शनिवार, १ मार्च, २०१४

मराठीच्या अस्तित्वाचे प्रश्न आणि मराठी बोली 
-डॉ. सुधीर रा. देवरे

          (प्रस्तावना: सासवड येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील याच विषयाच्या परिसंवादात माझा सहभाग होता, पण माझ्या सहभागाची मला कल्पना नसल्यामुळे मी संमेलनाला उपस्थित नव्हतो. या परिसंवादाच्या विषयावर मी माझ्या ब्लॉग मधून लिहावे अशी अनेक मित्रांची मागणी होती. म्हणून सदर विषयावरचा मी हा लेख लिहिला आणि तो भाषा दिनाच्या मुहुर्तावर 27 फेब्रुवारी दोनहजार चौदाच्या  महाराष्ट्र टाइम्स मध्ये प्रकाशितही झाला आहे. आपल्या सर्वांसाठी तो इथे पुन्हा देत आहे.)
          आज आपल्यापुढे केवळ मराठीच्या अस्तित्वाचा प्रश्न नाही तर मराठी भाषा सकस, सशक्त होत दमदारपणे पुढे वाटचाल कशी करेल हा खरा चिंतनाचा विषय आहे. मराठी भाषा ही महाराष्ट्रात अ‍ाणि महाराष्ट्राबाहेरही मोठ्या प्रमाणात बोलली जात असल्याने तिच्या अस्तित्वाचा प्रश्न मुळीच उद्‍भवत नाही, असे काही अभ्यासकांचे मत आहे. असा निष्कर्ष काढणे काही ठराविक मर्यादेपर्यंत ठीक असले तरी मराठी यापुढे महाराष्ट्रात कशा पध्दतीने अस्तित्वात राहू शकेल हा मात्र चिंतेचा विषय ठरावा अशीच परिस्थिती आहे.   
            मराठी कसदारपणे संवर्धीत होण्यासाठी तिच्यात महाराष्ट्रातील बोलीभाषांचे प्रभावी उपयोजन होणे आज आवश्यक आहे. साहित्यातून हे काम प्रभावीपणे करता येते आणि ते तसे करणे सोपेही होते- आहे. महाराष्ट्रात लहान मोठ्या परिसरात बोलल्या जाणार्‍या जवळपास पासष्ट बोली आढळतात. बोलीतले शब्द साहित्यात उपयोजित करताना ते शब्द कोणत्या बोलीतले आहेत हे त्या त्या पुस्तकात वा तळटिपेत नोंदवण्याची मुळीच आवश्यकता नाही. लेखकाच्या निवासातून- त्याच्या क्षेत्रीय परिचयातून त्या बोलीभाषेचा परिचय आपोआप स्पष्ट होत जातो. उदाहरणार्थ, टहाळबन , चावळणे असे काही शब्द मी माझ्या कथा- कवितेत वापरले तर ते शब्द अहिराणी बोलीतले  आहेत हे मला स्वतंत्रपणे तेथे नमूद करण्याची आवश्यकता भासू नये. काही काळ तळटिपेत त्यांचा अर्थ सांगितला तरी पुरे. कालांतराने तशीही आवश्यकता भासणार नाही.
            एका बोलीतले काही शब्द जसेच्यातसे दुसर्‍या काही बोली भाषांमध्ये आढळतात. म्हणून ते शब्द अमूक बोलीतूनच इतर बोलींमध्ये आले असे आपल्याला ठामपणे मांडता येणार नाही. मात्र तरीही हे शब्द ते ते बोलीभाषक लेखक प्रमाणभाषेत साहित्य लिहिताना वापरत नाहीत. उदा. उलसा (लहान), जाम (पेरू), घुगरी (उस्सळ), कुद (पळ), दप (लप), व्हता (होता), असे काही शब्द फक्त विशिष्ट बोलीभाषेतच अस्तित्वात आहेत असे नाही, तर ते अनेक बोलींमध्ये वापरले जातात हे लक्षात येते. म्हणजेच हे शब्द बोलीभाषेतले असूनही मराठी प्रमाणभाषेत सर्वदूर परिचयाचे आहेत. असे शब्द मराठी साहित्यात रूळायला हवेत.
            इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या मराठी विषयांच्या पुस्तकात बोलीभाषांचा वितृत परिचय द्यायला हवा. महाराष्ट्रात पासष्ट बोलीभाषा बोलल्या जातात. म्हणून पाचवी ते बारावी या आठ इयत्तांमध्ये एकेक वर्गात आठ आठ बोलीभाषांचा परिचय थोडक्यात विद्यार्थ्यांना करून देता येऊ शकतो. मात्र पाठ्यपुस्तके तयार करणार्‍या मंडळाचे हे काम असून अशा मंडळावर योग्य व्यक्तींची निवड होणे गरजेचे आहे. अभ्यास मंडळ आणि पाठ्यपुस्तक मंडळातून जबाबदारीने असे काम झाले पाहिजे आणि त्यासाठी योग्य व्यक्ती तिथे पाठवल्या गेल्या पाहिजेत.
            नागर भाषा म्हणजेच प्रमाणभाषेचे महत्व अतोनात वाढवणे हे मराठीचे प्रवाहीपण कमी करण्याची चाल असू शकते. संस्कृत भाषेचा मारा करून प्रवाही मराठी वाक्यरचनेपासून सर्वसामान्यांना दूर लोटण्याचा प्रयत्न होतो. अशा प्रवृत्तींपासूनही सावध राहणे आज गरजेचे झाले आहे. या गोष्टींकडे लक्ष पुरवले तरच आपल्याला बोली बोलणार्‍यांचा न्यूनगंड दूर करता येऊ शकतो. अन्यथा बोली आणि प्रमाण मराठी यांच्यातली दरी यापुढेही वाढत जाऊ शकते.
            सारांश, बोली भाषा जिवंत राहिल्या तर प्रमाण मराठी जिवंत राहील आणि बोलींशी युती केल्यानेच ती प्रवाही होईल. प्रवाही असणे हेच जिवंतपणाचे लक्षण आहे. तं‍त्रबंधात अडकल्याने भारताची पारंपरिक ज्ञानभाषा असलेल्या आणि ‍जिच्यात विपुल दर्जेदार साहित्य लिहिले गेले अशा संस्कृत भाषेचे आज काय झाले हे सर्वज्ञात आहे. म्हणून आज मराठीचे प्रवाहीपण टिकवायचे की संस्कृतप्रमाणे तिला मृत भाषा होऊ द्यायचे हे आपल्याला आज गंभीरपणे ठरवावे लागेल. मराठी भाषेतून- साहित्यातून अगदी नियोजनबध्द उपयोजन करतच आज बोलीभाषांचे दस्तावेजीकरण सुलभ होऊ शकेल.
            हे खरे आहे की संवादाची कामचलाऊ मराठी भाषा कधीच मरणार नाही. मात्र तिचे क्षेत्र दिवसेंदिवस संकुचित होऊन ती फक्त ग्रामीण आणि झोपडपट्टीतल्या व्यवहारात पहायला मिळेल. अशा पध्दतीने तिचे महत्व कमी होत जाणार असल्यामुळेच हा चिंतेचा विषय ठरतो. आजच महाराष्ट्रात मराठी हा विषय शिक्षणात अजिबात नसला तरी मराठीत गप्पा मारत कोणत्याही शाखेचा पदवीधर होता येते, ही परिस्थिती बदलली पाहिजे. म्हणजे केवळ मराठी हा विषयच नव्हे तर एखाद्या विद्यार्थ्याला मराठी माध्यमातून बी. एससी. व्हायचे असेल तर पदवी पर्यंतची सायन्सची पुस्तके त्याला मराठीत उपलब्ध व्हायला हवीत. पूर्णपणे मराठीत शिक्षण घेण्याचा हक्क त्याला मिळायला हवा. रसायन शास्त्र, भौतिक शास्त्र, जीवशास्त्रांसहीत सर्व शास्त्रांची पु्स्तके त्याला मराठीतून उपलब्ध झाली पाहिजेत. अशी परिस्थिती आज अजिबात नाही. आज अनेक ग्रामीण आणि आदिवासी विद्यार्थी शास्त्राच्या ज्ञानात चमकतात. परंतु इंग्रजी माध्यमाच्या अडसरमुळे मागे पडतात.
            शास्त्रांच्या पुस्तकांप्रमाणेच संगणकाची भाषाही मराठी झाली पाहिजे. आज संगणकाची संपूर्ण भाषा मराठी होण्याची गरज असताना महाराष्ट्रातील संगणक विक्रेत्यांना मराठी फॉन्टस् बद्दल काही सांगता येत नाही. मराठी फॉन्टस हवे असतील तर आपल्याला त्यातील तज्ञांची भेट घ्यावी लागते आणि ते फॉन्टस त्यांच्या सल्याने आपल्या संगणकात अपलोड करून घ्यावे लागतात. विशेषत: ग्रामीण भागात अशा समस्या जास्त प्रमाणात आहेत. अशी दारूण परिस्थिती आजही आपल्या महाराष्ट्रात आहे. या पार्श्वभूमीवर संगणकातील संपूर्ण आज्ञावली व विंडोज सॉफ्टवेअर मराठीत आणणे ही कदाचित आपली कवी कल्पनाच ठरण्याची शक्यता अधिक आहे.
            मराठी भाषा मोठ्या भौगोलिक क्षेत्रात बोलली जाते म्हणून तिला धोका नाही असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरेल. मराठीची व्यावहारीक पिछेहाट कमी प्रमाणात असून शैक्षणिक व ज्ञान क्षेत्रातील पिछेहाट मात्र चिंताजनक आहे हे कबूल करावेच लागेल.
            अशा पध्दतीने भाषा विकसित करायची जबाबदारी कुणा एकाचीच वा काही विशिष्ट संस्थांचीच नसून ही सामुहीक जबाबदारी ठरते. यासाठी आपण सगळ्यांनीच सजग होणे आवश्यक आहे.
         (या ब्लॉगमधील मजकूराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या        
ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

    - डॉ. सुधीर रा. देवरे        
       इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा