बुधवार, १५ डिसेंबर, २०२१

आकाशकंदील

 

-        डॉ. सुधीर रा. देवरे

                     दिवाळीच्या दिवसांची चाहूल लागली की फटाके फोडण्याच्या तयारी सोबतच आकाशदिवा तयार करायची लगबग गावात सर्वत्र सुरू होई. दिवाळीच्या आधीच सहामाही परीक्षा होऊन शाळेला सुट्ट्या लागत. त्यामुळे दिवाळी अगदी समरसून साजरी करायला सोन्या उतावीळ झालेला असायचा. चान्नी, इमान, गोल डबा असे अनेक प्रकारचे आका‍शकंदील घरोघरी तयार केले जात. आकाशकंदील कसे बनवतात हे गावात, जवळपासच्या थोराड मुलांना कंदील बनवताना सोन्या लहानपणापासून पाहत आला होता. कोणी कंदील बनवत असताना त्यांच्या ओट्यावर तो जाऊन बसत असे. अमूक एखादा माणूस वा त्याच्यापेक्षा पुढच्या इयत्तेतला थोराड मुलगा कंदील कसा बनवतो हे तो ध्यान देऊन मनात साठवीत असे. काही इथं काही तिथं असं सर्वत्र थोडं थोडं पाहून शिकून झाल्यावर आपल्याला आता चान्नी नाहीतर इमान हमखास बनवता येईल असा विश्वास सोन्याला वाटू लागला. पण त्याला पहिल्यांदा चान्नी म्हणजे चांदणी बनवायची होती. विमानापेक्षा चान्नी बनवणं सोप होतं. चान्नीला कामड्या आणि रंगीत कागदही कमी लागणार होते.

                    आता सोन्याची आठवीची सहामाहीची परीक्षा संपली. या सुट्टीत आपण आकाशकंदील बनवायचा हे त्याने आधीच नक्की करून ठेवलं होतं. सुट्टी लागताच दुसर्‍या दिवशी दुपारी सोन्याने आपल्या मागच्या दारच्या वाड्यातून टोकराच्या काही कामड्या शोधून काढल्या. खोलीतला इळा घेतला आणि आकाशदिव्याच्या चान्नीसाठी कशा कामड्या लागतील, त्या इळ्याच्या सहाय्याने तयार करू लागला. एका फुटाच्या आकाराच्या बारीक बारा काड्यांच्या कामड्या त्याने तासून तासून तयार केल्या. आता बिल्लासभर आकाराच्या सहा त्याच जाडीच्या कामड्या तयार करायला घेतल्या. ह्या कामड्या तयार करताना कामडीची‍ शिळीक त्याच्या हाताच्या बोटात घुसली. तो रस्ताळला. ती दुसर्‍या बोटाने हळूच काढून आणि बोटाबाहेर येणार्‍या रक्‍ताकडे दुर्लक्ष करून त्याने आपलं काम सुरू ठेवलं. पण थोडी शिळीक बोटात रूतली असल्याचं त्याच्या ध्यानात येत होतं. कामडीच्या बारीक तसूला शिळीक म्हणतात. ती हातापायात घुसली तर रूतलेल्या काट्यापेक्षाही आत जास्त ठसठसते.

                    बिल्लासभर अशा आडव्या कामड्याही तयार करता करता तो खूप दमला. पण आतून आनंद होत त्याने काम बंद केलं नाही. तो मायकडे पक्का दोरा घ्यायला घरात गेला. आज नाहीतर उद्या संध्याकाळपर्यंत आपला आकाशदिवा तयार होईल आणि उद्या तो आपण आपल्या दारासमोर लावायचाच असा त्याने मनातल्या मनात निश्चय केला होता.

                    दोर्‍याच्या तुकड्यांनी त्याने आधी तीन तीन कामड्या बांधून कामट्यांचे चार त्रिकोण तयार केले. नंतर एका त्रिकोणावर वेगळ्या पध्दतीने दुसरा त्रिकोण ठेवल्याने कामट्यांचा आता छटकोण तयार झाला. तो छटकोन एकजीव करण्यासाठी दोर्‍यांच्या तुकड्यांनी ते पुन्हा तीन ठिकाणी बांधले. तशाच पध्दतीने दुसरा छटकोन बनवला. असे दोन छटकोन, आता त्या बिल्लसभर सहा काडक्यांनी आडवे जोडायचे होते. तेही त्याने न थकता न थांबता केले. कामट्यांची चांदणी तयार झाली होती. पण ती पक्की नव्हती. डुगडुग हलायची. आकाश दिव्याचा सांगाडा असा डुगडुग हलायचं कारण त्याने आपल्या ओट्यावरूनच मॅट्रिकला शिकत असलेल्या आपल्यापेक्षा थोराड नामदेवला विचारलं. नामदेव म्हणाला, वरतीन घोट्या कागद चिटकाडा का मंग त्या दोरासना सांधा पक्का व्हयी जातंस. तवपावत चान्नी आशीच ढील्ली वाटस. घोट्या कागद चिटकाडशीना तू, तथळ दोराना सांधासले जरासा जास्त खळ लायी दे.

                    हे ऐकल्यावर आपण बरोबर आहोत याचा आनंद सोन्याला झाला. आता त्याने पणती ठेवण्यासाठी पुन्हा नवीन छोट्या चार काड्या तासून आकाशदिव्याची खालची बाजू कोणती राहील हे ठरवून बांधल्या. हे करताना त्याने पणतीचे माप घेऊन काड्या बांधल्या आणि बांधून झाल्यावर आत पणती ठेऊन पाहिली तर त्या चौकोनात पणतीही ‍फिट्ट बसली. ‍ज्या कामडीला आकादिवा टांगला जाणार होता तिथं तो त्याने एका हाताने उचलून पाहिला. पणती ठेवली तर तिरपी होईल का याचा अंदाज घेतला. कंदील बरोबर वर उचलला गेला. म्हणजे पहिल्याच प्रयत्नात सर्व त्याच्या मनाप्रमाणे ठाकठिक होत होतं.

                    आता त्याने आकाशदिव्याचा तो सांगाडा घराच्या एका कोपर्‍यात जिथं कोणी जाणार नाही, कोणी धक्का लावणार नाही अशा ठिकाणी ठेवला. दुसर्‍या दिवशी घोट्या कागद कंदिलाला चिकटवायचं ठरवलं. वेगवेगळ्या रंगांचे घोटे कागद दुकानातून आणावे लागणार होते. चान्नीच्या आकारात कापून ते चिटकावे लागणार होते. नंतर चान्नी टांगण्यासाठी काठी आणि दोर्‍याची गुंडी लावावी लागणार होती. हे त्याने दुसर्‍या दिवसावर ढकललं आणि आता एका बोटात कामडीची जी शिळीक भरली होती ती सुईने बाहेर काढण्याचा प्रयत्न तो करत होता. कारण ती शिळीक बोटात ठसठसत होती. तिचं कनोरं बोटात मुडलेलं होतं.

                    दुसर्‍या दिवशी सकाळी उठून आपण काल तयार केलेला आकाशदिवा जागेवर आहे की नाही याची त्याने पहिल्यांदा खात्री करून घेतली. नंतर तो चहा पिऊन पुढच्या कामाला लागणार होता. अगोदर त्याने दुकानातून घोट्या कागद विकत आणायला मायकडे पैसे मागितले. गावातले काही लोक आकाशदिव्यांना बेगड कागद लावत असत. बेगड कागद घोट्या कागदापेक्षा महाग होता म्हणून बहुतेक जण घोट्या कागदच वापरायचे. जे लोक आकाशदिव्याला बेगड वापरत त्यांचा आकाशदिवा आकर्षक आणि जास्त उजेड देतो असं पाहणार्‍याला वाटायचं. सोन्याने मात्र आधीच ठरवलं होतं की आपल्या आकाशदिव्याला घोट्या कागदच वापरायचा. मायने हो नाही करता करता त्याला तीस पैसे दिले. त्यातून त्याने गुलाबी, पिवळा आणि निळा असे तीन वेगवेगळ्या रंगांचे कागद आणले.

          सोन्याने चांदणी आडवी करून गुलाबी कागदावर ठेवली. चांदणीच्या मधल्या भागाचे माप घेत त्या कागदावर त्याने पे‍न्सिलीने खुणा केल्या. मग त्या आकाराचे दोन गुलाबी कागद कात्रीने कापून घेतले. आता चान्नीच्या एका छोट्या त्रिकोणाचे माप घेत सोन्याने पिवळ्या कागदाचे बारा छोटे छोटे त्रिकोण केले. आता राहिले चान्नीच्या मधल्या भागाचे माप. ते माप घेऊन निळ्या रंगाच्या कागदाचे काप घेतले.

                    मायला त्याने खळ करायला सांगितला. गव्हाच्या पिठात पाणी टाकून चुल्ह्यावर चाळून थोड्यावेळ पिठल्यासारखा गदकवला की खळ तयार होतो. गव्हाच्या पिठाचा असा खळ चिकट असल्यामुळे कागद डकवायला तो डिंकासारखं काम करतो. मायने त्याला खळ तयार करून दिला. काप घेतल्याप्रमाणे त्याने सर्व कागद आकाशदिव्याला चिटकवले. दोरा बांधलेल्या सांध्यांना जास्त खळ लावला. पणती ठेवण्याच्या जागेखाली आणि वरून पणती ठेवण्यासाठी - दोरी बांधण्यासाठीच्या जागा कागद न चिटकवता सोडून दिल्या. आता चान्नी पूर्णपणे तयार झाली होती. चान्नीचा आकार थोडा वाकडा वाटत असला आणि कागद चिटकवतानाही कागदाला कुठं कुठं थोड्या गुड्या पडलेल्या दिसत असल्या तरी सोन्याने तयार केलेल्या चान्नीला चान्नीच म्हणता येईल असा कंदील तयार झाला होता. विशेष म्हणजे सोन्या व्यतिरिक्‍त कोणाचीही मदत नसलेला तो आकाशकंदील तयार झाल्यामुळे त्याला स्वत:ला खूप आनंद मिळत होता.

                    चिटकवलेले कागद आता वाळवण्यासाठी त्याने तो आकाशदिवा घरात कोणाचा धक्का लागणार नाही अशा कोपर्‍यात ठेऊन तो पुढच्या तयारीला लागला. आकाशदिवा टांगण्यासाठी त्याने लांब अशी दोरी शोधली. गावातल्या आबा शिंप्याकडून एक रिकामी दोर्‍याची गुंडी मागून आणली. ती गुंडी एका काठीवर फिरण्यासाठी काठीला चूक ठोकली. चुकीमध्ये गुंडी टाकून ती चुकीबाहेर निघू नये म्हणून चुकीच्या टोकाला दोरा गुंडाळून अडथळा निर्माण केला. (लहान आकाराच्या खिळ्याला चूक म्हणतात.) ती काठी आणि दोरी तो धाब्यावर घेऊन गेला. गुंडीचा भाग पुढच्या वरंडीवरून थोडा पुढे करून काठीच्या मागच्या टोकावर काही विटा आणि दगडी ठेवल्या. धाब्यावर कधीच्या काही दगडी पडून होत्या त्या आता कामाला आल्या. काठी हलत तर नाही ना याची खात्री करून घेतली. आकाशकंदील आणि तिच्यातल्या पणतीच्या वजनाने काठी तिरपी तर होणार नाही ना याचा आपल्या हातानेच अदमास घेतला. असं होऊ नये म्हणून चुकीचं दुसरं टोक जरा वर राहील अशी थोडी तिरपी काठी पक्की केली. गुंडीवरून दोरी सोडून दोरीचे दोन्ही टोके त्याने खाली सोडून दिले. एवढे झाल्यावर तो पुन्हा शेजारून मागून आणलेल्या साट्यावरून (शिडीवरून) धाब्यावरून खाली उतरला.

                    खाली येताच त्याने आकाशदिवा दोरीच्या एका टोकाला बांधला आणि दोरीचे दुसरे टोक ओढले. गुंडीवरून दोरी फिरत आकाशदिवा वर गेला. कंदील थोडा तिरपा दिसतो असं लक्षात आल्यावर त्याने तो आकाशदिवा दोरी ढिली सोडत खाली आणला. बांधलेली दोरी मध्यभागी नव्हती. ती मध्यभागी बांधली. आकाशदिवा पुन्हा वर नेला. आता सरळ दिसत होता. दोरीचं टोक त्याने खुंटीला बांधून दिलं. आताचा पणतीशिवायचा रीकामा आकाशदिवा घराला टांगलेला होता. संध्याकाळी पणती पेटवून आत ठेवली की झालं.

                    आता तो पणतीच्या तयारीला लागला. मायकडून वाता वळवून घेतल्या. पणतीमध्ये दोन वाता ठेवल्या. माय म्हने, येकेरी वात घिऊ नही. दोन घेवा.  म्हणून दोन वातांचा पिळ करून तयार केलेली एक वात पणतीत ठेवली. पणतीत गोडतेल भरलं. आतापर्यंत संध्याकाळ झालीच होती. पणती आणि काडीपेटी घेऊन सोन्या बाहेर आला. खुंटीची दोरी सोडून कंदील खाली आणला. जमिनीवर टेकू दिला. पणती पेटवून आल्हाद वरून आकाशकंदिलात ठेवली. पणती ठेवण्याचा खालचा चौक त्याने पणतीचे माप घेऊनच तयार केला असल्यामुळे पणती छान बसली. आतून आकाशदिवा उजळून निघाला. दोरी ओढत त्याने आकाशदिवा वर नेला. आकाशदिवा पन्हाळजवळ जाताच त्याने ती दोरी ताणून खुंटीला बांधली. हात सोडला. 

                    सोन्याच्या घरासमोर लागलेला हा त्याच्या घराच्या आयुष्यातला पहिला आकाशकंदील होता. आजपर्यंतच्या दिवाळींना बाहेर सान्यात पणती लावली की मायचं काम संपायचं. आकाशकंदिलाचा उजेड ओट्यावर जेमतेमच पडत होता. सान्यात लावलेल्या पणतीच्या उजेडापेक्षाही कमीच. पण दुरून पाहताना आपल्या घराला आकाशकंदील लावला आहे हे कोणाच्याही लक्षात येत होतं, हे सोन्याला जास्त महत्वाचं वाटलं.

                    गावात वीज नव्हती. तरी काही व्यापारी आणि नोकरदार लोक तालुक्याहून आयता आकाशदिवा आणायचे आणि त्यात पणती ठेवायचे अथवा वेगळ्या प्रकारची मेनबत्ती ठेवायचे. पण आयते आकाशकंदील गावात दोन चार घरासमोरच पहायला मिळायचे. बाकी हाताने बनवलेलेच आकाशकंदील असत. सोन्याने आपल्या घरासमोर नुसता आकाशकंदीलच लावला असं नाही तर तो ही त्याने स्वत: बनवलेला आकाशकंदील लावला याचा त्याला खूप आनंद होत होता. जो आनंद आजपर्यंत त्याला कशानेच झालेला नव्हता. सोन्याचा आनंद गगनात मावत नव्हता. आनंद गगनात न मावणे  हा वाक्‍प्रचार त्याने शाळेत अभ्यासला होता. त्याचा अर्थ सांगून वाक्यात उपयोगही त्याने सहामाही परीक्षेत केला होता. पण आनंद गगनात न मावणे म्हणजे काय हे तो आज पहिल्यांदा ह्या आकाशकंदिलाच्या निमित्ताने स्वत: अनुभवत होता.

                    (लोकवाड्‍.मय गृहातर्फे नुकत्याच प्रकाशित झालेल्या सोन्याची शाळा या कादंबरीतल्या एका प्रकरणाचा संपादित अंश. जो 3 डिसेंबर 2021 च्या 'अक्षरनामा'तही  प्रकाशित झाला आहे. इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह संदर्भ द्यावा ही विनंती.)

           © डॉ. सुधीर रा. देवरे

             ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/

बुधवार, १ डिसेंबर, २०२१

‘‘ ‘मी गोष्टीत मावत नाही’तले सुभाषितं’’

 

-       डॉ. सुधीर रा. देवरे

 

चित्रपटात पुरूष नाचत नाहीत. बायाही नाचत नाहीत आता. फक्‍त अवयव नाचतात.

अपेक्षा वाढल्या की नात्यातल्या नात्यात तेढ उत्पन्न होते. मग माणूस म्हणतो, 'कोणीही कोणाचं नसतं.' नात्यांच्या अपेक्षांच्या कोषातून बाहेर पडलं की कळतं माणूस माणसांसाठी आहे.

असुरक्षिततेच्या भावनेतून साठेबाजी होत असेल का?’

तब्येत दाखवायला डॉक्टरांकडे जाण्यासाठीसुद्धा स्वाभिमान आडवा येतो.

घराला कोणता पैसा लागला, हे घराच्या रचनेवरून सहज लक्षात येतं.

विचारांपेक्षा पदाला अधिक महत्व असतं. पद असलं की लोकांना आपण सांगितलं नाही तरी लोक 'हो' म्हणतात.

आपल्याला खुशमस्करे आवडतात. आपणही खुशमस्करी करत राहतो.

आपणच आपली सोबत करत चांगलं जगायला का नये शिकू?’

‘I am victim of the system of Religion and Politics of India.’  

देवा, अशी जागा दे लिहायला. तेथे माणूस यायला नको. माणसासाठी लिहायचं आहे. माणूस लिहू देत नाही.

कोणतं पुस्तक 'उभं' करायचं आणि कोणतं 'आडवं' याचा खेळ काही काळ समीक्षक करू शकतो.

अस्सल कलावंत अस्सल माणूस असेलच असं नाही. कदाचित तो विकृतही असेल. दुसर्‍या कलावंतांचा द्वेष करेल... कदाचित तो महामानवही असेल.

फ्लॅटमध्ये दार आतून बंद करून लेखक वैश्विक साहित्याची निर्मिती करू शकतो!’            

मित्र रंधा मारलेली प्रमाण भाषा बोलतो.

गुन्हेगार लोक धार्मिक - अध्यात्मिक असतातच!

निसर्गाचे नियम पाळायचे तर धर्माचे करायचे काय?’

एक प्लॉट अंटार्टिकात घेऊन ठेवायचा आहे. एक प्लॉट चंद्रावर आणि एक मंगळावर, मागे - पुढे असू द्य‍ावं. आपण आज आहोत, उद्या नाहीत. प्लॉट कुठं जाणार आहे?’            

ओढीला वय नसते. ओढीला संस्कृती नसते. ओढीला धर्म नसतो. खानदान, शील, काळ, वेळ काहीही नसते ओढीला. ओढ फक्‍त ओढीत राहते शरीर विरुद्ध शरीराकडे... दगडातून... फुफाट्यातून... काट्याकुट्यातून ओढीला. ओढाओढीत माणूस माणसात राहात नाही.

माणसांना भाषा बोलता आली नसती तर किती लोकांची हत्या टळली असती!

माणसाला लिंग नसल्यावर मनुष्य प्रगती करू शकेल का!

कोणत्याही ऋतूत मंदिराचा बाजार तेजीतच असतो. दुष्काळ असो की सुकाळ. तुम्हाला धंदा चालवायचा आहे ना, देवाचा टाका. भांडवलसुद्धा वर्गणीने सहज उभारता येते.

झाडाच्या आळ्यात रोज पाणी पडण्याच्या सवयीला अवकाश मिळाला की झाड दुसर्‍या झाडाच्या सावलीत शांत व्हायला कचरत नाही. आळ्यात पाणी पडले की पाने टवटवीत दिसू लागतात... भर उन्हात...

जाणिवेला ओव्हरटेक करीत जाणारा आविष्कार धावनानुसारी आकृती होत राहतो आणि भावनानुसारी मरूनही पडतो तात्काळ प्रसिद्धीत... कलेचा टाहो घशातल्या घशात विरून जातो.

माणसं भितात माणसांनाच खुर्चीवरच्या!

निसर्ग वाया जाऊ देणं तत्वात बसत नाही.

संघर्ष हा अस्तित्वाचा स्थायीभाव आहे.

जिंकलेल्या टीमचा न खेळलेला गडीही विजयीच असतो.

दारं खिडक्या बंद करून जिवंत समाधी घेऊन बसावं आपल्या घरात. सुरक्षित. इज्जतदार.

याला तुम्ही साहित्य म्हणा, तत्वज्ञान म्हणा, काव्य म्हणा, कला वा हवे तर काहीही म्हणा. पण हा आविष्कार तुमच्या माथी मारणार म्हणजे मारणारच.

संस्कृत भाषा बोलणारा सुसंस्कृत असेलच असे नाही. अथवा इंग्रजी भाषा बोलणारा ज्ञानी असेलच असेही नाही. संस्कृती सापेक्ष असते!

माणूस माणसाला नमस्कार करायला घाबरतो. म्हणून माणसाने दुरुत्तरे न करणार्‍या देवाला निर्माण केलं!

कोणत्याही घराची कितीही केली शांती, तरी माणसाची भूते नाचल्याशिवाय राहत नाहीत... जीवन कोणत्याच सुविचारात मावत नाही!

थडग्यात का होईना जीवंत आहोत, याची शाश्वती काय कमी मोलाची आहे आपल्यासाठी?  थडग्यात असून सर्व चवी चाखू शकतो...

शोष खड्डा कोणालाच दिसत नाही वरून. शोषत राहतो आतल्या आत... लोकशाही पुरस्कृत मतदारासारखा...

आपल्या देशात आपल्यापेक्षा अनेक वस्तूंचे वय खूप मोठे आहे.

विकास दारावर धडका मारत राहतो, तो कितीही रोखला तरी रोखता येत नाही.

भाषणासाठी फिजिकल फिटनेसची आवश्यकता असते की काय?’

संस्कृती थोर असते. तिचे गोडवे गायचे असतात. इतर देशांना नाही अशी उज्ज्वल संस्कृती आमच्या देशाला आहे. इतिहास आहे. अशी स्वप्ने उबवत आम्ही झोपी जातो. जाग येताच संस्कृतीचे स्वप्न तुटतात, असे लक्षात येताच आम्ही पुन्हा जाणून बुजून झोपण्याचा प्रयत्न करतो.

कशाचा नाहीतर कशाचा आधार घेत माणूस जीवन घालवत राहतो. माणूस माणसासारखा समग्र जगतच नाही. माणसाला देव कळतो पण माणूस कळत नाही.

या खुर्चीत वाघाऐवजी उंदीर बसला तरी तो वाघासारखाच वागेल आणि माणूस, उंदीर खुर्चीत बसला म्हणून त्याचे पाय चाटेल.

गाय खाते एकाचे झाड आणि पुण्य लाभते शेजार्‍यांना. झाड खाऊ देणे पुण्य समजले जाते.

नोकरी गोचडी सारखी चिटकून बसते अंगाला.

उपदेश ही एक फार चांगली गोष्ट आहे. कोणत्याही विद्वानाला एखादा उपदेशक भेटला तर उपदेशक धर्मात्मा आणि ऐकणारा गाढव.’          

कीर्तन करणे आणि कीर्तनासारखे वागणे यात फरक आहे. व्याख्यान देणे आणि व्याख्यानासारखे वागणे यात फरक आहे. देव मानणे आणि देवासारखे वागणे यात फरक आहे. माणूस असणे आणि माणसासारखे वागणे यात फरक आहे. 'वेळ मारणे' ही एकच एक गोष्ट आपल्या सगळ्यांना चांगल्यापैकी जमते.

मानवी अस्तित्वामागे अशी काही खरोखरच ईश्वरी प्रेरणा वगैरे असती तर एकाच ग्रहावर धर्म-पंथाची इतकी बजबजपुरी नक्कीच माजली नसती.

एक देवभोळा मित्र ज्याला अतिसामान्य आचरण पाळणेही शक्य होत नाही, तो श्लोक म्हणायला लागला की नेहमी त्याला म्हणतो, "तू ज्याची प्रार्थना करतो तो अस्तित्वात नाही म्हणून बरे नाहीतर त्याने पहिल्यांदा तुझ्याच मुस्कटीत मारली असती."

लेखक कितीही मोठे असले तरी बायका संसारीच असतात.

गोष्ट म्हणजे सुभाषितं नसतात!

कोणी आपल्यावर प्रेम करू लागलं की आपण तेवढ्यास तेवढं प्रेम परत करतो... आपण उसनं घेतलेलं परत करतो तसं... कोणी आपला द्वेष केला की आपण तेवढ्यास तेवढा द्वेष करतो...  उसनं परत करावं तसं...

आपण डोके चालवतो तसे डोळे चालवायला पाहिजे. म्हणजे स्पष्ट दिसेल.’         

चांगल्या माणसाच्या जवळपास अनेक अर्धवट खुजे लोक राहतात... म्हणून चांगल्य‍ा माणसाला उदास वाटतं...

नोट सरकवली की आज्ञा पाळली जाते. मुलाला हाक मारावं तसं कुत्र्याला लाडात वाढवलं जातं. कुत्र्याला हकलावं तसं माणसाला हाकललं जातं...’ 

वारा बरोबर जिरवून देतो सगळ्यांचा माज. इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे करून...’

नाहीतरी कोणते लोक कोणाला चांगले म्हणतात?’

लोकांच्या भावना इतक्या कशा प्रबळ आहेत. का कमकुवत आहेत. त्या कशानेही दुःखू लागतात.

भावना दुखल्या की समाज खडबडून जागा होतो. समाजाच्या भावना रोज दुखतील अशी व्यवस्था सरकारी पातळीवर राबवायला पाहिजे. म्हणजे समाज जीवंत राहील.

समजा बकर्‍यांच्या मेंदूचा विकास झाला असता... म्हशींच्या मेंदूचा विकास झाला असता... बैलांच्या मेंदूचा विकास झाला असता... माणसांऐवजी... तर त्यांनीही लावले असते शोध, त्यांच्याचसाठी उपयुक्‍त असे...’

प्राण्यांनीही पाळले असते कदाचित माणसं... गळ्यात कुत्र्यासारखा पट्टा बांधून... त्यांनीही सांगितली असती मग एखाद्या पुराणातली कथा. या जन्मात पाप केलं की माणसांचा जन्म मिळतो...’

काही लोकांनी लोकांच्या नावावर केलेल्या भ्रष्टाचाराला लौकीकदृष्ट्या लोकशाही असे का म्हटले जाते?’

सर्व मानवजात नष्ट झाली आणि कविता उरली तर कवितेचा काय उपयोग... म्हणून मानवजात नष्ट होणे थांबवले पाहिजे. त्यासाठी राजकारण थांबवले पाहिजे. त्यासाठी यादवी थांबवली पाहिजे. त्यासाठी युद्धे थांबवायला पाहिजे. लढाया थांबवायला पाहिजेत.

शस्त्रास्त्रे नष्ट केली पाहिजेत. बॉम्ब नष्ट केले पाहिजेत. म्हणजे मानवी आयुष्य वाढेल. आणि मानवी आयुष्य वाढले तर मानव कोणाच्याही का होईना पण कविता वाचेल...  मानव झिंदाबाद आणि मग कविता झिंदाबाद...’

कायम एखाद्याच माणसाला ठेचा का लागत राहतात.

एक बैल दुसर्‍या बैलाला जीवानिशी ठार मारत नाही...  एक हत्ती दुसर्‍या हत्तीला जीवानिशी ठार मारत नाही...  एक म्हैस...  एक वाघ...  एक सिंह...  एक मेंढी...  एक बकरी...  दुसर्‍या म्हैस...  कुत्रा...  वाघ...  सिंह...  मेंढी...  बकरीला ठार मारत नाही...  एक माणूस दुसर्‍या माणसाला शांतचित्तपणे ठार मारू शकतो...’

माणूस माणसाच्या जीवावर उठायला भाषा कारणीभूत ठरत असेल तर माणसाची भाषा नष्ट करायला हवी का!

काँम्प्युटर मानवी भाषेत बोलू लागला तर मला ग्रंथांप्रमाणे काँम्प्युटर हा अजून एक सोबती मिळेल...  मग मला माणसाची गरजच उरणार नाही.

वेदना म्हणजे काय...  ठणका म्हणजे काय...  हे फक्त भोगणार्‍यालाच कळतं का!...’

पाठीमागे कोणाविषयीच चांगलं बोलायचं नाही अशी लोकपरंपरा आहे!

आपल्या एका मढ्याची व्यवस्था नीट लागावी म्हणून आयुष्यभर अनेक मढ्यांसाठी सर्वसामान्य माणूस धावाधाव करत राहतो.

मेल्यानंतरच्या काल्पनिक स्वर्गीय सुखासाठीच्या लालसेने वास्तव जीवनात माणूस नरक भोगत असतो.

देवाची गाणी सिनेमाच्या गाण्यांवर आधारीत गावी लागावीत यातच देवाचा सपशेल पराभव आहे.

                    (मी गोष्टीत मावत नाही या कादंबरीतील काही निवडक सुभाषितं. लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह संदर्भ द्यावा ही विनंती.)

 

          © डॉ. सुधीर रा. देवरे

             ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.com/

सोमवार, १५ नोव्हेंबर, २०२१

पुस्तकांचा सुकाळ वाचकांचा दुष्काळ : भाग दोन

 

-      डॉ. सुधीर रा. देवरे

 

       डिजिटल वाचन जगात सुरू झाले आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे लोकांना वेब पोर्टलचे - ईबुक्सचे महत्त्व कळू लागले आहे. मात्र अनेक साहित्यिक (ज्येष्ठ साहि‍त्यिकसुद्धा) ईमेल वापरत असूनही, सोशल मिडियावर वावरताना दिसत असूनही वाचण्यास त्यांना पुस्तकाची हार्ड कॉपीच हवी असते! काही पुस्तके संगणकावर वाचण्यास हरकत नसते, पण ते वाचत नाहीत. अनेक प्रकाशकांनाही प्रकाशनासाठी लेखकाकडून पुस्तकाची हार्ड कॉपी हवी असते. ते काळानुसार बदलण्यास तयार नाहीत. उलट, त्यांच्या लक्षात येत नाही, की लेखकाकडून (प्रकाशनार्थ) पुस्तकाची सॉफ्ट कॉपी ईमेलने प्राप्त झाली तर पुस्तक पुन्हा टाईप करावे लागत नाही. हवे त्या फॉण्टमध्ये त्याचे लगेच अवस्थांतर करता येते.

       साहित्य संमेलन असले की अनेक वाचकमित्र विचारत असतात, साहित्य संमेलनाला जाणार आहात का? संमेलनाला गेले होते का? ‘नाहीअसे सांगितले तर का नाही जाणार?’ ‘का नव्हते गेले?’ असल्या विचारणा होत असतात. साहित्यिक असले म्हणजे साहित्य संमेलनांना हजेरी लावलीच पाहिजे असे अनेकांना वाटते. वाचकांत साहित्य म्हणजेच साहित्य संमेलन असे समजले जाते की काय? साहित्य संमेलनांच्या व्यासपीठांवर वावरणारा वा साहित्य संमेलनांना जाणारा तो साहित्यिक असाही समज दृढ होत चालला आहे. साहित्य संमेलनांकडे एक वारी म्हणून पाहणार्‍यांसाठी अथवा पर्यटन म्हणून साजरे करणार्‍यांसाठी अथवा दरवर्षी साहित्य संमेलनातील कुठल्या तरी मंचावर हजेरी लावणार्‍यांसाठी साहित्य संमेलन ही पर्वणी नक्की असते.

       मराठी माणूस उत्सवप्रिय आहे. फोटोप्रिय आहे. प्रसिद्धीप्रिय आहे. फेसबुक- व्हॉटस्अॅपप्रियही आहे. म्हणून काही साहित्यिक संमेलनांच्या दिंडीत नाचतानाचे फोटोही अपलोड करतात. सर्वसामान्य माणूसच नव्हे, तर साहित्यिक असलेले लोकही फेसबुकवर लिखाणापेक्षा फोटो जास्त अपलोड करत राहतात आणि लिखाणापेक्षा फोटोंना लाईक वाढत राहतात. अनेक साहित्यिक संमेलने, सेमिनार-वेबिनार, भाषणे, काव्यवाचन आदी कार्यक्रमांत रमतात, पण तोच वेळ ते चांगले वाचन करण्यासाठी खर्च करत नाहीत.

       लेखन, सार्वजनिक वाचन आणि सार्वजनिक ऐकणे हे कवितेच्या बाबतीत मात्र प्रचंड प्रमाणात घडत असते. कविता कशी आस्वादावी यावर विंदा करंदीकर एकदा मुलाखतीत म्हणाले होते, ‘कविता आस्वादायची नसते, भोगायची असते आणि तीही अगदी कपडे काढून’. त्याचा अर्थ कविता ही सार्वजनिक जागेत आनंद घेता येईल अशी कलाकृती नाही. ती सोवळेओवळे पाळून, मखरात बसवून पूजाअर्चना करण्याची आकृती नाही. कविता ही ‍एकांतात समाधी लावून, व्रत घेऊन, म्हणजेच अभ्यास करून मेंदू आणि हृदय यांनी जगण्याची-लिहिण्याची-समजून घेण्याची कला आहे असा त्या उद्‍गाराचा ध्वन्यार्थ काढता येईल.

       करंदीकर यांचे ते म्हणणे कवितेच्या ठिकाणी पुस्तक हा शब्द घालून वाचावे. पुस्तक कोणाचे आहे यापेक्षा त्याची काय ताकद आहे ते समजून वाचावे. मग लेखक ओळखीचा असो वा नसो! सारांश, कोणत्याही कलेचा, साहित्याचा उत्सव व्हायला नको. कला, साहित्य हे कोपर्‍यात उदयास येऊन कोपर्‍यातच त्याचा आस्वाद घेण्याचा असतो. त्यानंतर त्याचा सार्वजनिक बोलबाला व्हावा.

       पुस्तके प्रचंड प्रमाणात प्रकाशित होत आहेत. अगदी तालुक्याच्या ठिकाणी आणि गावागावातही प्रका‍शन संस्था स्थापन होत आहेत, अनेक लेखक (लिहिणारा तो लेखक या अर्थाने) स्वखर्चाने आणि स्वत: पुस्तके प्रकाशित करत आहेत. महाराष्ट्रात रोज कमीत कमी पंचवीस पुस्तके प्रकाशित होत असावीत. त्या हिशोबाने महिन्याला साडेसातशे व वर्षाला नऊ हजार पुस्तके प्रकाशित होत असावीत. इतकी सारी पुस्तके प्रकाशित होत असूनही महाराष्ट्रात सांस्कृतिक दुष्काळ वाढत आहे. माणसांचा वै‍चारिक दृष्टिकोन वाढत आहे असे दिसून येत नाही. अशा प्रचंड प्रमाणात साहित्य छापले जात असेल तर मग वाचकाने काय करावे? कोणती पुस्तके वाचावीत आणि कोणती वाचू नयेत हे त्याने कसे ठरवावे? म्हणून मी स्वत:ला एक शिस्त लावून घेतली आहे. मी पुस्तक वाचण्याची एक प्राधान्यसूची तयार केली आहे. ती अशी -  एक: वाचलीच पाहिजेत अशी पुस्तके, दोन: एकदा वाचण्यास हरकत नाही अशी पुस्तके व तीन: वाचली नाहीत तरी चालेल अशी पुस्तके.

      अशा पद्धतीने, मी एक आणि दोन क्रमांकाची पुस्तके वाचत असतो. पुस्तकांची अशी यादी केली की वाचन सोपे होईल हे खरे असले तरी त्यासाठी निकष कोणता लावावा हा यक्षप्रश्न राहतोच आणि कोणती पुस्तके वाचावीत व कोणती वाचू नयेत हे कोणाला विचारावे हे त्यापेक्षा कठीण!

               (दिनांक 16-10-2021 ला थिंक महाराष्ट्र डॉट कॉम वर प्रकाशित झालेल्या लेखाचा उत्तरार्ध. लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह संदर्भ द्यावा ही विनंती.)

 

      © डॉ. सुधीर रा. देवरे

          ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.com/