रविवार, ३१ ऑगस्ट, २०१४

हाऊ फोटूक कोना?


 
- डॉ. सुधीर रा. देवरे

(पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशनतर्फे दिनांक 13 एप्रिल 2014 ला माझी चार पुस्तके प्रकाशित झालीत. त्यातील अहिरानी वट्टा’ या माझ्या पूर्णपणे अहिरानी बोलीत असलेल्या पुस्तकातील एक संपादित कथा.)

            काही लोकस्ले फोटो काढाना भयान सोस ऱ्हास. कुठे नहीथे कुठे त्या फोटूकमा चमकायीच ऱ्हातंस. दखावाले अशातशाच ऱ्हातंस, पन फोटूकमा आशा रुबाबदार दिसतंस कनी जशा देशना पंतप्रधानच. कोना मुद्दाना मानोसना नहीथे आमदार-खासदारना कोनी कुठे फोटूक काढी ऱ्हायनं ते मजार मुंडी घालीसन ह्या लोकस्ना फोटूकबी पेपरमा छापी येस, मंग त्या याले त्याले सांगत सुटतंस, ‘‘आज पेपरमा मन्हा फोटूक पाह्या का?’’ मन्हा लहानपने भालू आप्पाकडे त्यास्ना बाहेरगावना नातेवाईक कॅमेरा घिसन इये. कुठेबी जावानं येळे त्यास्ना गळामाच कॅमेरा आडकायेल ऱ्हाये. त्यास्नाकडथाईन कोनी कोनी लोक फोटो काढी घियेत. फोटो काढानं येळे त्या हासाले सांगेत. म्हनीसन काही लोक बळेबळेच हासानं म्हनीसन कॅमेराकडे दात विचकी दियेत. आनि मंग फोटोमा त्यानी कवळी दखाडाकर्ताच फोटो काढा आशे वाटे. तैन्हपशी फोटो काढना म्हंजे कॅमेराकडे पाही हासालेच पाहिजे आशे मन्हा मनमा पक्क बठेल शे.
            फोटो काढनारा पाव्हना कॅमेरानी खटकी दाबानं येळे मोठाइन रेडीम्हने. रेडीम्हनानं येळेच कोनी म्हने, ‘‘थोडं थांबा, मी आता दाढी करी येस.’’ तो भाऊ दाढी करी यी पावत फोटो काढनारले तश्याच टांगळाई ठिये. हाऊ फोटो काढाना कार्यक्रम पाव्हाले तैन्ह गलीस्मा हायी गर्दी व्हयी जाये. फोटो चांगला येवाकर्ता तो ऊनमाच काढना पडस’, आशे फोटोवाला सांगे. म्हनीसन गुपचूप फोटो कोनलेच काढता इयेतना. फोटो काढानं येळे मांगे काही बी भितडासवरला खड्डा बिड्डा दखाऊ नहीत म्हनीसन फोटो काढाना मानसस्ना मांगे येकांदी चादर - बिदर नहीथे सतरंजी धरनी पडे. चादर धरनारा लोकबी आपला फोटो येवाले पाहिजे म्हनीसन मजार मुंडी घालेत. पुढे आमनी एसेस्सीनी बोर्डनी परीक्षा जवळ वनी. फॉर्म भराकर्ता पासपोर्ट साइजना फोटो लागेत. पन फोटो काढाले सटनाले येनं पडे. मंग येक दिवस आमना आंगडा आम्ही साबन लाई धुयात. धुवाई चुवाई वळायात. आनि तांब्यामा इस्तव घालासीन इस्तऱीकऱी आम्ह़ी चार पाच सबत़ी सटनाल अशा रुबाबमा फाट काढाले वनूत कनी, जशी काय आमनी सिनेमानी शुटींगच व्हती तैन. पन मन्हा फोटो काय रुबाबमां वना नही. त्या याळनी माले अजूनबी टहाळबन याद शे.  मन्हा पहिला फोटो व्हता आयुक्षना.
            हायी सगळं ध्यानमा ठिसन येकदाव सटनानी जत्रामा येक रुपयाले येक आशा मी बळेबळेजना वाघवर बशीसन फोटूक काढी घिदा व्हता. वाघवर बसनू तरी फोटोमा मी वाघ काय दखावू ना. फोटो चांगला येत नहीत म्हनून नही, ते माले पहिलापशी फोटूकनं आपरूपच नही. आजीबात सोस नही. फोटो रुबाबमा येत नही, यानं कारन फोटोकर्ता माले पोझच देता येत नही. फोटोमा कुठे मन्हा डोळाच लागी जातंस, ते कुठे मी भयानच नाराज दखास. कुठे मन्हा कपाळवरच आढ्या चढतीस ते कुठे डोळाच वटारायी जातंस. म्हनीसन डंख व्यालेलं अवकाशह्या मन्हा पहिलाच मराठी कवितासंग्रहना पाठमांगे सुध्दा मी फोटो छापाले दिधा नही. प्रकाशक फोटो मांगी मांगी कटाळी गया पन मी काय फोटो दिधा नही. आदिम तालनं संगीतआनि ढोलवर भाषा केंद्रनी परस्पर मन्हा फोटो बळजबरी काढीसन छापी दिधा.
            आता ह्या अहिरानी वट्टासदरवर मन्हा जो फोटो छापेल शे, त्यामातीनबी मन्ह्या कशा किवा दखातीस पाह्यात ना तुम्ही. तरी मी फोटो दिवू ना. पन संपादकना आग्रह. म्हनेत, ‘‘फोटो पाहिजेच.’’ दिधा ते म्हनेत, ‘‘रंगीतच पाहिजे.’’ मग काय देनाच वना.
            फोटोना आग्रहच जया म्हनीसन परोंदिस स्डूडीओमा मी फोटो काढा. फोटो पाहिसन फोटोग्राफऱ्ले म्हंतं, ‘मन्हा केस भयान धवळा करी टाकात हो तुम्ही. जरासा काळा करी देवा ना.’’ ते तो भाऊ म्हने, ‘‘तुम्हना केसच धवळा शेत ते फोटूकमाबी धवळाच इथीन ना. आता आशे करा, सकाळ कनी केसस्ले काळी मेंदी लायी आना. आपू मस्त फोटूक काढूत.’’
            कितीबी इशेश बातमी ऱ्हायनी तरी मी पेपरसकर्ता फोटो देत नही. तरीबी येखांदा वार्ताहर पाठपुरावा करत घरपावत यीसन चावळीबोली फोटो घी जातंस. आशा येळे आपला काही इलाजच ऱ्हात नही. हायी फोटोसहीत बातमी पेपरमा वनी का मंग लोक सांगतंस, ‘‘तुमना फोटो पेपरमा पाह्या बरका. मस्त शे.आपुले वाटंस, बातमी वाचीसन लोक आपलं अभिनंदन करतीन. पन लोकते नुसता फोटोच पहातंस. आनि आपलापावत फोटोनीच पोच देतंस.
            अहिरानी वट्टावाचीसन प्रतिक्रिया सांगणारा आता काही लोक भेटतंस. पन काही ते सहज सांगतंस, ‘‘प्रतिबिंबमा तुमना फोटो छापेल शे ना.’’ आशे सांगनारा येकजनले म्हंतं, ‘‘मी ते तुमले आधूनमधून रस्तामा भेटीच ऱ्हास. म्हनीसन मन्हा फोटो पाह्या नही तरी चालयी, पन तठे जे मी काही लिहेल ऱ्हास ते वाचीसन बरं वाईट सांगत जा.’’ त्यानी ते वाचेल नव्हतं म्हनीसन भाऊ जागेच कांडवाइ गया.
            तात्यासाहेब शिरवाडकर (कुसुमाग्रज) यास्ले, ज्ञानपीठ पारितोषिक जाहीर जयं, तैन्ह आम्ही साहित्यायनमित्र मंडळ गाडी करी त्यास्ले भेटाले नाशिकले गयथूत. तात्यासाहेब जवळ मी बसनू तधळ बोलता बोलता श्री. माधवराव सोनवणे यास्नी कधळ पटकशी फोटूक काढी घिदा ते समजनंबी नही. हायी गोटले पाचेक वरीस उलटी गया व्हतीन. आनि येक दिवस हॉफिसमा माधवराव सर वनात. माले वाटनं काही कामलेच वना व्हतीन म्हनीसन बसा बिसा म्हंत. तवशी त्यास्नी लंगापँटना खिसामातीन तो फोटून काढीसन मन्हा जवळ दिधा. तो फोटूक पाहीसन मी चाटच पडी गवू. फोटोबी कोराकरकरीत व्हता. जश्या कालदिसस काढा. मन्हा फोटो पाहीसन माले नवल वाटनच बुवा पन माधवसर यास्नी तो फोटो आवरी ठेवानी कमाल पाहीसनच मी हारखी गयथू. फोटोबी मस्त काढेल व्हता. ह्या फोटूकले अपवाद म्हनीसन आजूनबी तो मी वसरीमा लायी ठियेल शे.
            काही लोकस्ना घर गयं का, त्यास्ना कडला लगीनले पंधरा वरीस उलटी जातंस तरी त्या लगनना आलबमच दखाडतंस. पाहनारा लोकबी आलबम पाव्हामा रमी जातंस. मन्हाकडे कोनी इयेल ऱ्हायनं आनि दहा पंधरा मिनिट माले जर दुसरं काम करनं राह्यनं ते मी त्या इसमले टाइमपास म्हनीसन येकांदं पुस्तक वाचाले देस. पन बराच पाव्हना पुस्तकस्मा बोर व्हयी जातंस. हायीबी मन्हा ध्यानात येवा लागं. मंग त्या वसरीमा दखातीस त्या वस्तूसकडे बोट दखाडी इचारतंस, ‘‘हाई चिन्ह कसानं? हाई प्रमाणपत्र कोन्हं? हाऊ फोटूक कोन्हा?’’ म्हंजे मन्ह हातमजारलं काम आखो लांबी जास. मी आशाच मन्हा येक जुना मित्रना घर गयथू. त्याना लगनले बराच वरीस व्हयी जायेल व्हतात. म्हंजे सकाळ परो त्यानी आंडेरनं लगीन करनं पडयी. तरी त्यानी त्याना लगनना आलबम माले पाव्हाले दिधा. अलबम उघाडा आनि मी त्याले इचारं, ‘‘हाऊ फोटूक कोन्हा?’’ तो म्हने, ‘‘मन्हाच!’’
‘‘आशेका’’ म्हनीसन माले आलबम चाळानं नाटक करनंच वनं.

-         डॉ. सुधीर रा. देवरे
  इमेल: sudhirdeore29@rediffmail.com           
       इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
     

शुक्रवार, १५ ऑगस्ट, २०१४

भाषावादाचे संभावित धोके


                              - डॉ. सुधीर रा. देवरे

(पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशनतर्फे दिनांक 13 एप्रिल 2014 ला प्रकाशित झालेल्या अहिरानीच्या निमित्ताने: भाषा ’ या माझ्या पुस्तकातील एक संपादित लेख.)

      भाषावादाने भारतीय संघराज्यांत अनेकदा आणि वेळोवेळी डोके वर काढले आहे. ढोबळपणे भारतीय संविधानाने मान्य केलेल्या एकवीस अधिकृत भाषांवरून दृष्टी फिरवली तरी हे लक्षात येते. भारताची राष्ट्रभाषा कोणती असावी, यावर स्वातंत्र्योत्तर काळात सुध्दा वाद झाले आहेत. खरं तर असे प्रश्न वेळोवेळी उपस्थित व्हायला नको होते. भारतासारख्या मुठभर लोक साक्षर असलेल्या देशात स्वातंत्र्योत्तर काळात सुध्दा इंग्रजी ही राष्ट्रभाषा असावी अशी मागणी केली जाते, ही स्वातंत्र्याच्या पार्श्वभूमीवर एक विसंगत बाब होती. बहुसंख्याकांची भाषा ती राष्ट्रभाषा असे परिमाण लावले गेले तर हिन्दी हीच राष्ट्रभाषा कोणत्याही चर्चेशिवाय मान्य व्हायला हवी होती. पण तसे झाले नाही. म्हणून तात्विक दृष्ट्या हिन्दीला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळाला तरी नुसत्या दक्षिण भारतीय राज्यातच नव्हे तर केंद्र सरकारच्या सर्व  देशपातळीवरील कार्यालयातही कामकाजाची पत्रव्यवहाराची भाषा संग्रजीच राहिली. आज हिन्दी भाषक चळवळ जोर धरत आहे. मात्र न्यायालये आणि दक्षिण भारतीय लोक इंग्रजीचाच वापर करताहेत.
      राष्ट्रभाषेच्या नशीबी असे असेल तर प्रादेशिक भाषांचे काय होत असेल? ज्यांचे आजही केवळ बोली म्हणूनच अस्तित्व आहे, अशा भाषांची अवस्था काय असेल, याचा अनुमान केवळ गावातीलच नव्हे तर दिल्ली स्थित व्यक्‍तीही काढू शकेल. पुढे भाषावार प्रांत रचनेमुळे भारताचे आणि त्या त्या राज्याचे भाषिकदृष्ट्या प्रचंड नुकसान झाले. कायद्याने भाषिक राज्य झाल्याने बेळगाव मधील मराठी भाषक विद्यार्थ्याला क्‍तीने कन्नड माध्यमात शिक्षण घ्यावे लागते. सापुतार्‍यातील आदिवासी बालकांची मराठी-कोकणी मातृभाषा असूनही त्याला शालेय शिक्षण गुजराती भाषेत घ्यावे लागते. या उलट भाषावार प्रांत रचनेचे राज्य अस्तित्वात आले नसते तर बेळगाव आणि सापुतार्‍यातील विद्यार्थ्याला असे वरून लादलेले क्‍तीचे भाषा शिक्षण घ्यावे लागले नसते. म्हणूनच अशा  भाषा लादलेल्यांच्या मनात कोणत्याही भाषेबद्दल अढीही निर्माण झाली नसती.
      १९६० च्या आधी मुंबई राज्यात आजचा संपूर्ण महाराष्ट्र गुजरात यांचा समावेश होत होता. त्यावेळी बडोद्यातून अनेक मराठी नियतकालिके प्रकाशित होत असत. अभिरूची हे नियतकालिक त्यातीलच एक. गुजराथ आणि महाराष्ट्र हे अनुक्रमे गुजराथी मराठी भाषिक स्वतंत्र राज्य झाल्यावर गुजराथमधील मराठी नियतकालिके बंद पडू लागलीत. सांस्कृतिक कार्यक्रम बंद होऊ लागले. मराठीला गुजरात राज्यात ओहटी लागली. अशाच घटना कर्नाटकात घडू लागल्यात. मध्यप्रदेशात हेच घडले आणि परवापरवाच्या गोवा राज्यात तेच घडते आहे. भाषावार प्रांतरचनेमुळे राष्ट्रीयत्व बाजूला पडून प्रादेशिकतेबरोबर भाषिक अस्मिता वाढल्या आणि सीमा प्रश्नांच्या नावाने त्यांचा भडका उडत राहिला. म्हणून भाषावार प्रांतरचना झाली नसती तर भाषिक सौहार्द टिकून राहिले असते. १९६० च्या दरम्यान जे महाराष्ट्र-गुजरात संबधात वितुष्ट आले, ते आले नसते. महाराष्ट्र-गुजराथ व्दिभाषी राज्य असते तर आज गुजराती-मराठी माणसं आत्तापेक्षा मनाने जवळ राहिले असते.  
      आण्णासाहेब किर्लोस्कर यांचे नाट्य प्रेम कर्नाटकातून आले तर राम गणेश गडकरी यांच्या एकच प्याला या नाटकाचा पहिला प्रयोग बडोद्यात झाला. कवी चंद्रशेखर, . . ठोकळ यांचे पहिले कवितासंग्रह गुजरातमध्ये प्रकाशित झालेत. भा. रा. तांबे मध्यप्रदेशातून उजेडात आले तर कवी वा. रा. कांत निजामशाहीतील मराठवाड्यातून प्रसिध्दीस आले. मात्र अशा घटना भाषावार प्रांतरचनेमुळे आज दुर्मिळ होतांना दिसतात.
      आजची एक घटना येथे उदृत करणे अगत्याचे ठरेल. बडोदा येथे डॉ. गणेश देवी यांनी भाषा नावाची एनजीओ स्थापन करून या बिगर शासकीय संस्थेतर्फे संपूर्ण भारतातील बोली भाषांचे वर्धन होत आहे. नुकतेच , १० मार्च २०१० ला संपूर्ण भारतातील बोली भाषक भाषाभ्यासक बडोदा तेजगड येथे एकत्र जमले त्यांनी आपसात हितगुज केले. डॉ. गणेश देवी हे कोणत्या राज्याचे? कोणत्या भाषेचे? हे शोधणे वा विचारणे येथे अज्ञानमूलक  ठरेल.
भाषिक मुस्कटदाबी केली तर प्रश्न उग्र होत जातो हे अजून एका उदाहरणाने स्पष्ट करता येईल. पाकिस्तानपासून बांगलादेश स्वतंत्र होण्यात इतर कारणांबरोबरच बांगला भाषा हे ही एक महत्वाचे कारण होते, हे विसरता येणार नाही. भाषिक अस्मिता कोंडली गेली तर तिचा स्फोट बांगलादेश स्वतंत्र होण्यात होतो. म्हणून कोणाचे मातृभाषेतील अभिव्यक्‍ती स्वातंत्र्य हिरावून घेणे म्हणजे बंडाला आमंत्रण ठरते. हा झाला कालपर्यंतचा भाषिकपट. पण आज आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे?
      राष्ट्रभाषेचा वाद तसा आजही अधूनमधून सुप्त भाषिक कलहामुळे उद्भवतो. याचे ताजे उदाहरण म्हणून एकदा संसदेत घडलेल्या घटनेचे देता येईल. एका हिन्दी भाषिक खासदाराने संसदेत प्रश्नोत्तराच्या तासात हिन्दीत प्रश्न विचारला तर दक्षिण भारतीय मंत्र्याने त्या प्रश्नाचे उत्तर इंग्रजीत दिले. यावर प्रश्नकर्त्या खासदाराने हरकत घेतली. शेवटी पंतप्रधानांना या तिढ्यावर भाष्य करावे लागले. तेव्हा पंतप्रधान श्री. अटलबिहारी वाजपेयी हे होते. पंतप्रधानाच्या भाष्याचा सारांश असा होता: लोकप्रतिनिधींनी प्रश्न विचारलेल्या भाषेतच मंत्रीमहोदयांनी उत्तर द्यायला हवे असा संकेत असला तरी कोणावर तसे बंधन घालता येत नाही.
      स्वभाषेविषयी प्रेम असणे ही स्वाभाविक बाब असली तरी भाषेबद्दल दुराग्रह वा अट्टहास असणे मात्र आतंकवादी गोष्ट ठरविली गेली पाहिजे. भाषिक वाद बहुतांश वेळा इतक्या टोकाच्या सीमा गाठतात की त्याबाबत आपण कल्पनाही करू शकत नाही. हे विवेचन लिहिते वेळी मला गुरखाभूमी मुक्‍ती चळवळीचे नेते सुभाष घेशींग नावाची पूर्व भारतीय व्यक्‍ती आठवते. जी व्यक्‍ती स्वत:ला साहित्यिक- कवी म्हणवून घेतेच शिवाय इतकी स्वायत्त समजते की भारतांतर्गत प्रश्नांबद्दलची दाद परदेशी पंतप्रधानांकडे मागण्यापर्यंत त्या व्यक्‍तीची मजल गेली होती.
      काही वर्षांपूर्वी (ठार होण्यापूर्वी) कुप्रसिध्द चंदनचोर वीरप्पन याने आपल्या तथाकथित कॅसेटीत कर्नाटकात तमिळ भाषेला उत्तेजन द्यावे अशी मागणी केली होती. यावरून भाषेचा दुराग्रह किती दहशतवादी उग्र टोक धारण करू शकतो याची प्रचिती येते.
      समजा, उद्या अहिरानी भाषिक चार जिल्ह्यांनी स्वतंत्र राज्याची मागणी केली. स्वतंत्र विदर्भ राज्याची तर आजच मागणी होतेय. पण या स्वतंत्र विदर्भ राज्याची भाषा कोणती असेल? वैदर्भी?, मराठी? का हिन्दी? भाषावार प्रांत रचना झाल्याने राज्यांच्या प्रगतीपेक्षा भाषिक दृष्या नुकसानच झाले याचे विवेचन या लेखाच्या सुरूवातीला आले आहे. असे छोटे छोटे स्वतंत्र भाषिक राज्य उदयास आल्यास परस्पर संवादापेक्षा राष्ट्रीय पातळीवर विसंवादच होण्याची भिती अनाठायी नाही. भाषिक आणि प्रांतिक अस्मितेचा अतिरेक राष्ट्रीयत्वास मारक ठरतो.
      महात्मा मोहनदास करमचंद गांधी हे गुजराती मातृभाषक होते तर सुभाषचंद्र बोस हे बंगाली मातृभाषक होते. मात्र त्यांनी आपल्या प्रांतिय मातृभाषेचा दुराग्रह धरता राष्ट्रीय चळवळीसाठी हिन्दीचा पुरस्कार केला. आज अशा समन्वयवादी नेत्यांची, भाषक अभ्यासकांची, तज्ज्ञांची आपल्या देशालाच नव्हे तर सर्व विश्वाला गरज आहे.
      भाषावादाचे असे संभावित धोके पाहिल्यास भाषेचे हत्यार हेही एक दुधारी शस्त्र आहे, असे लक्षात येते. म्हणून ते जपून वापरले पाहिजे. भाषा या माणूस-समाज-संस्कृती जोडण्यासाठी असतात. तोडण्यासाठी नव्हे. भाषांनी व्यक्‍ती, समाज जोडून स्वभाषा परभाषेत संवाद घडवून आणला पाहिजे म्हणजे विविध बहुभाषिक राज्य अशा संवादाने जोडले जातील. राष्ट्रीय पातळीवर बहुभाषिक राज्य आंतरराष्ट्रीय पातळीवर बहुभाषिक राष्ट्र जोडून भाषिक आंतरराष्ट्रीय एकात्मता सिध्द करता येईल. सारांश, परभाषेच्या आदरावरच स्वभाषेची वाढ होऊ शकते.

   - डॉ. सुधीर रा. देवरे         
       इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/