शनिवार, २२ फेब्रुवारी, २०१४

व्यवस्थेला धक्के देणारा माणूस 
-         डॉ. सुधीर रा. देवरे

       दिल्ली या केंद्रशा‍सित प्रदेशाच्या निवडणूकीचा निकाल पाहून काँग्रेस आणि भाजपने घाईघाईने लोकपाल विधेयक संसदेत पास करून टाकले. हे विधेयक पास होण्याच्या मुहुर्तावर इकडे आण्णा हजारेंनी उपोषण केले. विधेयक पास होताच राहुलगांधी, सोनियागांधी आणि सुषमा स्वराज यांना धन्यवाद देत आण्णांनी उपोषण मागे घेतले. सदर विधेयक हे जनलोकपालाइतकेच प्रभावी आहे असेही आण्णांनी त्यावेळी जाहीर केले होते. (नंतर केजरीवालांचा पगडा भारी होताच आण्णा केजरीवालांना पाठींबा देऊ लागले होते. आता केजरीवालही मागे पडले आणि ममता बॅनर्जी आण्णांना जवळच्या वाटू लागल्या.) लोकपाल विधेयक संसदेत पास होताच केजरीवालांची हवा निघून जाईल आणि त्यांच्या पक्षाचा काही अजेंडा उरणार नाही असा समज सगळ्यांनी करून घेतला होता. पण केजरीवालांना हे विधेयक मान्य नव्हते. ते या विधेयकाला ज्योकपाल म्हणत होते.
         केजरीवाल यांना तोंडघशी पाडण्यासाठी काँग्रेसने त्यांना बाहेरून पाठींबा देऊन सरकार बनवायला भाग पाडले. पण ‍दीड महिण्याचे सरकार चालवताना केजरीवाल जसजसे घेरले जात होते तसतसे त्यांनी नवनवीन धक्के देण्याचे तंत्र अवलंबले आणि त्यात ते काही प्रमाणात यशश्वीही झाले. शेवटी काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही प्रमुख पक्ष आणि त्यांच्या अनेक पोटशाखा असलेले पक्ष ह्या आपल्या स्वार्थासाठी कशा पध्दतीने एकत्र येतात हे सिध्द करून केजरीवालांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. ज्या देशात मोठमोठे गुन्हे करूनही राजीनामे दिले जात नाहीत तिथे ह्या वागण्याला त्याग म्हणावाच लागेल.
         भारताच्या इतिहासात आतापर्यंत जी राजकीय आंदोलने झालीत ती सगळी प्रामुख्याने काँग्रेसच्या विरोधात आणि विरोधी पक्षांना पुरक ठरलीत. 1977 ला जयप्रकाश नारायण यांचे आंदोलन असो की 1989 चे विश्वनाथ प्रताप सिंग यांचे आंदोलन असो. या आंदोलनांमुळे काँग्रेस सत्ताभ्रष्ट झाली आणि विरोधी पक्षांचा गट सत्तेवर आला. परंतु आताच्या केजरीवालांच्या आंदोलनाने सत्ताधारी काँग्रेससह सगळ्याच छोट्या मोठ्या विरोधी पक्षांनाही उघडे पाडले आहे.
         अरविंद केजरीवाल आणि त्यांचा पक्ष पूर्णपणे चांगला आहे असे येथे दूरान्वयानेही म्हणायचे नाही. काही ठिकाणी तांत्रिक तर काही वेळा प्रोटोकॉल संदर्भात ते चुका करतात हे खरे आहे. पक्षात काही लोक वाचाळ तर काही संधीसाधू असल्याचेही उघड झाले. पण ह्या झोपलेल्या भ्रष्ट व्यवस्थेला हलवून जागे करायचे काम ते अगदी ठरवून करताहेत हे महत्वाचे वाटते. केजरीवालांच्या पक्षामुळे जर इतर पक्षांची धार्मिक-जातीय वोट बँक ठिसूळ होणार असेल तर ते भारतीय लोकशाहीला ते हवेच आहे. म्हणूनच सर्वसामान्य माणूस या शातंतापूर्ण आंदोलनाचे सर्वत्र स्वागत करताना दिसतो.
         (या ब्लॉगमधील मजकूराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

    - डॉ. सुधीर रा. देवरे        
       इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
     

शनिवार, १५ फेब्रुवारी, २०१४

विवाहांचा थाटमाट


                               - डॉ. सुधीर रा. देवरे


       सोने कितीही महाग होवो, मंगलकार्यालयांचे भाडे कितीही वाढो, जेवणावळीत अन्न कितीही वाया जावो, बँड कितीही महाग होवो वा कितीही ध्वनी प्रदुषण करो, पैसे खर्च करण्याची आमची कुवत असो वा नसो आमच्या घरातले विवाह आम्ही जोरदार थाटामाटातच काढणार अशी जन्मताच शपथ घेतल्यासारखे लोक आपल्या घरातली लग्ने दणकेबाज पध्दतीने साजरी करताना दिसतात.
         भारतात हुंडा‍ विरूध्द कायदा 1961 साली अस्तित्वात आला आणि आज 2014 सालीही सर्रासपणे दहा दहा लाख हुंडा देऊन- घेऊन सर्वत्र लग्ने होताना दिसतात. कायद्याने अज्ञान आहेत म्हणून फक्त सर्वसामान्य लोकच हुंडा देतात घेतात असे नाही, तर ज्यांचा कायद्याशी रोजचा संबंध येतो त्या पोलिस, वकील आणि न्यायाधिशांमध्येही हुंडा देणे- घेणे राजरोसपणे सुरू आहे.
         कितीही गाजावाजा करून, गर्दीचे शक्तीप्रदर्शन करून आणि पोकळ प्रतिष्ठेचा प्रश्न करून सांस्कृतिक पध्दतीने लग्ने झालीत तरी लग्नपत्रिका वा लग्नातले फोटो वा व्हिडीओ हे विवाह झाल्याचा ढळढळीत पुरावा म्हणून आज कायद्याने ग्राह्य धरले जात नाहीत. त्यासाठी किमान ग्रामपंचायत वा नगरपालिकेचा दाखला मिळवणे गरजेचे झाले आहे. तरीही आम्ही यापासून कोणताही बोध न घेता प्रचंड गर्दीला जमवून आणि मगंलाष्टके म्हणून लेखाजोखा केलेला कोणताही पुरावा मागे न ठेवता तोंडी लग्ने लावत आहोत.
         नोंदणी पध्दतीने विवाह करायचा नसला तरी वधू-वरांचे दोन कुंटुंबे आणि काही नातेवाईक- मित्र मंडळी यात साध्या पध्दतीने विवाह होणे आज गरजेचे झाले आहे. किमान अकरा लोकांच्या उपस्थितीत विवाह करणे हा आज आदर्श विवाह समजायला हवा. यात लग्नपत्रिका छापणे, मंगल कार्यालय घेणे, वाजंत्री, हुंडा, सोन्याचे दागिने, मानपान, वरमाया, कपडे, अनावश्यक जेवणावळी अशा खर्चाला फाटा द्यायला हवा. असा साध्या आदर्श पध्दतीने विवाह समारंभ करून ग्रामपंचायत वा नगरपालिका यांच्याकडे विवाह नोंदणी करून तसे प्रमाणपत्र घेण्यासाठी सजग रहायला हवे.
         अशा पध्दतीने विवाह समारंभ सुरू झाले तर सर्वसाधारण आर्थिक परिस्थिती असलेल्या माणसाला लग्नांसाठी कर्ज काढावे लागणार नाही, पुढे हुंडा कुठून आणायचा म्हणून पालकांडून गर्भातच मुली मारल्या जाणार नाहीत आणि लग्नानंतर अतिरिक्त हुंड्यासाठी सुना आणि बायकाही मारल्या जाणार नाहीत, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
         (या ब्लॉगमधील मजकूराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

   - डॉ. सुधीर रा. देवरे         
       इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
     

शनिवार, ८ फेब्रुवारी, २०१४

मुर्तींचा उच्चांक आणि राजकारणाचा निचांक
- डॉ. सुधीर रा. देवरे

       माणसाला आपल्या भवितव्यात अंधार दिसायला लागला की तो भूतकाळात रमू लागतो. उदाहरणार्थ: माझे आजोबा असे होते. माझ्या वडिलांचा गावात दरारा होता. आमचा चिरेबंदी वाडा होता. संपूर्ण गाव माझ्या वडिलांना मानत असे. आमच्याकडे खूप वैभव होते. आमच्या घरात लोकांसाठी जेवणावळी उठायच्या. येणार्‍या जाणार्‍याला खाली हात जाऊ देत नसत. आमची पिढीजात श्रीमंती होती. वगैरे वगैरे...
         आणि आपल्या वाडवडलांचे आख्यान सांगणारा आज काय करतो: दिवसभर दारूच्या नशेत असतो. मटका लावतो. पत्ते खळतो. बापाने कमावलेल्या पैशांवर मजा करतो आणि चावडीवर बसून आपल्या पूर्वजांच्या बढाया मारतो.
         अशाच प्रकारची परिस्थिती आजच्या राजकीय नेत्यांची झाली आहे. भव्य आणि दिव्य मूर्ती उभारण्यासाठी आजच्या राजकारण्यांना आपल्या कतृत्ववान पूर्वजांची आठवण येते. त्यांच्याइतके कार्य करणे फार लांबची गोष्ट झाली. पण त्यांच्या एक शतांशपट कार्यही आपल्याला करता येत नाही हे लक्षात येताच, त्यांचीच भव्य मूर्ती बनवून आपण त्यांच्या मूर्तीसाठी तरी ओळखले जाऊ अशा मनिषेने देशात सध्या अनेक राजकीय लोकांना काम मिळाले आहे. जसजसा राजकारणाचा निचांक समोर येऊ लागला तसतशा मूर्ती देशात वाढू लागल्या आहेत.
         मी पंतप्रधान झालो तर!... (असा शालेय निंबध लिहून आता बरेच दिवस झालेत, पण हा लेख लिहिताना अशा निबंधाच्या रूपबंधाचा मला आधार घ्यावा लागतोय.) पहिल्यांदा अशा मुर्ती वा पुतळे उभारण्यासाठी कोणकोणते लोक पुढे येऊ शकतील याचा अदमास घेऊन मी देशात कुठेतरी एकाच जागी प्रचंड मोठी जमीन अधिग्रहीत करेल. या जागेत ज्या ज्या कोणाला मूर्ती उभारायच्या असतील, पुतळे उभारायचे असतील वा स्मारके उभारायची असतील, त्यांनी उभारावीत. त्यासाठी त्यांना विशिष्ट चौरस मीटरच जमीन दिली जाईल. त्या जमीनीवर ज्याला 182 मीटर वा 193 मीटर वा कोणाला अजून काही किलोमीटर उंचीची मूर्ती उभारायची असेल, त्याने तिथे जाऊन उभारावी. ती मूर्ती लोखंडाची असो की सिमेंटची, सोन्याची असो की चांदीची यावर शासन कोणताही आक्षेप घेणार नाही.
         काही अटी मात्र घालण्यात येतील. त्या अटी अशा: या मुर्तींसाठी शासकीय पैसा वापरता येणार नाही. लोकांकडे लोखंडासह कोणताही धातू वा पैसा मागता येणार नाही. आणि अशा मूर्तींची पशू- पक्ष्यांकडून विटंबना झालीच तर आपल्या भावना दुखावता येणार नाहीत. आणि अशा भावना दुखावण्याच्या भरात रस्त्यांवर आंदोलने करत सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करता येणार नाही, अशी प्रतिज्ञापत्रे मूर्ती उभारणार्‍यांना लिहून द्यावी लागतील...
         - असे माझे स्वप्न असले तरी ते कधीच पूर्ण होणार नाही. कारण पंतप्रधान पदासाठी लागलेल्या भल्या मोठ्या रांगेत या जन्मी माझा नंबर लागणार नाही.
         (या ब्लॉगमधील मजकूराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)


   - डॉ. सुधीर रा. देवरे         
       इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
     

शनिवार, १ फेब्रुवारी, २०१४

राजकारणातला महान संत 
-         डॉ. सुधीर रा. देवरे


         मोहनदास करमचंद गांधी. एम. के. गांधी. महात्मा गांधी. गांधी. बापू. राष्ट्रपिता. ही नावे उच्चारताच जी एक प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ती इतकी भव्य आहे की ही प्रतिमा एक तर आपण एक महामानव म्हणून मान्य करून सोडून देतो अथवा स्वत: अभ्यासाचा कंटाळा करून काही विषारी प्रचारकांमुळे टपोर्‍यांनी ठेवलेल्या टुक्कार नावांच्या प्रेमात पडून आपण गांधीना आपल्या आयुष्यातून हद्दपार करण्याचा प्रयत्न करतो.  
         गांधीची प्रतिमा पार्‍यासारखी आहे. ती हातात येत नाही. आदरार्थी आणि सन्माननिय नावांव्यतिरिक्त जनमानसाने अशी त्यांना अनेक हलकी नावे बहाल केली आहेत की जी इथे लिहिता येणेही अभिरूचीला शक्य नाही. अशी ठेवलेली नावे जशी मानवी अज्ञानातून आली आहेत, तशी काही नावे दूरत्वातून तर काही गांधी व्देषातून आलेली आहेत.
         असे व्देष सुध्दा किती उथळ कारणांवर आधारीत आहेत पहा: गांधी आमच्या उच्च जातीचे नाहीत वा आमच्या उच्च जातीचे त्यांनी कधीच समर्थन केले नाही म्हणून गांधी त्यांच्या व्देषाचे विषय होतात. तर दुसर्‍या बाजूने आमच्या मागे राहिलेल्या जातीला पुढे आणण्यासाठी गांधींनी एकही आंदोलन केले नाही म्हणून त्यांना वाळीत टाकले जाते. तिसर्‍या बाजूने गांधी हे जन्माने हिंदू होते म्हणून ते हिंदू धार्मिकतावादी होते, असा इतर धर्मांधतांकडून प्रचार होतो. तर चौथ्या बाजूने गांधी पाकिस्तानकडून होते असा प्रचार करून गांधींना शिव्या दिल्या जातात. (आणि शेवटी हिंदू धर्मांध व्यक्तीच त्यांचा खून करते.)
         महात्मा गांधी यांना जाहीरपणे शिव्या दिल्याने, गांधींच्या पुतळ्याची विटंबना केल्याने वा त्यांच्यावर अश्लाघ्य लिखाण केले तरी शंभर टक्के गँरंटी देता येते, की या देशात कोणाच्याच भावना दुखावून जातीय दंगली भडकणार नाहीत. गांधींनी कोणत्याही एका जातीचा कैवार न घेतल्याने वा ज्या जातीत जन्माला आले त्या जातीचे संघटन न केल्याने आज कोणतीच जात त्यांच्यासोबत नाही. कोणत्याच धर्माचा अतिरेक न केल्याने कोणताच धर्म त्यांना आपला मानत नाही. महात्मा गांधी या नावाचा जप केल्याने कोणत्याही पक्षाचे एक दोन टक्के मते आज वाढत नाहीत, हे लक्षात आल्याने राजकीय पक्षांनी त्यांचे नाव घेणे आता सोडून दिले आहे.         
         असा हा महात्मा. मनुष्याच्या आकलनापलिकडचा. काहींनी समजून न घेता व्देष करायला सुरूवात केली, तर कोणी जाणूनबुजून गांधींना अडगळीत टाकले. सगळ्या जात, पात, गट, तट, धर्मवाल्यांनी, डबकेवाल्यांनी आणि झेंडेवाल्यांनी त्यांच्याकडे कानाडोळा केला तर कोणी गांधी म्हणजे आपल्या बु्ध्दीपलिकडील घटना म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.
         पण या सगळ्यांपलिकडे पोचलेले गांधी आपल्या सर्वांचेच होते अखिल मानव जातीचे होते. जगाचे होते. हा राजकारणातलाच नव्हे तर आख्या जगाचा चालता बोलता मानवी संत होता हे अजूनही कोणाला कळत नाही, हे आपले दुर्दैव. आपण सं‍कुचित विचार करतो. महान विचार आपल्याला कधीच झेपवत नाहीत. अल्बर्ट आईनस्टाईन या शास्त्रज्ञाने गांधी जीवंत असतानाच त्यांच्याबद्दल म्हटले होते, असा हाडामांसांचा माणूस या पृथ्वीतलावर खरोखर होऊन गेला, यावर पुढील पिढ्यांचा विश्वास बसणार नाही!
         जगात जर कोणी आतून आत्मशुध्दीसाठी उपोषण केले असेल तर ते गांधींनी. गांधी राजकारणात गेले नसते वा या जगात इतरत्र कुठे जन्माला आले असते तर ते एखाद्या नव्या धर्माचे प्रेषित ठरले असते, इतके ते महान होते.
         भारतासारख्या व्यक्तीपूजा करणार्‍या देशात जन्माला येऊनही आज महात्मा गांधींची भारतात मंदिरे स्थापन झाली नाहीत याचे गुपीत भारतीय जनमानसात नसून गांधींच्या कार्यशैलीत होते हे निर्वीवाद सत्य ठरते. त्यांना आपले व्यक्तीस्तोम माजवायचे नव्हते तर आलटून पालटून कुठल्यातरी काल्पनिक श्रध्देला कवटाळणार्‍या लोकांच्या श्रध्देलाच धक्के देऊन त्यांना ध्येयाप्रत न्यायचे होते. आणि त्यात ते स्वत:ची व्यक्तीपूजा होऊ न देण्यात यशश्वी ठरले तरी त्यांना जे ध्येय अपेक्षित होते त्यात ते, म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर आपण अयशश्वी ठरलो आहोत.
   (या लेखातील मजकूराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

     - डॉ. सुधीर रा. देवरे       
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/