शुक्रवार, १ सप्टेंबर, २०२३

'माणूस', ‘माणुसकी’ व ‘पुरोगामीं’चे ‘वैश्विक संस्कार’!

  

- डॉ. सुधीर रा. देवरे

 

          मॉब, थवा, कळप यांचं मानसशास्त्र काय असतं? कळपातल्या भाबड्या लोकांचं सरासरी वय काय असतं? केवळ या प्रश्नांनाच अनुसरून नाही तर आजची परिस्थिती कोणत्याही कळपाहून दिवसेंदिवस भयानक होत आहे. म्हणून भलतीकडे संमोहित होऊ पाहणाऱ्यांच्या पायरीवर उतरावं लागत असल्यानं, हे प्रबोधन आजच्या काळात काही प्रगल्भ लोकांसाठी ‘बाळबोध’ ठरणार असलं तरी ते करावं लागणार आहे :  

          कारगिल युध्दाच्या आसपासच्या काळातली गोष्ट असावी. गोष्ट नव्हे, वास्तव घटना. एक हिंदू जोडपं काश्मीरचा प्रवास करत होतं. गाडी चालवताना पुरूष बायकोला म्हणाला, कपाळावरची टिकली काढून ठेव. कुटुंबाच्या मनात जी भिती होती तेच पुढं घडलं. रस्त्यात त्यांना पाकिस्तानी दहशतवाद्यांनी अडवलं. पैकी एकानं विचारलं, हिंदू हो या मुसलमान?’ त्या पुरूषानं क्षणाचाही विलंब न करता सांगितलं, मुसलमान. दहशतवादी म्हणाला, तो कुराण के कुछ आयत सुनवाईए. पुरूषानं प्रसंगावधान सांभाळत पाठ असलेले भगवद्‍गीतेचे काही श्लोक अडखळत म्हटले. ते ऐकून दहशवाद्यांनी त्यांना पुढं जाऊ दिलं.  

          दहशतवाद्यांना बरंच मागं टाकल्यावर त्याच्या बायकोनं विचारलं, कुराणातले म्हणून तुम्ही भगवद्‍गीतेतले श्लोक म्हटलेत. त्या आतंकींच्या हे लक्षात आलं असतं तर?’

          पुरूष सहज बोलून गेला, ह्या लोकांनी कुराण वाचलं असतं, तर ते अतिरेकी झालेच नसते!

          या उद्‍गारातून तात्कालिक प्रसंगात हा माणूस त्याच्याही नकळत किती मोठं तत्वज्ञान सांगून गेला!   

          अजून एक घटना. ओशोंनी (आचार्य रजनीश) त्यांच्या व्याखानात सांगितलेली. ओशोंना एकदा त्यांचा मित्र म्हणाला, माझी आई खूप धार्मिक आहे. त्यामुळं ती बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला भेटायला उत्सुक आहे. पण वृध्दत्वामुळं ती भेटायला येऊ शकत नाही. हे ऐकून ओशो स्वत: मित्राच्या घरी जाऊन आईला भेटले. गप्पांच्या ओघात आई म्हणाली, सध्या काय वाचताहात?’ ओशो मुद्दाम म्हणाले, ‘‘कालच बायबल वाचून संपवलं, आज कुराण वाचायला घेणार आहे!’’ हे ऐकून आई आश्चर्यानं म्हणाली, अरे, तुम्ही हिंदू असूनही दुसऱ्या धर्माचे ग्रंथ वाचता?’ ओशो फक्त स्मित करत न बोलता जायला निघाले. घराबाहेर सोडायला मित्रही आला. परतताना ओशो मित्राला म्हणाले, मला वाटलं आई खरंच धार्मिक असेल, पण त्या धार्मिक नसून संप्रदायिक आहेत! म्हणजे आप-पर मानणारी आहे. इतर धर्मांकडं दुषित दृष्टीनं पाहणारी आहे.  

               कोणत्याही धर्मातला खरा धार्मिक, अध्यात्मिक, धर्म-अभ्यासक परधर्माचा व्देष करत नाही. ज्यांनी आपल्या धर्मग्रंथांचा काळजीपूर्वक अभ्यास केला असेल त्यांच्या मनात इतर धर्मांचाही आदर असतो. कोणाचंही धार्मिक असणं इतरांसाठी दहशती वा विशिष्ट लोभासाठी नसेल तर ते लोकांना न आवडायचं काहीही कारण नाही! पण धर्मातले अर्धवट लोक स्वार्थासाठी अतिरेक्यांची भरती करतात. धर्माच्या वरवरच्या रंगात उन्माद भरतात. धर्मसत्ता म्हणजेच राजसत्ता समजणारे धर्मांध होतात आणि बाह्यरूपात धर्माच्या पेहरावातून दैवतांच्या खुणा वापरत आपला धंदा सुरू ठेवतात! जे लोक धर्माच्या आडून सत्ताकारण करतात त्यांचा जनकल्याण हा हेतू कायम संशयास्पद ठरतो!

          खऱ्या धार्मिकतेच्या कसोटीसाठी अगदी सोप्या शब्दांत एक सिध्दान्त मांडता येईल : कोणत्याही धर्मांत तीन पातळ्यांवरचे लोक गृहीत धरले तर- १) धर्माचा खोलवर अभ्यास करून आतूनच अध्यात्मिक असलेले लोक. (उदाहरणार्थ, हिंदू परंपरेतील संत ज्ञानेश्वर, तुकाराम, गाडगेबाबा, विवेकानंद, महात्मा गांधी इ.) २) धर्म वाचवण्याचा ठेका आपणच घेतला आहे अशा अविर्भावानं पण विशिष्ट स्वार्थासाठी धर्माचा चातुर्यानं उपयोग करून बहुजन समाजाला धर्मवेडं बनवण्याचा प्रयत्न करणारे धर्माचे दलाल. (उदा. परधर्माविरूध्द चिथावणी देणारे लोक, धर्मात आर्थिक- राजकीय सत्ता संबंध गुंतलेले लोक, बाबा- बुवा इ.) ३) क्रमांक २ वर असलेल्या दांभिक लोकांच्या नादी लागून आपली स्वत:ची बुध्दी गहान ठेवत, समाजाभिमुख नव्हे, तर सकाम-समूल्य मोबदल्यात समाजात बांडगुळी गुंडगिरी करणारे उन्मादी लोक. (उदा. सर्वसामान्यातले वाट चुकलेले लोक.) असे ‍दिसतील.            

          यात वर सांगितलेल्या १ क्रमांकाच्या अध्यात्मिक लोकांच्या नादी लागलेल्यांकडून अन्य कोणाचं नुकसान होत नाही, उलट त्यांची स्वसमाधानी आत्मोन्नती होऊ शकते. पण २ व ३ पासून सावधान! अभ्यासातून- चिंतनातून धर्मात काय चांगलं वा वांगलं ते आपणच शोधून योग्य ते आचरण करणं केव्हाही योग्य. वरील मांडणी पाहता स्वधर्माचा- तत्वाचा ठेका अन्य कोणाला कोणी का द्यावा?  

          हिंदू लोकसंस्कृतीत संशोधन करून याआधीच सुधारीत विचारांनी भगवान महावीर, गुरू नानक, गौतम बुध्द यांनी स्वतंत्र धर्मांची नव्यानं स्थापना केली, तर काही संतांनी धर्मांतर्गत विविध पंथांची स्थापना केली, हे सर्वज्ञात! (यात नास्तिकांच्या चार्वाक ह्या पंथाचाही समावेश.) भक्तीचे मार्ग अनेक आणि वेगवेगळे असू शकतात, आहेत. यांच्या व्यतिरिक्त छत्रपती शिवाजी, शाहू, राजाराम मोहन रॉय, विवेकानंद, संत तुकाराम, गाडगेबाबा, तुकडोजी, महात्मा फुले, गो. ग. आगरकर, धोंडो केशव कर्वे आदींनी धर्मातल्या अनेक वाईट व घातक परंपरांना  त्या काळी तिलांजली दिली! नाहीतर आजही महिला सती जात राहिल्या असत्या, अज्ञानामुळं चूल आणि मूल यातच खितपत पडल्या असत्या, मुलींची लग्न पाळण्यात होत राहिली असती. वर्तमानात काय योग्य वा अयोग्य याचा सारासार- साधकबाधक विवेक करून (कोणत्याही) धर्मातल्या वाईट गोष्टींना राम राम करायचा की डोळे बंद करून भजत सांभाळायचं ते ज्यानं त्यानं ठरवायचं. राज्यघटनेतील भाषण- लिखाण- अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आज लोकांसोबत आहे. गुंडगिरी- दहशतीविरुध्द अहिंसक निर्भय वैचारिक लढाईसाठी ही किती आश्वासक गोष्ट आहे!...  

          वाट चुकलेल्या प्रचार मोहीमेत शिक्षकही आज मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले दिसतात. कोणताही शिक्षक हा पेशानं हाडाचा शिक्षक समजला जातो. (फक्त व्यवसायानं नव्हे.) शिक्षकानं विद्यार्थ्यांना प्रथम 'माणूस' म्हणून घडवत माणुसकीच शिकवली पाहिजे. शिक्षक एकांगी- संकुचित विचार करणारा कसा असू शकेल? विषय कोणताही असो, शिक्षक हे पुरोगामीपणाचं मुर्तिमंत उदाहरण ठरलं पाहिजे! म्हणून तो फॅसिझमचा पुरस्कार कधीच करू शकत नाही! तसं करत असेल तर त्याला शिक्षकाच्या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही.

(उत्तर प्रदेशातील तृप्ती त्यागी नावाची एक शिक्षिका अल्पवयीन मुलांना धार्मिक व्देष शिकवते, तर दिल्लीतली अजून एक शिक्षिका देशातल्या नागरिकांची वर्गवारी करते. ही ताजी उदाहरणं म्हणजे आपला प्रवास नक्की कोणत्या दिशेनं सुरू आहे याची झलक समजावी.)

          नव्या विचारांसाठी जिथं आधीच मनाची- बौध्दीकतेची दारं आतून कडेकोट लावलेली असतात, तिथं मत परिवर्तन होणं पूर्णपणे बंद होतं. अलीकडे हे प्रमाण मनात भय निर्माण करण्याइतकं भयंकर वाढलेलं आहे. विशिष्ट लोकांनी विशिष्ट विचारधारेचा ब्रेन वॉश करून अनेकांना पूर्णपणे संमोहित केलेलं आढळेल. त्यांच्या विचारधारेच्या विरूध्द कोणी कितीही मोठा वास्तविक पुरावा सादर केला तरी ते त्यांच्या बाजूनं खोटा युक्तीवाद करत आकांडतांडव करत लढत राहतील, अथवा ओढूनताणून पटवून सांगण्यासाठी त्यांच्याकडे पुराणातली वांगी तरी असतील, अथवा त्यांचा प्रचार सपशेल उघडा पडला तर ते व्यक्तिगत दुश्मनासारखं तुमच्या अंगावर धाऊन येतील. मेंदूत फिट्ट बसलेली विचारधारा कोणी काढून घेतली तर त्यांना जगण्यासारखं आजूबाजूला काही दिसत नाही, हे जास्त भयानक आहे आणि हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशा लोकांवर आता मानसशास्त्रीय वैद्यकीय उपायांशिवाय दुसरा पर्याय नाही.     

          विशिष्ट विचारधारेचा ब्रेन वॉश होऊ द्यायचा की स्वतंत्रपणे विचार करायचा, कोणाच्या लादलेल्या विचारांनी गुलाम व्हायचं की योग्य मार्गदर्शनासाठी त्या विषयाचा अभ्यास करायचा, केवळ सांगीवांगी वा समाज माध्यमांतल्या प्रचाराच्या भरोशावर रहायचं की सारासार उपोद्‍बलक विवेक करायचा हे यापुढं ज्याच्या त्याच्या वकुबावर अवलंबून असणार. प्रत्यक्ष करण्यात नसली तरी वागण्यात आपल्यात सामाजिकता रूजायला हवी की नको? समाज माध्यमांवर फिरणाऱ्या बाबी खऱ्या की प्रचार हे समजण्यासाठी थोडातरी ऐतिहासिक सत्याचा वास्तव अभ्यास करत स्वत: सुज्ञ व्हायला हवं ना?

          समाज माध्यमांवर अलीकडे अचंबीत करणाऱ्या अनेक खोडकर घटना घडताहेत. कोणाचे विचार पटले नाहीत की समोरासमोर परिचय नसला तरी वा समोरच्याचे अन्य योगदान माहीत नसतानाही त्या व्यक्तीनं अमूकचा व्यक्तीगत गुन्हा केलेला असावा अशा पध्दतीनं धमक्या देत वेगळ्या नावांच्या फेक आयडींवरून ट्रोल केलं जातं. मानसिक संतुलन बिघडलेल्या वा अबनॉर्मल लोकांशी आपली गाठ आता रोज पडू लागली. इतरत्र ऐकू येणारा उन्माद आता आपल्या गावात, आपल्या घरादारापर्यंत येऊन पोचला. नागरिक जागरूक होत सावध राहिला तरच अशा कृत्यांना वेसण घालता येईल.

          नुकतीच घडलेली अजून एक घटना सगळ्यांनाच माहीत आहे. धावत्या रेल्वेत ड्युटीवर असलेल्या एका हत्यारबंद पोलिस कर्मचाऱ्यानं- सर्व्हीस बंदुक वापरून नुकतंच केलेलं हत्याकांड हे या विवेचनाचं ताजं उदाहरण. भावना पेटवणारे लोक केवळ सत्ता राखण्यासाठी भावना पेटवतात. ते सगळं खरं समजून एका संमोहित झालेल्या कर्मचाऱ्यानं पाच कुटुंबं क्षणार्धात नेस्तनाबूत केली. (स्वत:च्या कुटुंबासह). ज्यांनी कोणी या कर्मचाऱ्याच्या मेंदूत हा किडा सोडला ते मात्र नामानिराळं राहून सत्तेच्या उबेत मत्त आहेत. हा कर्मचारी एकमेव नाही, असे असंख्य लोक हे किडे चोवीस तास आपल्या मेंदूत घेऊन फिरताहेत. अशा बऱ्याच घटना आज आजूबाजूला घडू लागल्या आहेत.

          सारांश, आपण पुरोगामी आहोत का? जागतिक नागरिक आहोत का? आपल्यावर वैश्विक संस्कार आहेत का? या प्रश्नांची उत्तरं हो असतील तरच आज आपण माणूस म्हणवून घ्यायला पात्र ठरू! नागरिकांत बंधुभाव जागृत करण्याचं जे काम सरकारनं आपल्या वागणुकीतून दाखवून द्यायला हवं, ते आज नागरिकांना करावं लागतं, हे दुर्दैवं!

                    (अप्रकाशित. इतरत्र वापर वा अग्रेषित करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

© डॉ. सुधीर राजाराम देवरे

ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/