रविवार, २८ ऑक्टोबर, २०१२

बातमी, जाहिरात का पेडन्यूज-         डॉ. सुधीर रा. देवरे

         माझा एक वार्ताहर मित्र काही दिवसांपूर्वी माझ्याजवळ म्हणाला होता की, नाशिकला तो अमूक एका वर्तमानपत्रात कामाला होता. तेव्हा अनेक लोक त्याच्याकडे बातमी देताना एक पाकिट देत. त्या पाकिटात पैसे असायचे. त्यामुळे ती बातमी छापून आणण्यासाठी तो आग्रही व्हायचा. असे छोटे वार्ताहर अशी पाकिटे स्वीकारीत असतील म्हणून या घटनेकडे मी किरकोळ म्हणून पाहिले.
         अलिकडे अशा अनेक बातम्या वर्तमानपत्रातील पहिल्या पानावर वाचायला मिळतात की ज्यांना कोणतेही बातमीमूल्य नसते. अशा बातम्या वाचून मला अचंबा वाटतो. या बातम्यांबाबत संशय येतो. ही बातमीच आहे की ही बातमी बनवण्यामागे काही देवघेव आहे असे वाटू लागते. एखाद्या कंपनीच्या एखाद्या गाडीबद्दलचे कौतुक या बातमीत असते. अथवा कुठल्यातरी निवडणुकीला उभ्या राहणार्या उमेदवाराचे स्वच्छ चारित्र्य या बातमीत वितृतपणे कथन केलेले असते. आणि दुसर्या दिवशी त्याच जागेवर त्याच्या विरोधी उमेदवारालाही नावाजण्याची कला या वर्तमानपत्रातून होताना दिसते.
         याला चॅनल्स सुध्दा अपवाद नाहीत. आत्ताच झी चॅनल आणि उद्योजक जिंदाल यांच्यातील हा देवघेवीचा वाद चव्हाट्यावर आला. बातमी देण्यासाठी जसे पैसे लागतात तसे बातमी दडपण्यासाठीही पैसे लागतात. काही दिवसांपूर्वी पैशांचे पाकिट स्वीकारणारे भुरटे पत्रकार आपण किरकोळ समजत होतो. तर आता चॅनल आणि वृत्तपत्राचे संपादक-मालकच सौदा करतात आणि तोही काही कोटींचा, अगदी करारपत्र करून.
         चॅनल्स- वृत्तपत्रे म्हणजेच पत्रकारीता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. आणि तोही आता विश्वासार्ह राहिला नाही. तिथेही अनैतिकता आणि भ्रष्ट लोक घुसलेच. आता वृत्तपत्रे वाचायची की नाहीत आणि चॅनल्सवर बातम्या ऐकायच्या की नाहीत इथून विचार करावा लागेल.

-            डॉ. सुधीर रा. देवरे
            sudhirdeore29@rediffmail.com
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
         

शनिवार, २० ऑक्टोबर, २०१२

मलाला ला सलाम-         डॉ. सुधीर रा. देवरे

         तीन वर्षांपूर्वींपासून पाकिस्थानातील स्वात खोर्यात तालिबानी दहशतवाद्यांनी थैमान मांडले आहे. त्यांच्या अनेक आदेशांपैकी एक आदेश असा होता, स्वात खोर्यातील मुलींनी शाळेत जायचे नाही, घराबाहेर एकट्याने पडायचे नाही, पारंपरिक वेशभुषा करायची. अशा प्रकारच्या घटनांवर त्यांनी अनेक महिलांना आदिम शिक्षाही दिल्यात. वडिलांच्या सल्ल्याने या प्रकारच्या जुलमांना मलालाने विरोध केला. तेव्हा ती फक्त अकरा वर्षाची मुलगी होती. मलालाचे वडील एका मुलींच्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत.
         मलाला शाळेत भाषणे करून तालिबान्यांच्या या आदेशाला आव्हान देत होती. मुलींचे प्रबोधन करत होती. टोपण नावाने तिने तालिबान्यांच्या विरोधात  इंटरनेटवर ब्लॉगही लिहिलेत. या सर्वांची परिणीती म्हणून तालिबान्यांनी तिची हत्या करायचे ठरवले. त्यांचा एक प्रयत्न वाया गेला. पण परवा त्यांनी शाळेची बस अडवून डाव साधला. आज ती फक्त चौदा वर्ष वयाची आहे.
         तालिबान चौदा वर्षाच्या निशस्त्र मुलीला घाबरले. हातात एके 47 असलेले असंख्य दहशतवादी या चिमुरडीला घाबरले आणि त्यांनी तिच्या डोक्यात गोळी घातली. ती आज मरणाच्या दारात आहे. किती भेकड असतात दहशतवादी त्याचे हे ताजे उदाहरण. तालिबानचा अर्थ देवाचे सेवक असा होतो. पण त्यांच्या आतापर्यंतच्या सगळ्या कृत्यांवरून ते सैतानाचे सेवक ठरतात.
         यातून जर बरे काही घडले असेल तर आंतरराष्ट्रीय समुदायासोबत पाकिस्तानातील सरकारसह सर्व राजकीय पक्ष, मुल्लामौलवी आणि सर्वसामान्य ना‍गरिकही मलालाच्या बाजूने उभे राहिलेत. तिला शौर्याचे पारितोषिक देऊन गौरवण्यात येत आहे. तालिबान आणि काश्मीर खोर्यातील दहशतवादी यांच्या विरोधात पाकिस्तानचे जनमत गेले तर दहशतवाद टिकणार नाही. आणि पाकिस्तानच्या उज्ज्वल भवितव्यासाठीही दहशतवाद निपटवणे गरजेचे आहे.
         मलाला लवकर बरी व्हावी. तिला उदंड आयुष्य लाभावे. भविष्यात पाकिस्तानात तिच्या नेतृत्वाचे पुरोगामी लोकशाहीचे सरकार स्थापन व्हावे, अशी इच्छा व्यक्त करून मलाला ला सलाम .

-            डॉ. सुधीर रा. देवरे
            sudhirdeore29@rediffmail.com
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
         

रविवार, १४ ऑक्टोबर, २०१२

अपंगांच्या नावानेही सुरू ...
-         डॉ. सुधीर रा. देवरे

         माजी राष्ट्रपती डॉ. जाकिर हुसेन यांच्या नावाने डॉ. जाकिर हुसेन मेमोरियल ट्रस्ट 1986 सालापासून उत्तरप्रदेशात स्थापन झाला आहे. या ट्रस्टचे संस्थापक चेअरमन आजचे केंद्रिय कायदा मंत्री सलमान खुर्शीद आहेत तर या ट्रस्टच्या तहहयात सर्वेसर्वा प्रोजेक्ट ऑफिसर खुर्शीद यांच्या पत्नी लुईस खुर्शीद या आहेत. या ट्रस्टचे काम सहा राज्यांमध्ये चालतंय असे ट्रस्टचे म्हणणे आहे. अपंगांची उन्नती करणे, तीन चाकी सायकली देणे, कॅलिपर्स देणे, ब‍धिरांना ऐकण्याची उपकरणे देणे, पल्स पोलिओ मोहिम राबवणे आदी या ट्रस्टची कामे आहेत असे ट्रस्टची घटना सांगते. पण ---
         कागदावर जी हजारो अपंग लाभार्थिंची नावे आहेत ती तीस टक्के असली आणि सत्तर टक्के नकली असल्याचे उघड झालंय. ट्रस्ट 1986 पासून केंद्र सरकारची ग्रँट घेतंय. आणि या व्यतिरिक्त अनेक ठिकाणांहून ट्रस्टसाठी देणग्या मिळवल्या जातात. पैकी 2010  साली केंद्र सरकारकडून अडुसस्ट लाख रूपये आणि 2011 साली एक्कात्तर लाख रूपये ज्या कामासाठी ट्रस्टने कागदोपत्री खर्च केलेले दाखवले, त्या तीस टक्क्यातल्या असली लोकांनाही ती उपकरणे मिळालेली नाहीत. नकली व्यक्ती या जगातच अस्तित्वात नसल्याने त्यांना तो लाभ मिळणार नाही म्हणून त्यांना वगळून म्हणजे त्यांच्या नावाच्या पैशांचा गफला केला तरी खर्या तीस टक्के लोकांना तो लाभ मिळायला हरकत नव्हती. नकली नावांचे जे पत्ते दिले आहेत त्या पत्त्यांवर कोणीही भेटत नाही आणि गावातले लोक सांगतात की या नावाची व्यक्ती आमच्या गावात नाही. ही घटना आज उजेडात आली असली तरी ही फसवणूक 1986 सालापासून सुरू आहे हे स्पष्ट होते.
         कोणत्या अपंगाला कोणत्या उपकरणाची गरज आहे, हे तपासण्यासाठी वैद्यकीय अधिकार्यांच्या देखरेखीत अंपंगांची शिबीरे घेऊन उपकरणे वाटणी व्हावी असा नियम आहे. शिबिरात लाभार्थिंची वैद्यकीय तपासणी होते. त्यांना तसे प्रमाणपत्र दिले जाते. पण यापैकी या ट्रस्टने प्रत्यक्षात काहीही केलेले नसले तरी ग्रँट घेण्यासाठी कागदोपत्री सर्व सोपस्कार झालेले आहेत, असे दाखवले आहे. शिबीरे घेतली असल्याची विशिष्ट अधिकार्यांची पत्रे शासनाला सादर केलेली आहेत. मेडिकल ऑफिसर, समाज कल्याण अधिकारी, तहसिलदार, बिडीओ यांच्या खर्या नावांची पण खोट्या सह्या असलेली पत्रे कायद्याच्या चौकटीत सादर केली गेलीत.
         या प्रकरणाचा छडा आजतक या चॅनलने आपल्या पत्रकारांकडून गुप्त कॅमेर्याने लावला त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. अपंगांची ही फसवणूक - हा गुन्हा कायद्याच्या 420 कलमात बसणारा आहे हे उघड आहे. उत्तर प्रदेशातील 17 जिल्ह्यांच्या प्रत्यक्ष सर्वेतून या ट्रस्टचा खोटारडेपणा उघडकीस आला आहे.
         हा गुन्हा उघड होत असताना लुईस खुर्शीद यांनी उत्तर प्रदेशातील एका सचिवाचे प्रतिज्ञापत्र आजतकला सादर केले. या पत्रात हे सचिव म्हणतात की, या ट्रस्टचे काम योग्य रितीने सुरू असून तिथल्या शिबिरांना मी स्वत: उपस्थित होतो. मात्र आजतकचे पत्रकार या सचिवांना भेटले असता सदर प्रतिज्ञापत्र त्यांनी दिलेले नाही आणि प्रतिज्ञापत्रावरची सहीही त्यांची नाही पण नाव मात्र त्यांचे आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
         सलमान खुर्शीद हे भारताचे आजचे कायदामंत्री आहेत. स्वत: कायदामंत्र्याने कायद्याची खिल्ली उडवली आहे. कायदा लोकांसाठी आणि आपल्यासाठी कायद्यात बसणार्या नकली फायली सादर करून ग्रँट मिळवणे आणि ती ही कोणाच्या नावावर तर अंपगांच्या. आता अपंगांच्या नावानेही लुट सुरू झालीय. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ जाकिर हुसेन हे सलमान खुर्शीदचे आजोबा असावेत. खुर्शीद यांनी डॉ जाकिर हुसेन यांच्या नावाला तर काळिमा फासलाच पण अपंगांच्या नावावर जे आजपर्यंत करोडो रूपये या ट्रस्टने हडपले आहेत, त्यासाठी कितीही कठोर शिक्षा या खुर्शीद पती-पत्नीला दिली गेली तरी ती कमीच पडेल इतके नीचतम कृत्य त्यांनी केले आहे.  

-            डॉ. सुधीर रा. देवरे
            sudhirdeore29@rediffmail.com
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
         

रविवार, ७ ऑक्टोबर, २०१२

आता महालक्ष्मीच्या प्रसादाची पाळी


                                                      - डॉ सुधीर रा. देवरे
   
         शिर्डीच्या साईबाबांचे प्रसादाचे लाडू काही दिवसांपूर्वी संपूर्ण देशात गाजले. भेसळीच्या तूपाचा भ्रष्टाचार देवाला सोडत नाही तर आपल्यासारख्या आम आदमीला कोण विचारतो? आणि आता कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या प्रसादाची पाळी आली. जी आख्या महाराष्ट्रात गाजतेय.
         महालक्ष्मीच्या मंदिरातील प्रसाद म्हणजे लाडू बनवणार्या महिलांवर कोणीतरी आक्षेप घेतला की मासिक पाळीच्या वेळी महिला अपवित्र असतात म्हणून त्यांनी प्रसाद बनवू नये. या सगळ्या प्रकाराकडे नीट बघितले तर प्रश्न आर्थिक आणि गटातटाचा आहे हे लक्षात येते. पण आश्रय घेतला गेला महिलांच्या मासिक पाळीचा. पुरोगामी महाराष्ट्र म्हणून आपण आपले कौतुक करून घेतो. पण अशा आज अनेक गोष्टींकडे निर्देश करता येईल की आपण पुरोगामी राहिलो नाहीत. पुरोगामी पूर्वी असू पण आता नाही.
         महिलांची मासिक पाळी म्हणजे काय? हेच आपल्याला माहित नाही. तशी कोणत्याही शिक्षणाची व्यवस्था आपल्याकडे नसल्यामुळे असे अज्ञान पिढ्यानुपिढया सुरू आहे:
         : प्रत्येक महिण्यात स्त्री च्या गर्भाशयात बीज तयार होते. विशिष्ट दिवसात त्या बिजाशी पुरूष बिजाचा संबंध आल्यास ते बीज रूजते व महिला गर्भवती होते. तसे झाले नाही तर ते बीज गळून पडते. याला स्त्री ची मासिक पाळी म्हणतात.
         असा हा निसर्गधर्म आहे. आणि जो निसर्गधर्म आहे त्याला मानवनिर्मित धर्म अपवित्र कसे ठरवू शकतो? हा तर पुरूष जन्माचा उगम आहे. म्हणजेच मानव जन्माचे सातत्य राखणारा तो शरीरधर्म आहे.
         आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट. कोल्हापूरची महालक्ष्मी हे दैवत स्त्री आहे म्हणजे एक महिलाच आहे. दैवत असले तरी शरीरधर्म चुकणार नाही. मग महालक्ष्मीलाही आपण चार दिवस अपवित्र समजायजे का ???

-         डॉ. सुधीर रा. देवरे
            sudhirdeore29@rediffmail.com
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

सोमवार, १ ऑक्टोबर, २०१२

पाऊस यावा पण आपण पोचल्यावर...                                       - डॉ सुधीर रा. देवरे


इथे
प्रत्येकाला वाटतं
खूप
पाऊस यावा-
आपण
घरी पोचल्यावर...
ही माझी कविता आहे. आदिम तालनं संगीत या माझ्या अहिराणी कविता संग्रहात ही कविता आहे. मूळ कविता अहिराणी भाषेत असून तिचा हा मराठी अनुवाद. पाऊस कोणाला नको असतो? पण ऑफिसातून घरी निघताना मला वाटतं, त्याने जरा थांबावं. मी घरी पोचलो की पाऊस काय कोसळायचा तेवढा कोसळो.
पण मी घरी पोचलो म्हणजे सगळे जग घरी पोचेल असे थोडेच आहे? माझ्याऐवजी आता दुसरा कोणीतरी पावसाला थोडावेळ थांब म्हणेल. प्रत्येक पावसाळ्यात मला वाटतं, भरपूर पाऊस यावा मात्र माझ्या कोणत्याही कामाला व्यत्यय न करता यावा. पावसाने प्रमाणापेक्षा कमी येऊ नये आणि जास्तही येऊ नये. फक्त कामापुरते यावे.
हे झाले काव्यात्मक रसग्रहण. पण पाऊस आला तर मी पाणी साचवणार नाही. त्याला नीट वाहूही देणार नाही उतारावरून. माझ्या पन्हाळाचे पाणी माझ्या अंगणात सुध्दा पडता कामा नये. त्याला लांब पाईप लावून मी ते गल्लीत पडू देईल आणि शेजार्यांच्या अंगणातून कसे वाहील याची काळजी घेईल. मला पिण्यासाठी पाणी मात्र नगरपालिकेच्या नळाचेच पाहिजे. जे पावसाच्या ताज्या पाण्यापेक्षा कितीतरी पटीने दुषित असले तरी.
पावसाने यावे मी कितीही प्रदुषण केले तरी त्याने यावे. त्याला जमिनीत झिरपायला जागा ठेवली नसली तरी. त्याला येण्यासाठी योग्य तेवढी झाडी अस्तित्वात ठेवली नाही तरी त्याने यावे. वृक्ष लावायला जागा कुठून आणायची असेही कोणी म्हणेल. घराच्या आजूबाजूला जी थोडीफार जागा असते तिथे झाडे लावता येतात. पण आपले घर दुरून दिसावे म्हणून कोणी झाडे लावत नाही. कोणी असलेली झाडे तोडून टाकतात. झाडांना घराजवळची अडचण समजतात.
घराजवळ वृक्ष नकोत पण पाऊस हवा आम्हाला. वाटर सप्लायचे पाणी कपात सुरू झाल्यावर आम्हाला पावसाचे महत्व कळते. शेतकर्याला वझाड्यामुळे बांधावर झाडे नकोत पण पाऊस हवा पेरणीसाठी, पिकं तगवण्यासाठी आणि विहिरीतील पाणी पातळी वाढण्यासाठी. पर्यावरणाची काळजी न घेता सर्वांना पाऊस हवा. काही लोकांना तर पाऊसच नको पण घरातल्या नळाला पाणी हवंय चोवीस तास.

-         डॉ सुधीर रा. देवरे
     इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/