शनिवार, ३१ मे, २०१४

सर्वसामान्यातले गर्दीचे राजकारण
- डॉ. सुधीर रा. देवरे


         गर्दी का हवी असते माणसाला. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला गर्दी हवी असते. साहित्य संमेलनाला गर्दी हवी असते. राजकारणात तर गर्दी हवीच असते. व्यासपीठावर गर्दी हवी असते. जाहीर सभेला गर्दी हवी असते. मग ही गर्दी भाडोत्री असली तरी चालेल. हे झाले सार्वजनिक- सांस्कृतिक कार्यक्रमांसंदर्भात. अशा कार्यक्रमांना गर्दीची अपेक्षा करणे तसे रास्त ठरते. पण सर्वसामान्य माणसाला आपल्या घरातल्या विवाहासारख्या आणि अन्य घरगुती- कौटुंबिक कार्यक्रमातही गर्दी हवी असते. माणसाच्या अंत्ययात्रेला किती गर्दी होती हे सुध्दा नातेवाईक लोक प्रौढीने सांगतात. माझा एक मित्र म्हणाला की त्याच्या मुलीच्या लग्नाला चार हजार लोक उपस्थित होते.
         लोकांना गर्दी आवडण्याचे कारण काय हा माझा कायम चिंतनाचा विषय आहे. गर्दी घडवून आणली म्हणजे त्या गर्दीतला प्रत्येक माणूस आपल्या विचाराशी सहमत असतो का? आपल्या सुखदु:खात सामील झालेला असतो का? आपल्यासाठी झालेल्या गर्दीतला माणूस आपल्यावर प्रेम करतो का? ते कोणत्या प्रकारचे प्रेम असते? तो कोणत्या कारणाने आपल्या गर्दीत सामील झालेला असतो. आतून त्याला वाटले म्हणून तो गर्दीत आला का? उत्स्फूर्तपणे आला का? आपण निमंत्रण दिले म्हणून आला? का आपल्या सत्तेमुळे आला? का उसनवारी फेडायला आला? लादलेल्या संबंधांनी आला की अगदी आतून त्याला शुभेच्छा द्यायची इच्छा झाली म्हणून आला. का काही व्यावसायिक संबंधांना बाधा येऊ नये म्हणून मनधरनीसाठी आला. या सर्वांची खातरजमा न करता आपण आपल्या कार्यक्रमात किती लोकांची गर्दी होती एवढीच चर्चा वा एवढाच हिशोब का करतो? गर्दी ही प्रतिष्ठेची बाब होऊ शकते का? आपल्याकडच्या कार्यक्रमाला अमूक इतके लोक आले म्हणून आपली प्रतिष्ठा अमूक इतक्या इंचांनी वाढली असे आपल्याला वाटते का? वास्तव प्रतिष्ठा गर्दीने मोजता येईल काय?
         ह्या गर्दीत आपण का रमतो? आपण खरोखर सामाजिक बांधिलकी पाळतो म्हणून अशा पारंपरिक कार्यक्रमांना गर्दी करतो का यात अगदी आतूनचा जिव्हाळा कारणीभूत असतो. अशी गर्दी आपण जमवली नाही तर सामाजिक व्यवस्थेतून आपण बाहेर फेकले जाऊ अशी भीती यामागे असते का? आणि अशा गर्दीत आपण नाही गेलो तर आपल्याकडील कार्यक्रमात अशी गर्दी होईल की नाही या भीतीतून आपण दुसर्‍याच्या कार्यक्रम गर्दीत हजेरी लावतो का? ह्या तात्पुरत्या गर्दीत माणसाचे एकटेपण संपते? आपण एकटे नाहीत असा आधार त्याला आतून मिळतो?
         मुळात घरगुती कार्यक्रमात म्हणजे विवाह सोहळा, गोंधळ, मांडव, सत्यनारायण आदी पारंपरिक कार्यक्रमात गर्दी जमवावी की नाही? का ठरावीक लोकांमध्ये हे कार्यक्रम उरकून घ्यावे? म्हणजे यजमानांवरचा अतिरिक्त ताण आणि खर्चही कमी होईल? पण यजमानालाच अशी गर्दी हवी असेल तर? असे सगळे प्रश्न माझ्या मनात कायम गोंधळ घालतात. या निमित्ताने यावर सार्वमत घेऊ या.

   - डॉ. सुधीर रा. देवरे         
       इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
     

शनिवार, २४ मे, २०१४

अखेर मोदी सरकार आलेच!
- डॉ. सुधीर रा. देवरे


      जवळ जवळ तीन महिण्यांपासून मोदी सरकारचा हाय फाय प्रचार आपण ऐकत होतो. मोदी सरकार येणारच अशी चर्चा जनसामान्यांपासून तर अभ्यासकांपर्यंत सर्व पातळीवर जोरदारपणे सुरू होती. निवडणूक सहा महिने पुढे होती अशा वेळी एका उद्योजकाने गुजराथमध्ये एका कार्यक्रमात, मोदी पंतप्रधान व्हावेत अशी आशा व्यक्‍त केली होती. त्या वेळीच मोदींचा पंतप्रधान पदाचा मार्ग मोकळा झाला होता. जेव्हा जेव्हा मी मोदी सरकार असा शब्दप्रयोग ऐकला त्या त्या वेळी मला ऐतिहासिक पत्री सरकार आठवत होते. इंग्रजांच्या काळात महाराष्ट्रातील एका संस्थानात भुमिगत पत्री सरकार स्थापन झाले होते. पत्री सरकार जसे भुमिगत होते तसा मोदी सरकारचा भुमिगत प्रचार व्यासपिठावरच्या विकासाच्या प्रचारापेक्षा वेगळ्याच प्रकारचा होता हे ही लक्षात आले.
         देशात राजीव गांधी यांचे सरकार होते त्या वेळी दूरदर्शन नावाचे एकचएक सरकारी चॅनल देशभरात दिसायचे. या चॅनलवर चोवीस तास एकमेव राजीव गांधी दर्शन होत असे. त्या वेळी तेच तेच राजीव दर्शन पाहून जो कंटाळा देशवासियांना येत असे तोच कंटाळा मोदी सरकारच्या प्रचारादरम्यान येऊ लागला होता. तीन महिण्यांपासून प्रत्येक न्यूज चॅनलवर मोदींशिवाय काही दाखवलेच जात नव्हते. (अजूनही दुसर्‍या बातम्या दाखवल्या जात नाहीत. कदाचित अलिकडे जगात बातमी होण्यासारखे काही घडत नसावे.) चहावाले मोदींपासून हर हर ते घर घर मोदींपर्यंतचे अनेक मोदी अवतार सगळेच चॅनलवाले अहमहमिकेने दाखवत होते. मोदींच्या कुटुंबाने कसे मतदान केले याच्या इत्थंभूत वर्णनांपासून  उमेदवारी अर्ज भरायला मोदी पंधरा मिनिटे बाहेर कसे ताटकळत उभे रा‍हिले याचे गहिवरलेले वर्णनही चॅनल्सनी केले.
         मोदी यांच्या आईंनी मोदींचे भाषण टीव्हीवर ऐकले इथंपर्यंत एखाद्या चॅनलने सांगितले असते तर ते समजण्यासारखे होते. पण मोदींच्या आईंनी मोदींचे भाषण आमच्या चॅनलवरून ऐकले हे सुध्दा चार वेळा एका चॅनलने सांगितले आणि भाषण ऐकतानाचे त्या चॅनलसह चित्रिकरण केले होते. ज्या चॅनलवाला पत्रकार कॅमेरा घेऊन तिथे जाईल तो शूटींग करतांना त्यांचेच चॅनल लावून भाषण ऐकायला लावेल ही साधी गोष्ट लोकांच्या लक्षात येणार नाही असेही आपल्या भाबड्या चॅनेलवाल्यांना वाटत असावे.
         सारांश, येणार येणार म्हणून लोकांना ज्या दिवसांची आशा लागलेली होती ते चांगले दिवस अखेर आलेच. म्हणजेच लोकशाही पध्दतीने अखेर मोदी सरकार आलेच. आता मोदी सरकारकडून आपण आपल्या देशाच्या भरभराटीची अपेक्षा करू या. मोदी सरकारचे पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन!

   - डॉ. सुधीर रा. देवरे         
       इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
     

शनिवार, १७ मे, २०१४

तिथे पाहिजे जातीचे 
- डॉ. सुधीर रा. देवरे


         भारतीय लोकशाही पध्दतीने मोदी सरकार निवडून आल्यामुळे प्रथमत: नरेंद्र मोदी यांचे हार्दिक अभिनंदन!...
         दोन महिण्यांपासून चालत आलेली निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन निवडणुकीचा निकाल आता आपल्या डोळ्यासमोर आहे. सर्व जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि ह्या निवडणुकीने खर्चाचाही मोडलेला उच्चांक पाहिला की जगात कोण म्हणेल भारत हा विकसनशील देश आहे! एखाद्या विकसीत आणि श्रीमंत राष्ट्राप्रमाणे ह्या निवडणुकीवर अधिकृत सरकारी पैसा वापरला गेला. पक्षीय आणि व्यक्‍तीगत पातळीवर अनाधिकृतपणे किती खर्च झाला हे (निवडणूक आयोगाला नव्हे) तर त्या त्या पक्षांना आणि उमेदवारांनाच माहीत.
         आपण कितीही भारतीय संविधाच्या गप्पा मारल्यात, ‍धर्मनिरपेक्षता म्हणत राहिलोत, जातीभेद पाळत नाहीत असे व्यासपीठांवरून आरोळ्या मारत असलो तरी आपण पक्के जातीयवादी लोक आहोत हे मान्य करायलाच हवे. (धर्म हा तर आपला मते मागण्याचा मुख्य घटक आहेच!). तिथे म्हणजे आपल्या राजकारणात पाहिजे जातीचे हे ह्या निवड‍णुकीने ढळढळीतपणे सिध्द करून दाखवले. जिथे जाती- धर्माचा उपयोग होणार नाही अशा व्यासपीठांवरून विकासाच्या गप्पा मारायच्या आणि जातीय समीकरणाचा मॉब दिसताच आपल्या जातीचे भांडवल करायचे हे आपल्या देशाच्या पंतप्रधान होऊ इच्छिणार्‍या उमेदवाराने सुध्दा उदाहरण घालून दिले. मग साध्या आमदार, खासदार, मंत्री आणि छोट्या छोट्या डबक्यातल्या प्रादेशिक पक्षीय अध्यक्षांनी तशा उड्या मारल्या तर त्या बिचार्‍यांना नावे का ठेवावीत?
         या आधीच्या निवडणुकांमध्ये, राजकारणात जातीचा फायदा घेण्यातही आला असेल, वोट बँका तयार केल्या गेल्या असतीलही. पण त्या छुप्या तरी असायच्या. या जातीय समीकरणांना किमान व्यासपीठांवरच्या गर्जनेत तरी स्थान नसायचे. पण ही एकमेव निवडणूक म्हणावी लागेल की जिच्यात जातीचा दाखला व्यासपीठांवरून चर्चिला गेला आणि मिरवला गेला. कळीचा मुद्दा आला की व्यक्‍ती कितीही मोठी असो, आपली जात कशी बाहेर काढते हे या उदाहरणांवरून लक्षात येते.
         विकास आहे, शिक्षण आहे, बुध्दी आहे, विचार आहे, अभ्यास आहे पण
राजकारणी माणसाला जात नसेल तर कसे चालेल हो? म्हणून मूळ मुद्दा इथे जात हा
घटक आहे हे पुन्हा एकदा सिध्द होत आहे. म्हणूनच तिथे पाहिजे जातीचे असे
म्हणावे लागते. परिवर्तन झाले ते सत्तेत, पण या जातीय लोकांकडून सर्वसामान्यांच्या
आयुष्यात खूप मोठे परिवर्तन होईल याची अपेक्षा म्हणूनच आपल्याला करता येणार
नाही. जे सत्तेचे दलाल आहेत ते त्याचा पुरेपुर फायदा उठवतात. सत्ता बदलली म्हणजे
सत्तेचे फक्त दलाल बदलतात, एवढेच सत्य यातून पुढे येताना दिसते.
   - डॉ. सुधीर रा. देवरे         
       इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
     

शनिवार, १० मे, २०१४

Hunda ghene- dene gunha aahe!


हुंडा घेणे- देणे गुन्हा आहे!

-         डॉ. सुधीर रा. देवरे

       अलिकडे समाजात स्त्री- पुरूष समानतेच्या खूप मोठमोठ्या गप्पा मारल्या जातात. स्त्री ही पुरूषाच्या बरोबरीने आर्थिक सक्षमही होत आहे.  तरीही विवाह करायचे ठरले की पुरूष मुलगा नवरी मुलीच्या जिवावरच नटायला थटायला सुरूवात करतो. मुलगी कितीही उच्च शिक्षित आणि स्वत: आर्थिक सक्षम असली तरी लग्न मात्र नवरी मुलीच्या खर्चानेच व्हायला हवे असा सर्वत्र भक्कम समज झालेला दिसतो. नुसता खर्चच नाही तर वरून चांगल्यापैकी भरभक्कम हुंडाही घेतला जातो. पुन्हा नवरीच्या बापाने नवरीला सोन्याने सजवून दिले पाहिजे असे आडवळणाने आणि केव्हा केव्हा सरळपणे सुचवले जाते.
         एकीकडे समानता पाळण्याचे ढोंग करायचे आणि दुसर्‍या बाजूला लग्नाचा बाजार मांडायचा, नवर्‍या मुलाचा चक्क सौदा करायचा. असा दुटप्पीपणा आजच्या तथाकथित सुशिक्षित समाजात सुरू आहे. साधेपणाने विवाह लावून लग्नाचा खर्च दोन्ही बाजूने उचलला गेला अशी उदाहरणे अजूनही खूप दिसत नाहीत. आणखी हा हुंडा रोज नवीन संज्ञांनी रूढ होऊ लागला आहे. उदाहरणार्थ, काही लोक हुंड्याला आता वरदक्षिणा म्हणू लागलीत.
         मुलगी मुलाला आणि मुलगा मुलीला पसंत असूनही खालील कारणांनी ठरलेले विवाह चक्क मोडली जातात:
एक: मुलीचे वडील फक्‍त लग्न करून देण्यास तयार. सोने आणि हुंडा नाही म्हणतात. म्हणून लग्न मोडले.
दोन: नवरीचे वडील दोन तोळे सोने द्यायला तयार. नवरदेवाचे वडील पंधरा तोळे सोन्यावर अडून बसले.
तीन: नवरीचे वडील साध्या पध्दतीने लग्न लावून देण्याच्या मुद्दयावर अडून तर नवरदेवाचे वडील दणकेबाज लग्नाच्या मागणीवर ठाम.
चार: नवरीच्या वडिलांनी एक छोटेखानी मंगल कार्यालय ठरवले तर नवरदेवाचे वडील अमूक एक भव्य मंगल कार्यालयच हवे अशा मतावर ठाम. वगैरे वगैरे. परिणामी अनेक लग्न संबंध निकाली निघतात.
               अशी उदाहरणे पाहिलीत की, विवाह हा आयुष्यभरासाठी केला जातो की फक्‍त लग्नाच्या एका दिवसाच्या हौसमौजेसाठी केला जातो, असा प्रश्न पडावा इतके महत्व आज विवाह कसा साजरा करायचा या गोष्टीला दिले जाताना दिसते. खरे तर विवाह ठरविताना विवाहोत्तर आयुष्यात दोघांची काय धोरणे असतील हे समजून घेतले पाहिजे. पण आज दोन्ही बाजूने पसंती झाली की चर्चा होते ती देण्याघेण्याची आणि लग्न कसे भव्यपणे साजरे करायचे या ‍मुद्द्यावर. एखाद्या मालमत्तेचा सौदा करावा तशी.
         हुंडा घेणे आणि देणेही कायद्याने गुन्हा ठरतो. जे लोक लाच देत नाहीत आणि घेत नाहीत त्यांनी हुंडा सुध्दा घेऊ नये आणि देऊही नये. हुंडा पध्दत जावी असे जर आजच्या युवतींना मनापासून वाटत असेल तर जो कोणी मुलगा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष हुंडा मागत असेल अशा मुलाला मुलींनी लग्नासाठी नकार दिला पाहिजे. असे आजच्या युवतींनी स्वत: ठरवले तरच ही अघोरी प्रथा भविष्यात बंद होऊ शकेल. अन्यथा नाही. (या ब्लॉगमधील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

    - डॉ. सुधीर रा. देवरे        
       इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
     

शनिवार, ३ मे, २०१४

बहिणाबाईची गुढी उभारनी: एक आस्वाद


बहिणाबाईंची "गुढी उभारनी": एक आस्वाद
- डॉ. सुधीर रा. देवरे

            मराठी विकिपीडियाचे माहीतगार यांनी गुढी पाडव्याच्या दिवशी मला पुण्याहून फोन केला. फोनवर ते म्हणाले, बहिणाबाई चौधरी यांच्या गुढी उभारनी ह्या कवितेचा अर्थ मला नीट लागत नाही. जरा विश्लेषण करून सांगाल का? सदर कवितेतील कसे पडले घोरत असे निस्सयेलावानी या ओळीपासून पुढे मला अर्थ लागत नाही. लागला तर तो अर्थ गुढी पाडव्याच्या पवित्र दिवशी विपरीत होताना दिसतो. आपण या कवितेवर आस्वादात्मक लिहाल तर बरे होईल. म्हणजे विकिपीडियातील लेखात लेखन करणे सोपे पडेल. माहीतगार यांच्यासाठी मी सदर कवितेचा आस्वाद करायचे ठरवले. तो आस्वाद मी इथे सर्वांसाठी देत आहे.                                                                                                                              
            खानदेशातील लेवा पाटीदार गणबोलीतून बहिणाबाई चौधरी यांची ही काव्यरचना आहे. खानदेश आणि सर्व अहिरानी भाषा पट्ट्याच्या अंतर्गत अजून काही जातीय- जमातीय बोली आढळतात. पण या सर्व बोलींवर अहिरानीचा जबरदस्त पगडा आहे. म्हणून बहिणाबाईंच्या कवितांचे वर्गीकरण महाराष्ट्रात अगदी पाठ्यपुस्तक मंडळासह सर्वच वाचक अहिरानी भाषेत करताना दिसतात. ह्या बोलीत आढळणार्‍या अहिरानीच्या शब्द साम्यामुळे असे होताना दिसते.                                                           
गुढीपाडव्याचा सन                                                                 आतां उभारा रे गुढी                                                              नव्या वरसाचं देनं                                                                 सोडा मनांतली आढी                
            गुढी पाडव्याचा सण असल्याने आज आपण सर्वजण गुढी उभारू या. गुढी पाडव्यापासून आपण मराठी नववर्षाची सुरूवात होते असे मानतो. म्हणून या नवीन वर्षाच्या शुभमुहुर्तावर आपल्या मनात कोणाबद्दल आजपर्यंतची जी अढी निर्माण झाली असेल- गैरसमज असतील, ते विसरून जाऊ आणि नवीन वर्षाचा नवा विचार करूया असे बहिणाबाई कवितेच्या सुरूवातीलाच आवाहन करतात.
गेलसालीं गेली आढी                                                              आतां पाडवा पाडवा                                                                तुम्ही येरांयेरांवरी                                                                 लोभ वाढवा वाढवा
            गेल्या साली म्हणजेच ह्या मागच्या काळात आपल्या मनात एखाद्याबद्दल आढी निर्माण झाली असेलही. पण आज पाडवा हा शुभ दिवस नवीन वर्षाची सुरूवात घेऊन आल्यामुळे आपण सगळ्यांनी एक व्हावे आणि एकमेकांशी आपला लोभ वाढवावा, जुने मतभेद विसरून जावेत असे बहिणाबाई पुढे म्हणतात. (येरांयेरांवरी हा शब्द अहिरानीसह काही बोली भाषांमध्ये आढळतो. येरांयेरांवरी म्हणजे एकमेकांवर.)
अरे, उठा झाडा आंग                                                         गुढीपाडव्याचा सन                                                                आतां आंगन झाडूनी                                                               गेली राधी महारीन
            आज पाडवा हा सण असल्यामुळे बहिणाबाई अगदी पहाटेच आजूबाजूला झोपलेल्या लोकांना आवाहन करतात, झोपेतून ऊठा, आंग झाडा म्हणजे आळस झटका, अंघोळी करा. आत्ताच बाहेर राधी महारीन आंगन म्हणजे गल्ल्या झाडून गेली आहे. कविता पारंपारिक अर्थाची असल्याने ज्या काळात कवयित्रीने कविता लिहिली त्या काळी विशिष्ट एका गावी राधी महारीन नावाची महिला पहाटे गल्ल्या झाडत असावी, तो उल्लेख इथे आला आहे. बहीणाबाईंच्या तात्कालीन काळातली विशिष्ट जीवन जाणीव- गावपरंपरा ह्या कवितेत अधोरेखित झाली आहे. (जातीयवाद नव्हे.) 
कसे पडले घोरत                                                                  असे निस्सयेलावानी                                                                 हां हां म्हनतां गेला रे                                                           रामपहार निंघूनी
            ज्यांना कवयित्री झोपेतून उठायचे आवाहन करीत आहे ते लोक इतक्या सुंदर पहाटेला अंथरूनात घोरत पडले आहेत. निस्सायेल- निसवायेल हा शब्द अहिरानी बोली भाषेसह अजून काही बोलींमध्ये आढळून येतो. त्याचा अर्थ आहे निर्लज्ज अथवा कोनतीही काळजी नसलेला. निष्काळजी माणसासारखे झोपून राहिल्यामुळे, घोरत पडल्यामुळे घरावर गुढी उभारायचा जो मुहुर्त असतो रामपहार- रामाची पहार- पहाट ‍तो मुहुर्त निघून चालला आहे, असे क‍वयित्री आपल्या कवितेत म्हणतात.
आतां पोथारा हे घर                                                              सुधारा रे पडझडी                                                                करीसन सारवन                                                                  दारीं उभारा रे गुढी
            घर पोतारणे ही एक लोकपरंपरा आहे. पूर्वी ग्रामीण भागात मातीची घरे असत. मातीच्या भिंती असत. अंगण, ओटा, घराची जमीन जशी शेणाने सारवली जात, तशा मातीच्या भिंती सणासुदीच्या दिवशी पांढर्‍याशुभ्र मातीच्या पाण्याने कापडाच्या साहाय्याने पोतारत असत- सारवत असत. त्याला पोथारा हे घर असे बहिणाबाई म्हणतात. भिंतींच्या पडझडी झाल्या असतील तर त्या सुधारा, डागडुजी करा, सारवन करा आणि मग गुढी उभारा असे आवाहन कवितेत आहे. पडझडी सुधारा याचा लक्षणार्थ- व्यंगार्थही इथे दिसतो. नात्यागोत्यांमध्ये जर काही पडझडी झाल्या असतील तर ह्या शुभ मुहुर्तावर त्या सुधारा. एकमेकांशी गोड व्हा असा संदेश देण्याचा प्रयत्न कवयित्री करतात.
चैत्राच्या या उन्हामधीं                                                                जीव व्हये कासाईस                                                            रामनाम घ्या रे आतां                                                         रामनवमीचा दीस
            चैत्राच्या सुरूवातीला पाडवा आणि लगेच नऊ दिवसांनी रामनवमी येते. चैत्र महिना म्हणजे उन्हाळा. उन्हाळ्यात जीव कासावीस होतो म्हणून रामनवमीच्या निमित्ताने तरी रामाचे नाव घ्या म्हणजे जीवनातला नकोनकोसा उन्हाळाही थोडा हलका होईल अशी पारंपारीक लोकसमजूत कवयित्री इथे उदृत करतात.
पडी जातो तो 'पाडवा'                                                                 करा माझी सुधारनी                                                                 आतां गुढीपाडव्याले                                                                म्हना 'गुढी उभारनी'
            गुढी पाडव्याची गुढीच आपल्याशी बोलते आहे अशी ही रचना  असून पडतो तो पाडवा असा जर पाडवा ह्या संज्ञेचा सरळ अर्थ असेल तर मला पाडवा असे न म्हणता गुढी उभारनी असे म्हणावे अशी सुधारणा करण्याचे आवाहन स्वत: पाडवा हा सण आपल्याला करताना दिसतो.
काय लोकाचीबी तर्‍हा                                                                कसे भांग घोटा पेल्हे                                                                 उभा जमीनीच्या मधीं                                                              आड म्हनती उभ्याले
            पाडवा हा शब्द जसा गुढीला छेद देतो, म्हणजे पाडवा याचा अर्थ पडून जाणे असा असूनही गुढी मात्र उभारली जाते. तसाच आड हा जमिनीच्या पोटात सरळ खोल असा उभा गेलेला असूनही लोक त्याला आड म्हणजे आडवा म्हणतात, अशी टिपणी कवयित्री करतात. आणि ज्या लोकांनी आड आणि पाडवा अशा उलट्या संज्ञा तयार केल्यात ते लोक भांगेच्या नशेत होते की काय अशी आपली शंका बोलून दाखवतात. लोकपरंपरेने- लोकसंचिताने दिलेल्या संज्ञाच कशा विपरीत आहेत याची चिकित्सा करत आपल्या काही पारंपारिक संज्ञा आणि कृती कशा परस्पर विरूध्द आहेत असे दाखवण्याचा प्रयत्न इथे कवयित्री करताना दिसतात.
आस म्हनूं नही कधीं                                                               जसं उभ्याले आडवा                                                               गुढी उभारतो त्याले                                                                 कसं म्हनती पाडवा ?
         आणि म्हणून शेवटी कवयित्री आपल्या सगळ्यांना आवाहन करतात की, माणसाने उभ्याला आडवे म्हणू नये तसे पाडवा ह्या सणालाही पाडवा न म्हणता गुढी उभारनी असे म्हणावे. शेवटच्या दोन कडव्यांमध्ये बहिणाबाईंनी त्या काळीही ब्लॅक कॉमेडी केली आहे असे म्हणायला इथे वाव आहे.
       (या ब्लॉगमधील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

  - डॉ. सुधीर रा. देवरे          
       इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/