शनिवार, ५ एप्रिल, २०१४

आपली मते वाया जात नाहीत...


 
-         डॉ. सुधीर रा. देवरे

       अनेक नागरिकांचा असा समज आहे की आपण ज्याला मतदान केले तो उमेदवार निवडणुकीत पराभूत झाला की आपले मत वाया गेले! पण आपले मत कधीच वाया जात नाही, हे प्रत्येकाने लक्षात घेतले  पाहिजे. म्हणूनच निवडणुकीला उभ्या असलेल्या उमेदवारांपैकी मला कोणीही लोकप्रतिनिधीसाठी पात्र वाटत नाही अशी नोंद करण्याची सोय आपल्या निवडणूक आयोगाने आधीपासूनच केली आहे. यापूर्वी अशी नोंद करणे हे जरा गैरसोयीचे होते. पण आता इलेक्ट्रॉनिक बटणामुळे त्याच्यात सुटसुटीतपणा आला आहे.
         उमेदवार असलेल्यांपैकी कोणाला तरी मत देऊन आपण मतदान करण्याचे कर्तव्य पार पाडले अशा भ्रमात राहिल्यामुळे कोणीही अयोग्य उमेदवार निवडून येऊन पाच वर्ष सार्वजनिक पैसा पाण्यासारखा स्वत:साठी वापरतो आणि पाच वर्षात त्याची मालमत्ता पंधरा वीस पटीने वाढते. म्हणून दगडापेक्षा वीट मऊ या उक्तीने आता मतदान न करता जो खरोखर पात्र आहे अशा उमेदवाराला आपण मतदान केले पाहिजे. मग तो उमेदवार कोणत्याही पक्षाचा असो.
         मला अमूक पक्ष आवडतो म्हणून त्या पक्षाच्या कशाही नेत्याला निवडून देता कामा नये. आपल्या आवडत्या पक्षाने जर उमेदवार भ्रष्ट दिला असेल तर त्याला मतदान मुळीच करायला नको. न आवडणार्‍या पक्षाने जर चांगला उमेदवार दिला असेल तर आपण त्याला मतदान करायला हवे. कोणत्या पक्षाचे लोकप्रतिनिधी संसदेत जातील हे न पाहता, चांगले लोकप्रतिनिधी मग ते कोणत्याही पक्षाचे असोत, ते संसदेत गेले पाहिजेत.
         आपल्याला चांगल्या वाटणार्‍या उमेवाराची अनामत रक्कम जमा होईल असे आपल्याला वाटत असले तरी त्याच उमेदवाराला आपण मत दिले पाहिजे. जो बाहुबलावर, पैशांच्या बळावर, पार्ट्यांच्या बळावर, मतदारांना दारू वाटण्याच्या बळावर वा धर्म- जातीच्या बळावर निवडून येणार आहे, मग आपले मत वाया घालण्यापेक्षा त्यालाच देऊ असे जे कोणी विचार करतात त्यांच्यामुळे लोकशाही धोक्यात येत आहे. (काही उमेदवार कोणाला तरी लाभ पोचवण्यासाठी म्हणजेच मतविभागणीसाठी- मते खाण्यासाठी मुद्दाम उभे केले जातात. असे उमेदवार आपले नातेवाईक असले तरी त्यांना मतदान करू नये.)
         एका पक्षाचे संख्याबळ नसल्याने स्थिर सरकार कसे मिळेल अशा युक्तीवादाने काही राजकीय पक्ष मते मागतात आणि आपणही त्याला बळी पडतो. पण प्रश्न स्थिर सरकारचा नसून चांगल्या सरकारचा आहे. सत्तेची आणि पैशांची हाव नसलेले आणि देशाबद्दल तळमळ असलेले लोकप्रतिनिधी पक्षीय नव्हे तर राष्ट्रीय सरकार स्थापन करू शकतात, मग ते कोणत्याही विविध पक्षातले असोत. पक्ष महत्वाचे नाहीत तर देशाचा विचार करणारे चांगले नेते आपल्याला हवे आहेत. म्हणून या लोकसभेत आपण चांगले लोकप्रतिनिधी निवडून देऊ या.
         (या ब्लॉगमधील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

    - डॉ. सुधीर रा. देवरे        
       इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा