मंगळवार, ३१ ऑक्टोबर, २०१७

भाषांची स्थिती आणि परिस्थिती


 
-         डॉ. सुधीर रा. देवरे

      (साडेपाच वर्षातून पहिल्यांदा एक ब्लॉग वेळेवर ठरलेल्या दिवशी देता आला नाही. 15-10-2017 पासूनचा पंधरवाडा खाडा गेला.)

      जगात़ी सर्व भाषांची संख्या अमूक इतक़ी आहे असे काटेकोर सांगता येणार नसले तरी ती सुमारे 7000 इतकी आहे असा अंदाज वर्तवता येतो. जगातील भाषांपैकी अर्ध्याअधिक भाषा जेमतेम 2500 लोकांपेक्षा कमी लोक बोलतात. अंदमान- निकोबार बेटांवरील ओंगे आणि जारवा जमातीतील लोक तर शंभरांपेक्षाही कमी आहेत. 2050 पर्यंत जगातील निम्म्यापेक्षा अधिक भाषा समूळ मृतप्राय होतील. त्यातील बर्‍याच भाषा आजच मृत्यूपंथाला लागल्या आहेत.
      अमेरिकेत १९५१ साली रिचर्ड पिटमन यांनी जगातील भाषांचा कॅटलॉग तयार केला. तो अजूनही एश्नॉलॉगया नावाने दर चार वर्षांनी प्रकाशित होतो. २००४ साली प्रकाशित झालेल्या आवृत्तीत जगातील भाषांची संख्या ६९१२ अशी नोंदली गेली आहे. दर चार वषानी या कॅटलॉगमध्ये नव्याने उजेडात आलेल्या भाषांची नोंद होते. भाषांची संख्या एकीकडे वाढताना दिसत असली तरी मृत्यू पावलेल्या भाषांची संख्याही नमूद केलेली आहे. १९९६ ते २००० या काळात ४१४ भाषा मृत झाल्यात तर २००० ते २००४ या काळात ४९५ भाषा मृत्यू पावलेल्या आहेत. दर पंधरा दिवसांच्या काळात एक भाषा मृत्यू पावत असते, असा यातून अनुमान काढता येतो. या कॅटलॉगवरून एक गोष्ट लक्षात येते की, जगात एकूण किती भाषा होत्या वा आहेत हे अजून ठरायचे आहे.
      १९६१ सालच्या जनगणननेनुसार भारतात़ील बालींची संख्या १६५२ इतकी मोजली गेली. मात्र ह़ी संख्या नेमकी नाह़ी. भारतात़ील बोली व भाषा यांची एकूण संख्या अंदाजे १८00 इतक़ी असाव़ी. भारतातील आदिवासी भाषांची संख्या १८० इतक़ी सांगितली जाते. मात्र हे सर्व आकडे काटेकोर नाहीत.
      सर जॉर्ज ग्रियर्सन (१८५१-१९४६) यांनी प्रथमतः भारतीय भाषांचा सर्व्हे करण्याचा प्रयत्न केला. A Linguistic Survery of Indiaया नावाने तो खंडशः प्रसिद्ध आहे. पण हा प्रथम प्रयत्न असल्याने व त्यांच्याजवळ साधनांचा तुटवडा असल्यामुळे काही भाषांचे वर्गीकरण चुकीचे झाल्याचे लक्षात येते. उदाहरणार्थ, अहिराणी भाषेचे वर्गीकरण ग्रियर्सन यांनी भिल्ली भाषेत केले आहे. वस्तुतः अहिराणी बहुजन समाजाची लोकभाषा आह.
      भारतीय संविधानाच्या आठव्या परिशिष्टात भाषिक स्वायत्ततेच्या संदर्भात मार्गदर्शन केलेले आहे. संविधानानुसार अठरा भाषांना अधिकृत भाषा म्हणून मान्यता असली तरी इतर सर्व बोली व त्या बोलणार्‍यांचे अस्तित्व मान्य केले आहे.
      १९६१ सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील बोलींची संख्या ६५ इतकी आहे. मात्र ही संख्या ७५ च्या पुढे जाऊ शकते. कोकणीच्या सुमारे २० बोली आढळतात. अहिराणीत जवळ जवळ २१ बोलीभाषा आढळतात. या सर्व बोलींवर अहिराणीचा पगडा जाणवतो. वरील सर्व आकडे काटेकोर नसून सर्वसाधारण आहेत. महाराष्ट्रात ४७ आदिवासी जमाती असून त्यांच्या स्वतंत्र बोलीभाषा आहेत. २५ टक्के आदिवासी भाषा मराठीला जवळच्या बोलीभाषा आहेत. त्या मराठी माणसाला ऐकून समजतात. खरं तर सर्व प्रकारच्या बोली या स्वतंत्र भाषाच आहेत. बोली व भाषा हे वर्गीकरण योग्य नव्हे. डांगी, पावरी, राठवी, वंजारी, वडारी, गोंडी, कोरकू, कोलामी, बंजारा, मथवाडी, झाडी, ठाकरांची खिवारी या बोली सर्वसामान्य मराठी माणसाला समजायला अवघड वाटतात.
      एका भाषेच्या संपर्कात येणार्‍या भाषेत देवाण-घेवाण होत राहते. शब्दांची सरमिसळ होत राहते; पण भाषा स्वतंत्र असते. विश्वनाथ खैरे म्हणतात, ‘‘मानवाचे गट पुंजक्यांनी राहात होते. म्हणून जितके गट तितक्या अगणित बोली जगात नांदत होत्या.’’
       महाराष्ट्रातील बहुजनांच्या बोली व आदिवासींच्या बोली यांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे केले आहे.
बहुजनांच्या बोली : अहिराणी, माणदेशी, मराठवाडी, कोकणी, वर्‍हाडी, वैदर्भी, सातारी, पुणेरी (सदाशिव पेठी), दखणी, आगरी, भंडारी, दक्षिण कोकणी, उत्तर कोकणी, घाटी, मावळी, संगमेश्वरी, कुणबी, चित्पावणी, कुडाऴी रायपुरी, गुर्जर, लाडशिक्की, लेवापाटीदार, गुजरी, बडगुजरी, कोल्हापुरी, नेमाडी, मालवणी, भावसारी.
आदिवासी बोली : कोकणा, घाट कोकणी, डांगी, वारली, काटोनी, पावरी, राठवी, तडवी, पाडवी, वळवी, माची वंजारी (बंजारा), वडारी, चांभारी, महाराऊ, भिलोरी (भिल्ली), ठाकरी (खिवारी), कातकरी, गोंडी, कोरकू, कोलामी, कुटुबी, हळबी, कामारी, कटिया, कटकारी, करहंडी, मिरगानी, बाणकोटी, दमणी, धनगरी, कोळी, मथवाडी, झाडी, डांगणी, पारुषी (राजपूत भाटकाडागुरी, मांग-अंबुनी), गोलेवार.
      बहुजन लोकांच्या बर्‍याच बोली आज मृत्युपंथाला लागल्या आहेत. आपल्याला कोणी गावंढळ, खेडूत, मागासलेला म्हणू नये म्हणून आपल्या बोली न बोलता प्रमाण मराठी बोलण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. लहान मुलांना आपल्या बोलींपासून अगदी ठरवून लांब ठेवले जाते. ती भाषाच काय पण बोलीतला एखादा शब्द लहान मुलांच्या जिभेवर आला तरी त्याला घरातूनच खडसावले जाते. उदाहरणार्थ, एखाद्या अहिराणी भाषक कुटुंबात लहान मूल मराठी बोलत असले तरी त्याच्या जिभेवर एखादा अहिराणी शब्द सहज येऊन जातो. आई, माझ्या बोटाला रंगत निघाले बघ.हे वाक्य ऐकून आईला मुलाच्या बोटाला झालेल्या जखमेपेक्षा त्याच्या भाषेची काळजी जास्त वाटते. म्हणून आई मुलाला लगेच उपदेश करते, ‘रंगत नाही म्हणू. रक्‍त म्हणायचेअशा शिकवणुकीने पुढची पिढी बोलीभाषेपासून नुसती लांबच नाही जात तर ते आपली बोलीच हरवून बसणार आहेत. आता बोलीभाषा बोलणारे लोकही आपल्या दैनंदिन व्यवहारात अस्सल बोलीतल्या शब्दांपेक्षा प्रमाण मराठी भाषेतले वा इंग्रजीतले शब्द जास्त प्रमाणात वापरू लागलेत. अशा पद्धतीने बोली भाषेतले शब्द - अस्सल शब्द आधी मरतात आणि त्यांच्या पाठोपाठ बोलीभाषाही. उदाहरणार्थ, मूळ अहिराणी भाषेतलं वाक्य असं असतं, ‘‘तू कथा गयथा?’’ मात्र अलीकडे अहिराणी सोपी बोलली जाते. आता प्रश्न विचारला जातो, ‘‘तू कुठे गयथा?’’ अहिराणीतल्या कथाशब्द हळूहळू वापरेनासा होऊ लागला. कथाच्या जागी प्रमाण मराठीतला कुठेआल्लाद येऊन बसला. असे असंख्य उदाहरणे देता येतील.
      इंग्रजीचे प्रमाणही बोलीत असेच वाढते आहे. मूळ अहिराणी वाक्य : ‘‘मन्ही येरले झीळ फुटनात.’’ पण आता वाक्य ऐकू येतं. ‘‘मन्ही येरमा परक्युलेशन व्हयी र्‍हायनं’’ झीळच्या जागी सहज इंग्रजी परक्युलेशन शब्द येऊन बसला.
      भाषा मृत होऊ देणे म्हणजे लोकपरंपरांना मूठमाती देणे. आपल्या परंपरा आणि भाषा जाणूनबुजून मारणे. आपल्या स्वाभिमानाचा मृत्यू घडवून आणणे. If you kill the language you kill the nation! आपली बोलीभाषा जिवंत ठेवत इतर सर्व भाषांचा आदर राखणे - सन्मान करणे म्हणजेच जगा व जगू द्या सूत्र अंगीकारणे. परस्पर भाषांचा आदर करत माणसं जोडली जातात. प्रांत जोडले जातात. देश जोडले जातात. जग जोडले जाते. भाषेचा अभ्यास जग जोडण्यासाठी आहे. तोडण्यासाठी मुळीच नाही. दुसर्‍या भाषेला मनाई करून आपली भाषा वाढवता येत नाही. दुसर्‍या भाषेचा आदर करत वाढवता येते. भाषेबद्दल आपपर भाव ठेवणे घातक होऊ शकते. स्वभाषा जिवंत ठेवायची असेल तर दुसर्‍या भाषेचं नैसर्गिक जगणंही मान्य करावं लागेल.
      (पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘अहिराणीच्या निमित्ताने: भाषा’ या पुस्तकातून साभार. या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह  ब्लॉगचा  संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
  इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/