलमा आगा यांनीच काम केले आहे.
      अलिकडेच एका टीव्ही वाहिनीने (इंडिया टीव्ही) स्टींग ऑपरेशन करून तलाकला प्रोत्साहन देणार्‍या काही धार्मिक मुल्ला- मौलवींना उघडे पाडले. चुकून तलाक दिला गेला म्हणून त्याच महिलेशी निकाह करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल असं या धर्मगुरूंना विचारण्यात आलं. हलाला- हमबिस्तर होण्यासाठी ते स्वत: तयार झाले. त्यासाठी एक लाख रूपये सुध्दा मागण्यात आले. ही हमबिस्तरची बात कुणाला (आणि त्यांच्या घरी तर) अजिबात कळता कामा नये हे ही त्यांनी सांगितले. कारण हे लोक बालबच्चेवाले (स्वत:चे तरूण मुलं असलेले) होते म्हणे. म्हणजे त्यांच्या इज्जतीचा पंचनामा होणार होता. हलाल- हमबिस्तर होणे ही बाब धार्मिक असेल तर त्यासाठी लपवाछपवी का? धार्मिक पुण्य कमवण्याचे काम असेल तर या लोकांनी (धर्मासाठी) हे कृत्य उघडपणे प्रचार करून करायला हवे. अशा कामांसाठी वरून एक लाख रूपये लाच घ्यायला धर्माने सांगितलं का? ज्याअर्थी या गोष्टी लपून छपून केल्या जातात त्याअर्थी धर्माच्या नावावर चाललेल्या या वाईट प्रथा आहेत हे मुल्लाही अप्रत्यक्षपणे आपल्या वागण्याने कबूल करतात.
      सर्वच धर्मात वाईट प्रथा होत्या. अजूनही आहेत. काही वाईट प्रथा काळाची मागणी म्हणून बंद झाल्या. धर्माचा ठेका घेतलेले लोक इतके सनातनी असतात की ते आपल्या अनिष्ट प्रथा सहजासहजी सोडायला तयार नसतात. म्हणूनच धर्म संस्थापकाला सुध्दा सुळावर जावे लागते.
      माझे अनेक मुस्लीम मित्र आहेत. पण याबाबतीत त्यांना सखोल माहिती नाही. मी कुराण वाचले. मराठी अनुवाद वाचला. त्यात मला तलाक संबंधी काही वाचायला मिळालं नाही. कदाचित अनुवादातून तो भाग सुटून गेला असावा. (माझे अज्ञान म्हणून इथे मी काही प्रश्न उपस्थित करतो. माझ्यासहीत जे जे कोणी याबाबतीत अज्ञानी आहेत त्यांचे प्रबोधन व्हावे या हेतूने.)
      शरियत हा कुराणचा भाग आहे का स्वतंत्र? तोंडी तलाक नेमक्या कोणत्या संदर्भात आहे? कोणकोणत्या कारणांनी दिला जातो? ग्रंथात तलाकचे गौरवीकरण केले असेल तर त्यासाठी नेमके कोणते युक्‍तीवाद केले गेलेत? तलाक त्या विशिष्ट काळासाठी कालाय म्हणून योग्य होता की तो सार्वकालिक (आजही) योग्य आहे? तोंडी तलाक हा भाग प्रक्षिप्त असावा का? हलाला हे काय आहे? त्याच नवर्‍याशी पुनर्विवाहासाठी दुसर्‍याशी तात्पुरता निकाह लावून हमबिस्तर होण्यामागे नेमके काय तत्वज्ञान आहे?
      हे सर्व प्रश्न जाणकारांना विचारण्यासाठी उपस्थित केले आहेत. ज्या ज्या कोणाला याची माहिती असेल त्यांनी सामाजिक प्रबोधनासाठी इथे लिहावे ही विनंती.
      (या ब्लॉगचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

शुक्रवार, १४ एप्रिल, २०१७

उधई माले गिळी टाकई!...

- डॉ. सुधीर रा. देवरे

      1993 ला ओसरीच्या एका भिंतीला प्लायवूडचे शेल्फ तयार करून घेतले होते. मी पुस्तके विकत घेतो आणि वर्गणी भरून जी नियतकालिके मागवतो ती या केसमध्ये ठेवत होतो. हया पुस्तकांमध्ये अनेक दुर्मिळ पुस्तक होती की ते आता विकत घ्यायच ठरवल तरी मिळणार नाहीत. संदर्भासाठी जे पुस्तक लागतं ते काढून काम झाल्यावर पुन्हा जागेवर ठेऊन द्यायच असा परिपाठ. पुस्तक केव्हाही लागतं म्हणून चाळवाचाळव नेहमी होत होती.
      असंच एका दिवशी मला कुठलतरी पुस्तक हवं होतं म्हणून काढायला गेलो तर एका पुस्तकाला उधई लागलेली दिसली. घाबरून सर्व पुस्तके लगेच बाहेर काढली तर काही पुस्तकांना आणि संग्रही असलेल्या काही नियतकलिकांनाही उधई लागलेली दिसली. ताबडतोब मी तिथली सर्व पुस्तके काढून गच्चीवर वाळत घातली.
      ही उधई कुठून आली असेल म्हणून विचार करू लागलो. तिचा नायनाट कसा करता येईल या दिशेनेही विचार करत बसलो. वेळ वाया न घालवता उधईवरचे औषध आणले. ते शेल्फमध्ये टाकले. पुस्तकांनाही पावडर चोळून पुन्हा ती पुस्तके शोकेसमध्ये ठेवली.
      पंधरा दिवसांनी मी सेमिनारसाठी म्हैसूरला गेलो (जानेवारी 2003). तिथे पंधरा दिवस मुक्काम होता. तिकडून आलो आणि पुस्तके चाळून पाहिली तर पुस्तकांना पुन्हा उधई लागलेली होती. आता मात्र पुस्तकाचे नुकसान भरून निघणारे नव्हते. र्ध्यांपेक्षा अधिक पुस्तके उधईने खाऊन टाकली होती, ती वाचण्यासारखी राहिली नव्हती. पहिल्याच अनुभवातून शहाणा होत मी पुस्तकांना तिथून हलवायला हव होत. पण उधईवरच्या पावडरीवर विसंबून माझी चूक झाली होती. पुस्तकांसाठी आता मी ते शोकेस वापरत नाही पण माझ्या पुस्तकांचे जे नुकसान झाल ते कधीच भरून निघणारं नव्हतं. शोकेसच्या मागच्या बाजूच्या भिंतीला पावसाळ्यात ओलावा येतो. त्या ओलाव्यातून आणि बारीक भेगांतून उधईने शोकेसमध्ये प्रवेश केला होता. प्लायवुडच्या शोकेसची मागची बाजूही उधईने खाऊन टाकलेली होती.
      पुस्तक हरवायच दु: पुस्तकं वाचणार्यालाच सांगता येईल. इथं तर माझे सहा सात हजार पुस्तके उधई खावून गेली होती. (2003 मधले सहा सात हजार). बरीचशी पुस्तकं दुर्मिळ असल्याने आता ती बाहेर उपलब्धही होणार नाहीत. उरलेली पुस्तक केसमध्ये ठेवायची नाहीत असं पक्क ठरवलं.
      पुस्तक वाचून वेडे गबाळे लोकही शहाणे होऊन जातात. काही लोक विव्दान होऊन जातात. पुस्तकांचे वाचन करणारा माणूस आपल्या घरी बसून संपूर्ण जगाचा प्रवास करून येतो. मनाने आणि ज्ञानाने श्रीमंत होऊन जातो. जगातल्या अनेक अदृश्य घटना वाचकाला डोळ्यापुढे दिसू लागतात. पुस्तक वाचण्याऐवजी जो किडा त्याला खाऊन टाकतो त्या किड्यातही खरं तर परिवर्तन व्हायला हव. आक्खं पुस्तक खाऊन जो किडा ते पचवूनही टाकतो त्याची पचनशक्‍ती किती जबरदस्त असेल! ज्ञान पचवणं साधी सोपी गोष्ट नाही! तरीही हा किडा, किडाच का असतो कायम? किड्यात उत्क्रांती होत नाही. किडा काही माणूस हो नाही. पुस्तक खाल्लेले किडे म्हणून प्रचंड हिंस्त्र होत मी त्यांना मारून टाकल. त्यांचा नायनाट करण्याचा प्रयत्न केला. उधईचा आख्या जगातून नायनाट होईल अस औषध कधी तयार होईल, या दिशेनेही माझ्या विचारांनी झेप घेतली.
      पहिल्या अनुभवातून बोध घेत शहाणा होऊन मी पुस्तके तिथून हलवल असत तर माझ एवढ नुकसान झाल नसत. पण पहिल्याच अनुभवातून शिकेल त्याला माणूस म्हणता येईल का? या सगळ्याच लांबलचक चिंतनातून उधईवर मला कविता झाली, तीही माझ्या बोलीभाषेतून- अहिराणीतून. उधई हा शब्दच मुळी अहिराणी शब्द आहे. उधईला प्रमाणभाषे वाळवी म्हणतात.:

येवढी येवढी उधई
धक्का लागताच फुटीसन
पानी व्हयी जाई...
तरीबी डोळास्नी पापनी लवताच
शंभर पिढीस्ना बुकं
घटकात खाई जाई...
समाळ !!!
मी ते चालता बोलता
खेळता कुदता
लिहिता वाचता
वाचेल जगेल
सपनात पाही जुई...
- उधई बागे बागे कुरतडी
मालेबी येक दिवस
सहज गिळी टाकई.!...

      (1 ऑक्टोबर 2016 ला मुंबईच्या ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या सहज उडत राहिलो या पुस्तकातून साभार. या ब्लॉगचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/