शनिवार, ११ ऑक्टोबर, २०१४

आपण नागरीक आहोत की मतदार!


                                - डॉ. सुधीर रा. देवरे
 
            (माझे  ब्लॉग  आता प्रत्येक महिण्याच्या एक आणि पंधरा तारखेला
     येत असले तरी विधानसभेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आणि  विषय तोच
     असल्यामुळे चार दिवस आधी ब्लॉग देत आहे)

         देशाचा पंतप्रधान निवडून झाला. आता राज्याची पाळी. मुख्यमंत्री कोणाला करायचे याची जबाबदारी आपल्यावर येऊन पडली. म्हणजे कोणत्या पक्षाला सत्तेवर आणायचे ते महाराष्ट्राचे नागरीक वा मतदार राजा ठरवणार. आपण ही जबाबदारी व्यवस्थित पार पाडतो असे म्हणणारे जगात काही तज्ज्ञ लोक असले तरी आपण विस्कळीत मनस्थितीतले नागरीक आहोत असेही अनेक अभ्यासकांचे मत आहे. देशात तथाकथित लाटेची चर्चा असूनही एप्रिल- मे 2014 मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीत प्रत्येक तीन लोकांमधून दोन लोकांनी मोदी सरकारला मत दिले नाही तरी ते पंतप्रधान होऊ शकले. (शंभरपैकी 35 गुण मिळाले की विद्यार्थी काठावर पास होतो, आणि 34 मिळाले तर नापास होतो. मात्र हे सरकार फक्‍‍त 31 टक्के मते मिळवूनही म्हणजे सपशेल नापास असूनही जगज्जेतासारखे डांगोरा पिटतंय.) असा चमत्कार फक्‍‍त भारतात होऊ शकतो, जो देश ह्या विश्वात सर्वात मोठा लोकशाही देश समजला जातो, वा सर्वात मोठा लोकशाही देश असल्याचा प्रचार फक्‍‍त आपण करतो.
            खरे तर आपण मतदार राजा आहोत की भारताचे नागरीक आहोत हेच आपल्याला अजून नीट कळलेले दिसत नाही. आपण मतदार राजा आहोत असे भारतातील सर्व पक्षांचे एकमत आहे. त्यांची प्रचार यंत्रणा मतदारांना प्रभावित करण्यासाठी राबवली जाते, नागरीकांसाठी नव्हे. आपल्याला निवडून देणारे लोक या देशाचे सजग नागरीक आहेत असे राजकीय पक्ष मानायला तयार नाहीत. म्हणून हे पक्ष निवडणूकीपूर्वी फक्‍‍त तीन महिने आधी मतदारांची खुशमस्करी सुरू करतात आणि निवडणूक संपली की ते मतदारांना सपशेल विसरून जातात. (म्हणून तर देशहितार्थ निर्णयांना सुध्दा खिळ घालायचा प्रयत्न इथले विरोधी पक्ष करीत असतात. विरोधासाठी विरोध करतात.) पुढच्या निवडणूकीच्या तीन महिने आधी यांच्याकडे काहीतरी फेकले तरी हे कुठे जात नाहीत हे लक्षात आल्यामुळे भारतातील राजकीय पक्ष वेगळे आणि मतदार वेगळे असे चित्र पहायला मिळते. या देशात सर्व काही पैशांत विकत घेता येते ते अशा मतदारांमुळेच. म्हणजेच राजकीय पक्षांना मतदार विकत घेता येतो. आणि मतदार कायम विकला जायला तयारच असतो. सजग नागरीक सोडून विकला जाणारा मतदार हा काही टक्के असला तरी सत्तेच्या गणितात कायम तोच निर्णायक ठरत असतो. (म्हणून राजकीय पक्ष आपल्या मतदारांची टक्केवारी पहात असतात. विविध चॅनल्सही अशीच टक्केवारीची भाषा बोलतात.)
            देशाचे प्रश्न वेगळे, राज्याचे वेगळे, आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे आणखी वेगळे यातला फरकही अजून अनेक मतदारांना माहीत नाही. म्हणून मतदान करताना अनेक गडबडी होतात. आपण ज्याला मतदान करतो त्या उमेदवाराचे चारित्र्य काय आहे, मते काय आहेत, विचार काय आहेत हे तर मतदाराला माहीत नसतेच पण अनेक उमेदवारांचे नावही मतदाराने त्यापूर्वी ऐकलेले नसते. तरीही हा मतदार त्या उमेदवाराला मतदान करतो. कारण त्याला कोणीतरी त्या चिन्हावर (प्रायोजित) शिक्का मारायला सांगितलेले असते वा पक्षाशी बांधीलकी म्हणून तो त्याला मतदान करतो. एक चुकीचा उमेदवार निवडून आपण देश वा राज्य कोणाच्या हाती सुपूर्द करीत आहोत याचा विचार आपण करतो का. असा विचार जो करत असेल आणि निवडणूक ते निवडणूक एवढ्यापुरतेच जो राजकारणाकडे नव्हे- समाजकारणाकडे बघत नसेल, असे नागरीक आज – एकविसाव्या शतकातही किती आहेत?
            युती आणि आघाडी तुटल्यामुळे ह्या वेळी किमान चौरंगी तर कमाल अनेक रंगी निवडणुका होतील. मनसे, बसपा, इतर छोटे छोटे पक्ष, अपक्ष, बंडखोर यामुळे उमेदवार वाढतील. त्यातल्या त्यात सर्वत्र सर्व पक्ष निवडणूक लढवणार असल्यामुळे ह्या वेळी बंडखोर कमी असतील असे वाटत होते पण चित्र स्पष्ट झाल्यावर लक्षात येते की या वेळीही बंडखोरांची संख्या मोठी आहे. प्रत्येक मतदार संघात अनेक लोक आमदार होण्यासाठी उत्सुक आणि मतदार राजा बिचार्‍याला एकच आमदार निवडायची सोय. समोर भरपूर उमेदवार निवडीसाठी उपलब्ध असल्यामुळे मतदाराला योग्य उमेदवार निवडता येईल हो त्यातल्यात्यात बरे आहे. म्हणून या वेळी एखाद्या पक्षाला झुकते माफ देण्यापेक्षा उमेदवाराच्या चारित्र्यावर लक्ष करायला हवे मग तो उमेदवार कोणत्याही पक्षाचा असो. असे सगळे चांगले उमेदवार निवडून आले की नंतर आघाडी करून ते चांगले सरकार देतील अशी अपेक्षा करायला काय हरकत आहे. 
         (या ब्लॉगमधील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या
   ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

        -  डॉ. सुधीर रा. देवरे
     
        इमेल: sudhirdeore29@rediffmail.com           

             इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/