शनिवार, ३१ डिसेंबर, २०१६

गांझोल्यांचा पोळा





 - डॉ. सुधीर रा. देवरे

            मागच्या दारातून पुढच्या दारी येण्यासाठी एक बोळ होता. ओसरीत पाव्हणे रावळे असले तर मागच्या दाराने निघून पुढच्या दारी येता येत असे. ओसरीत आण्णा असले तर खेळायला जाण्यासाठी मागच्या दाराने मी हळूच निघून जात असे. ह्या बोळातून तसे खूप लोक वापराचे. विशेषत: स्त्रिया. बोळाच्या दोन्ही बाजूच्या भिंती मातीच्या रद्दयाच्या म्हणून त्या भिंतीना मोठमोठे नळे आणि भगदाड पडलेले होते.
      अशाच एका नळ्यात गाझोंल्यांचा (गांधील माश्यांचा) पोळा तयार झाला होता. हा नळा मोठ्या माणसांच्या डोक्याइतक्या उंचीवर होता. होता होता या गांझोल्यांचा पोळा खूपच वाढला. बोळातून वापरणार्‍यांना गांझोल्यांनी नको नको करून सोडले होते. कोणाच्या हाताला माशी चावायची तर कोणाच्या मानेला. कोणाच्या कानाला चावत असे तर कोणाच्या ओठाला. तिकडून वापरणार्‍यांची संख्याही कमी होऊन गेली. लोक फिरून फारून लांबच्या रस्त्याने वापरायला लागलेत.
      मी गोट्या गोट्या खेळण्यासाठी बोळातूनच हळूच सटकून जायचो. एकदा मलाही गांझोल्यांनी मानेवर डंख मारला. त्या डंखामुळे मी त्या दिवसापासून गांधीलमाश्यांच्या मागे लागून गेलो. त्यांना तिथून हुसकावून लावण्यासाठी येताजाता त्या नळ्याला मी दगड मारत रहायचो. एकदा शेनच मारून फेकले. पण त्या तिथून काही जात नव्हत्या. थोड्या उठायच्या. इकडे तिकडे गोल गोल उडत रहायच्या आणि पुन्हा नळ्यात येऊन बसायच्या.
      एकदा मला एक युक्‍ती सुचली. चिखलाचा गोळा तयार करून नळा हळूच बाहेरून लिंपून देऊ असे मला सुचले. मी ही युक्‍ती लगेच अमलात आणली. दुपारची वेळ होती. आजूबाजूला कोणी नव्हतं. मी चिखलाचा गोळा तयार करून नळ्याजवळ गेलो. हळूच चिखलाचा गोळा नळ्यात दाबायला लागलो. पण नळा माझ्या उंचीपेक्षा वर असल्याने माझा हात नीट पुरला नाही. अर्ध्या नळ्यापर्यंत चिखल गेला आणि वरचा अर्धा नळा उघडाच राहिला.
       काय होतंय हे कळायच्या आत सर्व गांधीलमाश्या घोंघावत झपकन बाहेर निघाल्या आणि माझ्या संपूर्ण तोंडावर येऊन बसून कडाकड चावू लागल्या. मी जोरजोरात ओरडत होतो. दोन्ही हातांनी तोंडावरच्या गांझोल्या काढून खाली फेकायला लागलो. म्हणून हातांनाही त्यांनी चावले. कोणीच मदतीला आलं नाही. दुपारची वेळ असल्याने जवळपास कोणी नव्हत. चावून चावून केव्हातरी त्या थकून उडून गेल्या. संपूर्ण तोंडाची खूप आग व्हायला लागली. तसाच धडपडत मागच्या दाराने घरी गेलो. आरश्यात तोंड पाहिल तर मी मलाच ओळखू येत नव्हतो. तोंड सुजून फुगून लाल झालं होतं. मी कोणाला दिसणार नाही असं कपड्यांच्या बंगळीवर येऊन झोपून घेतलं. मी असा का झोपलो म्हणून आईने पाहिलं. माझं सुजलेलं तोंड पाहून ती ही घाबरली. गांझोल्यांनी चावलं म्हणून आईने माठाखालचा गाळ काढून माझ्या तोंडाला लावला. तेव्हा कुठे थोडासा थंडावा वाटला. पण तोपर्यंत तोंडातून गरम वाफा बाहेर येत आहेत असं मला वाटत होतं. तीन चार दिवस शाळा बुडवली. घरीच राहिलो. चारपाच दिवसात सुज थोडी कमी होत होत उतरली.
      आता मी गांझोल्यांचा काटा काढण्यासाठी वेगळी युक्‍ती काढली होती. गोट्या गोट्या खेळण्यात मी तरबेज होतोच. गपकन नेम धरून ढाई मारून देत होतो. म्हणून माझ्याजवळ भरपूर गोट्या साचल्या होत्या. मी सर्व मित्रांना सांगितलं, जो इथल्या जितक्या गांझोल्या मारेल त्याला मी तेवढ्या गोट्या देईन. लगेच या घोषणेचा परिणाम झाला. पुढच्या दाराच्या गटाराजवळ माशा एकेक करत पाणी प्यायला यायच्या. ज्या मुलांची पोळ्याजवळ जायची हिमंत होत नव्हती, ते गटारीजवळ माशी दिसली की मारायचे आणि माझ्याकडून गोटी घ्यायचे. तेव्हापासून चारपाच दिवसातच दहा बारा माशा मित्रांनी मारल्या होत्या.
      हे माझे गांझोल्या मारण्याचे फर्मान मित्रांकडे जिकडे तिकडे होऊन गेलं होतं. हे दुसरी गल्लीतल्या कैलासच्या कानावर गेलं. आणि तो आमच्या गल्लीत आला. बोळात जाऊन तो पोळाही पाहून आला. अणि मग मला म्हणाला, मी सगळा पोळा काढी टाका ते तू माले काय दिशी बोल?
मी म्हटलं, वीस गोट्या देईल. तो म्हणाला, पंचवीस देशील का बोल? मी म्हणालो, हो. पण तो नळाही चिखलाने तुलाच बुजवून द्यावा लागेल. तो म्हणाला, हा चाल माले कबूल शे. मी थोड्या वेळात येतो असे सांगून तो निघून गेला. आम्ही गोट्या गोट्या खेळायला लागलोत. तेवढ्यात तिकडून कैल्या लगेच आला. चंद्रयाच्या फाटीला दोन तीन फडके बांधून त्यावर रॉकेल ओतून ते तो हातात घेऊन आला होता. दुसर्‍या हातात काडीपेटी होती. त्याच्या खांद्यावर फाटका टवेल होता. त्याने तो टेंभा आमच्या समोर पेटवला. तोंडावर टॉवेल टाकून घेतला आणि गेला बोळातील नळ्याजवळ. आम्ही दुरून गमंत पहात होतो. त्याने टेंभा नळ्यावर धरला आणि चर चर असा आवाज करत पोळा जळायला लागला. गांझोल्या पेटून जळत जळत खाली पडायला लागल्या. काही उडून गेल्या. कैलासने सर्व नळा टेंभ्याने शेकून काढला. खाली अर्धवट जळालेल्या आणि अर्ध्याअधिक जळून मरून पडलेल्या गांझोल्यांचा असा गंज पडला होता. हे काम आटपून कैलासने गटारमधलाच गाळ काढून त्याने तो मातीत कालवला आणि त्या चिखलाने नळा बुंजून दिला. इतके सारे त्याने एकट्याने करूनही त्याला एकही माशी चावली नाही हे पाहून मला आश्चर्य वाटलं.
      त्याला मी पंचवीस गोट्या लगेच मोजून दिल्या. आता तिथे गांझोल्यांचा पोळा नाही, असं ज्याला ज्याला कळलं तो तो त्या बोळाने पुन्हा वापरायला लागला.
      आजच्या दहशतवादी बातम्या ऐकल्या की मला तो लहानपणातला गांझोल्यांचा पोळा आठवतो. तो पोळा म्हणजे आजचा दहशतवाद. तेव्हा आमच्या गावाला ग्रामपंचायत होती. पण हा पोळा पंचायतीने काढला नाही. त्यांनी काढावा असा विचारही आमच्या मनात आला नाही. आम्ही तसा अर्ज दिला नाही. किंबहूना अस काम ग्रामपंचायतीच असत, अस माझ्या वयाएवढ्या मुलालाच काय पण मोठ्या माणसांनाही माहीत नव्हत. मी तो स्वयंस्फुर्तीने काढला. तसा आजचा दहशतवाद निपटून काढण्यासाठी सरकारवर आपण किती अवलंबून रहायच? आपल्याने जेवढ जिथे जिथे होईल तसा आपण दहशतवाद निपटण्याचा प्रयत्न करून पाहू. मग सरकारच कामही थोडेस सोप होऊन जाईल.
            (या ब्लॉगचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

बुधवार, १४ डिसेंबर, २०१६

सत्ता सर्वत्र पुज्यते




-डॉ. सुधीर रा. देवरे

      विव्दान सर्वत्र पुज्यते! असा सुविचार आपल्याला सर्वत्र वाचून-ऐकून बालपणापासून पाठ असतो. संस्कृतीचे गोडवे गातानाही हे ब्रीद नेहमी अधोरेखीत केले जाते. मात्र वास्तवात सर्वत्र विव्दान पुजला जात नाही हे सत्य आहे. निदान याचा प्रत्यय तुलनेने तरी निदर्शनास येत असतो. सत्ता सर्वत्र पुज्यते! हा अनुभव मात्र सर्वत्र सर्वदूर दिसून येईल. बालपणाच्या पोपटपणातून आपण जसजसे वयाने, अनुभवांनी, विचारांनी आणि ज्ञानाने मोठे होत जातो तसतसे आपल्याला वास्तवाचे भया रूप दिसू लागते आणि आपण सुविचारांच्या भोळ्या भाबड्या जगातून खडबडून जागे होतो. सर्वत्र सत्ताच पुजली जाते हे कटू सत्य आहे. शिकून विव्दान झालेल्या माणसाला समाजात स्थान नाही. तो आपल्या पोटापाण्यासाठी कोणती नोकरी वा कोणता व्यवसाय करतो याला जास्त महत्व दिले जाते. मग त्या व्यवसायाचा आणि प्रत्यक्ष त्याच्या सामाजिक भूमिकेचा ती व्यक्‍ती जाणीवपूर्वक काहीही संबंध येऊ देत नसली तरी समाज नेहमी खुर्चीला शरण जात असतो.
            एखादा युवक आयएएस, आयपीएस वा एमपीएससी असला तरी समाजात त्याचा सर्वत्र सत्कार केला जाईल. समाजात त्याच्याबद्दल आदर निर्माण होतो. तो सन्माननिय ठरत असतो. मग तो युवक कितीही आत्मकेंद्रीत आणि पोटार्थी असो. सामाजिक बांधिलकीशी त्याला काहीही देणेघेणे नसो वा तो आपल्या नोकरीत भ्रष्ट कामे करीत असो. या उलट एखादा युवक ज्ञानाने उच्चविद्याविभूषित होऊन प्रपंचासाठी तृतीय-चतुर्थ श्रेणीतील नोकरी वा अन्य व्यवसाय पत्करून सामाजिक उत्थापनासाठी काही कार्य करीत असेल, समाजाला नवीन दृष्टीको देत असेल, प्रबोधन करीत असेल तर अशा माणसाला समाजात - या व्यवस्थेत मानाचे स्थान मिळत नाही. याचे कारण त्याच्याकडे कोणत्याही प्रकारची तथाकथित सत्ता नसते. विचारवंताला आपल्या व्यवस्थेत स्थान नाहीच. उलट विचारवंत जाणीवपूर्वक अलक्षित-दुर्लक्षित केले जातात.
            एखाद्या संशोधकाने वीस-पंचवीस वर्ष सखोल अभ्यास करून एखादे सैध्दांतिक मत मांडले वा संशोधनात्मक प्रबंध लिहिला तर वृत्तपत्रात पाचव्या-सहाव्या पानावर त्यांची पाच- सहा ओळीत संक्षिप्त अशी काहीतरी बातमी छापून दखल घेतल्यासारखे दाखवले जाते. अशी बातमी दूरचित्रवाणींच्या वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित होणारच नाही, झालीच तर ती कोणाला कळणार नाही, इतक्या संक्षेपाने होईल. मात्र-
            एखाद्या दुय्यम-तिय्यम राजकीय पुढार्‍याने एखाद्या प्रचार सभेत एखादे भडक वा विवादास्पद विधान केले तर वृत्तपत्रे ती बातमी पाहिल्या पानावर अर्धेपान देऊन छापून अशा शिवराळपणाला अनाठायी प्रसिध्दी देतील. अनेक टीव्ही चॅनल्सवर तावातावाने अशा उद्‍गारावर चर्चा होतील.
            राजकीय पुढार्‍यांनी साहित्य संमेलनांपासून - संमेलनांच्या मंचापासून दूर रहावे असे दुर्गा भागवतानी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ठणकावून सांगितले नसते तर आज साहित्य संमेलनातील व्यासपीठे साहित्यिकांपेक्षा राजकीय नेत्यांनीच व्यापलेल दिस असत. यदाकदाचित राजकीय नेत्यांतले किंश्चिंत साहित्यिक लोकच अध्यक्ष म्हणून निवडून आले असते. नाहीतरी आजही अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा अध्यक्ष बर्‍याचदा दुय्यम दर्जाचा निवडून येतो. म्हणून काही व्रतस्थ आणि तत्वाधिष्ठित साहित्यिक अशा अध्यक्ष पदाच्या भानगडीत पडत नाहीत.
            गावागावात होणार्‍या इतर छोट्या मोठ्या साहित्य संमेलनात राजकीय नेत्यांचीच प्रामुख्याने व्यासपीठांवर हजेरी लागल्याचे दिसते. मान्यवर साहित्यिक श्रोत्यांमध्ये बसलेले दिसतात तर स्थानिक राजकीय सत्ताधारी, लोकप्रतिनिधी, थातूरमातूर संस्थेचे अध्यक्ष आणि देणगी देणारे दानशूर यांनी साहित्य संमेलनाचा मंच व्यापलेला दिसतो.
            अशा दुय्यम -तिय्यम राजकीय पुढार्‍यांची उपस्थिती सदर कार्यक्रमाला नसली तर सत्तेतली दुसरी फळी व्यासपीठावर बसवून व्यासपीठाला तथाकथित वजन आणण्याचा प्रयत्न केला जातो. या दुसर्‍या फळीत प्रशासकीय सवेतील ‍अधिकारी असतात. म्हणजे दुय्यम का होईना व्यासपीठावर प्रशासकीय सत्ताकेंद्राचा समावेश होतो. सारांश, ज्यांच्याकडे सत्ता आहे वा नावाबरोबर सत्ताकेंद्राचा उल्लेख करता येईल अशी खुर्ची आहे, अशांना अनाठायी महत्व प्राप्त होऊन कलाक्षेत्रातल्या वा साहित्य क्षेत्रातील व्यासपीठांवर त्यांचा उदोउदो केला जातो. अशा सत्ताकेंद्राचा फायदा संमेलने आयोजित करणार्‍या आयोजकांना वेगळ्या प्रकारे करून घ्यायचा असतो आणि तो करून घेण्यासाठी ते मागेपुढे पहात नाहीत. अशा फायद्यासाठीच आपल्याला निमंत्रित करण्यात आले होते, म्हणून आयोजकांचे काम करून देणे आपले कर्तव्यच आहे, अशा समजातून सत्ताकेंद्रही त्यांना अधिकारबाह्य सहकार्य करतात. थोडक्यात, हे जग दिल्याघेतल्याचे आहे. एकतर्फी इथे काही दिले जात नाही. आपण हे दिले तर तिकडून काय मिळेल यावर देणार्‍याचा डोळा असतोच. म्हणून काही घेतांना आपल्याला कोणती किंमत मोजावी लागेल याचे भान साहित्यिकांनी- कलावंतांनी- विचारवंतांनी ठेवायचे असते.
            सारांश, आज विद्वान पुजला जात नसून सर्वत्र सत्ता पुजली जाते हे सत्य पावलोपावली अधोरेखित होत राहते.
            (सहज उडत राहिलो या पुस्तकातून साभार. या ब्लॉगचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

सोमवार, ५ डिसेंबर, २०१६

कॅशलेस



देशभक्‍ताची व्याख्या या ब्लॉगचा ताजा कलम:

- डॉ. सुधीर रा. देवरे

            1975-77 च्या आसपासचा काळ. तेव्हाही माझ्या लहानपणी आमचं गाव बर्‍यापैकी कॅशलेस होतं. दुकानात कोणाला काही घ्यायला जायचं असलं की घरातलं धान्य- बाजरी, गहू, नागली, हरभरा, मका असं दुकानात घेऊन जायचं. दुकानदार तो त्याच्या मापाने मोजायचा. माप भरून भरपूर धान्य खाली पडू द्यायचा. आणि त्याच्या हिशोबाने सांगायचा, इतके इतके पैसे झाले. काय देऊ? मग रोज लागणार्‍या जिनसा गुळ, दाळ, चहा, साखर, तेल असं थोडं थोडं खरेदी करायचं. हिशोब जास्त व्हायला लागला तर काही वस्तू दुकानदाराला परत करून घरी यायचं.
            शेतात सालदार ठरवायचा तोही कॅशलेस. वर्षाचे दोन पोते बाजरी, दोन पोते गहू, शेतात रहायला झ्याप, आखाजी दिवाळीला घरादारासह सगळ्यांना कपडेलत्ते. शेतीसाठी अवजारं तयार करून देणार्‍या सुतारालाही वर्षभराचे धान्य ठरवलं जायचं. याच पध्दतीने लोहार, शिंपी, न्हावी अशा बारा बलुतेदारांना धान्य दिलं जायचं. मागायला येणार्‍या भिक्षुकांनाही धान्यच दिलं जायचं.
                        चावडी जवळ काही कोकणा बाया बोरं, करवंदं, शिताफळं, आवळा अशी फळं ‍ विकायला बसाचची. ही फळं कांद्यांच्या बदल्यातही मिळायची. चार पाच कांदे देऊन दोन चार फळं मिळायची. आपल्याला प्रश्न पडला असेल की हे सर्व सांगण्याचं कारण काय? काल गावागडचा विद्यार्थी आला. त्याला म्हटलं, गावात व्यवहार कसे होताहेत? लोकांकडे पैसे आहेत का? तो म्हणाला, हातात चालणारे पैसे नाहीत म्हणून लोक धान्याच्या बदल्यात वस्तू खरेदी करताहेत.
            पुन्हा जुन्या पध्दतीने व्यवहार सुरू झाले. लोक घरातले धान्य दुकानात देऊन किराणा आणायला लागले. बॅक टू नेचर. बॅक टू प्रिमिटीव्ह. पूर्वी ग्रामीण भाग असाच कॅशलेस व्यवहार करत होता आणि आता ते दिवस पुन्हा आले पहा. या धान्याचं मूल्य बाजारभावानेच असतं की नाही याचा विचार ग्रामीण अशिक्षित लोक करत नाहीत. आपली नड भागण्याशी मतलब. म्हणून ही प्रगती का अधोगती असं कोणी विचारू नये!                      
                        (देशभक्‍ताची व्याख्या या ब्लॉगचा ताजा कलम. ब्लॉगचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)
  डॉ. सुधीर रा. देवरे
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/