शनिवार, १५ ऑगस्ट, २०२०

करोनाच्या संधीचं ‘सोनं’

 

-  डॉ. सुधीर रा. देवरे

 

            एकीकडे आक्खं जग करोनाशी लढत बरबाद होत आहे. असंख्य लोक आपल्या जिवाला मुकत आहेत. आपल्या नातलगांना, मित्रांना गमावत आहेत. कधी नव्हे इतक्या मानवी अस्तित्वाच्या आणीबाणीच्या वेळी चीन सारख्या हुकुमशाही देशाला भारतात अतिक्रमण करण्याची दुर्बुद्धी होते.(आपल्यामुळे जगभर करोना फैलावला या मानसिकतेने चीनने खरं तर जगापुढे खजील असायला हवं होतं.) त्यासाठी करोना काळात भारताला रशियाकडून शस्त्रास्त्र खरेदी करण्याचा करार करावा लागतो. हाच मुहुर्त साधून फ्रांसकडून राफेल येतात. नेपाळ आणि पाकिस्तान त्यांच्या नव्या नकाशात भारताचा भाग दाखवतात. (नेपाळ भारताच्या विरुध्द जाऊ शकेल, याची कधी कोणी कल्पना  तरी केली होती का?) बांगलादेश, भूतान, ब्रम्हदेश, श्रीलंका या शेजारी देशांशी सुध्दा आपले खूप चांगले संबंध आहेत असं म्हणता येणार नाही. अशी सर्वदूर परराष्ट्र धोरणाची युध्दजन्य परिस्थिती पाहून- ऐकून आपण भांबावून जातो. करोनाला विसरता येत नाही की युध्दाला.

            एकीकडे करोनाचा लॉकडाउन लागू होताच देशातले लाखो मजूर बेरोजगार झाले.(देशात लाकडाऊन आधी आणि नंतर आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद, अशी आपली सुरुवात.)आधीच बेकार असलेल्या युवकांचं भवितव्य अंधारात टांगणीला आहे. मध्यमवर्गीय माणूस, शेतकरी, नोकरदार आणि व्यावसायिकही संकटात सापडला. दीड वर्षांसाठी वेतन- निवृत्ती वेतनांवरील महाभाई भत्ता थांबवला गेला. शेअर मार्केट प्रचंड कोसळलं. देशाची आर्थिक स्थिती नाजूक झाली. दुसरीकडे मात्र सोन्या- चांदीचा भाव अभूतपूर्व आकाशाला भिडला. कोणत्या लोकांकडे हा नेमका कोणता पैसा आहे? विकसनशील देशातलं हे कोणतं गौडबंगाल आहे, समजायला मार्ग नाही.

            आज आत्मनिर्भर होण्यासाठी देशात मेक इन इंडियाचे कारखाने सुरु व्हायला हवे होते. करोनामुळे देशात नवीन आरोग्यक्रांती व्हायला हवी होती. (भारत करोनारुग्ण संख्येत जगात तिसर्या स्थानावर आहे. कोणत्याही क्षणी आपण पहिला नंबर मिळवू शकतो.) म्हणून केवळ बेडची संख्या वाढवून चालणार नाही. केवळ रुग्णालयांची संख्या वाढवून चालणार नाही. नव्या आजारांना तोंड देऊ शकणारे डॉक्टर संख्येने लगेच निर्माण करता येणार नसले तरी; जे उपलब्ध आहेत त्यांना कमी दिवसांचं प्रशिक्षण देता येऊ शकतं. देशात करोनाने आजारी असलेल्या प्रत्येक नागरिकावर खाजगी रुग्णालयांतही मोफत आणि योग्य इलाज व्हायला हवा. 

            आधीच सरकारी कंपन्या डबघाईला येऊन खाजगीकरणाच्या दिशेने नामशेष होण्याच्या काठावर उभ्या आहेत. आता सरकारी बँकांचं तेच होतंय. बँकांचं महत्व हळूहळू नष्ट होत बँका बरखास्त होतील की काय? बँकांचं खच्चीकरण होतंय का? बँकांचे पैसे अनाधिकृतपणे वापरले जाताहेत का? नको त्या ठिकाणी कर्ज देण्यासाठी बँकांवर दबाव येऊ लागला का? आणि वेळ येताच कर्जबुडींताचं कर्ज आपोआप माफ होऊ लागलं. कोणताही विमा आपण भरलेल्या पैशांपेक्षा काही पट असतो. पण बँकेत ठेवलेल्या पैशांना बँक गेल्या वर्षापर्यंत फक् एक लाखाला जबाबदार होती. आता तो नियम पाच लाखापर्यंत आला.(म्हणजे बँकेत कोणाचे दहा लाख असले तरी बँक दिवाळखोरीत गेल्यास परत फक्‍त पाच लाख मिळतील.)  

            एकीकडे देशातले मंदिरं बंद आहेत. हॉटेली, हलवाई दुकानं, मॉल पाच ऑगष्टपर्यंत बंद होती. रेल्वे, बसेस बंद आहेत. सलून सारखा आवश्यक आणि गरीब लोकांचा व्यवसाय सुध्दा आतापर्यंत बंद होता. दुसरीकडे देशाची आर्थिक परिस्थिती- आजार संसर्ग दुर्लक्षून आपण देवालयांचं मात्र उदारीकरण करत आहोत. विनाकारण दिवसेंदिवस आपण धार्मिक(अध्यात्मिक नव्हे) होत आहोत. खरं तर देशातल्या सगळ्याच प्रार्थनागृहांचं राष्ट्रीयकरण करून तिथला प्रचंड उलाढालीचा पैसा देशाच्या प्रगतीसाठी खर्च करायला हवा.

            करोना विसरुन उत्तर प्रदेश प्रशासन शिलान्यास कार्यक्रम यशस्वीतेसाठी रात्रंदिवस झटत होतं. अयोध्येत हॉटेलीत आणि हलवाईंच्या दुकानातच नव्हे, तर भर रस्त्यांवर उघड्यावर गाड्या लावून बुंदीचे लाडू, पेढे तीन- चार ऑगष्टपासूनच विकले जात होते.(नंतर देशभर या सवलती नाईलाजाने देण्यात आल्या की काय?) एका राज्य सरकारकडे म्हणे कर्मचार्यांच्या वेतनासाठी पैसे नाहीत आणि याच करोना काळात राज्यातला तोच पक्ष मंदिराला एक कोटी रुपयांची मदत पाठवतो.   

            देशात नेमकं काय चाललंय कळायला मार्ग नाही. नागरिक फक् मतदान करुन गप्प बसतो- टिका करु शकतो- काही शंका विचारु शकतो- काही सुचवू शकतो. त्याचा काही उपयोग होणार आहे की नाही. देशात जे व्हायला हवं ते होत नाही आणि भलतंच काहीतरी होतंय. हे सगळं आकलनापलीकडे आहे. तथाकथित बहुचर्चित विकास सात वर्षांपासून गुडघ्यात डोकं घालून का बसलाय? जे भाषणांतून ऐकू येतं, ते प्रत्यक्षात का घडत नाही? 

            कोणी प्रामाणिक नागरिक करोनाला घाबरून आणि लॉकडाउनला अनुसरत घरी बसून आपलं उत्पन्न हरवून बसतो, तर त्याच वेळी कोणी करोनाचाच फायदा उठवत संधीचं सोनं करुन घेतो.

               (अप्रकाशित. लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

 

© डॉ. सुधीर रा. देवरे

   ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/