शनिवार, २५ जानेवारी, २०१४

तीन ओळींची प्रतिज्ञा




-         डॉ. सुधीर रा. देवरे


         दर रविवारी प्रसिध्द होणारे माझे ब्लॉग कमीतकमी एक पानी वा जास्तीत जास्त दोन पाने इतक्या मजकूरापर्यंत असतात. पण आजचा ब्लॉग फक्त तीन ओळींचा आहे. या तीन ओळींव्यतिरिक्त त्यात अजून काही लिहावे वा स्पष्टीकरण करावे असे मला वाटत नाही. तीन ओळींची ही एक प्रतिज्ञा आहे. म्हणून या ब्लॉगचे नावही तीन ओळींची प्रतिज्ञा असेच दिले आहे.
         या तीन ओळींच्या प्रतिज्ञेचे पालन प्रत्येक भारतीयाने केले (महाराष्ट्राच्या जागी त्या त्या राज्याचे नाव घेऊन) तर रोज जे देशभर जातीधर्मावर वाद होतात- राजकारणी जे उथळ राजकारण करत राहतात, याला भारतीय नागरीक सहज थांबवू शकतील. त्या तीन ओळींची प्रतिज्ञा अशी:  

‘’ मराठी (महाराष्ट्रीयन) ही माझी जात आहे!
भारतीयत्व हा माझा धर्म आहे!!
भारताची राज्यघटना हा माझा धर्मग्रंथ आहे!!! ’’

जय भारत!!! जय जगत!!!

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!


     - डॉ. सुधीर रा. देवरे       
     इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
        

शनिवार, १८ जानेवारी, २०१४

राजकारणापासून दूर राहणे शक्य आहे काय?




-         डॉ. सुधीर रा. देवरे

         दोन माणसात सुरू होणार्‍या राजकारणाबद्दल मला बोलायचे नाही. एखाद्या कार्यालयात चालणार्‍या राजकारणाबद्दल मला बोलायचे नाही आणि एखाद्या गावातील संकुचित राजकारणाबद्दलही मला बोलायचे नाही. आज काही लोक अगदी आत्मप्रौढीने सांगतात, की मला राजकारणाबद्दल काहीही बोलायचे नाही, मला राजकारण आवडत नाही, राजकारणी लोक मला आवडत नाहीत आणि राजकारणात जाणेही आवडत नाही, अशा तटस्थ प्रवृत्तीबद्दल मला बोलायचे आहे. राजकारणाविषयी व्देषाचे बोलणे आणि ऐकणेही आपल्याला आवडत असले तरी देशाच्या राजकारणापासून दूर राहणे आज आपल्याला शक्य आहे काय?
         व्यक्तीगत पातळीवरच्या डबक्यातल्या राजकारणापासून सगळ्यांनी लांब असायलाच हवे. पण देशाच्या राजकारणापासून दूर राहिलोत तर आपण आपल्या देशाबद्दल अज्ञानी राहण्याची शक्यता तर आहेच, पण देश काय करतोय आणि त्याची दशा- दिशा काय आहे याबद्दलही आपण अनभिज्ञ असू शकतो. व्यापक राजकारणाची काही माहितीच नसली तर आपण कोणाला मतदानही करू शकणार नाही. कारण मतदान करताना आपली राजकीय प्रणाली काय आहे हेच आपल्याला समजणार नाही. काही लोक आज मतदान न करणे यालाही म्हणूनच प्रतिष्ठा मानतात. असे लोक राजकारणाकडे डोळेझाक करतील हे ओघाने आलेच.
         आपण आपल्यापुरता असा कितीही अराजकीय वाद स्वीकारला तरी तो आमलात आणणे शक्य आहे काय? आपण आपल्या गावातील पंचाला निवडून देणार नसू, नगरसेवकाला निवडून देणार नसू, जिल्हा परिषद- पंचायत समितीचे सभासद निवडून देणार नसू. आमदार-खासदाराला निवडून देणार नसू, तर मी अराज्यवाद पाळतो म्हणून माझ्याकडे कोणी कोणताच कर मागू नये असे आपल्याला म्हणता येईल का? आपल्या गावातील भौतिक प्रगती आपण कोणाकडून करून घेणार? सरकार नाकारून आपल्याला शासनात राहता येईल का?
         राजकारण करणे हे आपले काम नाही. भल्या माणसाचा तो प्रांत नाही. असे म्हणत आपण राजकारणापासून लांब रहायचे आणि राजकारणात गुंड, गुन्हेगार, भ्रष्टाचारी, लुटारू, व्यसनी लोकांचे प्रताप पहात  त्यानांच मुकाट्याने मतदान करत रहायचे.  त्यांच्याकडून चांगली कामे होण्याची मात्र अपेक्षा करत रहायची, असा हा सगळा प्रकार आहे.
         आंतरराष्ट्रीयच नव्हे तर भारतातील होऊन गेलेल्या राजकीय लोकांच्या नावावरून नजर फिरवली तरी फक्त राजकारणी लोक आणि राजकारण असे समीकरण दिसत नाही. राजकारणात अनेक पैलू असलेले लोक भेटतात. गांधी, टिळक, सुभाषचंद्र बोस, रानडे, नेहरू, अब्राहम लिंकन, चर्चिल, मंडेला, डॉ राजेंद्र प्रसाद, योगी अरविंद, आंबेडकर, सावरकर, शास्त्री, पी व्ही नरसिंहराव, व्ही पी सिंग, अटलबिहारी वाजपेयी, यशवंतराव चव्हाण, शरद पवार, ग प्र प्रधान, एस एम जोशी, डांगे आदी नावे डोळ्याखालून घातली तरी हे लोक फक्त राजकारणी नाहीत. यापेक्षा ते अजून कोणीतरी आहेत. कोणी कवी, कोणी साहित्यिक, कोणी गणिती, कोणी तत्वज्ञ, कोणी विचारवंत, कोणी समाजकार्यकर्ता, कोणी समाजसुधारक अशा विविध क्षेत्रातून राजकीय व्यक्तीमत्वे तयार होत जातात. आणि अशा विविध स्तरातून राजकारणात येणारे लोकच इतिहास घडवत असतात. दुर्गा भागवत अशा राजकारणापासून अलिप्त राहिल्या असत्या तर त्यांना आणीबाणीला विरोध करता आला नसता.
         तात्पर्य, विचारवंत, साहित्यिक, समाजसुधारक, शास्त्रज्ञ, संशोधक, मीमांसक आपल्याला राजकारण्यांमध्ये पहायचे असतील तर आपण सक्रीय राजकारणापासून लांब राहिलोत तरी चालेल पण एकूण राजकारणातल्या घडामोडींपासून आपल्याला लांब पळता येणार नाही. किमान राजकारणाबाबत सजग राहून त्यावर भाष्य करण्याचे काम तरी आपल्याला करावे लागेल.
   (या ब्लॉगमधील मजकूराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)


  - डॉ. सुधीर रा. देवरे          
     इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
     

शनिवार, ११ जानेवारी, २०१४

अभा साहित्य संमेलन निमंत्रणाची पध्दत



-         डॉ. सुधीर रा. देवरे

       अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन फक्त आठ दिवस पुढे होते अशा एका संध्याकाळी मला मोबाइलवर एक एसेमेस आला. खालील इमेल आयडी वर आपला बायोडेटा पाठवावा.
मी एसेमेसनेच विचारले, उद्या पाठवला तर चालेल का?
एसेमेसने उत्तर आले, हो चालेल. साहित्य संमेलनाच्या परिसंवादासाठी हवा होता.
कोणते संमेलन वगैरे न विचारता मी दुसर्‍या दिवशी माझा बायोडेटा इमेलने पाठवून दिला. त्यानंतर मी एसेमेसनेही कळवले, बायोडेटा इमेलने पाठवला आहे. मिळाला का? या एसेमेसचे वा इमेलचे उत्तर मात्र मला अद्यापही मिळाले नाही.
         यानंतर दोन तीन दिवसांनी मुंबईहून माझ्या एका मित्राचा फोन आला, आत्ताच साहित्य संमेलनाची पत्रिका मिळाली. परिसंवादात तुमचे नाव वाचून फोन केला. तुम्ही तीन तारखेला सासवडला येणार आहात का चारला? मग आपण भेटू तिथे. याबद्दल मला काहीच माहीत नसल्यामुळे मी म्हणालो, अजून माझे नक्की नाही. पण आलो तर तुम्हाला फोन करीन.
         मित्राच्या या फोनमुळे माझ्या लक्षात आले की परवा माझ्याकडे जो बायोडेटा मागितला गेला तो अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या परिसंवादासाठी असावा. नंतर मला असे अजून काही फोन आले. पण मलाच नक्की माझ्या सहभागाविषयी माहिती नसल्यामुळे गुळमुळीत उत्तरे देण्यापलीकडे मी जास्त बोलत नव्हतो.
         मंडळाकडून मला अशा आशयाचे अजूनही पत्र नाही. साहित्य संमेलनाची कार्यक्रम-निमंत्रण पत्रिका आली नाही आणि फोनही नाही. मी कोणत्या परिसंवादात आहे त्याचे नावही मला माहीत नाही. पण मला काही मित्रांचे आणि ओळखणार्‍यांचे फोन येत होते.  
         दिनांक 4-1-2014 ला दुपारी मला सासवडहून एका मित्राने फोन केला मी सासवडहून बोलतो. तुम्ही परिसंवादासाठी आलेले आहात का? मी नाही म्हणालो. त्यांनी का असे विचारले. म्हणून मी सांगितले की परिसंवादात माझा सहभाग आहे हेच मला माहीत नाही आणि परिसंवादाचा विषयही माहीत नाही.
         दिनांक 4-1-2014 ला सासवडच्या अ भा मराठी साहित्य संमेलनात माझा ज्या परिसंवादात सहभाग होता तो होऊन गेल्यानंतर  माझे कवी मित्र प्रा. संतोष पवार यांच्याकडून मला फोनने सविस्तर कळले, मराठीच्या अस्तित्वाचे प्रश्न आणि मराठी बोली या विषयाच्या परिसंवादात मला बोलायचे होते.
         कोणत्याही वक्त्याने आपल्याला दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलण्यासाठी आपली मते लिहूनच मांडली पाहिजेत म्हणजे वक्ता इतरत्र भरकटत नाही, अशी माझी भूमिका असल्यामुळे कोणत्याही विषयावर बोलण्यासाठी मी आधी माझे बोलणे लिहून घेतो. टिपणे काढतो. यासाठी किमान पंधरा दिवस हवे असतातच. मात्र या परिसंवादासाठी मला कोणतेही अधिकृत निमंत्रण नसल्यामुळे आणि विषयही माहीत नसल्यामुळे तशी टिपणेही मी काढलेली नव्हती. ऐनवेळी कोणाकडून समजले म्हणून मी केवळ हजेरी लावण्यासाठी संमेलनाला जाण्याचा प्रश्नच येत नव्हता. साहित्यिकाला असे गृहीत धरणे योग्य आहे का? (ज्या वेळी माझ्याकडे बायोडेटा मागितला गेला त्यावेळी जरी मला परिसंवादाच्या विषयाविषयी सविस्तर सांगितले असते तरी ते समजण्यासारखे होते. पण तसे झाले नाही. घाईघाईने हा परिसंवाद निश्चित झाला असावा, असे म्हणावे तर परवा एका आक्षेपावर मंडळाने स्पष्ट केले की संमेलनाची कार्यक्रम पत्रिका तीन महिण्यापूर्वीच छापली गेली होती.)
         आपण कुठल्या परिसंवादात आहोत का? माझ्या परिसंवादाचा विषय कोणता आहे? असे मंडळाला फोनने वा पत्राने स्वत: अभ्यासकाने विचारून वा इतरत्र परस्पर पत्रिका पाहून-ऐकून संमेलनाला यावे, असे जर मंडळाला अभिप्रेत असेल तर तसे मी केले नाही.

    - डॉ. सुधीर रा. देवरे        
       इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
     

शनिवार, ४ जानेवारी, २०१४

अरविंद केजरीवाल


                                -         डॉ. सुधीर रा. देवरे

       दोन वर्षांपूर्वी म्हणजे दोन हजार अकराला दिल्लीत जन लोकपालासाठी आण्णा हजारे यांच्या नेतृत्वाने जे आंदोलन झाले तेव्हापासून देशात अरविंद केजरीवाल हे नाव ऐकू येऊ लागले. आधी आयआयटीचे इंजिनियर, नंतर इनकमटॅक्स ऑफिसात एक कर्मचारी, त्यानंतर परिवर्तन नावाच्या एनजीओचे संस्थापक, पुढे आम आदमी पक्ष स्थापन करणारा नेता आणि आता दिल्लीचे मुख्यमंत्री अशी त्यांची वाटचाल. राजकीय पक्ष स्थापन केल्यानंतर फक्त तेरा महिण्यात ते दिल्लीचे मुख्यमंत्री झाले.
         दोन प्रकारचे लोक जगात कायम अस्तित्वात असतात. एक, लोकजागरण करून प्रबोधनाने जड व्यवस्थेला बाहेरून धक्का देणारे आणि दोन, बिघडलेल्या व्यवस्थेच्या आत प्रवेश करून ती व्यवस्था आतून ठाकठीक करणारे. हे दोन्हीही प्रकारचे लोक नागरिकांना दिशा देण्याचे काम करीत असतात. अरविंद केजरीवाल यांनी प्रथम पहिल्या प्रकारचा रस्ता धरला आणि नंतर नाइलाजाने त्यांना दुसर्‍या प्रकारच्या रस्त्यावर उडी घ्यावी लागली.
         भारतात बहुपक्षीय राज्यव्यवस्था असली तरी फक्त दोनच पक्ष यापुढे आलटून पालटून सरकार बनवू शकतील अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यापैकी एका पक्षाला स्वातंत्र्यपूर्व सव्वाशे वर्षाची महान परंपरा असून दुसर्‍याला पन्नास वर्षाची परंपरा आहे. या व्यतिरिक्त अनेक छोटे मोठे प्रादेशिक पक्ष देशात असूनही त्यांच्या भाषा, धर्म, जात, प्रादेशिकता आदी संकुचित उद्देशांमुळे एक प्रकारची पोकळी निर्माण झाली होती. या दोन राष्ट्रीय पक्षांसह सगळ्या प्रादेशिक पक्षात भ्रष्टाचार, अनाचार, जातीय-धर्मांधता अतोनात माजल्याचे पुन्हा पुन्हा सिध्द होऊ लागले. अनेक नेत्यांना सत्तेची नशा चढल्याचे दिसत होते. अशा पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी अस्तित्वात येणे ही देशाची गरज होती.
         कोणत्याही जाती-धर्माशी बांधिलकी नसणे, कमी खर्चात निवडणूका लढवणे, नागरिकांशी थेट संवाद, कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसणे, कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसणे, साधी राहणी, साधे कपडे, सामान्य लोकांत मिसळणे, कोणताही बडेजाव नसणे, सामान्य माणसांच्या वाहनातून प्रवास करणे, लोकांच्या समस्यांविषयी जागरूक असणे, सामान्य माणसाशी संवाद साधणे, अल्पमतातले सरकार येईल म्हणून सरकार स्थापनेसाठी जनमत चाचपणी घेणे आदी आम आदमी पार्टीच्या भूमिका दाद देण्यासारख्या आहेत. 
         दिल्ली राज्याचे सरकार यापुढे टिको वा पडो. (विश्वासदर्शक ठराव पास झाल्यामुळे आता ते किमान सहा महिने तरी स्थिर राहील.) त्यांना आपल्या जाहीरनाम्यातील तरतुदी पूर्ण करता येवो वा न करता येवो. हे सरकार आता सहा महिण्यांनी गेले तरी हरकत नाही. पण इतर राजकीय पक्षांपुढे या छोट्याश्या पक्षाने जो आरसा धरला तो फार महत्वाचा आहे. इतर पक्षात आता अंतर्मुख होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या देशातील नागरिकांना फक्त मतदार म्हणून मोजता येणार नाही असा संदेश इतर पक्षात पोचायला सुरूवात झाली ही सुध्दा काही कमी महत्वाची घटना नाही.
         स्वांतत्र्य मिळवून दिल्यानंतर देशातली त्यागी, धेयवादी राजकारणातली पहिली पिढी निघून गेली, दुसरी पिढीही निघून गेली. आणि आता फक्त (अपवाद वगळता) संधीसाधू उरले होते. आपल्या देशाचे या पुढे कसे होईल अशी अनेकांना चिंता लागली होती. अशा काळात असा एखादा पक्ष पुढे येणे ही काळाची गरज होती. रविंद्रनाथ टागोरांची एक कविता आहे:
मावळतीला जाताना
सूर्याने एक प्रश्न केला
आता माझ्या जागी कोण
या पृथ्वीला प्रकाश देईल?
शरमले ग्रह तारे
शरमले नक्षत्र सारे
तेवढ्यात मिणमिणती
एक पणती पुढे आली
आणि म्हणाली,
प्रभु मी माझ्या परिने प्रयत्न करीन!
         सूर्याची जागा तर कोणी घेऊच शकत नाही. परंतु आपल्या परीने जेवढा उजेड देता येईल तेवढा प्रकाश आपण इतरांना दिला पाहिजे. दिल्लीत अरविंद केजरीवाल एक पणती झाले. पण आपल्या देशात अशी एकच पणती नाही. वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात संथपणे तेवणार्‍या अशा अनेक पणत्या आहेत. राजकीय क्षेत्रात झटपट प्रसिध्दी मिळते, तशी इतर क्षेत्रात मिळत नाही. आणि स्वस्त प्रसिध्दीच्या मागे न लागता असे अनेक लोक आहेत की ते पणती सारखे काम अहोरात्र करीत आहेत. (चांगली माणसे मोजण्यासाठी माझ्या हाताला अजून बोटे हवीत! अशा आशयाची भालचंद्र नेमाडे यांची एक कविता आहे. खरं तर आपल्यात इतकी चांगली माणसे आहेत की ती दिसण्यासाठी आपली नजर कमी पडते.)
         आपणही त्यापैकी एक पणती होऊ अथवा अशा पणत्या विझू नयेत म्हणून त्यांना दोन्ही हातांचा आडोसा करून उभे तरी राहू या.
        
   - डॉ. सुधीर रा. देवरे         
       इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/